Friday, September 18, 2020

खालीद उमर - कायद्याने तोडली कमर!


उरूस, 18 सप्टेंबर 2020 

शर्जिल इमाम याच्यावर गुन्हा दाखल करून तुरूंगात टाकण्यात आले तेंव्हा मी शिर्षक दिले होते, ‘शर्जिल इमाम-कायद्याने केले काम तमाम’. काही दिवसांत असाच मथळा परत वापरायची वेळ येईल याची  खात्री होतीच. यावेळी पाळी आली आहे उमर खालीदची. 

तुकडे तुकडे गँगचा पोस्टर बॉय असलेला उमर खालीद कधी ना कधी तपास यंत्रणेच्या हाती लागणार यात काही शंकाच नव्हती. त्याला पूर्वीही अटक झाली होती. तेंव्हा जामिन मिळाला. सुटका झाली. पण त्याच्या पुढील काळातील कारवाया पाहात हा परत अडकणार हे स्पष्ट दिसतच होते. 

1960 नंतर भारतात दोन प्रकारची आंदोलने भारतीय लोकशाहीला आतून पोखरून टाकत होती. एक होता नक्षलबारी गावातून सुरू झालेला नक्षलवाद. आणि दुसरा होता पाकिस्तान प्रेरीत कश्मीरमुद्द्यावरून सुरू झालेला इस्लामी आतंकवाद. या दोन्हीवर विविध मार्गांनी सतत कारवाया झाल्या आहेत. त्या अपुर्‍या होत्या किंवा कायद्यातील पळवाटा त्यांना वाचवत होत्या, डावे पुरोगामी बुद्धीवंत त्यांना पाठिंबा देत होते, कायदेतज्ज्ञ असलेली वकिल मंडळी त्यांना न्यायालयात सोडवत होती. माध्यमांतून डावी विचारसरणी आणि कश्मीरमधील फुटीर यांना मोठी सहानुभूती मिळत होती. 

उमर खालीद हा दिल्ली दंग्यांमध्ये, शाहिन बाग आंदोलन हिंसक बनविण्यात सहभागी होता याचे सकृतदर्शनी पुरावे समोर आले आहेत. आणि त्यांच्याच आधारावर त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 

दिल्ली दंग्यांचा सुत्रधार ‘आप’चा नगरसेवक ताहिर हुसेन, आणि दुसरा आरोपी खालीद सैफी यांच्यातील दूवा उमर खालीद होता. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप भारतात येतील तेंव्हा भारतात अस्वस्थता निर्माण करण्याचा एक डाव होता. हे समोर आलं आहे. 

या विषयाला वेगळं वळण देण्यासाठी म्हणून हिंदू मुसलमान किंवा भाजप संघ विरूद्ध इतर असे सांगितल्या जाते. खरं तर नक्षलवाद आणि इस्लामिक विविध गटांच्या कारवाया यांचा इतिहास वर सांगितल्याप्रमाणे किमान पन्नास वर्षांचा आहे. त्यात कुठले एक सरकार आणि कुठली एक विचारसरणी यांच्यावर टीका करून मुळ प्रश्‍न सुटणार नाही. 

मोदी पंतप्रधान होण्या अगोदर सर्वच सरकारांनी हा धोका ओळखला होता पण त्यावर कडक कारवायी करण्याचे टाळले होते. पोलिस यंत्रणा न्यायालयात होणार्‍या निर्णयांनी हतबल झाली होती. कायदेतज्ज्ञ म्हणवून घेणारे अशा गुन्हेगारांना लिलया सोडवून आणत होते. 

दुसरीकडून सरकार नावाची यंत्रणा पोलिसांनी केलेल्या मेहनतीवर पाणी फिरवत होती. म्हणजे तेच अधिकारी, तेच पोलिस, त्यांचे तेच खबरे पण यांनी नक्षलवाद व इस्लामिक आतंकवादी संघटना यांच्यावर केलेल्या कारवाया फलद्रूप होताना दिसत नव्हत्या. 

मोदी पंतप्रधान झाल्यापासून या दोन्ही बाबत एक निश्चित कडक धोरण ठरविण्यात आले. आणि त्याची कठोर अंमलबजावणी केली जावी अशा सुचना सर्व यंत्रणांना मिळाल्या. याचाच परिणाम म्हणून आता या अटका होताना दिसत आहेत. 

उमर खालीदला अटक झाली त्या सोबतच दूसरी एक अतिशय मोलाची बाब घडत आहे. सर्वसामान्य जनतेतून यांना असलेली मान्यता/ पाठिंबा संपून जाताना आढळून येतो आहे. जे पत्रकार यांच्यावर आधी स्तूती सुमने उधळत होते तेच आता यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी, त्या बाबतचे छोटे मोठे पुरावे समोर आणत आहेत. समाज माध्यमांनी एक मोठी ताकद सिद्ध केली आहे. शर्जिल इमामची वक्तव्ये, फोटो तसेच आता उमर खालीदचे व्हिडिओही समाज माध्यमांवर फिरत आहे. त्यातील जे निखालस खोटे आहेत ते बाजूला ठेवू. पण जी वक्तव्यं खरंच त्यांनी केली आहेत त्यांचा प्रसार फार मोठ्या प्रमाणावर झाल्याने यांच्याबाबत समाजमन विरोधात जाताना दिसून येते आहे.

कायदा त्याचे काम करतो आहे पण सोबतच समाजमाध्यमांची ही भूमिका पण याला फार पोषक राहिली आहे. 

तिसरी आघाडी आता डाव्या विचारवंतांच्या बाबतीत उभी राहिलेली दिसून येते आहे. अगदी आत्ता आत्तापर्यंत खोट्या गोष्टी अगदी रेटून नेलेल्या आपल्याला दिसून येतील. पण कायद्याने केलेली कारवाई, समाजमाध्यमांची भूमिका यामुळे या डाव्या पुरोगामी विचारवंतांना आता उमर खालीद, शेहला राशीद, शर्जिल इमाम, जिग्नेश मेवाणी यांच्या देशविरोधी चुक भूमिकांचे समर्थन करणे अवघड होवून बसले आहे. तात्काळ यावर प्रचंड अशा प्रतिक्रिया उमटू लागतात. 

न्यायालयात जेंव्हा निकाल लागायचा तेंव्हा लागो पण समाजमाध्यमांवर उथळपणे काम करणारे वगळले तर गंभीर पण खुप लोक आहेत. ते या खोटेपणाचा बुरखा लगेच फाडत आहेत. 

राम मंदिर प्रकरणात  मस्जिदीखाली सापडलेल्या अवशेषांवरून पुरोगाम्यांची वाचाच बंद झाली. रोमिला थापर व इरफान हबीब सारख्यांनी जो खोटा प्रचार चालवला होता त्याला लगेच चाप बसवला गेला. हे करण्यात समाजमाध्यमांचा मोठा वाटा आहे. वैचारिक खोटा प्रचार हाणून पाडल्या जातो आहे. 

अटक झालेल्या सफुरा झरगर, शर्जिल इमाम, देवांगना कालिता, नताशा नरवाल या नावांत आता उमर खालीद हे नाव पण सामील झाले आहे. लवकरच कन्हैया कुमारचे पण नाव यात येण्याची शक्यता आहे. 

संविधान बचाव म्हणत संविधान न मानणाऱ्यांच्या आता कायद्याने मुसक्या आवळ्या चालल्या आहेत. आता यांना पाठिंबा देणारी फळी मोडून काढण्याची गरज आहे.  हे कामही होताना दिसून येते आहे. हा लोकशाहीसाठी शुभशकून आहे.   

      श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575   

    

 

Thursday, September 17, 2020

स्वामीजी आम्हाला माफ करूच नका.. !


उरूस, 17 सप्टेंबर 2020 

 आदरणीय स्वामीजी सा.न.

स्वामीजी आज 17 सप्टेंबर. तूमच्या नावाने आणि हैदराबाद मुक्ती संग्रमाच्या नावाने गळे काढण्याचा सार्वजनिक कार्यक्रम आज मोठ्या उत्साहाने साजरा होतो. शासकीय सुट्टी आता मराठवाडा आणि चंद्रपुरचा राजूरा तालूका या प्रदेशात मंजूर झाली आहे. कागदोपत्री 15 ऑगस्ट, 26 जानेवारी, 1 मे यांच्या बरोबरीनेच या दिवसाचे महत्त्व आहे. 

मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबाद शहरात क्रांती चौकात प्रचंड मोठा ध्वजस्तंभ उभारला आहे. ही जागा म्हणजेच 1857 च्या स्वातंत्र्यलढ्यात ज्या क्रांतीकारकांना फासावर चढवले ती जागा. याला काला चबुतरा म्हणतात. त्याची आठवण म्हणून झाशीच्या राणीचा पुतळा इथे बसवला होता. 

2017 मध्ये स्वातंत्र्योत्तर भारतातील लोकशाही सरकारला अचानक जाग आली आणि हे स्मारक आधुनिक करण्याच्या नावाखाली काम सुरू झाले. प्रचंड उंच झेंडा इथे उत्साहात उभारला गेला. जवळपास अडीच करोड रूपये यावर खर्च झाला. आता अगदीच महत्त्वाची असलेली कामे म्हणजे बांधकाम, रंगरंगोटी, बागबगीचा, जागेचे रक्षण करण्यासाठी पहारेकरी,  प्रकाश योजना यावर निधी खर्च झाला. तरी आम्ही आमच्याकडून झाशीची राणी आणि तूमच्या पुतळ्यासाठी छान ग्रॅनाईटमध्ये चौथरे उभारूनही ठेवले. 

