Friday, August 28, 2020

शर्जील इमाम - कायद्याने केले काम तमाम

 


उरूस, 28 ऑगस्ट 2020 

 दोन दिवसांपूर्वी दिल्ली दंग्यातील आरोपी विद्यार्थी नेता शर्जील इमाम याला पोलिसांनी युएपीए कायद्याअंतर्गत अटक केली आहे. हा तोच शर्जील इमाम आहे ज्याने इशान्य भारताचा मूख्य भूमीपासून वेगळा तुकडा पाडण्याचे भडक विधान केले होते, दिल्ली दंगे भडकविण्यास आपल्या भाषणांनी मोठे योगदान दिले होते. 

‘पाच लाख लोक आपल्या सोबत असतील तर आपण ईशान्य भारताला मुख्य भूमीपासून कायमचे तोडू शकतो’ शर्जीलच्या मुळ वक्तव्याचे हे मराठी भाषांतर. ‘आसाम को काटना हमारी जिम्मेदारी है’ हे त्याचे पुढचे वाक्य. आता यात नेमकं कुणाला काय संदिग्ध दिसतं आहे? सरळ सरळ देश तोडण्याची ही भाषा आहे (हे भाषण अलीगढ मध्ये 16 जानेवारी 2020 चे आहे).

बरं हे भाषण म्हणजे याचे हे एकमेव वक्तव्य आहे असेही नाही. यापूर्वीही त्याने अशीच विधाने केली होती. 13 डिसेंबर 2019 ला याने जामिया मिलिया मध्येही असेच भडक भाषण केले होते. हा तोच शर्जील आहे ज्याने रस्ता पूर्णत: बंद करण्याची कल्पना मांडली होती. आणि त्यातूनच पुढे 15 डिसेंबरला पहिल्यांदा शाहिनबाग रस्ता रोको सुरू झाले. 

ज्याला चिकन नेक म्हणतात ती एक चिंचोळी पट्टी आहे भारत आणि ईशान्य भारताला जोडणारी. तेंव्हाच्या बंगाल प्रांताचा मोठा हिस्सा पाकिस्तानात निघून गेल्यामूळे हा भूभाग चिचोळा बनला.

हा शर्जील बिहारच्या जेहानाबादचा आहे. पुढे पटनाच्या सेंट झेवियर शाळेत तो शिकला. हा अतिशय हुशार विद्यार्थी आयआयटी पवई मधून कम्प्युटर इंजिनिअर बनला. देश विदेशात मोठ्या कंपन्यांत काम केल्यावर तो आता जेएनयुमध्ये पीएचडी करत आहे. म्हणजे अविकसित मागास भागातील अशिक्षीत मुसलमान तरूण  नौकर्‍या नसल्याने सामाजिक दृष्ट्या मागे पडल्याने अशी पावले उचलतात अशी जी एक बनावट गोष्ट सांगितली जात होती ती शर्जील सारख्या तरूणांनी खोटी ठरवली आहे.  इतके उच्च शिक्षण मिळालेला, देश विदेशात मोठ्या मोठ्या आस्थापनांमध्ये काम करण्याची संधी मिळालेला हा तरूण या वाटेने का गेला? 

त्याच्यावर गुन्हा दाखल झाल्यावर हा गायब झाला होता. 23 जानेवारी 2020 रोजी बिहारमध्ये गयेत एका सभेत तो भाषण करताना आढळला. तेंव्हा त्याने काय भाषण केले तेही उपलब्ध आहे. ‘मामला कोर्ट मे दर्ज है. मॅटर अर्जंट है. हमारे पास 4 हफ्ते याने 28 दिन है. अगले हेअरिंग तक सरकार को छोडो कोर्ट को नानी याद आ जायेगी.’ या भाषणांत तो मुसलमांनाना सरकार विरोधी न्यायालयाविरोधी भाषेतून उकसत आहे. 

शर्जीलची भाषणे आत्ताही युट्यूबवर उपलब्ध आहेत. विविध वाहिन्यांनी त्यावर तेंव्हा सविस्तर कार्यक्रम केले होते. आज जेंव्हा त्याला प्रत्यक्ष अटक करण्यात आली तेंव्हा मात्र पुरोगामी पत्रकारांनी शर्जीलला बातम्यातून गायब करून टाकले.

त्याच्यावर रितसर न्यायालयात खटला दाखल करण्यात आला. त्याच्या पहिल्या जाहिर भडकावू भाषणापासून ते आजपर्यंत जवळपास 8 महिने कालावधी लोटला आहे. पोलिसांनी सखोल तपास केला. त्याच्या विरोधात पुरावे गोळा केले. 

शर्जील, उमर खालीद, शेहला रशिद, कन्हैय्या कुमार, आयेशी घोष, सफुरा झरगर, देवांगना कालिता, नताशा नरवाल ही सगळी अतिशय बुद्धीमान उच्च शिक्षीत अशी तरूण मंडळी आहे. यांच्यावर रितसर खटले भरून कायदेशीर प्रक्रियेद्वारे शिक्षा कशी देता येईल हे प्रयत्न होत आहेत. आणि हे नेमके चालू असताना याला विरोध करणारे कोण आहेत? या मार्गात अडथळा कोण आणत आहेत? हे पाप करणारी जमात म्हणजे पुरोगामी. 

याच पठडीत एक नाव होते शाह फैजल. हा तरूण स्पर्धा परिक्षांत देशांत 2010 मध्ये पहिला आला. एक मुस्लिम तरूण आणि तोही परत कश्मिरचा म्हणून त्याचे विशेष कौतुक झाले. या तरूणाचे डोके कुणी फिरवले? याच पुरोगाम्यांनी. 2018 मध्ये हा तरूण सरकारी मोठ्या पदाची नौकरी सोडून मोदी भाजप सरकार विरोधी चळवळीत उतरला. 

देशाच्या हितासाठी कुठल्याही पक्षाचा सदस्य होवून रितसर निवडणुका लढवणे यात काहीच गैर नाही. उलट ते सामाजिक पातळीवर खुप काही करू पाहणार्‍यांनी केलेच पाहिजे. लोकशाही बळकटीसाठी सक्षम विरोधी पक्ष हवाच आहे. 

पुरोगामी बहकाव्यात येत त्याने राजकीय पक्ष स्थापन केला. कश्मिरमध्ये निवडणुका लढविण्याचे ठरविले. पण 2019 च्या लोकसभा निवडणुकात त्याला काहीही प्रभाव पाडता आला नाही. पुढे 370 हटल्यानंतर जी परिस्थिती निर्माण झाली त्यात शाह फैजल सारख्यांची नाव पुरती बुडून गेली. त्याला उकसवणारे सगळे कसे भंपक आहेत हे खुद्द त्यालाच उमजले. त्याने आपल्या पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. तो आता परत सरकारी नौकरीत जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. राज्यपालांच्या सल्लागार मंडळात त्याचे नाव येणार असल्याचे बोलले जात आहे.

ज्या शेहला रशिदचे नाव मोठ्या उमेदीने पुरोगामी गाजवत होते तीनेही राजकीय संन्यास घेतला आहे. गुजरातचा जिग्नेश मेवाणी आठवतो का? गुजरात विधानसभा निवडणुक काळात त्याला माध्यमांच्या वतीने गाजविण्यात आले होते. मोदींचे वय झाले तेंव्हा त्यांनी राजकीय सन्यास घेवून ‘हिमालय मे जाके हड्डीया गलानी चाहिये ’अशी भाषा त्याने वापरली होती. तो आता कुठे संन्यास घेवून बसला आहे? याच गुजरात मध्ये हार्दिक पटेल याला पटेल आरक्षण आंदोलनात मोठी प्रसिद्धी दिल्या गेली. तो आता कॉंग्रेस पक्षाचा प्रदेशाध्यक्ष बनला आहे. त्या सोबतच याच गुजरातमध्यले अजून एक नाव तेंव्हा चर्चेत आले होते. ते नाव म्हणजे अल्पेश ठाकुर. तो तर सरळ सरळ भाजपातच चालला गेला आहे. 

