Monday, April 11, 2016

अपंग सवर्णाने केला ‘बुद्ध आणि त्याचा धम्म’चा ओविबद्ध अनुवाद




उरूस, दै. पुण्यनगरी, 11 एप्रिल 2016

आषाढाच्या महिन्यात पंढरपुरच्या दिंडीचे वारे साऱ्या महाराष्ट्रात वाहू लागतात. तसे एप्रिल महिना आला की बाबासाहेबांच्या जयंतीमुळे निळे झेंडे सर्वत्र मोठ्या प्रमाणात झळकायला लागतात आणि वातावरण बदलून जाते. या वर्षी ही जयंती विशेष आहे. बाबासाहेबांच्या जन्माला 125 वर्षे पूर्ण होत आहेत. म्हणजे 14 एप्रिल ची जयंती शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंती आहे. दुसरी एक महत्त्वाची बाब या वर्षी घडणार आहे. 6 डिसेंबर ही बाबासाहेबांची 60 वी पूण्यतिथी आहे. एखाद्या लेखकाचे साहित्य स्वामित्वअधिकार (कॉपिराईट) कायद्यातून केंव्हा मु्क्त  होते? तर त्या लेखकाच्या मृत्यूच्या 60 वर्षानंतर जो जानेवारी महिना येईल तेंव्हा पासून कुणालाही छापण्यास मुक्त पणे उपलब्ध होते.
म्हणजेच बाबासाहेबांचे सर्व साहित्य जानेवारी 2017 पासून कुणीही छापू शकेल. आता यात विशेष काय असे कुणाला वाटेल. पण शासकीय पातळीवर जी हेळसांड बाबासाहेबांच्या साहित्याबाबत झाली ती यापुढे होणार नाही. उदा. ‘मूकनायक’ आणि ‘बहिष्कृत भारत’ या वृत्तपत्रांचे सर्व अंक शासनाने पुनर्मुद्रित स्वरूपात 1990 ला छापले. मोठ्या अकारातील 448 पानांचा पक्क्या  बांधणीतला हा मजकूर तेंव्हा 75 रूपयाला उपलब्ध करून दिला. आज हे पुस्तक उपलब्ध नाही. कारण काय तर त्याचा खर्च परवडत नाही. मग किंमत का नाही वाढवायची? तर आपले समाजवादी लोककल्याणकारी धोरण. सामान्य लोकांच्या खिशाला परवडायला पाहिजे. म्हणून उपाय काय तर छापायचेच नाही. 

आंबेडकरांची सर्व भाषणे, लेखन, पत्रव्यवहार, छायाचित्रे यांचे 21 खंड महाराष्ट्र शासनाने छापले. आज हे खंड कुठल्याही शासकीय ग्रंथागारात उपलब्ध नाहीत. म्हणजे लोकांना स्वस्त देण्याच्या नावाखाली त्याचा किमान खर्चही निघू नये अशी व्यवस्था करायची, ढिसाळ व्यवस्थापन ठेवायचे, अधिकार आपल्या अधिपत्यात दाबून ठेवायचे आणि करायचं काहीच नाही. अशी परिस्थिती आहे. 

आता जेंव्हा जानेवारी 2017 ला हे अधिकार खुले होतील तेंव्हा कुठलीही संस्था हे छापू शकेल. आणि त्यामुळे सर्वसामान्य जनतेला ते उपलब्ध होईल. त्यावर चर्चा होऊ शकेल.

याच्या उलट एक अतिशय सामान्य माणूस कुठलीही शासकीय मदत नसताना, स्वत:च्या खिशात पैसे नसताना, दोन्ही पायाने अपंग असताना जिद्दीने बाबासाहेबांवर पाचशे पानाचे पुस्तक लिहीतो हे किती विलक्षण आहे.  

