उरूस, दैनिक पुण्य नगरी, मंगळवार 15 एप्रिल 2015
बाबासाहेब आंबेडकरांची जयंती म्हटलं की त्यावर विविध पद्धतीनं प्रतिक्रिया उमटतात. बहुतांश सवर्ण समाज, ‘‘निळ्या झेंड्यावाल्यांची आज दिवाळी आहे.’’ आहे म्हणत आजही आपली नैतिक जबाबदारी झटकून बाजूला होतो. एखादा उत्सव साजरा करणे, बँड वाजवणे, डिजेच्या धमाकेदार संगीतावर बेफाम नाचणे म्हणजे मागासपणा समजणारा उच्चशिक्षित वर्ग. यांना जर विचारले की, ‘‘का हो तूमच्या घरी बाबासाहेबांचे एक तरी पुस्तक आहे का?’’ तर त्यांची तोंडं पहाण्यासारखी होतात.
दुसरीकडे बाबासाहेबांचे अनुयायी म्हणवून घेणारे आहेत. त्यांच्याकडे अर्थातच किमान बाबासाहेबांचा एक तरी फोटो असतोच. शिवाय बाबासाहेबांचे एखादे तरी पुस्तक असतेच. त्यांना आपण विचारले की, ‘‘का हो, बाबासाहेबांचे हे पुस्तक तुमच्या घरात आहे त्याचे कधी संपूर्ण वाचन तूम्ही केले का? ’’ परत तोच जूना अनुभव आपल्याला येतो. याचे तोंड पहाण्यासारखे होते कारण त्याने ते वाचलेले नसते.
कुसुमाग्रजांची एक सुंदर कविता आहे,
महापुरूष मरतात तेंव्हा
जागोजागचे संगमरवरी दगड
जागे होतात
आणि चौकातल्या शिल्पात
त्यांचे आत्मे चिणून
त्यांना मारतात
पुन्हा एकदा... बहुधा कायमचेच.
म्हणून-
महापुरूषाला मरण असते दोनदा
एकदा वैर्यांकडून
आणि नंतर भक्तांकडून..
(छंदोमयी, पॉप्युलर प्रकाशन, पृ. क्र.26)
एक मोठी शोकांतिकाच बाबासाहेबांच्या बाबतीत घडली आहे. अतिशय स्वाभिमानी, कष्टाळू, लढवय्या असलेल्या पूर्वाश्रमीच्या महार जातीला त्यांनी आत्मभानाची जाणीव करून दिली. त्यांना स्वाभिमान शिकवला. बाबासाहेबांना वाटले होतं की गुलामाला गुलामीची जाणीव करून दिली की तो बंड करून उठेल. आज परिस्थिती अशी आहे की बहुतांश दलितवर्ग राखीव जागांच्या, सरकारी नौकरीच्या लाचारीत गुरफटून गेलाय.
निवडणुकीच्या काळात तर हे स्पष्ट दिसते की नेते केवळ त्यांना मिळणार्या एखाद्या दुसर्या सत्तेच्या तुकड्यासाठी मोठमोठ्याने गर्जत असतात. भुकंत असतात. एखादा छोटा मोठा सत्तेचा मिळाला की ते भूंकणे थांबवून शेपूट हालवायला लागतात.
अशा वातावरणात आशाबाई डोके नावाची औरंगाबादची एक सामान्य कचरा वेचणारी बाई बाबासाहेबांचे स्वाभिमानाचे तत्त्व उराशी बाळगते. आपल्यासारख्या अजून सहा बायका गोळा करते. या सात बायका मिळून एक छोटीशी जागा भाड्यानं घेतात. आपण गोळा केलेला कचरा तिथे साठवतात. त्याची वर्गवारी करतात. स्वत:चा कचर्याचा व्यवसाय सुरू करतात. हे मोठं विलक्षण आहे.
या सगळ्या दलित बायका अतिशय सामान्य परिस्थितीतल्या आहेत. त्यांचा दिवस पहाटे पहाटेच सुरू होतो. ठरलेल्या भागात फिरून त्या रस्त्यावर पडलेल्या प्लॅस्टिकच्या बाटल्या, कागद, धातुचे तुकडे, प्लॅस्टिक गोळा करतात. साधारणत: शंभर किलो माल भरेल इतक्या मोठ्या गोणीत हे साठवून ठरलेल्या जागी ठेवून देतात. त्यांचा नेहमीचा रिक्क्षावाला ही गोणी उचलून भंगार खरेदी करणार्या दुकानदाराकडे 30 रूपयात नेवून ठेवतो.
तोपर्यंत या बायका घरी जावून स्वयंपाक करून स्वत: जेवून दुकानाकडे येतात. आपल्या गोणीतील मालाची थोडीफार वर्गवारी करतात. काहीतरी घासाघिस करून तो मला विकून हाती पडलेले दोन तीनशे रूपये घेवून घरी येतात. हा सगळा क्र्रम बदलून टाकावा असं आशाबाईला वाटले. कारण यात एक तर त्यांच्या मालाचे नीट वजन होत नव्हते. शिवाय त्यांनी गोळा केलेल्या मालातील काही माल दुकानदार विकत घेण्यास तयार नसायचा. असा माल फेकून देणे किंवा दुकानदार घेईन तेवढाच माल गोळा करणे इतकाच पर्याय त्यांना उरायचा.
