Monday, March 28, 2016

तुकाराम अभंग चर्चेची 100 वर्षे

उरूस, दै. पुण्यनगरी, 28 मार्च 2016

फाल्गुन कृ. द्वितीया (२५ मार्च) हा दिवस तुकाराम महाराज बीज म्हणजेच तुकाराम महाराजांची पुण्यातिथी समजुन साजरा केला जातो. या दिवशी तुकाराम महाराजांचे वैकुंठगमन झाले असे समजले जाते. गेल्या काही वर्षांपासून संभाजी ब्रिगेड सारख्या जातीय संघटना या दिवशी तुकाराम महाराजांचा ब्राह्मणांनी खुन केला असा प्रचार करताना आढळतात. बोलणाऱ्याचे तोंड कसे धरणार. ठरवून ठरवून जातीय द्वेषच पसरायचा म्हटलं तर त्याला काय उत्तर देणार? खरं तर तुकाराम महाराजांच्या आधी ज्ञानेश्र्वरादी चारही भावंडे आणि एकनाथ महाराज या पाच ब्राह्मण संतांचा मृत्यूही नैसर्गिकरित्या झाला नव्हता हे कोणी लक्षात घेत नाही. संत बहिणाबाई सारखी एक ब्राह्मण स्त्री तुकाराम महाराजांची शिष्या होती हे हीे लक्षात घेतलं जात नाही. बाबासाहेबांनी मनुस्मृती जाळली ती जाळणारा एक ब्राह्मणच होता हेही आपण विसरतो. 

ज्या भांडारकर संस्थेवर हल्ला करून ब्राह्मण-मराठा यांच्यात जातीद्वेष वाढवला गेला त्या भांडारकरांच्या संदर्भात एक मुद्दा आज तुकाराम बीजेच्या निम्मीताने विचारार्थ समोर ठेवतो आहे. 1901 च्या सुमारास सर रामकृष्ण गोपाळ भांडारकर यांच्या नेतृत्वाखाली ‘तुकाराम चर्चा मंडळाची’ स्थापना करण्यात आली. युरोपातील कवी वर्डस्वर्थ, ब्राउनिंग यांच्या नावाने जशा संस्था स्थापन झाल्या तशा मराठीतील कवींच्या बाबतही व्हायला पहिजे असे भांडारकरांना वाटले. त्यांनी पहिला कवी निवडला तो म्हणजे संतश्रेष्ठ तुकाराम. दर शुक्रवारी सर्वांनी एकत्र जमून तुकारामाच्या अभंगाची चर्चा करावी असे स्वरूप या तुकाराम चर्चा मंडळाचे ठरविले गेले. 

या चर्चा मंडळात डॉ. भांडारकर, का.ब.मराठे,ग.स.खरे, शिवरामपंत गोखले, प्रो. वासुदेव बळवंत पटवर्धन,गोविंदराव कानिटकर, पांडुरंग दामोदर गुणे, चिंतामण गंगाधर भानू, रामचंद्र विष्णू माडगांवकर, देवदत्त रामकृष्ण भांडारकर, लियमे, वीरकर, सुकथनकर, केशव सदाशिव केळकर, नाना योगी, ह.वि.पटवर्धन, भां.रा.साठे, कावतकर, वा. भावे ही मंडळी होती. 

1916 पर्यंत या चर्चा मंडळाचे काम चालले. या 16 वर्षांत एकूण 1800 अभंगांची चर्चा करण्यात आली. त्या सगळ्यांची टिपणे प्रो. पटवर्धनांनी लिहून काढली. त्यातील 750 अभंगांच्या  चर्चेचे इतिवृत्त लिहील्या गेले होते. वासुदेव बळवंत पटवर्धन आणि गणेश हरी केळकर यांनी संपादन करून त्या अभंगांचे तेंव्हा पुस्तकही प्रसिद्ध केले होते. तुकाराम महाराजांच्या जन्मास 400 वर्षे पूर्ण झाली त्या निम्मिताने  साहित्य अकादमीने या 750 अभंगांच्या संदर्भातील चर्चा आणि टिपणे यांचे दोन खंड प्रकाशित केले.

खरी शोकांतिका हीच की गेली 100 वर्षे हे सर्व 1800 अभंग, त्यांच्यावरील चर्चा आणि इतर टिपणे आम्ही सुसंगत लावून प्रकाशितही करू शकलो नाही. यातील केवळ 750 अभंगांचे काम जे की आधीच झाले होते तेवढेच फक्त  पुनर्मुद्रित केले आहे. 

एकीकडे संत तुकाराम महाराजांच्या मोठेपणाविषयी गप्पा मारायच्या. तुकाराम महाराजांच्या जातीचा आपल्या सोयीप्रमाणे वापर करायचा. आणि दुसरीकडे त्यांच्या अभंगांच्या तत्त्वचर्चेचा विषय आला की आळीमिळी गुपचिळी. 

पुढे तुकाराम महाराजांच्या अभंगांचा अभ्यास बऱ्याच विद्वानांनी केला. पण हा सगळा अभ्यास सुटा सुटा आहे. वारकरी संप्रदायात प्रस्थान त्रयीतील एक ग्रंथ म्हणून ‘तुकाराम गाथे’चे महत्त्व मोठे आहे. विद्यापीठ पातळीवर तुकाराम महाराजांच्या अभंगांचा अभ्यास करून पीएच.डि. मिळविणाऱ्यांची संख्याही प्रचंड आहे. पण शंभर वर्ष उलटली तरी ‘तुकाराम चर्चा मंडळा’ सारखा सामुहिक संस्थात्मक पातळीवरील अभ्यास मात्र कुठेच झाला नाही. हा प्रयत्न एकमेवाद्वितयच राहिला आहे. 

