उरूस, 31 मे 2021
उसंतवाणी- 64
(26 जानेवारी 2021 ला लाल किल्ल्यावर जो दंगा झाला त्यातील 18 आरोपींवर दिल्लीतील तिस हजारी कोर्टात चार्जशीट पोलिसांनी दाखल केली आहे. या गुन्हेगारांचे समर्थन करणारे अकाली दल आणि किसान युनियन चे नेते कार्यकर्ते देशद्रोह्यांचा बचाव करता करता अडचणीत सापडले आहेत. )
ज्यांनी केले होते । लाल किल्ला दंगे ।
त्यांना केले नंगे । कायद्याने ॥
कोर्टात दाखल । झाली चार्जशीट ।
कटाची ती नीट । कुंडलीच ॥
तिरंग्याचा केला । ज्यांनी अपमान ।
आवळा ती मान । कायद्याने ॥
म्हणूनी किसान । त्यांना पुन्हा पुन्हा ।
झाकताती गुन्हा । देशद्रोही ॥
पोलिसांच्यावर । करोनिया हल्ला ।
कृषीहित कल्ला । खोटा खोटा ॥
ट्रॅक्टर आमुचा । आहे म्हणे टँक ।
मांडिला आतंक । दिल्लीमध्ये ॥
‘कांत’ मिळाला हा । भक्कम पुरावा ।
मातीत पुरावा । देशद्रोह ॥
(29 मे 2021)
उसंतवाणी- 65
(पंतप्रधान मोदींनी चक्रिवादळाच्या नुकसानी संदर्भात एक बैठक पश्चिम बंगालात बोलावली होती. खुद्द मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या त्याला 30 मिनीटे उशीरा आल्या आणि 15 मिनिटांत काही एक कागदपत्रे सादर करून निघूनही गेल्या. त्यांच्या सोबत राज्याचे मुख्य सचिव अलपन बंधोपाध्याय हे पण उशीरा आले. राज्यशिष्टाचाराचा भंग उघड उघड केल्या गेला. )
ममतांचा चाला । राजकिय दंगा ।
प्रोटोकॉल ठेंगा । दाविती हा ॥
पंतप्रधानांची । असू दे मिटिंग ।
माझी ही सेटींग । वेगळीच ॥
माझ्यासाठी माझे । राज्य हाची देश ।
पुसून प्रवेश । करा इथे ॥
बोलभांड ऐसे । नेमले प्रवक्ते ।
गाती माझी सुक्ते । भक्तिभावे ॥
मीच संपविले । कॉंग्रेस नी डावे ।
फुर्फुराचे दावे । शुन्य केले ॥
भाजपा रोकले । शंभराच्या आत ।
सुरू ऊतमात । ‘कांत’ म्हणे ॥
लोकशाहीमध्ये । माजती जे दैत्य ।
वैध बंदोबस्त । त्यांचा करू ॥
(30 मे 2021)
उसंतवाणी- 66
(महाराष्ट्रातील लॉकडाऊन उठविण्यासंदर्भात एक फेसबुक लाईव्ह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. त्यांच्या भाषणांत काहीच अर्थपूर्णता नव्हती. शिवाय निर्णय तर कुठलाच घेतला नाही. ‘माहित्या’, ‘आपत्या’ असे शब्द वापरून आपले भाषेबाबतचे गाढ अज्ञानच त्यांनी उघड केले. )
फेसबुकवरी । चालते लाईव्ह ।
दिशा ना ड्राईव्ह । नाही दिसे ॥
बोलताना वाटे । केवळ पुतळा ।
धन्य शब्दकळा । गोल गोल ॥
घरात बसून । हाकतो शकट ।
असू दे बिकट । परिस्थिती ॥
कोकणचा केला । वेगे वेगे दौरा ।
जागेवर भौरा । फिरे जैसा ॥
पंधरा दिसांनी । वाढले निर्बंध ।
गोत्यात सबंध । व्यवसाय ॥
का बरे लाईव्ह । केला अट्टाहास ।
काहीच ना खास । सांगितले ॥
कांत बोलताना । अडकते गाडी ।
जनतेची नाडी । गवसेना ॥
(31 मे 2021)
श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575