Tuesday, November 18, 2014

उर्दू साहित्य देवनागरी लिपीतही हवे !



                         दै. पुण्यनगरी, उरूस, मंगळवार 18 नोव्हेंबर 2014 


सिमेंट कंपनीची एक जाहिरात आहे. अर्जुन नावाचा एक मुलगा बाईंनी भिंतीवर निबंध लिहा असे सांगितल्यावर सांगतो, ‘मॅडम, मेरा एक बहोत अच्छा दोस्त है इकबाल. मेरे साथ वो क्रिकेट खेलता था. अब नही खेलता. ताऊजी केहते है हम दोनो मे एक दिवार खडी हुई है. जो मुझे बिलकूल नजर नही आती.’ या जाहिरातीवर जास्त काही भाष्य करायची गरज नाही इतकी ती बोलकी आणि नेमकी आहे. मुस्लिम वस्ती जशी वेगळी असते त्याचप्रकारे उर्दू भाषा आणि लिपीही वेगळी असल्यामुळे एक ‘दिवार’ तयार झाली आहे. हे खरेच आहे.

डॉ. राही मासूम रजा ज्यांनी रामायण या मालिकेचे संवाद लिहीले त्यांनी उर्दू साहित्य देवनागरी लिपीत असायला हवं याची जोरदार मागणी केली होती. सुप्रसिद्ध कवी जावेद अख्तर यांनी आपला ‘तरकश’ हा उर्दू कवितासंग्रह देवनागरी लिपीत प्रसिद्ध केला. त्याला प्रचंड प्रमाणात प्रतिसाद मिळाला. ज्ञानपीठ प्रकाशनाने उर्दू कवितांची पुस्तके देवनागरी लिपीत प्रसिद्ध करून खुप मोठा वाचक वर्ग उर्दूसाठी मिळवला. 

हे बर्‍याच जणांच्या लक्षातच येत नाही की उर्दू ही अस्सल भारतीय भाषा आहे. दिल्लीच्या परिसरात या भाषेचा जन्म झाला. ही भाषा भारतीय असल्यामुळेच कुराण उर्दूत कशाला अशी तक्रारच मुस्लीम धर्ममार्तंडांनी एके काळी केली होती. या भाषेला राजाश्रय मिळाला म्हणून ही भाषा वाढली असा एक गैरसमज काही लोक मुद्दाम पसरवतात. पण हे कुणाला फारसे माहित नसते की ज्या मोगल सम्राट औरंगजेबाचा मुस्लिम धर्मवेडा म्हणून द्वेष केला जातो त्याच्या काळात उर्दू भाषा नव्हती. मोगल सम्राटांची राजभाषा पर्शियन होती. उर्दू या तुर्की शब्दाचा अर्थ सैन्य असे होतो. दिल्लीच्या परिसरातील मोगली सैन्याची जी भाषा होती जीत काही तूर्की आणि पर्शियन शब्दांचे मिश्रण असलेली हिंदी भाषा प्रचलित होती. हीच भाषा उर्दू म्हणून प्रसिद्ध झाली. याच भाषेला हिंदवी किंवा देहलवी असेही म्हटल्या जायचे. तेंव्हा ज्या कुणाचा गैरसमज असेल की उर्दूचा आणि हिंदूस्थानचा पर्यायाने हिंदूंचा काही संबंध नाही तो त्यांनी दूर करावा. 

1837 मध्ये पहिल्यांदा इंग्रजांच्या काळात पर्शियन लिपीतील उर्दूला इंग्रजी भाषेसोबत राजभाषेचा दर्जा मिळाला. लिपी आणि भाषा यांची ही सांगड हिंदूस्थानी वाचकांसाठी गैरसोयीची ठरली. गंमत म्हणजे पंजाबी, सिंधी या भाषांनीही पर्शियन लिपी वापरली आहे. प्रसिद्ध हिंदी लेखक प्रेमचंद यांनीही बरेच हिंदी साहित्य या पर्शियन लिपीत (ज्याला सध्या उर्दू लिपी असे संबोधले जाते) लिहीले आहे. उर्दू साठी पहिला ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला ते फिराक गोरखपुरी हे हिंदू होते. 

फक्त भाषेचाच विचार केला तर जगातील पहिल्या चार भाषांत हिंदी-उर्दू चा क्रमांक लागतो. (पहिल्या तीन भाषा म्हणजे चिनी मँडरिन, इंग्लिश आणि स्पॅनिश) तेंव्हा जर उर्दू देवनागरी लिपीत जास्त प्रमाणात आली तर ती लेखी स्वरूपातीलही चौथी भाषा हिंदीच्या बरोबरीने असेल. खरे तर भारत आणि पाकिस्तान मधील उर्दू म्हणजे उर्दू-हिंदी असे मिश्रणच आहे असे भाषातज्ज्ञ सांगतात. त्यांना वेगळे करणे अवघड ठरते. 

दुष्यंतकुमार या कवीचा ‘साये मे धूप’ हा कविता संग्रह प्रसिद्ध झाला आणि कित्येक अभ्यासक समिक्षक बुचकळ्यात पडले. त्याचे कारण म्हणजे ही भाषा कोणती? हीला उर्दू म्हणायचे की हिंदी? शिवाय ही भाषा ग्रांथिक नसून बोली स्वरूपाची असल्यामूळे तर अजूनच गोंधळ उडाला. परिणामी या पुस्तकाला पुरस्कार देताना अडचणी निर्माण झाल्या. आपली भाषा कोणती या बाबत दुष्यंतकुमार यांनी लिहून ठेवलं होतं ‘उर्दू और हिंदी अपने-अपने सिंहासन से उतरकर जब आम आदमी के पास आती है तो उनमे फर्क कर पाना बडा मुश्किल होता है. मेरी नीयत और कोशिश यह रही है कि इन दोनों भाषाओं को ज्यादा से ज्यादा करीब ला सकूँ. इसलिए ये गजले उस भाषा मे कही गयी है, जिसे मै बोलता हूं.’ या गद्य ओळींचा आशय आपल्या एका शेर मध्ये दुष्यंतनेच लिहून ठेवला आहे

मै जिसे ओढता-बिछाता हूं
वो गजल आपको सुनाता हूं । 

उर्दू साहित्य देवनागरी लिपीत आले तर त्याला मोठा वाचक वर्ग मिळतो हे आता सिद्ध झाले आहे. महाकवि गालिब यांच्याबाबतीत मराठीतही एक मोठा प्रयोग अमरावतीच्या डॉ. अक्षयकुमार काळे यांनी केला आहे. गालिबच्या 235 गझला देवनागरी लिपीत लिहील्या. त्यातील शब्दांचे अर्थ दिले आणि शेवटी मतितार्थ दिला आहे. यामुळे मराठी वाचकांसाठी एक मोठं दालनच खुले झाले आहे. नसता उर्दू शब्द आणि त्यांचे उच्चार यात बरेच रसिक अडखळत असतात.

साहित्य अकादमीने एक अतिशय चांगला उपक्रम याबाबतीत सुरू केला आहे. पुरस्कारप्राप्त उर्दू साहित्याची पुस्तके देवनागरी लिपीत प्रसिद्ध केली जातात. यातून कविताच नाही तर इतरही गद्य साहित्य समोर येते आहे. सैय्यद मुहम्मद अशरफ हे उर्दू कथाकार. त्यांच्या ‘बादे सबा का इंतिजार’ या कथा संग्रह याच पद्धतीने देवनागरी लिपीत प्रसिद्ध करण्यात आला आहे. एका मोठ्या वाचक वर्गाला नविन उर्दू साहित्यात काय चालू आहे हे त्यामुळे समजू शकते. कुरूतूल-एैन हैदर यांची ‘आग का दरिया’ ही ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त कादंबरी किंवा सज्जाद जहिर यांची 1935 मध्ये लिहीलेली ‘लंडन की एक रात’ अशी बरीच गद्य पुस्तकेही देवनागरी लिपीत आता उपलब्ध आहेत.

‘पाकिस्तान की शायरी’ या नावाने एक चांगले संपादन प्रसिद्ध झाले आहे. (राजपाल प्रकाशन, नवी दिल्ली) फैज अहमद फैज, अहमद फराज, अहमद नदीम कासमी, इब्ने इंशा, अदा जाफरी, परवीन शाकिर, एहसान दानिश, मुनीर नियाजी यांसारख्या प्रसिद्ध उर्दू कविंच्या कविता देवनागरी लिपीत त्यातील कठीण शब्दांच्या अर्थासह वाचकांसाठी उपलब्ध आहेत.

विनय वाईकर यांनी गुलाम अली, मेहदी हसन, जगजित सिंग, बेगम अख्तर आदींनी गायलेल्या प्रसिद्ध गजला देवनागरी लिपीत त्यातील कठिण शब्दांच्या अर्थांसह लिहून ‘गजल दर्पण’ नावाचे पुस्तक सिद्ध केले आहे. तसेच उर्दू साहित्याच्या अभ्यासक डॉ. जरीना सानी यांच्या मदतीने उर्दू गजलांतील कठीण शब्दांचा शब्दकोश ‘आईना-ए-गजल’ या नावाने प्रसिद्ध केला आहे.  उर्दू मराठी शब्दकोशाचे मोठे कठीण काम साहित्य संस्कृती मंडळाने श्रीपाद जोशी व एन.एस.गोरेकर यांच्या संपादनाखाली करून ठेवले आहे. कमी प्रमाणात असेल पण प्रामाणिकपणे ही कामे झाली आहेत याची दखल घेतली पाहिजे. उर्दूचीच बहिण असलेली- हैदराबाद ते औरंगाबाद या पट्ट्यात बोलली जाणारी दखनी भाषा हीच्यावरही सेतू माधवराव पगडी, श्रीधरराव कुलकर्णी या अभ्यासकांनी मोठे काम करून ठेवले आहे.      