आशाबाईने हिंमत केली. सोबत यायला तयार असणार्या सहा बायकांना गोळा केलेला माल साठवायची कल्पना सांगितली. त्यासाठी एक मोकळी जागा पत्र्याचे मोडके छत असलेली भाड्याने घेतली. एक तराजू आणून तिथे बसवला. आणि आपण गोळा केलेल्या कचर्याची वर्गवारी करून साठवायला सुरवात केली. म्हणजे प्लॅस्टिकच्या बाटल्या वेगळ्या, कागद वेगळा, पुठ्ठे वेगळे, धातूचे तुकडे वेगळे, प्लॅस्टिकचे तुकडे वेगळे. आणि असा गोळा झालेला माल घेण्यासाठी त्या त्या व्यापार्याला बोलावून आपल्या जागेवर त्याचे वजन करून भाव केला. या सगळ्यातून त्यांच्या असे लक्षात आले की ज्या मालाला आपल्याला फक्त दोन अडीच रूपये भाव भेटतो त्याला आता सरासरी किमान सहा रूपयेपर्यंत भाव मिळत आहे. गेली सहा महिने आशाबाई आणि त्यांच्या सहकारी महिलांनी हे कचर्याचे दुकान चालवून आपली हिंमत सिद्ध केली आहे.
आशाबाईंना मी भेटलो तेंव्हा त्या सिंधी कॉलनी (औरंगाबाद) येथे काम करत होत्या. त्यांच्या इंदिरा नगर मध्ये त्यांनी येण्याचे आमंत्रण दिले. जेंव्हा मी आणि ऍड. महेश भोसले दोन दिवसांनी तिथे पोचलो तर कुठे जायचे हेच आम्हाला कळेना. मग त्यांनी बाबासाहेबांच्या पुुतळ्याची खुण सांगितली.
ती जागा म्हणजे बाबासाहेबांच्या एक छोट्या पुतळ्याभोवती लोखंडाची जाळी करून त्यावर पत्र्याचे छत केले होते. खाली साधी शहाबादी फरशी होती. अशा प्रकारे ते छोटे सभागृह भिंती नसलेले तयार झाले होते. आम्ही चप्पल काढून बाबासाहेबांच्या पुतळ्याला वंदन करून बसलो. आमच्या या साध्या कृतीने त्या बायकांना आमच्याबद्दल अतोनात विश्वास निर्माण झाला. त्यांच्याशी बोलताना मला आश्चर्याचे धक्के बसत गेले. या सामान्य कचरा वेचणार्या दलित बायका कुठलीही लाचारीची, सुटसबसिडीची, अनुदानाची मागणी करत नव्हत्या. फुकटात कुठलीही मदत मागत नव्हत्या. आम्हाला आमचे दुकान सुरू करायला मदत करा. थोडेसे पैसे उभारून द्या. आम्ही भंगारवाल्यांकडून घेतलेली उचल वापस करतो. जास्तीत जास्त बायका या उचल घेतल्यामुळे अडकल्या आहेत. आम्ही घेतलेले पैसे व्याजानं परत करतो आणि आमच्या पायावर उभ्या राहतो. दुकानदाराकडून आमची लूट होते. ती आम्हाला थांबवायची आहे. चार पैसे जास्तीचे मिळवायचे आहेत. तो दुकानदार आमचा दुष्मन नाही. पण आम्हाला त्याच्या कह्यात रहायचे नाही.
मी आशाबाईंना पुढे दुकान सुरू झाल्यावर हे विचारले की, ‘‘आशाबाई ही हिंमत तुमच्यात कुठून आली?’’ त्या सामान्य बाईने दिलेले उत्तर साधे पण मोठे विलक्षण होते. आशाबाई म्हणाली, ‘‘साहेब, आम्ही बाबासाहेबांना लई मानतो. त्यांनी स्वाभिमानानं जगा असं सांगितली. म्हारकी सोडून आम्ही शहराकडे आलो. इथं परत लाचारी काहापाई करायची? आपल्या मनगटात हिंमत हाय. कशाला मागं सरायचं?’’ सुट सबसिडी, अनुदान, दलितांसाठी मोठमोठ्या योजना, राखीव जागा काही काही मागत नव्हती आशाबाई. केवळ तिच्या छोट्या दुकानासाठी छोटी मदत मागत होती आणि तीही व्याजानं परत करायच्या अटीवर. (ती आम्ही वैयक्तिक पातळीवर त्यांना दिली. मोठमोठ्या संस्था अजूनही त्यांना मदत कशी करायची यावर सखोल विचार करून कालहरण करत आहेत.)
आज आशाबाईचे दुकान दिमाखात उभे आहे. बाबासाहेबांच्या जयंतीच्या मुहूर्तावर या दुकानावर कदाचित आज रोषणाई केली जाईल. या रोषणाईपेक्षा या बायकांच्या डोळ्यांत उजळणारे स्वाभिमानाचे दिवे जास्त तेज दाखवत आहेत. बाबासाहेबांच्या विचारांचा खरा अर्थ एका सामान्या आशाबाईला जो कळला तो मोठ्मोठ्या विद्वानांना कधी कळेल आणि तो कळल्यावर त्यांच्या हातून तशी कृती कधी घडेल?
श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575
No comments:
Post a Comment