Tuesday, November 18, 2014

उर्दू साहित्य देवनागरी लिपीतही हवे !



                         दै. पुण्यनगरी, उरूस, मंगळवार 18 नोव्हेंबर 2014 


सिमेंट कंपनीची एक जाहिरात आहे. अर्जुन नावाचा एक मुलगा बाईंनी भिंतीवर निबंध लिहा असे सांगितल्यावर सांगतो, ‘मॅडम, मेरा एक बहोत अच्छा दोस्त है इकबाल. मेरे साथ वो क्रिकेट खेलता था. अब नही खेलता. ताऊजी केहते है हम दोनो मे एक दिवार खडी हुई है. जो मुझे बिलकूल नजर नही आती.’ या जाहिरातीवर जास्त काही भाष्य करायची गरज नाही इतकी ती बोलकी आणि नेमकी आहे. मुस्लिम वस्ती जशी वेगळी असते त्याचप्रकारे उर्दू भाषा आणि लिपीही वेगळी असल्यामुळे एक ‘दिवार’ तयार झाली आहे. हे खरेच आहे.

डॉ. राही मासूम रजा ज्यांनी रामायण या मालिकेचे संवाद लिहीले त्यांनी उर्दू साहित्य देवनागरी लिपीत असायला हवं याची जोरदार मागणी केली होती. सुप्रसिद्ध कवी जावेद अख्तर यांनी आपला ‘तरकश’ हा उर्दू कवितासंग्रह देवनागरी लिपीत प्रसिद्ध केला. त्याला प्रचंड प्रमाणात प्रतिसाद मिळाला. ज्ञानपीठ प्रकाशनाने उर्दू कवितांची पुस्तके देवनागरी लिपीत प्रसिद्ध करून खुप मोठा वाचक वर्ग उर्दूसाठी मिळवला. 

हे बर्‍याच जणांच्या लक्षातच येत नाही की उर्दू ही अस्सल भारतीय भाषा आहे. दिल्लीच्या परिसरात या भाषेचा जन्म झाला. ही भाषा भारतीय असल्यामुळेच कुराण उर्दूत कशाला अशी तक्रारच मुस्लीम धर्ममार्तंडांनी एके काळी केली होती. या भाषेला राजाश्रय मिळाला म्हणून ही भाषा वाढली असा एक गैरसमज काही लोक मुद्दाम पसरवतात. पण हे कुणाला फारसे माहित नसते की ज्या मोगल सम्राट औरंगजेबाचा मुस्लिम धर्मवेडा म्हणून द्वेष केला जातो त्याच्या काळात उर्दू भाषा नव्हती. मोगल सम्राटांची राजभाषा पर्शियन होती. उर्दू या तुर्की शब्दाचा अर्थ सैन्य असे होतो. दिल्लीच्या परिसरातील मोगली सैन्याची जी भाषा होती जीत काही तूर्की आणि पर्शियन शब्दांचे मिश्रण असलेली हिंदी भाषा प्रचलित होती. हीच भाषा उर्दू म्हणून प्रसिद्ध झाली. याच भाषेला हिंदवी किंवा देहलवी असेही म्हटल्या जायचे. तेंव्हा ज्या कुणाचा गैरसमज असेल की उर्दूचा आणि हिंदूस्थानचा पर्यायाने हिंदूंचा काही संबंध नाही तो त्यांनी दूर करावा. 

1837 मध्ये पहिल्यांदा इंग्रजांच्या काळात पर्शियन लिपीतील उर्दूला इंग्रजी भाषेसोबत राजभाषेचा दर्जा मिळाला. लिपी आणि भाषा यांची ही सांगड हिंदूस्थानी वाचकांसाठी गैरसोयीची ठरली. गंमत म्हणजे पंजाबी, सिंधी या भाषांनीही पर्शियन लिपी वापरली आहे. प्रसिद्ध हिंदी लेखक प्रेमचंद यांनीही बरेच हिंदी साहित्य या पर्शियन लिपीत (ज्याला सध्या उर्दू लिपी असे संबोधले जाते) लिहीले आहे. उर्दू साठी पहिला ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला ते फिराक गोरखपुरी हे हिंदू होते. 