पत्रकार अंबरिश मिश्र यांनी लिहून ठेवलेला किस्सा मोठा विलक्षण आहे. एका प्रसिद्ध संगीतकाराची मुलाखत घेण्यासाठी ते वेळ ठरवून त्यांच्या घरी गेले. ते संगीतकार बाहेर फिरायला गेले होते आणि त्यांनी घरी निरोप ठेवला होता की मी लगेच येतो आहे तूम्ही बसून घ्या. अंबरिश मिश्र त्यांच्या दिवाणखान्यात त्यांची वाट पहात बसले असताना त्यांना समोर टी-पॉय वर दोन वह्या पडलेल्या दिसल्या. त्यांनी त्या सहज हातात घेतल्या आणि चाळायला सुरवात केली. सगळी अक्षरं उर्दूमधली. ती काही मिश्रांना वाचता येईनात. त्यांनी वह्या तश्याच ठेवून दिल्या. थोड्याच वेळात ते संगीतकार घरी परतले. मुलाखत चहापाणी सगळं व्यवस्थित झाल्यावर काहीसे दचकत अंबरिष मिश्रांनी त्यांना विचारले, ‘तूमच्या माघारी ह्या वह्या मी चाळल्या त्या बद्दल माफी मागतो पण यात काय लिहीले आहे? आणि हे उर्दूत कसे काय?’ ते संगीतकार म्हणाले, ‘अहो हे मी जय श्रीराम जय श्रीराम लिहीत असतो. आणि उर्दूत लिहायचे कारण म्हणजे मला दुसरी लिपीच येत नाही. तेंव्हा कशात लिहीणार?’ हे संगीतकार म्हणजे उडत्या चालीच्या पंजाबी गाण्यांनी हिंदी चित्रपट सृष्टी गाजवणारे ओ.पी.नय्यर.    
  
श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575

Tuesday, November 11, 2014

अनंत भालेराव पुरस्कार-आदर्श गुणांचा सत्कार !


                         दै. पुण्यनगरी, उरूस, मंगळवार 11 नोव्हेंबर 2014 

तेवीस वर्षांपूर्वी अनंत भालेराव यांचे निधन झाले (26 ऑक्टोबर 91). त्यांच्या सहवासातील परिचयातील माणसे त्यांना ‘अण्णा’ या संबोधनाने ओळखत. घरातील मोठ्या भावाला अण्णा म्हणायची आपल्याकडे पद्धत आहे. लहान भावंडांना ‘अण्णाचा’ आधार वाटायचा तसं अनंत भालेरावांबाबतही होतं. आजही त्यांच्याबद्दल बोलताना अण्णा हे संबोधन सहज ओठावर येतं ते त्याच कारणाने. 

अण्णांच्या स्मृती प्रित्यर्थ त्यांच्या पहिल्या स्मृतिदिनापासून ‘अनंत भालेराव स्मृति पुरस्कार’ देण्याची सुरवात त्यांच्या नावाने स्थापन झालेल्या प्रतिष्ठानने केली. पहिलाच पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार गोविंद तळवलकर यांना देण्यात आला. कामगार नेते जॉर्ज फर्नांडिस यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला होता. तेंव्हापासून आजतागायत ही परंपरा चालू आहे. या वर्षी प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ डॉ. द.ना.धनागरे यांना हा पुरस्कार देवून गौरविण्यात आले.

गोविंद तळवलकर, कुमार केतकर, अरूण टिकेकर यांसारख्या ज्येष्ठ पत्रकार; विजय तेंडूलकर, महेश एलकुंचवार यांच्या सारखे नाटककार; मंगेश पाडगांवकर,ना.धो.महानोर हे प्रतिभावंत कवी; ग.प्र प्रधान, मृणाल गोरे, मेधा पाटकर, अभय बंग, थोर गांधीवादी गंगाप्रसादजी अग्रवाल, नरेंद्र दाभोळकर ही सामाजिक राजकीय क्षेत्रातील मोठी माणसे, अनिल अवचट आदिंना या पुरस्काराने गौरविण्यात आले.  अप्पा जळगांवकर यांच्यासारखा हार्मोनिअम वादक जो मुळचा मराठवाड्याचा आहे त्यांना पुरस्कार दिल्यावर भाषण करण्यास सांगितले. तर अप्पा बोलायला तयार झाले नाहीत. मग त्यांची मुलाखत रसिकराज ऍड. वसंत पाटील यांनी घेतली. अप्पांबद्दल पु.ल.देशपांडे असं म्हणाले होते, ‘अप्पा काही पेटी वाजवत नाही. तो बोटाने गातो!’ अशा व्यक्तींना पुरस्कार देण्यात आला. खरं तर हा पुरस्कार आता पुरस्कार उरलेला नाही. समाजातील आदर्श प्रवृतीचा हा सत्कार आहे. 

हा पुरस्कार स्वीकारताना द.ना.धनागरे यांच्यासारखा शिक्षण तज्ज्ञ उच्च शिक्षणावर ताशेरे ओढतो त्याची दखल गांभिर्याने घ्यायला हवी. धनागरे यांचा सहभाग असलेल्या  समितीने ज्या शिक्षण संस्थांवर आक्षेप घेतले. त्यांच्याबाबत नकारात्मक अहवाल दिला त्या शिक्षण संस्थांच्या संचालकांना शासन पुढच्याच वर्षी पद्मश्री देते ही चिंतेची बाब आहे. महात्मा गांधींच्या नावाचा वापर करून, गांधींच्या खादीच्या धोरणाचे पांघरून वापरून आपले काळे कृत्य झाकणार्‍या शिक्षणसम्राटांचे वाभाडे जाहिररित्या धनागरे यांनी आपल्या भाषणात काढले. 

असे पुरस्कार जेंव्हा दिले जातात आणि त्या प्रसंगी मृणाल गोरे, ग.प्र.प्रधान, टिकेकर, केतकर, धनागरे ही माणसे काही तळमळीने सांगतात ते नीट समजून घेतले पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे ज्या प्रवृत्तींवर या सत्कारमूर्तींनी आक्षेप घेतले आहेत त्यांना प्रतिष्ठा देणार नाही असे सामान्य माणसांनी ठरवायला पाहिजे. याच पुरस्कार वितरण सोहळ्यात न्यायालयात निर्णय मिळतो पण न्याय मिळतो का? असा खडा सवालच धनागरे यांनी केला आहे. आणि शेवटी लोकांना हे आवाहनच केले आहे की आता लोकांनीच राज्यकर्त्यांवर शासनावर दबाव टाकला पाहिजे.

हे विचार अनंत भालेराव यांच्या स्मृतीपुरस्कार निमित्ताने व्यक्त झाले हा एक चांगला योगायोग. कारण अण्णा नेहमीच स्पष्ट आणि रोखठोक लिहायचे. मंत्र्यांनी केलेला भ्रष्टाचार चव्हाट्यावर मांडला पण त्याचे पुरावे न्यायालयात देता आले नाहीत. या प्रकरणी तुरूंगात जाणे अण्णांनी पसंत केले. ते तुरूंगातून सुटले तेंव्हा लोकांनी प्रचंड जल्लोषात त्यांचे स्वागत केले आणि त्यांची भव्य मिरवणूक काढली. कमल हसन यांच्या अप्पु राजा चित्रपटातील ‘ये हाय कोर्ट नही, माय कोर्ट है’ असा एक संवाद फार गाजला होता. त्याप्रमाणे अण्णांना जनतेच्या ‘माय कोर्ट’ने उचित न्याय दिला.

आज अण्णांना जावून तेवीस वर्षे उलटली आहेत आणि धनागरे त्यांच्या स्मृति पुरस्कार सोहळ्यात अण्णांच्या विचारांचा हाच धागा मांडून दाखवत आहेत हे फार महत्त्वाचे आहे.

अण्णा आणि मराठवाडा म्हणजे एक अद्वैत. अण्णा म्हणजे मराठवाडा पेपर आणि मराठवाडा म्हणजेच अण्णा. दोन वर्षांपूर्वी औरंगाबाद शहरात एका मोठ्या समुहाच्या वृत्तपत्राने एक परिसंवाद आयोजित केला होता. त्यात मराठवाडा हा प्रदेश त्याची अस्मिता त्याचा विकास येथील पत्रकारिता हा विषय निघाला. दै. मराठवाड्याची चर्चा निघाली तेंव्हा त्या वृत्तपत्राचे व्यवस्थापकीय संपादक उपहासाने असे म्हणाले की ते वृत्तपत्र तर केंव्हाच बंद पडले. त्यावर एका वक्त्याने त्यांना ताडकन सुनावले की बंद पडूनही ते वृत्तपत्र आणि त्याचे संपादक यांचा प्रभाव अजून लोकांवर आहे. आणि तुमचे वृत्तपत्र चालू असूनही त्याचा कोणावरच कसलाच प्रभाव नाही.

ही खरंच विचार करण्याची गोष्ट आहे की अण्णांसारखा  सारखा संपादक जेंव्हा लिहायचा त्याचा प्रभाव तेंव्हा तर लोकांवर पडायचाच पण आजही त्यांचे विचार वाचणार्‍याला प्रभावित करून जातात. यशवंतराव चव्हाण यांना ‘घोड्याचा खरारा करणारे अश्वमेधाचा घोडा काय अडवणार?’ असा टोला अण्णांनी मारला होता. आजची राजकीय परिस्थिती पाहता राज्यकर्त्यांना असे सुनावणारे किती संपादक आहेत? बी.टी. रणदिवे हे कम्युनिस्टांचे मोठे पुढारी. ते गेले तेंव्हा ‘बी.टी.आर. गेले : राजकीय क्षेत्रातील धाक गेला’ असा एक साध्या शब्दांमधला विलक्षण प्रभावी लेख अण्णांनी लिहीला होता. बी.टी.आर.बद्दल इतक्या जिव्हाळ्याने एखाद्या कम्युनिस्टानेही लिहीले नाही.

