लोकसत्ता लोकरंग पुरवणी दि १६ जून २०१३
मिलींद बोकील यांच्या ‘गवत्या’ कादंबरीने दोन बाबी प्रामुख्याने अधोरेखीत केल्या. 1. मिलींद बोकील हे कादंबरीकार नसून त्यांचा पिंड कथाकाराचाच आहे. 2. एक लेखक म्हणून आता बोकीलांच्या मर्यादा स्पष्ट झाल्या असून त्या ते ओलांडतील ही शक्यता दिसत नाही.
‘उदकाचिये आर्ती’ आणि ‘झेन गार्डन’ या दोन कथासंग्रहांच्या पलिकडे त्यांचे कुठलेच पुस्तक आतापर्यंत गेलेले नाही. ‘शाळा’ सारख्या कादंबरीतून वेगळा विषय मांडायचा ते आव आणत असले तरी त्यांचा मूळ पिंड लपत नाही.
आणिबाणीच्यानंतर बर्याच राजकीय कार्यकर्त्यांनी स्वयंसेवी संस्था सुरू केल्या. या एनजीओ’ज ना राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर बर्यापैकी पैसा प्राप्त होवू लागला. 1978 ते 2008 म्हणजे 30 वर्षे हा खेळ बर्यापैकी चालला. अमेरिकेतील आर्थिक घोटाळ्यानंतर आणि युरोपातील आर्थिक आणिबाणीनंतर यावर मर्यादा आल्या. आणि आता या स्वयंसेवी संस्थांचा खेळ आटोपत आला आहे. मिलींद बोकीलांच्या जवळपास सगळ्याच पुस्तकांवर या स्वयंसेवी संस्थांची छाया आहे. कधी स्पष्ट तर कधी अस्पष्ट.
सर्वोदयी सेवक संघाचे सचिव घारपुरे यांच्या सोंडूर गावच्या केंद्रावर नौकरी साठी नायक येतो. शहरातल्या विविध छोट्यामोठ्या नौकर्या करून कंटाळलेला हा नायक पंडितराव या सीए असलेल्या दुरच्या नातेवाईकामुळे सोंडूर गावी नौकरी साठी येतो. तो ज्या संस्थेत काम करतो त्याचे नेमके स्वरूप काय हे शेवटपर्यंत लेखक स्पष्ट करत नाही आणि त्याला करावेही वाटत नाही. शशिकांत सावंत यांनी स्पष्ट केल्याप्रमाणे दीर्घ वर्णनं यात येत रहातात. कादंबरी म्हणून येणारी विविध पात्रं, प्रसंग, त्यातील भव्य नाट्य, ताण-तणाव असं काहीही घडत नाही. ही कादंबरी नसून एक कथाच आहे हे परत परत जाणवत रहातं.
सगळ्यात मोठा आक्षेप तर हा आहे की नायक हा सगळं नाकारणारा, भौतिक पातळीवरच्या सगळ्यांना नकार देणारा रंगवत असताना कादंबरीचा शेवट मात्र अशा नायकाला अमेरिकेतून बोलावणं येतं. कुणी धनाढ्य माणूस (हे नेमकं काय दुखणं डाव्या चळवळीतील कार्यकर्त्यांचं आहे कळत नाही. यांना समाजसेवा तर करायची पण ती शासनाच्या पैशानं किंवा कुणा धनाढ्य माणसाने दिलेल्या देणगीतून परत त्यानं कसल्याही अटी घातल्या नाही पाहिजेत. ज्याला तत्त्वश: विरोध करायचा त्याच्याच पैशावर यांच्या गमज्या.) मोठी देणगी देतो, त्या संस्थेत काम करायला नायकाला आमंत्रण असतं.
चेतन भगत याला तद्दन व्यवसायिक लेखक म्हणून समिक्षक हिणवतात मग आता प्रश्न असा पडतो की मिलींद बोकील सारखा लेखकही चेतन भगत सारखाच व्यूह आपल्या लिखाणात रचत असेल तर त्याला काम म्हणावे? चेतन भगतच्या कादंबरीवर आधारीत थ्री इडियट चित्रपटात अमिर खान सकृतदर्शनी व्यवस्थेत बसण्यास कसा अयोग्य आहे हे दाखवत दाखवत त्यालाच पहिला नंबर मिळतो असं दाखवलं जातं. आणि जो कायम धडपडत असतो त्याला दुसरा नंबर. शिवाय त्याच्यावर शेवटी अमिर खान पाशी येऊन लाचारी करण्याची वेळ कशी आली हेच रंगवलं जातं. इथे नायकाला अमेरिकेचं आमंत्रण आल्यावर घरचं वातावरण कसं बदलतं. सगळ्यांना याच्या बुद्धिमत्तेचा कसा साक्षात्कार होतो वगैरे वगैरे चित्र रंगवलं जातं. हा मोह बोकीलांना कसा आणि का पडला?
