Wednesday, April 14, 2021

उसंतवाणी - राजकीय उपहास- भाग ६

    
उरूस, 14  एप्रिल 2021 

उसंतवाणी-16

(ममता बॅनर्जी यांचे स्ट्रॅटजीस्ट प्रशांत किशोर यांच्याशी पुरोगामी पत्रकारांनी ज्या गप्पा मारल्या ती चॅट लीक झाली. हे प्रकरण खुप गाजले. त्यात त्यांनी मोदींचा प्रभाव मान्य केला. नेमकी हीच गोष्ट पुरोगाम्यांची पोटदुखी ठरत आहे.) 

प्रशांत किशोर । लीक झाल्या गप्पा ।
माथी आता ठप्पा । मोदीभक्त ॥
मोदी विरोधात । का नाही लहर?।
उगाळी जहर । रविश हा ॥
करी ममतांच्या । ‘न्हाणी’ची चौकशी ।
ऐसी साक्षी जोशी । पत्रकार ॥
कितीही पेटवा । विरोधात रान ।
मोदी भगवान । लोकांसाठी ॥
ममता विरोधी । अँटिइन्कंबन्सी ।
नाही एकजिन्सी । काही इथे ॥
ऐसे कैसे बोले । प्रशांत किशोर ।
लिब्रांडूंना घोर । लागलेला ॥
धंदेवाईक हे । स्ट्रॅटजिस्ट खोटे ।
हाणा दोन सोटे । कांत म्हणे ॥
(11 एप्रिल 2021)

उसंतवाणी-17

(पहिल्या तीनही चरणांत असम प. बंगालमध्ये मतदानाचा टक्का वाढलेला आढळून आला आहे. शिवाय केरळ आणि तामिळनाडूतही चांगले मतदान झाल्याची खबर आहे. सामान्य लोकांनी लोकशाहीवर टाकलेला हा विश्वासच आहे. पण पुरोगामी विद्वान हे मान्य करत नाहीत. लोकशाही मेली अशीच राहूल गांधींसारखी भाषा त्यांच्या तोंडात असते. )

मतदानाचा हा । वाढलाय टक्का ।
झाले हक्का बक्का । बुद्धीवंत ॥
रांगेत माणसे । टाकतात व्होट ।
मनी नाही खोट । त्यांच्या काही ॥
लोकशाही मेली । बोलतो शहाणा ।
शोधतो बहाणा । हारण्याचा ॥
सेफॉलॉजिस्टांचा । आकड्यांचा घोळ ।
जनतेची नाळ । कळेची ना ॥
मतदाने बने । माणूस अंगार ।
करितो भंगार । विद्वानांना ॥
पाच वर्षांची ही । लोकशाही वारी ।
धावे वारकरी । मतदार ॥
कांत म्हणे जाणा । सच्चा हा ची भाव ।
फुका नको आव । पांडित्याचा ॥
(12 एप्रिल 2021)

उसंतवाणी-18

(सचिन वाझेचा साथीदार रियाज काझी यालाही तुरूंगात टाकण्यात आले आहे. हरिश साळवे यांनी अर्णब गोस्वामीला दिलेल्या मुलाखतीत मुंबईच्या अंडर वर्ल्ड बाबत अतिशय सूचक अशी विधानं केली आहेत. माजी मुख्यमंत्री आणि सध्याच्या सरकारचे सर्वेसर्वा असलेल्या मोठ्या नेत्याकडे हा इशारा आहे. )

काझी पकडला । वाझे पाठोपाठ ।
भरे काठोकाठ । पापघडा ॥
छोटे छोटे मासे । लागती गळाला ।
धुंडती तळाला । यंत्रणा ही ॥
येतसे वरती । जग हे ‘अंडर’।
घोंगावे थंडर । गुन्हेगारी ॥
हरिश साळवे । कायदे पंडित ।
गाठतो खिंडित । भले भले ॥
साळवे सांगतो । दाउद गतीने ।
चालतो ‘मती’ने । राजकिय ॥
व्होरा कमिटीचा । शोधा अहवाल ।
त्याची करा चाल । कायद्याची ॥
अर्णवला देई । साळवे इशारा ।
सुरू खेळ न्यारा । कांत म्हणे ॥
(13 एप्रिल 2021)

श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575 

Sunday, April 11, 2021

उसंतवाणी - राजकीय उपहास- भाग ५

     
उरूस, 11 एप्रिल 2021 

उसंतवाणी-13

(सचिन वाझे यांच्या पत्रात विविध मंत्र्यांचे उल्लेख आले आहेत. त्याने महाविकास आघाडी सरकार भयंकर अडचणीत आले आहे. या सरकारचे चाणक्य भाग्यविधाते खुद्द शरद पवार यांचेच नाव वाझेने घेतले आहे. न्यायालय, राष्ट्रीय तपास यंत्रणा, सीबीआय अशा विविध संस्थांनी या प्रकरणाभोवती फास आवळल्याने राजकीय कोंडी सत्ताधार्‍यांची झाली आहे.) 

