Monday, March 14, 2016

कृष्ण धवल गाण्यातला रंगीत मनोज कुमार



उरूस, दै. पुण्यनगरी, 14 मार्च 2016

मनोज कुमारला दादासाहेब फाळके पुरस्कार घोषित झाला आणि सगळ्यांना परत आठवण झाली ती त्याच्या ‘मेरे देश की धरती’ सारख्या गाण्यांची. महेंद्रकपुरच्या आवाजातली त्याची देशभक्तीची  गाणी किंवा प्रेमाची विरहाची मुकेशच्या आवाजातील गाणी आठवत राहतात. पण याच मनोजकुमारची सुरवातीच्या जवळपास 8 वर्षांतील कृष्ण धवल (ब्लॅक अँड व्हाईट) चित्रपटातील गोड गाणी फारशी कुणाला आठवत नाहीत. जेमतेम वीस पंचेवीस चित्रपट आहेत असे पण त्यातील काही मोजकी गाणी फार श्रवणीय आहेत. 

मनोजकुमारचा जन्म (24 जुलै 1937) पाकिस्तानमधील अबोटाबादचा. हरिकृष्ण गिरी गोस्वामी नाव असलेल्या या देखण्या तरूणाला दिलीपकुमारच्या चित्रपटातील (शबनम 1949) नायकाचे मनोजकुमार हे नाव अशोक कुमार आणि कामिनी कौशल यांनी बहाल केले. हिंदी चित्रपटातील त्याचे करिअर याच नावाने बहरले.

मुळात मनोजकुमारच्या वाट्याला गाणीच फारशी आली नाहीत. त्याचा पहिलाच चित्रपट फॅशन (1959).  हेमंत कुमारचे त्याला संगीत आहे. यात जेमतेक एकच गाणे हेमंतकुमारच्या आवाजात मनोजकुमारच्या तोंडी आहे.

दुसरा चित्रपट ज्याच्या गाण्याचा आवर्जून उल्लेख करावा तो म्हणजे सुहाग सिंदूर (1960). यातही परत माला सिन्हाच त्याची नायिका आहे. तलत मेहमुदची हळवी थरथरत्या आवाजातील गाणी ज्या नायकांच्या वाट्याला आली त्यात मनोजकुमारही आहे. मुकेशच्या आवाजात ‘कोई जब तूम्हारा हृदय तोड दे’ गाणारा मनोजकुमार तलतच्या नाजूक आवाजात ‘बागों मे फुलते है फुल कसम तेरी आखों की खातिर’ म्हणतो तेंव्हा गंमत वाटते. लता मंगेशकर आणि तलतच्या आवाजातील हे गाणे राजेंद्रकृष्ण यांनी लिहीले आहे. नाजूक गाण्याला चित्रगुप्त सारखा संगीतकारच न्याय देउ शकतो. 

कांच की गुडिया (1961) हा चित्रपट एस.डि.बर्मन यांचा सहाय्यक सुहरिद कार याने संगीतबद्ध केलेला चित्रपट. त्याला मुळातच अतिशय कमी संधी मिळाली संगीत देण्याची. मनोज कुमार आणि सईदाखानवर चित्रित 
साथ हो तूम और रात जवां 
निंद किसे अब चैन कहां 
हे गाणे मुकेश आणि आशा भोसलेच्या आवाजात आहे. द्वंद गीतात मुकेशचा आवाज त्या प्रेमगीतातील हळूवार भावनांना न्याय देत नाही हे सारखे जाणवत राहते. त्या तूलनेने त्याची एकट्याची गाणी चांगली वाटतात.

बाबुल हाही असाच दुर्लक्षीत राहिलेला संगीतकार. रेश्मी रूमाल (1961) या मनोजकुमार शकिलाच्या चित्रपटाला त्याचे संगीत आहे. मन्ना डे आणि आशा भोसले ने गायलेले 
जुल्फो की घटा लेकर 
सावन की परी आयी 
हे निसर्ग वर्णनातून प्रेम भावना व्य्नत करणारे गीत फार चांगले आहे. मदनमोहनशी ज्याचे सूर फार चांगले जूळले त्या राजा मेहंदी अली खान ने हे गाणे लिहीले आहे. याच चित्रपटात मुकेशचे एक अतिशय चांगले गाणे आहे. गर्दीश मे हो तारे ना घबराना प्यारे हे गाणे मुकेशच्या आवाजाला शोभूनही दिसते. शिवाय एकल गाणे असल्याने काही प्रश्र्नच नाही. राजकपुर साठी मुकेशनी जी गाणी गायली त्या पठडीतले हे गाणे आहे. याच चित्रपटात तलतच्या आवाजातही एक गोड गाणे आहे, 
जब छाये कभी सावन घटा 
रो रो के न करना याद मुझे 
ए जाने तमन्ना गम तेरा 
कर दे ना कही बरबाद मुझे

