दै. पुण्यनगरी, उरूस, मंगळवार 11 मार्च 2014
ज्येष्ठ मराठी साहित्यीक डॉ. चंद्रकान्त पाटील यांना मराठवाडा साहित्य परिषदेने आपला सर्वोच्च सन्मान ‘‘जीवनगौरव’’ देऊन गौरविले. प्रा.निशिकांत ठकार यांनी हा सन्मान करताना ‘‘सेतू चंद्रकान्त पाटील’’ असा त्यांचा उल्लेख केला. आपल्या एका शब्दातूनच ठकारांनी पाटीलसरांचे नेमके वैशिष्ट्य सांगितले.
सारा भारत सांस्कृतिकदृष्ट्या एक आहे असं आपण म्हणतो; पण आपल्या शेजारच्या राज्यात काय लिहिलं जातंय याची आपल्याला खबर नसते. मराठीमध्ये इंग्रजीतून मोठ्या प्रमाणात साहित्य अनुवादित झाले; पण त्याच्या दसपटही इतर भारतीय भाषांमधून आले नाही. जे आले त्यातही परत अडचण म्हणजे विविध भारतीय भाषांमधून आधी सर्व साहित्य इंग्रजीमध्ये येणार. मग इंग्रजीतून मराठीत किंवा इतर भारतीय भाषांमध्ये जाणार. ही एक मोठीच त्रुटी आहे. खरं तर दोन भारतीय भाषा चांगल्या जाणून त्यातील साहित्य दोन्ही दिशांनी अनुवादित होण्याची गरज आहे. अशा वेळी मराठी-हिंदी हा सेतू चंद्रकान्त पाटील यांनी बांधला. म्हणून त्यांच्या गौरवार्थ इतर बाबींवर बोलत असताना ठकार सरांनी या कामाचा आवर्जून उल्लेख केला.
स्वत: एक अव्वल दर्जाचे कवी असताना, समीक्षेची चिकित्सक दृष्टी असताना अनुवादासारख्या ‘हमाल्या’ सरांनी केल्या हे महत्त्वाचे आहे. अन्यथा हे आपले काम नाही म्हणत मोठमोठे साहित्यिक जबाबदारी झटकताना आढळतात. खरं तर ‘चंदू म्हणे उरलो फक्त अनुवादापुरता’ अशी त्यांची टिंगलही झाली; पण सरांनी हिंदीपुरतंच स्वत:ला मर्यादित न ठेवता जागतिक कविता इंग्रजीतून समजून घेत ‘कवितान्तरण’ नावाचा सव्वापाचशे पानाचा भलामोठा ग्रंथच सिद्ध केला. भारतासह जगभरातल्या 29 देशातील शंभर कवींच्या चारशे कविता मराठीत अनुवादित केल्या. या अनुवादाची दखल घेत साहित्य अकादमीने या ग्रंथाला पुरस्कार प्रदान केला. सरांची टिंगल करणार्यांची दातखिळीच बसली. अनुवाद करताना सरांनी नोंदविलेली निरीक्षणेही मोठी विलक्षण आहेत. ‘ज्या प्रदेशातील सामाजिक-सांस्कृतिक विकास तुलनेने कमी, तिथल्या समकालीन स्त्रीकवितेत विद्रोहाची तीव्रता अधिक असल्याचे जाणवते.’ किंवा ‘जगभरच पुरुषांची कविता भावनिकतेकडून बौद्धिकतेकडे प्रवास करताना दिसते. याउलट स्त्रीकवितेला अजूनही हा प्रवास पारखाच आहे.’ अशा नेमक्या आणि महत्त्वाच्या गोष्टी सरांनी नोंदवल्या आहेत. ‘अनुवाद म्हणजे सांस्कृतिकदृष्ट्या आवश्यक अशी तडजोड’ म्हणत सरांनी त्यांच्यावरील टीकेला सडेतोड उत्तर देऊन ठेवले आहे.
अनुवादाच्या बाबतीतही आपल्याकडे सहसा इतर भाषांमधून मराठी असाच ‘वन वे’ प्रवास आढळतो; पण सरांनी ‘सूरज के वंशधर’ या नावाने 21 दलित कवींच्या 50 कवितांचे हिंदी अनुवाद करून पुस्तक सिद्ध केले. भालचंद्र नेमाडे यांच्या ‘तुकाराम’ या इंग्रजी पुस्तकाचा तसेच गो.पु.देशपांडे यांच्या दोन नाटकांचा हिंदी अनुवाद केला. शिवाय कित्येक मराठी कवितांचे हिंदी अनुवाद केले. यामुळेही मराठी कविता हिंदी आणि मग त्या माध्यमातून इंग्रजीत पोहोचली.
