उरूस, 17 सप्टेंबर 2020
आदरणीय स्वामीजी सा.न.
स्वामीजी आज 17 सप्टेंबर. तूमच्या नावाने आणि हैदराबाद मुक्ती संग्रमाच्या नावाने गळे काढण्याचा सार्वजनिक कार्यक्रम आज मोठ्या उत्साहाने साजरा होतो. शासकीय सुट्टी आता मराठवाडा आणि चंद्रपुरचा राजूरा तालूका या प्रदेशात मंजूर झाली आहे. कागदोपत्री 15 ऑगस्ट, 26 जानेवारी, 1 मे यांच्या बरोबरीनेच या दिवसाचे महत्त्व आहे.
मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबाद शहरात क्रांती चौकात प्रचंड मोठा ध्वजस्तंभ उभारला आहे. ही जागा म्हणजेच 1857 च्या स्वातंत्र्यलढ्यात ज्या क्रांतीकारकांना फासावर चढवले ती जागा. याला काला चबुतरा म्हणतात. त्याची आठवण म्हणून झाशीच्या राणीचा पुतळा इथे बसवला होता.
2017 मध्ये स्वातंत्र्योत्तर भारतातील लोकशाही सरकारला अचानक जाग आली आणि हे स्मारक आधुनिक करण्याच्या नावाखाली काम सुरू झाले. प्रचंड उंच झेंडा इथे उत्साहात उभारला गेला. जवळपास अडीच करोड रूपये यावर खर्च झाला. आता अगदीच महत्त्वाची असलेली कामे म्हणजे बांधकाम, रंगरंगोटी, बागबगीचा, जागेचे रक्षण करण्यासाठी पहारेकरी, प्रकाश योजना यावर निधी खर्च झाला. तरी आम्ही आमच्याकडून झाशीची राणी आणि तूमच्या पुतळ्यासाठी छान ग्रॅनाईटमध्ये चौथरे उभारूनही ठेवले.
पूर्वीच्या उद्यानातील झाशीच्या राणीचा पुतळा होताच. तो बसवून टाकला. पूर्वीच्या उद्यानात तूमचा पुतळा नव्हता त्याला आम्ही तरी काय करणार? नसता तो पण बसवून टाकला असता. बरं ज्यांनी या स्मारकासाठी देणग्या दिल्या त्यांनी सगळ्यांनी पैसेच दिले. पुतळा कोणीच दिला नाही. मग मला सांगा स्वामीजी पुतळा कसा आणायचा?
4 नोव्हेंबर 2017 मध्ये या स्मरकाचे उद्घाटन राज्यपाल विद्यासागर राव यांच्या हस्ते झाले. त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. आता याला 3 वर्षे उलटून गेली आहेत. पण या काळात तूमचा पुतळा बसवणे शक्य झाले नाही. आहो शासनाच्या मागे खुप कामे आहेत. इतके किरकोळ काम इतक्या लवकर कसे शक्य आहे. तेंव्हा तूम्ही समजून घ्या स्वामीजी.
तसेही स्वामीजी तूम्ही भगवे वस्त्र धारण केलेले संन्यासी. तूम्ही नि:संग होता. मग पुतळ्याची तरी काय गरज ? असे आम्हाला वाटले.
मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराचा प्रश्न पेटला होता. त्याला विरोध करणारे सर्व तूमचेच शिष्य. त्यातील पद्मविभुषण गोविंदभाई श्रॉफ तेवढे 1994 मध्ये हयात होते. मग यावर तडजोड म्हणून मराठवाड्याची शैक्षणीक फाळणी केल्या गेली. औरंगाबाद, जालना, बीड आणि उस्मानाबाद हे जिल्हे औरंगाबादमध्ये तेंव्हाच्या मराठवाडा विद्यापीठांत ठेवल्या गेले. आणि विद्यापीठाचा नामविस्तार (नामांतर नाही) केल्या गेला डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ. आणि गोविंदभाई श्रॉफ यांच्या नेतृत्वाखाली विरोध करण्यांर्यांना शांत करण्यासाठी नांदेड येथे नांदेड, परभणी, हिंगोली व लातूर जिल्ह्यांसाठी नविन विद्यापीठ स्थापन झाले. त्याला नाव देण्यात आले स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ. अशा प्रकारे स्वामीजी तडजोडीचा एक भाग म्हणून तूमच्या नावाने विद्यापीठ स्थापन झाले. बोली भाषेत या दोन्ही विद्यापीठांना बामु आणि रामु अशी नावे आहेत हा भाग वेगळा.
तर स्वामीजी तूमच्या नावाने विद्यापीठ आहे ना. मग परत आता पुतळा कशाला पाहिजे आहे? तसाही तूमचा आणि औरंगाबादचा काय संबंध? तूम्ही भलेही इथे खासदार म्हणून निवडुन आला असाल. पण हैदराबाद मुक्ती लढ्याचे नेतृत्व करण्यासाठी तूम्ही पुढे आलात आणि राजधानीचे ठिकाण म्हणून तूम्ही मुख्यालय बनवले ते हैदराबाद येथेच. शिवाय तूमचे निधनही हैदराबाद येथेच झाले ना. मग औरंगाबादला तूमचा पुतळा कशाला पाहिजे? तूम्ही मुळचे कर्नाटकातील गुलबर्ग्याचे. तेंव्हा तिथे फार तर तूमचे पुतळे वगैरे ठिक आहे.
