उरूस, 25 एप्रिल 2021
उसंतवाणी-28
( नाशिकला ऑक्सिजन गळतीने 24 रूग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना नेमकी राम नवमीलाच घडली. देशभरात ऑक्सिजनचा मोठा तुटवडा आहे असे एक चित्र उभं केल्या गेले. विरोधक आणि सत्ताधारी एकमेकांवर आरोपाच्या फैरी झाडत आहेत. आणि तिकडे लोकांचे जीव जात आहेत. )
प्राणवायु भरे । सृष्टीत सजीव ।
तरी गेले जीव । त्याच्यावीना ॥
राम नवमीला । राज जन्मावेळी ।
‘रामनाम’ पाळी । मुखी आली ॥
होतील बदल्या । येती अहवाल ।
जनतेचे हाल । पाहवेना ॥
लोकांसाठी म्हणे । राबते यंत्रणा ।
तरी हा ठणाणा । नशीबात ॥
विरोधक आणि । मत्त सत्ताधारी ।
आरोपाच्या फैरी । झाडतात ॥
बेपर्वाईचे हे । बळी नव्हे खून ।
करीती मिळून । भ्रष्ट सारे ॥
कांत म्हणे शोधू । व्यवस्थेचे भोक ।
बंदोबस्त चोख । करू त्याचा ॥
(23 एप्रिल 2021)
उसंतवाणी-29
(कोरोना काळात कुंभमेळ्यावर बंदी आली. पश्चिम बंगालातील शेवटच्या तीन टप्प्यातील प्रचारात सभा रॅली मेळावे यांवर रोक लावण्यात आली. पण इतकं असतानाही किसान आंदोलन सुरूच होते. कोरोना बिरोना सब झुठ है असले बेजबाबदार वक्तव्य राकेश टिकैत यांनी केले. दिल्ली कोरोना रूग्णांसाठी नेण्यात येणार्या ऑक्सिजनची वाहनंही या आंदोलना मुळे अडल्या गेली. त्यांना लांब वळसा घालून न्यावे लागत आहे. )
बंगालात बंद । रॅली सभा मेळा ।
थांबे कुंभमेळा । कोरोनात ॥
कृषी आंदोलनी । इफ्तारचा थाट ।
रोकलेली वाट । दिल्लीची ही ॥
कोरोना बिरोना । सब है ये झुठ ।
बोले अडमुठ । टिकैत हा ॥
ऑक्सिजन नेण्या । झाला अडथळा ।
आवळला गळा । आरोग्याचा ॥
संसदेने केला । कायदा संमत ।
आम्ही ना मानत । ऐसी भाषा ॥
जाणून ना घेती । संकट देशाचे ।
हाणा कायद्याचे । फटकारे ॥
नव्हे हे किसान । आडते दलाल ।
कोरोनाचा काळ । कांत म्हणे ॥
(24 एप्रिल 2021)
उसंतवाणी-30
(23 एप्रिल हा जागतिक ग्रंथ दिन. या निमित्ताने समाज माध्यमांवर पुस्तक प्रेमींच्या विविध पोस्ट पाहण्यात आल्या. याच व्यवसायातला असल्या कारणाने मला यातल्या खाचाखोचा माहित आहेत. कागदावरील पुस्तकांचा काळ आता सरला आहे. आता नविन डिजिटल माध्यम वापरावे लागणार आहे हे निश्चित. नविन तंत्रज्ञानाचे खुल्या मनाने स्वागत केले पाहिजे.)
तेवीस एप्रिल । विश्व ग्रंथ दिन ।
परिस्थिती दीन । मराठीत ॥
प्रकाशकाकडे । पुस्तकांचे गठ्ठे ।
पाठीवर रट्टे । व्यवहारी ॥
टक्केवारीमध्ये । ग्रंथालये गुंग ।
चळवळीचे बिंग । फुटलेले ॥
झाली सोय खरी । डिजिटल आता ।
नको जून्या बाता । ग्रंथप्रेमी ॥
नव्या स्वरूपात । येवू दे पुस्तक ।
गुंगेल मस्तक । वाचकाचे ॥
नव्या माध्यमाची । दूरवर खेप ।
विदेशात झेप । त्वरे घेई ॥
डिजीटल स्क्रिन । वाचे नवी पिढी ।
नको मना आढी । कांत म्हणे ॥
(25 एप्रिल 2021)
श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575