वाझेच्या पत्राचा । फिरे दांडपट्टा ।
मंत्रीपद थट्टा । महाराष्ट्री ॥
भाजपचे म्हणे । आहे षडयंत्र ।
बारामती मंत्र । चालेची ना ॥
राजीनामे तेंव्हा । शोभती खिशात ।
आता प्रकाशात । येती कसे? ॥
किंगमेकर हो । होण्यापरी किंग ।
शाबूत हे बिंग । राहतसे ॥
बरा होता हाची । व्यवहार्य सल्ला ।
दादरचा किल्ला । सुरक्षीत ॥
‘कुट’ बारामती । संजू करामती ।
नासवली मती । मातोश्रीची ॥
फोटोग्राफी जैसे । नाही सत्ता विश्व।
उधळले अश्व । कांत म्हणे ॥
(8 एप्रिल 2021)

उसंतवाणी-14

(सर्वौच्य न्यायालयात महाराष्ट्र सरकार आणि अनिल देशमुख यांची याचिका फेटाळण्यात आली. आणि सीबीआय चौकशी चालूच राहिल असे सांगितल्या गेले. कपिल सिब्बल, अभिषेक मनु सिंघवी सारखे वकिलही कामा आले नाहीत. महाराष्ट्र सरकारने नेमलेली चांदीवाल समितीही अर्थहीन होवून गेली. शिवसेनेचे मंत्री अनिल परब यांनी हास्यास्पद अशी भूमिका पत्रकार परिषदेत घेतली. स्व. बाळासाहेबांची आणि माझ्या मुलींची शपथ घेवून मी सांगतो की मी सचिन वाझे आरोप करत आहेत तसे काही केले नाही. यात परत एबीपी माझा सारख्या मविआ ची बाजू घेणार्‍या चॅनेलची वेगळीच गोची झाली. त्यांनी जाहिर केलेले कोराना लसीचे आकडे खोटे असल्याचे गंभीर प्रकरण समोर आले. त्यांना केंद्र सरकारने या प्रकरणी नोटीस पाठवली. )

मुंबईत उच्च । दिल्लीत सर्वौच्च ।
पाचरही गच्च । बसते ॥
वकिल तगडे । सिंघवी सिब्बल ।
झाले हतबल । कोर्टापुढे ॥
समिती नेमली । आम्ही ‘चांदीवाल’ ।
कुणी तिचे हाल । विचारीना ॥
सीबीआय चा हा । तपास कडक ।
बसली धडक । आघाडीला ॥
परब घे आण । बायको पोरीची ।
खंडणीखोरीची । झाकपाक ॥
मातोश्रीला धावू । का सिल्व्हर ओक ।
जहाजाला भोक । भलेमोठे ॥
दूजा अनिलाचा । कटणार पत्ता ।
पचते ना सत्ता । अनैतिक ॥
कांत म्हणे चळे । पुरोगामी ‘माझा’ ।
खोटा गाजावाजा । आकड्यांचा ॥
(9 एप्रिल 2021)

उसंतवाणी-15

(प.बंगालच्या निवडणुकांत मोदींचा एका मुसलमान तरूणाबरोबरचा फोटो व्हायरल झाला. मोदी भाजप विरोधकांना वाटले हा काहीतरी डाव असणार. पण प्रत्यक्षात झुल्फीकर अली या नावाचा हा मुलगा खराच निघाला. त्यानं ज्या पद्धतीनं राष्ट्रीय माध्यमांना मुलाखती दिल्या त्यानं तर पुरोगाम्यांचे पितळ अजूनच उघडे पडले. याच काळात काशीच्या ग्यानवापी मस्जिद प्रकरणांत जिल्हा न्यायालयाने पुरातत्त्व विभागाला सर्वेक्षणाचे आदेश दिले. त्यानं तर पुरोगामी अजूनच बावचळले.)

बंगालात झुल्फी । मोदींच्या गळ्याला ।
पुर ये डोळ्याला । पुरोगामी ॥
छाती पिटूनिया । म्हणती ‘या अल्ला’।
सेक्युलर कल्ला । करितसे ॥
झुल्फीकार पोट्टा । बोले चुरू चुरू ।
मरे झुरू झुरू । व्होट बँक ॥
आब्बास सिद्दीकी । ममता ओवैसी ।
मते ऐसी तैसी । विखुरली ॥
रोहिंग्यांचा प्रश्‍न । कोर्ट यांना झापी ।
त्यात ग्यानवापी । सुरू चर्चा ॥
मस्जिद खोदता । लागेल मंदिर ।
भितीने बधीर । पुरोगामी ॥
कांत म्हणे खोदा । ढोंगाची कबर ।
बरी ही खबर । देशकाळी ॥
(10 एप्रिल 2021)

श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575 

Thursday, April 8, 2021

उसंतवाणी - राजकीय उपहास- भाग ४

   
उरूस, 8 एप्रिल 2021 

उसंतवाणी-10

(मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे फेसबुक लाईव्ह हा एक चेष्टेचा विषय होवून बसले आहे. शिवसैनिकांत आणि ज्येष्ठ नेत्यांत कशी नाराजी आहे हे वारंवार समोर आले आहे. शिवसेनेच्या वाट्यांतील 9 पैकी पाच मंत्री मुळचे शिवसेनेचे नसलेले असे आहेत. दोन तर खुद्द ठाकरे घराण्यांतीलच सदस्य आहेत. त्यामुळे कट्टर शिवसैनिकांच्या वाट्याला केवळ 2 मंत्रीपदे आली. त्यावरून जी अस्वस्थता आहे त्याचा संदर्भ या अभंगांत आहे.