बाबासाहेब फक्त  दलितांचे असा एक समज पसरलेला आहे. अगदी महारेत्तर इतर दलितही त्यांना फारसे मानत नाहीत किंवा ते बुद्ध धम्म स्विकारायला तयार नसतात असे आपल्याला वाटते. अशा वातावरणात मराठा समाजातील एक अपंग  माणूस बाबासाहेबांच्या विचारांनी भारून जातो. ज्याचे लौकिक अर्थाने फारसे शिक्षण झाले नाही. कित्येक दिवस खपून बाबासाहेबांच्या पुस्तकाचा अभ्यास करतो.  बाबासाहेबांच्या ‘भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म’ या पुस्तकाचा नांदेड जिल्ह्यातील उमरी तालुक्यातील बोरजुन्नी येथील माधवराव डोईफोडे या अपंग व्यक्तीने  ओवीबद्ध मराठी अनुवाद केला आहे. जशी भागवताची पोथी गावोगावात वाचली जाते. तसे माधवराव डोईफोडे यांना असे वाटले की लोकांना वाचून दाखवायचे तर त्याची भाषा लयबद्ध जी की पोथीचे असते करायला पाहिजे. मग त्यांनी आपले काम सुरू केले. आणि पाच वर्षांच्या मेहनतीने 6 हजार ओवीमध्ये ‘धम्मनीती’ या नावाने पोथी लिहून काढली. या पोथीची आठ प्रकरणे असून त्यात 42 निरूपणे आलेली आहेत. 

त्यांची भाषा अतिशय साधी सोपी आणि सरळ आहे. सामान्य जनतेला समजावी अशी आहे. सातव्या निरूपणातील या ओव्या पहा

भीमलिखीत पुस्तकातील विचार । तंतोतंत शब्दात काव्यार्थ सार ।
यथार्थ शैली श्रोत्यांसमोर मांडणार । काम जरा कठीण होय ।।
हा ग्रंथ तयार होताना । विचार करितो नाना ।
शब्दसंदर्भ बदलो देईना । याची ग्वाही देतो ।।

किती साधी भूमिका आहे. डोईफोडे यांनी अतिशय गहन अशा तत्त्व चर्चेलाही सोप्या भाषेत मांडले आहे. वाचताना वाटते की हे तर सगळे इतके सोपे आहे. पण प्रत्यक्षात या विषयावर शेकडो वर्षे जगभरच्या विद्वानांनी काथ्याकुट केलेला आहे. मोक्षाच्या मार्गात धर्मसंस्थापक, प्रेषित स्वत:चे महत्त्व अबाधित ठेवतात. आणि आपल्या शिष्यांना, अनुयायांना, धर्मबांधवांना त्याप्रमाणे आवाहन करतात. पण भगवान बुद्ध मात्र तसे काहीच करत नाहीत. हे विवरण करणारी ही ओवी किती सोपी आहे

येशु ख्रिस्त अणि महंमद । धर्मशासनात विशेष प्रसिद्ध ।
मोक्षमार्गात आपुले महत्त्व । राखोनिया ठेवियेले ।।
भगवात तथागत । आपुले बुद्ध धम्मात ।
विशेष आपुले स्थान प्राप्त । नाही ठेवियेले तयांनी ।।

आपला वारस कोण असा प्रश्र्न भगवान बुद्धाला विचारला गेला. तेंव्हा 

धम्म हाची धम्माचा । उत्तराधिकारी होय तयाचा ।
असे प्रत्येकवेळी बुद्धाचा । शब्द प्रखर असे ।।
धम्मात ऐसे सामर्थ्य असावे । त्याने ‘स्व’ सामर्थ्यानेच जगावे ।
कुणी वारसाच्या सत्तेने नोव्हे । ऐसे बुद्ध बोलत ।।

सामान्य लोकांना समजावी अशी जून्या पोथ्यांची एक शैली आहे. ओवीची रचना त्या पद्धतीने केलेली असते. त्यात फार वाक्य- चमत्कृती केल्या जात नाहीत. अर्थ चटकन समजावा असा असतो. आजही सामान्य लोक फार काही वाचतील अशी शक्यता  नाही. पण समुहानं किर्तन ऐकायची आपल्याला सवय आहे. याचा विचार करून माधवराव डोईफोडे यांनी आपल्या अपंगत्वावर मात करून ‘भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म’ वर सहा हजार ओव्यांचा ‘धम्मनीती’ हा 456 पानांचा ग्रंथ रचला. 

माधवराव डोईफोडे  (मो.95380771) या दुसऱ्याच्या आधाराने चालणाऱ्या माणसाने त्याच्या विचारांचा आधार घेत "बुद्धनिती" समजून घ्यावी असे काम सामान्य माणसांसाठी करून ठेवले आहे.  

बाबासाहेबांचे साहित्य जानेवारी पासुन सर्वांसाठी खुले होत आहे. बाबासाहेबांनी भगवान बुद्धांची शिकवण समजून सांगितली. त्यांचा विचारांचा गाभा माधवराव सारख्यांनी समजून घेउन अजून सोप्या भाषेत मांडला. 

 श्रीकांत अनंत उमरीकर, जनशक्ती  वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575.

No comments:

Post a Comment