संपादक म्हणून जबाबदारी संपल्यावर ते ‘कावड’ हे सदर दै. मराठवाड्यात लिहायचे. या त्यांच्या सदराची कित्येक वाचक चातकाप्रमाणे वाट पहात असायचे. आज स्वच्छता अभियासाठी गांधींची आठवण काढली जाते. अण्णांनी ‘गांधी आमचा कोण लागतो?’ या नावाने एक सुंदर लेख कावड सदरात गांधी जयंतीच्या निमित्ताने लिहीला होता. गांधींची हत्या झाली त्याच दिवशी उमरी बँक लुटली गेली त्यात अनंतरावांचा सहभाग होता. ती लाखो रूपयांची रक्कम घेवून ही मंडळी उमरखेडला चालली होती. पहाटे त्यांना शेतकरी आपला शेतमाल गावाकडे वापस आणताना दिसले. त्यांनी विचारले की मोंढ्यात जायच्या ऐवजी तूम्ही वापस का निघालात? शेतकर्‍यांनी सांगितले की गांधीबाबाचा खून झाल्यामुळे मोंढा बंद आहे. अण्णा लिहीतात, ‘‘गांधींचा खून झाला हे ऐकून आम्ही  तर जागच्या जागीच खलास झालो. एक मोठा पराक्रम गाजवून आम्ही आलो होतो परंतू तो आता शून्यवत झाला होता. लाखो रूपयांची रक्कम या क्षणी कोणी हिसकून नेली असती तर आम्हाला काहीच वाटले नसते. आम्ही प्रतिकार कला नसता. कारण या पैशांहून अधिक मोलाचे नष्ट झाले होते. गांधीजी गेले नव्हे आपले सर्वस्वच गेले. आपण निराधार झालो अशी जाणीव झाली.’’

मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराला विरोध केला म्हणून अण्णांची फार बदनामी केल्या गेली. त्यांच्या अंत्ययात्रेत आमचा एक दलित मित्र सहभागी झाला होता. अंत्यविधीच्यावेळी अश्रुभरल्या डोळ्यांनी सरण रचण्यासाठी तो पुढे सरसावला. सगळे आटोपल्यावर माझ्या प्रश्नार्थक चेहर्‍याकडे पाहून त्याने खुलासा केला, ‘अरे मी पाहिलेला हा सगळ्यात मोठा माणूस. साध्या घरात राहणारा, धोतर घालणारा हा आमचा शत्रू कसा असेल? गावोगावच्या दलितांना मराठवाडा पेपरमधूनच विचार वाचायला मिळाले होते.’ अण्णा आत्मा मानत नव्हते. पण माझ्या जिवलग मित्राच्या शब्दांनी त्यांच्या आत्म्याला नक्कीच समाधान वाटले असेल. 
अण्णांच्या 23 व्या स्मृतिदिनामित्त विनम्र अभिवादन.    
  
श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575

Tuesday, November 4, 2014

रस्त्यावर मराठी गाणी गाणारी कानडी माणसे

                         
                   (दासू वैद्य यांच्या घरी दिवाळीत गाताना शिवानंद विभूते आणि सहकारी)

                         दै. पुण्यनगरी, उरूस, मंगळवार 4 नोव्हेंबर 2014 

शहरातील सकाळची वेळ. कानावर खड्या आवाजात कानडी ढंगात ‘कानडा राजा पंढरीचा’ या गाण्याचे सूर ऐकू येतात. तरतरीत चेहर्‍याचे चमकदार डोळ्यांचे सावळ्या रंगाचे तीन तरूण गळ्यात पेटी, तबला अडकवून गाणी म्हणत आपल्या दारात उभी असतात. त्यांचे सच्चे सूर आणि कानडी वळणाचे कानाला गोड वाटणारे मर्‍हाटी उच्चार ऐकणार्‍याला मोहात पाडतात. औरंगाबाद शहरातील कित्येकांचा हा गेल्या पाच दहा वर्षांतील अनुभव आहे.
सध्या बेळगांवचे नामांतर बेळगांवी करण्यात आलेले आहे म्हणून वाद सुरू आहे. मराठी कानडी असा वाद बेळगांवच्या निमित्ताने गेली पन्नास वर्षे धुमसत आहे. अशा पार्श्वभूमीवर कर्नाटकाच्या गदग जिल्ह्यातील काही कानडी माणसे महाराष्ट्रात येवून राहतात. आपल्या आपल्या पोटपाण्याची चिंता वाहता वाहता सुरेल आवाजाने मराठी गाणी गाऊन मराठी माणसांचे कान तृप्त करतात हे मोठं विलक्षण आहे. 

शिवानंद विभूते आणि त्याच्या नात्यातील तिरूपती, श्रीनिवास आणि चंद्रू विभूते गेली दहा वर्षे औरंगाबाद शहरात दारोदारी जावून गाणी म्हणत आहेत. प्रसिद्ध कवी दासू वैद्य यांच्या घरासमोर ही माणसं गात होती ते त्यांनी ऐकलं आणि दिवाळीत यांचंच गाणं आपल्या घरी करायचं ठरवलं. मोठ्या सन्मानानं रस्त्यावर उभं राहून गाणार्‍यांना आमंत्रित केलं. जवळपास राहणारी शंभरएक माणसे बोलावली. दिवाळीची पहाट या साध्या कलाकारांच्या सुरांनी मंगलमय केली. 

ही माणसे मुळची कर्नाटकातील गदग जिल्ह्यातील देवीहाळ गावची. तिथल्या पुट्टूराज स्वामींच्या मठात यांचे पूर्वज गाणं शिकले. पंचाक्षरी बुवा म्हणून फार मोठे गवइ याच परिसरातले. त्यांच्यामुळे या परिसरात संगीत बहरलं. पोटपाण्याच्या शोधात ही माणसे सोलापूरला आली. विजापूररोडला यांची घरं आहेत. महादेव कोळी समाजाच्या या माणसांचे गळे मोठे विलक्षण आणि गोड आहेत. लोकगीताला शोभणारा उंच पट्टीचा आवाज आणि सहज फिरणारा गळा याचे वरदान यांना लाभले आहे.  सोलापुरहून यांचे गट वेगवेगळ्या शहरात जावून स्थायिक झाले. औरंगाबाद, नासिक, मुंबई, पुणे, आळंदी, पंढरपूर, लातूर, करकम, नागपूर अशी सर्वत्र यांची घरं पसरलेली आहेत. 

शिवानंद विभूतेचे वडिल दुर्गाप्पा हे पंचवीस तीस वर्षांपूर्वी औरंगाबादला आले. चिकलठाण्यात ढाकणे हायस्कूलच्या पाठीमागे थोडीशी जागा मिळवून विभूत्यांची पंधरा घरे उभी ठाकली आहेत. गाड्यांचे कुशन शिवून देण्याचा यांचा मुख्य व्यवसाय. चिकलठाण्याला कुशनचे त्यांचे एक दुकान आहे. औरंगाबाद जवळच्या गावांत जावून बाजाराच्या दिवशी हे दुकान लावतात.
पोटपाण्याची चिंता वाहता वाहता त्यातच आयुष्य संपवून टाकणारी कितीतरी माणसं आपल्या आजू बाजूला नेहमीच पहायला मिळातात. तूलनेने अधिक संपन्नता लाभूनही काहीच न करणारी माणसेही भरपूर आहेत. पण अतिशय साध्या परिस्थितीत राहणारी, जेमतेम कमाविणारी माणसे जेंव्हा कलेसाठी कष्ट घेवून पायपीट करून दारोदारी जावून उभी राहतात तेंव्हा आपल्याला नवल वाटते. 

शिवानंद आणि त्याचे सहकारी तसेच नात्यातील अजून बारा पंधरा माणसे तीन-चार जणांचे गट करून जन्माष्टमी ते दिवाळी या काळात औरंगाबाद शहरात घरोघरी जावून दारात उभं राहून भजनं ऐकवतात. एखादं पद ऐकून घरातलं माणूस बाहेर येतं. त्याला गाण्याची आवड असेल तर सन्मानानं आत बोलावतात. अजून गा म्हणून सांगतात. पण फारसा रस नसलेला माणूसही त्यांच्या सुरांच्या मोहात काहीतरी दक्षिणा त्यांच्या हातावर ठेवतो. या कलाकारांचे वैशिष्ट्य म्हणजे ते कधीही आपणहून कोणाच्या घरात जात नाहीत. ते बाहेरच आदबीनं उभं राहून गाणं म्हणतात. कोणी बोलावलं तरच ते आत जातात. यांचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे ते सेवा म्हणून गाणं म्हणतात. चुकूनही कधीही कोणालाही पैसे मागत नाहीत. जी काही दक्षिणा लोक देतील ती भक्तिभावाने स्विकारतात. कोणी कार्यक्रमाला बोलवायला आला तर जातात. आपण गाण्यातील खुप साधी माणसं आहोत. आपल्यापेक्षा फार मोठ मोठी माणसे या क्षेत्रात आहेत हे ते नम्रपणे सांगतात. 

या लोकांना मराठी लिहीता येत नाही. सगळी मराठी गाणी हे कानडीत लिहून घेतात आणि पाठ करतात. तूम्ही मुळचे कानडी मग कानडी भजन जास्त का म्हणत नाही? असं विचारल्यावर त्यांनी दिलेलं उत्तर मोठं मार्मिक आणि संगीतातील अभ्यासकांना विचार करायला लावणारं आहे. त्यांचं म्हणणं असं की मराठी भाषेतील जे शब्द आहेत ते भक्तिगीत भजन गाण्यासाठी जास्त सोयीचे वाटतात. या शब्दांवर हरकती घेता येतात, आलापी करता येते. पण कानडी शब्दांबाबत मात्र अवघड जाते. म्हणून आम्ही मराठीच गाणी गातो. मराठी माणसे ‘सौभाग्यदा लक्ष्मी बारम्मा’ सारख्या कानडी भजनांची फर्माइश आम्हाला करतात. आम्ही ते म्हणतोही पण आम्हाला जास्त कानडी भजनं येत नाहीत. 

