Monday, June 28, 2021

उसंतवाणी - राजकीय उपहास- भाग ३१



उरूस, 28 जून  2021 

उसंतवाणी- 91

(कश्मिर प्रश्‍नावर एक मोठी बैठक पंतप्रधान मोदींनी दिल्लीत बोलावली. त्यासाठी जम्मु कश्मिरमधील महत्वाचे राजकीय पक्ष आणि विविध गटाचे नेते आवर्जून हजर होते. कश्मिरमध्ये विधानसभा निवडणुकांची चाचपणी करण्यासाठी हे बैठक होती.)

कश्मिरी बर्फाचे । वितळणे सुरू ।
संवादाचा धरू । सुपंथ हा ॥
आले बैठकीला । सर्व पक्ष गट ।
बुजू लागे फट । मोदींमुळे ॥
देशाच्या माथ्याची । खोल ही जखम ।
लावु या मलम । सौहार्दाचा ॥
धरतीचा स्वर्ग । बनविला नर्क ।
स्वार्थामध्ये गर्क । नेतागण ॥
तीनशे सत्तर । दूर अडथळा ।
गळ्यामध्ये गळा । भारताच्या ॥
गण झाला सुरू । मंगल हो नांदी ।
फुलू दे रे फांदी । लोकशाही ॥
कांत संवादाचे । विश्वासु पाउल ।
उजळ चाहूल । भविष्याची ॥
(25 जून 2021)

उसंतवाणी- 92

(रामविलास पासवान यांच्या माघारी त्यांच्या पक्षात आठच महिन्यात भांडणं सुरू झाली. पशुपतीनाथ पारस आणि चिराग पासवान या काका पुतण्यांत जुंपली. पक्षाच्या 6 पैकी 5 खासदार पारस यांच्या पाठिशी आहेत तर चिराग पासवान एकटे उरले आहेत.)

पासवान गेले । नाही वर्षश्राद्ध ।
सुरू झाले युद्ध । पक्षामध्ये ॥
काका पुतण्याची । सुरू वादावादी ।
वारश्याची गादी । कुणाची ही? ॥
काका मागे गेले । सहातील पाच ।
उरे एकटाच । चिराग हा ॥
पक्षाच्या वाटण्या । संपत्तीच जैसी ।
करू ऐसी तैसी । लोकशाही ॥
केंद्र मंत्रीपद । लागले डोहाळे ।
पक्षाचा आवळे । गळा दोघे ॥
बारकुले पक्ष । त्यांचे इगो मोठे ।
देशहित छोटे । त्यांच्यासाठी ॥
कांत म्हणे धब्बा । लोकशाहीवर ।
मिटो लवकर । विवेकाने ॥
(26 जून 2021)

उसंतवाणी- 93

(ऑक्सीजन प्रकरणांत सर्वौच्च न्यायालयाने अरविंद केजरीवाल सरकारचे कान उपटले. तज्ज्ञांच्या समितीने असा अहवाल दिला आहे की गरजेच्या चौपट ऑक्सीजनची मागणी दिल्ली सरकारकडून करण्यात आली. याचा परिणाम म्हणजे किमान 12 राज्यांतील ऑक्सीजन पुरवठ्यावर गंभीर परिणाम झालो. )

ऑक्सीजन नावे । वाजवे डमरू ।
भंपक केजरू । दिल्लीमध्ये ॥
सुप्रीम कोर्टाची । कान उघाडणी ।
चौपट मागणी । कशासाठी? ॥
तज्ज्ञांचा रिपोर्ट । फोडितसे बिंग ।
उतरवी झिंग । चढलेली ॥
जास्त ऑक्सिजन । ठेविला गाठीला ।
धरले वेठीला । बाकी राज्ये ॥
मॅनेज माध्यमे । केल्या जाहिराती ।
फुगवली छाती । पुरोगामी ॥
अतिरंजीत या । बातम्या कहर ।
पसरे जहर । पुरोगामी ॥
कांत म्हणे ढोंगी । ‘आप’मतलबी ।
सत्तेची जिलबी । फिरवतो ॥
(27 जून 2021)

श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575 





No comments:

Post a Comment