Saturday, April 18, 2015

धावपट्टीवरच फिरलेलं ‘घुमान’चे साहित्यीक विमान

साप्ताहिक विवेक १९  एप्रिल २०१५  

घुमानचे सहित्य संमेलन जाणिवपूर्वक गाजविण्याचा प्रयत्न आयोजकांकडून केला गेला. खरे तर गेली काही वर्षे सातत्याने अखिल भारतीय साहित्य संमेलनांवर ‘उत्सवी’ बनल्याची टीका केली होती. त्याचे भक्कम पुरावेही गेल्या काही संमेलनांनी दिले आहेत. आता त्यापुढे जावून ही संमेलने केवळ पर्यटनासाठी आहेत असेही स्पष्ट होत चालले आहे. 

चौथ्या विश्व संमेलनाला जो फटका बसला त्याचे पडसाद अजून उमटत आहेत. गेली दोन वर्षे विश्व संमेलन बंद पडले आहे. टोरांटोला हे संमेलन भरणार होते. ना.धो.महानोरांना अध्यक्ष म्हणून घोषितही केले होते. पण विमानाचा खर्च कोणी करायचा यावरून सगळं प्रकरण फिसकटलं. अजूनही कोणताही आयोजक पुढे आला नाही.

फुकटच्या पैशातून परदेशात नाही तर निदान देशात तरी विमानवारी करू अशी आशा साहित्य महामंडळाच्या पदाधिकार्‍यांमध्ये निर्माण झाली. त्यासाठी यावर्षी घुमानच्या साहित्य संमेलनाचा घाट घातल्या गेला. यात कुठलाही वाङ्मयीन हेतू नव्हता. नागपूरहून पत्रकार, विदर्भ साहित्य संघाचे पदाधिकारी, अगदी चपराशी सुद्धा बायकापोरांसोबत विमानात बसून घुमानला गेले यातून हेच स्पष्ट झाले. 

दोन रेल्वे घुमानसाठी सोडण्यात आल्या होत्या. या रेल्वेत रसिकांच्या तोंडी साहित्य चर्चा असण्याऐवजी काय होते किंवा हातात पुस्तक असण्याऐवजी पत्ते कसे होते याच्या सुरस कथा आता सर्वत्र फिरत आहेत. या गाड्या लेट होणे, त्यात कसलीही सुविधा नसणे हे कशाचे द्योतक आहे?  बरं जर साहित्य महामंडळाचा हेतू स्वच्छ होता तर मग महामंडळाचे पदाधिकारी या रेल्वेत का नव्हते? एक दोन नव्हे तर जवळपास सर्वच पदाधिकारी एक तर विमानानं गेले किंवा स्वतंत्र दुसरी व्यवस्था करून गेले. ना.धो.महानोर, विठ्ठल वाघ, सुधीर रसाळ यांसारख्या ज्येष्ठांची कुठलीही चांगली वाहतूक व्यवस्था करण्याचे संयोजकांना सुचले नाही.

प्रत्यक्ष संमेलनाच्या आयोजनाबाबतही भरपूर आक्षेप आहेत. महाराष्ट्राच्या बाहेर मराठीचा झेंडा फडकवायचा आहे असा आव महामंडळ आणि आयोजक संस्थेने आणला होता. खरं तर महाराष्ट्राच्या बाहेर पणजी (गोवा), गुलबर्गा (कर्नाटक), बंगळूरू (कर्नाटक), हैदराबाद (तेलंगणा), निझामाबाद (तेलंगणा), आदिलाबाद (तेलंगणा), रायपूर (छत्तीसगढ), इंदूर (मध्यप्रदेश), बडोदा (गुजरात), भोपाळ (मध्यप्रदेश), ग्वाल्हेर (मध्यप्रदेश), दिल्ली या ठिकाणी खूप वर्षांपासून मराठी माणसांच्या विविध संस्था कार्यरत आहेत. मग मराठी साहित्य संमेलन या ठिकाणी का नाही भरवले? जसे की इंदोर, हैदराबाद, बडोदा, दिल्ली येथे यापूर्वी भरलेल्या संमेलनांचा अनुभव अतिशय चांगला आहे. त्या ठिकाणी कार्य करणार्‍या संस्थांना एक नैतिक पाठबळ संमेलनामुळे मिळू शकते. काहीतरी ठाशीव भरीव भाषाविषयक काम त्या ठिकाणी उभे राहू शकते. पण असा कोणताही विचार महामंडळ करत नाही. 

संमेलनाना उत्सवी आणि पुढे जावून पर्यटन यात्रा बनल्याची जी बोचरी टिका ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त मराठी लेखक भालचंद्र नेमाडे यांनी केली ती योग्यच आहे असे म्हणावे लागेल. कारण नेमाडे यांनी टोमणा असा मारला की, ‘‘यापुढे मराठी साहित्य संमेलन आता काश्मिर मध्ये भरवा.’’