घरात बसून । करतो लाईव्ह ।
शाब्दिक ड्राईव्ह । मनसोक्त ॥
पत्नी संपादक । मंत्रीपदी पोर।
नाचे बिनघोर । कार्यकर्ता ॥
बाहेरचे पाच । दोन ‘गृह’ मंत्री ।
वाजवा वाजंत्री । सैनिकहो ॥
राज्य ना पक्षाचा । घरचा शीऐम ।
काका करी गेम । माझ्यासाठी ॥
होवू दे बेजार । कितीही जनता ।
राजकीय सुंता । केली आम्ही ॥
फक्त झेंडा हाती । सैनिक कट्टर ।
चाटतो खेटर । मातोश्रीचे ॥
फोडी कधी काळी । वाघ डरकाळी ।
सत्ता लाळ गाळी । ‘कांत’ म्हणे ॥
(3 एप्रिल 2021)


उसंतवाणी-11

(उच्च न्यायालयात जयश्री पाटील यांची याचिका सुनावणीस आली आणि त्यावर निर्णय देताना न्यायालयाने सीबीआय चौकशीला परवानगी दिली. स्वाभाविकच यामुळे गृहमंत्री अनिल देशमुख यांना राजीनामा द्यावा लागला. शरद पवारांसारखे ज्येष्ठ नेतेही जिथे अनिल देशमुख कसे स्वच्छ पारदर्शी कारभार करतात त्यांना राजीनामा देण्याची गरज नाही असं सांगत होते त्याच गृहमंत्र्यांना न्यायालयाच्या दणक्याने पद सोडावे लागले.)

कोर्टाचा आदेश । रंगले श्रीमुख ।
देती देशमुख । राजीनामा ॥
सीबीआय चौकशी । बसला दणका ।
तुटला मणका । सत्ताधारी ॥
आघाडीचा घडा । भरला पापाचा ।
साधूंच्या शापाचा । तळतळाट ॥
वाटला नरम । निघाला गरम ।
करतो ‘परम’ । कायदाकोंडी ॥
सचिन हा वाझे । भामटा जोडीला ।
त्यानेच फोडिला । कट सारा ॥
काका घाली जन्मा । अनौरस सत्ता ।
तिच्या माथी लत्ता । प्रहार हा ॥
झाली सुरवात । नाही ही इतिश्री ।
गोत्यात मातोश्री । ‘कांत’ म्हणे ॥
(5 एप्रिल 2021)


उसंतवाणी-12

(अनिल देशमुखांच्या जागी दिलीप वळसे पाटील यांना गृहमंत्री करण्यात आले. जाणते राजे शरद पवार यांचे अवघे राजकारण जे की अतिशय धोरणी म्हणून ओळखले जाते तेच गोत्यात आले आहेत. कॉंग्रेस शिवायची तिसरी आघाडी देशभर उभी करावी हे पवारांचे राजकारण ही फसताना दिसत आहे.)

गेले देशमुख । आलेत वळसे ।
खोटेच बाळसे । अब्रुवरी ॥
वाझे उसवतो । रोज एक टाका ।
करणार काका । काय आता? ॥
सत्ता डळमळे । तरी करू चर्चा ।
तिसरा हा मोर्चा । कोलकत्ता ॥
कॉंग्रेसच्या माथी । बंगालात लाथ ।
राज्यामध्ये साथ । काकानिती ॥
तिसरी आघाडी । सदाची बिघाडी ।
काकाला ना नाडी । गवसली ॥
काकांचे आयुष्य । तळ्यात मळ्यात ।
पक्षीय खळ्यात । काही नाही ॥
कांत म्हणे गाठा । संन्यास आश्रम ।
राजकिय श्रम । पेलवेना ॥
(6 एप्रिल 2021)


श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575 

Wednesday, April 7, 2021

उसंतवाणी -राजकीय उपहास- भाग ३

उरूस, 7 एप्रिल 2021 

उसंतवाणी-7

(कॉंग्रेसची मोठी गोची महाराष्ट्राच्या राजकारणात झाली आहे. एक तर महाविकास आघाडीत त्यांची आमदार संख्या सगळ्यात कमी. त्यांना सातत्याने दुय्यम वागणुक मिळत आहे अशी तक्रार ज्येष्ठ मंत्री करतात. जे घोटाळे समोर आले त्यातही आपले नाव नाही याची खंत कॉंग्रेस नेत्यांना वाटत असवी असा उपहास करत या ओळी लिहिल्या. बाळासाहेब थोरात त्यांचे महसुल मंत्री आहेत. त्यांना हाताशी धरून शरद पवारांनी सगळी बोलणी केली असं सांगितलं जातं.)