यांचे मराठी उच्चार मोठे गंमतशीर आहेत. गाताना ज चा उच्चार ध सारखा होता. ब आणि भ ची उलटा पालट होते. ह चा उच्चार अ सारखा होता. दासू वैद्य यांच्या घरी गाणं संपल्यावर त्यांना एका रसिकाने तूमचे कार्ड आहे का? म्हणून विचारणा केली. ‘ते नाही की हो’ असं कानडी ढंगात त्यांनी सांगितलं. त्यांचे हे उच्चार कानाला मोठे गोड वाटतात. खरं तर सुगम गायनात शब्दांना मोठे महत्त्व आहे. पण या गायकांचा सच्चा सुर एैकला की बाकीच्या गोष्टी बाजूला पडतात. 

भीमसेन जोशी, जितेंद्र अभिषेकी, अजित कडकडे, वसंतराव देशपांडे यांची गाणी जास्त करून ही कलाकार मंडळी गातात. आपल्या वडिलांकडून गाणं शिकलेली ही पिढी आपल्या मुलांनाही सकाळी चारलाच उठून गाणं शिकवते. ज्या मुलाला आवड आहे तो शिकतो. आपल्या घराण्यात गाणं असावं यासाठी त्यांची धडपड आजही चालू आहे. गाण्यावर पोट भरतं का? गाण्यात करिअर करता येईल का? मराठी गाण्यांचे (आणि मराठीचेही) काय भवितव्य? असल्या प्रश्नांचा मागमुसही या सामान्य माणसांच्या चेहर्‍यावर दिसत नाही.  कानडी अस्मिता, मराठी अस्मिता असले विषयही त्यांना शिवत नाहीत. आपला प्रदेश सोडून इतकी दूर आलेली ही माणसे इथल्या मातीत सहज सामावून गेली आहेत. कानडीत शिकलेली आणि मराठी लिहू न शकणारी ही पिढी पण त्यांनी आपली मुलं मात्र आवर्जून मराठी शाळेत घातली आहेत. आपल्या पोरांना आता कानडीच फारसे येत नाही असे त्यांनी बोलताना सांगितले.

सरकारने कलाकारांना मदत केली पाहिजे, रहायला जागा दिली पाहिजे, वृद्ध कलाकारांना पेन्शन दिली पाहिजे अशा मागण्या आपण नेहमी करतो. पण दुसर्‍या प्रदेशात येवून सामान्य पद्धतीने आपले जीवन जगत झोपडपट्टीवजा भागात राहत ही कलाकार मंडळी संगीताची सेवा करताना कुठलीही अपेक्षा सरकारकडून किंवा समाजाकडून करत नाहीत हे विशेष. दर शिवरात्रीला हे आपल्या घरात रात्रभर अखंड संगीतसेवा करतात. त्यासाठी आजूबाजूच्या परिसरातून मोठ्या प्रमाणावर सामान्य माणसे यांच्याकडे येवून गर्दी करतात. सगळी सामान्य माणसे एकत्र येवून संगीतिक उत्सव साजरा करतात. त्याला कोणी मोठा प्रायोजक नसतो, श्रीमंत रसिकांसाठी व्हिआयपी पास नसतात, जवळच्याच चिकलठाणा विमानतळाहून कोणी कलाकार विमानानी येत नाही की पंचतारांकित हॉटेलमध्ये उतरत नाही. 

शिवानंद विभूते यांच्याशी बोलायला मी गेलो तेंव्हा वीज गेलेली होती. मातीच्या रस्त्यावर दोन खुर्च्या टाकून त्यांनी माझी बसायची सोय केली. त्यांचा साथीदार खाली रस्त्यावर बसूनच बोलत होता. शेजारच्या पत्र्याच्या टपरीतून स्टीलच्या पेल्यातून एक छोटा मुलगा चहा घेवून आला. परिस्थितीची कुठलीही तक्रार हे करत नाहीत.

सुरेश भटांनी सामाजिक संदर्भात लिहीले होते
साध्याच माणसांचा एल्गार येत आहे 
हा थोर गांडूळांचा भोंदू जमाव नाही 

शिवानंद विभूते सारख्या कलाकारांनी  आपल्या छोट्या कृतीतून कलेच्या प्रांतातही असेच आहे हे सिद्ध केले आहे. 

श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575

Tuesday, October 28, 2014

आंदोलनास वर्ष उलटले । रस्त्याचे ना भाग्य पलटले ॥



                         दै. पुण्यनगरी, उरूस, मंगळवार 28 ऑक्टोबर 2014 


बरोबर एक वर्षापुर्वीची गोष्ट आहे. रस्त्यांवर खड्डे की खड्ड्यांमध्ये रस्ते हे न समजल्यामुळे औरंगाबाद शहरातील सामान्य नागरिक वैतागुन शांततेच्या मार्गाने रस्त्यावर उतरले. एकाही राजकीय पक्षाने जनतेच्या गंभीर समस्यांकडे लक्ष दिले नव्हते परिणामी आपणच काही तरी करू म्हणून हे नागरिक रस्ता रोको करण्यासाठी पुढे आले. या आंदोलनास लोकांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. पोलिसांनी आंदोलन करणार्‍यांना समज दिली. महानगरपालिकेच्या सबंधित अधिकार्‍यांनी रस्ता चांगला करण्याचे कागदोपत्री आश्वासन दिले. सगळ्यांना वाटले आता रस्ता दुरूस्त होईल. 

आंदोलनाचा खरा धसका घेतला राज्यकर्त्यांनी. त्यांनी पोलिसांवर दबाव वाढवला. दुसर्‍या दिवशी पोलिसांनी आंदोलन करणार्‍या तिघांना पोलिस स्टेशनमध्ये बोलावून त्यांच्यावर कार्रवाई करण्याचा, त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचा पुरूषार्थ दाखवला. एरव्ही मोठ-मोठ्या गुन्ह्यांबाबत आणि गुन्हेगारांबाबत लेचीपेची भूमिका स्वीकारणार्‍या पोलिसांनी या सामान्य माणसांवर कार्रवाई करताना मोठाच उत्साह दाखवला. यातील एकाने जामिन नाकारून तुरूंगात जाणे पसंद केले. त्याला तुरूंगात घालून शासनाने स्वत:चीच आब्रू घालवून घेतली. 

स्वातंत्र्याची साठी उलटून गेली आणि अजूनही चांगला रस्ता नागरिकांच्या नशिबी नाही. उलट या मागणीसाठी आंदोलन करणार्‍याला सरकार जेलमध्ये टाकते. यावर इतर सामान्य नागरिकांनी, समाजातील प्रतिष्ठीतांनी, माध्यमांनी सरकारला धारेवर धरले. परिणामी या नागरिकाची बीनशर्त सुटका करावी लागली. निवडणुका तोंडावर होत्या. जनतेला वाटले आता काहीतरी होईल. 

रस्त्यावर उतरून आंदोलन करणे, कायदा हातात घेणे याला काही विचारवंत पत्रकार विरोध करतात. त्यांचे म्हणणे असते कायद्याचे राज्य आहे. तेंव्हा जे काय व्हायचे ते कायद्याच्या मार्गाने व्हावे. हे आंदोलन होण्याच्या 1 महिना आधीच रूपेश जयस्वाल या तरूणाने उच्च न्यायालयात रस्त्याच्या संदर्भात एक जनहित याचिका दाखल केली होती. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लगायच्या आत रस्त्याची कामं सुरू झाली पाहिजेत असा आग्रह याचिकेत करण्यात आला होता. महानगरपालिकेने थातूर मातूर पद्धतीने 13 रस्त्यांची कामं सुरू करू असं आश्वासन त्यावेळी न्यायालयात दिलं. काही रस्त्यांची कामं सुरूही झाली. आज यालाही सात महिने उलटून गेले. एकाही रस्त्याचं काम अद्याप पूर्ण झालं नाही.

मधल्या काळात लोकसभेची निवडणुक झाली. जनतेने दिल्लीतील सरकार बदलून दाखवले. आता विधानसभेचाही निकाल लागला आहे. जे मुंबईत सत्तेत होते त्यांची तर औरंगाबाद शहरात अमानत रक्कमही जप्त झाली. निवडणुकीच्या माध्यमातून शांतपणे सरकार बदलून जनतेने आपली ताकद दाखवून दिली. वैध मार्गाने जनता न्यायालयाचे दरवाजे ठोठावत आहे तर त्यांना अजून न्याय मिळत नाही. रस्त्यावर उतरत आहे तर त्यांना तुरूंगात घातले जात आहे. इतकं झालं तरी अजूनही ज्या रस्त्यावर आंदोलन झाले तो रस्ता तसाच आहे.

आता करावे तरी काय? आता औरंगाबाद महानगरपालिकेच्या निवडणुका तोंडावर आहेत. त्यांची आचारसंहिता केंव्हाही लागू शकते. परत आचारसंहितेचे नाव पुढे करत काहीही न करण्याचा जन्मसिद्ध अधिकार बजावायला सरकार मोकळे.

भर दिवाळीत शहरात कचर्‍याचे मोठ मोठे ढिग साठले होते. कारण काय तर जे स्वच्छता कर्मचारी आहेत ते संपावर गेले होते. त्यांना दिवाळीचा बोनस हवा होता शिवाय सुट्टीच्या दिवशी न केलेल्या कामाचे पैसेही हवे होते. या कर्मचार्‍यांच्या मागण्या मान्य करत कसा बसा संप मिटवला गेला. आज कुठल्याही शहरात कचर्‍याचे ढिग जिथे साठलेले असतात त्या ठिकाणी काही बायका आणि लहान मुले कचर्‍यात काही तरी वेचत बसलेले आढळतात. हे लोक काय गोळा करत असतात? फेकुन दिलेल्या गोष्टीमध्ये यांना काय मिळतं?