मनोजकुमारचा संगीतच्या दृष्टीने आणि इतरही बाबतीत गाजलेला खरा पहिला चित्रपट म्हणजे ‘हरियाली और रास्ता’ (1962). यातली शंकर जयकिशनची गाणी तुफान गाजली. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरही यश मिळवले. मुकेश लताच्या आवाजातील ये हरियाली और ये रास्ता .हे शैलेंद्रचे गाणे, याच जोडीचे हसरतचे गाणे 
इब्तेदा ए इश्क मे हम सारी रात जागे 
अल्ला जाने क्या  होगा आगे 
एकट्या मुकेशचे दर्दभरे गाणे 
तेरी याद दिल से भूलाने चला हू
के खुद आपनी हस्ती मिटाने चला हू  
आणि लता मुकेशचेच 
लाखों तारे आसमान मे 
एक मगर धुंडे ना मिला 
देख के दुनिया की दिवाली 
दिल मेरा चुपचाप जला 
‘हरियाली और रास्ता’ नंतर इतकी गाणी परत कुठल्याच चित्रपटात मनोजकुमारच्या वाट्याला आली नाहीत आणि त्यांना इतकी लोकप्रियताही भेटली नाही. अगदी त्याने स्वत: काढलेल्या चित्रपटांतूनही.

डॉ. विद्या हा एस.डि. बर्मन यांचा 1962 चा चित्रपट. मजरूह सारखा ताकदीचा कवी, रफी आणि भांडण मिटवून परत एस.डी.कडे गायला लागलेली लता यांचे सुंदर गाणे मै फिर मिलूंगी इसी गुलिस्तां मे मनोज कुमार व वैजयंती मालावर चित्रित आहे.  मनोजकुमार आणि मुकेश यांचे काहीतरी अंतरिक नातंच असावं. त्यामुळे मुकेशच्या आवाजातील एखादे गाणे असल्याशिवाय त्याला करमतच नाही. एस.डी.कडे कधीच फारसं न गाणारा मुकेशही या चित्रपटात मनोजकुमार साठी गायला आहे. ए दिले आवारा चल हे गाणे याच चित्रपटात आहे.

‘पिया मिलन की आस’ हा याच काळात आलेला चित्रपट. एस.एन.त्रिपाठी या धार्मिक चित्रपटांचा ठप्पा पडलेल्या संगीतकाराचा चित्रपट. भरत व्यासचे गोड शब्द, रफी-लताचा आवाज असूनही यातले एक गोड गाणे दुर्लक्षीत राहिले
चांदी का गोल गोल चंदा
की डाल रहा दुनिया पे जादू का फंदा
की दूध मे भिगोयी चांदनी
बुलाये तूझे तेरी कामिनी आजा रे आजा रे
इतकी सुंदर लय असलेले शब्द भरत व्यास लिहायचे की त्याला संगीत देणं फारसं अवघड नसायचं असं वसंत देसाई यांनी नोंदवून ठेवलं आहे. 

नकली नवाब (1962) मध्ये बाबूलने एक गाणे मनोजकुमारच्या तोंडी रफीच्या आवाजात दिले आहे. तूम पुछते हो इश्क भला है की नही है हे गाणे तेंव्हा दुर्लक्षीत राहिलं. पण ही चाल चोरायचा मोह शंकर जयकिशन सारख्या मोठ्या संगीतकारालाही आवरला नाही. पुढे आरजू मध्ये त्याने ही चाल उचलून रफीच्याच आवाजात गाणे दिले, झलके तेरी आंखो से शराब और ज्यादा याच चित्रपटात परत तलतच्या आवाजात लतासोबत मस्त आंखो के है पैमाने दो हे कैफ इरफानीचे गाणे बाबुलने दिले आहे.

‘घर बसा के देखो’ हा 1963 ला आलेला चित्रगुप्त-राजेंद्रकृष्ण जोडीचा चित्रपट. राजश्री सोबत मनोजकुमारची जोडी या चित्रपटात आहे. तूमने हसी ही हसी मे क्यू  दिल चुराया जबाब दो हे गाणे या जोडीवर महेंद्र- लताच्या आवाजात आहे. मनोजकुमार राजश्री हीच जोडी पुढे रवीने संगीत दिलेल्या गृहस्थीमध्ये सुद्धा आहे. शास्त्रीय संगीतावर आधारलेले शकिल चे गीत ‘पायल खुल खुल जाये मोरी’ चांगलेच श्रवणीय आहे. रफी-आशा दोघांनाही शास्त्रीय संगीताची चांगली जाण असल्याने यातील बारीक जागा त्यांनी रंगवल्या आहेत. मनोजकुमार आणि राजश्रीने या गाण्याला पडद्यावर बऱ्यापैकी न्याय दिलेला जाणवतो. 

