Tuesday, November 4, 2014

रस्त्यावर मराठी गाणी गाणारी कानडी माणसे

                         
                   (दासू वैद्य यांच्या घरी दिवाळीत गाताना शिवानंद विभूते आणि सहकारी)

                         दै. पुण्यनगरी, उरूस, मंगळवार 4 नोव्हेंबर 2014 

शहरातील सकाळची वेळ. कानावर खड्या आवाजात कानडी ढंगात ‘कानडा राजा पंढरीचा’ या गाण्याचे सूर ऐकू येतात. तरतरीत चेहर्‍याचे चमकदार डोळ्यांचे सावळ्या रंगाचे तीन तरूण गळ्यात पेटी, तबला अडकवून गाणी म्हणत आपल्या दारात उभी असतात. त्यांचे सच्चे सूर आणि कानडी वळणाचे कानाला गोड वाटणारे मर्‍हाटी उच्चार ऐकणार्‍याला मोहात पाडतात. औरंगाबाद शहरातील कित्येकांचा हा गेल्या पाच दहा वर्षांतील अनुभव आहे.
सध्या बेळगांवचे नामांतर बेळगांवी करण्यात आलेले आहे म्हणून वाद सुरू आहे. मराठी कानडी असा वाद बेळगांवच्या निमित्ताने गेली पन्नास वर्षे धुमसत आहे. अशा पार्श्वभूमीवर कर्नाटकाच्या गदग जिल्ह्यातील काही कानडी माणसे महाराष्ट्रात येवून राहतात. आपल्या आपल्या पोटपाण्याची चिंता वाहता वाहता सुरेल आवाजाने मराठी गाणी गाऊन मराठी माणसांचे कान तृप्त करतात हे मोठं विलक्षण आहे. 

शिवानंद विभूते आणि त्याच्या नात्यातील तिरूपती, श्रीनिवास आणि चंद्रू विभूते गेली दहा वर्षे औरंगाबाद शहरात दारोदारी जावून गाणी म्हणत आहेत. प्रसिद्ध कवी दासू वैद्य यांच्या घरासमोर ही माणसं गात होती ते त्यांनी ऐकलं आणि दिवाळीत यांचंच गाणं आपल्या घरी करायचं ठरवलं. मोठ्या सन्मानानं रस्त्यावर उभं राहून गाणार्‍यांना आमंत्रित केलं. जवळपास राहणारी शंभरएक माणसे बोलावली. दिवाळीची पहाट या साध्या कलाकारांच्या सुरांनी मंगलमय केली. 

ही माणसे मुळची कर्नाटकातील गदग जिल्ह्यातील देवीहाळ गावची. तिथल्या पुट्टूराज स्वामींच्या मठात यांचे पूर्वज गाणं शिकले. पंचाक्षरी बुवा म्हणून फार मोठे गवइ याच परिसरातले. त्यांच्यामुळे या परिसरात संगीत बहरलं. पोटपाण्याच्या शोधात ही माणसे सोलापूरला आली. विजापूररोडला यांची घरं आहेत. महादेव कोळी समाजाच्या या माणसांचे गळे मोठे विलक्षण आणि गोड आहेत. लोकगीताला शोभणारा उंच पट्टीचा आवाज आणि सहज फिरणारा गळा याचे वरदान यांना लाभले आहे.  सोलापुरहून यांचे गट वेगवेगळ्या शहरात जावून स्थायिक झाले. औरंगाबाद, नासिक, मुंबई, पुणे, आळंदी, पंढरपूर, लातूर, करकम, नागपूर अशी सर्वत्र यांची घरं पसरलेली आहेत. 

शिवानंद विभूतेचे वडिल दुर्गाप्पा हे पंचवीस तीस वर्षांपूर्वी औरंगाबादला आले. चिकलठाण्यात ढाकणे हायस्कूलच्या पाठीमागे थोडीशी जागा मिळवून विभूत्यांची पंधरा घरे उभी ठाकली आहेत. गाड्यांचे कुशन शिवून देण्याचा यांचा मुख्य व्यवसाय. चिकलठाण्याला कुशनचे त्यांचे एक दुकान आहे. औरंगाबाद जवळच्या गावांत जावून बाजाराच्या दिवशी हे दुकान लावतात.
पोटपाण्याची चिंता वाहता वाहता त्यातच आयुष्य संपवून टाकणारी कितीतरी माणसं आपल्या आजू बाजूला नेहमीच पहायला मिळातात. तूलनेने अधिक संपन्नता लाभूनही काहीच न करणारी माणसेही भरपूर आहेत. पण अतिशय साध्या परिस्थितीत राहणारी, जेमतेम कमाविणारी माणसे जेंव्हा कलेसाठी कष्ट घेवून पायपीट करून दारोदारी जावून उभी राहतात तेंव्हा आपल्याला नवल वाटते. 

शिवानंद आणि त्याचे सहकारी तसेच नात्यातील अजून बारा पंधरा माणसे तीन-चार जणांचे गट करून जन्माष्टमी ते दिवाळी या काळात औरंगाबाद शहरात घरोघरी जावून दारात उभं राहून भजनं ऐकवतात. एखादं पद ऐकून घरातलं माणूस बाहेर येतं. त्याला गाण्याची आवड असेल तर सन्मानानं आत बोलावतात. अजून गा म्हणून सांगतात. पण फारसा रस नसलेला माणूसही त्यांच्या सुरांच्या मोहात काहीतरी दक्षिणा त्यांच्या हातावर ठेवतो. या कलाकारांचे वैशिष्ट्य म्हणजे ते कधीही आपणहून कोणाच्या घरात जात नाहीत. ते बाहेरच आदबीनं उभं राहून गाणं म्हणतात. कोणी बोलावलं तरच ते आत जातात. यांचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे ते सेवा म्हणून गाणं म्हणतात. चुकूनही कधीही कोणालाही पैसे मागत नाहीत. जी काही दक्षिणा लोक देतील ती भक्तिभावाने स्विकारतात. कोणी कार्यक्रमाला बोलवायला आला तर जातात. आपण गाण्यातील खुप साधी माणसं आहोत. आपल्यापेक्षा फार मोठ मोठी माणसे या क्षेत्रात आहेत हे ते नम्रपणे सांगतात. 

या लोकांना मराठी लिहीता येत नाही. सगळी मराठी गाणी हे कानडीत लिहून घेतात आणि पाठ करतात. तूम्ही मुळचे कानडी मग कानडी भजन जास्त का म्हणत नाही? असं विचारल्यावर त्यांनी दिलेलं उत्तर मोठं मार्मिक आणि संगीतातील अभ्यासकांना विचार करायला लावणारं आहे. त्यांचं म्हणणं असं की मराठी भाषेतील जे शब्द आहेत ते भक्तिगीत भजन गाण्यासाठी जास्त सोयीचे वाटतात. या शब्दांवर हरकती घेता येतात, आलापी करता येते. पण कानडी शब्दांबाबत मात्र अवघड जाते. म्हणून आम्ही मराठीच गाणी गातो. मराठी माणसे ‘सौभाग्यदा लक्ष्मी बारम्मा’ सारख्या कानडी भजनांची फर्माइश आम्हाला करतात. आम्ही ते म्हणतोही पण आम्हाला जास्त कानडी भजनं येत नाहीत. 

यांचे मराठी उच्चार मोठे गंमतशीर आहेत. गाताना ज चा उच्चार ध सारखा होता. ब आणि भ ची उलटा पालट होते. ह चा उच्चार अ सारखा होता. दासू वैद्य यांच्या घरी गाणं संपल्यावर त्यांना एका रसिकाने तूमचे कार्ड आहे का? म्हणून विचारणा केली. ‘ते नाही की हो’ असं कानडी ढंगात त्यांनी सांगितलं. त्यांचे हे उच्चार कानाला मोठे गोड वाटतात. खरं तर सुगम गायनात शब्दांना मोठे महत्त्व आहे. पण या गायकांचा सच्चा सुर एैकला की बाकीच्या गोष्टी बाजूला पडतात. 

भीमसेन जोशी, जितेंद्र अभिषेकी, अजित कडकडे, वसंतराव देशपांडे यांची गाणी जास्त करून ही कलाकार मंडळी गातात. आपल्या वडिलांकडून गाणं शिकलेली ही पिढी आपल्या मुलांनाही सकाळी चारलाच उठून गाणं शिकवते. ज्या मुलाला आवड आहे तो शिकतो. आपल्या घराण्यात गाणं असावं यासाठी त्यांची धडपड आजही चालू आहे. गाण्यावर पोट भरतं का? गाण्यात करिअर करता येईल का? मराठी गाण्यांचे (आणि मराठीचेही) काय भवितव्य? असल्या प्रश्नांचा मागमुसही या सामान्य माणसांच्या चेहर्‍यावर दिसत नाही.  कानडी अस्मिता, मराठी अस्मिता असले विषयही त्यांना शिवत नाहीत. आपला प्रदेश सोडून इतकी दूर आलेली ही माणसे इथल्या मातीत सहज सामावून गेली आहेत. कानडीत शिकलेली आणि मराठी लिहू न शकणारी ही पिढी पण त्यांनी आपली मुलं मात्र आवर्जून मराठी शाळेत घातली आहेत. आपल्या पोरांना आता कानडीच फारसे येत नाही असे त्यांनी बोलताना सांगितले.

सरकारने कलाकारांना मदत केली पाहिजे, रहायला जागा दिली पाहिजे, वृद्ध कलाकारांना पेन्शन दिली पाहिजे अशा मागण्या आपण नेहमी करतो. पण दुसर्‍या प्रदेशात येवून सामान्य पद्धतीने आपले जीवन जगत झोपडपट्टीवजा भागात राहत ही कलाकार मंडळी संगीताची सेवा करताना कुठलीही अपेक्षा सरकारकडून किंवा समाजाकडून करत नाहीत हे विशेष. दर शिवरात्रीला हे आपल्या घरात रात्रभर अखंड संगीतसेवा करतात. त्यासाठी आजूबाजूच्या परिसरातून मोठ्या प्रमाणावर सामान्य माणसे यांच्याकडे येवून गर्दी करतात. सगळी सामान्य माणसे एकत्र येवून संगीतिक उत्सव साजरा करतात. त्याला कोणी मोठा प्रायोजक नसतो, श्रीमंत रसिकांसाठी व्हिआयपी पास नसतात, जवळच्याच चिकलठाणा विमानतळाहून कोणी कलाकार विमानानी येत नाही की पंचतारांकित हॉटेलमध्ये उतरत नाही. 

शिवानंद विभूते यांच्याशी बोलायला मी गेलो तेंव्हा वीज गेलेली होती. मातीच्या रस्त्यावर दोन खुर्च्या टाकून त्यांनी माझी बसायची सोय केली. त्यांचा साथीदार खाली रस्त्यावर बसूनच बोलत होता. शेजारच्या पत्र्याच्या टपरीतून स्टीलच्या पेल्यातून एक छोटा मुलगा चहा घेवून आला. परिस्थितीची कुठलीही तक्रार हे करत नाहीत.

सुरेश भटांनी सामाजिक संदर्भात लिहीले होते
साध्याच माणसांचा एल्गार येत आहे 
हा थोर गांडूळांचा भोंदू जमाव नाही 

शिवानंद विभूते सारख्या कलाकारांनी  आपल्या छोट्या कृतीतून कलेच्या प्रांतातही असेच आहे हे सिद्ध केले आहे. 

श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575

No comments:

Post a Comment