उस्मानपुर्‍यात कचरा वेचणार्‍या कोंडाबाई नावाच्या महिलेला विचारले, ‘मावशी तुम्ही काय वेचता अहात? याचा तुम्हाला काय फायदा?’ ती बाई म्हणाली, ‘बाबा आम्ही प्लॅस्टिक, कागद, काच, लवा-लोखंड असं काही मिळालं तर ते शोधतो.’ ‘मग त्याचे काय करता?’, ‘हे आम्ही भंगारवाल्या मोहसिनभाईला विकतो.’ ‘तूम्हाला त्याचे किती पैसे मिळतात?’, ‘शंभर दोनशे कसे बसे मिळतात भाऊ.’ मावशी यापेक्षा भिक मागीतली तर काय वाईट? कशाला इतकी मरमर करता? इतक्या घाणीत हात घालता? 

त्या कोंडाबाईने या प्रश्नावर जे उत्तर दिले ते समाजाच्या तोंडात मारणारे होते, ‘भाऊ, भीक मागायचे कशाला सांगतूस. त्याला तरी मेहनत करावी लागतीया. छिनाली केली तर जास्तीचा पैसा फुकटच मिळतो. आमी इज्जतीची रोटी खातो भाऊ. पोटापुरतं भेटलं की बास झालं. पोटाखालचे बेकार धंदे करायची नियत नाही आपली.’ 

एक सामान्य बाई शहरातला कचरा वेचून त्यातून भंगार वेगळं काढते. ते विकून आपलं पोट भरते. तीला कुठलाही बोनस भेटत नाही. तिच्यासाठी कुठलीही योजना काम करत नाही. आज कोंडाबाईसारखी शेकडो बायका आणि मुले कचरा वेचित आहेत. कुणापाशीही भीक न मागता, कुठल्याही अनुदानाची मागणी न करता, कुठलीही सवलत न मागता स्वत: तर जगत आहेतच, आपले कुटूंब पोसत आहेत आणि शिवाय मोठ्या समस्येचा डोंगर उचलण्यासाठी जीवतोडून आपली करंगळी लावत आहेत. 

रस्ता, पाणी, कचरा यांसारख्या समस्या प्रचंड पैसा खर्च करून सुटता सुटत नाहीत. आंदोलन करून सुटत नाहीत. कायदेशीर मार्गाने गेलं तरी लवकर निकाल लागण्याची आशा नाही. अशावेळी जी माणसं आपल्या आपल्या छोट्यामोठ्या क्षमतेने या समस्या सोडविण्यासाठी पुढे येतात त्यांच्या पाठीशी जनतेने उभं राहिलं पाहिजे. 

एखाद्या गावात, वसाहतित, सहनिवासात (अपार्टमेंट) धार्मिक कार्यक्रम होतात, जेवणं घातली जातात त्याला काय सरकारच्या निधीची कोणी वाट पहाते काय? लोक वर्गणी गोळा करतात आणि हे उत्सव होतात. त्याप्रमाणे आता इतर समस्यांसाठी लोकांनी पुढाकार घेवून त्याची सोडवणुक केली पाहिजे. खरं तर यासाठीच लोकशाही व्यवस्था आपण स्विकारली होती. पण राजकीय पक्षशाही आणि त्यांना अनुकूल अशी नोकरशाही  यांनी सामान्यांच्या वाटेचा निधी आपल्या पोळीवर ओढून घेतला. आणि हे सगळं परत मतदानाद्वारे लोकांचा पाठिंबा मिळवून. 
एखाद्या घरात चोरी करायची असेल तर चोर कुत्र्याला एखादे हाडूक टाकतो. पण तूझ्या घरात चोरी करायची परवानगी दे म्हणून घरमालकाला हाडूक दाखवत नाही. इथं निवडणुकीत मतदाराला दिलेली लाच मग ती पैशाच्या स्वरूपात असो, आश्वासनाच्या स्वरूपात असो, जाहिराती करून दाखविलेल्या स्वप्नांच्या स्वरूपात असो  किंवा कुठल्याही अन्य स्वरूपात असो ही लाच म्हणजे प्रत्यक्ष घरमालकालाच दिलेले हाडूक आहे. हे हाडूक चघळत बस आणि आम्ही तूझे घर लुटत असताना शांत बसून रहा. असा हा कावा आहे.

काहीही कुठलीही मदत न घेता आपण आपला कचरा वेचून पोटही भरावे आणि समाजाची समस्या सोडविण्यास हातभारही लावावा अशी कोंडाबाईची साधी भूमिका इतर सामान्य माणसांनी स्विकारली पाहिजे. गेली साठ वर्षे आपल्या समस्या न सोडविणार्‍या आणि स्वत:च समस्या बनलेल्या शासनाला हळू हळू मर्यादित करून टाकलं पाहिजे. आवश्यक तेवढा शासकीय हस्तक्षेप ठेवून बाकीच्या अमरवेलीसारख्या वाढलेल्या आयतखाऊ फांद्या कापून टाकायची वेळ आली आहे. इज्जातीचे खाणारी सामान्य कोंडाबाई डोळ्यासमोर ठेवून आम्हीही गैर मार्गाने काम करणाऱ्या नेत्याला, अधिकाऱ्याला मुकपणे पाठींबा देऊन पापात सहभागी होणे नाकारले पाहिजे.

एका साध्या खड्ड्यासाठी केलेल्या आंदोलनाला वर्ष उलटलं तरी काहीही परिणाम होत नाही. तेंव्हा मोठ मोठी आंदोलन करणे आणि त्यामागे शक्ती खर्च करण्यापेक्षा जास्त डोकं लावून परिणामकारक उपाय शोधले पाहिजेत. 
      
श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575

Tuesday, October 21, 2014

डॉ. प्रकाश बाबा आमटे : चित्रपट नव्हे अनुभूती !


                         दै. पुण्यनगरी, उरूस, मंगळवार 21 ऑक्टोबर 2014 

चित्रपटातील प्रसंग आहे. हेमलकसा या आदिवासी भागात मलेरियाची साथ येते. भराभर आदिवासी मृत्यूमुखी पडायला लागतात. एक आदिवासी बाई कडेवर छोटं लेकरू घेवून ‘माझ्या पोराला वाचवा’ म्हणत रडत ओरडत येते. प्रकाश आमटे तिला शांत करतात. तिच्या बाळावर उपचार चालू करतात. पोराला लावायला सलाईन नसते. आता काय करायचे असा विचार करत असताना त्यांचा सहकारी एक सलाईनची बाटली घेवून येतो. ही कुठून आणली? असा प्रश्न विचारताच तो उत्तरतो की ज्या म्हातार्‍याला ही लावली होती तो मेला आहे. आता हीचा त्याला काय उपयोग? 

रात्रभरच्या वैद्यकीय उपचाराला प्रतिसाद देत तो मुलगा वाचतो. त्याची आई पहाटे म्हणायला लागते, ‘याच्याकडे थोडावेळ लक्ष द्या. मी जरा जावून येते.’ आमट्यांचा सहकारी तिला जाऊ देत नाही. आत्ताच कुठे मुल वाचले आहे. आता तू कुठू निघालीस. पण ती बाई अस्वस्थपणे चुळबुळ करत राहते. शेवटी न राहवून ती प्रकाश आमटेंच्या टेबलापाशी येते. तेही दोन रात्रींपासून न झोपता रूग्णांची सेवा करत थकून गेले असतात. ही बाई भकास डोळ्यांनी उदास स्वरात सांगते, ‘साहेब मला जावून येवू द्या. जरा या लेकराकडे लक्ष ठेवा. माझा नवरा आधीच मेला होता. दोन लेकरं वाचावी म्हणून त्यांना घेवून पळत निघाले. एक लेकरू वाटेतच मेलं. त्याला झाडाखाली ठेवून आले. जनावरांनी खावू नये म्हणून त्याच्यावर काटे कुटे टाकून आले. आता जावून त्याला मातीआड करून येते. तोवर तूमी याकडे लक्ष द्या.’

या प्रसंगावर काय भाष्य करणार? अशाप्रसंगी व्यक्त करायची भाषा अजून जन्माला यायची आहे. आपण चित्रपट पाहतो आहोत, आजूबाजूला इतके लोक बसलेले आहेत हे सारे विसरून आपल्या डोळ्यातून अश्रुच्या  धारा वहायला लागतात. चित्रपट म्हणून या प्रसंगाची काय चिकित्सा करायची ते समीक्षक करो पण एक सामान्य प्रेक्षक मात्र या दृश्याने हादरून जातो. 

डॉ. प्रकाश बाबा आमटे : अ रिअल हिरो’ हा चित्रपट सामान्य प्रेक्षकांना हलवून सोडतो. कुठेही आक्रस्ताळेपणा न करता, आरडा ओरडीची भाषा न वापरता, भडकपणा न करता दिग्दर्शक समृद्धी पोरे हीने ही किमया साधली आहे.

