Tuesday, October 7, 2014

बगळ्यांची माळ फुले अजूनी अंबरात


                    दै. पुण्यनगरी, उरूस, मंगळवार 7 ऑक्टोबर 2014 

औरंगाबाद शहरातील प्रसंग आहे. कवी वा.रा.कांत यांच्या जन्मशताब्दीचा कार्यक्रम सादर करीत असताना ‘बगळ्यांची माळ फुले’ हे गाणे मरावाड्यातील सुरेल गायक संजय जोशी यांनी गायला सुरवात केली आणि रसिकांनी टाळ्यांचा कडकडाट केला. कांतांना जावून 23 वर्षे उलटून गेली.  6 ऑक्टोबर 1913 हा कांतांचा जन्मदिवस. आज कांत असते तर ते 101 वर्षांचे असते. कांतांच्या कविता त्यांच्या 9 कवितासंग्रहातून मराठी वाचकांच्या समोर आहेत. पण त्यांची आठवण रसिकांना सारखी येत राहते ती ‘त्या तरूतळी विसरले गीत’, ‘आज राणी पूर्वीची ती प्रीत तू मागू नको’, ‘सखी शेजारणी तू हसत रहा’, ‘राहिले ओठातल्या ओठात वेडे शब्द माझे राहिले’ आणि अर्थातच ‘बगळ्यांची माळ फुले’ सारख्या गीतांमुळे.

नांदेडात जन्मलेल्या कांतांनी निजामी राजवटीत शेतकी खात्यात साधा कारकून म्हणून आपल्या नौकरीची सुरवात केली. पुढे आकाशवाणीच्या मराठी विभागात हैदराबाद व नंतर औरंगाबाद येथे काम करण्याची संधी त्यांना मिळाली. आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून कांत निवृत्त झाले. ही झाली त्यांची साधी व्यवहारीक माहिती. पण साहित्याच्या क्षेत्रात कविता, अनुवाद, नाट्य-काव्य अशी किमान 18 पुस्तके त्यांच्या नावावर आहेत. शासनाचे पुरस्कार, साहित्य संस्कृती मंडळाची गौरव वृत्ती, साहित्य-कवी संमेलनाची अध्यक्षपदे असे कितीतरी सन्मान कांतांच्या वाट्याला आले. सतत लिहीत राहिलेल्या या कविने एका ठिकाणी मोठं विलक्षण लिहून ठेवलं आहे. 

गाते कोण मनात कळेना 
गाते कोण मनात ॥
जरी शतावधि कविता लिहिल्या
शंभरदा वाचिल्या गाइल्या
शब्द कुणाचा सूर कुणाचा 
अजूनी मला अज्ञात ॥
अभिमानाने कधी दाटता
रचिले मी हे गाणे - म्हणतां
गीतच रचिते नित्य तुला रे - 
फुटे शब्द हृदयांत ॥
मावळते शब्द, मौज प्रकाशन, पृ. 58)

कलेच्या प्रांतातील एक शाश्वत सत्यच कांतांनी लिहून ठेवलंय. आपण कला निर्माण करतो असे नाही तर कलाच आपल्याला कलाकार म्हणून घडवित असते. कलेविषयी एक जाणिव कायम त्यांच्या मनात ताजी असायची. मावळते शब्द या आपल्या शेवटच्या काव्यसंग्रहात त्यांनी सुरवातीला ऋग्वेदातील एक ऋचेचा (ऋग्वेद, 2-28-5) भावार्थ दिला आहे.
 
मी विणितो गाणे तंतु नको रे तोडू
सम येण्याआधी ताल नको रे सोडू

कुठल्याही कलाकाराची परमेश्वराचरणी हीच प्रार्थना असते की मी विणित असलेल्या गाण्याचे धागे तुटू देऊ नकोस. सम येण्याआधी म्हणजेच परिपूर्तता होण्याआधीच हा जो ताल जुळून आला आहे तो सोडायला लावू नकोस. 

कांतांचे आयुष्य तसे परिपूर्ण होते. 78 वर्षांचे आयुष्य त्यांना लाभले. (मृत्यू 8 सप्टेंबर 1991) त्यांचे कवितासंग्रह मौजेसारख्या मान्यवर प्रकाशन संस्थांनी प्रकाशित केले. वसंतराव देशपांडे, अरूण दाते, सुधीर फडके सारख्यांनी त्यांच्या गीतांना स्वर दिला. यशवंत देव, श्रीनिवास खळे यांच्यासारखे प्रतिभावंत संगीतकार त्यांना लाभले.