घोटाळ्यांची इथे । साजरी दिवाळी ।
आम्हाला वेगळी । वागणुक ॥
सेना राष्ट्रवादी । मलिद्याची खाती ।
करवंटी हाती । आमच्याच ॥
सोनिया मातेला । सांगतो रडून ।
घ्यावा हा काढून । पाठिंबाच ॥
राठोड मुंढेच्या । चारित्र्याची धुणी ।
आमचा ना कुणी । सापडला ॥
कॉंग्रेस निवांत । बाकीचे जोरात ।
बोलती ‘थोरात’ । काय करू ?॥
दास ‘कांत’ म्हणे । त्याला मिळे हूल ।
राशीला ‘राहूल’ । ज्यच्या ज्याच्या ॥
(21 मार्च 2021)

उसंतवाणी-8

(शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल हे अचानक रात्री 2 वा. विमानाने अहमदाबादला गेले आणि त्यांनी अमित शहा यांची भेट घेतली. ही भेट गौतम अडानी यांच्या घरी झाली. त्यांना 45 मि. शहांनी वाट पहायला लावली. अशा बातम्या पसरल्या. याची अधिकृत कसलीच पुष्टी कोणी केली नाही. आणि नकारही दिला नाही.)

साबरमतीला । गेली बारामती ।
काय करामती? । कोण जाणे ॥
गुप्तभेटीसाठी । मध्यरात्री वेळ ।
राजकीय खेळ । रंगतसे ॥
गुजरात दौरा । संजय उवाच ।
बोलतो उगाच । मूढमती ॥
येवुनिया काका । जाती ब्रीचकँडी ।
उद्धवासी थंडी । उन्हाळ्यात ॥
परम वादाची । पडलिया चीर ।
सरकार स्थिर । प्रवक्ता म्हणे ॥
तिघांचा हा खेळ । कडी वरकडी ।
कॉंग्रेस कोरडी । ‘कांत’ म्हणे ॥
(29 मार्च 2021)

उसंतवाणी-9

(बंगाल निवडणुकांत ममता दिदींनी हिंदूंना खुश करण्यासाठी म्हणून आपणही कसे देवी कवच म्हणतो, चंडीपाठ करतो, आपले गोत्र शांडिल्य आहे असे सांगितले. बरोबर हाच मुद्दा मग भाजपने उचलला. राहूल गांधींनी तर आधीच शर्टावर जानवे घालून मंदिरांचे उंबरे झिजवालया सुरवात केली होती.)

रेड्यामुखी वेद । जूनी झाली कथा ।
ऐका नवी गाथा । बंगालात ॥
कुठे चंडी पाठ । कुठे मंत्र स्तोत्र ।
प्रकटले गोत्र । ‘दिदी’ मुखी ॥
सदर्‍या वरून । घाली जो जानवे ।
त्याला ना जाणवे । आत काही ॥
जामा मशिदीत । इमाम बुखारी ।
फतवे पुकारी । कधी काळी ॥
मतांसाठी ढोंगी । पढले नमाज ।
सरे त्यांचा माज । राम नामे ॥
व्यर्थ मिरवून । दावी जो ब्राह्मण्य ।
नासे त्याचे पुण्य । ‘कांत’ म्हणे ॥
(31 मार्च 2021)

श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575 

Tuesday, April 6, 2021

उसंतवाणी - राजकीय उपहास- भाग २

     
उरूस, 6 एप्रिल 2021 

उसंतवाणी-3

(परमवीर सिंह यांनी आधी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले. अपेक्षा अशी होती की गृहमंत्र्यांचा तत्काळ राजीनामा घेवून ते काही कार्रवाई करतील. पण तसे काही घडले नाही. याची कल्पना असल्यानेच परमवीर सिंह सर्वौच्च न्यायालयात गेले. पुढे ते उच्च न्यायालयात गेले आणि आता तर अनिल देशखुख यांचा राजीनामाच आला आहे.) 
‘परम’ स्फोटाचा । जाहला आवाज ।
हादरला आज । महाराष्ट्र ॥
महिन्याला फक्त । शंभरच कोटी ।
बाब आहे छोटी । ‘काका’ म्हणे ॥
शंभराचे वाटे । करताना तीन ।
कोण मारी पीन । दिल्लीतून ॥
सिंहासनाखाली । लागला सुरूंग ।
दाखवी तुरूंग । देवेंद्र हा ॥
राजकारण्यांनी । सोडलीय लाज ।
दिसे मज आज । ‘कांत’ म्हणे ॥
(21 मार्च 2021)

उसंतवाणी-4

(सचिन वाझे आणि परमवीर सिंह यांच्यामुळे महाविकास आघाडी सरकारची मोठी गोची झाली. अनिल देशमुख राजीनामा देणार नाही असे मोठ्या आवेशात सांगितले जात होते. पण प्रत्यक्ष काय घडले ते सर्वांच्या समोरच आहे.) 
दाण्याच्या मोहात । मुठ उघडेना ।
बाहेर निघेना । ‘हात’ कसा ॥
माकडासारखी । राजकीय स्थिती ।
गुंग बारामती । महाराष्ट्री ॥
‘परम’ गाठतो । पायरी सर्वौच्च ।
हालवतो गच्च । व्यवस्था ही ॥
राजीनामा नाही । भाषेचा हा दर्प ।
सत्ता वीष सर्प । वळवळे ॥
दास ‘कांत’ म्हणे । झाली सुरूवात ।
राजकिय वात । विझु लागे ॥
(22 मार्च 2021)