या चर्चा मंडळाची काम करण्याची पद्धत मोठी सुत्रबद्ध होती. ही सगळी चर्चा आणि टिपणे जी नोंदवून ठेवली आहे त्यातही एक शिस्त आढळते. अभंगाची मुळ संहिता मग त्यातील पाठभेद, त्याचा अर्थ, नंतर त्यावरील वाद, या अभंगात केले गेलेले लक्ष्यप्रयोग, यातील शब्दकळा आणि शेवटी यावरील शेरा अशी ही रचना आहे.

प्रत्येक अभंगाची सविस्तर चर्चा केल्यामुळे केवळ अभ्यासकांनाच नाही तर सामान्य वाचकांनाही बऱ्याच गोष्टींचा उलगडा होतो. जो की इतर ठिकाणी होत नाही. उदा. तुकाराम महाराजांचा हा अभंग घ्या

शोके शोक वाढे । हिमतीचे धरी गाढे ।।1।।
काय केले काय न्हाई । लंडीपण खोटे भाई ।।2।।
करिती होया होय । परी नव्हे कोणी साह्य ।।3।।
तुका म्हणे घडी । साधिलिया एक थोडी ।।4।।

वारकरी सांप्रदायिक याचा अर्थ लावताना असं सांगतात, ‘मनुष्य शोक करीत बसला म्हणजे शोकानेच शोक वाढतो. आणि धैर्य धरले तर धैर्यानेच धैर्य बळकट होते. या मनुष्यदेहात काय करता येणे शक्य नाही. पाप पुण्य  सर्व काही करता येते. पण बाबांनो पाप करता येते म्हणून करावे असे नाही तर ते वाईट असल्यामुळे टाकून द्यावे. मनुष्य कोणतेही कार्य करीत असता, इतर लोक त्याच्या ‘हो ला हो’ लावून अनुमती देतात. पण त्याच्या कार्याला प्रत्यक्ष रीतीने कोणीही साहाय्य करीत नाही. तुकाराम महाराज म्हणतात मनुष्य देहाला एक क्षणभर आयुष्य लाभले तरीही ते महत्त्वाचे आहे कारण क्षणभरच्या आयुष्यतही अनेक पुण्यकृत्ये करता येतात.’ (श्रीतुकाराममहाराज गाथाभाष्य-खंड 1, ह.भ.प.वै. शंकरमहाराज खंदारकर, अभंग क्र.215, पृ. 56) 

खंदारकर महाराजांनी सांगितलेला अर्थ सोपा आणि नेमका आहे यात काही शंकाच नाही. पण "तुकाराम चर्चा मंडळाने" लावलेला अर्थ पहा ‘शोक करावा, दु:ख करावे तितके ते वाढते. कमी होत नाही. म्हणून हिंमत धरून धैर्याने राहतात ते बहाद्दर खरे, गाढे धीराचे खरे. जगात भित्रेपण करून कांही निभावयाचे नाही. होस हो पुष्कळ म्हणणारे भेटतील. परंतु खरी सहाय्य कराण्याची वेळ आली म्हणजे कोणी नाही. त्यावेळी उपयोगी पडेल तो खरा.’ इथपर्यंतचा अर्थ सारखाच आहे. पण पुढच्या ओळीचा अर्थ अतिशय वेगळा लावला आहे. ‘तुकाराम म्हणतात आणीबाणीची वेळ थोडी असते. क्षणभरच असते. तेवढी निभावून नेली पाहिजे. अंगावर आलेली लाट जाईपर्यंत धीर धरिला पाहिजे.’

नुसता अर्थच वेगळा लावला असा नाही तर खाली शब्दांचे अर्थ देतानाही काही स्पष्टीकरणं या चर्चा मंडळाने दिलेली आहेत. 

लंडीपण-मुळचा शब्द लवंडीपणा हा आहे. लवंडी हा मुसलमानी स्त्री-वाचक शब्द आहे. लंडीपण म्हणजे भित्रेपणा. तसेच गाढे या शब्दाचा अर्थ बळवंत असा देण्यात आला आहे.

या अभंगावर शेरा देताना चर्चा मंडळाने असे लिहीले आहे, ‘अभंग व्यवहारिक व तात्त्विक अशा दुहेरी स्वरूपाचा आहे. संसारात जसा मुहूर्त साधावयाचा तसे परमेश्र्वर प्राप्तीची वेळ साधावयाची असते. तेवढी साधली म्हणजे झाले.

शंभर वर्षांपूर्वी बहुतांश ब्राह्मण मंडळी एकत्र येवून तुकाराम महाराजांच्या अभंगांचा अभ्यास करण्यासाठी चर्चा मंडळ स्थापन करतात. त्याची टिपणं सविस्तर नोंदवून ठेवतात. ही घटना महत्त्वाची आहे. 

महाराष्ट्रात  विचारांची परंपरा अतिशय उदारमतवादी अशी राहिलेली आहे. तुकाराम महाराजांची जात कोणती हे कोणी पाहिले नाही. आज काही जातीवादी संघटना आपल्या आपल्या जातीतील संत महात्म्यांच्या जातीचे भांडवल करताना दिसतात त्यांना तुकाराम महाराजांच्या भाषेत सांगावयाचे तर ‘तुका म्हणजे ऐशा नरा । मोजूनी माराव्या पैजरा ।।’ म्हणावे लागेल.  

 श्रीकांत अनंत उमरीकर, जनश्नती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575.

1 comment: