दै. पुण्यनगरी, उरूस, मंगळवार 14 ऑक्टोबर 2014
(राज कपूरच्या चित्रपटासाठी गीता चा आवाज कधीच वापरला गेला नाही. जिस देश मे गंगा बेह्ती हे या चित्रपटात मात्र गीता चा आवाज होता. त्या प्रसंगी लता गीता आणि राज कपूर असे दुर्मिळ छायाचित्र ....)
लता मंगेशकर यांचा उल्लेख नुसता लता करण्यात कुणाला लेखकाचा उद्धटपणा दिसू शकेल. पण ही सलगी लता मंगेशकर नावाच्या व्यक्तीसाठी नसून त्या स्वर्गीय सुरांसाठी आहे. जसे की तुकारामाबद्दल आपण बोलतो ते त्या शब्दांशी आपला जिव्हाळा असतो म्हणून. आईच्या नातेवाईकांना नाही का आपण हक्कानं अरे तूरे म्हणतो तसेच या सलगीचे- जिव्हाळ्याचे स्वरूप आहे.
नुकताच लताचा वाढदिवस होवून गेला. (जन्म 28 सप्टेंबर 1929). लताबद्दल प्रचंड प्रमाणात लिहीलं गेलं आहे. तिच्या आवाजाचे विश्लेषण बर्याचजणांनी केलं आहे. हे सगळं करत असताना काही एक दंतकथा खर्याखोट्या पसरल्या किंवा पसरवल्या गेल्या. यात एक मुद्दा नेहमी मांडला जातो तो म्हणजे लताने राजकारण करून सोबतच्या गायिकांना कसे पुढे येवू दिले नाही. खरं तर गाणं ही सादरीकरणाची कला आहे. लताच्या समकालीन सर्वच गायिकांचा आवाज आपल्याला ऐकायला उपलब्ध आहे. तेंव्हा दुसर्या कोणी काही सांगण्यापेक्षा आपण प्रत्यक्ष ऐकून काय ते ठरवू शकतो.
लताने आपल्या काळात जी गाणी गायिली त्यात या समकालीन गायिकांसोबत गायिलेली गाणीही आहेत. ती ऐकताना लता आणि समकालीन गायिका यांची आपण तूलना सहज करू शकतो. पण अशी तुलना करण्यापेक्षाही यातील काही सुंदर गाणी निवडून त्यांचा आनंद घेणे हे जास्त चांगले.
हिंदी चित्रपटात पार्श्वगायनाची पद्धत खर्या अर्थाने रूजविणारी पहिली मोठी गायिका म्हणजे शमशाद बेगम (जन्म १४ एप्रिल १९१९). त्या काळात नुरजहा, सुरैय्या यांसारख्या अभिनेत्री-गायिका होत्या नुसत्या गायिका नव्हत्या. पुरूषांचेही तसेच सैगल, श्याम सारखे गायक-नट होते. लताच्या आधीपासून शमशाद गात होती आणि पार्श्वगायनास प्रतिष्ठा मिळवून देण्यात तीचा मोठा वाटा होता. लता आणि शमशाद यांचे मिळून जवळपास तीस तरी गाणी आहेत.
1949 मध्ये शंकर जयकिशनने संगीताचा बाज बदलला. नवीन नायिकासाठी नवीन आवाजांची गरज होती. नर्गिस, वैजयंतीमाला, मधुबाला या नव्या नायिकांना शमशादचा आवाज शोभून दिसत नव्हता. तिथे लता-आशा-गीताचाच आवाज आवश्यक वाटायला लागला. पण शमशादच्या आवाजाला एक विशिष्ट पोत आहे. लोकसंगीतासाठी लागणारा खडा आक्रमक असा हा आवाज त्या शैलीतील गाण्यात फारच शोभून दिसतो. लता-शमशाद यांचे सर्वोत्तम गाणे मोगल-ए-आजम (1960) मधील ‘तेरी मेहफील मे किस्मत आजमाकर हम भी देखेंगे’ हे आहे. या लोकप्रिय कव्वालीत प्रेमाचे शारिरपातळीवर समर्थन करताना निगार सुलातासाठी शमशाद आणि प्रेमाचे मानसिक पातळीवर समर्थन करताना मधुबालासाठी लता असे आवाज वापरून शकिल बदायुनीच्या शब्दांचे चीज नौशाद यांनी केले आहे. खडा खणखणीत मोकळा आवाज आणि पातळ कोवळा स्वरांची बारीक कलाकुसर करणारा आवाज यांची एक जुगलबंदीच आपल्याला अनुभवायला मिळते. यात कोण मोठे कोण छोटे असं काही आपल्या मनात येतच नाही.