नाना पाटेकर यांच्यावर विचित्रपणाचा, आक्रस्ताळी भाषा वापरण्याचा जो आरोप एरव्ही केला जातो तो पूर्णपणे खोडून काढत आपण कसे उच्च दर्जाचे अभिनेते आहोत हेच त्यांनी सिद्ध केले आहे. याचा उत्तम पुरावा म्हणजे चित्रपटातील एक प्रसंग. आपल्या आईवर अत्याचार करणार्‍या पोलिस अधिकार्‍याचा खुन करून सुड उगवणारा पुरू हा छोटा मुलगा आमटे दांपत्याच्या हाती लागतो. या मुलाला त्याचे आयुष्य या मार्गाने वाया जाईल म्हणून ते समजून सांगतात.  आमटेंच्या घराबाहेर नक्षलवादी येवून बसतात आणि मागणी करतात की हा मुलगा आमच्या ताब्यात द्या. तो आम्हाला जगू देणार नाही. या सगळ्या प्रसंगात नाना पाटेकर केवळ एकच वाक्य बोलतो ‘समझो वा मर गया’. ते नक्षलवादी निघून जातात. पुढे हा मुलगा मोठा होतो, परदेशात मोठ्या नौकरीवर लागतो. हा सगळा प्रसंग नाना पाटेकरने एका वाक्यावर तोलला आहे.
प्रकाश आमटे यांनी हेमलकश्यात उभे केलेले काम त्यांना मॅगेसेस पुरस्कार देवून गेले. तेंव्हा इतर सर्व गोष्टींना फाटा देवून नेमकेपणाने हाच विषय परिणामकारक पद्धतीने समृद्धी पोरे यांनी चित्रपटातून समोर आणला आहे.

आदिवासींसाठी काम करण्यासाठी एनजीओ चालविणे यावर मोठी टिका बर्‍याचदा केली जाते. अशा एनजीओजना मिळणारा मोठा परदेशी निधी या या टिकेचा मुख्य विषय असतो. बर्‍याच एनजीओ बाबत हे खरेही आहे. पण प्रत्यक्षात असे काम किती अवघड आहे. एक तर पुरेसा पैसा मिळत नाहीच, शिवाय सरकारी पातळीवरही अशा कामांची कशी उपेक्षा होते, अडवणूक होते याचे फार चांगले चित्रण चित्रपटात केल्या गेले आहे. 

काही अनाथ, जखमी झालेले प्राणी आमटेंच्या लोकबिरादरी प्रकल्पात गोळा होतात. त्यांचे एक अनाथालय आपसुकच तयार होते. त्याची पहाणी करायला आलेला सरकारी अधिकारी मठ्ठ शासकीय व्यवस्थेचा नमुनाच असा दाखवला आहे जे की वास्तव आहे. ज्याला डिअर म्हणजे हरिण हे स्पेलिंगही कसे माहित नसते. ज्याची भाषा कशी अरेरावीची असते हा प्रसंग फार चांगला रंगवला आहे.

आदिवासींसाठी काम करताना अनंत अडचणी येतात तसे आनंदाचे क्षणही येतात. एका जख्ख म्हातारीच्या डोळ्यात मोतीबिंदू झाला असतो. ती महिनाभरापासून उपचारासाठी चकरा मारीत असते. पण शहरातून कोणी डॉक्टर तिच्यावर उपचारासाठी येत नाही. आणि तिला बाहेर नेणे शक्य नसते. शेवटी डॉ. प्रकाश आमटे स्वत: नेत्ररोग तज्ज्ञ नसताना तिच्यावर उपचार करण्याचे धाडस करतात. तिचे ऑपरेशन होते. तिच्या डोळ्यावरची पट्टी काढताना सगळे श्वास रोखून पहात राहतात.आणि जेंव्हा ती सुरकूतल्या चेहर्‍याची म्हतारी दृष्टी आल्याच्या आनंदाने आपल्या हातातील लाकडी चमचा उचलून माडिया भाषेत काहीतरी उद्गार काढते तेंव्हा प्रेक्षकही त्या आनंदात सहज सामिल होवून जातात.

आजूबाजूचा निसर्ग आणि त्यात राहणारे अदिवासी यात रमणारे आमटे दांपत्यही निसर्गात मिळून मिसळून जातात. त्यांचे जे घर चित्रपटात दाखवले आहे ते फार सुंदर आणि त्यांच्या निसर्गप्रेमाची साक्ष देणारे आहे. त्यांची मुलंही पुढे यातच रमून जातात. आमटेंच्या नातवाने शाळेत पाळीव प्राणी कोणते असा प्रश्न विचारल्यावर ‘वाघ, सिंह’ असं लिहीलं आणि मास्तरांनी त्याला कसे गुण दिले नाहीत. मग आमटे यांनी शाळेत जावून सांगितलं की खरंच आम्ही हे प्राणी पाळले आहेत असं नव्हे तर ते आमच्या कुटूंबाचाच कसा भाग आहेत. हा प्रसंग मोठा मजेदार उतरला आहे.  

सगळ्या चित्रपटभर प्रकाश आमटेंच्या थटेखोर स्वभावाची छाया पसरली आहे. हे श्रेय अर्थातच नाना पाटेकर यांच्या अभिनयाचे आहे.  मंदा आमटेंचे काम करताना सोनाली कुलकर्णी यांनी आपल्या हसतमुख चेहर्‍याने चांगली साथ दिली आहे. सगळ्या चित्रपटभर सोनाली कुलकर्णीच्या स्वच्छ परिटघडीच्या साड्या मात्र थोड्याशा खटकतात. थंडीत कुडकुडणार्‍या लहान मुलाला पाहून बीनबाह्याची बंडी आणि खाली चड्डी अशा साध्या वेषातच राहण्याचा संकल्प करणार्‍या प्रकाश आमटेंसोबत काम करताना आणि त्यातही वीजही न पोचलेल्या हेमलकश्यात वावरताना मंदाताईंचे कपडेही मळले असतील किंवा त्यांना एक साधेपणा आपोआपच आला असणार. पण ही फार छोटी गोष्ट आहे. आमटे नदीत आंघोळ करताना त्यांच्या बरोबर वाघही आंघोळ करतो. हा वाघ खरा नसून तो ऍनिमेशनने बनवला आहे. हे लक्षात येतं. पण यानं फार काही बिघडत नाही. खरं तर या चित्रपटाकडे चिपटाचे निकष लावून पाहता येणारच नाही. आमटेंच्या जिवनाची सामाजिक बाजू प्रकर्षाने मांडण्याचा काम हा चित्रपट करतो हेच महत्त्वाचे आहे. 

एरवी काही करत नाही म्हणून ज्याच्यावर टिका होते त्या महाराष्ट्र शासनाने या चित्रपटाला करमुक्त करून एक चांगले काम केले आहे. मराठी प्रेक्षकांनी चित्रपटाला मोठी गर्दी करून आपल्या सामाजिक जाणिवांवर शिक्कामोर्तब केले आहे.

चांगले चरित्रात्मक चित्रपट मराठीत फार कमी आहेत. नुकताच जब्बार पटेल यांनी यशवंतराव चव्हाण यांच्यावर आणि चंद्रकात कुलकर्णी यांनी सुशीलकुमार शिंदे यांच्यावर  सुमार दर्जाचा चरित्रपट काढून मराठी प्रेक्षकांना  नाराज केले आहे. अतिशय ताकदीच्या या दिग्दर्शकांनी अपेक्षाभंग केला असताना समृद्धी पोरे या नविन तरूणीने एक अतिशय चांगला चरित्रपट द्यावा हा अनपेक्षीत सुखद असा धक्का आहे. चित्रपटात एकच गाणे आहे. लहान मुलांना शिकविण्याचा प्रयास करताना हे गाणे चित्रित झाले आहे. ही खरं म्हणजे एक प्रार्थना आहे. ती चांगली आणि समर्पक अशीच आहे. बाकी चित्रपटात गाण्यांना फारसा वावही नाही. बर्‍याचदा चरित्रपट कंटाळवाणे होत जातात. पण इथे तसं काही दिग्दर्शकिने होवू दिलं नाही. प्रकाश आमटे यांच्या जिवनातील निवडक प्रसंग घेवून चित्रपटाची गती चांगली ठेवली आहे. 

साध्या भाषेत आदिवासींच्या प्रश्‍नांची दाहकता आपल्यासमोर हा चित्रपट मांडतो. नक्षलवाद्यांची समस्या अतिशय त्यांची बाजू न घेता पण त्यांच्या बाजूचा विचार करून इथे मांडली आहे. शासनाने करमुक्त केलेला हा चित्रपट मराठी प्रेक्षकांनी जरूर पहावा.  

श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575

Tuesday, October 14, 2014

लता गाते शमशाद, गीता, आशा सोबत तेंव्हा...

                       दै. पुण्यनगरी, उरूस, मंगळवार 14 ऑक्टोबर 2014 

(राज कपूरच्या  चित्रपटासाठी गीता चा आवाज कधीच वापरला गेला नाही. जिस देश मे गंगा बेह्ती हे या चित्रपटात मात्र गीता चा आवाज होता. त्या प्रसंगी लता गीता आणि राज कपूर असे दुर्मिळ छायाचित्र ....) 


लता मंगेशकर यांचा उल्लेख नुसता लता करण्यात कुणाला लेखकाचा उद्धटपणा दिसू शकेल. पण ही सलगी लता मंगेशकर नावाच्या व्यक्तीसाठी नसून त्या स्वर्गीय सुरांसाठी आहे. जसे की तुकारामाबद्दल आपण बोलतो ते त्या शब्दांशी आपला जिव्हाळा असतो म्हणून. आईच्या नातेवाईकांना नाही का आपण हक्कानं अरे तूरे म्हणतो तसेच या सलगीचे- जिव्हाळ्याचे स्वरूप आहे. 

नुकताच लताचा वाढदिवस होवून गेला. (जन्म 28 सप्टेंबर 1929). लताबद्दल प्रचंड प्रमाणात लिहीलं गेलं आहे. तिच्या आवाजाचे विश्लेषण बर्‍याचजणांनी केलं आहे. हे सगळं करत असताना काही एक दंतकथा खर्‍याखोट्या पसरल्या किंवा पसरवल्या गेल्या. यात एक मुद्दा नेहमी मांडला जातो तो म्हणजे लताने राजकारण करून सोबतच्या गायिकांना कसे पुढे येवू दिले नाही. खरं तर गाणं ही सादरीकरणाची कला आहे. लताच्या समकालीन सर्वच गायिकांचा आवाज आपल्याला ऐकायला उपलब्ध आहे. तेंव्हा दुसर्‍या कोणी काही सांगण्यापेक्षा आपण प्रत्यक्ष ऐकून काय ते ठरवू शकतो. 

