उरूस, 23 जानेवारी 2021
हसतमुख दिलखुलास अनोळखी माणसालाही जराशा परिचयांत मोकळं बोलायला लावणारा माझा मोठा मामा वसंत बीडकर 18 मार्चला काळाच्या पडद्याआड गेला. मामाचे 78 वर्षाचे वय, त्याने गेली 20 वर्षे कॅन्सरशी दिलेली कडवी झुंज पाहता हा दिवस कधीतरी येणार हे समजत होतेच. विविध प्रकारच्या लोकांत वावरणार्या, माणसांशी बोलण्याचा भेटण्याचा लोभी असलेल्या, अशा या माणसाचा अंत्यविधी कोरोना आपत्तीत पाच सात जवळच्या नातेवाईकांत व्हावा याचा चटका बसला.
मामाचा मोठा मुलगा कैलास माझ्या अगदी बरोबरचा. माझा मोठा भाऊ श्रीकृष्ण, कैलास आणि मी अगदी 14 महिन्यांच्या अंतरांतील आम्ही तिघे. त्यामुळे भाऊ असण्यापेक्षा आम्ही मित्र जास्त.
माझे दोन मामा परभणीलाच अगदी आमच्या नानलपेठला लागून वडगल्लीतच होते. तिसरा मामा असम, ओरिसा, कर्नाटक असा दूर दूर राज्यांत नौकरी निमित्ताने असायचा. परिणामी मामाच्या गावाला जाणे म्हणजे या मोठ्या मामाच्या गावाला जाणे. तीर्थपुरी, सेलू ही दोन गावं जास्त आठवतात. नंतर तो औरंगाबादला गेला आणि तोपर्यंत आम्ही मोठे झाल्याने ‘मामाच्या गावाला जावूया’ ही वृत्ती हरवून गेली.
मामाची पहिली आठवण त्याच्या तीर्थपूरी गावची आहे. तिथे पाटबंधारे खात्यात तो अभियंता म्हणून नौकरीला होता. तिथल्या कॅनॉलचे काम चालू होते. त्या कॅनॉलच्या फरश्यांच्या उतरत्या भिंतीवर आम्ही घसरगुंडी घसरगुंडी म्हणून खेळायचो. आमच्या मनसोक्त खेळण्याचा परिणाम एकच झाला की आमच्या सगळ्या चड्डया पार्श्वभागावर फाटून गेल्या. मामाने न रागवता उत्साहात आम्हाला नविन चड्डया आणून दिल्या. पण खेळण्यापासून रोकले नाही.
पुढे सेलूला बदली झाल्यावर सहकारवाडीत तो राहायला आला. हे घर स्टेशनच्या इतके जवळ होते की पूर्वेकडे प्लॅटफॉर्म संपला की लगेच घरांची रांग सुरू व्हायची. परभणी कडून येणारी गाडी स्टेशनात थांबली की उलट्या दिशेने हातातली छोटी बॅग सांभाळत आम्ही तर्राट धावत सुटायचो. एव्हाना गाडी माहित असल्याने कैलास स्टेशनवर आलेला असायचाच. मोठी माणसं मोठ्या बॅगा घेवून येईपर्यंत आम्ही घराच्या अंगणात पोचलेलो असायचो. रेल्वेस्टेशनच्या अगदी जवळचं घर हे एक फारच मोठं आकर्षण होतं. तेंव्हाच्या कोळश्याची ती इंजिनं त्यांचा गोड वाटणारा आवाज, गाडी येताना धावत रूळांजवळ येवून उभं राहणं, गाडी नजरेआड होईपर्यंत पहात राहणे हा आमचा एक खेळच होता. प्रकाश नारायण संत यांनी आपल्या पुस्तकांत रेल्वेा स्टेशनच्या रेल्वे रूळांच्या रेल्वे गेटच्या ज्या आठवणी रंगवल्या आहेत त्या मला नितांत आवडतात. त्याचे कारण माझ्या लहानपणी वसंत मामाच्या सेलूच्या घराशी निगडीत आठवणींशी गुंतलेले आहे.