प्रत्यक्ष संमेलनात सादर झालेल्या कविता, परिसंवादातील भाषणे, अभिरूप न्यायालयातील वक्तव्ये यांचा दर्जा काय होता? तो मुळीच समाधानकारक नव्हता हे सिद्ध झालं आहे. असं वारंवार का घडते आहे? संमेलन महाराष्ट्रात होवो नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर त्याच्या दर्जाबाबत ही हेळसांड का चालू आहे?

याचे मुख्य कारण म्हणजे अतिशय सुमार दर्जाची माणसे महामंडळाचे पदाधिकारी आहेत. एक काळ असा होता की साहित्याच्या प्रांतात ज्यांचा दबदबा होता अशी माणसं महामंडळात असायची. आता जागोजागी दुय्यम, तिय्यम दर्जाची माणसं येवून बसली आहेत. ज्यांची पुसटशीही ओळख मराठी वाचकांना नाही. त्यांचा कुठलाही साहित्यीक दबदबा नाही. ही माणसं आपल्या आपल्या प्रदेशातील प्रतिभावंत हुडकून, नवोदित साहित्यीक शोधून, ज्येष्ठांना मनवून त्यांना संमेलनासाठी बोलावित नाहीत. उलट हे स्वत:चीच नावे निमंत्रित साहित्यीक म्हणून घुसडतात.   

आपल्याकडे एक म्हण आहे तळं राखील तो पाणी चाखील. यात ज्याला तळे राखायचे काम दिले आहे त्याने थोडेफार पाणी चाखून घेणे अपेक्षित आहे. पण उद्या तळं राखणार्‍याने सगळे पाणीच पिऊन टाकले तर त्याला काय म्हणायचे? घुमान सहित्य संमेलनाबाबत असा प्रकार नुकताच घडला आहे. 

मराठवाडा साहित्य परिषद ही साहित्य महामंडळाची घटक संस्था. या संस्थेने आपल्या परिसरातील साहित्यीकांची नावे संमेलनासाठी सुचवायची असतात. मराठवाडा साहित्य परिषदेने यावर्षी साहित्य संमेलनात सुचवलेली मराठवाड्यातील  15 नावे निमंत्रण पत्रिकेत आहेत. आश्चर्य म्हणजे या पंधरापैकी 11 जण साहित्य परिषदेचे कार्यकारिणी सदस्यच आहेत. म्हणजे ज्यांनी इतरांची नावे सुचवायची त्यांनी आपलीच नावे घुसडून घेतली. आता याला काय म्हणायचे? या महाभागांची नावे अशी. 1. रसिका देशमुख (औरंगाबाद) 2. डॉ. जगदीश कदम (नांदेड) 3. डॉ. ऋषिकेश कांबळे (औरंगाबाद) 4. प्रा. श्रीधर नांदेडकर (औरंगाबाद) 5. प्रा. भास्कर बडे (लातूर) 6. देविदास कुलकर्णी (परभणी) 7. डॉ. केशव देशमुख (नांदेड) 8. सुरेश सावंत (नांदेड) 9. प्रा. विद्या पाटील (औरंगाबाद) 10. प्रा.विलास वैद्य (हिंगोली) 11. किरण सगर (उस्मानाबाद) हे सगळे कार्यकारीणी सदस्य आहेत. 

वरील  उदाहरण हे केवळ प्रातिनिधीक आहे. सर्वत्र हेच घडताना दिसत आहे. मग प्रश्न असा निर्माण होतो की ही साहित्य संमेलने म्हणजे केवळ महामंडळाच्या पदाधिकार्‍यांची मिरवायची आणि पर्यटनाची हौस यासाठीच आहेत का? 

डॉ. सदानंद मोरे यांच्यासारखा अव्वल दर्जाचा लेखक साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवडून आला. आता अपेक्षे अशी होती की त्यांच्या भाषणावर चांगली चर्चा व्हावी. समरसता साहित्य संमेलनाने एक चांगला पायंडा पाडला आहे की अध्यक्षाच्या भाषणाचा स्वतंत्र कार्यक्रम होतो. त्या भाषणावर चर्चा होती. असा प्रकार अखिल भारतीय साहित्य संमेलनात का घडत नाही? 

महाराष्ट्रात विविध साहित्य संमेलने भरत असतात. त्यांना शासन निधी देतो. बुलढाण्याचे लेखक नरेंद्र लांजेवार यांनी माहितीच्या अधिकारात साहित्य संस्कृती मंडळाकडून 2012-13 या वर्षी किती संमेलनांना शासनाकडून निधी दिला गेला अशी विचारणा केली होती. आश्चर्य म्हणजे 26 संस्थांना साहित्य संमेलनासाठी 51 लाख इतका निधी शासनाकडून त्या वर्षी दिला गेला होता. मग आता एक साधी अपेक्षा अखिल भारतीय साहित्य संमेलनाकडून व्यक्त होते. या सगळ्या संमेलनांचे अध्यक्ष, त्यांनी मांडलेले विविध मते, त्यांच्या अपेक्षा या सगळ्याचा साकल्याने विचार अखिल भारतीय म्हणवून घेणार्‍या साहित्य संमेलनाने करायचा की नाही?  वर्षभर महाराष्ट्रात संपन्न झालेल्या विविध संमेलनांच्या अध्यक्षांना अखिल भारतीय साहित्य संमेलनात सन्मानाने निमंत्रित करून त्यांच्या विचारांवर एक चर्चा का नाही घडवून आणली जात?

