उरूस, दै. पुण्यनगरी, 18 एप्रिल 2016
नेमाडे केंव्हा काय बोलतील हे कुणाला सांगता येत नाही. आणि म्हणूनच ते असं काहीतरी बोलतात की त्याची बातमी होते. नेमाडे यांचे वर्तमानपत्रांशी जमत नाही. ते माध्यमांवर तोंडसुख घेतात आणि परत त्याचीच बातमी होउन जाते. औरंगाबाद शहरात ‘साकेत बुक वर्ल्ड’ या पुस्तकाच्या दुकानाच्या उद्घाटनाला ते आले होते. त्यावेळी नेहमीप्रमाणे नेमाडे वर्तमानपत्रांवर घसरले. वर्तमानपत्रं वाचणारे माणसेही मनोरूग्ण असतात असंही त्यांचे निरीक्षण.
नेमाडेंचे खरंच काही कळत नाही. ज्या माध्यमांवर ते उखडतात त्याच माध्यमाने ठेवलेला ‘ज्ञानपीठ’ (ज्ञानपीठ हा टाईम्स गटाचा पुरस्कार आहे. शासनाचा नाही.) पुरस्कार मात्र नेमाडे स्वीकारतात. त्यासाठी शासनाकडून परत सत्कारही स्वीकारतात. एरव्ही साहित्य संमेलनांसारख्या उत्सवी कार्यक्रमांवर नेमाडे टिका करतात. मग त्यांना ज्ञानपीठ मिळाले म्हणून महाराष्ट्र शासनाने भव्य सत्कार सोहळा मुंबईला साजरा केला. त्यावर नेमाडे चुप्प बसून राहिले. म्हणजे नेमाडे यांची नैतिकतेची शिकवण फक्त इतरांसाठीच आहे का? स्वत:वर पाळी आली की मात्र नेमाडे चुप राहणार. आणि स्वत:चे फायदे करून घेणार. हे काय गौडबंगाल आहे?
औरंगाबादच्या कार्यक्रमात नेमाडे साहित्य संस्कृती मंडळाच्या सध्याच्या अध्यक्षांबाबत बोलताना (साहित्यीक बाबा भांड) पूर्वीच्या अध्यक्षांवर (तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी) काहीच कारण नसताना घसरले. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जेंव्हा साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष होते त्या काळातील एक प्रकरण नेमाडे यांनी सर्वांसमारे मांडले. तर्कतीर्थांचा मुलगा चरस गांजाच्या व्यसनात अडकला होता. त्यावर उपचार करण्यासाठी त्याला लंडनला पाठवले गेले. त्याचा खर्च विश्वकोश निर्मिती मंडळाच्या (साहित्य संस्कृती मंडळाच्या नव्हे) खात्यातून करण्यात आला. असे नेमाडे यांनी ज्येष्ठ समिक्षक कै. म.द.हतकणंगलेकर यांचा हवाला देवून सांगितले. इथपर्यंतच नेमाडे बोलले असते तर काही हरकत नव्हती. नेमाडे यांनी पुढे तर्क असा मांडला. त्या काळातील ज्येष्ठ पत्रकार मा. गोविंद तळवलकर, मा. अरूण टिकेकर, मा. अनंत भालेराव हे का म्हणून चुप बसले? त्यांनी हे प्रकरण चव्हाट्यावर का आणले नाही?
आता नेमाडे यांच्या या तर्काला काय उत्तर द्यावे? एक तर कुठलेही प्रकरण त्या त्या वर्तमानपत्राचा वार्ताहर उघडकीस आणत असतो संपादक नव्हे. दुसरी गोष्ट म्हणजे जर नेमाडे यांना ही माहिती होती तर त्यांनी हे प्रकरण या संपादकांच्या निदर्शनास का नाही आणून दिले? वर्तमानपत्रांनी छापले नसते तर इतर माध्यमं (उदा.दूरदर्शन वाहिन्या) उपलब्ध होती. त्यांनीही नकार दिला तर आजकाल इंटरनेट उपलब्ध आहे. नेमाडे यांनी त्या माध्यमातून तर्कतीर्थांचा कथित घोटाळा उघडकीस आणायचा.