मनोजकुमार नायक असलेल्या या  ‘अपने हुये पराये’ (1964) चित्रपटाचे संगीत शंकर जयकिशनचे आहे. शशिकला जी की पुढे खाष्ट सासू- खलनायिका म्हणून गाजली तिच्यावरचे एक गाणे या चित्रपटात आहे. सुबीर सेनची मुळात फारच थोडी गाणी हिंदी चित्रपटांत आहेत.  त्याचे ‘गगन के चंदा न पुछ मुझको, कहां हू मै दिल मेरा कहां है’ हे लता सोबतचे गाणे चांगलेच जमले आहे. (शशिकला चांगली नृत्यांगना होती. याच शंकर जयकिशन च्या  पट्टरानी चित्रपटात शशिकला वैजयंतीमला सोबत नाचली आहे )
  
‘हरियाली और रास्ता’ नंतर मनोजकुमारचा जास्त गाजलेला चित्रपट म्हणजे ‘वो कौन थी’ (1964). यातली गाजलेली गाणी मात्र त्याच्यावर चित्रित नाहीत. यात महेंद्रकपुर लताच्या आवाजात छोडकर तेरे प्यार का दामन हे गाणे मनोजकुमार हेलनवर आहे. यातच एक तेंव्हाच्या लोकप्रिय शैलितले पार्टीतले गाणे टिकी रिकी टिकी रिकी टाकूरी रफी-आशाच्या आवाजात आहे.

हैदराबादचा संगीतकार इक्बाल कुरैशी याने मनोजकुमारच्या तोंडी बनारसी ठग (1963) मध्ये एक गाणे दिले आहे ‘आज मौसम की मस्ती मे गाये चमन’. हे गाणे लता-रफीच्या आवाजात आहे. ही आपलीच चाल इक़्बाल कुरैशीने पुढे आपल्याच चा चा चा (1964) साठी रफी-आशाच्या आवाजासाठी चोरली. हे गाणं म्हणजे मक़्दूम मोईनोद्दीन प्रसिद्ध कविता होती, इक चमेली के मंडुवे तले.

फुलों की सेज (1964) हा आदी नारायण राव सारख्या दक्षिणेतल्या संगीतकाराने संगीत दिलेला चित्रपट. आ तू आ जरा दिल मे आ हे लता मुकेशच्या आवाजात हसरत जयपुरीचे एक सुंदर गाणे मनोजकुमार वैजयंती माला वर चित्रित आहे. मुकेशचा आवाज योग्य न्याय देत नाही हे परत जाणवते.

मनोजकुमारची ‘भारतकुमार’ ही प्रतिमा तयार झाली ती उपकार मधे नाही. तर तो चित्रपट होता 1964 चा शहिद. भगतसिंग वरच्या या चित्रपटात प्रेम धवनने संगीतबद्ध केलेले व स्वत: लिहीलेले रफीच्या आवाजातील गाणे 
ए वतन ए वतन तुझको मेरी कसम
तेरी राहो मे जा तक लुटा देगे हम
हे अतिशय गाजले. यातील इतरही गाणी रंग दे बसंती चोला, सरफरोशी कि तमन्ना चांगलीच लोकप्रिय झाली होती. 

1965 चा रोशनच्या संगीतातील ‘बेदाग’ (मैने जाने वफा तुमसे मुहोब्बत की है-रफी/सुमन, आंखो आखों मे न जाने क्या इशारा हो गया-रफी/आशा) आणि सलिल चौधरीचा ‘पुनम की रात’(तुम कहा ले चले हो सजन अलबेले-मुकेश/लता, दिल  तडपे तडपाये-रफी, सपनों मे मेरे कोई आये जाये झलकी दिखाये-लता/मुकेश)  हे मनोजकुमारचे शेवटचे कृष्ण धवल चित्रपट. त्यानंतर रंगीत चित्रपटांचे युग सुरू झाले.

ही कृष्ण धवल गाणी त्यातील गोडव्यासाठी आजही महत्त्वाची वाटतात. बाकी रंगीत गाण्यांबाबत काय बोलणार. सगळाच भडकपणा सुरू झाला. नंतर मनोजकुमारचे प्रेम, देशप्रेम सगळेच कृत्रिम वाटत गेले. ही कृत्रिमता काही काळ लोकांना आवडली. पण ती काही अभिजात म्हणता येणार नाही.
फाळके पुरस्कार मिळाल्याच्या निमित्ताने मनोजकुमारच्या या जुन्या दुर्लक्षित गाण्यांचे स्मरण.