पुढे सेलूलाच जायकवाडी कॉलनी म्हणून पाटबंधारे विभागांतील कर्मचार्यांची वसाहत होती तिथे मामाला क्वार्टर मिळाले. सिमेंटचे पत्रे असलेले ते तीन खोल्याचे लहान टूमदार घर आजही माझ्या नजरेसमोरून जात नाही. दारात मामाची एसडी गाडी लावलेली असायची. या वसाहतीत चारी बाजूंना घरे आणि मध्यभागी अतिशय सुंदर बगिचा होता. त्याच्या घसरगुंडीवर खेळण्याइतके आम्ही लहान राहिलो नव्हतो. पण रोज आम्ही तिघे भावंडं संध्याकाळी अंधार पडल्यावर घसरगुंडीच्या वरच्या भागात बसून गप्पा मारत रहायचो. तेंव्हा मामा घराच्या अंगणात कुणा मित्राशी सहकार्याशी मस्त हसत खेळत गप्पा मारत बसायचा. आपण लहान मुलंच गप्पा मारतो हसतो एकमेकांना चिडवतो असं नाही तर ही मोठी माणसंही अशीच वागतात हे नकळत डोक्यात मामाने ठसवले.
सेलूच्या मामाच्या रेल्वेस्टेशन जवळच्या घराचे जसे आकर्षण होते त्यात अजून एक भाग होता. मामाचा छोटा मुलगा सुधीर तो अगदी लहान होतो. गोरा गोमटा गालाला खळी पडणारा फारच लोभस हा भाउ आम्हाला जिवंत खेळणंच वाटायचा. तो होताही अगदी तस्साच. आमच्यापेक्षा पाच सहा वर्षांनी लहान असलेला हा भाउ आम्हाला फार आवडायचा. त्याला उत्साहात खेळवणे, कडेवर घेणे, त्याला आंघोळ घालणे, मामीबरोबर बाजारात जाताना याला सोबत घेवून चालणे मला फार आवडायचे.
मामा आम्हाला आम्हा भाच्च्यांना ‘काय जावई..’ असंच म्हणायचा. मराठवाड्यात मामाची पोरगी करून घेण्याची पद्धत आहे. त्यामुळे बहिणीच्या पोराला जावाईच म्हटलं जातं. यातही मामाच्या बोलण्यात एक मस्त चिडवण्याचा सूर होता. कारण त्याला पोरगीच नव्हती. दुसर्या मामालाही पहिला मुलगाच झाला. ज्या तिसर्या मामाला पोरगी झाली तोपर्यंत आम्ही फारच मोठे झालो होतो. त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या मामाची पोरगी मिळणार नव्हतीच.
पण यात दूसरा एक गंमतीचा भाग होता. माझे वडिल ज्या ब्राह्मण पोटजातीचे होते (देशस्थ ऋग्वेदी) त्यांच्यात मामाची पोरगी करतात तर आई ज्या पोटजातीतली आहे (देशस्थ यजूर्वेदी) त्यांच्यात मामाची पोरगी चालत नाही. त्यांच्यात तर अगदी लग्न जूळवताना मामाचेही गोत्र तपासले जाते. (हे माझ्या आईवडिलांचे लग्न झाले तेंव्हाच सगळं निकालात निघालं होतं. शिवाय माझ्या नातेवाईकांत आंतरजातीय, आंतरधर्मिय, आंतरदेशीय अशी मोठ्या संख्येने लग्नं झाल्यानं हा सगळा विषय आमच्यासाठी केवळ थट्टेचा विनोदाचा गंमतीचाच आहे). माझी इकडची आज्जी मात्र मामाला म्हणायची तूम्हाला पोरगी असली असती तर आम्ही नक्कीच करून घेतली असती.
मामामुळे सेलूच्या दिवसांच्या असंख्य सुंदर आठवणी माझ्या आयुष्यात गोळा झाल्या. आजही सांस्कृतिक सामाजिक उपक्रमांसाठी सेलूला जातो तेंव्हा पहिली आठवण मामाचीच येते.
