उरूस, 21 जून 2021
उसंतवाणी- 85
(कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी येत्या सर्व निवडणुका कॉंग्रेस स्वबळावर लढणार असल्याचे घोषित केले. त्यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना संजय राउत यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी यांनी एकत्रित यावे असे सुचवले.)
पटोले बोलले । दाखवू स्वबळ ।
झाली खळबळ । आघाडीत ॥
भिवयी उडवे । बोलले राऊत ।
स्वबळा ये ऊत । आज कसा? ॥
कॉंग्रेस भाजप । लढती वेगळे ।
सेनेचे मावळे । मोकळेची ॥
राष्ट्रवादी त्यांना । घेई कडेवरी ।
सत्ता कॅडबरी । मुखामध्ये ॥
रानातला वाघ । आला सर्कशीत ।
खुर्चीच्या खुशीत । हुरळला ॥
जोरात उमटे । बाटग्याची बांग ।
नाना म्हणे टांग । माझी वर ॥
कांत आघाडीत । जमा झाले बुळे ।
काय हे स्वबळे । लढणार ॥
(19 जून 2021)
उसंतवाणी- 86
(शिवसेनेच्या वर्धापन दिना निमित्त उद्धव ठाकरे यांनी ममता दिदींची त्यांच्या पक्षाची स्तुती केली. प्रादेशीक पक्षांचे महत्त्व प्रतिपादीत केले. नाना पटोले यांच्या स्वबळाच्या घोषणेवर त्यांना काही स्पष्ट भूमिका घेता येईना. मग त्यांनी शब्दांची कसरत करत स्वबळाची व्याख्या केली. )
उद्धवाने केली । स्वबळाची व्याख्या ।
जागमध्ये आख्ख्या । ऐसी नाही ॥
अन्यायाविरूद्ध । मनगटी बळ ।
म्हणजे स्वबळ । बोलले ते ॥
निवडणुकांना । म्हणती दुय्यम ।
हारता संयम । राखा म्हणे ॥
तोंडफाड स्तुती । ममता दिदीची ।
सत्तेच्या गादीची । प्रादेशीक ॥
तीन आकड्यांत । नाही आमदार ।
बुडबुडे फार । शब्दांचेच ॥
वर्धापन दिन । नाही डरकाळी ।
बें बें करी शेळी । शिवसेना ॥
बाळासाहेबांचा । गेला तो दरारा ।
कांत हे खरारा । करणारे ॥
(20 जून 2021)
उसंतवाणी- 87
(शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहून परत भाजपशी जूळवून घेण्याचा आग्रह धरला आहे. कॉंग्रेस राष्ट्रवादीवाले आपल्याच पक्षाला फोडत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. शिवाय येत्या मनपा निवडणुकीत पक्षाला अवघड जाईल असं प्रतिपादन केले आहे. )
सरनाईकांचा । सुटला रे धीर ।
चौकशीचा तीर । काळजात ॥
उद्धवासी सांगे । लिहूनिया चिठ्ठी ।
पुरे झाली कट्टी । भाजपाशी ॥
जावुनिया भेटा । नरेंद्र मोदीला ।
सत्तेच्या गादीला । साथीदार ॥
कॉंग्रेसी बेरके । सत्तेच्या तुपाशी ।
सेनेचा उपाशी । कार्यकर्ता ॥
मुख्यमंत्री पद । देवुनी आवळा ।
काढला कोहळा । सत्तेचा हा ॥
होईनात कामे । हलेना फाईल ।
केरात जाईल । मुसळ हे ॥
कांत म्हणे सुरू । वाटणीचा तंटा ।
बदलाची घंटा । वाजू लागे ॥
(21 जून 2021)
श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575
No comments:
Post a Comment