पूर्वीच्या उद्यानातील झाशीच्या राणीचा पुतळा होताच. तो बसवून टाकला. पूर्वीच्या उद्यानात तूमचा पुतळा नव्हता त्याला आम्ही तरी काय करणार? नसता तो पण बसवून टाकला असता. बरं ज्यांनी या स्मारकासाठी देणग्या दिल्या त्यांनी सगळ्यांनी पैसेच दिले. पुतळा कोणीच दिला नाही. मग मला सांगा स्वामीजी पुतळा कसा आणायचा? 

4 नोव्हेंबर 2017 मध्ये या स्मरकाचे उद्घाटन राज्यपाल विद्यासागर राव यांच्या हस्ते झाले.  त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. आता याला 3 वर्षे उलटून गेली आहेत. पण या काळात तूमचा पुतळा बसवणे शक्य झाले नाही. आहो शासनाच्या मागे खुप कामे आहेत. इतके किरकोळ काम इतक्या लवकर कसे शक्य आहे. तेंव्हा तूम्ही समजून घ्या स्वामीजी. 

तसेही स्वामीजी तूम्ही भगवे वस्त्र धारण केलेले संन्यासी. तूम्ही नि:संग होता. मग पुतळ्याची तरी काय गरज ? असे आम्हाला वाटले. 

मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराचा प्रश्‍न पेटला होता. त्याला विरोध करणारे सर्व तूमचेच शिष्य. त्यातील पद्मविभुषण गोविंदभाई श्रॉफ तेवढे 1994 मध्ये हयात होते. मग यावर तडजोड म्हणून मराठवाड्याची शैक्षणीक फाळणी केल्या गेली. औरंगाबाद, जालना, बीड आणि उस्मानाबाद हे जिल्हे औरंगाबादमध्ये  तेंव्हाच्या मराठवाडा विद्यापीठांत ठेवल्या गेले. आणि विद्यापीठाचा नामविस्तार (नामांतर नाही) केल्या गेला डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ. आणि गोविंदभाई श्रॉफ यांच्या नेतृत्वाखाली विरोध करण्यांर्‍यांना शांत करण्यासाठी नांदेड येथे नांदेड, परभणी, हिंगोली व लातूर जिल्ह्यांसाठी नविन विद्यापीठ स्थापन झाले. त्याला नाव देण्यात आले स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ. अशा प्रकारे स्वामीजी तडजोडीचा एक भाग म्हणून तूमच्या नावाने विद्यापीठ स्थापन झाले. बोली भाषेत या दोन्ही विद्यापीठांना बामु आणि रामु अशी नावे आहेत हा भाग वेगळा. 

तर स्वामीजी तूमच्या नावाने विद्यापीठ आहे ना. मग परत आता पुतळा कशाला पाहिजे आहे?  तसाही तूमचा आणि  औरंगाबादचा काय संबंध? तूम्ही भलेही इथे खासदार म्हणून निवडुन आला असाल. पण हैदराबाद मुक्ती लढ्याचे नेतृत्व करण्यासाठी तूम्ही पुढे आलात आणि राजधानीचे ठिकाण म्हणून तूम्ही मुख्यालय बनवले ते हैदराबाद येथेच. शिवाय तूमचे निधनही हैदराबाद येथेच झाले ना. मग औरंगाबादला तूमचा पुतळा कशाला पाहिजे? तूम्ही मुळचे कर्नाटकातील गुलबर्ग्याचे. तेंव्हा तिथे फार तर तूमचे पुतळे वगैरे ठिक आहे.

तूम्ही खासदार होतात तेंव्हा तूमच्या खासदार निधीतून स्वत:च्या पुतळ्यासाठी निधीपण तूम्ही राखून ठेवला नाही (तेंव्हा खासदार निधी नव्हता असे सांगू नका. ते आम्हालाही माहित आहे). आता याला आम्ही काय करणार? 

तूम्ही ज्यांच्या विरोधात लढलात तोच सातवा निजाम उस्मान अली पाशा हैदराबाद राज्याचा प्रमुख म्हणजेच राज्यपाल बनवला गेला. तूमच्या विरोधातील जे राजकीय नेते होते त्यांचे पुढारी बी. रामकिशनराव यांनाच हैदराबाद राज्याचा मुख्यमंत्री केल्या गेले. तूम्ही खासदार होता पण तूम्हाला नेहरूंच्या मंत्रीमंडळात घेतल्या गेले नाही. तेंव्हा तूम्हीच सांगा स्वामीजी तूमचा पुतळा कसा काय बसवायचा? 

22 जानेवारी 1972 ला तूमचे निधन झाले तेंव्हा तूमची अंत्ययात्रा निघाली होती हैदराबादला. तूम्ही रहात होत्या त्या बेगम पेठेतील गल्लीमधून निघालेल्या या अंत्ययात्रेत किती माणसं होती स्वामीजी? फक्त पंधराशे ते दोन हजार. आहो अशावेळी ट्रकांमधून माणसे आणावी लागतात. जागजागी फलक लावावे लागतात. ‘स्वामीजी अमर रहे’ असे पोस्टर छापून घ्यावे लागतात. वर्तमानपत्रांतून पुरवण्या छापून आणाव्या लागतात. हे तूम्ही काहीच केले नाही.

तूम्ही ज्याच्या विरोधात लढलात तो सातवा निजाम उस्मान अली पाशा त्याचे निधन झाले तेंव्हा किती लोकं होते बघितले का? लाखभर लोक त्याच्या जनाजात शरीक झाले होते. आजही त्याला मानणार्‍या पक्षाचे दोन खासदार असदुद्दीन ओवैसी हैदराबाद आणि इम्तीयाज जलील औरंगाबाद येथून निवडून आलेले आहेत. तूम्हाला मानणारे कोण आहे सांगा तरी एकदा?

तेंव्हा स्वामीजी (तूमचे नाव व्यंकटेश भवानराव खेडगीकर होते हे खुप जणांना माहितच नाही. माहित करूनही काय करणार म्हणा). पुतळ्याचे काही आम्हाला सांगू नका. 

कागदोपत्री म्हणाल तर कॉ. मुरूगप्पा खुमसे (रेणापुर. जि. लातूर) यांनी उच्च न्यायालयात तूमचा पुतळा बसविण्यासाठी याचिका दाखल केली होती. तेंव्हाचे विभागीय आयुक्त यांनी न्यायालयात पुतळा बसवू असे आश्वासन दिले. याचिका मागे घेण्यात आली. आता विषय संपला ना स्वामीजी. शासन म्हणाले आहे बसवु तेंव्हा बसवु कधीतरी. त्यात काय एवढे.    

आपले मा. मुख्यमंत्री विलासराव देशमुख आणि मा. अशोकराव चव्हाण हे मराठवाड्याचे भूमीपुत्र. यांनीही आश्वासन दिले पुतळा बसवू. एक पुतळा सिद्धार्थ उद्यानात कापडात गुंडाळून पडून आहे ना. आता नियमच असे आहेत की नाही लवकर बसवता येत पुतळा. गोविंदभाई श्रॉफ यांचा पुतळा पैठणगेटला बसवला आहेच ना. ते तूमचेच शिष्य. मग परत तुमच्या पुतळ्याची गरजच काय स्वामीजी? भाईंचा पुतळा उत्तम पाचारणे यांनी तयार केला. भाईंच्या पुतळ्याचे बील काढण्यासाठी त्यांना महापालिकेच्या वित्तविभागात ‘भाईचारा’ दाखवत कोणाला किती ‘चारा’ खावू घालावा लागला हे सगळे तूम्हाला कळाले असेलच ना. मग परत आता तुमच्या पुतळ्याच्या निमित्ताने झंझट कशाला? 

तेंव्हा स्वामीजी आम्हाला माफ करूच नका. खरं कारण म्हणजे आमची काहीच चुक नाही. तूम्हीच तूमच्या खासदार निधीतून सोय करायला पाहिजे होती. तूम्ही मंत्री मुख्यमंत्री झाला असता तर काही झाले असते. शिवाय तूमचे पोरंबाळं असले असते तर त्यांनीही बापासाठी मरमर करून पुतळे उभारण्याची काही सोय सत्ता मिळताच केली असती. शासकीय निधीतून बापाची जन्मशताब्दि पुतळे स्मारके हे सारे करता येते. तेही तूम्ही केलं नाही. तूम्ही संन्याशी. 

पत्राच्या खाली तूमचाच म्हणून सही करण्याची पद्धत असते. पण आम्ही तूमचे नाहीतच स्वामीजी तेंव्हा तूमचा म्हणून सही तरी कशी करू? स्वामीजी नशिब तूमच्या नावाचा चौथरा तरी आहे. तेवढे तरी भाग्य कोणाच्या वाट्याला येते? 

तूमचे नसलेले आम्ही सर्व !

 

     श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575   

    

 

Tuesday, September 15, 2020

वेताळवाडी : अजिंठा डोंगरातील एक दुर्लक्षीत किल्ला !