समकालीन तसेच नंतरच्या पिढीच्या लेखकांसाठी अपार कष्ट सोसून त्यांच्या वाङ्मयाची योग्य दखल घेण्याचे महत्त्वाचे आणि वेगळे कामही सरांनी मोठ्या निष्ठेने पार पाडले. ना.धों.महानोर यांच्या कवितांचा नीट क्रम लावून, पुस्तकाची सगळी आखणी करून ते पॉप्युलरच्या भटकळांकडे पोहचविण्याचा तरुणपणीचा सरांचा उत्साह अगदी आजही ट़िकून आहे. म्हणूनच साहित्य अकादमीचा युवा पुरस्कार पटकाविणारा रवी कोरडे असो की शासनाचा पुरस्कार मिळवणारा अभय दाणी असो, यांच्या कवितांसाठीही तीच मेहनत सर आजही घेताना दिसतात.
लघु अनियतकालिकांची चळवळ मोठ्या निष्ठेने समकालीन मित्रांसोबत सरांनी चालविली. चळवळ चालवताना हळूहळू माणसं प्रस्थापित होत जातात. श्री.पु.भागवत यांनी मोठं बोलकं निरीक्षण नोंदवलं होतं, ‘‘सत्यकथेची होळी करणारे हळूच मागच्या दाराने आपली कविता आमच्याकडे पाठवायचे.’’ सर याला अपवाद राहिले. लघु अनियतकालिकांची चळवळ चालविताना अलगदपणे ‘भागवत संप्रदायात’ शिरण्याचा दुट्टपीपणा त्यांनी केला नाही . त्यांनी आपली पुस्तके पॉप्युलर नंतर इतर अगदी नवख्या प्रकाशकांनाही दिली.
मराठी-हिंदी नियतकालिके/अनियतकालिके ,वर्तमानपत्रांच्या वाङ्मयीन पुरवण्या यांची बाळंतपणं सरांनी मोठ्या उत्साहानं केली. प्रकाश घोडकेच्या कवितेत एक ओळ आहे, ‘येणा काळजाला गेल्या कशा पांगल्या सुईणी’. पाटील सरांच्या बाबतीत उलट घडलं आहे. या नियतकालिकांना विशेष अंकाच्या ‘येणा’ सुरू झाल्या, की सगळ्यांना सरांसारख्या सुईणीची आठवण येते. अशा वेळी हक्काची मोठी माणसे पांगतात; पण सर मात्र मदतीला धावून येतात असाच सगळ्यांचा अनुभव आहे.
सरांचे वाचन हे एक स्वतंत्र प्रकरण होईल. ‘विषयांतर’ या त्यांच्या पुस्तकात स्वत:च्या वाचनावर दीर्घ लेख आहे. ‘‘मानवी सभ्यतेच्या इतिहासात वाचन ही गोष्ट बरीच उशिरा आली आणि मानवाच्या बौद्धिक विकासातला तो टप्पा झाल्यामुळे वाचन ही सांस्कृतिक प्रक्रिया झाली. त्यामुळे वाचन हे बौद्धिक उन्नयनाशी जोडता आलंच पाहिजे, असं मला वाटतं.’’ अशा स्पष्ट शब्दांत सरांनी आपली भूमिका मांडली आहे.
निशिकांत ठकारांनी म्हटलं त्याप्रमाणे हिंदी-मराठी असा सेतू बांधण्याचे काम सरांनी केलं हे खरं आहे; पण त्याहीपेक्षा जास्त लेखक-वाचक-साहित्य संस्था-नियतकालिके या सगळ्यांना जोडणारे सेतू ते बांधत राहिले. एक सर्जनशील कवी म्हणून त्यांनी आपल्या कवितेत लिहून ठेवलंय
अंगभूत आकार टाकून
आखडून बसणारी अक्षरं नकोत
अनुभवाचं ओलेपण न चिकटताच
उमटलेले शब्द नकोत
आतलं आत बाहेरचं बाहेर
मधोमध पहारा देणारी भाषा नकोय
आजूबाजूचा उजेड ओरबाडून
काळवंडलेली कविता नकोय
असण्यात फसून नसणं नाकारणारं
अनाठायी जगणं नकोय
चांगलं साहित्य टिकावं यासाठी विविध मार्गांनी सरांनी धडपड केली, सेतू बांधले, ही फार मोठी गोष्ट आहे; पण हे सगळं होताना स्वत:ला प्रस्थापित करणं त्यांनी नाकारलं. त्यांच्या आवडत्या चंद्रकांत देवतालेंच्या भाषेत सांगायचं तर...
जो रास्ता भुलेगा
मै उसे भटकावों वाले रास्ते ले जाऊँगा
जो रास्ता नही भुलते
उनमें मेरी कोई दिलचस्पी नही
मराठी साहित्यातील प्रस्थापित रस्ते सरांनी नाकारले. त्यांच्या संपर्कात आलेल्यांनाही त्यांनी लेखन, वाचनाचे संस्थात्मक कामाचे ‘भटकाव वाले’ रस्ते दाखवून दिले. वनस्पती शास्त्राचे प्राध्यापक असलेल्या सरांनी वनस्पतींच्या पेशींसोबतच वाङ्मयीन पेशींचा सुक्ष्म अभ्यास केला. त्यांच्या अभ्यासाचा, प्रतिभेचा गौरव मराठवाडा साहित्य परिषदेने ‘‘जीवनगौरव’’ देऊन केला हे अतिशय योग्य झाले.
श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575