ज्या कन्हैय्या कुमारने कम्युनिस्ट पक्षाचा उमेदवार म्हणून बिहारमध्ये निवडणुक लढवली होती त्याच्या विरोधात लालू प्रसाद यादवांच्या पक्षाने मुस्लिम उमेदवार दिला होता. त्याला कन्हैय्यापेक्षा लाखभर मते जास्त मिळाली. भाजपचे मंत्री गिरीराज सिंह तर या दोघांच्या बेरजेपेक्षा जास्त मतांनी निवडुन आले. मग हे पाप पुरोगाम्यांचे नाही का?

आता सामान्य माणसांना असा प्रश्‍न पडतो हे जे भाजप मोदी विरोधी आघाडीचे स्टार म्हणून तयार करण्यात आलेले तरूण यांची अशी वाट का लागली? ज्या माध्यमांनी यांना गाजवले होते तीच माध्यमे आणि उठवळ पुरोगामी याला जबाबदार आहेत. ते आता अडचणीत आले आहेत. शर्जील इमामच्या बातम्या दाबून टाकल्या जात आहेत. कारण आपलेच पाप त्यातून उघड होणार हे पुरोगाम्यांच्या हातातील खेळणं बनलेल्या माध्यमांना माहित आहे. 

कायद्याची लढाई लढताना पुरोगामी मागे पडताना दिसत आहेत. त्याचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे शाहिनबाग प्रकरणापासून मोठ्या प्रमाणावर मोबाईल, सीसीटिव्ही कॅमेरे यांच्या आधाराने वस्तुनिष्ठ पुरावे गोळा करता आले आहेत. मोबाईलवरची भाषणे, व्हाटसअप वरील चॅटिंग या सगळ्यांतून मोठे धागेदोरे तपास यंत्रणांच्या हाती लागत आहेत. याचा विचारच कधी पुरोगाम्यांनी केला नव्हता. पूर्वीची आपल्या कृत्यांकडे काणा डोळा करणारी सुरक्षा यंत्रणा आता बदलली आहे. अर्बन नक्षल, पुरोगामी यांची सुटका व्हावी अशा कायदेशीर फटी यांना आता सापडत नाहीत.

शर्जीलच्या बातम्या पुरोगामी माध्यमांनी दाबल्या पण सोशल मिडियात त्यांना वाचा फुटत आहे. काही छोटे यु ट्यूब चॅनेल पुराव्यासह या बातम्या वाचकांसमोर आणत आहेत. इतरांना ‘गोदी’ मिडिया म्हणणारा पुरोगामी मिडिया स्वत:च  पुरोगाम्यांच्या अर्बन नक्षलींच्या टूकडे टूकडे गँगच्या ‘गोदीत’ कसा आणि केंव्हा जावून बसला हे त्यांनाही कळायला मार्ग नाही. हे तर इतके टोकाला गेले आहेत की सुशांतसिंह प्रकरणांतील संशयीत आरोपी रिया चक्रवर्ती हीची मुलाखत दाखणारे पत्रकारही यांना जवळचे वाटायला लागले आहेत. प्रशांत भुषण यांना सत्यासाठी लढणारा गांधींचा आधुनिक वाटतो आहे.  


          श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575    


Thursday, August 27, 2020

शेंदूरवादा : मध्वमुनीश्वरांचे पवित्र ठिकाण



उरूस, 27 ऑगस्ट 2020 

औरंगाबाद लेण्याजवळ उगम पावणारी खाम नदी मकबर्‍यापासून पाणचक्की जवळून वहात पूढे शहराबाहेर पडते. वाळूज जवळून ही नदी पुढे शेंदूरवादा गावा जवळ जाते (औरंगाबादपासून अंतर 30 किमी. बीडकिनजवळूनही या गावाला जायला चांगला रस्ता आहे). या गावी नदीच्या काठावर शेंदूरवदन गणेशाचे सुंदर दगडी अष्टकोनी छोटेसे मंदिर आहे. मंदिराला छानसा दगडी चौथरा आहे. तिथेच एक दगडी कुंडही आहे. 

हे मंदिर जागृत गणेशस्थळ म्हणून परिसरांत प्रसिद्ध आहे. पण मंदिराला लागूनच संतकवी मध्वमुनीश्वरांची (जन्म 1640-मृत्यू 1731) समाधी आहे त्याची फारशी माहिती कुणाला नाही. मूळचे नाशिकचे असलेले त्र्यंबक नारायण हे  औरंगाबादला आले.  या ठिकाणी त्यांना योगानंद मौनपुरी, निपट निरंजन, अमृतराय यांचा सहवास लाभला. अमृतराय यांनी तर त्यांचे पुढे शिष्यत्वच स्विकारले. मध्वमुनीश्वरांनी शेंदूरवादा गावी गणेश मंदिराजवळ एका अश्‍वत्थ वृक्षाखाली मुक्काम केला. तिथेच आजचा मध्वमुनींचा आश्रम आहे. त्यांची समाधी आहे. जहागिरदार कुटूंबाच्या मालकीची ही जागा त्यांनी एक आश्रम म्हणून सुंदर बांधून काढली. भक्कम दगडी कमानी ओवर्‍या असलेली ही सुंदर इमारत वास्तुशास्त्राचा उत्तम नमुना आहे. 

ज्या अश्वत्थ वृक्षाखाली मध्वमुनीश्वरांनी मुक्काम केला त्या वृक्षाला चांगला दगडी चौथरा बांधला असून त्या भोवती  भक्कम दगडी कमानींच्या ओवर्‍यांची रचना केलेली आहे. 

पाच कमानींच्या दर्शनी ओवर्‍या या वास्तूचे खरे सौंदर्य दर्शवतात. समोर खुले पटांगण असून त्याच्या चारही बाजू बंदिस्त आहेत. एका बाजूला ओवर्‍या आजही सुस्थितीत आहे. त्याखाली तळघरही आहे.

दर्शनी भिंतीला दोन मोठे बुरूज आहेत. त्यांची दुरूस्तीही करण्यात आली आहे. गणपती मंदिराला लागून असलेली ही देखणी वास्तू लगेच नजरेला भरते.

या आश्रमाला लागूनच हनुमानाचे छोटे दगडी मंदिर आहे. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे त्याला कळस नाही. या मंदिराला लागूनच एक मस्जिद आहे. तिथे मध्वमुनीश्वरांचे शिष्य सुभानशा यांची कबर आहे. या सुफी शिष्याला मध्वमुनीश्वरांनी आपल्या जवळ जागा दिली. मध्वमुनीश्वरांच्या समाधीजवळही सुभानशांची समाधी प्रतिकरूपात आहे. 

शेंदूरवादा गावात अजून एक महत्त्वाची मुर्ती आहे. मध्वमुनीश्वरांनी आयुष्यभर नियमित पंढरपुरची वारी केली. ते जेंव्हा थकले आणि वारी थांबली तेंव्हा त्यांनी व्याकुळ होवून विठ्ठलाला पत्र लिहीले. विठ्ठलाने त्यांना सांगितले की तू माझ्यापाशी येवू नकोस. मीच तुझ्यापाशी येतो. आणि तिथे एक विठ्ठलमुर्ती प्रकट झाली. ही विठ्ठलमुर्ती गावातच एका वाड्यात स्थापन केलेली आहे. इतकी सुंदर विठ्ठल मुर्ती अतिशय क्वचित पहायला मिळते. तुकाराम महाराजांनी याच मुर्तीकडे पाहून ‘राजस सुकुमार मदनाचा पुतळा’ हा अभंग लिहीला असावा. मूर्तीचे पाय तर इतके देखणे आहेत की संतांना विठ्ठल चरणाचे इतके का आकर्षण असते ते लक्षात येते. या मूर्तीच्या शेजारी गरूडाचे आणि हनुमानाच्या देखण्या सुबक मुर्ती आहेत. विठ्ठल हे विष्णूचेच रूप आहे. पण विठ्ठल मंदिरात सहसा विष्णुचे वाहन असलेला गरूड आढळत नाही. पंढरपुरला गरूड खांब आहे. पण गरूडाची मुर्ती नाही (कुठे असल्यास अभ्यासकांनी सांगावे). उत्सव काळात ही मुर्ती मध्वमुनींच्या आश्रमात आणली जाते.