मामाची बदली पुढे औरंगाबादला झाली. एव्हाना आम्हीही शिकायला औरंगाबादला आलो होतो. आपला भाच्चा शासकिय अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकतोय याचा त्याला नितांत अभिमान होता. मला आवर्जून भेटायला हॉस्टेलला तो यायचा तेंव्हा तो शिकला त्या परिसरांतून फिरताना त्याला एक वेगळाच आनंद व्हायचा. याच परिसरांत तो पॉलिटेक्निक झाला.
बांधकाम हा त्याच्या अतिशय जिव्हाळ्याचा विषय. आमच्या नातेवाईकांची जवळपास सर्व बांधकामे त्या काळात त्यानं हौसेने स्वत:च्या देखरेखीखाली करून दिली. त्यात त्याचा खरं तर काहीच संबंध नसायचा. केवळ त्याला या विषयाची आवड होती किंवा असं म्हणूया की त्याला बांधकामाचे व्यसनच होते.
आमचे सगळे नातेवाईक त्याच्यावर बांधकाम सोपवून निर्धास्त असायचे. आता ज्या पद्धतीने अधिकृत रित्या गुत्तेदार व बांधकाम व्यवसायीक पुढे आलेले आहेत तेंव्हा तसं नसायचं (मला आठवतोय तो 1980 चा काळ). सिमेंट वगैरेची टंचाई असायची. मजूर यायचे नाहीत. आर्किटेक्ट नावाच्या प्राण्याचा सुळसुळाट झाला नव्हता. त्या काळातली ही बांधकामे तो मोठ्या हौसेने पूर्ण करून द्यायचा.
निवृत्तीनंतर त्यानं हाच व्यवसाय करावा असं मी त्याला सुचवून पाहिलं. आग्रह धरला. पण त्याला त्याचा व्यवसाय करण्यात रस नव्हता. त्याची ती आवड होती, छंद होता. त्याचा व्यवसाय झाला तर आनंद निघून जाईल असं त्याला वाटत असावं. छोट्या मुलानं स्टेशनरीचं दुकान काढलं तिथे तो आनंदाने बसायचा. पण आपला म्हणून बांधकाम व्यवसाय उभा करावा हे त्याला वाटलं नाही हे खरं आहे.
मामा जन्मला आणि त्याची आई निधन पावली. आजोबांनी माझ्या आज्जीशी दुसरं लग्न केलं. त्या क्षणापासून तो माझ्या आज्जीचंच लेकरू झाला. आज्जीची एक सर्वात लहान बहिण (बाबी मावशी-विजया माणकेश्वर) हीच्या जन्मा आधीच तिचे वडिल वारले. ही मावशीआज्जी अगदी मामाच्याच वयाची. या दोघांसाठी जन्म न देताही आज्जीने आईची भूमिका निष्ठेने जिव्हाळ्याने निभावली. हा मामाही आयुष्यभर आपल्या दुसर्या आईच्या बहिणी तिचे मावस भाउ तिचे नातेवाईक यांच्यातच रमला. त्याचा सख्खा मामा हयात होता. पण याला कधीच त्या आजोळचा जिव्हाळा लागला नाही.
मामा व बाबी मावशी हे दोघे बरोबरचे. यांची भांडणं लागायची तेंव्हा आज्जी वैतागून असं म्हणायची ‘मेले छळतात मला. एक आईला गिळून बसलंय आणि एक बापाला’ अशी एक आठवण आई सांगते. पण सगळा संसार रेटणार्या सतरा अठरा वर्षाच्या बाईचा हा उद्गार वरवरचा असायचा. प्रत्यक्षात या दोघांनाही आज्जीची सर्वात जास्त माया अनुभवायला मिळाली. या आपल्या मावशीला मामा कायम ‘बाबे’ असंच म्हणत आला. आणि तिही ‘वश्या’ असंच म्हणायची.