फक्त भाषेचाच विचार केला तर जगातील पहिल्या चार भाषांत हिंदी-उर्दू चा क्रमांक लागतो. (पहिल्या तीन भाषा म्हणजे चिनी मँडरिन, इंग्लिश आणि स्पॅनिश) तेंव्हा जर उर्दू देवनागरी लिपीत जास्त प्रमाणात आली तर ती लेखी स्वरूपातीलही चौथी भाषा हिंदीच्या बरोबरीने असेल. खरे तर भारत आणि पाकिस्तान मधील उर्दू म्हणजे उर्दू-हिंदी असे मिश्रणच आहे असे भाषातज्ज्ञ सांगतात. त्यांना वेगळे करणे अवघड ठरते. 

दुष्यंतकुमार या कवीचा ‘साये मे धूप’ हा कविता संग्रह प्रसिद्ध झाला आणि कित्येक अभ्यासक समिक्षक बुचकळ्यात पडले. त्याचे कारण म्हणजे ही भाषा कोणती? हीला उर्दू म्हणायचे की हिंदी? शिवाय ही भाषा ग्रांथिक नसून बोली स्वरूपाची असल्यामूळे तर अजूनच गोंधळ उडाला. परिणामी या पुस्तकाला पुरस्कार देताना अडचणी निर्माण झाल्या. आपली भाषा कोणती या बाबत दुष्यंतकुमार यांनी लिहून ठेवलं होतं ‘उर्दू और हिंदी अपने-अपने सिंहासन से उतरकर जब आम आदमी के पास आती है तो उनमे फर्क कर पाना बडा मुश्किल होता है. मेरी नीयत और कोशिश यह रही है कि इन दोनों भाषाओं को ज्यादा से ज्यादा करीब ला सकूँ. इसलिए ये गजले उस भाषा मे कही गयी है, जिसे मै बोलता हूं.’ या गद्य ओळींचा आशय आपल्या एका शेर मध्ये दुष्यंतनेच लिहून ठेवला आहे

मै जिसे ओढता-बिछाता हूं
वो गजल आपको सुनाता हूं । 

उर्दू साहित्य देवनागरी लिपीत आले तर त्याला मोठा वाचक वर्ग मिळतो हे आता सिद्ध झाले आहे. महाकवि गालिब यांच्याबाबतीत मराठीतही एक मोठा प्रयोग अमरावतीच्या डॉ. अक्षयकुमार काळे यांनी केला आहे. गालिबच्या 235 गझला देवनागरी लिपीत लिहील्या. त्यातील शब्दांचे अर्थ दिले आणि शेवटी मतितार्थ दिला आहे. यामुळे मराठी वाचकांसाठी एक मोठं दालनच खुले झाले आहे. नसता उर्दू शब्द आणि त्यांचे उच्चार यात बरेच रसिक अडखळत असतात.

साहित्य अकादमीने एक अतिशय चांगला उपक्रम याबाबतीत सुरू केला आहे. पुरस्कारप्राप्त उर्दू साहित्याची पुस्तके देवनागरी लिपीत प्रसिद्ध केली जातात. यातून कविताच नाही तर इतरही गद्य साहित्य समोर येते आहे. सैय्यद मुहम्मद अशरफ हे उर्दू कथाकार. त्यांच्या ‘बादे सबा का इंतिजार’ या कथा संग्रह याच पद्धतीने देवनागरी लिपीत प्रसिद्ध करण्यात आला आहे. एका मोठ्या वाचक वर्गाला नविन उर्दू साहित्यात काय चालू आहे हे त्यामुळे समजू शकते. कुरूतूल-एैन हैदर यांची ‘आग का दरिया’ ही ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त कादंबरी किंवा सज्जाद जहिर यांची 1935 मध्ये लिहीलेली ‘लंडन की एक रात’ अशी बरीच गद्य पुस्तकेही देवनागरी लिपीत आता उपलब्ध आहेत.