उसंतवाणी-5

(रश्मी शुक्ला या पोलिस खात्यातील उच्च पदस्थ अधिकारी. त्यांनी बदल्यांचे रॅकेट आणि त्यासाठी होत असलेला पैशाचा व्यवहार यावर एक अहवाल तयार केला. आणि तो ऑगस्ट मध्येच मुख्यमंत्र्यांना सादर केला. पण त्यावर मुख्यमंत्र्यांनी काहीच हालचाल केली नाही. शेवटी हा अहवाल विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी मिळवला. त्याला वाचा फोडली.)
आधीच नशिबी । देवेंद्र हा खाष्ट ।
त्यात ‘शुक्ला’ काष्ठ । मागे लागे ॥
‘रश्मी’ दोरखंड । आवळतो गळा ।
बदल्यांची ‘लीळा’ । दावी जगा ॥
एकाला झाकता । दूजे हो उघडे ।
संजू बडबडे । हकनाक ॥
बरा होता गप्प । जितेंद्र आव्हाड ।
जिभेला ना हाड । त्याच्या जरा ॥
सत्तेच्या गाडीचे । उधळले बैल ।
कासरा हो सैल । ‘कांत’ म्हणे ॥
(25 मार्च 2021)

उसंतवाणी-6

(आघाडी सरकारच्या अडचणी कमी पडल्या होत्या म्हणून की काय संजय राउत यांनी अशी बडबड केली. त्यांनी मागणी केली की युपीए च्या अध्यक्षपदी शरद पवारांना बसवा. वास्तवात पवारांचे लोकसभेत खासदार किती? शिवसेनेचाच मुळात युपीए शी काय सबंध? असे प्रश्‍न मग विचारले जावू लागले. राज्य कॉंग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी  राउतांना चांगले टोले लगावले आहे.)
संजू म्हणे करा । अध्यक्ष काकाला ।
झोंबू दे नाकाला । मिर्ची कुणा ॥
सोनिया मातेची । वाया घुसळणी ।
सत्तेचे ना लोणी । दिसे कुठे ॥
राहूल प्रियंका । झाला पोरखेळ ।
कशाना ना मेळ । पक्षामध्ये ॥
‘नॅनो’ पक्षाचे हे । पाच खासदार ।
तरी काका फार । ‘पवार’फुल ॥
काका जाणतात । सगळ्यांचा ‘भाव’ ।
म्हणून प्रभाव । पडे त्यांचा ॥
संजू नाचतोय । बेगान्या शादीत ।
नाव ना यादीत । ‘कांत’ म्हणे ॥
(27 मार्च 2021)
 
श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575 

Monday, April 5, 2021

उसंतवाणी - राजकीय उपहास - भाग १

उरूस, 5 एप्रिल 2021 

मराठवाडा ही संतांची आणि उसंतांची भूमी आहे असं फ.मुं.शिंदे गंमतीत म्हणायचे. त्यांच्या या शब्दाचा पुढे आम्हाला एक अतिशय चांगला उपयोग झाला. रविंद्र तांबोळी हा मित्र उपहास अतिशय चांगला लिहायचा. शेतकरी संघटक या पाक्षिकासाठी एखादे असे उपहासात्मक सदर चालव असं त्याला सुचवले. त्यात संत ठोकाराम नावाने त्याने काही अभंग लिहिले. त्या लेखांचे पुस्तक झाले तेंव्हा त्याचे नावच आम्ही ‘उसंतवाणी’ असे ठेवले. 

उसंतवाणी हा शब्द तेंव्हापासून माझ्या डोक्यात ठसून बसला. सध्याच्या राजकीय परिस्थितीत एका लेखात मी उपहासात्मक अभंग लिहिला. पुढे मग असे अभंग गेले काही दिवस समाज माध्यमांवर लिहित आहे. आपसुकच उसंतवाणी हेच नाव त्या मालिकेला द्यावे असे सुचले. 

राजकिय उपहास मराठीत अतिशय चांगला लिहिला गेला आहे. पण सातत्याने राजकिय उपहासाची कविता मात्र लिहिल्या गेली नाही. रामदास फुटाणे यांनी आपल्या वात्रटिकांच्या माध्यमांतून हा विषय जिवंत ठेवला. त्याचे महाराष्ट्रात सर्वत्र स्वागत झाले. ब्रिटीश नंदी (प्रविण टोकेकर) आणि तंबी दुराई (श्रीकांत बोजेवार) यांच्या उपहासात काही अतिशय सुंदर अशा कविता येवून गेलेल्या आहेत. संजय वरकड या माझ्या पत्रकार मित्राने ‘वरकडी’ हे राजकिय विडंबनाचे सदर दीर्घकाळ चालवले. या कविताही मला आवडत आलेल्या आहेत.