जर आत्ता संशोधन करून, सी.बी.आय.ची चौकशी करून असे सिद्ध झाले की तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी आपल्या पदाचा दुरूपयोग करून मुलासाठी आर्थिक लाभ पदरात पाडून घेतला. मग यावरून आजच्या अध्यक्षांवरील जे आरोप आहेत त्यांच्याबाबत काय सिद्ध होणार आहे? सध्याचे जे साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष आहेत साकेत प्रकाशनाचे श्री. बाबा भांड यांच्यावर न्यायालयात खटला चालू आहे. त्या खटल्यावर याचा काय परिणाम होणार?
तर्कतीर्थांना आणि त्यांचा गैरव्यवहार न छापणार्या संपादकांना चार लाथा झाडून सध्याच्या अध्यक्षांची नैतिक बाजू कशी काय बळकट होणार आहे? हा कुतर्क नेमाडे काय म्हणून काढत आहेत?
नेमाडे यांनी आपल्या शेरेबाज भाषणात अजून एक मुद्दा मांडला. तो म्हणजे इतिहास नीट लिहीलाच गेला नाही. तो लिहायला पाहिजे. नेमाडे यांच्या सलग पाच कादंबर्या प्रकाशीत झाल्यावर तब्बल तीस वर्षांचा कालावधी गेल्यावर सहावी कादंबरी ‘हिंदू’ प्रकाशीत झाली. मग या मोठ्या कालखंडात नेमाडे यांनीच हा इतिहास का नाही लिहीला? त्यांचे एकही महत्त्वाचे पुस्तक या काळात प्रकाशीत झाले नाही. जो काही खरा इतिहास नेमाडे यांना अपेक्षीत आहे तो त्यांना लिहीण्यासाठी कुणी अडवले होते?
आपल्या पदाचा फायदा घेतला म्हणून तर्कतीर्थांवर टीकेची झोड उठविणारे नेमाडे, महाराष्ट्र सोडून सिमला येथे राष्ट्रपती भवनात कुणाच्या शिफारशींवरून जावून बसतात? गेली कित्येक वर्षे नेमाडे तिथे नेमके कोणते सरकारी काम करत आहेत? नेमाडे यांच्या सिमला वास्तव्यामागे नेमकी कोणती ‘प्रतिभा’लपलेली आहे?
पद्मश्री पुरस्कार नेमाडेंना राष्ट्रपतींच्या हस्ते प्राप्त झाला. या पुरस्काराची शिफारस महाराष्ट्रातून नव्हे तर हिमाचल प्रदेशातून करण्यात आली होती. नेमाडेंचे असे नेमके कोणते दिव्य काम सिमल्याच्या लोकांना महत्त्वाचे वाटले? नेमाडे यांनी हिंदू या कादंबरीच्या पुढच्या लेखनाचे काम तिथे बसून केले असे म्हणतात. मग या कामासाठी त्यांची शिफारस अमराठी सिमलावासीयांनी केली का? मराठी लेखकाला लेखन वाचन चिंतनाला वेळ मिळावा म्हणून सिमला सरकारकडे खास योजना आहेत का? तसे काही असेल तर नेमाडेंनी स्पष्ट सांगावे. बर्याच मराठी लेखकांना या योजनेचा फायदा घेता येईल.
साहित्य संमेलनांपासून नेमाडे दूर राहिले. इतकेच नाही तर त्यांनी यावर कडाडून टिका केली. साहित्यातील गटबाजीवर टिका केली. साहित्य महामंडळ हाही नेमाडेंचा टीकेचा विषय. मग असे असताना साहित्य अकादमीसारखी सरकारी संस्था, तिथे काम करण्याचे, तिचे अध्यक्षपद स्विकारणाचा निर्णय नेमाडेंनी का घेतला? बरं अपवाद म्हणून एकदा घेतला असे नाही. नियम मोडून नेमाडे साहित्य अकादमीचे दुसर्यांदा अध्यक्ष झाले. बरं या अकादमीवर परत साहित्य महामंडळावरच काम करणारे लोक आहेत. हे नेमाडेंना कसे काय सहन होते?