लताची समकालीन दुसरी गायिका गीता दत्त (जन्म 23 नोव्हेंबर 1930). गीता आणि लता यांनी जवळपास 19 गाणी सोबत गायली आहेत. या दोघींच्या गाण्यातील चार गाणी फारच सुंदर आहेत. पहिले गाणे लडकी चित्रपटातील (1953) मधील आहे. आर सुदर्शन व धानीराम या अपरिचित संगीतकार जोडीने हे गाणे दिले आहे. या चित्रपटातील जास्त गाणी सी. रामचंद्र यांच्या नावावर आहेत. पण त्यांनी मात्र गीताचा आवाज वापरला नाही. ‘मन मोर मचावे शोर घटा घनघोर छायी घिर घिरके’ असे राजेंद्र कृष्ण यांचे गीताचा गोडवा वाढविणारे बोल आहेत. तरूण कोवळ्या वयाची दोन वेण्या घालणारी डोक्याशी रिबीनीचे फुल बांधणारी वैजयंतीमाला हीच्यावर हे गाणे चित्रित झाले आहे.
लता-गीताचे दुसरे सुंदर गाणे ‘तुफान और दिया’ या चित्रपटातले आहे. वसंत देसाई यांनी लहान बहिण भावांवरती बेतलेले हे गाणे भरत व्यास यांनी लिहिले आहे. याचे शब्दच किती लयबद्ध आहेत-‘मेरी छोटीसी बहन, देखो गहने पहन, ससूराल चली रे बन ठन के’ वसंत देसाई यांनी एका ठिकाणी मुलाखतीत सांगितले की भरत व्यास यांचे शब्द स्वत:च एक चाल घेवून येतात. खरंच भरत व्यास यांच्यासारखा अनुप्रास कुणीच वापरला नाही.
मदन मोहनने संगीतबद्ध केलेल्या ‘देख कबीरा रोया’ (1957) मधील ‘हम पंछी मस्ताने’ हे मस्तीखोर गाणे लता-गीताच्या आवाजात आहे. शुभा खोटे आणि अमिता यांच्यावर चित्रित झालेले हे गाणे. साड्यांचे पदर कमरेला खोचलेले, शुभा खोटे माऊथ ऑर्गन वाजवित आहे, वेण्यांचे शेपटे उडत आहेत, बाजूला समुद्राच्या लाटा खळाळत आहेत आणि इकडे लता-गीताचे सुरही हिंदकळत आहेत. राजेंद्र कृष्ण यांच्या या गीतातील एक ओळ बघा, लता गाते आहे ‘धरती को छोड के पिछे बादल के पार जाना है’ आणि त्याला गीता उत्तर देते ‘चुन चुन के शोख तारोंको एक आशिया बनाना है’. रसिकांच्या मनात या दोघीं स्वरांचा सुंदर आशिया निर्माण करतात. लता-गीताचे सर्वात सुंदर गाणे वसंत देसाई यांच्या ‘गुंज उठी शहनाई’ मध्ये आहे. या गाण्याचे शब्द भरत व्यास यांचे आहेत. ‘आखिया भूल गयी है सोना, दिल पे हुआ है जादू टोना, शहनाईवाले तेरी शहनाई रे कलेजवा को चीर गयी चीर गयी ची ऽऽऽऽ र गयी..’ या शब्दांमध्ये जो खट्याळपणा आहे तो गीता दत्त च्या आवाजात जास्तच उठून दिसतो. गाण्याची सुरवातही गीताच्याच आवाजाने झाली आहे. लताचा आवाज हा गीताच्या खट्याळपणाला पोषक असा आहे. इतरवेळी गीताचा आवाज पोषक भूमिकेत वापरला आहे. इथे उलटे झाले आहे.
