उरूस, 15 जून 2021
उसंतवाणी- 79
(दिल्लीत आणि गल्लीत भेटीगाठींचे सत्र सुरू झाले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटले. देवेंद्र फडणवीस शरद पवारांना भेटले. प्रशांत किशोर शरद पवारांना भेटले. असं सर्व चालू आहे. )
गल्लीत दिल्लीत । सुरू गाठीभेटी ।
पडद्याच्या पाठी । हालचाली ॥
मोदी विरोधात । उठवतो ‘शोर’ ।
भेटतो किशोर । पवारांना ॥
देवेंद्र गाठतो । पवारांची गल्ली ।
उद्धवासी दिल्ली । आठवते ॥
राकेश टिकैत । ममताच्या दारी ।
आंदोलन दोरी । सोपविण्या ॥
भेटी नी बैठका । चाले धामधुम ।
फक्त सामसुम । कॉंग्रेसींची ॥
पहिली दुसरी । तिसरी आघाडी ।
धावतसे गाडी । राजकिय ॥
‘कांत’ म्हणे चालो । किती गाठीभेटी ।
सुटू दे रे गाठी । समस्यांच्या ॥
(14 जून 2021)
उसंतवाणी- 80
(कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी नेहमीप्रमाणे बोलून परत एकदा कॉंग्रेसला अडचणीत आणले आहे. कॉंग्रेस सत्तेत आली तर 370 कलम परत कश्मिरात लागू करू असे एका पाकिस्तानी पत्रकाराशी बोलताना ते म्हणाले. क्लब हाउस वर ऑन लाईन चर्चेतील त्यांचे हे वक्तव्य बाहेर आले आहे. )
जिभेला लावली । फटाक्याची लड ।
उडे तडतड । दिग्विजय ॥
कश्मिरात पुन्हा । तिनशे सत्तर ।
म्हणे हे उत्तर । समस्येचे ॥
कॉंग्रेसींचा मेंदू । आहे पाक व्याप्त ।
तेची यांचे आप्त । भावकीच ॥
मुस्लिमांपुढती । लांगुल चालन ।
फाडती चलन । सेक्युलर ॥
किती उडविला । हिरवा गुलाल ।
सत्तेवीना हाल । संपेचिना ॥
मुस्लिम म्हणजे । वोट बँक फक्त ।
ऐसे नासे रक्त । लोकशाही ॥
‘कांत’ म्हणे ऐसी । देशद्रोही थट्टा ।
द्यावा यांना रट्टा । कायद्याने ॥
(14 जून 2021)
उसंतवाणी- 81
(संजय राउत, नाना पटोले आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक सारखं काहीतरी बोलत असतात. राउत यांनी पाच वर्षे सेनेचाच मुख्यमंत्री राहणार असे विधान केले. नाना पटोले यांनी कार्यकर्त्यांना संबोधीत करताना तुमच्या मनातला मुख्यमंत्री मीच आहे अशी मल्लीनाथी केली. सुप्रिया सुळे यांना अडिच वर्षे मुख्यमंत्री पद मिळावं अशी एक चर्चा राष्ट्रवादीने शांतपणे सुरू केली आहे.)
नेहमीप्रमाणे । संजय उवाच ।
बोलतो उगाच । काहीबाही ॥
भाजपा सोबत । जाहली निलामी ।
सेनेने गुलामी । सोसली ही ॥
काकांच्या कृपेने । मुख्यमंत्री पद ।
चढे सत्ता मद । भलताच ॥
मुख्यमंत्री पद । पाच वर्षे हमी ।
त्याच्याहून कमी । काही नाही ॥
पटोले बोलले । वाजवा वाजंत्री ।
मीच मुख्यमंत्री । भविष्यात ॥
अर्ध्या काळासाठी । बसवा ताईला ।
आलीये घाईला । राष्ट्रवादी ॥
कांत म्हणे ऐसी । आघाडीची जत्रा ।
कारभारी सत्रा । सत्यानाश ॥
(15 जून 2021)
श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575
No comments:
Post a Comment