Wednesday, February 5, 2020

तळ्याकाठी निवारा शोधीत थकून आली शांतता !


काव्यतरंग, दै. दिव्य मराठी  २  फेबु २०२० .

अशा एखाद्या तळ्याच्या काठी बसून रहावे मला वाटते
जिथे शांतता स्वत:च निवारा शोधीत थकून आली असते
जळाआतला हिरवा गाळ निळ्याशी मिसळून असतो काही
गळून पडत असता पान मुळीच सळसळ करीत नाही
सावल्यांना भरवीत कापरे जलवलये उठवून देत
उगीच उसळी मारून मासळी मधूनच नसते वरती येत
पंख वाळवीत बदकांचा थवा वाळूत विसावा घेत असतो
दूर कोपर्‍यात एक बगळा ध्यानभंग होऊ देत नसतो
हृदयावरची विचारांची धूळ जिथे हळूहळू निवळत जाते
अशा एखाद्या तळ्याच्या काठी बसून रहावे मला वाटते
-अनिल
(दशपदी, मौज प्रकाशन)

खुप ताणाताणीचे व्यग्र असे (व्यग्र हा शब्द वापरायच्या ऐवजी आपण चुकीने सर्रास हिंदी अर्थाचा शब्द व्यस्त वापरतो. त्याचा मराठीतला अर्थ ‘सम’च्या विरूद्ध ते ‘व्यस्त’ असा आहे.) जीवन जगत असताना कधीतरी आपल्याला शांततेची तहान लागते. अशी जागा आपण शोधू पहातो तिथे कुठलेच आवाज नसतील. अशा जागी जो आवाज असतो त्याला शांततेचा आवाज म्हणतात. जंगलात एखाद्या तळ्याच्याकाठी अशी जागा आपल्याला सापडते.

कवी अनिलांनी याच भावनेला आपल्या कवितेत शब्दरूप दिले आहे. अनिलांच्या अकादमी पुरस्कार प्राप्त अतिशय प्रसिद्ध अशा ‘दशपदी’ कवितासंग्रहात ही कविता आहे. ‘दशपदी’तील सर्वच कविता या दहा ओळींच्या आहेत. त्यांची वैशिष्ट्ये समिक्षकांनी उलगडून दाखवली आहेत. नुकतेच अनिलांच्या समग्र कवितेचे पुस्तक श्याम धोंड यांनी मोठ्या कष्टाने संपादित करून प्रकाशीत केले आहे.

‘तळ्याकाठी’ या कवितेची लय अतिशय संथ उस्ताद अमीर खां यांचा विलंबीत ख्याल असावा अशी आहे. जवळ जवळ गद्य वाट्याव्या अशा ओळी यात आलेल्या आहेत. आपण ही कविता वाचत जातो तसं तसं आपल्या आत एक शांतता पसरत गेल्याचा विलक्षण अनुभव येत जातो. दुसर्‍याच ओळीत ‘शांतता स्वत:च निवारा शोधीत थकून आली असते’ असे शब्द येतात. म्हणजेच शांतते साठी जे काही इतर उपाय आपण करत असतो ते सगळे थकून गेले आहेत. त्यांना मर्यादा पडली आहे. आणि ही शांतता नेमकी मिळते कुठे तर वर्दळीपासून पूर्णत: दूर गेल्यावर जंगलातल्या एखाद्या अस्पर्श अशा तळ्याच्याकाठी. जिथे शेकडो वर्षांपासून प्राणी पक्षी वृक्ष यांचे सहजीवन अव्याहतपणे चालू आहे.  मानवी हस्तक्षेपापासून दूर असलेल्या जागी आपण जावून त्याच भावनेने शांत बसून राहिलो तरच आपल्याला ही शांतता अनुभवण्यास मिळणार आहे.

