Tuesday, May 12, 2015

बालकवींची आठवण कोणाला आहे का?...














उरूस, दैनिक पुण्य नगरी, रविवार 10 मे 2015 

पाच मे 1918 ची गोष्ट आहे. अठ्ठावीस वर्षे वयाचा एक तरूण आपल्या धुंदीत चालला होता. जवळची वाट पकडायची म्हणून तो रेल्वेचे रूळ ओलांडून जाणार्‍या छोट्या पायवाटेने निघाला. दोन रूळ एकत्र येवून पुढे जाणार्‍या ठिकाणी तो उभा होता. तेवढ्यात त्याला मालगाडीची शिट्टी एैकू आली. ही गाडी दुसर्‍या रूळावरून जाईन असा अंदाज होता पण ती नेमकी तो चालला होता त्याच रूळावर आली. घाईघाईत रूळ ओलांडताना त्याची चप्पल तारेत आडकली. ती सोडवण्यासाठी तो खाली झुकला. तोपर्यंत मालगाडी त्याच्या देहाचे तुकडे तुकडे करून निघून गेली. 

एरव्ही ही घटना पोलीसांच्या नोंदीत अपघात म्हणून जमा झाली असती. पण हा तरूण म्हणजे कोणी सामान्य इसम नव्हता. मराठी कवितेत ‘बालकवी’ म्हणून अजरामर ठरलेल्या त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांची ही गोष्ट आहे. जळगांव जिल्ह्यातील भादली या रेल्वेस्टेशनवर हा अपघात घडला. पाच मे 2015 ही बालकवींची 97 वी पुण्यतिथी. किती जणांना आठवण आहे या कवीची?

जागतिक हास्य दिवस मे महिन्याच्या पहिल्या रविवारी साजरा केला जातो. या वर्षी हा दिवस 3 मे रोजी साजरा झाला. जगभरात विविध उपक्रम हाती घेतले गेले. भारतात पण कार्यक्रम झाले. महाराष्ट्रातही उत्साही लोकांनी हा दिवस साजरा केला. पण 5 मे रोजी ज्यांची पुण्यतिथी होती त्या बालकवींनी 

आनंदी आनंद गडे
इकडे तिकडे चोहिकडे
वरती खाली मोद भरे
वायूसंगे मोद फिरे
नभांत भरला
दिशांत फिरला
जगांत उरला
मोद विहरतो चोहिकडे
आनंदी आनंद गडे !

अशी सुंदर आनंदावरची कविता लिहीली त्यांची आठवण हा जागतिक हास्य दिवस साजरा करणार्‍यांना झाली नाही. आनंदाचे तत्त्वज्ञान अतिशय साध्या सोप्या भाषेत लिहीणारा हा कवी ज्यानं आनंदाची केलेली व्याख्या किती साधी सोपी आणि मार्मिक आहे

स्वार्थाच्या बाजारात
किती पामरे रडतात
त्यांना मोद कसा मिळतो
सोडुनी तो स्वार्था जातो
द्वेष संपला  
मत्सर गेला  
आता उरला
इकडे तिकडे चोहिकडे
आनंदी आनंद गडे

बालकवींचा जन्म 13 ऑगस्ट 1890 रोजी धरणगाव (जि. जळगांव) इथे झाला. केवळ 28 वर्षांचे आयुष्य लाभलेल्या या कवीने अतिशय मोजक्या पण नितांत सुंदर आणि नितळ भावना व्यक्त करणार्‍या कविता लिहून मराठी वाचकांवर मोठे गारूड करून ठेवले आहे.

श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे, 
क्षणात येती सरसर शिरवे क्षणात फिरूनी उन पडे 

किंवा 

हिरवे हिरवे गार गालीचे 
हरित तृणाच्या मखमालीचे 
त्या सुंदर मखमालीवरती 
फुलराणीही खेळत होती

या सारखी गोड रचना असो. आपल्या साध्या सुंदर शब्दकळेने बालकवी वाचकाच्या मनात घर करून राहतात. अशा सुंदर साध्या गोड कविता लिहीणार्‍याला आपण विसरून जातो. त्यांच्या जयंत्या पुण्यतिथ्या आमच्या लक्षातही राहत नाहीत. अजून तीन वर्षांनी त्यांची स्मृती शताब्दि येते आहे. गावोगावच्या साहित्य संस्था कित्येक उपक्रम सतत करत असतात. तेंव्हा ज्यांची जन्मशताब्दि होवून गेली आहे अशा मराठी कविंवर काहीतरी कार्यक्रम करावे असे का बरे कोणाच्या डोक्यात येत नाही? एक साहित्य संमेलन केवळ शताब्दि साहित्य संमेलन म्हणून नाही का साजरे करता येणार? केशवसुत, बालकवी पासून ते कुसूमाग्रज, मर्ढेकर, अनिल, इंदिरा संत, ना.घ.देशपांडे, बा.भ.बोरकर, वा.रा.कांत, ग.ल.ठोकळ, ग.ह.पाटील अशी कितीतरी नावे आहेत. शंभरी पार केल्यावरही टिकून राहणार्‍यांची आठवण न काढणे हा आपलाच करंटेपणा आहे.

या जून्या कविंची आठवण का काढायची? कोणाला वाटेल कशाला हे सगळे उकरून काढायचे. पण जर जूनी कविता आपण विसरलो तर पुढच्या कवितेची वाटचाल सोपी रहात नाही. बा.भ.बोरकर लिहून जातात

तू नसताना या जागेवर चिमणी देखील नच फिरके
कसे अचानक झाले मजला जग सगळे परके परके

आणि पन्नास साठ वर्षे उलटल्यावर संदिप खरे सारखा आजचा कवी लिहीतो

नसतेच घरी तू जेंव्हा जीव तुटका तुटका होतो
जगण्याचे तुटती धागे संसार फाटका होतो

आजचा कवी काळाच्या किती मागे किंवा पुढे आहे हे समजण्यासाठी जूने कवी वाचावे लागतात. त्यांची कविता समजून घ्यावी लागते. जी कविता काळावर टिकली आहे निदान तेवढी तरी कविता आपण वाचणार की नाही? आणि ती नाही वाचली तर मराठी कवितेचेच नुकसान होते.

आजकाला सर्वच गोष्टींना जातीचा रंग चढवला जातो. मग बालकवी म्हणजे त्यांची जात कोणती? त्याचा काय फायदा आहे? त्याप्रमाणे त्यांची जयंती पुण्यतिथी साजरी करायची की नाही ते ठरते. कुठलाही खरा प्रतिभावंत नेहमीच जातीपाती, देश, काळ याच्या सीमा ओलांडून आपली निर्मिती करत असतो. 

बालकवींच्याच आयुष्यातील एक काळीज हेलावून टाकणारा प्रसंग आहे. त्यांच्या शरिराचे तुकडे तुकडे  त्यांचे स्नेही आप्पा सोनाळकर पोत्यात भरत होते. त्यांच्या डोळ्यातून अश्रू खळाखळा वहात होते. बालकवींच्या सदर्‍याकडे हात जाताच आप्पांच्या लक्षात आले की आत घड्याळ आहे आणि ते अजूनही चालूच आहे. बालकवींची एक अप्रकाशित कविता आहे

घड्याळांतला चिमणा काटा
टिक_ टिक् बोलत गोल फिरे
हे धडपडते काळिज उडते
विचित्र चंचल चक्र खरे!
घड्याळातला चिमणा काटा
त्याच घरावर पुन्हा पुन्हा
किति हौसेने उडत चालला
स्वल्प खिन्नता नसे मना!

काळावर इतकी सुंदर कविता लिहीणारा हा कवी आपण कशासाठी जातीपातीच्या चौकटीत, नफा नुकसानीच्या हिशोबात मोजायचा?

शंभर वर्षांपूर्वी होवून गेलेला हा कवि आनंदाचे उत्साहाचे कारंजे आपल्यापुढे कवितेत ठेवून गेला आहे. त्याच्या डोळ्यापुढचे त्याच्या स्वप्नातले जग कसे होते?

सूर्यकिरण सोनेरी हे 
कौमुदि ही हंसते आहे
खुलली संध्या प्रेमाने
आनंदे गाते गाणे
मेघ रंगले
चित्त दंगले
गान स्फुरले
इकडे तिकडे चोहिंकडे 
आनंदी आनंद गडे !

बालकवींना 97 व्या स्मृतिदिनी विनम्र अभिवादन !
     
श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575

Tuesday, May 5, 2015

बाबासाहेबांच्या नजरेतून तथागत गौतम बुद्ध


दैनिक पुण्य  नगरी, उरूस, रविवार 3 मे 2015 

सोमवारी बुद्ध पौर्णिमा आहे. वैशाखातील ही पौर्णिमा भगवान गौतम बुद्धांचा जन्मदिवस (इ.स.पूर्व 563) जातक कथेत बुद्ध जन्माची जी कथा सांगितली आहे ती अशी आहे.  महामायेच्या स्वप्नात चार दिशापुरूषांनी तिला ती झोपेत असताना हिमालयाच्या माथ्यावर नेवून ठेवले. मानसरोवरापाशी तिला स्त्रियांनी स्नान घातले. सुमेध नावाचा एक बोधिसत्व तिच्यासमोर येवून म्हणाला, ‘‘माझा शेवटचा जन्म मी पृथ्वीवर घेण्याचे ठरवले आहे. तू माझी माता होशील का?’’ महामायेनं मोठ्या आनंदानं त्याला होकार दिला. तिच्या ह्या स्वप्नाचा अर्थ लावण्यासाठी शुद्धोदन राजानं आठ ब्राह्मणांना बोलावून घेतलं. त्यांनी या स्वप्नाचा अर्थ असा सांगितला, ‘‘ राजा, तुला असा एक पुत्र होईल की जर तो संसारात राहिला तर सार्वभौम सम्राट होईल आणि जर त्याने संसारत्याग केला तर संन्यासी होऊन तो विश्वातील अंधार नाहीसा करणारा भगवान बुद्ध होईल.’’

बाबासाहेब आंबेडकर हे विद्वान होते. त्यांनी पुराणातील किंवा जातकातील अशा कथांवर विश्वास ठेवून बौद्ध धम्म नाही स्विकारला. अतिशय चिकित्सक पद्धतीनं त्यांनी भारतीय आणि पाश्चात्य धर्मांचा दर्शनांचा अभ्यास केला. आणि विचारपुर्वक बौद्ध धम्म स्विकारला. भारतीय परंपरेत एकूण 9 दर्शनं सांगितली आहेत. त्यातील सहा दर्शनं ज्यांना षड् दर्शनं असं म्हणतात जी वैदिक आहेत (न्याय, योग, सांख्य, वैशेषिक, पुर्व मिमांसा, उत्तर मिमांसा) त्यांना आस्तिक म्हणतात. म्हणजे या दर्शनांना वेद मान्य आहेत. म्हणजे ते वेदप्रामाण्य मानतात. तर इतर तीन दर्शनं जी आहेत (लोकायत, जैन, बौद्ध) ही नास्तिक आहेत म्हणजेत ते वेद मानत नाहीत. आपण चुकून देव मानणे आणि न मानणे याला आस्तिक किंवा नास्तिक असे म्हणतो.

बुद्ध दर्शनात देव न मानणार्‍या  कपिलमुनींच्या सांख्य दर्शनाचा आधार घेतला आहे. बाबासाहेबांनीही त्याची नोंद आपल्या पुस्तकात केली आहे. बौद्ध धम्म स्विकारताना तो संपूर्णत: बाबासाहेबांनी स्विकारला नाही. विशेषत: कर्म आणि पुनर्जन्म या संकल्पना ज्या की बौद्ध धम्मातही आहेत त्यांच्यावर बाबासाहेबांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. 

बाबासाहेब नोंदवून ठेवतात, ‘‘बुद्धाने आत्म्याचे अस्तित्व नाकारले आहे; पण त्याने कर्म आणि पुनर्जन्म ह्यांबद्दलची तत्त्वे दृढतया प्रतिपादन केली आहेत असे सांगितले जाते. मग लगेच प्रश्न उपस्थित होतो. जर आत्मा नाही तर कर्म कसे असू शकेल? जर आत्मा नाही तर पुनर्जन्म कसा असू शकेल? हे गोंधळ निर्माण करणारे प्रश्न आहेत. बुद्धाने कर्म आणि पुनर्जन्म हे शब्द कोणत्या अर्थाने वापरले आहेत? त्या काळी ब्राह्मण वापरत त्यापेक्षा निराळ्या अर्थी हे शब्द त्याने वापरले काय? असे असेल तर आत्म्याचा अस्वीकार आणि कर्म व पुनर्जन्म ह्यांदे दृढ प्रतिपादन ही भयानक विसंगती नाही काय? ही विसंगती उकलण्याची आवश्यकता आहे. ’’ (भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म, आवृत्ती 19 वी)

राजपुत्र गौतमाची भगवान बुद्ध बनण्याची प्रक्रियाही बाबासाहेबांनी अतिशय सोप्या आणि वस्तूनिष्ठ पद्धतीने एखाद्या वकिलाने आपले म्हणणे मुद्देसूद मांडावे अशी मांडली आहे. 

मूळात पहिला प्रश्न बाबासाहेब अतिशय महत्त्वाचा असा उपस्थित करतात की भगवान बुद्धांनी परिव्रज्या(संन्यास) का ग्रहण केली?  राजपुत्र गौतमाला मृत देह, रूग्ण व जराजर्जर मनुष्य यांचे दर्शन झाले व तो उदास बनला असे एक पारंपरिक मत आहे. बाबासाहेबांनी हे सपशेल नाकारले आहे. गौतमाने वयाच्या 29 व्या वर्षी परिव्रज्या ग्रहण केली मग तोपर्यंत हे काय त्याच्या दृष्टीस कधी पडलेच नव्हते?

बाबासाहेबांनी केलेली मांडणी अशी. तेंव्हाच्या शाक्य राज्यात एक संघ होता. वयाची वीस वर्षे पुर्ण केलेल्या प्रत्येक शाक्य तरूणाला त्या संघात दाखल होवून संघाची दीक्षा घ्यावी लागे. त्याप्रमाणे गौतमाने घेतली. संघाचा सभासद झाल्यापासून आठ वर्षे राजपुत्र गौतम या संघात नियमित जात होता. कामकाजात भाग घेत होता. आठव्या वर्षी जी घटना घडली त्याने एका वेगळ्या दु:खांतिकेला सुरवात झाली. 

रोहिणी नदीच्या पाण्यावरून शाक्य व बाजूच्या कोलिय राज्यात झगडा उत्पन्न झाला. दोन्ही बाजूच्या लोकांना या भांडणात दुखापती झाल्या. शाक्यांच्या सेनापतीने कोलियांवर चढाई करून त्यांना नेस्तनाबूत करावे असा ठराव मांडला. दोष शाक्यांचाही असल्याचे लक्षात आल्यावर गौतमाने या ठरावास विरोध केला. शाक्य संघात हा ठराव गौतमाच्या मताविरूद्ध बहुमतांनी पारित झाला. आता सर्वांना संघाच्या नियमानुसार सैन्यात सामील होऊन युद्ध करणे भाग होते. मात्र गौतमाच्या सद्सद् विवेक बुद्धीला बहुमताचा हा प्रस्ताव मंजूर झाला नाही. त्याच्यापुढे तीन पर्याय होते

1. सैन्यात दाखल होऊन युद्धात सामील होणे. 
2. देहांत शासन अथवा देशत्याग 
3. आपल्या कुटूंबियांवर सामाजिक बहिष्कार आढवून घेणे किंवा त्यांच्या मामत्तेची जप्ती होवू देणे. 


पहिला आणि तिसरा पर्याय त्याला स्विकारणे शक्य नव्हते. त्याला दुसरा पर्याय योग्य वाटला. सेनापतीने शंका व्यक्त केली. ‘‘तू देहांतशासन किंवा देशत्याग करायला स्वेच्छेने करायला जरी तयार असशील तरी कोशलाधिपती जे आमचे वरिष्ठ आहेत त्यांना वाटणार की आम्हीच तूझ्यावर अन्याय केला. ते संघाला जाब विचारतील.’’

अशा आणिबाणीच्या परिस्थितीत सर्वांचीच सुटका करण्यासाठी आपल्या सदसद्विवेकबुद्धीला स्मरून राजपुत्र गौतम म्हणाला की, ‘‘मी परिव्राजक होतो आणि हा देश सोडून जातो. तो एक प्रकारचा देशत्यागच होय.’’

बाबासाहेबांनी अतिशय विचारपूर्वक मानवी पातळीवर विचार करून बुद्धाच्या आयुष्यातील या महत्त्वाच्या प्रसंगाचे विश्लेषण करून दाखवले आहे. पुढचा इतिहास सर्वांना विदीत आहे. बारा वर्षे ज्ञानप्राप्तीसाठी भगवान बुद्धांनी कशी भटकंती केली, किती सायास केले, काय काय सोसले हे सारे सोप्या भाषेत बाबासाहेबांनी सांगितले आहे. 

पुढचा एक प्रसंग तर फार विलक्षण आहे. गौतमाने परिव्रज्या स्विकारल्यानंतर इकडे शाक्य व कोलिय यांच्यात मोठी खळबळ उडाली. त्यांच्यातील युद्धाचा जोर ओसरून शांततेसाठी जोरदार प्रयत्न सुरू झाले.  झगडा शांततेने मिटविल्या गेला. जेंव्हा सिद्धार्थाला हे विचारल्या गेले की, ‘‘आता तर झगडा मिटला आहे. आता तुम्ही परिव्राजक म्हणून राहण्याची आवश्यकता नाही. मग तुम्ही घरी जाऊन आपल्या कुंटूंबाबरोबर का राहत नाही?’’ याला भगवान बुद्धांनी दिलेले उत्तर मोठे महत्त्वाचे आहे, 

‘‘युद्धामुळे मी घर सोडले हे खरे. पण शाक्य व कोलिय यांच्यातील युद्ध संपले असले तरी मी घरी जाऊ शकत नाही. मला आता असे दिसून येते की, माझ्या पुढील समस्येने विशाल रूप धारण केले आहे. या सामाजिक संघर्षाच्या समस्येचे उत्तर मला शोधून काढले पाहिजे.’’

पुढे भगवान बुद्धांनी केलेली ज्ञानसाधना, बौद्ध दर्शनाची केलेली मांडणी, त्याची व्यापकता, देशातच नव्हे तर तेंव्हाच्या  शेजारच्या इतर देशांतही त्याचा वाढत गेलेला प्रभाव हे सगळे सर्वांना माहित आहे. 

आजही जेंव्हा आंबेडकर जयंती असो की बुद्ध जयंती ज्या पद्धतीने बुद्ध आणि आंबेडकरांचे दैवतीकरण त्यातून दिसून येते ते मोठे विचित्र आहे. काहीच विचार न करता आम्ही बाबासाहेबांनाही आता देव करण्यास निघालो आहोत. स्वत: बाबासाहेबांनीच नोंदवून ठेवले आहे ‘बुद्ध होण्यासाठी बोधिसत्त्व आवश्यक अशा दहा जीवनवस्थांतूनच गेला पाहिजे या सिद्धांताला दुसर्‍या कोणत्याही धर्मावर तोड नाही. दुसरा कोणताही धर्म आपल्या संस्थापकाला असल्या कसोटीला उतरण्याचे आव्हान देत नाही.’ आपल्या धर्मसंस्थापकाचीही कसोटी पाहणारा धर्म आता कोणा भक्तांच्या हाती आहे? 

आपल्या सारासार विचार शक्तीवर आधारलेला बौद्ध धम्म बाबासाहेबांना हवा होता. भगव्या, हिरव्या, पांढर्‍या रंगात माखलेल्या इतर धर्मासारखा एक नवा निळा बौद्ध धम्म नको होता. पण हे कोण लक्षात घेते? आम्हाला मेंदू बाजूला ठेवून डिजेच्या तालावर भन्नाट नाचायचे आहे. त्याला बाबासाहेब आणि भगवान गौतम बुद्ध तरी काय करणार ! 

श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575      

Sunday, May 3, 2015

दासू : दोन अक्षरात न मावणारा कविमित्र



(दासू वैद्य यांना  यावर्षीचा केशवराव कोठावळे पुरस्कार ‘तत्पूर्वी’ या कवितासंग्रहासाठी जाहिर झाला असून याचे वितरण दिगंबर पाध्ये यांच्या हस्ते दि. 5 मे रोजी मुंबईत होत आहे. या निमित्ताने दैनिक लोकसत्ता च्या लोकरंग पुरवणीत लिहिलेला लेख दि. ३ मे २०१५ )

एखाद्या माणसाची आपली पहिली भेट होते आणि पुढे त्याच्याशी मैत्री वाढत जाते. पण एखाद्याच्याबाबतीत मात्र असे होते की पहिल्याभेटीतच आपली पूर्वीपासूनची मैत्री आहे असे वाटत राहते. जवळपास पंचेवीस वर्षांपूर्वी औरंगपुर्‍यात सरस्वती भुवन महाविद्यालया जवळच्या चहाच्या टपरीवर कुण्या मित्रानं ‘हा दासू!’ अशी माझी ओळख करून दिली. तेंव्हा ‘हो मी याला ओळखतो’ अशा आशयाची मान हलवत मी त्याच्याशी हात मिळवला. दासूनेही पूर्वीचीच मैत्री असल्याची खुण आपल्या डोळ्यातून दिली.  ‘दासू’ इतकी छोटी ओळख करून देवून चटकन मैत्रीची सलगी साधण्याची किमया दासूने साधली आणि तेंव्हापासून त्याच्याशी मैत्री दाट होत गेली.

अंबाजोगाई हे दासूचे मूळ गाव. पुढे त्याचे आजोबा नांदेडला गेले. नामंकित वैद्य म्हणून नांदेड व परिसरात ते प्रसिद्ध होते. महाराष्ट्र आणि तेलंगणाच्या सीमेवरील सरस्वती देवीच्या मंदिरासाठी प्रसिद्ध असलेलं गोदावरी काठच्या बासर गवात त्यांना इनाम जमिन मिळाली. त्यांच्या कुटूंबाचा मोठा वाडा तिथे होता.  दासूचे वडिल शिक्षक होते. वडिलांच्या बदलीनिमित्ताने हे कुटूंब नांदेडजवळ मुदखेड या गावी स्थायिक झाले. दासूचे शालेय शिक्षण याच गावात झाले. या छोट्या गावचे, तिथल्या रिती रिवाज परंपरांचे मोठे संस्कार त्याच्या कवितेवर आणि एकूणच लिखाणावर उमटले.

पुढे अंबाजोगाई आणि औरंगाबाद येथे शिक्षणासाठी त्याचे वास्तव्य होते. औरंगाबाद सारख्या महानगरात आता कायमचे वास्तव्य असले तरी गावाकडचा एक मोकळेपणा, नाते जोडण्याची आसोशी, बोलण्यातली अनौपचारिकता त्याच्या स्वभावात टिकून राहिली आहे.

वीस वर्षांपूर्वी मराठीच्या प्राध्यापकासाठी एम.ए. एम.फिल. पुरेसे असायचे. त्या काळातही दासूने नेटची परिक्षा उत्तीर्ण केली. जालन्याच्या बारवाले महाविद्यालयात मराठी विभागात प्राध्यापक म्हणून त्याची निवडही झाली. पुढे त्याने पी.एचडी. केले. त्याच्या संशोधनाचा विषय भारत सासणे या गंभीर प्रवृत्तीच्या लेखकाचे लिखाण हा होता. पण असं सगळं असूनही त्याची ओळख मा.प्रा.डॉ. दा.ह.वैद्य अशी मात्र बनली नाही. किंबहूना त्याने ती बनू दिली नाही. अजूनही त्याची ओळख ‘दासू’ अशीच आणि इतकीच आहे.

बारवाले महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून काम करत असताना महाविद्यालयाच्या प्राचार्यपदाची जबाबदारी त्याच्याकडे आली. हे आपल्या प्रकृतीशी जूळणारे नाही हे दासू पूर्ण जाणून होता. त्याने हे पद नाकारले. पण तांत्रिकदृष्ट्या काही दिवस तरी प्राचार्याचा कार्यभार सांभाळणे भाग होते. या कविमित्राने एका सच्च्या कविला शोभावे अशी कृती केली. त्याने प्राचार्यांच्या प्रचंड मोठ्या खुर्चीच्या बाजूला एक साधी प्लॅस्टिकची खुर्ची ठेवली. कार्यभाराचा कालावधी संपेपर्यंत त्या छोट्या खुर्चीवर बसून काम केले. त्या पदास पात्र दुसरा उमेदवार रूजू होताच प्राचार्यांचे दालन आणि नि:श्‍वास सोबतच सोडला.

दासूला फार लवकर चित्रपट आणि दूरदर्शन मालिकांमधून गीतलेखनाचे काम मिळाले आणि गीतकार म्हणून प्रसिद्धीही मिळाली. यातून दोन धोके संभवत होते. एक तर प्रसिद्धीमूळे हवा डोक्यात जाणे आणि गीत लेखनामूळे गंभीर काव्य लेखनावर परिणाम होणे.

हे दोन्ही घडले नाही याचे ठळक पुरावेच माझ्याजवळ आहेत. 93-94 साली अजिंठ्याच्या डोगरात वसलेल्या उंडणगाव या छोट्या गावात एका कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या गावात कित्येक वर्षांपासून गणपतीच्या काळात सांस्कृतिक कार्यक्रम आयोजिक करण्याची चांगली परंपरा आहे. इथल्या रसिकांची तिसरी तरूण पिढी आता या आयोजनात हिरीरीने पुढे आली आहे. त्यांच्या आयोजनास मी कित्येक वर्षांपासून मदत करतो. त्यांनी त्या वर्षी दासूला आमंत्रित केले होते. नेमके त्याच दिवशी औरंगाबादला प्रसिद्ध नट दिग्दर्शक अमोल पालेकर यांची मुलाखत दासू वैद्य व चंद्रकांत कुलकर्णी घेणार होते. तशा बातम्याही वर्तमानपत्रांतून झळकल्या होत्या. उंडणगावच्या कार्यकर्त्यांनी दासू  येणार नाही हे गृहीत धरले. प्रत्यक्ष कार्यक्रमाची वेळ झाली आणि कविसंमेलन सुरू होण्याच्या आधी बरोबर दासू तिथे हजर झाला. मला आश्चर्य वाटले. मी त्याला तसे विचारलेही. त्याने दिलेले उत्तर मोठे सुंदर मार्मिक आणि त्याची मानसिकता दर्शविणारे होते. ‘श्रीकांत तो झगमगाटी कार्यक्रम होता. माझे नाव त्यांनी परस्परच छापले. मी या लोकांना आधीच शब्द दिला होता. कवितेसाठी इतक्या प्रामाणिकपणे काम करणारी ही माणसं मला जास्त मोलाची आहेत. माझ्या कवितेला इथे खरी दाद मिळणार आहे. म्हणून मी तो कार्यक्रम सोडून इथे आलो.’

चित्रपट व मालिकांसाठी गीतलेखन करताना गंभीर काव्यलेखनावर परिणाम होतो असा समज आहे. तो बर्‍याच कवींच्या बाबत खराही आहे. पण अलिकडच्या काळात किशोर कदम (सौमित्र) आणि दासू वैद्य (दासू) हे दोन कवी याला अपवाद आहेत. गीतकार व कवी अशी कसरत त्यांनी मोठ्या कौशल्याने सांभाळली. दासूचा पहिला कविता संग्रह ‘तूर्तास’ आणि ज्याला आत्ता कोठावळे पुरस्कार जाहिर झाला आहे तो ‘तत्पूर्वी’ हे दोन्ही संग्रह पॉप्युलर सारख्या मान्यवर प्रकाशनाने प्रसिद्ध केले आहेत. अनेक मानाचे पुरस्कार पहिल्या कवितासंग्रहाला मिळाले असून मुंबई विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातही त्याचा समावेश झाला आहे. दुसर्‍या कवितासंग्रहावरही आता पुरस्काराची मोहर उमटली आहे. ललितच्या जानेवारी 2015 च्या अंकात दशकातील साहित्यीक म्हणून प्रा. मधु जामकर यांनी दासूच्या एकूणच लिखाणावर दीर्घ लेख लिहून त्याची दखल घेतली आहे.

नाटक हे दासूचे आवडीचे क्षेत्र राहिले आहे. त्याच्या एकांकिका खुप गाजल्या. ‘देता आधार की करू अंधार’ सारख्या एकांकिकेतून मकरंद अनासपुरे सारखा नट चित्रपट सृष्टीला मिळाला. त्याच्या ‘रिअल इस्टेट’ या दीर्घांकास मागच्याच वर्षी लिखाणाचे पहिले पारितोषिक मिळाले. पण अजून आपल्या हातून तीन अंकी नाटक लिहून झाले नाही याची खंत त्याला जाणवते.  

बहुतांश साहित्यीक कलाकार हे आपल्या काचेरी महालात बंदिस्त राहतात. त्यांचा समाजाशी संबंध येत नाही असा एक सार्वत्रिक आरोप होतो. दासू त्याला अपवाद राहिला आहे. मी पंधरा वर्षांपूर्वी परभणीला एक सामाजिक संस्था स्थापन करून आरोग्य चळवळ, मराठी शाळा अशी कामं सुरू केली होती. आम्ही या संस्थेसाठी मदतीचे आव्हान केले तेंव्हा तातडीने आम्हाला धनादेश पाठवून त्याने देणगी दिली होती. दासू आपल्या मुलीचा वाढदिवस अनाथाश्रमात जावून त्या मुलांना खेळणी, खाऊ, कपडे वाटून साजरा करतो हे आमच्या सारख्या अगदी जवळच्या मित्रांनाही आत्ता आत्तापर्यंत माहित नव्हते.

औरंगाबादला डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात मराठी विभागात दासू प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे. ह्या विद्यापीठाचे नामांतर झाले तेंव्हा या प्रदेशातील बहुतांश दलित विद्यार्थ्यांना या विद्यापीठाबद्दल आस्था निर्माण झाली. दासूचा विद्यार्थी असलेल्या एका दलित मुलाने एक आठवण मला सांगितली आणि दासूचा एक वेगळाच पैलू नजरेसमोर आला. या विद्यार्थ्याला शासनाकडून मिळणार्‍या शिष्यवृत्तीप्रकरणात दलित प्राध्यापकांकडूनच अडथळा येत होता. या विद्यार्थ्याने दासूकडे नोंदणी केली त्याचे एकमेव कारण म्हणजे विद्यार्थ्यांना आणि विशेषत: दलित मागासवर्गीय विद्यार्थ्यांना दासूकडून मिळणारी सन्मानाची वागणूक, अडीअडणीला त्यांना मदत करण्याची वृत्ती.

आंबेडकरांच्या नावाने असलेल्या विद्यापीठात महात्मा गांधी यांच्या नावाने असलेल्या अध्यासनासाठी काम करण्यास कोणीच तयार नव्हते. प्रा. जयदेव डोळे यांनी या अध्यासनाचे काम सांभाळले. त्यांच्यानंतर सगळ्यांना नकोशी वाटणारी ही खुर्ची दासूने स्विकारली. गांधी विचारांवर विद्यार्थ्यांनी लिहीलेले निबंध एकत्रित करून त्याचे पुस्तक प्रकाशीत करून या अध्यासनाच्या माध्यमातून एक वेगळेच काम करून दाखवले. औरंगाबाद जवळच्या तंटामुक्त गावाच्या सरपंचांना बोलावून त्यांचा सत्कार घडवून आणला. स्वच्छता अभियानात उत्कृष्ठ कामगिरी करणार्‍या गावकर्‍यांना विद्यापीठात बोलावून त्यांचा सन्मान या अध्यासनाद्वारे केला.

तुकाराम चित्रपटाची गाणी दासूने लिहीली आहेत. दासूतील गीतकाराला आणि कविला अभिमान वाटावा अशी एक गोष्ट या चित्रपटात घडली. चित्रपटाचा शेवट कसा असावा यावार दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी विचार करत होता. तुकारामांच्यावह्या नदीत बुडतात. त्यासाठी तुकाराम महाराज नदीकाठी उपोषणाला बसले आहेत. हळू हळू आजूबाजूला लोक जमा होत जातात. लोकांच्या तोंडी तुकारामाचे अभंग येवू लागतात. कारण लोकांना ते पाठच असतात. अशा पद्धतीने लोकगंगेतून वह्या तरल्या हा आशय दिग्दर्शकाला पोचवायचा होता. या पार्श्वभूमिवर दासूने गीत लिहीले

जगण्याचा पाया । चालण्याचे बळ । 
विचारांची कळ । तुकाराम ॥
खोल पसरतो । पुन्हा उगवतो । 
सांगून उरतो । तुकाराम ॥
या गाण्याचे चित्रण इतके प्रभावी झाले की ठरलेला शेवट बदलून याच प्रसंगावर आणि गाण्यावर चित्रपटाचा शेवट करण्याचा निर्णय चंद्रकांत कुलकर्णीने घेतला. तुकारामावर एक चांगली कविता लिहीली जावी, त्याचे सुंदर गाणे बनावे आणि तो प्रसंग चित्रपटाचा कळस ठरावा ही दासूसाठी फार समाधानाची कुठल्याही पुरस्काराहून मोठी गोष्ट आहे.

गीतकार श्रेष्ठ का कवी असा एक वाद आपल्याकडे केला जातो. त्यावर काहीही न बोलता एक सुंदरशी कविता लिहून दासूने पडदा टाकला आहे.

गाणं म्हणजे असते काय?
शब्दावरची ओली साय !!

कोठावळे पुरस्कारासाठी या कविमित्राला लाख लाख शुभेच्छा !

श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद.
9422878575

     
   

 

Sunday, April 26, 2015

गजेंद्रसिंहाची आत्महत्त्या! नव्हे, हा तर कर्जबळी!

दैनिक पुण्य नगरी,  उरूस, रविवार 26 एप्रिल 2015 

गेली कित्येक वर्षे शेतकर्‍यांच्या आत्महत्या गावोगाव चालूच आहेत. रोज मरे त्याला कोण रडे असं म्हणून त्याकडे  दुर्लक्ष करायला आम्ही शिकलो आहोत. अशावेळी गजेंद्रसिंह या राजस्थानच्या दौसा जिल्ह्यातील शेतकर्‍याने दिल्लीत भर सभेत सगळ्यांच्या देखत आत्महत्या केली. सर्वांसमक्षच हे घडल्याने डोळ्यावर कातडे ओढून बसलेल्या व्यवस्थेला दखल घेणे भागच पडले. आता सर्वत्र शेतकर्‍यांच्या आत्महत्या हा विषय परत ऐरणीवर आलेला दिसतो आहे.

सगळ्यात पहिल्यांदा शेतकरी चळवळीने आत्महत्या हा शब्द वापराण्यास आक्षेप घेतला होता. शेतकरी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते अमर हबीब यांनी अशी मांडणी केली होती की याला कर्जबळी म्हणण्यात यावे. पूर्वी हुंड्यासाठी नवरीचा छळ आपल्याकडे मोठ्या प्रमाणात केला जायचा. मग ती सासूरवाशीण बिचारी या जाचाला कंटाळून आत्महत्या करायची. या आत्महत्येला ‘‘हुंडाबळी’’ असा शब्द महिला आंदोलनाने दिला. तोच शब्द आता रूढ झाला. नूसता शब्द बदलल्याने काय होते? तर सगळ्यात पहिल्यांदा मानसिकता बदलते. आत्महत्या हा आपल्या काद्याने गुन्हा आहे. ज्याने आत्महत्या केली तो गुन्हेगार ठरतो. हुंड्यासाठी छळ होवून जिने आत्महत्या केली ती गुन्हेगार नसून तिला तसे करण्यास प्रवृत्त करणारे गुन्हेगार सिद्ध होतात. परिणामी या सगळ्या प्रकाराकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलतो.

मग आता शेतकरी जो आत्महत्या करतो आहे ते कशामुळे? तर सरकारी धोरणच असे आहे की शेतीमालाला भाव मिळू नये. परिणामी शेतकर्‍याने कितीही प्रयत्न केले कष्ट केले तरी त्याची शेती तोट्यातच जाते. परिणामी त्याला आत्मसन्मानासाठी आत्महत्या करण्याशिवाय पर्याय राहत नाही. तेंव्हा ही आत्महत्या म्हणजे ‘‘कर्जबळी’’ असे समजण्यात यावे. म्हणजेच याची जबाबदारी सरकारी धोरणांवर येवून पडते. 

शेतकर्‍यांचे कर्ज हा विषय आला की शेतीशी संबंध नसलेली भली भली माणसे असा मुद्दा मांडतात, ‘‘शेतकरी नादान आहे. त्याला शेतीचे शिक्षण नाही. आधुनिक तंत्रज्ञान तो वापरत नाही. म्हणून त्याची शेती तोट्यात आहे. अशी जर कर्जमाफी त्याला देत राहीलो तर तो आळशी बनेल. काहीच न करता फुकट खाण्याची प्रवृत्ती वाढेल. आणि कोणा कोणाला कर्जमाफी देणार? तेंव्हा शेतकर्‍यांची कर्जमाफी हे थोतांड बंद करा. ’’ ज्यांना अर्थशास्त्र चांगले कळते अशी माणसेही अशीच मांडणी करतात. मूळात शेतकरी चळवळीने ‘कर्जमाफी’ मागितली नसून ‘कर्जमुक्ती’ मागितली आहे. माफी मागायला शेतकरी काय गुन्हेगार आहे? त्याच्याभोवती जो कर्जाचा फास धोरणांनी आवळला आहे त्यापासून त्याला मुक्ती हवी आहे. 

शेतमालाच्या भावाआड सरकार येते हेच बर्‍याच जणांना पटत नाही. दोन वर्षांपूर्वी कापसाचे भाव आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत 7 हजारपर्यंत चढले होते. भारत सरकारने निर्यातबंदी लादली. परिणामी हे भाव 3500 पर्यंत उतरले. यात भारतीय शेतकर्‍यांचा काय गुन्हा? शासनाच्या एका निर्णयामुळे भारतातील कापूस शेतकर्‍याचे एका फटक्यात साडेतीन लाख कोटींचे नुकसान झाले आणि मनमोहनसिंग सरकारच्या काळात  कर्जमाफी किती रूपयांची झाली होती तर केवळ सत्तरहजार कोटी रूपयांची. म्हणजे वर्षानुवर्षे साठलेले कर्ज केवळ सत्तरहजार कोटी बदल्यात एकाच वर्षी शासकीय धोरणाने शेतकर्‍याला लुटले साडेतीन लाख कोटींना. हे केवळ कापसाच्या एका पीकापोटी एका वर्षासाठी.  

कर्जाचा विचार केला तर कर्ज देणारा आणि कर्ज घेणारा यांच्यात जो करार होतो त्याच्या काही अटी आहेत. विशेषत: शेती कर्जाबाबत रिझर्व बँकेने नियम घालून दिले आहेत. कर्ज देणार्‍याने जर अशी परिस्थिती निर्माण केली की कर्ज घेणार्‍याला ते फेडताच येवू नये तर त्याला कर्जदार जबाबदार नाही. दुसरी गोष्ट म्हणजे शेती कर्जाचे व्याज हे चक्रवाढ पद्धतीने आकारू नये. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे कुठल्याही परिस्थितीत मूळ कर्जाच्या रक्कमेपेक्षा व्याजाची रक्कम अधिक होवू नये. म्हणजे दहा हजार रूपयांच्या कर्जावर जास्तीत जास्त दहाच हजार व्याज आकारता येते. त्यापेक्षा जास्तीच्या व्याजाची आकारणी अवैध आहे.

आपल्याकडे कागदपत्रे नाचविणारी खुप विद्वान मंडळी आहेत. त्यांच्यासाठी शेतीकर्जाचे एक उत्तम उदाहरण देतो. कर्नाटकातील एक शेतकरी श्री. के. रंगराव यांनी एप्रिल 1976 मध्ये बँक ऑफ इंडिया कडून उसासाठी दहा हजार रूपये कर्ज घेतले. कर्ज थकित झाल्यावर बँकेने रंगराव यांच्यावर कर्ज अधिक व्याज असा 30,564/- इतक्या रकमेचा दावा केला. हा शेतकरी थेट सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढला आणि त्याच्या कर्जाची रक्कम 19,851/- इतकी ठरविण्यात आली. बँकेचे सर्व दावे न्यायालयाने फेटाळले आणि या शेतकर्‍याला न्याय दिला. ही कर्ज आकारणी 17 % इतक्या दराने करण्यात आली होती. चक्रवाढ पद्धतीने व्याजाची आकारणी करण्यात आली होती. रिझर्व बँकेचे जे कृषी कर्ज आकारणीचे जे नियम आहेत ते बहुतांश बँकांनी पाळले नाहीत असे या प्रकरणात समोर आले.  इतकेच नाही तर या प्रकरणात निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाने असेही नमूद करून ठेवले आहे की, ‘‘सर्वोच्च न्यायालयाचे निकाल हे सर्वांना बंधनकारक असूनही न्यायालयांनी त्याविरूद्ध निकाल दिले असतील तर ते निकाल अवैध आहेत.’’ (ज्या वकिलांना या केससंबंधी कायदेशीर माहिती हवी आहे ती माझ्याकडे उपलब्ध आहे.)

म्हणजे मुळात शेतकर्‍याला नफा मिळू नये अशी व्यवस्था करायची आणि वर त्याला दिलेले कर्ज चुकीचे व्याज लावून अवैध रित्या वाढवत न्यायचे असे हे सुलतानी (शासकीय) धोरण आहे. गेल्या काही वर्षात अस्मानी (नैसर्गिक) संकटांची संख्या आणि तीव्रता वाढली आहे. अतिवृष्टी, दुष्काळ, गारपीट, वादळं अशा कित्येक गोष्टींमूळे शेती प्रचंड संकटात सापडली आहे.

काहीजणं ‘बागायती शेती आणि कोरडवाहू शेती’ असा कृत्रिम फरक करतात. शिवाय पंजाबची शेती आणि महाराष्ट्राची शेती असा प्रदेशाचाही फरक करतात. पीका पीकात फरक करतात. हे सगळे लोक दिशाभूल करत आहेत. शेती कुठलीही असो, कुठल्याही प्रदेशातील असो, पीक कुठलंही असो, पाणी असो नाही तर कोरडी असो भारतीय शेतीत फक्त एक आणि एकच पीक उगवते आणि ते म्हणजे कर्जाचे. दुसरे कुठलेच पीक कुठल्याच भागात उगवत नाही. 

शेतकरी शेतीतून बाहेर पडू पाहत आहे. आणि सगळे शेतकरी बाहेर पडले तर कसं होणार याचा गांभिर्याने विचार व्हायला पाहिजे. खरं तर आपल्याकडे शेती शिवाय एवढ्या माणसांना समावून घेईल असा दुसरा कुठलाही व्यवसाय/उद्योग नाही. शेतीतून माणसं बाहेर पडली तर ती शहरात येतील. आजच शहराची अवस्था भयानक झाली आहे. आजच शहरातही पुरेसा रोजगार उपलब्ध नाही. 

इंद्रजीत भालेराव यांनी आपल्या एका कवितेत जो प्रश्न विचारला आहे त्याचे उत्तर दिल्याशिवाय आपली सुटका होणार नाही.

सांगा माझ्या बापाने नाही केला पेरा
तर  तुम्ही काय खाल ? धतूरा !

असं म्हणायची खरं तर माझी इच्छा नाही
पण माझ्या बापानं आत्महत्या करूनही
आमच्या आयुष्याला 
तुमची सदिच्छा नाही
तसं असतं तर तूम्ही 
आमच्या धानाचं मोल केलं असतं
मग आम्हीही आमचं काळीज 
तुमच्यासाठी खोल केलं असतं
पेरा करणार्‍या माझ्या बापाचा घास
मग अपुरा राहिला नसता
ऐतखाऊंच्या ताटात 
तुपाचा शिरा राहिला नसता
रस पिऊन माझ्या बापाचा
तुम्ही ठिवलाय फक्त चुर्रा

सांगा माझ्या बापानं नाही केला पेरा
तर तुम्ही काय खाल? धत्तुरा ! 
(पेरा, प्रकाशक : जनशक्ती वाचक चळवळ, पृष्ठे 57, आ.3)

सामान्य शेतकर्‍याची वेदना आपण समजून घेतली पाहिजे. तो कुठल्याही लाचारीची बात करत नाही. कुठल्याही सुट सबसिडीची बात करत नाही, कुठल्याही अनुदानाची बात करत नाही. तो फक्त त्याचा हक्क मागतो आहे. गांधी जे गरीबांसाठी म्हणाले होते त्याच धरतीवर शरद जोशी शेतकर्‍यांसाठी म्हणतात, ‘शेतकर्‍याचे भले करायचे म्हणून त्याच्या छातीवर तूम्ही बसला अहात ते आधी उठा. शेतकर्‍याचे भले करणार्‍यांनी स्वत:चेच भले करून घेतले आहे. ते आधी थांबले पाहिजे. अडथळे आणले नाही तर शेतकरी स्वत:हून स्वत:चे भले करून घेण्यास समर्थ आहे. 

गजेंद्रसिंहाच्या या कर्जबळीप्रकरणानंतर आता सर्वांना कळकळीची विनंती.. बाबांनो आधी शेतकर्‍याच्या छातीवरून उठा!

श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575

Monday, April 20, 2015

सदानंद मोरे, जरा तुकारामी बाणा दाखवा!

दैनिक पुण्य नगरी, उरूस, रविवार 19 एप्रिल 2015 

   घुमान साहित्य संमेलन पार पडले. या संमेलनाचे अध्यक्ष म्हणून तुकाराम महाराजांचे वंशज असलेले डॉ. सदानंद मोरे हे निवडून आले होते. संमेलन नामदेवांच्या वास्तव्याने पावन झालेल्या घुमान सारख्य पवित्र स्थळी पार पडले. साहजिकच सामान्य लोकांची अशी अपेक्षा होती की ज्या पद्धतीने तुकारामांसारख्या संतांनी रोखठोकपणे तेंव्हाच्या समाजातील विसंगती सांगितल्या तसे काहीतरी त्यांचे वंशज करती. ही अपेक्षा काही गैरही नव्हती.

घुमान साहित्य संमेलनावर आधीपासूनच टिका सूरू झाली होती. त्यामुळे साहित्य महामंडळाच्या कारभारात काहीतरी फरक पडेल अशी एक अंधुक आशा होती. पण प्रत्यक्ष तसं काहीच घडले नाही. आश्चर्य असे की तुकारामांचे वंशज असलेले सदानंद मोरेही अध्यक्षपदाच्या ओझ्याखाली दबून राहिले. ते काही बोललेच नाही.

संमेलन घुमानला घेण्यास प्रकाशकांनी विरोध केला होता. कारण स्पष्ट आहे की त्या ठिकाणी मराठी माणसे नाहीत. शिवाय हे ठिकाण गैरसोयीचे असल्याने तेथे ग्रंथविक्री होणे शक्य नव्हते. प्रकाशकांवर व्यावसायिक म्हणून टिका करणार्‍यांनी किमान एका तरी संमेलनात दोन्ही हातात पुस्तकांचे गठ्ठे घेवून पायपीट करून दाखवावी. रात्री उघड्या स्टॉलवर पुस्तकांची राखण करत थंडीत झोपून दाखवावे. आणि इतके करून विक्री न झालेली पुस्तके परत आणाताना काय यातना होतात हे अनुभवावे. म्हणजे उंटावर बसून जे शहाणपण शिकविले जाते ते कमी होईल. 

प्रकाशकांनी बहिष्कार टाकल्यावर महामंडळाने एक ग्रंथमहोत्सव महाराष्ट्रात घेण्याचे कबूल केले होते. त्याचे काय झाले? याचा जाब सदानंद मोरे यांनी महामंडळास का नाही विचारला? त्यांच्या विजयात मराठी प्रकाशकांचा मोठा वाटा होता. मग गरज सरो आणि ‘प्रकाशक मतदार’ मरो अशी भूमिका मोरे यांची होती का?

संमेलनासाठी खास दोन रेल्वेगाड्या सोडण्यात आल्या होत्या. यातील प्रवाशांचे प्रवासात अतोनात हाल झाले. बरं घुमानला पोचेपर्यंत हाल झाले हे माहित असताना परतीच्या प्रवासात या त्रूटींवर विचार करून काही कारवाई का नाही केल्या गेली? ना.धो.महानोर, सुधीर रसाळ, विठ्ठल वाघ यांच्या सारखे ज्येष्ठ साहित्यीक रेल्वेने इतक्या लांब येवू शकत नाहीत हे माहित असताना त्यांची स्वतंत्र व्यवस्था का नाही केली? आणि अशी व्यवस्था करणे शक्य नव्हते तर नागपूरहून पत्रकार, विदर्भ साहित्य संघाचे पदाधिकारी, चपराशी यांच्यासाठी विमानाची सोय कशी करण्यात आली होती? सांगा मोरे सर या विमानात कोण कोण गेले हे तूम्ही महामंडळास विचारले का?  

प्रत्यक्ष संमेलनात उद्घाटन सत्रात गुरूदयालसिंग (पंजाबी) व समारोपात रहमान राही (काश्मिरी) हे दोन ज्ञानपीठ पुरस्कार विजेते लेखक आमंत्रित होते. त्यांचा कुठलाही उल्लेख कुठल्याही बातमीत, लेखात नाही. त्यांनी भाषेसंदर्भात काय मते मांडली, त्यांची भाषा आणि मराठी यांची त्यांनी काय तुलना केली हे कोणीच सांगितले नाही. मुळात हे लेखक संमेलनास आले होते की नाही हेही माहित नाही. शरद पवार, विनोद तावडे, देवेंद्र फडणवीस यांची चिंता सर्वांना होती. त्यांच्या भाषणांची दखल सर्वत्र घेतल्या गेली. मग जे ज्ञानपीठ विजेते साहित्यीक पाहुणे आमंत्रित होते ते कुठे गेले? मोरे सर सांगा का नाही तुम्ही काही याबाबत बोललात?

नामदेवांची गाथा महाराष्ट्र शासनाने प्रकाशीत केली होती. तिची आवृत्ती आता संपली आहे. मग घुमानच्या संमेलनात या गाथेची नविन आवृत्ती का नाही उपलब्ध करून देण्यात आली? शासनाच्या वतीने लाखो रूपये खर्च करून एक पुस्तिका गुरूमुखीत प्रकाशीत केल्या गेली. त्यावर महाराष्ट्र शासनाची जाहिरात छापली आहे. मग घुमानला नामदेवांच्या भुमीत नामदेव गाथा छापून प्रकाशीत करण्यात काय अडचण होती? सांगा मोरे सर, केवळ तुकारामांचे वंशज, संमेलनाचे अध्यक्ष म्हणून नाही तर तूम्ही संत साहित्याचे अभ्यासक अहात. तुम्ही का नाही जाब विचारलात?

संमेलनात ज्यांना आमंत्रित केले त्यांचा दर्जा सुमार होता यावर आधीच टिका झाली. प्रत्यक्षात हे सुमार लोक जेंव्हा संमेलनात आले आणि त्यांनी आपल्याा कविता सादर केल्या, भाषणे केली, चर्चा केल्या, मुलाखती घेतल्या त्यावरून त्यांचा दर्जा टिका केली त्यापेक्षाही खराब असल्याचे सिद्ध झाले. मोरे सर सुमार दर्जाच्या साहित्यीकांच्या (यातील बरेच महामंडळाचे पदाधिकारीच आहेत) सहभागाबाबत सगळेच मिठाची गुळणी धरून का बसून राहिले?

महाराष्ट्राच्या बाहेर मराठीचा झेंडा फडकवायचा आहे असा आव महामंडळ आणि आयोजक संस्थेने आणला होता. खरं तर महाराष्ट्राच्या बाहेर पणजी (गोवा), गुलबर्गा (कर्नाटक), बंगळूरू (कर्नाटक), हैदराबाद (तेलंगणा), निजामाबाद (तेलंगणा), आदिलाबाद (तेलंगणा), रायपूर (छत्तीसगढ), इंदूर (मध्यप्रदेश), बडोदा (गुजरात), भोपाळ (मध्यप्रदेश), ग्वाल्हेर (मध्यप्रदेश), दिल्ली या ठिकाणी खूप वर्षांपासून मराठी माणसांच्या विविध संस्था कार्यरत आहेत. मग मराठी साहित्य संमेलन या ठिकाणी का नाही भरवले? जसे की इंदोर, हैदराबाद, बडोदा, दिल्ली येथे यापूर्वी भरलेल्या संमेलनांचा अनुभव अतिशय चांगला आहे. त्या ठिकाणी कार्य करणार्‍या संस्थांना एक नैतिक पाठबळ संमेलनामुळे मिळू शकते. काहीतरी ठाशीव भरीव भाषाविषयक काम त्या ठिकाणी उभे राहू शकते. मोरे सर हा एक साधा प्रश्न महामंडळास संमेलनाच्या व्यसपीठावरून तूम्ही विचारला असता तर त्याचा चांगला परिणाम झाला असता.

साहित्य संमेलनाची निवडणूक असली की सगळे चुप बसतात. निवडणूक संपली की हरलेला आणि विजयी दोघेही महामंडळाची निवडणुकीची पद्धत कशी चुक आहे हे मोठ्याने सांगत बसतात. मोरे सर हे सगळे बदलण्यासाठी तुम्ही पुढाकार घेणार अहात का? का इतर अध्यक्षांप्रमाणे तुम्हीही शोभेचे बाहुले बनुन वर्षभर फिरत राहणार? 

तुमाराम गाथेचा संदर्भ मी तूम्हाला द्यावा इतकी माझी लायकी नाही आणि अधिकारही नाही. तूमचा अभ्यास मोठा, अधिकार मोठा, व्यासंग दांडगा. तरी तुकाराम गाथेतील क्षेपक मानल्या गेलेल्या एका अभंगाची आठवण करून देतो. शिवाजी महाराजांचे तुकारामांना बोलावणे येते त्याला तुकाराम महाराजांनी दिलेले उत्तर असे  

तुम्हापाशी आम्ही येऊनिया काय ।
वृथा आहे सीण  चालण्याचा 
मागावे हे अन्न  तरी भिक्षा थोर ।
वस्त्रासी हे थोर चिंध्या बिंदी ॥२
निद्रेसी आसन उत्तम पाषाण 
वरी आवरण आकाशाचे ॥३
तेथे काय करणे कवनाची आस ।
वाया होय नाश आयुष्याचा ॥४
राजगृहा यावे मानाचिया आसे ।
तेथे काय वसे  समाधान ॥५
रायाचीये घरी  भाग्यवंता मान ।
इतरा सामान्य मान नाही ॥६
देखोनिया वस्त्रे  भूषणाचे जन ।
तात्काळ मरण  येते मज ॥७
ऐकोनिया मानाल  उदासता जरी ।
तरी आम्हा हरी  उपेक्षीना ॥८
आता हेची तुम्हा सांगणे कौतूक ।
भिक्षे ऐसे सुख नाही नाही ॥९
तप व्रत याग महा भले जन ।
आशाबद्ध हीन वर्तताती ॥१०
तुका म्हणे तुम्ही  श्रीमंत मानाचे ।
पूर्वीच दैवाचे हरिभक्त ॥११
(सार्थ तुकारामाची गाथा, ढवळे प्रकाशन, पृ. 961, क्षेपक अभंग क्र. 82)

साक्षात शिवाजी महाराजांशी बोलण्याची ही भाषा तूमच्या खापरखापर पणजोबांची होती. मग साहित्य महामंडळ किंवा विनोद तावडे किंवा देवेंद्र फडणवीस यांना साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून थोडेफार सुनाविण्यास तूम्हाला कोणी रोकले होते? अहो सदानंद मोरे सध्या सगळीच लाचारी आणि हरामी आहे. तूम्ही थोडा तरी तुकारामी बाणा दाखवा!...

श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575      

Saturday, April 18, 2015

धावपट्टीवरच फिरलेलं ‘घुमान’चे साहित्यीक विमान

साप्ताहिक विवेक १९  एप्रिल २०१५  

घुमानचे सहित्य संमेलन जाणिवपूर्वक गाजविण्याचा प्रयत्न आयोजकांकडून केला गेला. खरे तर गेली काही वर्षे सातत्याने अखिल भारतीय साहित्य संमेलनांवर ‘उत्सवी’ बनल्याची टीका केली होती. त्याचे भक्कम पुरावेही गेल्या काही संमेलनांनी दिले आहेत. आता त्यापुढे जावून ही संमेलने केवळ पर्यटनासाठी आहेत असेही स्पष्ट होत चालले आहे. 

चौथ्या विश्व संमेलनाला जो फटका बसला त्याचे पडसाद अजून उमटत आहेत. गेली दोन वर्षे विश्व संमेलन बंद पडले आहे. टोरांटोला हे संमेलन भरणार होते. ना.धो.महानोरांना अध्यक्ष म्हणून घोषितही केले होते. पण विमानाचा खर्च कोणी करायचा यावरून सगळं प्रकरण फिसकटलं. अजूनही कोणताही आयोजक पुढे आला नाही.

फुकटच्या पैशातून परदेशात नाही तर निदान देशात तरी विमानवारी करू अशी आशा साहित्य महामंडळाच्या पदाधिकार्‍यांमध्ये निर्माण झाली. त्यासाठी यावर्षी घुमानच्या साहित्य संमेलनाचा घाट घातल्या गेला. यात कुठलाही वाङ्मयीन हेतू नव्हता. नागपूरहून पत्रकार, विदर्भ साहित्य संघाचे पदाधिकारी, अगदी चपराशी सुद्धा बायकापोरांसोबत विमानात बसून घुमानला गेले यातून हेच स्पष्ट झाले. 

दोन रेल्वे घुमानसाठी सोडण्यात आल्या होत्या. या रेल्वेत रसिकांच्या तोंडी साहित्य चर्चा असण्याऐवजी काय होते किंवा हातात पुस्तक असण्याऐवजी पत्ते कसे होते याच्या सुरस कथा आता सर्वत्र फिरत आहेत. या गाड्या लेट होणे, त्यात कसलीही सुविधा नसणे हे कशाचे द्योतक आहे?  बरं जर साहित्य महामंडळाचा हेतू स्वच्छ होता तर मग महामंडळाचे पदाधिकारी या रेल्वेत का नव्हते? एक दोन नव्हे तर जवळपास सर्वच पदाधिकारी एक तर विमानानं गेले किंवा स्वतंत्र दुसरी व्यवस्था करून गेले. ना.धो.महानोर, विठ्ठल वाघ, सुधीर रसाळ यांसारख्या ज्येष्ठांची कुठलीही चांगली वाहतूक व्यवस्था करण्याचे संयोजकांना सुचले नाही.

प्रत्यक्ष संमेलनाच्या आयोजनाबाबतही भरपूर आक्षेप आहेत. महाराष्ट्राच्या बाहेर मराठीचा झेंडा फडकवायचा आहे असा आव महामंडळ आणि आयोजक संस्थेने आणला होता. खरं तर महाराष्ट्राच्या बाहेर पणजी (गोवा), गुलबर्गा (कर्नाटक), बंगळूरू (कर्नाटक), हैदराबाद (तेलंगणा), निझामाबाद (तेलंगणा), आदिलाबाद (तेलंगणा), रायपूर (छत्तीसगढ), इंदूर (मध्यप्रदेश), बडोदा (गुजरात), भोपाळ (मध्यप्रदेश), ग्वाल्हेर (मध्यप्रदेश), दिल्ली या ठिकाणी खूप वर्षांपासून मराठी माणसांच्या विविध संस्था कार्यरत आहेत. मग मराठी साहित्य संमेलन या ठिकाणी का नाही भरवले? जसे की इंदोर, हैदराबाद, बडोदा, दिल्ली येथे यापूर्वी भरलेल्या संमेलनांचा अनुभव अतिशय चांगला आहे. त्या ठिकाणी कार्य करणार्‍या संस्थांना एक नैतिक पाठबळ संमेलनामुळे मिळू शकते. काहीतरी ठाशीव भरीव भाषाविषयक काम त्या ठिकाणी उभे राहू शकते. पण असा कोणताही विचार महामंडळ करत नाही. 

संमेलनाना उत्सवी आणि पुढे जावून पर्यटन यात्रा बनल्याची जी बोचरी टिका ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त मराठी लेखक भालचंद्र नेमाडे यांनी केली ती योग्यच आहे असे म्हणावे लागेल. कारण नेमाडे यांनी टोमणा असा मारला की, ‘‘यापुढे मराठी साहित्य संमेलन आता काश्मिर मध्ये भरवा.’’