आमचे मोठे आजोबा (सखारामपंत बीडकर) 1943 ला अभियंता पदवी घेवून उस्मानिया विद्यापीठांतून बाहेर पडले. मध्य प्रदेशांत तंत्र शिक्षण विभागांत फार मोठ्या पदांवर त्यांनी काम केलं. अगदी म.प्र.शासनाच्या तंत्र शिक्षण सचिव पदावरून ते निवृत्त झाले. मामाला आपल्या या मोठ्या काकांचा अतिशय अभिमान. मराठवाड्यातला पहिला अभियंता आपला काका आहे आणि आपणही त्याच क्षेत्रात काम करतो या भावनेनं त्याची छाती भरून यायची. सगळ्यात लहान आजोबा (डॉ. नारायणराव बीडकर) हे वैद्यकीय क्षेत्रांत आणि औरंगाबादच्या सामाजिक विश्वात एक आदरणीय नांव. निवृत्तीनंतर मामा औरंगाबादला आयुष्याच्या अखेरपर्यंत होता. डॉ. नारायणराव बीडकर (नाना काका) हे पण औरंगाबादलाच होते. त्यांच्यासाठीचा मामाचा असलेला आदर मला त्याच्या बोलण्यात नेहमी जाणवायचा. आपण नारायणराव बीडकरांचे पुतणे आहोत हे तो आवर्जून स्वत:ची ओळख करून देताना सांगायचा. बर्याचदा नाना काकांकडे जाताना मला सोबत घेवून जायचा. तेंव्हा त्यांच्याशी बोलताना आदर जिव्हाळा शब्दांशब्दांतून उमटून यायचा.
लहान दोन मामा ऍटोमोबाईल व्यवसायात होते. व्यवसाय करणार्यांचे त्याला फार कौतूक वाटायचे. दिवाळीत आमच्या या परभणीच्या मामांच्या दुकानांत लक्ष्मीपुजनाचा मोठा कार्यक्रम असायचा. हा मोठा मामा तेंव्हा अगत्याने हजर असायचा. बहुतेक वेळा लहान दोघेही मामा मोठ्या मामा मामीलाच पुजेला बसवायचे. सगळ्या भावांडांनी मामाचे मोठेपण आनंदाने मान्य केलेले तर होतेच. मोठा मामाही ही भूमिका मनापासून निभवायचा.
मामा शिकायला होता तेंव्हा त्याची परिक्षा असताना, आजारी असताना आज्जी त्याच्या खोलीवर येवून रहायची आणि त्याच्या सकट त्याच्या दोन मित्रांना स्वयंपाक करून खावू घालायची. त्यामुळे मामाचे दोन्ही मित्र मोहन भाले आणि बिंदू हे आम्हाला मामासारखेच होते.
दोन मुलं सुना पाच नातवंडं असा भरल्या घरात तो गेला. परभणी कडे आईकडचे नातेवाईक कितीही मोठे असो त्याला अरे तूरेच करायची सवय आहे. त्यामुळे बाबांच्या वयाचा हा मामा आमच्यासाठी ‘अरे मामाच’ होता. जावाई म्हणणार्या मामानं पोरगी तर दिली नाही पण आयुष्यात खुप आनंद दिला. स्वत:च्या आयुष्यात जन्मापासून आलेलं दु:ख किंवा नंतरही वाट्याला येणार्या छोट्या मोठ्या अडचणींचा त्याने कधीच बाउ केला नाही. उलट तो जिथे जाई तिथले वातावरण प्रसन्न करण्याची विलक्षण हातोटी त्याला होती. आमच्या नातेवाईक घरगुती सगळ्या समारंभांत त्याची उपस्थिती अनिवार्य असायची ते त्याच्या या स्वभावामुळेच.