लताने आपल्या काळात जी गाणी गायिली त्यात या समकालीन गायिकांसोबत गायिलेली गाणीही आहेत. ती ऐकताना लता आणि समकालीन गायिका यांची आपण तूलना सहज करू शकतो. पण अशी तुलना करण्यापेक्षाही यातील काही सुंदर गाणी निवडून त्यांचा आनंद घेणे हे जास्त चांगले. 

हिंदी चित्रपटात पार्श्वगायनाची पद्धत खर्‍या अर्थाने रूजविणारी पहिली मोठी गायिका म्हणजे शमशाद बेगम (जन्म १४ एप्रिल १९१९). त्या काळात नुरजहा, सुरैय्या यांसारख्या अभिनेत्री-गायिका होत्या नुसत्या गायिका नव्हत्या. पुरूषांचेही तसेच सैगल, श्याम सारखे गायक-नट होते. लताच्या आधीपासून शमशाद गात होती आणि पार्श्वगायनास प्रतिष्ठा मिळवून देण्यात तीचा मोठा वाटा होता. लता आणि शमशाद यांचे मिळून जवळपास तीस तरी गाणी आहेत. 

1949 मध्ये शंकर जयकिशनने संगीताचा बाज बदलला. नवीन नायिकासाठी नवीन आवाजांची गरज होती. नर्गिस, वैजयंतीमाला, मधुबाला या नव्या नायिकांना शमशादचा आवाज शोभून दिसत नव्हता. तिथे लता-आशा-गीताचाच आवाज आवश्यक वाटायला लागला. पण शमशादच्या आवाजाला एक विशिष्ट पोत आहे. लोकसंगीतासाठी लागणारा खडा आक्रमक असा हा आवाज त्या  शैलीतील गाण्यात फारच शोभून दिसतो. लता-शमशाद यांचे सर्वोत्तम गाणे मोगल-ए-आजम (1960) मधील ‘तेरी मेहफील मे किस्मत आजमाकर हम भी देखेंगे’ हे आहे. या लोकप्रिय कव्वालीत प्रेमाचे शारिरपातळीवर समर्थन करताना निगार सुलातासाठी शमशाद आणि प्रेमाचे मानसिक पातळीवर समर्थन करताना मधुबालासाठी लता असे आवाज वापरून शकिल बदायुनीच्या शब्दांचे चीज नौशाद यांनी केले आहे. खडा खणखणीत मोकळा आवाज आणि पातळ कोवळा स्वरांची बारीक कलाकुसर करणारा आवाज यांची एक जुगलबंदीच आपल्याला अनुभवायला मिळते. यात कोण मोठे कोण छोटे असं काही आपल्या मनात येतच नाही.

लताची समकालीन दुसरी गायिका गीता दत्त (जन्म 23 नोव्हेंबर 1930). गीता  आणि लता यांनी जवळपास 19 गाणी सोबत गायली आहेत. या दोघींच्या गाण्यातील चार गाणी फारच सुंदर आहेत. पहिले गाणे लडकी चित्रपटातील (1953) मधील आहे. आर सुदर्शन व धानीराम या अपरिचित संगीतकार जोडीने हे गाणे दिले आहे. या चित्रपटातील जास्त गाणी सी. रामचंद्र यांच्या नावावर आहेत. पण त्यांनी मात्र गीताचा आवाज वापरला नाही. ‘मन मोर मचावे शोर घटा घनघोर छायी घिर घिरके’ असे राजेंद्र कृष्ण यांचे गीताचा गोडवा वाढविणारे बोल आहेत. तरूण कोवळ्या वयाची दोन वेण्या घालणारी डोक्याशी रिबीनीचे फुल बांधणारी वैजयंतीमाला हीच्यावर हे गाणे चित्रित झाले आहे.  

लता-गीताचे दुसरे सुंदर गाणे ‘तुफान और दिया’ या चित्रपटातले आहे. वसंत देसाई यांनी लहान बहिण भावांवरती बेतलेले हे गाणे भरत व्यास यांनी लिहिले आहे. याचे शब्दच किती लयबद्ध आहेत-‘मेरी छोटीसी बहन, देखो गहने पहन, ससूराल चली रे बन ठन के’ वसंत देसाई यांनी एका ठिकाणी मुलाखतीत सांगितले की भरत व्यास यांचे शब्द स्वत:च एक चाल घेवून येतात. खरंच भरत व्यास यांच्यासारखा अनुप्रास कुणीच वापरला नाही. 

मदन मोहनने संगीतबद्ध केलेल्या ‘देख कबीरा रोया’ (1957) मधील ‘हम पंछी मस्ताने’ हे मस्तीखोर गाणे लता-गीताच्या आवाजात आहे. शुभा खोटे आणि अमिता यांच्यावर चित्रित झालेले हे गाणे. साड्यांचे पदर कमरेला खोचलेले, शुभा खोटे माऊथ ऑर्गन वाजवित आहे, वेण्यांचे शेपटे उडत आहेत, बाजूला समुद्राच्या लाटा खळाळत आहेत आणि इकडे लता-गीताचे सुरही हिंदकळत आहेत. राजेंद्र कृष्ण यांच्या या गीतातील एक ओळ बघा, लता गाते आहे ‘धरती को छोड के पिछे बादल के पार जाना है’ आणि त्याला गीता उत्तर देते ‘चुन चुन के शोख तारोंको एक आशिया बनाना है’. रसिकांच्या मनात या दोघीं स्वरांचा सुंदर आशिया निर्माण करतात. लता-गीताचे सर्वात सुंदर गाणे वसंत देसाई यांच्या ‘गुंज उठी शहनाई’ मध्ये आहे. या गाण्याचे शब्द भरत व्यास यांचे आहेत. ‘आखिया भूल गयी है सोना, दिल पे हुआ है जादू टोना, शहनाईवाले तेरी शहनाई रे कलेजवा को चीर गयी चीर गयी ची ऽऽऽऽ र गयी..’ या शब्दांमध्ये जो खट्याळपणा आहे तो गीता दत्त च्या आवाजात जास्तच उठून दिसतो. गाण्याची सुरवातही गीताच्याच आवाजाने झाली आहे. लताचा आवाज हा गीताच्या खट्याळपणाला पोषक असा आहे. इतरवेळी गीताचा आवाज पोषक भूमिकेत वापरला आहे. इथे उलटे झाले आहे. 

लता-आशा या तर आवाजाची जातकुळी तपासली तरी बहिणी आहेत हे सिद्धच होते. दोन स्त्रीयांच्या आवाज वापरायचे तर त्यातील एक आवाज पुरूषी तत्त्वासारखा वापरायची त्या काळात पद्धत होती. म्हणजे तो थोडा जाडसर, मोकळा, टिपेचा वगैरे असावा. त्याप्रमाणे शमशाद, मुबारक बेगम अगदी गीताचाही वापरला आहे. पण लता किंवा आशा यांचा आवाज असा कधीच कुठल्याच संगीतकाराने पुरूषी तत्त्वाने वापरला नाही. लता आणि गीता यांच्या आवाजातील मोहकता गोडवा खट्याळपणा चपळपणा असं सगळं घेवून तयार झालेलं एक अफलातून मिश्रण म्हणजे आशाचा आवाज. लता-आशा अशी जवळपास साठ गाणी हिंदी चित्रपटांत आहेत. त्यातील सर्वांत सुंदर गाणं म्हणजे उत्सव (1985) मधील ‘मन क्यु बहेका रे बहेका आधी रात को’ हे होय. लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी वसंत देव यांच्या शब्दांना जे काही रूप दिलं आहे त्याला तोडच नाही. रेखा आणि अनुराधा पटेल यांनी हे गाणं पडद्यावर साकार केलं आहे. एका कडव्यात रेखा संपूर्ण दागिन्यांसह असते तर सोबत अनुराधा साध्या वेशात आणि पुढच्या कडव्यात अनुराधा संपूर्ण साजशृंगारात तर रेखा साध्या कपड्यांत. तसाच लता आणि आशाचा सूर लागलेला आहे. या गाण्याचे ध्वनीमुद्रणही अप्रतिम झाले आहे. राजन साजन मिश्रा यांचे गाणे म्हणजे कसे तर एक जिथे सोडतो तिथून दुसरा उचलतो. दुसरा जिथपर्यंत आणून सोडता तिथून पहिला पुढचा प्रवास चालू करतो. लता-आशा यांच्या आवाजाचे असेच स्वरूप आहे. गरज आहे तिथे हे आवाज मिसळून जातात, गरज आहे तिथे आपले वेगवेगळे अस्तित्व स्पष्टपणे सिद्ध करतात. 

मुबारक बेगम सोबत लताचे एकच गाणे आहे. बारादरी (1955) चित्रपटात शौकत देहलवी नाशाद या संगीतकाराने या दोघींचा आवाज वापरला आहे. पण हे गाणे फार काही विशेष नाही. सुमन कल्याणपुर आणि लता यांचेही एकच गाणे आहे. चांद चित्रपटात (1959) हेमंतकुमार यांच्या संगीताने नटलेले हे एक नृत्य गीत आहे. सारख्या वेशातील दोन नर्तिकांवर हे गाणे चित्रित केले आहे. लताच्या आवाजाची छायाच सुमन कल्याणपूर आहे हे जणू संगीतकाराला सुचवायचे आहे. हे गाणेही फारसे विशेष नाही. ममता (1966) मध्ये रोशन ने लता-सुमन-रफी असे एक सुंदर गाणे ‘रहे ना रहे हम’ गावून घेतले आहे. पण यातही लताच्या आवाजात हे गाणे स्वतंत्र आहे. तर सुमन-रफी असे द्वंदगीत आहे. कदाचित त्या काळी लता रफी सोबत गात नसल्यामुळे अशी तडजोड करण्यात आली असावी. प्रत्यक्षात लता व सुमन एकसाथ असे या गाण्याचे स्वरूप नाही. 

