Tuesday, November 11, 2014

अनंत भालेराव पुरस्कार-आदर्श गुणांचा सत्कार !


                         दै. पुण्यनगरी, उरूस, मंगळवार 11 नोव्हेंबर 2014 

तेवीस वर्षांपूर्वी अनंत भालेराव यांचे निधन झाले (26 ऑक्टोबर 91). त्यांच्या सहवासातील परिचयातील माणसे त्यांना ‘अण्णा’ या संबोधनाने ओळखत. घरातील मोठ्या भावाला अण्णा म्हणायची आपल्याकडे पद्धत आहे. लहान भावंडांना ‘अण्णाचा’ आधार वाटायचा तसं अनंत भालेरावांबाबतही होतं. आजही त्यांच्याबद्दल बोलताना अण्णा हे संबोधन सहज ओठावर येतं ते त्याच कारणाने. 

अण्णांच्या स्मृती प्रित्यर्थ त्यांच्या पहिल्या स्मृतिदिनापासून ‘अनंत भालेराव स्मृति पुरस्कार’ देण्याची सुरवात त्यांच्या नावाने स्थापन झालेल्या प्रतिष्ठानने केली. पहिलाच पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार गोविंद तळवलकर यांना देण्यात आला. कामगार नेते जॉर्ज फर्नांडिस यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला होता. तेंव्हापासून आजतागायत ही परंपरा चालू आहे. या वर्षी प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ डॉ. द.ना.धनागरे यांना हा पुरस्कार देवून गौरविण्यात आले.

गोविंद तळवलकर, कुमार केतकर, अरूण टिकेकर यांसारख्या ज्येष्ठ पत्रकार; विजय तेंडूलकर, महेश एलकुंचवार यांच्या सारखे नाटककार; मंगेश पाडगांवकर,ना.धो.महानोर हे प्रतिभावंत कवी; ग.प्र प्रधान, मृणाल गोरे, मेधा पाटकर, अभय बंग, थोर गांधीवादी गंगाप्रसादजी अग्रवाल, नरेंद्र दाभोळकर ही सामाजिक राजकीय क्षेत्रातील मोठी माणसे, अनिल अवचट आदिंना या पुरस्काराने गौरविण्यात आले.  अप्पा जळगांवकर यांच्यासारखा हार्मोनिअम वादक जो मुळचा मराठवाड्याचा आहे त्यांना पुरस्कार दिल्यावर भाषण करण्यास सांगितले. तर अप्पा बोलायला तयार झाले नाहीत. मग त्यांची मुलाखत रसिकराज ऍड. वसंत पाटील यांनी घेतली. अप्पांबद्दल पु.ल.देशपांडे असं म्हणाले होते, ‘अप्पा काही पेटी वाजवत नाही. तो बोटाने गातो!’ अशा व्यक्तींना पुरस्कार देण्यात आला. खरं तर हा पुरस्कार आता पुरस्कार उरलेला नाही. समाजातील आदर्श प्रवृतीचा हा सत्कार आहे. 

हा पुरस्कार स्वीकारताना द.ना.धनागरे यांच्यासारखा शिक्षण तज्ज्ञ उच्च शिक्षणावर ताशेरे ओढतो त्याची दखल गांभिर्याने घ्यायला हवी. धनागरे यांचा सहभाग असलेल्या  समितीने ज्या शिक्षण संस्थांवर आक्षेप घेतले. त्यांच्याबाबत नकारात्मक अहवाल दिला त्या शिक्षण संस्थांच्या संचालकांना शासन पुढच्याच वर्षी पद्मश्री देते ही चिंतेची बाब आहे. महात्मा गांधींच्या नावाचा वापर करून, गांधींच्या खादीच्या धोरणाचे पांघरून वापरून आपले काळे कृत्य झाकणार्‍या शिक्षणसम्राटांचे वाभाडे जाहिररित्या धनागरे यांनी आपल्या भाषणात काढले. 

असे पुरस्कार जेंव्हा दिले जातात आणि त्या प्रसंगी मृणाल गोरे, ग.प्र.प्रधान, टिकेकर, केतकर, धनागरे ही माणसे काही तळमळीने सांगतात ते नीट समजून घेतले पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे ज्या प्रवृत्तींवर या सत्कारमूर्तींनी आक्षेप घेतले आहेत त्यांना प्रतिष्ठा देणार नाही असे सामान्य माणसांनी ठरवायला पाहिजे. याच पुरस्कार वितरण सोहळ्यात न्यायालयात निर्णय मिळतो पण न्याय मिळतो का? असा खडा सवालच धनागरे यांनी केला आहे. आणि शेवटी लोकांना हे आवाहनच केले आहे की आता लोकांनीच राज्यकर्त्यांवर शासनावर दबाव टाकला पाहिजे.

हे विचार अनंत भालेराव यांच्या स्मृतीपुरस्कार निमित्ताने व्यक्त झाले हा एक चांगला योगायोग. कारण अण्णा नेहमीच स्पष्ट आणि रोखठोक लिहायचे. मंत्र्यांनी केलेला भ्रष्टाचार चव्हाट्यावर मांडला पण त्याचे पुरावे न्यायालयात देता आले नाहीत. या प्रकरणी तुरूंगात जाणे अण्णांनी पसंत केले. ते तुरूंगातून सुटले तेंव्हा लोकांनी प्रचंड जल्लोषात त्यांचे स्वागत केले आणि त्यांची भव्य मिरवणूक काढली. कमल हसन यांच्या अप्पु राजा चित्रपटातील ‘ये हाय कोर्ट नही, माय कोर्ट है’ असा एक संवाद फार गाजला होता. त्याप्रमाणे अण्णांना जनतेच्या ‘माय कोर्ट’ने उचित न्याय दिला.