माझा तीन नंबरचा मामा ओरिसात भुवनेश्वरला होता. त्याच्याकडे आमच्या घरच्यांनी सगळ्यांनी मिळून जायचे ठरवले. मोठा मामा, मामी, त्याची दोन मुलं, दोन नंबरचा सुहास मामा, मामी आणि त्याचा एक मुलगा, आई-बाबा आणि आम्ही दोघे भावंडं अशी अकरा जणं आम्ही भुवनेश्वरला रेल्वेने गेलो. तिथे तीन नंबरचा मामा (अनील बीडकर) मामी आणि त्यांची लहान मुलगी श्यामली असे तिन जणं होते. कल्पना करा अशी चौदा माणसं एका अंबॅसिडर गाडीत बसून कोणार्क सुर्यमंदिर, पुरीचे जन्ननाथ मंदिर, नंदनकानन अभयारण्य अशी सहल केली होती. तेंव्हा अंब्यासिडर गाडीचे समोरचे सीट एकसंध असायचे. या सगळ्या अडचणीवर मामाच्या दिलखुलास कॉमेंट चालायच्या. मोठे लोकं पत्ते खेळताना आमची एक मामी सांगितलं ते एंकायची आणि दुसरी ऐकायची नाही तेंव्हा ‘एैकती आणि न एैकती’ अशी त्यांना नावं ठेवून मामा गंमत करायचा. नंदन कानन अभयारण्यात फिरताना तर मग मागची डिक्की उघडून आम्ही तिघं मोठे भावंडं त्यात बसून प्रवास केला.
मामे-चुलत-मावस भावंडांत तो सर्वात मोठा. हे ‘दादा’पण त्यानं खर्या अर्थाने निभावलं. त्याचे अंत्यदर्शन घेता आले नाही म्हणून त्याच्या सख्ख्या भावंडांइतकेच त्याचे मावस चुलत मामे भावंडं हळहळत होते त्याचं कारण हेच.
आमच्या सगळ्या मामा मावश्यांना आज्जी आजोबा गेल्यावर आज्जीच्या तीन बहिणी गेल्यावर याच मामाचा आधार वाटायचा. मीना मावशी मला म्हणाली, ‘बाळ्या (मला बाळ्या म्हणणार्या मोजक्या माणसांत ही मावशी आहे) दादा असल्याने वाटायचं कुणीतरी आहे आपल्या पाठीशी. पण आता तोच गेला की रे.’ तीला पुढे बोलवेना. मंजू मावशी तर बोलूच शकत नव्हती. तीनं अर्धवट बोलून फोनच ठेवून दिला. कोरोना मुळे आई आणि इतर मामांना येण्यापासून रोकता रोकता माझ्या मोठ्या भावाच्या नाकी नउ आले. भुषण मामा, नंदू मामा बोलता बोलताच गप्प झाले. संजू मामा भंडारी दवाखान्यात चार तास बसून होता. माझे तीन चुलतमामा अंत्यविधीला हजर होते. त्यांची भावना घरातला सगळ्यात मोठा भाऊ वडिलधारा गेला अशीच होती.
मामासारखी माणसं जातात त्याचं एक जवळचा नातेवाईक म्हणून आतोनात दु:ख तर असतंच. पण आयुष्याकडे सकारात्मकतेने पाहणारा सर्वांना हसत खेळत ठेवणारा जगण्याचा खरा अर्थ आपल्या कृतीतून समोर ठेवणारा असा माणूस गेला म्हणून जास्त दु:ख होते. आता आपलीच जबाबदारी आहे की आपण तसे वागायचा प्रयत्न करणे. छोट्या मामाच्या मुलीने राधा दंडे हिने मला फोन केला आणि तिला रडू कोसळलं. कुणीच कुणाकडे जाणं शक्यच नव्हतं. तरी मी तिच्याघरी गेलो. दुर अंतरावर बसून आम्ही डोळ्यांनीच एकमेकांचे सांत्वन केलं. शब्द तर फुटत नव्हतेच. माझ्या लक्षात आलं वसंतमामा सारखी व्यक्तिमत्वं ही फक्त कुणा एकाची नातेवाईक नसतात. ही एक रसरशीत अशी जीवनवृत्ती आहे. ती आपण जपणं हीच त्यांना खरी श्रद्धांजली.
-श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575