साहित्य महामंडळाच्या विदर्भ साहित्य संघ, मराठवाडा साहित्य परिषद, महाराष्ट्र साहित्य परिषद आणि मुंबई साहित्य संघ या चार महात्वाच्या घटक संस्था आहेत. या संस्थांची विभागीय संमेलने दरवर्षी होत असतात. त्यांच्या अध्यक्षांना का नाही बोलावले जात? 

शिवाय कोकण साहित्य परिषद- जिला की संलग्न संस्था म्हणून अजून मान्यता देण्यात आली नाही- नियमितपणे आपली संमेलने भरवते. दक्षिण महाराष्ट्र साहित्य परिषद कोल्हापुरला अस्तित्वात आहे. या सगळ्यांना सामावून घेण्यात महामंडळाला कुठला कमीपणा वाटतो आहे?

घुमान संमेलनाने अखिल भारतीय संमेलनाला ‘टूर ऍण्ड ट्रॅव्हल्स एजन्सी’चे स्वरूप आणले आहे. याच वाटेने आपण पुढे गेलो तर काही दिवसांनी ट्रॅव्हलींग कंपन्या महामंडळाचा सगळा कारभार आपल्या हातात घेतील. साहित्य दुय्यम ठरेल आणि पर्यटनाला महत्त्व येवून बसेल. हे होवू द्यायचं की नाही याचा गंभिर विचार करावा लागणार आहे.

ज्या ज्या ठिकाणी संमेलन पार पडते त्या ठिकाणी नियमितपणे साहित्यविषयक काही उपक्रम पुढे सातत्याने होतात का? परभणीला 1995 मध्ये अखिल भारतीय साहित्य संमेलन पार पडले होते. त्याच्या शिल्लक निधीतून ‘अक्षर प्रतिष्ठा’ या नावाने एक संस्था स्थापून नियमित स्वरूपात जिल्हा साहित्य संमेलने, दिवाळी अंक असे विविध उपक्रम राबविले गेले होते. असे काही इतर ठिकाणी घडले का? सासवडला मागच्या वर्षी साहित्य संमेलन पार पडले. आज तिथे काय चालू आहे? त्या आधी चिपळूणला साहित्य संमेलन संपन्न झाले होते. नितीन चंद्रकांत देसाई यांनी संमेलनासाठी भव्य दिव्य देखावा भरपूर पैसे घेवून उभारला होता. आता चिपळूणला काय आहे? त्या आधी चंद्रपुरला साहित्य संमेलन झाले होते. तिथे आता काय घडते आहे? मग ही साहित्य महामंडळाची जबाबदारी नाही का? का केवळ विमानातून संमेलनाला जाणे आणि पर्यटन करून येणे इतकेच साहित्य महामंडळाचे काम आहे? 

आहे त्या स्वरूपात साहित्य संमेलने होणार असतील तर त्यातून काहीही निष्पन्न होणार नाही. साठा उत्तराची कहाणी मुळीच सुफळ संपन्न होणार नाही. नको त्या माणसांच्या पदरात स्वार्थाचे नको ते फळ तेवढे पडेल. सामान्य रसिक उपाशीच राहतील, मराठी भाषा, मराठी साहित्य उपेक्षीतच राहिल.

नामदेवांनी म्हटले होते

तीर्थे करोनी नामा पंढरीये आला । जिवलगा भेटला विठोबासी ॥
सद्गदित कंठ वोसंडला नयनी । घातली लोळणी चरणावरी ॥
शिणलो पंढरिराया पाहे कृपादृष्टी । थोर जालो हिंपुटी तुजविण ॥
अज्ञानाचा भाग होता माझे मनी । हिंडविले म्हणोनि देशोदेशी ॥
परि पंढरीचे सुख पाहतां कोटि वाटे । स्वप्नीही परि कोठे न देखेंची ॥
(श्री नामदेव गाथा, साहित्य संस्कृती मंडळ, अभंग क्र. 923)

नामदेवांना सगळी तीर्थयात्रा केल्यावर पंढरीच कशी चांगली आहे हे पटले. तसेच मराठी रसिक, प्रकाशक, लेखक यांना कल्पना आली असेल की हे संमेलन म्हणजे निव्वळ तीर्थयात्रा आहे. त्याचा साहित्याशी काही संबंध नाही. पुस्तक विक्रीशी काही संबंध नाही. नेहमीच्याच रटाळ भाषणांतून काहीच भेटले नाही. उगीच हेलपाटा पडला. आपली पंढरीच बरी.

साहित्यीक दृष्ट्या घुमानचे विमान उडालेच नाही. त्यानं नुस्त्याच धावपट्टीवर फेर्‍या मारल्या. महामंडळाच्या सदस्यांनी आपली हौस भागवून घेतली. बाकी काही नाही. 

श्रीकांत अनंत उमरीकर
जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद मो. 9422878575

  
  
  

No comments:

Post a Comment