समाज माध्यमांवर त्या त्या वेळी घडलेल्या प्रसंगांवर मी अशा विडंबन कविता अशात लिहितो आहे. त्या एकत्रित स्वरूपात दिल्या तर वाचायला बरे अशी काही वाचका मित्रांनी मागणी केली. त्यानुसार या कविता एकत्रित काही भागात देतो आहे. या कवितेचे आयुष्य फार अल्प असते. त्या त्या वेळचे ते संदर्भ असतात. काही काळांनी या कविता कुणी वाचेल तर त्याला सगळेच संदर्भ लागतील असे नाही. म्हणून त्या खाली तारीख देत आहे. म्हणजे संदर्भच शोधायचे असतील तर ते सोयीचे पडेल. शिवाय प्रत्येक कवितेच्या सुरवातीला थोडक्यात ते प्रसंग आणि त्यावेळची परिस्थिती देण्याचा प्रयत्न केला आहे. अपेक्षा आहे वाचकांना हे आवडेल. सोशल मिडियावर याला मोठा प्रतिसाद मिळाला आहेच. या विडंबनांना कसा प्रतिसाद मिळतो आहे याचीच एक बातमी फोकस इंडिया या पोर्टलने केली होती. संपादक संतोष कुलकर्णी यांचे आभार.  (यातील काही रचना पूर्वी लेखात आलेल्या आहेत)

उसंतवाणी-1

(राहूल गांधी यांनी ऑनलाईन एका मुलाखतीत आणीबाणी ही चुक असल्याचा उच्चार केला. मग कॉंग्रेसचे खासदार कुमार केतकर जे आजतागायत आणीबाणीचे समर्थन करत आले आहेत यांची पंचाईत झाली. त्या संदर्भातील हे विडंबन. केतकर परदेशी विद्यापीठांत आमंत्रित प्राध्यापक म्हणून जायचे. पण भारत सरकारने अशा काही व्यक्तींवर बंधने आणली. अर्थात त्यात केतकरांचे नाव नाही. पण तोही एक संदर्भ आहे. शिवाय अशा वेबिनारमध्ये कुणाला बोलवायचे यावरही काही नियम मनुष्यबळ विकास मंत्रालयाने घातले आहेत. त्यावरही ओरड पुरोगाम्यांनी सुरू केली आहे.)

आज्जीची ती चुक । लादे आणीबाणी ।
राहूलची वाणी । उमटली ॥
‘कुमार’ अवस्था । हो केविलवाणी ।
गावी कशी गाणी? । आणीबाणीची॥
गाउन आरती । जीभेला ना हाड ।
कौतुकाचे झाड । ओठांवर ॥
आंतर राष्ट्रीय । कटाचा हा भाग ।
नशिबात भोग । काय आला ॥
राहूलही त्यात । अडकला असा ।
फेकला हा फासा । कसा कुणी ? ॥
परदेशी जावे । कराया चिंतन ।
विचार गहन । लोकशाहीचा ॥
हूकुमशहा तो । अडवितो मोदी ।
पत्रकार गोदी । भंडावती ॥
उतार वयात । अवस्था सुमार ।
बेजार ‘कुमार’ । कांगरेसी ॥
दास‘कांत’ म्हणे । हाणा दोन लाथा ।
बुद्धिवंत माथा । कुजलेला ॥
(5 मार्च 2021)

उसंतवाणी-2

(ओवैसींचा पक्ष बंगालात निवडणुक लढवणार अशी हवा आधीपासून केल्या गेली. पण प्रत्यक्षात त्यांच्या बंगाल शाखेत फुटाफुट झाली. अध्यक्ष जमीर-उल-हसन यांनीच पक्ष सोडला. ज्या पीरजादा अब्बास सिद्दीकी यांच्यावर भरोसा ठेवून ओवैसींनी राजकिय डावपेच आखले होते त्यांनी आपला स्वतंत्र पक्षच स्थापन केला आणि कॉंग्रेस डाव्यांसोबत स्वतंत्र आघाडी करून निवडणुक लढवत आहेत.)

ओवैसींचा पक्ष । बंगालात फुटे ।
राजकीय तुटे । स्वप्न सारे ॥
बंगाली भाषेने । उतरीला आज ।
उर्दूचा हा माज । हुगळीकाठी ॥
हैदराबादेत । बिर्याणीची सत्ता ।
तिला कोलकोत्ता । ओळखेना ॥
ओवैसी काढतो । हिरवे फुत्कार ।
त्याचा ना सत्कार । बंगालात ॥
बक बक इथे । करू नको जादा ।
बोले पीरजादा । फुर्फुराचा ॥
दास ‘कांत’ म्हणे । गाठू नये टोक ।
पदराला भोक । राजकीय ॥
(8 मार्च 2021)
   
श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575 

Sunday, April 4, 2021

अमेरिकेपुढे राहूल गांधींचे रडगाणे

    


उरूस, 4 एप्रिल 2021 

आपल्याच पक्षाची स्थिती जरा कुठे चांगली होताना दिसली की राहूल गांधी अस्वस्थ होतात. मी इतका प्रयत्न करतो आहे पण तरी लोक आम्हाला मतदान करतातच कसे? मग ते एकापेक्षा एक भन्नाट अशा आयडिया काढतात. आणि मनापासून पक्ष पूर्ण खड्ड्यात जाण्यासाठी प्रयत्न करतात.