हे गाव गणपतीसाठी प्रसिद्ध आहे. ते मंदिर छोटेखानी अष्टकोनी असून त्याचे वैशिष्ट्य म्हणजे आठही दिशांना त्याला कमानी आहेत. आता इथे जाळी बसवली आहे पण मुळचे मंदिर आठही दिशांना खुले असे आहे. गणपतीची मुर्ती शेंदूर फासलेली पुरातन असून वालूकामय दगडाची आहे. सिंधूसुराचा वध गणेशाने केला व त्याचे रक्त गणेशाच्या तोंडावर उडाल्याने तो लाल भासू लागला. त्यामुळे त्याला सिंधूरवदन असे म्हटल्या जाते. अशी एक पुराणातील अख्यायिका  सांगितली जाते. या सिंधूरवदन गणेशामुळेच गावाला शेंदूरवादा असे नाव पडले असावे. सिंधूरासुराचा वध केला म्हणूनही नावाची व्युत्पत्ती शेंदूरवादा झाली असावी. 

गावात भटकत असताना एका पडक्या वाड्याचा दरवाजा आणि त्याची कोरीव दगडी चौकट दृष्टीस पडली. चौकटीवर दोन बाजूला सुंदर फुल कोरले आहे. जे तसे सर्वत्रच आढळते. पण या फुलावर बसलेला एक पोपट कोरलेला आढळला. एरव्ही समतोल अशा भौमितिक रचना सहसा आढळतात. ज्याचे एक ठराविक सुत्र असते. पण पोपटासारखा आकार कोरायचा असेल तर ते कसब कारागिराचे नसून कलाकाराचेच असावे लागते. 



मध्वमुनीश्वरांना संगीताची खुप चंागली जाण होती. त्यांची पदे आजही लोकांच्या ओठी आहेत. ‘उद्धवा शांतवन कर जा त्या गोकुळवासी जनांचे’ ही त्यांची रचना पूर्वी अभ्यासक्रमात असायची. ‘पावन तुझे नीर गंगे, पावन तुझे नीर’ ही त्यांची रचना अतिशय गोड आवाजात आजही गायली जाते.  

मध्वमुनीश्वरांमुळे हे गाव संगीत साहित्य संस्कृतीचे हे केंद्र बनले होते. गणेश स्थानामुळे एक अध्यात्मिक धार्मिक अधिष्ठान या गावाला लाभले आहे. अशा छोट्या गावांनी आपल्या परंपरा जतन करत सांस्कृतिकदृष्ट्या फार मोठे काम केले आहे. हौशी पर्यटकांनी अशा जागी आवर्जून गेले पाहिजे. ही सांस्कृतिक केंद्रं परत गजबजली पाहिजेत.  

(छायाचित्रांसाठी सौजन्य आकाश धुमणे, व्हिन्सेंट पास्किलीनी)


          श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575    


Monday, August 24, 2020

‘दिल्ली दंगे’ । पुरोगामी नंगे ॥


उरूस, 24 ऑगस्ट 2020 

 भारतातील पुरोगाम्यांनी अगदी शपथच घेतली आहे. काहीही झाले तरी पुढच्या निवडणुकीत भाजपच्या 350 पेक्षा जास्त जागा आल्याच पाहिजेत. त्यासाठी कोणतीही कसर सोडायला हे तयार नाहीत. 

ऍड. मोनिका अरोरा हा सर्वोच्च न्यायालयातील वकिल आहेत. त्यांनी दिल्ली दंग्यावर एक पुस्तक लिहीले ‘दिल्ली रॉयटस 2020 द अनटोल्ड स्टोरी’(सहलेखिका-सोनाली चितळकर, प्रेरणा मल्होत्रा). या पुस्तकाचा अभासी प्रकाशन समारंभ दिल्लीत 22 ऑगस्टला आयोजीत केला होता. प्रकाशन समारंभाच्या अर्धाघंटा आधीच ब्लुम्स बेरी या आंतरराष्ट्रीय प्रकाशन संस्थेने हे पुस्तक आपण प्रकाशीत करणार नसल्याचे सांगितले आणि समारंभ रद्द करण्याची सुचना लेखिकेला केली.

अपेक्षेप्रमाणेच अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे पाठीराखे पुरस्कार वापसीवाली टूकडे टूकडे गँग यांनी पुस्तक प्रकाशीत होवू नये यासाठी दबाव आणायला सुरवात केली.  जागतिक पातळीवर सुत्र हालली आणि अगदी शेवटच्या क्षणी हे पुस्तक प्रकाशीत करण्यास प्रकाशक संस्थेने नकार दिला. एखादे पुस्तक ज्याच्या मजकुराची चर्चा झालेली असते, मजकुर पूर्ण तपासला गेलेला असतो, मजकुरावर मान्यवरांचे अभिप्राय घेतलेले असतात मगच पुस्तक प्रकाशनासाठी अंतिम केले जाते. मग जर दिल्ली दंग्यांवरचे हे पुस्तक प्रकाशन संस्थेला आक्षेपार्ह आता वाटत असेल तर याची जाणीव मजकुर हाती आला तेंव्हाच का झाली नव्हती? किंवा मजकुर तपासत असताना त्यांच्या दृष्टीने जे काही आक्षेपार्ह आहे ते जाणून नकार का दिला गेला नाही? 

अगदी वेळेवर समारंभाच्या आधी प्रकाशन रद्द करण्याचा निर्णय कसा काय होतो? बरं यावर आवाजही उठवायला प्रस्थापित माध्यमं तयार नाहीत. (मराठीत या विषयावर अनय जोगळेकर यांनी आपल्या MH48 या  यु ट्यूब चॅनेल वर या विषयाला वाचा फोडली आहे. जिज्ञासूंनी तो व्हिडिओ जरूर पहा)

लोकसत्ताच्या आपल्या सदरात चिनेश सरलष्कर (लाल किल्ला, दि. 24 ऑगस्ट 2020) यांनी असे तारे तोडले आहेत की हा प्रकाशन समारंभ पुढच्या महिन्यात ठरला होता. पण लेखिकेला घाई होती म्हणून त्यांनी तातडीने अभासी प्रकाशन समारंभ ठरवला. त्यात कपिल मिश्रांसारख्या भडकावू भाजप नेत्यांना बोलावल्याने प्रकाशन संस्थेने पुस्तकाचे प्रकाशन करण्याचा निर्णय रद्द केला. लेखिकेला ही घाई कशासाठी होती? तर बिहारच्या निवडणुकीत याचा फायदा भाजपला मिळावा म्हणून. 

आता हा तर्क तर अगदी सामान्य माणसालाही पटणार नाही. बिहारच्या 7 कोटी मतदारांपैकी कितीजण गंभीर इंग्रजी पुस्तके वाचतात? आणि जे काही अगदी तुरळक वाचत असतील त्यांच्यावर याचा परिणाम होवून निवडणुकीचे निकाल पलटावे असं शक्य आहे का? 

‘26/11 आरेसेस साजिश’ या नावाचे पुस्तक उर्दू सहाराचे संपादक अजीज बर्नी यांनी लिहीले होते. हे पुस्तक वाचून भाजपचा 2009 मध्ये लोकांनी पराभव केला असे मानायचे का? मराठीत या पुस्तकाचा अनुवाद झाला. त्यावर जागजागी चर्चा घेतल्या गेल्या. तेंव्हा कुणी हा आरोप केला नाही की या पुस्तकामुळे भाजपेतर पक्षांना फायदा होईल आणि भाजपचा पराभव होईल. मग आता हा दावा का केला जातोय? 

दिल्ली दंग्यांवर इतक्या मोठ्या प्रमाणात माध्यमांमधून लिहीलं गेलंय सांगितलं गेलंय की आता नव्यानं कुणी दोन चारशे पानांच्या पुस्तकांत काही संागेल आणि त्याचा परिणाम होईल ही शक्यताच नाही.