उरूस, 15 सप्टेंबर 2020 

 अजिंठा डोंगर रांगांतील रूद्रेश्वर लेणी, जंजाळा किल्ला व घटोत्कच लेणी यांवर मी याच सदरात लिहीले होते. त्याच मालिकेतील हा पुढचा लेख. संपूर्ण तटबंदी आणि दोन भव्य दरवाजे शाबूत असलेला अजिंठा डोंगर रांगेतील किल्ला म्हणजेच वेताळवाडीचा किल्ला. औरंगाबाद अजिंठा रस्त्यावर अजिंठ्याच्या अलीकडे गोळेगांवपासून डाव्या बाजूला एक  रस्ता फुटतो. हा रस्ता उंडणगाव मार्गे सोयगांवला जातो. याच रस्त्यावर हळदा घाटात तीन्ही दिशेने डोंगर रांगांनी वेढलेला असा हा वाडीचा किल्ला.  


किल्ल्याची संपूर्ण तटबंदी लांबूनच दिसते आणि त्याची भव्यता लक्षात येते. भोवताली डोंगर रांगा आणि मध्यभागी मोदक ठेवावा असा एक डोंगर. लांबट आकारात पसरलेला भव्य भक्कम बुरूज पहिल्यांदा आपले लक्ष वेधून घेतो. यादव राजा भिल्लम याच्या काळातील हा किल्ला असल्याचे तज्ज्ञ सांगतात. पण याची नेमकी माहिती उपलब्ध नाही. किल्ल्यावर एक तोफ पण सापडलेली आहे. तिच्यावरची चिन्हे आणि दरवाज्यावरची चिन्हे यांवरून किल्ला यादव काळातील असल्याची पुष्टी मिळते. 

किल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार तीन बुरूजांच्या त्रिकोणी रचनेतून तयार झालेले आहे. त्याची रचना इतकी अवघड आहे की शत्रूला सहजा सहजी मुख्यद्वार सापडू नये. हल्ला करण्यासाठी दरवाजा समोर जराही जागा मोकळी सोडलेली नाही. परिणामी या दरवाजासमोर शरण गेल्याशिवाय कुणाला त्यातून प्रवेशच मिळू शकत नाही. 


किल्ल्याचे प्रवेशद्वार, अगदी त्याला लागूनच असलेले द्वारपालाचे दालन, मुख्य बुरूजावर टेहेळणीसाठी बांधलेली झरोके झरोके असलेली माडी. या गॅलरीवजा सज्जाच्या कमानीतून समोरचे डोंगर आणि त्याच्या पायाशी असलेले तळे हे दृश्य मोठे कलात्मक दिसते.

किल्ल्याच्या प्रवेशद्वार आणि परिसराची डागडुजी पुरातत्त्व खात्याकडून चांगल्या प्रकारे करण्यात आलेली दिसून येते आहे. किल्ल्यावर सापडलेली एक मोठी लोखंडी तोफ लाकडी गाड्यावर बुरूजावर मांडून ठेवली आहे. किल्ल्यावर चढताना बालेकिल्ल्याची दुसरी तटबंदी लागते. ही संपूर्ण नसली तरी बर्‍याच जागी चांगल्या स्थितीत शाबूत आहे. बालेकिल्ल्याच्या एका महालाचा बुरूज पडक्या अवस्थेत आहे.


किल्ल्यावर धान्य साठवणुकीचे दोन भव्य दालनं चांगल्या अवस्थेतील आहेत. शिवाय एक अतिशय देखणे असे दगडी चिर्‍यांचे अष्टकोनी बांधीव तळे आहे. त्याच्या एका बाजूला पूर्वेला तोंड करून ‘जलमहाल’ आहे. याच्या तीन भिंती शिल्लक आहेत. दगडांवरील सुंदर कोरीव काम कोण्या एके काळी हा महाल अतिशय रसिकतेने उभारलेला असावा याची साक्ष देतात.

या किल्ल्यावरील सर्वात देखणी आणि सुंदर जागा म्हणजे उत्तर टोकावर असलेल्या हवामहलच्या शिल्लक चार कमानी. मराठवाडा आणि खान्देश यांना विभागणार्‍या डोंगरकड्यावरील टोकाचा बिंदू म्हणजे ही जागा. एकेकाळी सुंदर असा हवामहल या ठिकाणी होता. त्याची पडझड होवून महालाच्या चार कमानी आणि दोन भिंतीच आता शिल्लक आहेत. या कमानींमधून दूरवर पसरलेला खानदेशचा परिसर, सर्वत्र पसरेली शेते, जागजागी पाणी साठून तयार झालेली सुंदर तळी असे मोठे नयनरम्य दृश्य दिसून येते. याच किल्ल्याच्या डाव्या अंगाला सोयगाव धरणाचा पाणीसाठा डोळ्याचे पारणे फेडतो. किल्ल्याच्या उजव्या अंगाला प्रसिद्ध अशी रूद्रेश्वर लेणी आणि धबधबा आहे. 


अजिंठा डोंगराची नैसर्गिक अशी भव्य संरक्षक भिंत औरंगाबाद आणि जळगांवला विभागते. तेंव्हा या डोंगराच्या कड्यांवर चार किल्ले बांधल्या गेले आहेत. त्यांची रचना टेहेळणीचे संरक्षक किल्ले अशी असावी. हे चार किल्ले म्हणजे वाडिचा किल्ला, त्याच्या बाजूचा जंजाळ्याचा किल्ला, सुतोंड्याचा किल्ला आणि गवताळा अभयारण्या जवळचा अंतुरचा किल्ला. वाडीच्या किल्ल्यावरून जवळचा जंजाळा किल्ला आणि घटोत्कच लेणीचा डोंगर दिसतो.  

वाडीच्या किल्यावर हवामहलच्या बाजूने खाली उतरल्यास किल्ल्याचा उत्तरेकडचा म्हणजेच सोयगावच्या दिशेचा दरवाजा आढळतो.  दरवाजापासून आतपर्यंत डाव्या बाजूला ओवर्‍या ओवर्‍यांची वैशिष्ट्यपूर्ण रचना दिसून येते. कदाचित हा भाग किल्ल्यावरील बाजारपेठेसारखा असावा. उत्तरेकडील दरवाजापासून डाव्या हाताने तटबंदीला लागून चालत गेले तर आपण परत दक्षिणेकडील मुख्य दरवाजापाशी येतो.

वाडिच्या किल्ल्याजवळ डोंगरात उजव्या बाजूच्या (पूर्वेकडील) डोंगरात काही रिकाम्या लेण्या आहेत. हा परिसर अजिंठा लेणीच्या कालखंडात लेणी कोरण्यासाठी तपासला गेला होता. दगडा हवा तसा सापडला नाही म्हणून ही लेणी सोडून दिलेली दिसते. हौशी पर्यटकांसाठी अशा झाडांत लपलेल्या लेण्यांचा शोध घेणे हे एक आव्हान असते. 

वाडिचा किल्ला जून ते डिसेंबर काळात एक चांगले पर्यटन स्थळ म्हणून विकसित होवू शकते. किल्ल्यावरील माजलेली झाडी, झुडपे काढणे, हवामहल ते उत्तर दरवाजापर्यंत जाणारी चांगली पायवाट तयार करणे, मुख्य तटबंदीला लागून पर्यटकांना फिरण्यासाठी उत्तम पायवाट तयार करणे आवश्यक आहे.

किल्ल्याच्या प्रवेशद्वाराची जशी डागडुजी झाली आहे तशीच किल्ल्यावरील इतर भग्न अवशेषांची व्हायला हवी. 

जंजाळा किल्ला, घटोत्कच लेणी, वाडीचा किल्ला, रूद्रेश्वर लेणी, रूद्रेश्वर धबधबा, वडेश्वर महादेव मंदिर, मुर्डेश्वर देवस्थान असा हा अगदी एकमेकांच्या जवळ असलेला परिसर. औरंगाबादेहून पहाटे निघून जंगलात एक दिवसाचा मुक्काम (तशी चांगली सोय उंडणगावात व जवळच गणेशवाडीत उपलब्ध आहे) केल्यास दोन दिवसात सर्वच ठिकाणं पाहणं शक्य होते.

जळगांव कडून सोयगांव मार्गे आल्यास तर हा परिसर अजूनच जवळ आहे. अगदी अर्ध्याच अंतरावर आहे.

पर्यटनाचा एक वेगळा विचार पंतप्रधान मोदींनी मांडला आहे. प्रत्येक भारतीयाने वर्षातून किमान एकदा देशांतर्गत पर्यटनासाठी गेले पाहिजे. कोरोना काळात जास्त खर्चिक पर्यटन करण्यापेक्षा आपल्या जवळच्या अशा स्थळांना भेटी दिल्यास हा उद्देश सफल होईल.

या प्रदेशात हौशी पर्यटकांसोबतच अभ्यासक विद्यार्थी आल्यास त्यांच्याकडून इतिहासातील अजून काही लपलेल्या बाबींवर प्रकाश पडू शकतो.

(छायाचित्र सौजन्य -ऍक्वीन टूरिझम)  

 

     श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575   

    

 

Monday, September 14, 2020

घटोत्कच लेणीचा सुंदर निसर्ग आणि आपली अनास्था !


उरूस, 14 सप्टेंबर 2020 

 अजिंठा डोंगराचा परिसर विलक्षण अशा निसर्ग सौंदर्याने नटलेले आहे. इथल्या दगडाचा दर्जा पारखून दोन हजार वर्षांपूर्वीपासून इथे लेणी कोरल्या गेली आहेत. अजिंठा लेणी सर्वपरिचित आहे पण याशिवाय त्याच काळातील किंवा त्यापूर्वीचीही काही लेणी या डोंगरात आहेत. पितळखोरा लेणी तर अजिंठ्याच्या आधीची आहे. 