केरळ जिथे त्यातल्या त्यात कॉंग्रेसची चांगली स्थिती आहे असे पत्रकार निरीक्षक अभ्यासक सर्वेक्षण करणारे सांगत आहेत. तिथे दोन दिवसांत मतदान होणार आहे (6 एप्रिल 2021, 140 जागांसाठी). नेमक्या या मतदानाच्या तीनच दिवस आधी राहूल गांधी यांनी एक मुलाखत अमेरिकेचे माजी राजदूत उच्चपदस्थ अधिकारी आणि हॉर्वर्ड विद्यापीठांत राज्यशास्त्राचे प्राध्यापक असलेल्या निकोलस बर्न यांना दिली. यात त्यांनी नेहमी प्रमाणे भारतात लोकशाही राहिली नाही हे रडगाणे तर गायले आहेच. पण शिवाय अमेरिका कशी काय गप्प बसून आहे? असं म्हणत याचनाही केली आहे. ही मुलाखत यु ट्यूबवर उपलब्ध आहे. जरूर पहा. नसता परत कॉंग्रेसचे प्रवक्ते अर्वाच्चपणे राहूल गांधी असे बोललेच नाहीत. माध्यमं भाजपला विकली गेली आहेत. गोदी मिडिया म्हणत आरडा ओरड करतात. तूम्ही शब्द तोडून मोडून दाखवत आहेत असा आरोप परत माध्यमांवरच करतात. 

यातील सर्वात आक्षेपार्ह मुद्दा असा की चीन आमच्या जमिनीवर अतिक्रमण करून बसला आहे याचा त्यांनी केलेला उल्लेख. ही बाब वारंवार आपल्याकडे चर्चेत स्पष्टपणे समोर आली आहे. संरक्षण मंत्री, गृहमंत्री, पंतप्रधान यांनी प्रत्यक्ष संसदेत स्पष्ट खुलासे केले आहेत. सैन्याधिकार्‍यांनी सर्व मुद्दे समोर ठेवले आहेत. विविध पत्रकारांनी यातील अगदी बारकावे सर्व देशवासियांना दाखवले आहेत. इतके असतानाही परत परत राहूल गांधी हे एकच तुणतुणं का लावून धरतात? आणि तेही परत परदेशी उच्चपदस्थ अधिकारी विचारवंत प्राध्यापक यांच्या समोर. 

आमचा पक्ष निवडणुका कशा लढू शकत नाही असेही एक रडगाणे त्यांनी गायले आहे. सत्ताधारी भाजप मोदी अमित शहा यांनी सर्वच यंत्रणा कशा आपल्या ताब्यात घेतल्या आहेत हे मांडले.  याचे उदाहरण देताना राहूल गांधी यांनी नेमके असम मधील एका मतदान केंद्रावरील ई.व्हि.एम. मशिन कशी भाजप उमेदवाराच्या गाडीत आढळली हे सांगितले. 

यातील खरा प्रकार काय आहे हे माध्यमांनी लगेच समोर आणला होता. निवडणुक आयोगाने त्यावर त्वरीत कार्रवाई केली. शंकेचे निराकरण केले. अजूनही ते एव्हिएम सीलबद्धच आहे. त्या केंद्रावर आता परत मतदान होत आहे. असं असतनाही राहूल गांधी हीच एक घटना परदेशी तज्ज्ञासमोर सांगतात. बरं त्यांना निवडणुकीतील गैर प्रकारांबाबतच बोलायचे होते तर प.बंगाल मधील ममतांच्या पक्षाने ज्या तक्रारी आयोगा समोर मांडल्या त्याचा उल्लेख का करावा वाटला नाही?

राहूल गांधी यांनी नेमकी असम मधील हीच घटना उचलली याचा एक वेगळाच अर्थ आता लावला जात आहे. नेमकी ते ईव्हिएम घेवून जाणारी गाडी बंद पडणे, रस्त्यात ती गाडी थांबवून दुसर्‍या गाडीला हात करून त्यात ती मशिन घेवून जाणे. ही गाडी दुसर्‍या मतदारसंघातील का असेना पण भाजप उमेदवाराशी संबंधीत आहे हे कळले की लगेच थोड्या अंतरावर  कॉंग्रेसच्याच कार्यकर्त्यांनी ती रोकणे. गाडीची मोडतोड करणे. लगेच यावर लोकशाही धोक्यात आली म्हणून गोंधळ घालणे. अगदी माध्यमांनाही धारेवर धरणे. जेंव्हा की पत्रकार कॉंग्रेसच्या प्रवक्त्यांना समजावून सांगत आहेत की आम्हीच हा प्रकार उघडकीस आणला. तूम्ही आमच्यावर का आरोप करत आहात? म्हणजे या सर्वातच कॉंग्रेसचे खासदार महान पत्रकार कुमार केतकर म्हणतात तसा काही कट आहे की काय असा वास येतो आहे. 