टीप :
मनोज कुमार ची रंगीत गाणी कोणती अशी विचारणा या लेख नंतर फार जणांनी केली.... लोकप्रिय गाणी याप्रमाणे आहेत
१.  चांद सी मेहबूबा हो मेरी कब ऐसा मैने सोचा था - मुकेश - हिमालय कि गोद मे : (1965)
२\ मै तो एक खाव्ब हू - मुकेश - हिमालय कि गोद मे : (1965)
३. जाणे चमन शोला बदन - रफी/शारदा - गुमनाम (१९६५)
४\ राहा गर्दीशो मे हर दम - रफी - दो बदन - (१९६६)
५. होठो पे हसी आंखो मे नाश - रफी/आशा- सावन की घट (१९६६)
६. झुल्फो को हटा दो चेहरे से - रफी - सावन की घट (१९६६)
७. मेरी जान तुमपे सदके- महेंद्र- सावन की घट (१९६६)
८\ साजन साजन पुकारू मै गलियो मे - रफी- साजन (१९६६)
९. मेहबूब मेरे - मुकेश/लता- पत्थर के सनम (१९६७)
१०. पत्थर के सनम - रफी - पत्थर के सनम (१९६७)
११. तौबा ये मतवाली चाल- मुकेश - पत्थर के सनम (१९६७)
१२. तुम बिन जीवन कैसे बीटा - मुकेश - अनिता (१९६७)
१३.  मेरे देश की धरती - महेंद्र - उपकार (१९६७)
१४. आयी झुमती बसंत - शमशाद, आशा, मन्ना, महेंद्र-  उपकार (१९६७)
१५. दिवानो से मत पुछो- मुकेश - उपकार (१९६७)
१६. है प्रीत जहा की रीत सदा - महेंद्र - पूरब और पश्चिम (१९७१)
१७. कोई जब तुम्हारा हृदय तोड दे- मुकेश - पूरब और पश्चिम (१९७१)
१८. दुल्हन चली -  महेंद्र- पूरब और पश्चिम (१९७१)
१९. पुरवा सुहानी आयी रे - लता/महेंद्र/ मन्ना - पूरब और पश्चिम (१९७१)
२०. बस येही अपराध मै हर बार करता हू - मुकेश - पेहचान (१९७०)
२१. आया ना हमको प्यार जाताना - मुकेश/सुमन- पेहचान (१९७०)
२२. एक प्यार का नग्मा है- लता/मुकेश - शोर (१९७२)
२३. पानी रे पानी तेरा रंग कैसा - लता मुकेश- शोर (१९७२)
२४. जीवन चालने का नाम - महेंद्र/मन्ना -  शोर (१९७२)
२५. मैना भूलुंगा - मुकेश/लता - रोटी कपडा और मकान (१९७४)
२६. मैहेंगाई मार गायी- चंचल/लता/मुकेश- रोटी कपडा और मकान (१९७४)
२७. चल सन्यासी मंदीर मे- लता/मुकेश - सन्यासी (१९७५)
२८. सून बाल ब्रह्मचारी - लता/मुकेश - सन्यासी (१९७५)
२९. मुझे दर्द लागता है- लता/मुकेश- दस नंबरी (१९७६)
३०. ये दुनिया एक नंबरी - मुकेश - दस नंबरी (१९७६)
३१. तेरी जवानी तापता महिना - रफी - अमानत (१९७७)
३२. दूर रेह्कर ना करो बात - रफी - अमानत (१९७७)
३३. जिंदगी की ना तुटे लडी - लता/नितीन मुकेश- क्रांती (१९८१)
३४. अब के बरस - महेंद्र - क्रांती (१९८१)
३५. चना जोर गरम बाबू - नितीन मुकेश/रफी/ लता/ किशोर - क्रांती (१९८१)
३६. दिलवाले दिलवाले - नितीन मुकेश/मन्ना/ लता/महेंद्र/शैलेंद्र सिंग  - क्रांती (१९८१)


        
श्रीकांत अनंत उमरीकर, जनश्नती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575.       
  

1 comment:

  1. कृष्ण धवल सिनेमातील मनोजकुमार मला तरी विसरणे शक्य नाही .त्याच्या तोंडी सुंदर गाणी होती .त्या काळची ती गाणी मनात रुतून बसली आहेत ,संपूर्ण नाही पण ध्रुव पद व एक अंतरा सहज आठवतो .हरियाली और रास्ता- छान गाणी ,नेटकी फोटोग्राफी. अफलातून ! साथ हो तुम और रात जवा -रात्री रेडिओवर लागले कि ----मस्त वाटायचं .या गाण्याचे गायक बहुदा हेमंतकुमार असावेत असे वाटते , खात्री नाही .जुन्या आठवणी जागवल्या बद्दल धन्यवाद .

    ReplyDelete