स्वत:च्या लिखाणाबाबतही नेमाडे खोटे बोलले. ते म्हणाले त्यांची कादंबरी कित्येक वर्षे पडून होती. मग प्रकाशकाच्या नजरेस आली आणि मग ती प्रकाशीत झाली. किमान नेमाडेंच्या बाबतीत असे आहे की त्यांच्या कादंबर्याच कशाला, ते जेंव्हा काहीच महत्त्वाचे लिहीत नव्हते त्या 30 वर्षांच्या मोठ्या कालावधीत त्यांचे स्फुट लेख गोळा करून त्याचे पुस्तक करण्यात आले (टिकास्वयंवर). नेमाडेंचा काही भरवसा नाही. पुढे काही लिहीतील की नाही. हिंदूची घोषणा करून इतके वर्षे झाले पण ती काही येतच नाही. म्हणून या पुस्तकाला सहित्य अकादमीचा पुरस्कारही देण्यात आला. त्यांची भाषणं, त्यांच्या मुलाखती गोळा करून त्यांचीही पुस्तकं करण्यात आली. नेमाडेंचा शब्दही वाया जावू दिला जात नाही. आणि नेमाडे मात्र म्हणतात की त्यांची कादंबरी पडून होती. हे कसे शक्य आहे? त्यांच्या मनात पडून असेल कदाचित. मराठीत ग्रेस, जी.ए.कुलकर्णी आणि भालचंद्र नेमाडे हे तीन साहित्यीक असे आहेत की त्यांच्यावर प्रचंड दंतकथा तयार झाल्या आहेत. हे किस्से गोळा केले तर त्याचेच मोठे मोठे खंड होतील. तेंव्हा नेमाडे स्वत:च्या लिखाणाबाबत बोलले ते नक्कीच खोटे आहे.
इंग्रजीचे प्राध्यापक असलेले नेमाडे शिक्षक म्हणून कधीही विद्यार्थीप्रिय नव्हते. नेमाडे यांचे बोलणे अतिशय सदोष आहे. सलग सुत्रबद्ध भाषण न करता केवळ शेरेबाजी करणे हे आता त्यांच्या वयाला, त्यांच्या स्थानाला, त्यांच्या विद्वत्तेला शोभत नाही. हिंदूच्या आकाराच्या अजून किमान तीन कादंबर्या लिहून तयार आहेत असं नेमाडे हिंदू आली तेंव्हा म्हणाले होते. त्यांनी आता त्या मजकुरावर अंतिम हात फिरवून हा मजकूर प्रकाशकाच्या स्वाधीन करावा. जेणे करून त्यांच्या हातून तो वाचकांच्या लवकरच हाती पडेल. हे काम नेमाडेंनी आधी करावे. नाहीतरी नेमाडे भाषणबाजीवर टीका करतच आले आहेत. तेंव्हा त्यांनीच आता भाषणं बंद करावीत.
नैतिकता सांगणार्या नेमाडेंनी ‘समता परिषदेच्या’ व्यासपीठावर मिळालेले सगळे सन्मानही छगन भुजबळ यांच्या भ्रष्टाचार प्रकरणी परत करावेत. नेमाडेंना घातलेली फुल्यांची पगडी आणि भेट मिळालेला पुतळा समता परिषदेच्या भ्रष्ट पैशांनी बाटला आहे असे समजून भूजबळांच्या नाशिकच्या अलिशान बंगल्यावर परत पाठवावा. नसता नेमाडेंना कुतर्कतीर्थ भालचंद्रशास्त्री नेमाडे याच नावाने ओळखावे लागेल.
श्रीकांत अनंत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575.