सिल्लोड तालूक्यात हळदा घाटात वाडीचा किल्ला आणि रूद्रेश्वर लेणी आहे. याच किल्ल्याच्या बाजूला दुसर्‍या घाटात आहे ऐतिहासिक जंजाळा किल्ला (याला वैश्यगड किंवा तलतमचा किल्लाही म्हणतात). याच किल्ल्यासमोरच्या दरीत घटोत्कच लेणी आहे. नितांत सुंदर अशा दाट जंगलाने हा परिसर वेढलेला आहे. जंजाळा किल्ला आणि घटोत्कच लेणी याच्या मध्ये दरीत आजूबाजूच्या शेत शिवारातून वाहत येणारे पाणी धबधबा बनून कोसळते. कोसळते म्हणण्यापेक्षा वहात येते असं म्हणणं जास्त संयुक्तीक आहे. हिंदीत ‘झरना’ असा जो शब्द आहे तो याला नेमका लागू पडतो. 


जून्या मोगल वास्तूंमध्ये दगडांवरून वहात जाणार्‍या पाण्याची कारंज्याजवळ रचना केलेली असते. तशीच रचना या अनोख्या धबधब्याची आहे. उंचावरून तिरक्या असलेल्या दगडावरून हे पाणी खळाळत येते. अन्य जागी उंच कड्यांवरून पाणी खाली झेप घेते. इथे अतिश वेगळी आणि वैशिष्ट्यपूर्ण अशी दगड रचना असल्याने या झर्‍याचे सौंदर्य वेगळेच जाणवते. (औरंगाबाद परिसरांत बिबीचा मकबरा, सोनेरी महाल, औरंगजेबाचा राजवाडा किलेअर्क, हिमायत बाग, विद्यापीठातील सलाबत खानाचा मकबरा अशा कितीतरी ठिकाणी दगडांवरून पाणी वाहण्याची सुंदर रचना केलेली आढळून येते.)

घटोत्कच लेणीला जायला मुळात रस्ताच नाही. अक्षरश: शेत शिवारांतून वाट काढत जावे लागते. स्थानिक माणसाच्या मदतीशिवाय लेणीचा रस्ता शोधणे अवघडच आहे. पुरातत्त्व खात्याने अगदी अशात प्रत्यक्ष लेणीपर्यंत डोंगरमाथ्यापासून नीट पायर्‍या खोदल्या आहेत. लेणीजवळही एक ओहोळ परत आडवा येतो. तो ओलांडून पाय पाण्यात भिजवूनच लेणीला जाता येते. लेणीजवळ पुरातत्त्व खात्याने माहितीचा फलक लावला आहे. एक रक्षक तिथे नेमला आहे जो की कधीच हजर नसतो.

महायान पंथातील ही पहिली लेणी आहे. वाकाटकांच्या काळातील ही लेणी अजिंठा लेणीला समकालीन अशी आहे. लेणीत एकच दालन आहे. वीस सुंदर भव्य खांबांवर एक मोठे सभागृह आहे. त्याच्या एका बाजूला बुद्धाची भव्य अशी धम्मचक्र परिवर्तन मुर्ती आहे. लेणीत फारसे कोरीव काम दिसून येत नाही. कदाचीत त्या काळात काढलेली चित्रे नष्ट झाली असावीत. ब्राह्मी भाषेतील एक शिलालेख लेणीच्या प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूला आहे. लेणी समोर प्रशस्त अशी जागा मोकळी सोडलेली आहे. लेणीला दोन खिडक्या आहेत. आतल्या अंधारातून बाहेर प्रवेशद्वार आणि खिडक्यांकडे पाहिल्यास खांबांमधून मोठे सुंदर चित्र दिसते. 


लेणी समोरची दरी पावसाळ्यात दगडावरून वाहणार्‍या पाण्याच्या आणि मोरांच्या आवाजाने भरून गेलेली असते. लेणीच्या अगदी समोर जंजाळा किल्ल्याचे अवशेष दिसतात किल्ल्याचा एक दरवाजा या दरीत उतरण्यासाठी आहे. तोच किल्ल्याचा दिल्ली दरवाजा म्हणून ओळखला जातो. तटबंदीचे थोडे अवशेष, दिल्ली दरवाजा, किल्ल्यावरील महाल आणि एक पडकी मस्जिद असे फारच थोडे अवशेष आता शिल्लक आहेत.

हा सगळा परिसर विलक्षण सुंदर आहे. सागाच्या हिरव्या गर्द वनराईने सगळा डोंगर भरून गेलेला आहे. घटोत्कच लेणी समोरच डोंगरात अजून लेणी कोरल्याच्या खुणा दाट झाडीतून डोकावताना दिसतात. ही लेणी रिकामी असून तिथे फारसे कोरीव काम नाही अशी माहिती स्थानिक हौशी गाईड अक्रम भाई यांनी दिली. 

हा परिसर हौशी पर्यटकांना आकर्षण ठरावा असाच आहे. पण याची किमान माहितीही पर्यटकांना होत नाही. अगदी गावात गेल्यावरही लेणीकडे जाणारा रस्ता सापडत नाही. आता गावामधून जाणार्‍या सिमेेंट रस्त्याचे काम चालू आहे. पण मार्गात येणार्‍या शेतकर्‍यांनी रस्ता आडवून ठेवला आहे. 

ऐतिहासिक पुराण वास्तूंबाबत आपली अनास्था जागजागी दिसून येते. दोन हजार वर्षांपूर्वीचा सुंदर वारसा जवळ आहे आणि त्याकडे जाणारा साधा रस्ता आपण आजतागायत बांधू शकलो नाही याची अत्यंत खंत वाटते. लेणीच्या शोधात आमच्यासोबत असलेला फ्रेंच मित्र व्हिन्सेंट वाटेत शेवाळलेल्या दगडांवरून पाय घसरून कॅमेर्‍यासह पडला. एक भारतीय म्हणून आणि त्याचा मित्र म्हणून मला विलक्षण शरम वाटली. कुणीतरी आपला ऐतिहासिक दिव्य वारसा आपली वास्तूकला आपली शिल्पं आपल्या परंपरा यांचा शोध घेत धडपडत आहे आणि आपण किमान सोयीही पुरवू शकत नाही ही फारच शोकांतिका आहे. 

बरं केवळ या लेणीसाठी रस्ता करायला पाहिजे असेही नाही. अगदी लेणीच्या जवळ जंजाळा या गावातील लोकांसाठीही याची गरज आहे. भराडीपासून अंभईपर्यंत किंवा उंडणगावपासून अंभईपर्यंत बर्‍यापैकी रस्ता आहे. तिथपासून जंजाळ्यापर्यंत चांगला रस्ता करणे हे केवळ लेणीच नाही तर येथील लोकसंख्येसाठीही आवश्यक आहे.

याच वाटेवर अंभई जवळ वडेश्वराचे पुरातन महादेव मंदिर आहे. तेही पुरातत्त्व खात्याने नोंदीकृत केले आहे. त्या ऐतिहासिक वास्तुसाठीही रस्ता गरजेचा आहे.  

प्रत्यक्ष लेणी आणि त्या परिसरांतील घाण, आतमध्ये मोकाट जनावरे शिरून त्यांनी टाकलेले शेणाचे पोवटे, वटवाघळांनी केेलेली घाण या तर अजून वेगळ्या बाबी. पण इथपर्यंत येण्यासाठी आपण किमान वाटही करू शकत नाही याला काय म्हणावे? बारमाही रस्ते ही बाब महत्त्वाची आहे. मग याचा उपयोग करून इथे बाहेरचे लोक येवू शकतात. त्यामुळे पर्यटनाला चालना मिळू शकते. चलनवलन वाढू शकते. आणि त्यामुळे त्या भागातील अर्थकारणाला गती येवू शकते. पण आपण याचा विचार करत नाही. 

आम्हाला वाट दाखविणारे अक्रम भाई हौसेने आलेल्या पर्यटकांना लेणी दाखवतात, किल्ला दाखवतात, डोंगरावर फिरून आणतात. त्यांच्याच छोट्याश्या झोपडीवजा घरामसोर बसून चहाची खाण्याची व्यवस्था कुणी सांगितले तर ते करतात.  ही सामान्य माणसे आणि व्हिन्सेंट सारखे परदेशी पर्यटक/अभ्यासक विनातक्रार हे सर्व करत आहेत. आणि ज्यांच्या हातात निर्णयाचे अधिकार आहेत, सत्ता आहे ते मख्ख बसून आहेत. 

केवळ सरकारच नव्हे तर त्या त्या परिसरांतील लोकांची अनास्था पण याला कारणीभूत आहे. किमान स्वच्छता, किमान सोयी स्थानिक स्वराज्य संस्था करू शकते. त्यासाठी सरकारी यंत्रणेकडे पाठपुरावा करू शकते. 


अजिंठा डोंगराचा दिडदोनशे किलोमिटरचा पट्टा हा विलक्षण निसर्ग सौंदर्याने नटलेला आहे. या परिसरांत अभयारण्ये, लेण्या, मंदिरे, किल्ले दर्‍या डोंगर धबधबे असे पर्यटनाचे विविध पैलू उपलब्ध आहेत. सर्व परिसरांत अग्रक्रमाने बारमाही चांगले पक्के रस्ते पहिल्यांदा निर्माण करण्याची गरज आहे. नुसतं या परिसरांत फिरले तरी आनंदाची अनुभूती सामान्य पर्यटकांना होवू शकते. आधी आपण आपल्या मनातील अनास्थेवर मात करू. मग स्थानिक प्रतिनिधींवर दडपण आणू. आणि मग राज्य व केंद्र सरकारवर दबाव तयार करून हा परिसर विशेष पर्यटन क्षेत्र म्हणून विकसित करूया. परत कुणी व्हिन्सेंट सारखा परदेशी हौशी पर्यटक/अभ्यासक रस्ता नाही म्हणून शेवाळलेल्या दगडांवरून पाय घसरून पडला असे व्हायला नको.      

