उरूस, 6 जून 2021
उसंतवाणी- 70
(लॉकडाउन उठणार की नाही यावर एक घोळ प्रत्यक्ष मुख्यमंत्री आणि दुसरे मंत्री विजय वडेट्टीवर यांच्या विरोधी वक्तव्यातून पुढे आला. तसेच शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड आणि मुख्यमंत्री यांचीही वक्तव्यं अशीच आली.)
एक म्हणे चालू । एक म्हणे बंद ।
गोंधळाचा छंद । आघाडीला ॥
सांगे मुख्यमंत्री । त्या उलट मंत्री ।
लावुनिया ‘संत्री’ । बोलती का? ॥
प्रशासनावर । पकड हो सैल ।
जू सोडूनी बैल । चाललेले ॥
ढकलली पोरे । न घेता परिक्षा ।
आघाडीची रिक्षा । तैसी चाले ॥
दोन मंत्री गेले । एक वाटेवर ।
काय खाटेवर । कुरकुरे ॥
‘सिल्व्हर’ भेटीचे । चमके पितळ ।
चाले खळबळ । मातोश्रीला ॥
‘कांत’ या सत्येचा । अनैतिक पाया ।
लागला ढळाया । तोल हिचा ॥
(4 जून 2021)
उसंतवाणी- 71
(विधानपरिषदेवर नेमायचे 12 आमदार अजून अडकूनच पडले आहेत. राज्यपालांशी विनाकारण घेतलेल्या पंग्याने महाविकास आघाडी सरकार स्वत:च अडचणीत सापडले आहे.)
राजकिय डाव । उलटला सारा ।
आमदार बारा । अडकले ॥
आढ्याला टांगले । शिंकोळ्यात लोणी ।
हातावर कोणी । देईचीना ॥
रोकले विमान । केला अपमान ।
दिली उगा मान । हातामध्ये ॥
अस्वस्थ खडसे । आणि राजू शेट्टी ।
दोघांचिही शिट्टी । वाजविली ॥
गप्प राज्यपाल । ऐसे कोशियारी ।
दावी होशियारी । नियमांची ॥
आशेला लागले । पुरोगामी सारे ।
लाचारी पाझरे । लेखणीतूनी ॥
कांत परिषद । करा बरखास्त ।
भ्रष्ट गड ध्वस्त । बांडगुळी ॥
(5 जून 2021)
उसंतवाणी- 72
(आशुतोष मिश्रा यांनी टाईम्स नाउच्या चर्चेत सेंट्रल विस्टा प्रकल्पाला ‘मोदी मकबरा’ अशी असभ्य भाषा वापरली. ज्या पद्धतीने कोरोना आपत्तीत देशाची बदनामी करण्याची मोहिम मोदि विरोधात हाती घेतली गेली आहे ती संपूर्णत: निषेधार्ह आहे. )
निर्लज्ज होवूनी । बोले चराचरा ।
‘मोदी मकबरा’ । लिब्रांडू हा ॥
चॅनल चर्चेचा । कुच्चर हा वट्टा ।
रोज ऐसी थट्टा । नॅशनल ॥
राजस्थानामध्ये । चाले बांधकाम ।
कराया आराम । आमदारा ॥
त्यावरती नाही । बोलती भाडोत्री ।
मालकाची कुत्री । भुंकणारी ॥
स्मारकास जागा । सरकारी पैसा ।
कॉंग्रेसचा ऐसा । डाव असे ॥
समाजवादाचे । रूप हे सर्कारी ।
लुटते तिजोरी । जनतेची ॥
कांत ढोंगावर । मोदी करी घाव ।
चाले काव काव । पुरोगामी ॥
(6 जून 2021)
श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575
No comments:
Post a Comment