आज अण्णांना जावून तेवीस वर्षे उलटली आहेत आणि धनागरे त्यांच्या स्मृति पुरस्कार सोहळ्यात अण्णांच्या विचारांचा हाच धागा मांडून दाखवत आहेत हे फार महत्त्वाचे आहे.

अण्णा आणि मराठवाडा म्हणजे एक अद्वैत. अण्णा म्हणजे मराठवाडा पेपर आणि मराठवाडा म्हणजेच अण्णा. दोन वर्षांपूर्वी औरंगाबाद शहरात एका मोठ्या समुहाच्या वृत्तपत्राने एक परिसंवाद आयोजित केला होता. त्यात मराठवाडा हा प्रदेश त्याची अस्मिता त्याचा विकास येथील पत्रकारिता हा विषय निघाला. दै. मराठवाड्याची चर्चा निघाली तेंव्हा त्या वृत्तपत्राचे व्यवस्थापकीय संपादक उपहासाने असे म्हणाले की ते वृत्तपत्र तर केंव्हाच बंद पडले. त्यावर एका वक्त्याने त्यांना ताडकन सुनावले की बंद पडूनही ते वृत्तपत्र आणि त्याचे संपादक यांचा प्रभाव अजून लोकांवर आहे. आणि तुमचे वृत्तपत्र चालू असूनही त्याचा कोणावरच कसलाच प्रभाव नाही.

ही खरंच विचार करण्याची गोष्ट आहे की अण्णांसारखा  सारखा संपादक जेंव्हा लिहायचा त्याचा प्रभाव तेंव्हा तर लोकांवर पडायचाच पण आजही त्यांचे विचार वाचणार्‍याला प्रभावित करून जातात. यशवंतराव चव्हाण यांना ‘घोड्याचा खरारा करणारे अश्वमेधाचा घोडा काय अडवणार?’ असा टोला अण्णांनी मारला होता. आजची राजकीय परिस्थिती पाहता राज्यकर्त्यांना असे सुनावणारे किती संपादक आहेत? बी.टी. रणदिवे हे कम्युनिस्टांचे मोठे पुढारी. ते गेले तेंव्हा ‘बी.टी.आर. गेले : राजकीय क्षेत्रातील धाक गेला’ असा एक साध्या शब्दांमधला विलक्षण प्रभावी लेख अण्णांनी लिहीला होता. बी.टी.आर.बद्दल इतक्या जिव्हाळ्याने एखाद्या कम्युनिस्टानेही लिहीले नाही.

संपादक म्हणून जबाबदारी संपल्यावर ते ‘कावड’ हे सदर दै. मराठवाड्यात लिहायचे. या त्यांच्या सदराची कित्येक वाचक चातकाप्रमाणे वाट पहात असायचे. आज स्वच्छता अभियासाठी गांधींची आठवण काढली जाते. अण्णांनी ‘गांधी आमचा कोण लागतो?’ या नावाने एक सुंदर लेख कावड सदरात गांधी जयंतीच्या निमित्ताने लिहीला होता. गांधींची हत्या झाली त्याच दिवशी उमरी बँक लुटली गेली त्यात अनंतरावांचा सहभाग होता. ती लाखो रूपयांची रक्कम घेवून ही मंडळी उमरखेडला चालली होती. पहाटे त्यांना शेतकरी आपला शेतमाल गावाकडे वापस आणताना दिसले. त्यांनी विचारले की मोंढ्यात जायच्या ऐवजी तूम्ही वापस का निघालात? शेतकर्‍यांनी सांगितले की गांधीबाबाचा खून झाल्यामुळे मोंढा बंद आहे. अण्णा लिहीतात, ‘‘गांधींचा खून झाला हे ऐकून आम्ही  तर जागच्या जागीच खलास झालो. एक मोठा पराक्रम गाजवून आम्ही आलो होतो परंतू तो आता शून्यवत झाला होता. लाखो रूपयांची रक्कम या क्षणी कोणी हिसकून नेली असती तर आम्हाला काहीच वाटले नसते. आम्ही प्रतिकार कला नसता. कारण या पैशांहून अधिक मोलाचे नष्ट झाले होते. गांधीजी गेले नव्हे आपले सर्वस्वच गेले. आपण निराधार झालो अशी जाणीव झाली.’’

मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराला विरोध केला म्हणून अण्णांची फार बदनामी केल्या गेली. त्यांच्या अंत्ययात्रेत आमचा एक दलित मित्र सहभागी झाला होता. अंत्यविधीच्यावेळी अश्रुभरल्या डोळ्यांनी सरण रचण्यासाठी तो पुढे सरसावला. सगळे आटोपल्यावर माझ्या प्रश्नार्थक चेहर्‍याकडे पाहून त्याने खुलासा केला, ‘अरे मी पाहिलेला हा सगळ्यात मोठा माणूस. साध्या घरात राहणारा, धोतर घालणारा हा आमचा शत्रू कसा असेल? गावोगावच्या दलितांना मराठवाडा पेपरमधूनच विचार वाचायला मिळाले होते.’ अण्णा आत्मा मानत नव्हते. पण माझ्या जिवलग मित्राच्या शब्दांनी त्यांच्या आत्म्याला नक्कीच समाधान वाटले असेल. 
अण्णांच्या 23 व्या स्मृतिदिनामित्त विनम्र अभिवादन.    
  
श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575

No comments:

Post a Comment