(फोटो सौजन्य अॅक्विन टूरीझम, या भागातील भटकंतीसाठी मला छोट्या भावासारख्या असलेल्या नीलेश महाजनचे विशेष धन्यवाद)

श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575   

 

 

    

 

Thursday, September 10, 2020

कायद्याच्या भोवर्‍यात आरक्षणाची नाव !


उरूस, 10 सप्टेंबर 2020 

 मराठा आरक्षणाची नाव सर्वोच्च न्यायालयाच्या प्रवाहात कायद्याच्या भोवर्‍यात जावून अडकून पडणार आहे याची सर्वांनाच कल्पना होती. पण कुणी तसे कबुल करत नव्हते. केवळ मराठा आरक्षणच नव्हे तर भारतातील विविध राज्यांमध्ये आरक्षणासाठी शेतकरी जातींनी आंदोलने केली आणि अशा आरक्षणाची मागणी पुढे आली. या पूर्वीही विविध कारणाने 50 टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण विविध राज्यांनी दिले होते. विशेषत: तामिळनाडूचे उदाहरण सर्वच जण देत होते. तिथे तर आरक्षण 69 टक्क्यांचा टप्पा पार करून गेले होते.

आरक्षणाचे समर्थन करणारे कुणीही हे सामान्य जनतेला सांगत नव्हते की आजतागायत 50 टक्क्यांवरचे कुठलेच आरक्षण सर्वौच्च न्यायालयात टिकले नाही. आजही विविध प्रकरणे तिथे प्रलंबित आहेत. केवळ त्यांचा निकाल लागलेला नव्हता याचा फायदा घेत सर्वच या विषयातील सत्य लपवत होते. 

हा विषय केवळ मराठा आरक्षण आणि महाराष्ट्रापुरता मर्यादीत नाही. भारतभरच्या आरक्षण विषयक विविध खटल्यांना एकत्रित करून हे सर्व खटले सर्वौच्च न्यायालयाच्या पूर्णपीठा समोर आणावे लागणार आहेत. या सगळ्यांचा एकत्रित विचार करून निर्णय द्यावा लागणार आहे. सर्वच दावे खारीज होतील हे तर स्पष्टच दिसत आहे. पण तसं कबुल करण्याची कुणाचीही तयारी नाही. स्वत:ला मागास म्हणविणार्‍या जातींचे एकूण लोकसंख्येतील प्रमाणच जर 80 टक्के इतके प्रचंड होत असेल तर या सर्वच मांडणीत काहीतरी वैचारिक गोंधळ आहे किंवा जाणीवपूर्वक तसा गोंधळ घातला जातोय हे स्पष्ट आहे. 

या विषयातील तज्ज्ञ किचकट भाषेत लिहीत बोलत असतात. पण समान्य जनतेसाठी काही मुद्दे अतिशय स्पष्ट आहेत. ते सोपेपणाने समोर ठेवले पाहिजेत. 

पहिली गोष्ट म्हणजे सर्वच जनता मागास असेल तर त्यांना सर्वांना आरक्षण देणे याला काहीच अर्थ नाही. मागासपणाची व्याख्या ही तूलनेत केलेली असते. दोन समाजांची आपसात तुलना करून मागासपण ठरवले जाते. या दोघांची इतर कुणा परदेशी समुहाशी तुलना करून मागासपणाचे निकष ठरवले तर त्यातून काहीच साध्य होणार नाही. महाराष्ट्राचा विचार केल्यास मराठ्यांची स्थिती खराब आहे पण कुणाशी तुलना करून? ही स्थिती सामाजिक राजकीय सांस्कृतिक पातळीवर खराब आहे का? इतिहासात खराब होती का? या सगळ्यांची प्रमाणिक उत्तरे आपली आपल्यालाच द्यावी लागणार आहेत. वेगळा राज्य मागासवर्गीय आयोग स्थापन करून स्वत:ला मागास घोषित करून हा प्रश्‍न सुटू शकत नाही.

दुसरी बाब म्हणजे आरक्षण हा आर्थिक मागासपणा दुर करण्याचा उपाय नाही हे घटनेत स्पष्टपणे म्हटलेले आहे. असं असताना वारंवार आर्थिक मागासलेपणाचे दाखले देत आरक्षणाची मागणी काय म्हणून करण्यात येते आहे? मराठाच कशाला बाकी सवर्ण जातींमधील आर्थिकदृष्ट्या मागासांसाठीही 10 टक्के आरक्षण द्या अशी विचित्र मागणी सतत केली जात आहे. यात मुळातच एक बुद्धीभेद आहे हे समजून घ्या. कुठलीही आर्थिक विषमता दूर करण्याचे साधन म्हणजे आरक्षण नव्हे हे एकदा स्वच्छपणे समजून घेतले तर या प्रश्‍नावर जो बौद्धिक गोंधळ घातला जातो आणि त्याला भले भले बळी पडतात ते पडणार नाही. (मराठा समाजाच्या आर्थिक मागासलेपणासाठी शेतीमालाचे सरकारी धोरणाने केलेले शोषण जबाबदार आहे. पण तो स्वतंत्र विषय आहे.) आर्थिक विषमता दूर करण्याचे उपाय वेगळे आहेत.

तिसरी बाब म्हणजे आरक्षण कुणालाही वैयक्तिक कारणांसाठी दिले जात नाही. एखादा समाज शतकानुशतके मागास राहिला आहे. त्याला जी सामाजिक राजकीय सांस्कृतिक कारणे आहेत ती ओळखून त्यावर उपाय म्हणून प्रतिकात्मकरित्या केलेली कृती म्हणजे आरक्षण. ज्या व्यक्तीला हे आरक्षण मिळते तेंव्हा ते त्याला वैयक्तिक पातळीवर दिल्या गेले नसते. त्याने त्याचा उपयोग करून आपल्या समाजाला वर आणाणे अपेक्षीत असते. मागास समाजातील अशा व्यक्ती त्या समाजातील सर्व घटकांपर्यंत लाभ पोचविण्याचे एक माध्यम समजले गेले आहे. त्यामुळे त्याची वागणुक तशी अपेक्षीत आहे. हे विसरून नालायक असताना ‘त्याला’ मिळाले असून आणि लायक असून ‘मला’ मिळाले नाही असा जो एक बाळबोध वाद घातला जातो त्यामागची बुद्धीहीनता समजून घेतली पाहिजे. 

आजपर्यंत आरक्षणाचे लाभ मूळात कुणाला आणि किती मिळाले हे एकदा नीट समजून घ्या. सवर्ण असो की दलित की इतर मागास वर्गीय (ओबीसी) एकूण लोकसंख्येच्या केवळ अडीच टक्के इतकीच लोकसंख्या सरकारी नौकरीत सध्या आहे. भारतातील एकूण सरकारी नोकरांची संख्या 2 कोटी 72 लाख इतकी आहे. यांच्या कुटूंबातील सर्व सदस्यांची संख्या मोजली तर ती साधारणत: 10 कोटी इतकी भरते. म्हणजे ज्या आरक्षणासाठी आणि त्यामुळे मिळणार्‍या सरकारी नौकरीसाठी ही मारामारी चालली आहे तिचे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष लाभार्थी आहेत केवळ दहा बारा कोटी. मग उर्वरीत 120 कोटी लोकांचे काय? एका माणसाला मिळू शकणार्‍या लाभासाठी लाखो रस्त्यावर का उतरत आहेत? कशासाठी एकमेकांची डोकी फोडली जात आहेत? गेली 72 वर्षे सरकारी नौकर्‍यात संख्येने किती वाढ झाली? 

जगभरात सरकारी यंत्रणेवरील खर्चात कपात कशी आणि किती करता येईल हे कसोशीने पाहिले जात आहे. त्यावर उपाय शोधले जात आहेत. मुळात सरकार म्हणजे प्रचंड अशा जनसमुदायाने आपसांतील व्यवहार सुरळीत व्हावेत म्हणून तयार केलेली यंत्रणा आहे. ही यंत्रणा मुळात स्वत: संपत्तीचे निर्माण करत नाही. सामान्य माणसांनी आपल्या बुद्धीमत्तेने प्रतिभेने मेहनतीने संपत्तीचे निर्माण केलेले असते. यातील एक छोटा वाटा ही सगळी व्यवस्था चालविण्यासाठी सरकार नावाच्या यंत्रणेवर खर्च केला जातो. आता हीच अनुत्पादक अशी यंत्रणा जास्त मग्रूर बलशाली आणि शोषण करणारी बनत गेली तर तो समाज सुदृढ बनणार कसा? 

आपल्याकडे सरकारी नौकरी म्हणजे सर्वस्व बनले आहे. कारण या सरकारी नौकर्‍यांना दिले गेलेले अनावश्यक संरक्षण. इतर सामान्य लोकांना मिळणार्‍या पगारापेक्षा जास्त मिळणारी रक्कम सोयी सवलती. म्हणून मग कुणीही उठते आणि सर्वकाही सरकारने करावे म्हणून आंदोलन करते. त्यासाठी रस्त्यावर उतरते. राजकारणीही या मानसिकतेचा फायदा उचलत अशी आंदोलने पेटवतात. हे आपण कधी समजून घेणार आहोत? 