तूम्ही खासदार होतात तेंव्हा तूमच्या खासदार निधीतून स्वत:च्या पुतळ्यासाठी निधीपण तूम्ही राखून ठेवला नाही (तेंव्हा खासदार निधी नव्हता असे सांगू नका. ते आम्हालाही माहित आहे). आता याला आम्ही काय करणार?
तूम्ही ज्यांच्या विरोधात लढलात तोच सातवा निजाम उस्मान अली पाशा हैदराबाद राज्याचा प्रमुख म्हणजेच राज्यपाल बनवला गेला. तूमच्या विरोधातील जे राजकीय नेते होते त्यांचे पुढारी बी. रामकिशनराव यांनाच हैदराबाद राज्याचा मुख्यमंत्री केल्या गेले. तूम्ही खासदार होता पण तूम्हाला नेहरूंच्या मंत्रीमंडळात घेतल्या गेले नाही. तेंव्हा तूम्हीच सांगा स्वामीजी तूमचा पुतळा कसा काय बसवायचा?
22 जानेवारी 1972 ला तूमचे निधन झाले तेंव्हा तूमची अंत्ययात्रा निघाली होती हैदराबादला. तूम्ही रहात होत्या त्या बेगम पेठेतील गल्लीमधून निघालेल्या या अंत्ययात्रेत किती माणसं होती स्वामीजी? फक्त पंधराशे ते दोन हजार. आहो अशावेळी ट्रकांमधून माणसे आणावी लागतात. जागजागी फलक लावावे लागतात. ‘स्वामीजी अमर रहे’ असे पोस्टर छापून घ्यावे लागतात. वर्तमानपत्रांतून पुरवण्या छापून आणाव्या लागतात. हे तूम्ही काहीच केले नाही.
तूम्ही ज्याच्या विरोधात लढलात तो सातवा निजाम उस्मान अली पाशा त्याचे निधन झाले तेंव्हा किती लोकं होते बघितले का? लाखभर लोक त्याच्या जनाजात शरीक झाले होते. आजही त्याला मानणार्या पक्षाचे दोन खासदार असदुद्दीन ओवैसी हैदराबाद आणि इम्तीयाज जलील औरंगाबाद येथून निवडून आलेले आहेत. तूम्हाला मानणारे कोण आहे सांगा तरी एकदा?
तेंव्हा स्वामीजी (तूमचे नाव व्यंकटेश भवानराव खेडगीकर होते हे खुप जणांना माहितच नाही. माहित करूनही काय करणार म्हणा). पुतळ्याचे काही आम्हाला सांगू नका.
कागदोपत्री म्हणाल तर कॉ. मुरूगप्पा खुमसे (रेणापुर. जि. लातूर) यांनी उच्च न्यायालयात तूमचा पुतळा बसविण्यासाठी याचिका दाखल केली होती. तेंव्हाचे विभागीय आयुक्त यांनी न्यायालयात पुतळा बसवू असे आश्वासन दिले. याचिका मागे घेण्यात आली. आता विषय संपला ना स्वामीजी. शासन म्हणाले आहे बसवु तेंव्हा बसवु कधीतरी. त्यात काय एवढे.
आपले मा. मुख्यमंत्री विलासराव देशमुख आणि मा. अशोकराव चव्हाण हे मराठवाड्याचे भूमीपुत्र. यांनीही आश्वासन दिले पुतळा बसवू. एक पुतळा सिद्धार्थ उद्यानात कापडात गुंडाळून पडून आहे ना. आता नियमच असे आहेत की नाही लवकर बसवता येत पुतळा. गोविंदभाई श्रॉफ यांचा पुतळा पैठणगेटला बसवला आहेच ना. ते तूमचेच शिष्य. मग परत तुमच्या पुतळ्याची गरजच काय स्वामीजी? भाईंचा पुतळा उत्तम पाचारणे यांनी तयार केला. भाईंच्या पुतळ्याचे बील काढण्यासाठी त्यांना महापालिकेच्या वित्तविभागात ‘भाईचारा’ दाखवत कोणाला किती ‘चारा’ खावू घालावा लागला हे सगळे तूम्हाला कळाले असेलच ना. मग परत आता तुमच्या पुतळ्याच्या निमित्ताने झंझट कशाला?
तेंव्हा स्वामीजी आम्हाला माफ करूच नका. खरं कारण म्हणजे आमची काहीच चुक नाही. तूम्हीच तूमच्या खासदार निधीतून सोय करायला पाहिजे होती. तूम्ही मंत्री मुख्यमंत्री झाला असता तर काही झाले असते. शिवाय तूमचे पोरंबाळं असले असते तर त्यांनीही बापासाठी मरमर करून पुतळे उभारण्याची काही सोय सत्ता मिळताच केली असती. शासकीय निधीतून बापाची जन्मशताब्दि पुतळे स्मारके हे सारे करता येते. तेही तूम्ही केलं नाही. तूम्ही संन्याशी.
पत्राच्या खाली तूमचाच म्हणून सही करण्याची पद्धत असते. पण आम्ही तूमचे नाहीतच स्वामीजी तेंव्हा तूमचा म्हणून सही तरी कशी करू? स्वामीजी नशिब तूमच्या नावाचा चौथरा तरी आहे. तेवढे तरी भाग्य कोणाच्या वाट्याला येते?
तूमचे नसलेले आम्ही सर्व !
श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575