आत्ता जिथे निवडणुका होत आहेत त्यापैकी तामिळनाडू आणि केरळात भाजपचे अस्तित्व जवळपास शुन्य आहे. आणि हे आजचेच नाही तर आधीपासून आहे. अगदी मोदी अमित शहा यांनी सुत्रे हाती घेतली तेंव्हापासून आजपर्यंत 7 वर्षांत फारसा फरक पडला नाही. अजूनही डिएमके आणि डावेच इथे निवडून येतील अशी शक्यता सर्वेक्षणांत समोर आली आहे. पण तरीही राहूल गांधी बिनधास्त आरोप करत आहेत की देशात लोकशाही शिल्लक राहिलेली नाही.

कोरोना काळात देशाच्या आर्थिक विकासाची गती खुुंटली आहे. अर्थक्षेत्रात आपण पिछाडीवर पडलो आहोत हे खरे आहे. वास्तविक सर्वच जग अडचणीत आहेत. तरीही आपला विकासदर बर्‍यापैकी आहे. आणि राहूल गांधी या मुलाखतीत बिनधास्त जीडीपी महत्त्वाचा नसून नौकर्‍या निर्माण करण्यासाठी या सरकारने काही केले नाही असले आरोप करत आहेत. आमच्या सरकारच्या काळात मनरेगा सारखी योजना आम्ही कशी राबवली आणि त्याचे किती अप्रतिम असे परिणाम समोर आले असली शेखी मिरवत आहेत.

वास्तविक संरचनात्मक बाबींमध्ये (इन्फ्रा) जास्तीत जास्त पैसा गुंतवला तर त्याचा परतावा जास्त चांगल्या प्रमाणात होतो शिवाय रोजगार (नौकरी नव्हे) निर्मितीची गती संख्या वाढते हे पण जगभरांत पुढे आलेले आहे. अमेरिकन तज्ज्ञ प्राध्यापक तेच राहूल गांधींना सांगू पहात आहेत आणि हे मात्र इतरच बाबींवर बोलत आहेत. मनरेगा कशी फसली याचे पुरावे देशातील सोडा पण परदेशी अर्थतज्ज्ञांनी पण मांडले आहेत. आता तर मजूरांच्या खात्यात सरळ पैसे जमा करतो म्हटले तर गुत्तेदार ही कामेच करायला तयार नाहीत. शेतकर्‍यांच्या खात्यात सरळ पैसे देतो म्हटले तर अडते दलाल भडकले आहेत. आणि अशा अडत्यांच्या आंदोलनाला राहूल गांधींचा पक्ष पाठिंबा देत आहेत. प्रा. निकोलस बर्न या प्रश्‍नावर जेंव्हा विचारत आहेत तेंव्हा राहूल गांधी खोटं बोलत आहेत की सरकार शेतकर्‍यांचे ऐकायलाच तयार नाहीत म्हणून. ज्या अकरा चर्चेच्या फेर्‍या झाल्या त्या काय होत्या? सर्वोच्च न्यायालयाने समिती नेमली आहे, त्यासमोर विविध  शेतकरी संघटनांनी आपली बाजू मांडली आहे. पण यातले काहीच बर्न यांना सांगितले जात नाही. आपल्याच पक्षाने निवडणुक जाहिरनाम्यात काय कबुल केलं होतं हे राहूल गांधी निकोलस यांना का सांगत नाहीत?

माझा तर निकोलस यांच्यावरही आक्षेप आहे. ते का राहूल गांधींना विचारत नाहीत की तूमचा पक्ष तर याच कृषी कायद्यांच्या बाजूने होता. तसे स्पष्ट तूमच्या जाहिरनाम्यात लिहीले आहे.

मला वाटते आहे की आपल्या लोकशाहीची बदनामी करण्याची ठरवून ठरवून केलेली खेळी आहे. आणि तीही नेमकी पाच महत्त्वाच्या राज्यातील निवडणुका चालू असताना. यातही परत असममधील प्रकरण झाल्या बरोबर एकच दिवसांत ही मुलाखत झाली आहे. 

बाकीही अकलेचे तारे राहूल गांधींनी काय तोडलेत ते तूम्ही जरूर पहा. सोनिया आजारी आहेत. प्रियंका यांनी कोरोना मुळे प्रचारात सहभागी होणार नाही असे जाहिर केले आहे. उरले सुरले राहूल गांधी. त्यांनीही प्रचाराकडे दुर्लक्ष करून असल्या मुलाखतींचा पोरखेळ चालवला आहे. दिसतं असं आहे की जर चुकून माकून केरळात आपला पक्ष जिंकला तर काय करायचे? खरंच काठावरची का असेना असम मध्ये सत्ता आलीच तर कसं होणार? या चिंतेने राहूल गांधी हैराण झाले होते. त्यांनी हा मुलाखतीचा फार्स घडवून आणला. आणि आपल्या पक्षाची विश्वासार्हता पुरती मातीत मिसळवून घेतली. स्वत:चे तर ते नेहमी हसे करून घेत आलेले आहेतच. 

                

श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575