आरक्षणाने प्रश्‍न सुटू शकत नाहीत. मुळात दलित, आदिवासी आणि भटक्यांपुरता आरक्षण हा एक प्रतिक म्हणून योजलेला उपाय आहे. त्याचीही परिणामकारकता हवी तेवढी सिद्ध झालेली नाही. दलित आरक्षणांतही आता विविध जातींना वेगळे करून त्यांचे स्वतंत्र गट करावेत अशी एक याचिका सर्वौच्च न्यायालयात विचारार्थ आली आहे. कारण सर्वच दलित जातींपर्यंत आरक्षणाचे लाभ पोचलेले दिसत नाहीत.

मराठा आरक्षणाच्या निमित्ताने असे विविध मुद्दे समोर आले आहेत. महाराष्ट्रापुरता विचार केला तर मराठा समाजाचे हित शेतमालाच्या भावात जास्त सामावलेले आहे. आरक्षणात नाही. आरक्षण ही दिशाभूल आहे. शेतकरी संघटनेने एक घोषणा अगदी सुरवातीलाच दिली होती. ‘सरकार समस्या क्या सुलझाये सरकार खुद समस्या है’ तेंव्हा आरक्षणासाठी शक्ती खर्च न करता शेतमालाच्या भावासाठी केली तर मराठा समाजचे जास्त भले होईल.  

श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575   

 

 

    

 

Tuesday, September 8, 2020

नीमा तेन्जिंग : भारतासाठी शहिद झालेला तिबेटी !


उरूस, 8 सप्टेंबर 2020 

 लेह-लदाख मध्ये चीनची लष्करी धुसफुस चालूच आहे. 29 ऑगस्टच्या रात्री पेन्गॉंग त्से तळ्याजवळ मोठी चकमक उडाली. भारतीय सैन्याने चीनी सैन्याला पिटाळून लावले. यात तिबेटी सैनिकांच्या एस.एफ.एफ. (स्पेशल फ्रंटियर फोर्स) तुकडीने मोठी कमाल केली. या तुकडीचा अधिकारी नीमा तेन्जिंग याचा पाय चीनने पेरलेल्या भूसुरूंगावर पडला. त्यावेळी मोठा स्फोट झाला. या स्फोटात हा तिबेटी अधिकारी भयानक जखमी झाला. आठ दिवस मृत्यूशी कडवी झुंज दिल्यानंतर शनिवारी उपचार चालू असताना त्याचे निधन झाले. 

नीमा यांचा अंत्यविधी संपूर्ण शासकिय इतमामात लेहमध्ये करण्यात आला. यावेळी हजारो तिबेटी निर्वासित तिथे गोळा झाले होते. शोकाकुल अवस्थेत त्यांनी आपल्या या वीराला अखेरचा निरोप दिला. यावेळी ‘भारत माता की जय’ अशा जोरदार घोषणा दिल्या गेल्या.

तिबेटी सैनिक भारतासाठी कसे काय लढत आहेत? असा प्रश्‍न कुणाही भारतीयाला पडू शकतो. चीनने जबरदस्ती तिबेटवर ताबा मिळवल्यावर तिबेटींचे धार्मिक नेते दलाई लामा यांनी आपल्या असंख्य अनुयायांसह भारताता आश्रय मागितला. या सर्व शरणागतांना आपण हिमाचल प्रदेशातील धर्मशाळा येथे राहण्यास जागा दिली. दलाई लामांसोबत त्यांचे असंख्य तिबेटी अनुयायी तेंव्हा भारतात आले. आपली मातृभूमी स्वतंत्र करण्याची त्यांनी शपथ घेतली. महात्मा गौतम बुद्धाच्या वास्तव्याने पावन झालेली भारत भूमी त्यांच्यासाठी अतीव श्रद्धेचा विषय आहे. आपल्याला आश्रय देणार्‍या आणि आपल्यासाठी श्रद्धेचा विषय असलेल्या या भारतमातेसाठी हे तिबेटी अगदी जीवही द्यायला तयार आहेत. नीमा तेन्जिंग यांच्या वीर मरणाने हे परत एकदा सिद्ध केले आहे. 

1971 च्या बांग्लादेश युद्धाच्यावेळेस आणि 1999 च्या कारगीलच्या युद्धाच्या वेळेसे या सैनिकांनी आपले शौर्य दाखवले होते. आताही आघाडीवर जावून ते संघर्ष करत आहेत. 

नीमा यांच्या वीर मरणाने भारतात राहून चीनचे गोडवे गाणार्‍यांच्या तोंडावर चांगलीच चपराक दिली आहे. तिबेटी निर्वासित सैन्यात भरती होवून भारतासाठी कडवा संघर्ष करत आहेत. हिमालयाच्या बर्फाळ प्रदेशात लढत आहेत. आणि हे भारतात सुरक्षीत राहून नागरि स्वातंत्र्याचे सगळे फायदे उपटून चीनचे गोडवे गात आहेत. 

हिमालयाच्या बर्फाळ डोंगररांगांत विरळ हवेत मुळात वावरणेच मुश्किल. त्यात युद्ध करणे तर अजूनच कठिण. चीनी सैनिकांसमोर हीच मोठी अडचण आहे. भारतीय सैन्यात लेह लदाखचे निवासी, गुरखा आणि तिबेटी असे अतिशय काटक कष्टाळू आणि  या वातावरणाला सरावलेल्या लोकांची मोठी भरती आहे. यांना तोंड देता देता चिनी सैनिकांच्या नाकीनऊ येत आहेत. आत्तापर्यंत युद्धाच्या नुसत्या धमक्या देवून भागत होते. या भागात जसे चीनने मोठ्या प्रमाणात रस्त्याची कामं केली. पुल बांधले. हेलीपॅड तयार केले. तसे भारताने फारसे केले नव्हते. तत्कालीन संरक्षण मंत्री ए.के. अँटोनी यांनी लोकसभेत 2013 मध्ये सीमेवर रस्ते न बांधण्याचे आपले धोरणच असल्याचे जाहिर केले होते. 

पण गेल्या काही वर्षांत विशेषत: मोदी सरकारच्या कारकिर्दीत या धोरणात मोठे बदल करण्यात आले. सीमेवर फार मोठ्या प्रमाणावर रस्ते पुल धावपट्ट्या हेलीपॅड यांची कामं सुरू झाली आहेत. त्यामुळे सैन्याची वाहतूक, शस्त्रांची वाहतूक आधीपेक्षा सुकर झाली आहे. आणि या जोडीला आहे तो तिबेटी गुरखा सैनिकांचा चिवटपणा त्यांचा अदम्य असा उत्साह त्यांची अखंड लढाऊ उर्जा. शिवाय पाठीशी दिल्लीत बसलेल्या राज्यकर्त्यांचा संपूर्ण पाठिंबा.  चीनविरोधी हे असे  ‘डेडली कॉम्बीनेशन’ पूर्वी कधी जूळून आले नव्हते. 

आश्चर्य म्हणजे या नीमा तेन्जिंग यांच्याबद्दल बोलायला भारतातील डावी माध्यमं तयार नाहीत. आपण चालवत असलेल्या खोट्या विचारसरणीचा धडधडीत पराभव होताना दिसत आहे. मग ते कशाला तोंडातून ब्र काढतील.

भाजप नेते राम माधव हे नीमा यांच्या अंत्यविधीला हजर राहिले होते. त्यांनी त्या संदर्भात एक ट्विटही केले. पण नंतर लगेच हे ट्विट काढून टाकण्यात आले. कदाचित राजकीय धोरणाचा भाग म्हणून ही खेळी खेळली गेली असावी. पण यातून एक खणखणीत संदेश चीनला दिला गेला आहे. तिबेटचा प्रश्‍न चीनसाठी ‘गलेकी हड्डी’ बनला आहे. शेकडो वर्षे ज्यू आपल्या मायभूमीसाठी लढत राहिले. आणि शेवटी त्यांनी आपली मायभूमी स्वतंत्र करून दाखवली. याच धर्तीवर आता तिबेटी आपल्या मायभुमीसाठी लढत आहेत. भारताचा यासाठी नेहमीच नैतिक पाठिंबा राहिलेला आहे. 

पण आधीच्या सरकारांनी नेहमीच तिबेटबाबत बोटचेपे धोरण अवलंबिले. एकीकडून दलाई लामांना आसरा देणे आणि दुसरीकडून चीनने डोळे वटारताच शांत बसणे असला भारताचा विचित्रपणा जगाने पाहिला. पण आता चीनविरोधी एक कणखर असे धोरण आणि त्याप्रमाणे प्रत्यक्ष कृती समोर येते आहे. 

पहिल्यांदाच चीनची भयंकर अशी कोंडी या विषयावर झाली आहे. कश्मीरचा अक्साई प्रदेश चीनने बळकावला होता त्यावर दादागिरी करणे हेच आत्तापर्यंत चीनला सोयीचे होते. पण आता प्रत्यक्ष चीनच्या तिबेटमधील जनता आंदोलनाच्या पवित्र्यात आहे. भारतात राहणारे तिबेटी प्रत्यक्ष रणांगणावर आपल्याच विरोधात समोर पाहून चीनी सैन्याची पाचावर धारण बसली आहे. केवळ शत्रूशी लढाई एक वेळ ठीक होती. पण आपलेचे नागरिक आपल्याच विरोधात असल्यावर करायचे काय? हा पेच आहे. 

दुसरीकडे तैवान मधील वातावरण पेटले आहे. नुकतेच चीनचे एक लढाउ विमान तैवानने पाडले. हॉंगकॉंग प्रश्‍नी तेथील चीनी नागरिक रस्त्यावर उतरले आहेत.  दक्षिण चीन समुद्रात अमेरिकन आरमार उतरले आहे. रशियन सीमेवर वाद नहेमीच चालू असतो. गलवान खोर्‍यातील चकमकीनंतर रशियाने उघडपणे भारताची बाजू घेतली आहे. कोरोना महामारीमुळे आपले प्रचंड आर्थिक नुकसान झाले. तेंव्हा त्याची भरपाई चीनने द्यावी असे दावे जर्मनी इटली फ्रांस या युरोपीय देशांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर लावले आहेत. 

त्यामुळे चीन सर्वच बाजूंनी घेरल्या गेला आहे. तिबेटी सैनिकांनी चीनविरूद्ध एल्गार पुकारून शेवटचा घाव घालण्याचे काम केले आहे. चुकून माकून चीनने युद्धाचा निर्णय घेतलाच तर तिबेटी सैनिक भारताच्या बाजूने प्रचंड त्वेषाने लढतील आणि या निमित्ताने आपली मातृभूमी स्वतंत्र करण्याची स्वप्न पुर्ण करतील याची शक्यता जास्त आहे.  याच धामधुमीत तैवान, हॉंगकॉंगही आपले स्वातंत्र्य प्राप्त करतील. हीच चीनला भिती आहे.  

भारतासाठी लढलेल्या नीमा तेन्जिंग या तिबेटी वीरला यांना विनम्र श्रद्धांजली. 

श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575   

 

 

    

 

Saturday, September 5, 2020

कलेचा संस्कार करणारी ‘आमची शाळा’ !



उरूस, 5 सप्टेंबर 2020 

 बाल विद्या मंदिर, परभणी या शाळेत 1978 पासून ते 1986 पर्यंत मी शिकलो. आज लक्षात येते आहे की ज्ञानासोबतच अतिशय वेगळा आणि अतिशय सखोल असा कलात्मक संस्कार या शाळेनं माझ्यावर केला. एका दोघा शिक्षकांनी नाही तर आख्खी शाळाच हा संस्कार आपल्या मुलांवर अशा पद्धतीनं करते आहे हे फार दुर्मिळ उदाहरण त्या काळातलं असावं. आज शिक्षक दिनाच्या दिवशी इतर शिक्षकांसोबत ह्या कला जाणीवा रुजविणाऱ्या विशेष शिक्षकांची आठवण येते. 

लेखाच्या शिर्षकात ‘आमची शाळा’ हे शब्द वापरले आहेत ते केवळ स्वत:ची शाळा सुचविण्यासाठी नाहीत. ‘आमची शाळा’ नावाचे एक मासिक वार्तापत्र माझ्या शाळेत निघायचे. (त्याच्या अंकाचेच छायाचित्र लेखात वापरले आहे) प्रसिद्ध लेखक कथाकार गणेश घांडगे त्याचे सर्वेसर्वा होते. ज्या काळात दै. मराठवाडा खेरीज दुसरे वर्तमानपत्र परभणी गावात यायचे नाही. त्या काळात एक शाळा आपल्या मुलांसाठी चार पानांचे एक मासिक वार्तापत्र चालवते ही एक फार मोठी सांस्कृतिक घटना होय. याचा एक फार सुंदर असा संस्कार आमच्यावर झाला. 

वर्तमानपत्रांत सांस्कृतिक घडामोडींचे वार्तांकन आजकाल सर्रास वाचायला मिळते. पण 1983 ला हा प्रकार अतिशय कमी होता. मला चांगले आठवते बाल विद्यामंदिर मध्ये पलूस्कर भातखंडे पुण्यतिथीला गुणी विद्यार्थी, आमचे आवडते संगीत शिक्षक अरूण नेरलकर यांच्या गाण्यासोबतच औरंगाबादहून सतारवादक वैशाली बामणोदकर यांना आमंत्रित केले होते (इ.स. 1983 ऑगस्ट). त्यांचे अतिशय सुंदर सतारवादन त्या दिवशी झाले. मी तेंव्हा 8 वीत शिकत होतो. तानसेन नसलो तरी आम्ही कानसेन मात्र होतो. मला वाटले या कार्यक्रमाचे आपण शब्दांकन करावे. घांडगे सरांच्या कानावर घातल्यावर त्यांनी प्रोत्साहन देवून माझ्याकडून त्या कार्यक्रमावर आधारीत ‘रात्र ती स्वरात भिजलेली’ असे एक छोटे फिचर लिहून घेतले. अगदी आजही शाळांमधून असं काही कुणी शिक्षक करत नाही. नकळतपणे संगीत आणि त्याचा आस्वाद घेण्याचा एक संस्कार बाल विद्या मंदिरने आमच्यावर केला.

‘गीतमंच’ मध्ये सहभाग असायचा त्यांना संगीत शिकवले जायचे ते स्वाभाविक होते. पण पाचवी ते सातवी असे सगळे विद्यार्थी मैदानात गोळा करून त्यांना ‘समुह गीत’ शिकवले जायचे तो अनुभव विलक्षण असायचा. आम्हाला पाचवी ते सातवी या काळात शिकवलेले ‘वेद मंत्राहून आम्हा वंद्य वंदे मातरम्’ हे गदिमांचे गीत चांगलेच आठवते. एखादी ढगाळलेली दुपार असायची. मैदानात गाणं म्हणायचं म्हणून उत्साहात मुलं मुली रांगेत येवून बसलेली असायची. कुठलेही निमित्त शोधून पळून जाणारी मुलंही हमखास थांबायची. तीन चारशे मुलांचे कोवळे आवाज एका सुरात उमटायचे आणि अंगावर काटा उमटायचा. प्रकाश नारायण संत यांनी आपल्या कथेत सगळ्या सुरांचा मिळून कसा रेशमी दोर वळला जायचा असं एक सुरेख वर्णन केलं आहे. तसा अनुभव आम्हाला शाळेत समुहगीताच्या वेळी यायचा. हा फार वेगळा सांगितिक संस्कार शाळेनं आमच्यावर केला. 

अरूण नेरलकर आमच्या या गीताचा सराव घ्यायचे. सातवीच्या वर्गाजवळ असलेल्या सैतुकाच्या झाडाखाली टेबलावर पेटी ठेवून ती वाजवत ते शिकवायचे. आणि त्यांच्या पाठोपाठ मुलं म्हणायची. कडवे संपवून धृवपदावर येताना मातरम् शब्द उच्चारताना एक मिंड घेतली जायची. ही अवघड मिंडही मुलं सरावाने अतिशय छान घ्यायचे. आठवी ते दहावी ला समुह गीत माधव वसेकर सर शिकवायचे. ते पुढे माझे वर्गशिक्षकही होते पण तेंव्हा विषय संगीत नव्हता.

जंगली बाई आम्हाला चित्रकला शिकवायच्या. एलिमेंटरी, इंटरमिडिऐट किंवा आनंद-आरंभ-बोध अशा चित्रकलेच्या परिक्षांसाठी जी मुलं बसलेली असायची त्यांना त्या शिकवायच्या. तो त्यांचा विषयच असल्याने त्यात वेगळेपण काही नव्हते. पण जन्माष्टमीला दहीहंडी च्या कार्यक्रमासाठी मडकी रंगवल्या जायची. हे काम आम्ही काही हौशी मुलं स्वेच्छेने करायचो. यासाठी जंगली बाईंचा उत्साह विलक्षण असायचा. त्यात केवळ परिक्षेसाठी हे नसून एक रंगांचा संस्कार मुलांवर व्हावा असा त्यांचा दृष्टीकोन असायचा. आज असे किती शिक्षक आहेत की जे आपल्या विद्यार्थ्यांवर रंगांचा संस्कार व्हावा म्हणून जीव टाकत असतील?

‘विठ्ठल तो आला आला’ ही पुलं देशपांडे यांची एकांकिका शाळेने बसवली होती. त्यासाठी विठ्ठल मंदिर आणि त्याचा गाभारा तयार करायचा होता. तो सेट बाईंनी ज्या पद्धतीनं रंगवून दिला तो मला आजही डोळ्यासमोर दिसतो. अनील गंडी हा माझ्या मोठ्या भावाचा मित्र विठ्ठलाचे काम करायचा. त्याचा मेकअपही बाईंनी आणि ह.प. पाटील सरांनी फार मेहनतीनं करून दिला होता. 

अशात मी लिहीलेल्या एका कवितेत ‘पोपट रंगी मखमालीचा । हिरवा हिरवा दाटे पुर’ अशी ओळ आलेली आहे. माझ्या नंतर वाचताना लक्षात आलं हिरव्या रंगांच्या विविध छटांबाबत आपण हे लिहू शकलो कारण जंगली बाईंनी तेंव्हा केलेला तो रंगांचा संस्कार. विविध रंगांच्या छटा आणि त्यांचे वैशिष्ट्ये त्यांनी फार सुरेख समजावून सांगितली होती. नुसतं सांगणं नाही तर किमान फटकार्‍यांतून त्याचे जिवंत प्रात्यक्षिक त्या करून दाखवायच्या. 

चित्रकला परिक्षेचा सराव म्हणून जास्तीच्या तासिका घेतल्या जायच्या त्यासाठी परभणीला वसमत रोडला विद्यापीठ कमानीपाशी असलेल्या ‘विष्णु जिनींग’ परिसरांतील त्यांच्या घरी जावे लागायचे. तिथे मोकळ्या मैदानात भरपूर झाडी आणि हिरवळ असायची. आम्ही कागदावर जे काढायचो ते हिरवे पोपटी निळे ढगांचे पांढरे लालसर पिवळे रंग आमच्या आजूबाजूला झाडं माती आभाळ यातून जिवंतपणे प्रकट होवून भोवती फेर धरायचे. तिथल्या वडाच्या झाडाच्या कलात्मक पारंब्या आपसुकच मग चित्रांत उमटायच्या. 

केशव दुलाजी अडणे उर्फ के.डी. अडणे सर हा माणुस आमच्यासाठी साक्षात ‘नटसम्राट’ होता. खणखणीत विलक्षण प्रभावी आवाजाचा धनी असलेल्या या शिक्षकाने आमच्या रक्तात नाटक रूजवले. सरांचे व्यक्तीमत्व लौकिक अर्थाने प्रभावी कधी जाणवले नाही. पण एकांकिका त्यांनी बसवायला घेतली की त्यांच्या सुंदर संवादफेकीत आम्ही कधी ओढले जायचो ते कळायचं नाही. नाटक बसवतानाच्या काळात त्यांच्या अंगात खरोखरीच नटराज संचारायचा. ते मोठ्या गटाचे नाटक बसवायचे. छोट्या म्हणजे पाचवी ते सातवी गटाचे नाटक बसवायची जबाबदारी मंगला कुरूंदकर बाईंची असायची. बाईंची उंची कमी देहयष्टी किरकोळ. तेंव्हा जवळपास सर्वच मुलंमुली त्यांच्या इतकी किंवा त्यांच्याहीपेक्षा उंच होती. त्यामुळे त्यांना नावच ‘मी उंच बाई’ असं  ठेवलं होतं. बाई विलक्षण मिश्कील. आवाजाला धार, डोळ्यांच्या किमान हालचालींतून भाव व्यक्त करण्याचे एक कसब त्यांचे अंगी होतं. अगदी हसत खेळत त्या नाटक बसवायच्या. सहजपणे अभिनय शिकवायच्या. त्यांची साडी नेसायची पद्धत, विशेषत: पदर  घेण्याची पद्धत मला अजून आठवते. हा सगळा परफॉर्मिंगचाच एक भाग असायचा. कुठेही आक्रस्ताळेपणा न करता शब्दफेक करून प्रभाव कसा पाडावा हे त्यांच्याकडून आम्हाला शिकायला मिळाले. वर्गात शिकवत असताना एक लय त्यांच्या बोलण्याला असायची. बाकांच्या रांगांमधून फिरताना त्यांच्या चालण्यातला डौल जाणवायचा. 

अडणे सर आणि कुरूंदकर बाईंनी आम्हा नाटकात सहभागी असणार्‍या मुलांना नाटक शिकवले असं कुणाला वाटू शकेल. ते वर वर पाहता खरेही आहे. पण यांच्या वागण्याबोलण्यांतून उच्चारांतून संवादफेकीतून नाटकाचा एक संस्कार आमच्यावरच नाही तर आख्ख्या शाळेवरच होत होता हे आज जाणवत आहे.

अडणे सर माझ्या वडिलांकडे काही तरी कामासाठी एकदा आले होते. तेंव्हाचे त्यांचे बोलणे ऐकून मला लक्षात आले की या माणसांत एक विलक्षण अशी अभिनयाची समज आहे. कुरूंदकर बाईंच्या बाबतीतला एक अनुभव अतिशय हृद्य असा आहे. शाळेत मराठी शिकवणार्‍या हंसा कुरूंदकर बाई होत्या. त्यांच्या नावाशी मंगला कुरूंदकर बाईंचे साम्य असल्याने बर्‍याचदा घोटाळे व्हायचे. त्यावर बाई मस्त फिरकी घ्यायच्या. मी त्यांना शिक्षण संपल्यावर एकदा सहजच भेटायला गेलो होतो. त्यांची मुलं आमच्या बरोबरचीच. त्यांचे घर माझ्या आजीच्या घरा जवळच म्युनिपल कॉलनीत दर्गा रोड परभणी येथे होते. मी सहजच त्यांना बोलता बोलता ‘बाई तब्येत कशी आहे?’ असं विचारलं. त्यावर खळाळून हसत त्या म्हणाल्या, ‘मला काय धाड भरली. हंसा गेली तेंव्हा सगळ्यांना वाटले मीच गेले की काय. आमचे गावाकडचे गडी तर घरी येवून मोठ्यानं रडू लागले. मी बाहेर आल्यावर ‘तूम्ही तर जित्त्या हायती की’ म्हणायला लागले.’ बाई बोलताना त्यांच्या हसण्यातून हंसाबाईंचे दु:ख त्या लपवत होत्या हे मला स्पष्ट जाणवलं. मला त्यांच्या अभिनयाची ताकद कळाली. 

ह.प.पाटील हा एक विलक्षण असा शिक्षक आमच्या आयुष्यात आला. आज कुणाला सांगितलं तर विश्वास बसणार नाही पण या सरांनी आख्ख्या शाळेला एकादशीच्या दिंडीत पावली खेळायला, अभंग गायला, टाळ मृदंग वाजवायला रिंगण घालायला शिकवलं. आता हा काही शाळेच्या अभ्यासक्रमातला विषय नाही. ह.प. पाटील सर निष्ठावंत वारकरी. टाकळी येथील (ता. पूर्णा जि. परभणी) दाजी महाराजांच्या संस्थानचे अनुग्रहीत कपाळाला. गंध बुक्का लावणारे. आषाढी एकादशीला परभणीच्या गांधी पार्कातील विठ्ठल मंदिरापासून दिंडी निघायची. ती नांदखेडा रस्त्यावरील रंगनाथ महाराजांच्या समाधीपर्यंत जायची. या दिंडीत भजनी मंडळांचा मोठा सहभाग असायचा. आमचे मुख्याध्यापक मा.रा. पोटेकर सरांसमोर ह.प. पाटील सरांनी एक प्रस्ताव ठेवला. दरवर्षी या दिंडीत शाळेचा संच सहभागी करू या. धोतर टोपी कपाळी गंध बुक्का गळ्यात तुळशी माळा अशा वेशात विद्यार्थी तयार केले जायचे. नाऊवार नेसून गळ्यात माळ घालून डोक्यावर तुळस अश्या मुली सजायच्या. हातात टाळ, एखादा तालात पक्का असलेला मुलगा मृदंग वाजविण्यासाठी पक्का असायचा. या दिंडीमधील अभंगांचा पाउलीचा सराव नियमितपणे आठ पंधरा दिवस आधीपासून कसून केल्या जायचा.

पाटील सरांचे घर माझ्या घराच्या अगदी मागेच होते. दर गुरूवारी त्यांच्या घरी भजन असायचे. दोन दोन खोल्यांची पाच घरे या बाजूला आणि पाच घरे समोरच्या बाजूला असा तो गजबजलेला डांगेचा वाडा होता. घरांच्या ओळींमधली मोकळी जागा म्हणजे भले मोठे अंगण. गुरूवारी रात्री हे अंगण म्हणजे पंढरीचे चंद्रभागे काठचे वाळवंट बनून जायचे. ज्यांना गळे नाहीत ते आमच्यासारखे कानसेनही गुरूवारी गाण्याच्या ओढीने तिथे तासंतास अभंग गवळणी ऐकत भारवल्या सारखे बसून रहायचे. आजही आषाढीच्या दिवशी माझ्या कानात त्या अभंगाचा नाद घुमत असतो. डोळ्यासमोर ती दिंडी येत राहते.

नाटक चित्रकला संगीत भक्तीसंगीत असा विलक्षण संस्कार माझ्या शाळेनं आणि या शिक्षकांनी आमच्यावर केला. 

कुणी आपल्या शाळेची आठवण सांगताना शिक्षकांच्या ज्ञानाचा आवर्जून उल्लेख करतात. ते तसे आमच्या शाळेत होतेही. (त्यावर परत कधी सविस्तर लिहीन. साहित्यिक संस्कार करणार्‍या हंसा कुरूंदकर बाई, घांडगे सर, सेलमोकर बाई, जपे बाई, नजमा रंगरेज बाई, ग्रंथालयाचे लोनसने सर यांच्यावर स्वतंत्र लिहायला पाहिजे). उज्ज्वल निकालाची मोठी परंपरा आमच्या शाळेची राहिली आहे. पण हा परिक्षेसाठी नसलेला कलेचा संस्कार कुणाच्या भाग्यात असतो? तो आमच्या भाग्यात होता. आज समाजात वावरताना सहजपणे सांस्कृतिक क्षेत्रात मी काम करतो तेंव्हा संपन्न सांस्कृतिक पार्श्वभूमी असलेलं घर आई वडिल भाउ यांच्या सोबत शाळेत हा संस्कार गडद करणारे शिक्षक आणि त्यांच्या पाठिशी भक्कमपणे उभे राहणारे आमचे मुख्याध्यापक मा.रा. पोटेकर आणि उपमुख्याध्यापक वि.म. औंढेकर मला अतिशय महत्त्वाचे वाटतात. शिक्षक दिनाला यांना प्रणाम.      

           श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575