प्रत्यक्ष संमेलनात सादर झालेल्या कविता, परिसंवादातील भाषणे, अभिरूप न्यायालयातील वक्तव्ये यांचा दर्जा काय होता? तो मुळीच समाधानकारक नव्हता हे सिद्ध झालं आहे. असं वारंवार का घडते आहे? संमेलन महाराष्ट्रात होवो नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर त्याच्या दर्जाबाबत ही हेळसांड का चालू आहे?

याचे मुख्य कारण म्हणजे अतिशय सुमार दर्जाची माणसे महामंडळाचे पदाधिकारी आहेत. एक काळ असा होता की साहित्याच्या प्रांतात ज्यांचा दबदबा होता अशी माणसं महामंडळात असायची. आता जागोजागी दुय्यम, तिय्यम दर्जाची माणसं येवून बसली आहेत. ज्यांची पुसटशीही ओळख मराठी वाचकांना नाही. त्यांचा कुठलाही साहित्यीक दबदबा नाही. ही माणसं आपल्या आपल्या प्रदेशातील प्रतिभावंत हुडकून, नवोदित साहित्यीक शोधून, ज्येष्ठांना मनवून त्यांना संमेलनासाठी बोलावित नाहीत. उलट हे स्वत:चीच नावे निमंत्रित साहित्यीक म्हणून घुसडतात.   

आपल्याकडे एक म्हण आहे तळं राखील तो पाणी चाखील. यात ज्याला तळे राखायचे काम दिले आहे त्याने थोडेफार पाणी चाखून घेणे अपेक्षित आहे. पण उद्या तळं राखणार्‍याने सगळे पाणीच पिऊन टाकले तर त्याला काय म्हणायचे? घुमान सहित्य संमेलनाबाबत असा प्रकार नुकताच घडला आहे. 

मराठवाडा साहित्य परिषद ही साहित्य महामंडळाची घटक संस्था. या संस्थेने आपल्या परिसरातील साहित्यीकांची नावे संमेलनासाठी सुचवायची असतात. मराठवाडा साहित्य परिषदेने यावर्षी साहित्य संमेलनात सुचवलेली मराठवाड्यातील  15 नावे निमंत्रण पत्रिकेत आहेत. आश्चर्य म्हणजे या पंधरापैकी 11 जण साहित्य परिषदेचे कार्यकारिणी सदस्यच आहेत. म्हणजे ज्यांनी इतरांची नावे सुचवायची त्यांनी आपलीच नावे घुसडून घेतली. आता याला काय म्हणायचे? या महाभागांची नावे अशी. 1. रसिका देशमुख (औरंगाबाद) 2. डॉ. जगदीश कदम (नांदेड) 3. डॉ. ऋषिकेश कांबळे (औरंगाबाद) 4. प्रा. श्रीधर नांदेडकर (औरंगाबाद) 5. प्रा. भास्कर बडे (लातूर) 6. देविदास कुलकर्णी (परभणी) 7. डॉ. केशव देशमुख (नांदेड) 8. सुरेश सावंत (नांदेड) 9. प्रा. विद्या पाटील (औरंगाबाद) 10. प्रा.विलास वैद्य (हिंगोली) 11. किरण सगर (उस्मानाबाद) हे सगळे कार्यकारीणी सदस्य आहेत. 

वरील  उदाहरण हे केवळ प्रातिनिधीक आहे. सर्वत्र हेच घडताना दिसत आहे. मग प्रश्न असा निर्माण होतो की ही साहित्य संमेलने म्हणजे केवळ महामंडळाच्या पदाधिकार्‍यांची मिरवायची आणि पर्यटनाची हौस यासाठीच आहेत का? 

डॉ. सदानंद मोरे यांच्यासारखा अव्वल दर्जाचा लेखक साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवडून आला. आता अपेक्षे अशी होती की त्यांच्या भाषणावर चांगली चर्चा व्हावी. समरसता साहित्य संमेलनाने एक चांगला पायंडा पाडला आहे की अध्यक्षाच्या भाषणाचा स्वतंत्र कार्यक्रम होतो. त्या भाषणावर चर्चा होती. असा प्रकार अखिल भारतीय साहित्य संमेलनात का घडत नाही? 

महाराष्ट्रात विविध साहित्य संमेलने भरत असतात. त्यांना शासन निधी देतो. बुलढाण्याचे लेखक नरेंद्र लांजेवार यांनी माहितीच्या अधिकारात साहित्य संस्कृती मंडळाकडून 2012-13 या वर्षी किती संमेलनांना शासनाकडून निधी दिला गेला अशी विचारणा केली होती. आश्चर्य म्हणजे 26 संस्थांना साहित्य संमेलनासाठी 51 लाख इतका निधी शासनाकडून त्या वर्षी दिला गेला होता. मग आता एक साधी अपेक्षा अखिल भारतीय साहित्य संमेलनाकडून व्यक्त होते. या सगळ्या संमेलनांचे अध्यक्ष, त्यांनी मांडलेले विविध मते, त्यांच्या अपेक्षा या सगळ्याचा साकल्याने विचार अखिल भारतीय म्हणवून घेणार्‍या साहित्य संमेलनाने करायचा की नाही?  वर्षभर महाराष्ट्रात संपन्न झालेल्या विविध संमेलनांच्या अध्यक्षांना अखिल भारतीय साहित्य संमेलनात सन्मानाने निमंत्रित करून त्यांच्या विचारांवर एक चर्चा का नाही घडवून आणली जात?

साहित्य महामंडळाच्या विदर्भ साहित्य संघ, मराठवाडा साहित्य परिषद, महाराष्ट्र साहित्य परिषद आणि मुंबई साहित्य संघ या चार महात्वाच्या घटक संस्था आहेत. या संस्थांची विभागीय संमेलने दरवर्षी होत असतात. त्यांच्या अध्यक्षांना का नाही बोलावले जात? 

शिवाय कोकण साहित्य परिषद- जिला की संलग्न संस्था म्हणून अजून मान्यता देण्यात आली नाही- नियमितपणे आपली संमेलने भरवते. दक्षिण महाराष्ट्र साहित्य परिषद कोल्हापुरला अस्तित्वात आहे. या सगळ्यांना सामावून घेण्यात महामंडळाला कुठला कमीपणा वाटतो आहे?

घुमान संमेलनाने अखिल भारतीय संमेलनाला ‘टूर ऍण्ड ट्रॅव्हल्स एजन्सी’चे स्वरूप आणले आहे. याच वाटेने आपण पुढे गेलो तर काही दिवसांनी ट्रॅव्हलींग कंपन्या महामंडळाचा सगळा कारभार आपल्या हातात घेतील. साहित्य दुय्यम ठरेल आणि पर्यटनाला महत्त्व येवून बसेल. हे होवू द्यायचं की नाही याचा गंभिर विचार करावा लागणार आहे.

ज्या ज्या ठिकाणी संमेलन पार पडते त्या ठिकाणी नियमितपणे साहित्यविषयक काही उपक्रम पुढे सातत्याने होतात का? परभणीला 1995 मध्ये अखिल भारतीय साहित्य संमेलन पार पडले होते. त्याच्या शिल्लक निधीतून ‘अक्षर प्रतिष्ठा’ या नावाने एक संस्था स्थापून नियमित स्वरूपात जिल्हा साहित्य संमेलने, दिवाळी अंक असे विविध उपक्रम राबविले गेले होते. असे काही इतर ठिकाणी घडले का? सासवडला मागच्या वर्षी साहित्य संमेलन पार पडले. आज तिथे काय चालू आहे? त्या आधी चिपळूणला साहित्य संमेलन संपन्न झाले होते. नितीन चंद्रकांत देसाई यांनी संमेलनासाठी भव्य दिव्य देखावा भरपूर पैसे घेवून उभारला होता. आता चिपळूणला काय आहे? त्या आधी चंद्रपुरला साहित्य संमेलन झाले होते. तिथे आता काय घडते आहे? मग ही साहित्य महामंडळाची जबाबदारी नाही का? का केवळ विमानातून संमेलनाला जाणे आणि पर्यटन करून येणे इतकेच साहित्य महामंडळाचे काम आहे? 

आहे त्या स्वरूपात साहित्य संमेलने होणार असतील तर त्यातून काहीही निष्पन्न होणार नाही. साठा उत्तराची कहाणी मुळीच सुफळ संपन्न होणार नाही. नको त्या माणसांच्या पदरात स्वार्थाचे नको ते फळ तेवढे पडेल. सामान्य रसिक उपाशीच राहतील, मराठी भाषा, मराठी साहित्य उपेक्षीतच राहिल.

नामदेवांनी म्हटले होते

तीर्थे करोनी नामा पंढरीये आला । जिवलगा भेटला विठोबासी ॥
सद्गदित कंठ वोसंडला नयनी । घातली लोळणी चरणावरी ॥
शिणलो पंढरिराया पाहे कृपादृष्टी । थोर जालो हिंपुटी तुजविण ॥
अज्ञानाचा भाग होता माझे मनी । हिंडविले म्हणोनि देशोदेशी ॥
परि पंढरीचे सुख पाहतां कोटि वाटे । स्वप्नीही परि कोठे न देखेंची ॥
(श्री नामदेव गाथा, साहित्य संस्कृती मंडळ, अभंग क्र. 923)

नामदेवांना सगळी तीर्थयात्रा केल्यावर पंढरीच कशी चांगली आहे हे पटले. तसेच मराठी रसिक, प्रकाशक, लेखक यांना कल्पना आली असेल की हे संमेलन म्हणजे निव्वळ तीर्थयात्रा आहे. त्याचा साहित्याशी काही संबंध नाही. पुस्तक विक्रीशी काही संबंध नाही. नेहमीच्याच रटाळ भाषणांतून काहीच भेटले नाही. उगीच हेलपाटा पडला. आपली पंढरीच बरी.

साहित्यीक दृष्ट्या घुमानचे विमान उडालेच नाही. त्यानं नुस्त्याच धावपट्टीवर फेर्‍या मारल्या. महामंडळाच्या सदस्यांनी आपली हौस भागवून घेतली. बाकी काही नाही. 

श्रीकांत अनंत उमरीकर
जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद मो. 9422878575

  
  
  

Tuesday, April 14, 2015

बाबासाहेबांचे तत्त्व जपणारी कचरावाली आशाबाई !