यापेक्षा ‘माचिवरचा बुधा’ मधील गो.नि.दांडेकरांनी रंगवलेला बुधा कितीतरी प्रामाणिक आणि खरा आहे. तो म्हातारपणी माचिवर रहायला येतो. कुठलीही समाजसेवा करायला येत नाही. तिथल्या निसर्गात रममाण होतो. आणि शेवटी तिथेच खांबाला टेकून प्राण सोडतो. त्याच्या देहाला मुंग्या लागतात असा अप्रतिम शेवट करून एक उंची दांडेकरांनी गाठली आहे. बोकीलांच्या नायकाची प्रेरणा काय? आणि जर अमेरिकेतच जाण्यात इतकी इतिकर्तव्यता आहे तर मग त्यासाठी धडपडणारे त्याच्या शहरातील इतर लोक दुय्यम कसे? त्या सगळ्यांच्यापोटी नायक कायम तूच्छता, उदासिनता का दाखवत रहातो?
एक गुरूजी नावाचे पात्र नायकाला गुरूस्थानी, आदरस्थानी वगैरे वगैरे रंगवलेले आहे. मुलगा, सुन शेतकरी असलेली ही एक व्यक्तीरेखा. खरं तर ज्या पद्धतीनं त्याच्याबद्दल आत्मियता बोकीलांनी रंगवली आहे ते पहात तेच खरे या कादंबरीचे नायक शोभतात. नायकाच्या दृष्टीकोनातून गुरूजी जो आला आहे त्यातूनच लेखकाची दृष्टी कळते. पण परत बोकीलांवर त्यांच्यातील युवा संघर्ष वाहिनीचा कार्यकर्ता आरूढ होतो. वसंतराव देशपांड्यांसारख्या गायकासारखं जमत चाललेलं आपलंच गाणं विस्कटून टाकण्याची बुद्धि लेखकाला होते. म्हणून बहुतांश लिखाणातून ज्या खेड्यांबद्दल त्यांना आत्मियता आहे केवळ तिथेच राहणारा, सर्व प्रेरणा त्याच वातावरणातून घेणारा आणि तिथेच इतिकर्तव्यता मानणारा नायक त्यांना रंगवता येत नाही इच्छा असूनही. इतकंच नाही तर दुसरीही एक अडचण बोकीलांची होते. त्यांना पूर्णपणे झोकून देणार्या निसंगपणे काम करणार्या कार्यकर्त्याबद्दल पूर्ण आत्मियता आहे (उदकायिचे आर्ती या कथेतील नायिका जी मेधा पाटकरांवरून रंगवली आहे, बाकी इतिहास कथेतील नायक) पण सोबतच तथाकथित ‘करिअर’चे आणि शहराचे आकर्षण त्यांचे संपतच नाही. जसं ग्रामीण कादंबर्यांमधून नायकाला कायम महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून नौकरी मिळण्याची आस असते. (‘बारोमास’ सारखी अकादमी पुरस्कर विजेती कादंबरी कुठल्याही पानावर ‘...आणि त्याला महाविद्यालयाचा शिक्का असलेला खाकी लिफाफा आला. ज्यात त्याच्या नौकरीच्या कायमस्वरूपी आदेशाचे पत्र होते.’ हे वाक्य टाकले की संपून जाते). या द्वंद्वात हा नायक मग नेहमीच छोटं गाव, खेडं सोडून तरी जातो की त्याचा रस हळू हळू संपून तरी जातो.