लताच्या 85 व्या वाढदिवशी तिच्या जून्या गाण्यांचा धांडोळा घेणे फारच आनंददायी आहे. प्रत्यक्षात हिंदी चित्रपट संगीतातील राजकारण जे असायचे ते असो, रसिकांच्या कानात मात्र सुरांचे माप सर्वच कलाकारांनी भरभरून टाकलं आहे. 1949 ते 1965 हा काळ हिंदी चित्रपट संगीताचा सुवर्णकाळ. या काळातील सर्वात प्रभावी आवाज लताचा आणि सर्वात प्रभावी संगीत शंकर जयकिशनचे होते हे दर्जा आणि संख्या दोन्हीच्या पातळीवर खरे आहे.  
     श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575
तेरे मेहफिल मे, अखिया भूल गायी हे सोना, मन क्यू बेहाका या तीन गाण्याची link.....
http://www.hindigeetmala.net/song/teri_mahafil_men_kismat_aazamaa.htm
http://www.hindigeetmala.net/song/akhiyan_bhul_gayee_hain_sona.htm
http://www.hindigeetmala.net/song/man_kyon_bahakaa_re_bahakaa.htm

Tuesday, October 7, 2014

बगळ्यांची माळ फुले अजूनी अंबरात


                    दै. पुण्यनगरी, उरूस, मंगळवार 7 ऑक्टोबर 2014 

औरंगाबाद शहरातील प्रसंग आहे. कवी वा.रा.कांत यांच्या जन्मशताब्दीचा कार्यक्रम सादर करीत असताना ‘बगळ्यांची माळ फुले’ हे गाणे मरावाड्यातील सुरेल गायक संजय जोशी यांनी गायला सुरवात केली आणि रसिकांनी टाळ्यांचा कडकडाट केला. कांतांना जावून 23 वर्षे उलटून गेली.  6 ऑक्टोबर 1913 हा कांतांचा जन्मदिवस. आज कांत असते तर ते 101 वर्षांचे असते. कांतांच्या कविता त्यांच्या 9 कवितासंग्रहातून मराठी वाचकांच्या समोर आहेत. पण त्यांची आठवण रसिकांना सारखी येत राहते ती ‘त्या तरूतळी विसरले गीत’, ‘आज राणी पूर्वीची ती प्रीत तू मागू नको’, ‘सखी शेजारणी तू हसत रहा’, ‘राहिले ओठातल्या ओठात वेडे शब्द माझे राहिले’ आणि अर्थातच ‘बगळ्यांची माळ फुले’ सारख्या गीतांमुळे.

नांदेडात जन्मलेल्या कांतांनी निजामी राजवटीत शेतकी खात्यात साधा कारकून म्हणून आपल्या नौकरीची सुरवात केली. पुढे आकाशवाणीच्या मराठी विभागात हैदराबाद व नंतर औरंगाबाद येथे काम करण्याची संधी त्यांना मिळाली. आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून कांत निवृत्त झाले. ही झाली त्यांची साधी व्यवहारीक माहिती. पण साहित्याच्या क्षेत्रात कविता, अनुवाद, नाट्य-काव्य अशी किमान 18 पुस्तके त्यांच्या नावावर आहेत. शासनाचे पुरस्कार, साहित्य संस्कृती मंडळाची गौरव वृत्ती, साहित्य-कवी संमेलनाची अध्यक्षपदे असे कितीतरी सन्मान कांतांच्या वाट्याला आले. सतत लिहीत राहिलेल्या या कविने एका ठिकाणी मोठं विलक्षण लिहून ठेवलं आहे. 

गाते कोण मनात कळेना 
गाते कोण मनात ॥
जरी शतावधि कविता लिहिल्या
शंभरदा वाचिल्या गाइल्या
शब्द कुणाचा सूर कुणाचा 
अजूनी मला अज्ञात ॥
अभिमानाने कधी दाटता
रचिले मी हे गाणे - म्हणतां
गीतच रचिते नित्य तुला रे - 
फुटे शब्द हृदयांत ॥
मावळते शब्द, मौज प्रकाशन, पृ. 58)

कलेच्या प्रांतातील एक शाश्वत सत्यच कांतांनी लिहून ठेवलंय. आपण कला निर्माण करतो असे नाही तर कलाच आपल्याला कलाकार म्हणून घडवित असते. कलेविषयी एक जाणिव कायम त्यांच्या मनात ताजी असायची. मावळते शब्द या आपल्या शेवटच्या काव्यसंग्रहात त्यांनी सुरवातीला ऋग्वेदातील एक ऋचेचा (ऋग्वेद, 2-28-5) भावार्थ दिला आहे.
 
मी विणितो गाणे तंतु नको रे तोडू
सम येण्याआधी ताल नको रे सोडू

कुठल्याही कलाकाराची परमेश्वराचरणी हीच प्रार्थना असते की मी विणित असलेल्या गाण्याचे धागे तुटू देऊ नकोस. सम येण्याआधी म्हणजेच परिपूर्तता होण्याआधीच हा जो ताल जुळून आला आहे तो सोडायला लावू नकोस. 

कांतांचे आयुष्य तसे परिपूर्ण होते. 78 वर्षांचे आयुष्य त्यांना लाभले. (मृत्यू 8 सप्टेंबर 1991) त्यांचे कवितासंग्रह मौजेसारख्या मान्यवर प्रकाशन संस्थांनी प्रकाशित केले. वसंतराव देशपांडे, अरूण दाते, सुधीर फडके सारख्यांनी त्यांच्या गीतांना स्वर दिला. यशवंत देव, श्रीनिवास खळे यांच्यासारखे प्रतिभावंत संगीतकार त्यांना लाभले.

कुठलाही प्रतिभावंत निसर्गाच्या अद्भूत सौंदर्याने हरखून जातो. कांतही याला अपवाद नाहीत. पन्नास वर्षांपूर्वी लिहीलेली ही कविता आजही किती ताजी टवटवीत वाटते. 

सरी श्रावणाच्या येती
शेला पाण्याचा उडतो
पंखा उन्हाचा मधून
थोडा थोडा उमलतो

चिंब भिजून कर्दळ
लाल फुलांनी पेटते
ओल्या आगीत फुलांच्या
शीळ साळुंकी पेरते

मग कलत्या उन्हांत
होते आभाळाचे गाणे
जेथे संपून उरते
उभ्या जन्माचे या देणे  
(मावळते शब्द, मौज प्रकाशन, पृ. 33)

आभाळाचे गाणे झाल्याचा अनुभव आपलं काळीज कलाकाराचं असेल तरच येतो. बा.भ.बोरकर, पांडगांवर, महानोर यांच्यासारख्यांनी मराठीत खुप समृद्ध अशी निसर्ग अनुभवाची कविता लिहीली आहे. कांतांची ही कविता याच समृद्ध परंपरेतली आहे.

अनुवादाचे फार मोठे काम कांतांनी केले. त्याची फारशी दखल घेतली गेली नाही. यशपाल शर्मा यांची  ‘मनुष्याची रूपं’  ही हिंदी कादंबरी, मौलना अब्दूल हलीम शर्र यांची उर्दू कादंबरी ‘कालचे लखनौ’, रफिक झकेरिया यांची इंग्रजी कादंबरी ‘सुलतान रझिया’, राजेंद्रसिंह बेदी यांची कादंबरी ‘एक चादर मैलीसी’असे महत्त्वाचे अनुवाद कांतांनी मराठीत केले. मिर्जा गालिबवरच्या हैदर यांच्या इंग्रजी पुस्तकाचा मराठी अनुवादही त्यांनी मोठ्या रसाळतेने केला. गालिबच्या बर्‍याच कविता त्यांनी मराठीत आणल्या. नाट्यकाव्य हा एक अतिशय दुर्लक्षित काव्यप्रकार कांतांनी मोठ्या ताकदीने हाताळला. पंचेविसच्या जवळपास नाट्यकाव्य त्यांनी लिहीली. मराठीत इतकी नाट्यकाव्य कुणाच्याच नावावर नाहीत.

आज कांतांच्या माघारी आपल्या हातात आहे ती त्यांची कविता, गाणी, नाट्यकाव्य आणि त्यांचे अनुवाद. कुठल्याही कलाकाराला आपण आपल्या कलेच्या रूपाने रसिकांच्या स्मरणात राहू याचा विश्वास असतो. कांतांनीही आपल्या दोनुली या कवितासंग्रहात ‘अस्तित्व’ नावाने छोटेसे चिंतन या संदर्भात लिहून ठेवले आहे. ते मोठे समर्पक आहे. 

साठविता डोळा । सूर्यनारायण ।
उडावे हे प्राण । अचचित ॥
जळात उन्हात । पाखरांच्या माळा ।
बिंबाचा सोहळा । प्रतिबिंबी ॥
सहज गळावे । देहाचे या भान ।
पिकलेले पान । तळ्यामध्ये ॥
बिंबतात झाडे । तीरीची पाण्यात ।
तसे कवितेत । नांदो आम्ही ॥
(दोनुली, मौज प्रकाशन, पृ. 16)

त्यांच्या कवितेत कांत अजूनही नांदत आहेत. कांतांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने त्यांच्या समग्र कविता एकत्रित प्रकाशीत होण्याचा संकल्प करण्यात आला होता. हे पुस्तक लवकरच प्रकाशीत होते आहे. 6 ऑक्टोबर या कांतांच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांचे हे छोटेसे स्मरण. 
बगळ्यांची माळ फुले अजूनी अंबरात ।
अजूनही कांत तूम्ही आमच्या स्मरणात । 
 
     श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575