कुठलाही प्रतिभावंत निसर्गाच्या अद्भूत सौंदर्याने हरखून जातो. कांतही याला अपवाद नाहीत. पन्नास वर्षांपूर्वी लिहीलेली ही कविता आजही किती ताजी टवटवीत वाटते. 

सरी श्रावणाच्या येती
शेला पाण्याचा उडतो
पंखा उन्हाचा मधून
थोडा थोडा उमलतो

चिंब भिजून कर्दळ
लाल फुलांनी पेटते
ओल्या आगीत फुलांच्या
शीळ साळुंकी पेरते

मग कलत्या उन्हांत
होते आभाळाचे गाणे
जेथे संपून उरते
उभ्या जन्माचे या देणे  
(मावळते शब्द, मौज प्रकाशन, पृ. 33)

आभाळाचे गाणे झाल्याचा अनुभव आपलं काळीज कलाकाराचं असेल तरच येतो. बा.भ.बोरकर, पांडगांवर, महानोर यांच्यासारख्यांनी मराठीत खुप समृद्ध अशी निसर्ग अनुभवाची कविता लिहीली आहे. कांतांची ही कविता याच समृद्ध परंपरेतली आहे.

अनुवादाचे फार मोठे काम कांतांनी केले. त्याची फारशी दखल घेतली गेली नाही. यशपाल शर्मा यांची  ‘मनुष्याची रूपं’  ही हिंदी कादंबरी, मौलना अब्दूल हलीम शर्र यांची उर्दू कादंबरी ‘कालचे लखनौ’, रफिक झकेरिया यांची इंग्रजी कादंबरी ‘सुलतान रझिया’, राजेंद्रसिंह बेदी यांची कादंबरी ‘एक चादर मैलीसी’असे महत्त्वाचे अनुवाद कांतांनी मराठीत केले. मिर्जा गालिबवरच्या हैदर यांच्या इंग्रजी पुस्तकाचा मराठी अनुवादही त्यांनी मोठ्या रसाळतेने केला. गालिबच्या बर्‍याच कविता त्यांनी मराठीत आणल्या. नाट्यकाव्य हा एक अतिशय दुर्लक्षित काव्यप्रकार कांतांनी मोठ्या ताकदीने हाताळला. पंचेविसच्या जवळपास नाट्यकाव्य त्यांनी लिहीली. मराठीत इतकी नाट्यकाव्य कुणाच्याच नावावर नाहीत.

आज कांतांच्या माघारी आपल्या हातात आहे ती त्यांची कविता, गाणी, नाट्यकाव्य आणि त्यांचे अनुवाद. कुठल्याही कलाकाराला आपण आपल्या कलेच्या रूपाने रसिकांच्या स्मरणात राहू याचा विश्वास असतो. कांतांनीही आपल्या दोनुली या कवितासंग्रहात ‘अस्तित्व’ नावाने छोटेसे चिंतन या संदर्भात लिहून ठेवले आहे. ते मोठे समर्पक आहे. 

साठविता डोळा । सूर्यनारायण ।
उडावे हे प्राण । अचचित ॥
जळात उन्हात । पाखरांच्या माळा ।
बिंबाचा सोहळा । प्रतिबिंबी ॥
सहज गळावे । देहाचे या भान ।
पिकलेले पान । तळ्यामध्ये ॥
बिंबतात झाडे । तीरीची पाण्यात ।
तसे कवितेत । नांदो आम्ही ॥
(दोनुली, मौज प्रकाशन, पृ. 16)

त्यांच्या कवितेत कांत अजूनही नांदत आहेत. कांतांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने त्यांच्या समग्र कविता एकत्रित प्रकाशीत होण्याचा संकल्प करण्यात आला होता. हे पुस्तक लवकरच प्रकाशीत होते आहे. 6 ऑक्टोबर या कांतांच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांचे हे छोटेसे स्मरण. 
बगळ्यांची माळ फुले अजूनी अंबरात ।
अजूनही कांत तूम्ही आमच्या स्मरणात । 
 
     श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575

No comments:

Post a Comment