बोकीलांच्या लिखाणात कायम शहरातून खेड्यात काम करायला येणारा स्वयंसेवी संस्थातील कर्मचारी, कार्यकर्ता दाखवला जातो. किंवा या सगळ्या कामाबद्दल आस्था असणारा नायक रंगवला जातो. हा खेड्यात जातो. त्याला तिथल्या जनजिवनाबद्दल आस्था असते. मग तो खेड्यातील मुख्य व्यवसाय असलेल्या शेतीबद्दलच नेमका अनभिज्ञ कसा असतो? याला आदिवासींबद्दल आकर्षण आहे. तो त्यांच्या वस्त्यांवर जातो, सण समारंभात सामिल होतो. त्यांच्याबरोबर दारू पितो. सगळं काही. पण हेच शेतकर्यांबाबत का नाही करत? प्रत्यक्ष शेतीवर जाउन तिथली सगळी समस्या समजून घेण्याबाबत याला अनास्था का आहे? डाव्या चळवळीत असल्यामुळे एखादी मुस्लिम व्यक्तिरेखा ही हवीच. मग हा त्यांच्या घरात कसा जातो आणि त्या मित्राच्या आईच्या हातची बिर्याणी कशी खातो आणि ती कशी चविष्ट असते, त्या मित्राची चुलत बहिण कशी याला आवडते, तिच्याशी भेटायला हा दर्ग्यावर कसा जातो वगैरे वगैरे साचेबद्ध चित्रण बोकीलांसारखा लेखक करत जातो तेंव्हा कळत नाही हे कशासाठी आहे. किंवा उलट कळत जाते की हे सगळे डाव्यांची तथाकथित खोटी उदारमतवादी वृत्ती दाखविण्यसाठीच आहे.
जो काळ बोकील रंगवतात तो 1975 नंतरचा काळ आहे. म्हणजे साधारण: आणिबाणी आणि त्या नंतरचा काळ. नेमकं याच काळात शेतकरी आंदोलन सुरू झालेलं आहे. म्हणजे तिकडे शेतकरी आपल्याभावासाठी लढत आहेत, त्या प्रश्नाची शास्त्रशुद्ध मांडणी केली जात आहे. आणि याच काळात बोकील त्यांच्या कादंबरीतील आदिवासींना विहीरीवर मोटर बसवून पाणी कसं उपसता येईल आणि शेती कशी करता येईल या खटाटोपात दिसतात. आता जर शेती हे कलमच मुळात तोट्याचं असेल तर ते अडचणीत असलेल्या आदिवासीनी कसं काय फायद्याचं ठरू शकेल? आणि फक्त पोटापुरता विचार केला तर 1972 च्या दुष्काळानंतर आजतागायत कधीही संपूर्ण भारतात अन्नधान्याची टंचाई उरलेली नाही. शासनाची गोदामं भरून अन्न सडून गेल्याची उदाहरणं आहेत पण अन्नाचा दुष्काळ पडल्याचं एकही उदाहरण नाही. हे बोकीलांना समजून घ्यायचं आहे की नाही? बोकीलांचे सृजनात्मक लिखाण सोडा त्यांच्या इतर लिखाणातही शेतकरी मध्यवर्ती येत नाही. (‘कातकरी व्यवस्थापन आणि विस्थापन’, ‘मेंढा गावची गोष्ट’ वगैरे पुस्तकं)
स्वयंसेवी संस्थांतील डाव्या विचारांचा शहरी कार्यकर्ता हा बोकीलांच्या लिखाणाचा मध्यवर्ती नायक आहे. हे व्यक्तिमत्व मुळातच दुभंगलेलं आहे. नेहरूप्रणित समाजवादी व्यवस्थेचे सगळे फायदे शहरांनी आणि त्यात रहाणार्या मध्यवर्गीयांनी उचलले. त्यासाठी ग्रामीण भागाचे आणि शेतीचे प्रचंड शोषण केले. हे समजणारा एक वर्ग असा तयार झाला की त्याला अपराध गंड निर्माण झाला. त्यातून यांनी खेड्यात कामं करण्याचा ध्यास घेतला. खेड्यात जाताना तिथल्या समस्येची कॅन्सरची गाठ असलेला शेतीचा प्रश्न यांच्या गैरसोयीचा होता म्हणून मग यांनी नेमका तो सोडून बाकी सगळ्यावर आपली शक्ती खर्च करायला सुरवात केली. सुरवातीला यात असलेला प्रामाणिकपणा संपून परदेशातून मिळणार्या प्रचंड आर्थिक देणग्यांमुळे व्यवसायिकता आली. या सगळ्याला दिलेला साहित्यीक कलात्मक मुलामा म्हणजे बोकीलांचे लिखाण.