लता-आशा या तर आवाजाची जातकुळी तपासली तरी बहिणी आहेत हे सिद्धच होते. दोन स्त्रीयांच्या आवाज वापरायचे तर त्यातील एक आवाज पुरूषी तत्त्वासारखा वापरायची त्या काळात पद्धत होती. म्हणजे तो थोडा जाडसर, मोकळा, टिपेचा वगैरे असावा. त्याप्रमाणे शमशाद, मुबारक बेगम अगदी गीताचाही वापरला आहे. पण लता किंवा आशा यांचा आवाज असा कधीच कुठल्याच संगीतकाराने पुरूषी तत्त्वाने वापरला नाही. लता आणि गीता यांच्या आवाजातील मोहकता गोडवा खट्याळपणा चपळपणा असं सगळं घेवून तयार झालेलं एक अफलातून मिश्रण म्हणजे आशाचा आवाज. लता-आशा अशी जवळपास साठ गाणी हिंदी चित्रपटांत आहेत. त्यातील सर्वांत सुंदर गाणं म्हणजे उत्सव (1985) मधील ‘मन क्यु बहेका रे बहेका आधी रात को’ हे होय. लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी वसंत देव यांच्या शब्दांना जे काही रूप दिलं आहे त्याला तोडच नाही. रेखा आणि अनुराधा पटेल यांनी हे गाणं पडद्यावर साकार केलं आहे. एका कडव्यात रेखा संपूर्ण दागिन्यांसह असते तर सोबत अनुराधा साध्या वेशात आणि पुढच्या कडव्यात अनुराधा संपूर्ण साजशृंगारात तर रेखा साध्या कपड्यांत. तसाच लता आणि आशाचा सूर लागलेला आहे. या गाण्याचे ध्वनीमुद्रणही अप्रतिम झाले आहे. राजन साजन मिश्रा यांचे गाणे म्हणजे कसे तर एक जिथे सोडतो तिथून दुसरा उचलतो. दुसरा जिथपर्यंत आणून सोडता तिथून पहिला पुढचा प्रवास चालू करतो. लता-आशा यांच्या आवाजाचे असेच स्वरूप आहे. गरज आहे तिथे हे आवाज मिसळून जातात, गरज आहे तिथे आपले वेगवेगळे अस्तित्व स्पष्टपणे सिद्ध करतात.
मुबारक बेगम सोबत लताचे एकच गाणे आहे. बारादरी (1955) चित्रपटात शौकत देहलवी नाशाद या संगीतकाराने या दोघींचा आवाज वापरला आहे. पण हे गाणे फार काही विशेष नाही. सुमन कल्याणपुर आणि लता यांचेही एकच गाणे आहे. चांद चित्रपटात (1959) हेमंतकुमार यांच्या संगीताने नटलेले हे एक नृत्य गीत आहे. सारख्या वेशातील दोन नर्तिकांवर हे गाणे चित्रित केले आहे. लताच्या आवाजाची छायाच सुमन कल्याणपूर आहे हे जणू संगीतकाराला सुचवायचे आहे. हे गाणेही फारसे विशेष नाही. ममता (1966) मध्ये रोशन ने लता-सुमन-रफी असे एक सुंदर गाणे ‘रहे ना रहे हम’ गावून घेतले आहे. पण यातही लताच्या आवाजात हे गाणे स्वतंत्र आहे. तर सुमन-रफी असे द्वंदगीत आहे. कदाचित त्या काळी लता रफी सोबत गात नसल्यामुळे अशी तडजोड करण्यात आली असावी. प्रत्यक्षात लता व सुमन एकसाथ असे या गाण्याचे स्वरूप नाही.
लताच्या 85 व्या वाढदिवशी तिच्या जून्या गाण्यांचा धांडोळा घेणे फारच आनंददायी आहे. प्रत्यक्षात हिंदी चित्रपट संगीतातील राजकारण जे असायचे ते असो, रसिकांच्या कानात मात्र सुरांचे माप सर्वच कलाकारांनी भरभरून टाकलं आहे. 1949 ते 1965 हा काळ हिंदी चित्रपट संगीताचा सुवर्णकाळ. या काळातील सर्वात प्रभावी आवाज लताचा आणि सर्वात प्रभावी संगीत शंकर जयकिशनचे होते हे दर्जा आणि संख्या दोन्हीच्या पातळीवर खरे आहे.
श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575
तेरे मेहफिल मे, अखिया भूल गायी हे सोना, मन क्यू बेहाका या तीन गाण्याची link.....
http://www.hindigeetmala.net/song/teri_mahafil_men_kismat_aazamaa.htm
http://www.hindigeetmala.net/song/akhiyan_bhul_gayee_hain_sona.htm
http://www.hindigeetmala.net/song/man_kyon_bahakaa_re_bahakaa.htm
तेरे मेहफिल मे, अखिया भूल गायी हे सोना, मन क्यू बेहाका या तीन गाण्याची link.....
http://www.hindigeetmala.net/song/teri_mahafil_men_kismat_aazamaa.htm
http://www.hindigeetmala.net/song/akhiyan_bhul_gayee_hain_sona.htm
http://www.hindigeetmala.net/song/man_kyon_bahakaa_re_bahakaa.htm
No comments:
Post a Comment