ब्लुम्स बेरी प्रकाशन संस्थेने नकार देताच गरूडा नावाची दुसरी प्रकाशन संस्था पुढे आली. त्यांनी या पुस्तकाचे प्रकाशन लवकरच करण्याची घोषणा केली आहे. गरज पडली तर पुस्तकाच्या प्रती मोफत वाटण्याचीही तयारी काही संस्थांनी दाखवली आहे. 

आता मुद्दा हा येतो की या पुस्तकाला विरोध करून याचे महत्त्व पुरोगाम्यांनी का वाढवले? एक तर दिल्ली दंग्यांचे जे काही सत्य बाहेर येते आहे ते स्विकारल्या गेले पाहिजे. त्याला नाकारून कुणाचेच भले होणार नाही. शिवाय अभिव्यक्ती स्वातंत्र्य आपल्या देशात असल्याने पुस्तकाला विरोध करणे उचित नाही.

गुजरात दंग्यांवर कितीतरी पुस्तके डाव्यांनी लिहीली. अजूनही त्यावर खुसपटं काढली जातात. अगदी आत्ता मेघा मुजूमदार यांची कादंबरी ‘अ बर्निंग’ आली आणि त्यावर लिहीताना जयदेव डोळे सारखे पत्रकार भाजपवर घसरले (याच सदरातील कालचा लेख). परत एकदा हिंदू मुस्लिम दुही पेटती रहावी यासाठी प्रयत्न केल्या गेले. 18 वर्षांपूर्वीचे सगळे उकरून काढण्याचे स्वातंत्र्य आहे आणि अगदी आत्ता सहा महिन्यांपूर्वी जे घडले त्यावर लिहिले तर ते छापू नका म्हणून पुरोगामी दबाव आणतात? 

अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या बाता करणारे, संविधान बचाव अशी ओरड करणारे आपल्या अशा कृतीने सामाजिक दृष्ट्या उघडे पडले आहेत. 

दिल्ली दंगे आणि नुकतेच घडवून आणलेला बंगलोर हिंसाचार यातून देशविघातक कारवाया करणारे चव्हाट्यावर आले आहेत. यांच्या विरोधात कायदेशीर कार्रवाई होत असल्याने पुरोगामी अस्वस्थ आहेत. महाराष्ट्रात भीमा कोरेगांवला जो हिंसाचार उसळला होता त्या गुन्हेगारांभोवतीही कायद्याचा पाश आवळला गेला आहे. शाहिनबाग प्रकरणांत जिथे जिथे दंगे झाले त्यावरही कडक कारवाई होताना दिसत आहे.

अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे फक्त आपण बोलू तेवढेच. इतरांनी काही बोललं तर त्यावर दबाव टाकायचा आणि आवाज बंद करायचा असा काही वेगळा अर्थ पुरोगाम्यांच्या शब्दकोशात आहे का?

कुमार केतकर असे म्हणाले होते की 2019 ची निवडणुकच होणार नाही, झाली तरी भाजप पराभव स्विकारणार नाही सत्ता सोडणार नाही, दंगे होतील. कुमार केतकरांनी अर्धच सत्य सांगितले. भाजप जिंकला तर काय होईल हे त्यांनी नाही सांगितलं. दंगे होतील हे बरोबर सांगितले पण ते पुरोगामीच घडवून आणतील असं नाही कबुल केलं. आधी कश्मिर मग सीएए नंतर शाहिनबाग नंतर बंगलूरू सातत्याने निमित्त शोधून दंगे घडवून आणले जात आहेत. देशातील विषय कमी पडतील की काय म्हणून अमेरिकेतील कृष्णवर्णीय व्यक्तीच्या पोलिस कस्टडीतील मृत्यूचे भांडवल करूनही इथे भडकावू ट्विट्स केले, लेख लिहीले. अजून आपण शांत कसे? लोक रस्त्यावर कसे उतरत नाहीत? असे विचारले गेले. ही काय भाषा होती?

वैचारिक पातळीवर, राजकीय पातळीवर पुरोगाम्यांची जबरा पिछेहाट होत चालली आहे. केवळ भारतातच नव्हे तर जगभरात हे चालू आहे. आता सोशल मिडिया भाजपच्या कह्यात गेले असा आरोप पुरोगामी करत आहेत तेंव्हा इथूनही त्यांची सद्दी संपत चालली याची ही कबुलीच आहे.

मोनिका आरोरा यांच्या पुस्तकाच्या निमित्ताने पुरोगाम्यांनी आपण नंगे आहोत याचीच कबुली दिली आहे. 

   

          श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575    


Sunday, August 23, 2020

जयदेव जयदेव (डोळे) (द्वेष)आरती ओवाळू !


उरूस, 23 ऑगस्ट 2020 

 जयदेव डोळे हे सातत्याने भाजप संघ विरूद्ध गरळ ओकत असतात. त्यावर मी जेंव्हा जेंव्हा लिहीले त्यावर एका ज्येष्ठ स्वयंसेवकाने मलाच उलट प्रश्‍न केला, ‘आम्ही त्यांच्या संघद्वेषाने पछाडलेल्या लिखाणाची दखलही घेत नाही. तूम्ही कशाला लिहीता?’. स्वत: जयदेव डोळे आणि ज्यांच्यासाठी ते लिहीतात त्या पुरोगाम्यांनाही काही सांगण्यात अर्थ नाही. कारण त्यांना समजून घ्यायचेच नाही. शिवाय हे ते मूद्दामच करत आहेत. तेंव्हा माझा हेतू केवळ तटस्थ असे जे वाचक आहेत त्यांच्या समोर वस्तुस्थिती ठेवण्याचा आहे.

मेघा मुजूमदार या मूळच्या बंगाली आणि आता अमेरिकेत असलेल्या लेखिकेची ‘अ बर्निंग’ नावाची कादंबरी नुकतीच प्रकाशीत झाली आहे. तिच्यावर लिहीताना जयदेव डोळे यांनी परत आपल्या संघ भाजप द्वेषाची आरती ओवाळली आहे. (‘अ बर्निंग : असहाय, निरपराध, गरीब, मुसलमान तरुणीची करुण, टोकदार शोकांतिका, अक्षरनामा पोर्टल, दिनांक 22 ऑगस्ट 2020) खरं तर यातील संघ भाजप विरोधाचा मुद्दा बाजूला ठेवूत. कारण मग माझ्यावर पुरोगामी ‘चड्डीवाला’ म्हणून शिक्का मारायला ते मोकळे होतील. आणि विषय दूसरीकडे भरकटेल.

या कादंबरीची जी नायिका आहे तिचे नाव ‘जीवन’ असे आहे. मग डोळे शिर्षकात ‘मुस्लिम तरूणी’ असा उल्लेख कशाच्या आधारावर करतात? 

जो प्रसंग प्रत्यक्ष कादंबरीतील डोळे यांनी आपल्या लेखात सांगितला आहे तो असा,  एक बाई त्वेषाने सागत आहे ‘ रेल्वे स्थानकापाशीच एक जीपभर पोलीस होते. त्यांना विचारा की माझा नवरा जळत असताना ते तसेच उभे का होते? तो डब्याचे दार उघडू पहात होतो. आमची मुलगी वाचू पाहता होता. तो खूप झटला.’

आता या प्रसंगातून डोळे यांना काय सुचवायचे आहे? मुळात गोध्रा प्रकरणात आधी जो रेल्वेचा डबा जाळला गेला तो कुणी जाळला? आणि जे जळाले ते कोण होते? मुसलमानांनी आयेध्येहून परतणार्‍या हिंदूं कारसेवकांना जिवंत जाळले असा तो प्रसंग आहे. मग हा मुस्लिम विरोधी कसा काय? आणि ती बाई जी त्वेषाने बोलत आहे त्यावरून पोलिस हिंदूंना मरू देत होते, जळू देत होते असा अर्थ निघतो. 