‘उदकाचिये आर्ती’ आणि ‘झेन गार्डन’ या दोन कथा संग्रहातून हा अनुभवाचा ऐवज वापरून नितांत सुंदर लिखाण करणारा हा लेखक स्वत:तच अडकत गेला. त्यांची नुकतीच प्रकाशित झालेली ‘महेश्वर’ नावाची दिर्घकथा वाचा. म्हणजे आपण ‘गवत्या’ ही कादंबरी वाचतो आहोत की ‘महेश्वर’ ही दीर्घकथा वाचतो आहोत हे कळणारच नाही इतका गोंधळ लेखकाने करून ठेवला आहे. लग्न संसार व्हायच्या आधीचा ‘गवत्या’चा नायक आणि सगळं संपून भोगून निवृत्त झालेला ‘महेश्वर’ चा नायक एकाच जागी आलेले आहेत. (‘शोधयात्रा’ या पुस्तकात अरूण साधूंनी हा व्यूह वापरलाही आहे.) ही या नायकांची मर्यादा नसून लेखकाचाच आवाका संपल्याची खुण आहे.
पुस्तक मौज प्रकाशनाने काढले हेही एक बरेच झाले. म्हणजे हे या प्रकाशनाचेही अपयश आहे हे सिद्ध होत आहे. नेमाडे यांच्या वयाला 75 वर्षे पूर्ण झाली शिवाय ‘कोसला’लाही 50 वर्षे झाली. अशी कादंबरी आपल्या प्रकाशनाकडून आली नाही याची खंत श्री.पुं.नी व्यक्त केली होती. नविन साहित्यीक प्रवाहांना समजून आणि सामावून घ्यायला तर ‘मौज’ प्रकाशन कमी पडलेच पण नविन हाती आलेल्या लेखकांना मुक्तपणे वाढू न देता त्यांना खुरटं करण्याचे काम मौजेने केले असेच म्हणावे लागेल. आपल्या भावविश्वाशी प्रमाणिक राहून लिखाण करणार्या प्रकाश नाराण संत, आशा बगे, सानिया अशा लेखकांचे दर्जेदार साहित्य समोर आणता आणता कुठं झोपडपट्टीत जा, कुठे खेड्यात जा, कुठं मुसलमानांच्या वस्त्यांत जा असं करायला लावून मोनिका गजेंद्रगडकर, मिलिंद बोकील सारख्या लेखकांना लेखक म्हणून संपवून टाकण्याचं काम मौजेनं केलं आहे.
विनय हर्डिकरांनी मौजेवर जे आरोप 30 वर्षांपूर्वी केले होते ते बोकीलांच्या ‘गवत्या’ने आजही खरे आहेत हे सिद्ध केलं आहे. जर बोकीलांच्या लिखाणात मौजेच्या संपादकांचा आणि हस्तलिखित वाचणार्या तथाकथित तज्ज्ञांचा हात नसेल तर मात्र हे अपयश पूर्णपणे बोकीलांचे आहे असं म्हणावं लागेल. असं म्हणलं तर परत पंचाईत की मग मौज आजकाल लेखकाच्या हस्तलिखितात फार ढवळाढवळ करत नाही म्हणावं लागेल. मग परत गोची ही की पुस्तक प्रकाशित करायला उशीर का होतो हे सांगता यायचे नाही. पुस्तकं प्रकाशित करायला होणारा उशीर ही लंगडी सबब मौजेला आजकाल सांगायला जागा तशीही उरली नाही. कारण अच्युत गोडबोले आणि मीना प्रभूंची पुस्तकं ज्या झपाट्याने मौजेने काढली आणि त्याच्याही दुप्पट झपाट्याने ते लेखक मौजेतून पसार झाले त्यावरून हे सिद्ध झालेच आहे.
इवलासा मजकूर चारशेपानांपर्यंत रंगवून ठूमरीला ख्यालासारखं रंगविण्याचा प्रयत्न मिलिंद बोकीलांनी केला आहे. आणि त्याच्या तोडीस तोड चंद्रमोहन कुलकर्णी यांनी पुस्तकाची सजावट सुंदर केली आहे. ते काय काहीच साहित्य मुल्य नसलेल्या संदीप खरेंच्या पुस्तकाची सजावटही नितांत सुंदर करू शकतात. फक्त अडचण इतकीच आहे की यापुढे मला आवडलेल्या पुस्तकाचेच मुखपृष्ठ मी करतो हे म्हणण्याचा हक्क त्यांनी गमावला आहे.
‘गवत्या’च्या निमित्ताने पन्नासहून अधिक वर्षांची परंपरा असलेल्या ‘मौज’सारख्या प्रकाशनाच्या वाङ्मयीन गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत हे नक्की.