उरूस, दैनिक पुण्य नगरी, मंगळवार  15 एप्रिल 2015 

बाबासाहेब आंबेडकरांची जयंती म्हटलं की त्यावर विविध पद्धतीनं प्रतिक्रिया उमटतात. बहुतांश सवर्ण समाज, ‘‘निळ्या झेंड्यावाल्यांची आज दिवाळी आहे.’’ आहे म्हणत आजही आपली नैतिक जबाबदारी झटकून बाजूला होतो. एखादा उत्सव साजरा करणे, बँड वाजवणे, डिजेच्या धमाकेदार संगीतावर बेफाम नाचणे म्हणजे मागासपणा समजणारा  उच्चशिक्षित वर्ग. यांना जर विचारले की, ‘‘का हो तूमच्या घरी बाबासाहेबांचे एक तरी पुस्तक आहे का?’’ तर त्यांची तोंडं पहाण्यासारखी होतात. 

दुसरीकडे बाबासाहेबांचे अनुयायी म्हणवून घेणारे आहेत. त्यांच्याकडे अर्थातच किमान बाबासाहेबांचा एक तरी फोटो असतोच. शिवाय बाबासाहेबांचे एखादे तरी पुस्तक असतेच. त्यांना आपण विचारले की, ‘‘का हो, बाबासाहेबांचे हे पुस्तक तुमच्या घरात आहे त्याचे कधी संपूर्ण वाचन तूम्ही केले का? ’’ परत तोच जूना अनुभव आपल्याला येतो. याचे तोंड पहाण्यासारखे होते कारण त्याने ते वाचलेले नसते. 
कुसुमाग्रजांची एक सुंदर कविता आहे, 

महापुरूष मरतात तेंव्हा
जागोजागचे संगमरवरी दगड
जागे होतात
आणि चौकातल्या शिल्पात
त्यांचे आत्मे चिणून
त्यांना मारतात
पुन्हा एकदा... बहुधा कायमचेच.
म्हणून-
महापुरूषाला मरण असते दोनदा
एकदा वैर्‍यांकडून 
आणि नंतर भक्तांकडून..
(छंदोमयी, पॉप्युलर प्रकाशन, पृ. क्र.26)

एक  मोठी शोकांतिकाच बाबासाहेबांच्या बाबतीत घडली आहे. अतिशय स्वाभिमानी, कष्टाळू, लढवय्या असलेल्या पूर्वाश्रमीच्या महार जातीला त्यांनी आत्मभानाची जाणीव करून दिली. त्यांना स्वाभिमान शिकवला. बाबासाहेबांना वाटले होतं की गुलामाला गुलामीची जाणीव करून दिली की तो बंड करून उठेल. आज परिस्थिती अशी आहे की बहुतांश दलितवर्ग राखीव जागांच्या, सरकारी नौकरीच्या लाचारीत गुरफटून गेलाय. 

निवडणुकीच्या काळात तर हे स्पष्ट दिसते की नेते केवळ त्यांना मिळणार्‍या एखाद्या दुसर्‍या सत्तेच्या तुकड्यासाठी मोठमोठ्याने गर्जत असतात. भुकंत असतात. एखादा छोटा मोठा सत्तेचा मिळाला की ते भूंकणे थांबवून शेपूट हालवायला लागतात. 

अशा वातावरणात आशाबाई डोके नावाची औरंगाबादची एक सामान्य कचरा वेचणारी बाई बाबासाहेबांचे स्वाभिमानाचे तत्त्व उराशी बाळगते. आपल्यासारख्या अजून सहा बायका गोळा करते. या सात बायका मिळून एक छोटीशी जागा भाड्यानं घेतात. आपण गोळा केलेला कचरा तिथे साठवतात. त्याची वर्गवारी करतात. स्वत:चा कचर्‍याचा व्यवसाय सुरू करतात. हे मोठं विलक्षण आहे. 

या सगळ्या दलित बायका अतिशय सामान्य परिस्थितीतल्या आहेत. त्यांचा दिवस पहाटे पहाटेच सुरू होतो. ठरलेल्या भागात फिरून त्या रस्त्यावर पडलेल्या प्लॅस्टिकच्या बाटल्या, कागद, धातुचे तुकडे, प्लॅस्टिक गोळा करतात. साधारणत: शंभर किलो माल भरेल इतक्या मोठ्या गोणीत हे साठवून ठरलेल्या जागी ठेवून देतात. त्यांचा नेहमीचा रिक्क्षावाला ही गोणी उचलून भंगार खरेदी करणार्‍या दुकानदाराकडे 30 रूपयात नेवून ठेवतो. 
तोपर्यंत या बायका घरी जावून स्वयंपाक करून स्वत: जेवून दुकानाकडे येतात. आपल्या गोणीतील मालाची थोडीफार वर्गवारी करतात. काहीतरी घासाघिस करून तो मला विकून हाती पडलेले दोन तीनशे रूपये घेवून घरी येतात. हा सगळा क्र्रम बदलून टाकावा असं आशाबाईला वाटले. कारण यात एक तर त्यांच्या मालाचे नीट वजन होत नव्हते. शिवाय त्यांनी गोळा केलेल्या मालातील काही माल दुकानदार विकत घेण्यास तयार नसायचा. असा माल फेकून देणे किंवा दुकानदार घेईन तेवढाच माल गोळा करणे इतकाच पर्याय त्यांना उरायचा. 

आशाबाईने हिंमत केली. सोबत यायला तयार असणार्‍या सहा बायकांना गोळा केलेला माल साठवायची कल्पना सांगितली. त्यासाठी एक मोकळी जागा पत्र्याचे मोडके छत असलेली भाड्याने घेतली. एक तराजू आणून तिथे बसवला. आणि आपण गोळा केलेल्या कचर्‍याची वर्गवारी करून साठवायला सुरवात केली. म्हणजे  प्लॅस्टिकच्या बाटल्या वेगळ्या, कागद वेगळा, पुठ्ठे वेगळे, धातूचे तुकडे वेगळे, प्लॅस्टिकचे तुकडे वेगळे. आणि असा गोळा झालेला माल घेण्यासाठी त्या त्या व्यापार्‍याला बोलावून आपल्या जागेवर त्याचे वजन करून भाव केला. या सगळ्यातून त्यांच्या असे लक्षात आले की ज्या मालाला आपल्याला फक्त दोन अडीच रूपये भाव भेटतो त्याला आता सरासरी किमान सहा रूपयेपर्यंत भाव मिळत आहे. गेली सहा महिने आशाबाई आणि त्यांच्या सहकारी महिलांनी हे कचर्‍याचे दुकान चालवून आपली हिंमत सिद्ध केली आहे.

आशाबाईंना मी भेटलो तेंव्हा त्या सिंधी कॉलनी (औरंगाबाद) येथे काम करत होत्या. त्यांच्या इंदिरा नगर मध्ये त्यांनी येण्याचे आमंत्रण दिले. जेंव्हा मी आणि ऍड. महेश भोसले दोन दिवसांनी तिथे पोचलो तर कुठे जायचे हेच आम्हाला कळेना. मग त्यांनी बाबासाहेबांच्या पुुतळ्याची खुण सांगितली. 

ती जागा म्हणजे बाबासाहेबांच्या एक छोट्या पुतळ्याभोवती लोखंडाची जाळी करून त्यावर पत्र्याचे छत केले होते. खाली साधी शहाबादी फरशी होती. अशा प्रकारे ते छोटे सभागृह भिंती नसलेले तयार झाले होते. आम्ही चप्पल काढून बाबासाहेबांच्या पुतळ्याला वंदन करून बसलो. आमच्या या साध्या कृतीने त्या बायकांना आमच्याबद्दल अतोनात विश्वास निर्माण झाला. त्यांच्याशी बोलताना मला आश्चर्याचे धक्के बसत गेले. या सामान्य कचरा वेचणार्‍या दलित बायका कुठलीही लाचारीची, सुटसबसिडीची, अनुदानाची मागणी करत नव्हत्या. फुकटात कुठलीही मदत मागत नव्हत्या. आम्हाला आमचे दुकान सुरू करायला मदत करा. थोडेसे पैसे उभारून द्या. आम्ही भंगारवाल्यांकडून घेतलेली उचल वापस करतो. जास्तीत जास्त बायका या उचल घेतल्यामुळे अडकल्या आहेत. आम्ही घेतलेले पैसे व्याजानं परत करतो आणि आमच्या पायावर उभ्या राहतो. दुकानदाराकडून आमची लूट होते. ती आम्हाला थांबवायची आहे. चार पैसे जास्तीचे मिळवायचे आहेत. तो दुकानदार आमचा दुष्मन नाही. पण आम्हाला त्याच्या कह्यात रहायचे नाही. 

मी आशाबाईंना पुढे दुकान सुरू झाल्यावर हे विचारले की, ‘‘आशाबाई ही हिंमत तुमच्यात कुठून आली?’’ त्या सामान्य बाईने दिलेले उत्तर साधे पण मोठे विलक्षण होते. आशाबाई म्हणाली, ‘‘साहेब, आम्ही बाबासाहेबांना लई मानतो. त्यांनी स्वाभिमानानं जगा असं सांगितली. म्हारकी सोडून आम्ही शहराकडे आलो. इथं परत लाचारी काहापाई करायची? आपल्या मनगटात हिंमत हाय. कशाला मागं सरायचं?’’ सुट सबसिडी, अनुदान, दलितांसाठी मोठमोठ्या योजना, राखीव जागा काही काही मागत नव्हती आशाबाई. केवळ तिच्या छोट्या दुकानासाठी छोटी मदत मागत होती आणि तीही व्याजानं परत करायच्या अटीवर. (ती आम्ही वैयक्तिक पातळीवर त्यांना दिली. मोठमोठ्या संस्था अजूनही त्यांना मदत कशी करायची यावर सखोल विचार करून कालहरण करत आहेत.) 

आज आशाबाईचे दुकान दिमाखात उभे आहे. बाबासाहेबांच्या जयंतीच्या मुहूर्तावर या दुकानावर कदाचित आज रोषणाई केली जाईल.  या रोषणाईपेक्षा या बायकांच्या डोळ्यांत उजळणारे स्वाभिमानाचे दिवे जास्त तेज दाखवत आहेत. बाबासाहेबांच्या विचारांचा खरा अर्थ एका सामान्या आशाबाईला जो कळला तो मोठ्मोठ्या विद्वानांना कधी कळेल आणि तो कळल्यावर त्यांच्या हातून तशी कृती कधी घडेल?      


श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575