मग जर पोलिस व्यवस्था हिंदूंना मारत होती तर मग  पोलिस प्रशासन मुख्यमंत्री मुस्लिम विरोधी होते असा निष्कर्ष कसा काय निघतो?

बरं स्वत: डोळे यांनीच आपल्या लेखात असं लिहीलं आहे, ‘... वाचक सारे काही जाणतात असे गृहीत धरून लेखिका पक्ष, संघटना, धर्म असे कोणलाही थेट समोर  आणत नाही. पण वाचक समजतो. मुस्लीम नागरिक किती असहाय व उपेक्षित होऊन गेलाय हे मात्र लेखिका जाणीवपूर्वक ठसवते.’

जर कुठला धर्म पक्ष संघटना नावानिशी समोर येत नाही मग डोळे असा दावा का करतात की हे सगळे मुस्लिम विरोधी आहे? लेखिकेने नेमका कुठे तसा उल्लेख केला आहे? कोणता प्रसंग आहे की ज्यातून धर्म स्पष्ट व्हावा?

या कादंबरीवर लिहीत असताना डोळे सुरवातीलाच असे लिहून जातात, ‘फेसबुकचा भाजपने कसा वापर केला, त्याच्या बातमीने या कंपनीला आता आपला ‘फेस’ मास्कमध्ये लपवावा लागतोय. कितीही खुलासे केले तरी केलेले गैरकृत्य सार्थ ठरवता येईनासे झालेय. भाजपच्या नादी जो जो जागला, त्याचा कारभार आटोपलाय. कोणी खालसा झाले, तर कोणी बेईज्जत! पण फेसबुकवरची एक पोस्ट थेट फासावर नेऊन जीव घेते. ती कहाणी त्या बातमीच्या आशयाची जवळपास पुष्टी करते. म्हणजे हिंदुत्ववादी पक्ष व संघटना फेसबुकवरच्या एका बेसावध अजाणत्या प्रतिक्रियेचा वापर करून कसा डाव साधतात, त्याची ही कहाणी आहे.’

एका फेसबुक पोस्टमुळे थेट फाशीची शिक्षा ठोठावली जाते असे भारतात 2014 नंतर कधी घडले आहे? डोळे हा आरोप कशाच्या आधारावर करतात? उलट याकुब मेमन याची फाशी टळावी म्हणून रात्री 2 वाजता न्यायालयाचे दरवाजे भारतात उघडले गेले आहेत. कसाबवर खटला दाखल करून संपूर्ण कारवाई लोकशाही पद्धतीनं कायद्याप्रमाणे होउन फाशी सुनावल्या गेली आहे. भाजपवर आरोप करताना डोळे काय म्हणून भारतीय न्यायव्यवस्थेवर शिंतोडे उडवत आहेत?

बरं जो संदर्भ डोळे देत आहेत तो आत्ताचा सोशल मिडियाचा वापर भाजप आपल्यासोयीने करत आहे. हा सोशल मिडिया भाजपच्या कह्यात आहे. आणि कादंबरी गुजरात दंग्यांच्या काळातील आहे. 2003 मध्ये सोशल मिडियाचा वापर कसा आणि किती केला जात होता? 

शिवाय 2002 मध्ये मुळातच सोशल मिडिया भारतात इतका सर्वव्यापी होता का? डोळे कशाचा संदर्भ कशाचीही का जोडत आहेत? आज फेसबुकचे 34 कोटी वापरकर्ते आहेत. तेंव्हा किती होते? मुळात फेसबुकच त्या काळात होते का? ज्या फेसबुकची सुरवात 2004 मध्ये झाली त्याचा वापर 2002 च्या गुजरात दंग्यांच्या काळात प्रभावीपणे मुस्लिमविरोधासाठी केला गेला हा डोळे यांचा शोध कोणत्या पातळीवरचा आहे?   

डोळेंना गुजरात दंगल जिवंत ठेवायची आहे का? राम मंदिर प्रकरणी निकाल आल्यानंतर आणि आता राम मंदिराची उभारणी सुरू झाल्यानंतर परत एकदा जून्या सगळ्या आठवणी काढून दोन समाजात तेढ निर्माण करावयाची आहे का? आणि तेही परत कसलाही आधार नसताना. एका कादंबरीतील काल्पनिक पात्राचा आधार घेवून?

मेघा मुजूमदार यांना काय म्हणायचे आहे, त्यांनी कादंबरीत काय मांडलंय हा एक स्वतंत्र विषय आहे. पण त्याचा आधार घेवून जयदेव डोळे विनाकारण तेढ निर्माण करत आहेत हे गंभीर आहे. ही एक प्रकारची विकृतीच आता पुरोगाम्यांमध्ये वाढत चालली आहे. हे आक्षेपार्ह आहे कारण याने समाजात अस्वस्थता निर्माण होवू शकते. 

या प्रकारच्या लिखाणासाठी अशा लेखकांना देशहित लक्षात घेवून सामान्य नागरिक म्हणून आपण जाब विचारला  पाहिजे. 

 

          श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575    


Friday, August 21, 2020

आजीच्या जवळी घड्याळ कसले आहे चमत्कारिक


काव्यतरंग, शुक्रवार 21 ऑगस्ट 2020 दै. दिव्यमराठी


आजीचे घड्याळ

आजीच्या जवळी घड्याळ कसले आहे चमत्कारिक

देई ठेवुनि ते कुठें अजुनि हे नाही कुणा ठाउक

त्याची टिक् टिक् चालते न कधिंही, आहे मुके वाटते

किल्ली देई न त्यास ती कधिं, तरी ते सारखे चालते ॥


‘‘अभ्यासास उठीव आज मजला आजी पहाटे तरी,’’

जेव्हा मी तिज सांगुनी निजतसे रात्री बिछान्यावरी

साडेपांचहि वाजतात न कुठे तो हांक ये नेमकी

बाळा झांजर जाहले, आरवले तो कोंबडा, ऊठ की’’ ॥


आजीला बिलगुन ऐकत बसूं जेव्हां भुतांच्या कथा

जाई झोप उडून, रात्र किति हो ध्यानी न ये ऐकतां

‘‘अर्धी रात्र किं रे’’ म्हणे उलटली, ‘‘गोष्टी पुरे! जा पडा! ’’

लागे तो धिडधांग पर्वतिवरी वाजावया चौघडा ॥


सांगे वेळ, तशाच वार-तिथिही आजी घड्याळांतुनी

थंडी पाउस ऊनही कळतसे सारे तिला त्यांतूनी !

मौजेच असले घड्याळ दडुनी कोठे तिने ठेविले?

गाठोडे फडताळ शोधुनि तिचे आलों ! तरी ना मिळे ! ॥


-केशवकुमार (आठवणीतील कविता 1, पृ.15, प्रकाशक ‘आठवण’, आ.2008)


13 ऑगस्ट हा दिवस म्हणजे आचार्य अत्र्यांची 123 वी जयंती होती. वर्षभरातच त्यांच्या स्मृतीचा शतकोत्तर रौप्य महोत्सव सुरू होतो आहे. आचार्य प्र.के. अत्रे यांचा मराठी माणसाला त्यांच्या विविध पैलूंनी परिचय आहे. सिद्धहस्त लेखक, प्रभावी वक्ते, यशस्वी नाटककार, चित्रपट दिग्दर्शक निर्माते, ‘मराठा’ सारख्या लोकप्रिय दैनिकाचे संपादक मालक, संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील झुंझार नेते राजकारणी. पण कवी म्हणून त्यांची ओळख मात्र फारशी समोर येत नाही. अत्र्यांनी ‘केशवकुमार’ या नावाने कविता लिहील्या. तसेच अतिशय फर्मास अशी विडंबनेही लिहीली. ‘झेंडूची फुले’ या नावाने त्यांचा विडंबन कवितांचा संग्रह प्रसिद्ध आहे. 

आता जसे ‘बालभारती’ अभ्यासक्रमाची पुस्तके प्रकाशीत करते तसे पूर्वी नसायचे. काही प्रकाशक चांगला मजकुर संपादीत करून ती पुस्तके शिक्षणखात्याकडून मंजूर करून घ्यायचे. नंतर ही पुस्तके शालेय अभ्यासासाठी लावली जायची. आचार्य अत्र्यांनी अशी शालेय अभ्यासक्रमाची पुस्तके संपादीत केली. त्यांच्यातील शिक्षणतज्ज्ञाला लहान मुलांची मानसिकता चांगली समजत होती. या पुस्तकांत ज्या कविता असायच्या त्यांची निवड अतिशय अचूक केलेली असायची.

अत्र्यांनी आपण स्वत: संपादीत केलेल्या पूर्वीच्या अभ्यासक्रमांतील पुस्तकांत काही कविता लिहील्या आहेत. त्यातीलच ही एक सुंदर शार्दूलविक्रिडीत छंदातील कविता. मुळात आजी आणि नातवंडे यांचे एक अतिशय वेगळे वैशिष्ट्यपूर्ण नाते भारतीय  कुटूंबसंस्थेत आहे. घराचा कारभार सांभाळणारी, सगळ्यांना माया लावणारी, घर सावरून धरणारा बळकट खांब  म्हणजेच आजी. हीच्या भोवतीच सगळा गोतावळा जमा होता.

साधारणत: 1920 च्या काळातील ही कविता. तेंव्हा आताच्यासारखी घड्याळं सार्वत्रिक झाली नव्हती. मनगटी घड्याळं अजून आली नव्हती. लहान मुले आजीला दिवसभर वेळ विचारायची. पहाटे अभ्यासाला उठवणे, शाळेची वेळ होताच आठवण करून देणे, संध्याकाळी खेळात गुंगल्यावर अभ्यासासाठी घरात बोलावणे आणि रात्री गोष्टी सांगून झोपवणे या दिवसभराच्या सर्व प्रहरात ही आजी नातवंडांना वेळेची आठवण करून देई. 

एकीकडून अत्र्यांनी आपण कसे काळाशी जोडले गेलो आहोत हे सांगताना आजीशीही त्यासारखेच जोडले गेलो आहोत असंही संागितलं आहे. शांता शेळक्यांनी आजीसाठी नावतंडे म्हणजे ‘दुधावरची साय’ असे वर्णन केले आहे. या आजीलाही ही नातवंडे परंमप्रिय आहेत. स्वयंपाक आणि घरच्या रगाड्यात आई गुंतलेली असते. वडिल बाहेरचे व्याप सांभाळत असतात. आजोबांचा एक धाक असतो. मग मुलांच्या वाट्याला येते ती हक्काची आज्जीच. 

ही आज्जी संध्याकाळी मुलांना खेळातून बोलावून घेते. देवासमोर बसवून त्यांना स्त्रोत्र श्‍लोक पाढे म्हणावयास लावते. त्यांचा अभ्यास घेते. तान्ह्या लहान मुलास मांडीवर घेवून जोजवते. बी. रघुनाथ यांच्या ‘सांज’ या कवितेत या आजीचे म्हणजेच माउलीचे वर्णन मोठे सुंदर आलेले आहे

माऊलीच्या वातीतून सांज तेज ल्याली

माऊलीच्या गीतातून सांज भाव प्याली

माऊलीच्या अंकावरी सांज मुल झाली

मुलासाठी निदसुरी सांज भूल झाली

ही आजी मुलांना जेवणं खाणं झाल्यावर गोधडीत पहुडतांना गोष्टी सांगते. गोधडीच्या ऊबेसोबतच आजीच्या गोष्ट सांगणार्‍या वेल्हाळ आवाजाचीही एक ऊब नातवंडांच्या भोवती पसरते. भूताखेताच्या गोष्टी ऐकताना झोप कशी उडून जाते आणि मग आजी दटावते मध्यरात्र झाली आहे. पहाटे शाळा आहे आता झोपा. 

सुदर्शन फाकिर यांच्या एका कवितेत आजीच्या गोष्टींचा संदर्भ फार सुरेख आला आहे. जगजित-चित्रा सिंग यांनी गायलेलं हे गाणं अतिशय प्रसिद्ध आहे. ‘ये दौलत भी ले लो ये शोहरत भी ले लो’. यातील एक कडवं असं आहे

मुहल्ले की सबसे निशानी पुरानी

वो बुढिया जिसे बच्चे केहते थे नानी

वो नानी के बातों मे परियां डेरा

वो चेहरे की झुरियों मे सदियां का फेरा

भुलाये नही भूल सकता है कोई

वो छोटीसी राते वो लंबी कहानी

आपल्या कुटूंबव्यवस्थेचा कणा असणारी अशी आजी. या आजीचा घड्याळाशी संबंध जोडताना अत्र्यांनी नकळतपणे काळाला बांधून ठेवणारी किंवा काळावर विजय मिळवणारी ती आजी अशी पण एक व्याख्या करून ठेवली आहे. गावाकडच्या भाषेत चिवटपणे परिस्थितीशी दोन हात करत जगणार्‍या लोकांना ‘दु:ख दळून खाणारी माणसे’ म्हटलं जातं. तशी ही आजी काळाला कनवटीला बांधून ठेवणारी आहे. 

गो.नि.दांडेकरांची ‘पडघवली’, श्री.ना.पेंडश्यांची ‘रथचक्र’, अरूण साधूंची ‘मुखवटा’ या कादंबर्‍या आणि महेश एलकुंचवारांचे नाटक ‘वाडा चिरेबंदी’ या महान कलाकृतींमधून ही आजी मध्यवर्ती पात्र म्हणून ताठपणे उभी राहते. महाभारताचा बारीक विचार केल्यास आधी सत्यवती आणि मग कुंती या दोन आज्ज्याच सर्व कथेच्या केंद्रभागी आहेत किंबहुना सर्व महाभारत त्यांच्यामुळेच घडले  हे लक्षात येते.

(लेखासोबत वापरलेले चित्र जून्या पाठ्यपुस्तकांतील आहे. हे चित्र सुप्रसिद्ध चित्रकार दलाल यांनी काढलेले आहे. आठवणीतील कविता या सुंदर संपादीत पुस्तकांत अशी काही जूनी अभ्यासक्रमांतील चित्रे कवितेसोबत दिलेली आहे.  या संपादकांचे, प्रकाशकाचे, चित्रकाराचे मन:पूर्वक धन्यवाद.)

श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575    


Thursday, August 20, 2020

समाधी छोटी गोष्ट मोठी !


उरूस, 20 ऑगस्ट 2020 

 सोबतच्या छायाचित्रात दिसते आहे ही एक घडीव दगडाची छोटी साधी देखणी समाधी. वृंदावनाच्या आकारात कोरलेल्या दगडांत वरती एक शिवलिंग आहे. त्याला वाहिलेले पाणी निघून जाण्यासाठी छोटीशी खोबण दगडांतच कोरलेली आहे. परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालूक्यात ऐतिहासिक सुप्रसिद्ध चारठाणा गावाजवळ धानोरा हे गांव आहे. जवळच्या वाघी गावामुळे याला वाघी धानोरा असेच संबोधले जाते. 

या गावात एकोणविसाच्या शतकाच्या उत्तरार्धात अद्वैयानंद नावाचे एक सन्यासी सत्पुरूष वास्तव्यास आले. वाशिम जवळच्या एका गावाहून कायंदे कुळातील हे सत्पुरूष धानोर्‍यात चालत आले. उर्वरीत आयुष्य त्यांनी याच गावात व्यतित केले. 1920 च्या दरम्यान त्यांचे देहावसान झाले. गावातील वतनदानर देशपांडे धानोरकरांनी आपल्या गढीवजा वाड्याच्या परिसरात या सत्पुरूषाची ही समाधी उभारली. या जागेला देवघर या नावाने ओळखले जाते.

समाधीची पुजा, समाधीस्थळी भजन किर्तन नियमित होत असायचे. मधुकरराव धानोरकर यांनी या समाधीची नित्यपूजा फार काळ केली. जिंतूरचे नरहर गुरू जिंतूरकर यांनी 35 वर्षे भागवताचे पारायण या जागी केले. पुढे काळाच्या ओघात वतनदार देशपांडे स्थलांतरीत झाले. गढी ढासळली. समाधीची जागाही बेवारस बनत गेली. तिथे मोकाट जनावरांचा वावर सुरू झाला. 

2010 मध्ये येथील सुप्रसिद्ध किर्तनकार व्यंकटराव धानोरकर गुरूजी यांचे निधन झाले. त्यांनी आपल्या आयुष्यातील पहिले किर्तन 1955 सालादरम्यान याच समाधी स्थळी केले होते. याची आठवण ठेवून त्यांचे सुपुत्र माझे मित्र जयंत देशपांडे धानोरकर यांना प्रमाणिकपणे असे वाटले की वडिलांची स्मृती म्हणून आपण या समाधीचा जिर्णोद्धार केला पाहिजे. त्यांनी आपले किर्तनकार बंधू भालचंद्र आणि पडद्यामागचा सुत्रधार संजय या तिघांनी भाउबंदकिला विचारले. सगळ्यांनी एकमताने समाधीचा कायापालट करण्याचे ठरवले. आपल्या गढीवजा वाड्याचा चांगल्या अवस्थेत असलेला जो माळवदाचा (लाकडी छताचा, आताच्या पिढीला हा शब्द माहित नसतो) भाग उचलून घेतला. शिल्लक मजबूत खांब आणि भक्कम तळखडे यांचा वापर करून समाधी भोवती चांगले छत उभारले. समाधी समोर छोटेसे अंगण मोकळे ठेवले. चारीबाजूंनी चांगली बांधबंदिस्ती केली. मोकाट जनावरे येवू नये म्हणून जागेला दरवाजा बसवला. त्याला कडी घातली. 

खरं तर ही तशी साधीच गोष्ट होती. पण यापुढे जयंत देशपांडे यांनी जे केले ते मात्र अतिशय महत्वाचे होते. तीच खरी मोठी गोष्ट मला वाटते. त्यांनी या जागेला कुलूप घातले नाही. जागा चांगली करून गावकर्‍यांच्या स्वाधीन केली. सगळ्यांसाठी हे समाधीस्थळ कधीही उघडे असावे अशी व्यवस्था केली. गावकर्‍यांवर विश्वास ठेवून त्यांनाच सर्व व्यवस्था पाहण्यास सांगितले. रोज एक म्हातारी आजी येवून ही जागा साफसुफ करून जाते. समाधीजवळ कोनाड्यात दिवा पेटवते. महादेवाला पाणी घालून चार फुले वाहते. 

जवळपास उकिरडा बनलेली ही जागा आता परत माणसांनी गजबजून गेली आहे. प्रवचनं किर्तनं इथे आता होतात. सामान्य माणसांच्या श्रद्धेने या जागेला परत एकदा जिवंतपणा प्रदान केला आहे. 

समाधीच्या बाजूला देशपंाडे धानोरकरांच्या पडलेल्या वाड्याचा मोठा परिसर आहे. ती सगळी जागा समतल करून तिथे साफ सफाई करून ज्येष्ठ नागरिकांसाठी लहान मुलांसाठी खेळायची जागा बगीचा करण्याचा मनोदयही जयंत देशपांडे यांनी सांगितला. 

परभणी, हिंगोली, नांदेड, बीड या परिसरांत (इतरत्रही हीच स्थिती आहे) छोट्या गावांमध्ये वतनदारांचे जूने वाडे, गढ्या उद्ध्वस्त झालेल्या आढळून येतात. त्या जागा अगदी बेवारस बनल्या आहेत. तिथे कुणाचाही वावर नाही. काही ठिकाणी मालकिचे वाद चालू आहेत. अशी परिस्थिती असताना जयंत देशपांडे सारखा एक वतनदार आपल्या कृतीने एक आगळा वेगळा आदर्श लोकांसमोर ठेवतो. आपल्या वाडवडिलांच्या जागेचा सद्उपयोग नविन काळात गावकर्‍यांना व्हावा अशी दृष्टी बाळगतो ही फार मोठी गोष्ट आहे. 

खेड्यांमधल्या असे जूने वाडे, गढ्या ज्या बर्‍यापैकी अवस्थेत आहेत त्यांची दूरूस्ती बांधबंदिस्ती केली गेली पाहिजे. ही ठिकाणं एका अर्थाने ऐतिहासिक पुरातत्वीय दृृष्ट्या महत्त्वाची आहेत. इथे किमान रहायची सोय झाली तर परदेशी पर्यटक येथे येण्यास उत्सूक आहेत. जानेवारी महिन्यात चारठाण (ता. जिंतूर जि. परभणी) येथील देशपांडे यांचा वाडा आणि  होट्टल (जि. नांदेड, ता. देगलूर) येथील देशमुखाची गढी व्हिन्सेंट पास्किलीनी या फ्रेंच मित्राला आम्ही दाखवली. त्याने हीची दूरूस्ती आणि जतन करण्याबाबत तळमळ व्यक्त केली.  

चारठाणा येथील काही वाडे बर्‍यापैकी अवस्थेत आहेत. पैठण उंडणगाव गंगापूर माजलगाव  येथेही जूने भव्य वाडे आहेत. अशा खुप जून्या वास्तू आहेत. या शिवाय ज्या जागा पूर्णत: पडलेल्या आहेत तिथे जयंत देशपांडे यांनी केलेल्या कृती प्रमाणे काही एक उपाय करता येईल. ही जागा साफसुफ करणे. तिला संरक्षक भिंत उभारणे. त्यासाठी दगड तिथेच असतात. झाडे लावणे. हा परिसर गावकर्‍यांना वापरासाठी उपलब्ध करून देणे. जागा मूळ मालकाच्याच नावावर राहणार असल्याने मालकीचे वाद उदभवणार नाहीत. हा सगळा विश्वासाचा प्रश्‍न आहे. सध्या उद्ध्वस्त असलेल्या जागेचे रूपांतर सुंदर बगीच्यात झाले तर त्याचा फायदा गावकर्‍यांसाठी आणि पर्यटकांसाठी होणार आहे. 

याच परिसरांतील संत समर्थ रामदास यांनी ‘क्रियेवणी वाचाळता व्यर्थ आहे’ असे  सांगून ठेवले आहे. जयंत देशपांडे यांनी एक आदर्श घालून दिला आहे. तेंव्हा आता इतरांनी आपल्या आपल्या गावची परिस्थिती जाणून त्या प्रमाणे काही एक कार्यवाही केली पाहिजे. ही अतिशय साधी सहज होऊ शकणारी गोष्ट आहे. 

सातवाहनापासून वाकाटक राष्ट्रकुट ते देवगिरीच्या यादवांपर्यंत महान सम्राटांचा हा प्रदेश. आपल्या या पुरातन वारश्याची जाण ठेवून आपण त्या प्रमाणे आपल्या परिसरांतील ऐतिहासिक वास्तूंचे जतन करत असताना आपल्या घराण्याच्या पडक्या जागाही चांगल्या करण्याचे व्रत हाती घेवू या.        


          श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575    


Friday, August 14, 2020

भेटेन नऊ महिन्यांनी !