‘पाकिस्तान की शायरी’ या नावाने एक चांगले संपादन प्रसिद्ध झाले आहे. (राजपाल प्रकाशन, नवी दिल्ली) फैज अहमद फैज, अहमद फराज, अहमद नदीम कासमी, इब्ने इंशा, अदा जाफरी, परवीन शाकिर, एहसान दानिश, मुनीर नियाजी यांसारख्या प्रसिद्ध उर्दू कविंच्या कविता देवनागरी लिपीत त्यातील कठीण शब्दांच्या अर्थासह वाचकांसाठी उपलब्ध आहेत.

विनय वाईकर यांनी गुलाम अली, मेहदी हसन, जगजित सिंग, बेगम अख्तर आदींनी गायलेल्या प्रसिद्ध गजला देवनागरी लिपीत त्यातील कठिण शब्दांच्या अर्थांसह लिहून ‘गजल दर्पण’ नावाचे पुस्तक सिद्ध केले आहे. तसेच उर्दू साहित्याच्या अभ्यासक डॉ. जरीना सानी यांच्या मदतीने उर्दू गजलांतील कठीण शब्दांचा शब्दकोश ‘आईना-ए-गजल’ या नावाने प्रसिद्ध केला आहे.  उर्दू मराठी शब्दकोशाचे मोठे कठीण काम साहित्य संस्कृती मंडळाने श्रीपाद जोशी व एन.एस.गोरेकर यांच्या संपादनाखाली करून ठेवले आहे. कमी प्रमाणात असेल पण प्रामाणिकपणे ही कामे झाली आहेत याची दखल घेतली पाहिजे. उर्दूचीच बहिण असलेली- हैदराबाद ते औरंगाबाद या पट्ट्यात बोलली जाणारी दखनी भाषा हीच्यावरही सेतू माधवराव पगडी, श्रीधरराव कुलकर्णी या अभ्यासकांनी मोठे काम करून ठेवले आहे.      

पत्रकार अंबरिश मिश्र यांनी लिहून ठेवलेला किस्सा मोठा विलक्षण आहे. एका प्रसिद्ध संगीतकाराची मुलाखत घेण्यासाठी ते वेळ ठरवून त्यांच्या घरी गेले. ते संगीतकार बाहेर फिरायला गेले होते आणि त्यांनी घरी निरोप ठेवला होता की मी लगेच येतो आहे तूम्ही बसून घ्या. अंबरिश मिश्र त्यांच्या दिवाणखान्यात त्यांची वाट पहात बसले असताना त्यांना समोर टी-पॉय वर दोन वह्या पडलेल्या दिसल्या. त्यांनी त्या सहज हातात घेतल्या आणि चाळायला सुरवात केली. सगळी अक्षरं उर्दूमधली. ती काही मिश्रांना वाचता येईनात. त्यांनी वह्या तश्याच ठेवून दिल्या. थोड्याच वेळात ते संगीतकार घरी परतले. मुलाखत चहापाणी सगळं व्यवस्थित झाल्यावर काहीसे दचकत अंबरिष मिश्रांनी त्यांना विचारले, ‘तूमच्या माघारी ह्या वह्या मी चाळल्या त्या बद्दल माफी मागतो पण यात काय लिहीले आहे? आणि हे उर्दूत कसे काय?’ ते संगीतकार म्हणाले, ‘अहो हे मी जय श्रीराम जय श्रीराम लिहीत असतो. आणि उर्दूत लिहायचे कारण म्हणजे मला दुसरी लिपीच येत नाही. तेंव्हा कशात लिहीणार?’ हे संगीतकार म्हणजे उडत्या चालीच्या पंजाबी गाण्यांनी हिंदी चित्रपट सृष्टी गाजवणारे ओ.पी.नय्यर.    
  
श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575

No comments:

Post a Comment