काव्यतरंग, शुक्रवार 14 ऑगस्ट 2020 दै. दिव्यमराठी


भटेन नऊ महिन्यांनी 


मनि धीर धरी शोक आवरी जननी । भेटेन नऊ महिन्यांनी ॥

या न्यायाची रीत मानवी असते । खरी ठरते केव्हा चुकते

किति दुर्दैवी प्राणी असतिल असले । जे अपराधाविण मेले

लाडका बाळ एकुलता

फांशीची शिक्षा होतां

कवटाळुनि त्याला माता

अति आक्रोशे, रडते केविलवाणी । भेटेन नऊ महिन्यांनी ॥


तुज सोडुनि मी. जाइन कां गे इथुन । परि देह परस्वाधीन

बघ बोलति हे, बोल मुक्या भावाचे । मम दोरखंड दंडाचे

अन्नपाणि सेवुनि जिथले

हे शरीर म्यां पोशियले

परदास्यिं देश तो लोळे

स्वातंत्र्य मला, मिळेल मग कोठोनी । भेटेन नऊ महिन्यांनी ॥


लाभते जया, वीर मरण भाग्याचे । वैकुंठपदी तो नाचे

दे जन्म मला, मातृभूमिचे पोटी । पुन:पुन्हा मरण्यासाठी

मागेन हेंच श्रीहरिला

मातृभूमि उद्धरण्याला

स्वातंत्र्यरणी लढण्याला

तव शुभ उदरी, जन्म पुन्हा घेवोनी । भेटेन नऊ महिन्यांनी ॥


-कुंजविहारी (गीतगुंजारव, पृ.54, प्रकाशक गीतगुंजारव मंडळ सोलापुर, आ.1947)


15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी विविध स्वातंत्र्यगीते वाजवली जातात. काही कवितांची आठवण या निमित्ताने काढली जाते. कुसुमाग्रजांच्या ‘गर्जा जयजयकार क्रांतीचा’ सारख्या कवितांप्रमाणेच तेंव्हाची अतिशय लोकप्रिय असलेली कवी कुंजविहारी यांची कविता म्हणजे ‘भेटेन नऊ महिन्यांनी’.

कवी कुंजविहारी यांचे संपूर्ण नाव हरिहर गुरुनाथ कुलकर्णी-सलगरकर (जन्म 10 नोव्हेंबर 1896 मृत्यू 1 नोव्हेंबर 1978). सोलापूर ही त्यांची कर्मभूमी. स्वातंत्र्यलढ्यात अतिशय सक्रिय असलेले कुंजविहारी यांना सोलापूरच्या मार्शल लॉच्या वेळी 1 वर्षाचा तुरूंगवासही भोगावा लागला. 

देशासाठी लढणार्‍या एकुलत्या एक मुलाला फांशीची शिक्षा होते. त्याला पोलिस ओढून नेत असताना त्याची आई आक्रोश करते. या आईला समजावून सांगताना तो स्वातंत्र्यवीर जे बोलतो आहे त्याचीच ही कविता बनली आहे. सोलापुरचे स्वातंत्र्यवीर मल्लप्पा धनशेट्टी यांना फासावर चढविण्यात आले. त्यावेळी त्यांची पत्नी गरोदर होती. मल्लप्पा धनशेट्टी यांच्या मृत्यूनंतर काही महिन्यांनी त्यांच्या पत्नींस पुत्रप्राप्ती झाली. त्यांचे नाव शंकरअप्पा धनशेट्टी. हा स्थानिक संदर्भही कुंजविहारींच्या कवितेला आहे. 

कुंजविहारींनी भारतीय सनातन तत्त्वज्ञानातील पुनर्जन्माची संकल्पना अतिशय उत्कटपणे कवितेत आणली आहे.  आत्ता जरी मला हे सरकार फासावर चढवत असले तरी तूझ्या उदरी मी परत नऊ महिन्यांनी जन्म घेईन. मूळ कविता 13 कडव्यांची आहे. (कुंजविहारींची स्वाक्षरी असलेली त्यांच्या पुस्तकाची प्रत मला औरंगाबादच्या जीवन विकास ग्रंथालयात सापडली. त्याचे छायाचित्र सोबत जोडले आहे. हे पुस्तक त्यांनी 1962 मध्ये तेंव्हाच्या शिक्षणाधिकारी शकुंतलाबाई वाघमारे यांना सप्रेम भेट दिलेले आहे.)  

भारतीयांची ही जी मानसिकता आहे हीच त्यांनी मोठी ताकद आहे. अगदी आत्ता जून महिन्यात गलवान खोर्‍यात चिनी सैनिकांसोबत हातापायी होवून 20 सैनिक मृत्यूमुखी पडले. त्यांच्या सोबतच्या इतर सैनिकांना जेंव्हा पत्रकारांनी विचारले तेंव्हा त्यांनी ‘आम्हाला परत आघाडीवर पाठवा’ अशीच भावना व्यक्त केली. स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर ही आपली भारतीय मानसिकता समजून घेण्याची गरज आहे. 

देशासाठी शहिद होणार्‍या कित्येकांची तर नोंदही नाही. कुसुमाग्रजांनी ‘अनामवीरा’ या कवितेत म्हटल्याप्रमाणे

अनामवीरा जिथे जाहला तुझा जिवनांत

स्तंभ तिथे ना कुणी बांधला पेटली ना वात

जरी न गातील भाट डफावर तूझे यशोगान

सफल जाहले तूझेच हे रे तूझेच बलिदान

भारतीयांच्या मनांमनांत शहिदांसाठी अतिशय सन्मानाची आदराची भावना नेहमीच राहिली आहे. कुंजविहारींनी हेच ओळखून या कवितेची रचना केली. कवितेचा आशय अतिशय सोपा सरळ आहे. आपल्या स्वातंत्र्यलढ्याला एक वेगळी भक्कम अध्यात्मिक अशी पार्श्वभूमी आहे. संत साहित्यातून, शिवाजी सारख्या महान राज्यकर्त्यांपासून एक प्रेरणा सतत आपल्याला मिळत आली आहे. तुरूंगात असतांना कुंजविहारी यांच्यावर संत साहित्याचा परिणाम झाल्याची नोंद त्यांच्यावर लिहीताना वा.शि. आपटे यांनी करून ठेवली आहे. 

याच कुंजविहारींनी शिवरायांची आरती लिहीताना स्वातंत्र्यलढ्याला इतिहासाशी जोडत आपली प्रेरणा स्पष्ट केली आहे,

जेव्हा जगी धर्मध्वज होतो पदभ्रष्ट

जेव्हां मांडिती तांडव अरिदानव दुष्ट

जेंव्हा साधूसज्जन सहतिल अति कष्ट

शिवसंभव तव होइल भगवद्वच स्पष्ट ॥

राष्ट्रीयत्वाची भावना लोकांमध्ये जागृत करण्यासाठी महाभारतातील युद्ध, परकियांची आक्रमणे यांचा धागा इंग्रजांविरूद्धच्या लाढ्याशी र्जोडणारी कविता त्या काळात लिहीली गेली.

आजही स्वातंत्र्यलढ्यातील कवितां का लोकप्रिय आहेत? ही गाणी आजही परत त्याच उत्साहात का गायली जातात? त्याचे कारण म्हणजे भारतीयांच्या मनात या भूमीबद्दल एक विलक्षण अशी आत्मियता आहे. हा केवळ जमिनीचा तुकडा नसून आमच्या कणाकणांत हे भारतीयत्व समावलेले आहे. आजही विपरीत सामाजिक परिस्थिती उद्भवते, दंगे होतात, दंग्यांत बळी पडलेला मुलगा 100 वर्षांपूर्वी जसे आईला म्हणत होता, ‘भेटेन नऊ महिन्यांनी’ तोच आजच्या आईला म्हणतो 

आई दाराबाहेर पाऊल ठेवताना

कधी येशील? विचारू नको

वापस यायची निश्चित वेळ व खात्री द्यावी

इतकं हे शहर साधं सरळ उरलेलं नाही


इंग्रजांविरूद्ध लढलेल्या 

भगतसिंग सुखदेव राजगुरू यांचे भाग्य

आमच्या वाट्याला येणार नाही  

आपल्याच लोकांनी पाठीमागुन केलेल्या वारांनी

ते बाटल्या शिवाय राहणार नाही

भागतसिंग सुखदेव राजगुरू 

तर आम्ही ठरणार नाहीतच

पण तूझं काळीज मात्र

भगतसिंगाच्या आईचे असू दे.

कुंजविहारी यांनी भारतीय मानसिकता ओळखून काळावर मात करणारी कविता लिहीली. आजचाही कवी हीच भावना आपल्या शब्दांत मांडतो तेंव्हा या कविची प्रतिभा लक्षात येते.

श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575