व्यंकटेश माडगुळकर यांचे ‘नागझिरा’ हे आख्खे पुस्तक म्हणजेच अनिलांच्या या कवितेचा गद्य विस्तार होय. ‘नागझिरा’ पुस्तकाच्या शेवटी माडगुळकरांनी असे लिहीले आहे की ‘..येताना सोबत जी मद्याची बाटली आणली होती ती बॅगेच्या तळाशी परत येताना तशीच पडून होती.’ त्यांना त्या नशेची कुठली गरजच पडली नाही इतकी नशा या निसर्गातील प्राणी पक्षी वृक्ष यांच्या सहवासात लाभली होती.

अनिलांच्या या कवितेतला सगळ्यात महत्त्वाचा भाग जो प्रत्यक्षपणे शब्दांत आलेला नाही तो म्हणजे या निसर्गाचा अनुभव घेण्यासाठी आपल्यालाही त्यात त्याच पद्धतीनं मिसळावं लागेल हा आहे. नसता निसर्गात जावून आपण जो धुडगुस घालतो, खाण्यापिण्याचा जो आचरटपणा करतो, आरडा ओरडा करून सगळं पाणी गढूळ करून टाकतो ते भयानक आहे. हे पूर्णत: टाळलं पाहिजे. पाणी गढूळ करून टाकतो हे केवळ पाण्याशी संबंधीत विधान नाही. आपण त्या निसर्गातील सगळं जगणंच गढूळ करून टाकतो. रणजीत देसाई यांची एक सुंदर कथा आहे. त्यात रात्रभर जंगलातील विविध आवाजांचे वर्णनं येत जातात. जंगलातील विलक्षण अनुभव देसाई रंगवत जातात. कथेच्या शेवटी असं वाक्य येतं, ‘... खट खट लाकडे तोडण्याचा आवाज येवू लागला. आणि जंगलात माणसांचा दिवस सुरू झाला.’या एकाच वाक्यात मानवी हिंसक वृत्तीची दखल रणजीत देसाईंनी नेमकी घेतली आहे.

व्यंकटेश माडगुळकरांनी नागझिरा तळ्याच्या काठी बसून रात्रभर चांदण्यात विविध आवाज कसे अनुभवायला आले याचे वर्णन केलं आहे. आणि शेवटी तेंदू पत्ता मजूर कसे येतात आणि आवाजाचा कलकलाट कसा सुरू होतो याचे वर्णन येतं. आत्तापर्यंत गढून न झालेलं पाणी पुरतं गढूळ होवून जातं.

निसर्गातील सर्व घटक या शांततेत समाजवून गेलेले असतात. कुणीच कुणाच्या शांततेचा भंग करत नाही. केवळ माणूस हा असा एकच प्राणी आहे की जो गोंगाट करून सगळं काही ढवळून टाकतो.

कवितेचा शेवट हृदयावरची विचारांची धूळ हळू हळू जिथे निवळत जाते असा केलेला आहे. विचार हे मानवी उत्क्रांतीचे एक महत्त्वाचे साधन आहे. बुद्धी आहे म्हणूनच तर माणूस इतर प्राण्यांपासून वेगळा आहे. पण याच विचारांची धूळ बनते आणि ती आपल्या हृदयावर साचून राहते तेंव्हाच आपण शांतता गमावून बसतो. ही धुळ झटकायची असेल तर आपल्यालाही प्राणी पक्षी झाडे यांच्यासारखाच निसर्गाचा एक अविभाज्य घटक बनून तळ्याच्या काठी बसून रहावे लागेल तेंव्हाच ती अनुभूती येईल.

धुळे जिल्ह्यात महाराष्ट्र गुजरात सीमेवर ‘बारीपाडा’ नावाचे सुंदर गाव आहे. या गावाने स्वत:चे जंगल राखले आहे. या जंगलातील तलावाकाठी बसून अनिलांच्या या कवितेचा अनुभव मला स्वत:ला घेता आला. उपस्थित सर्व मित्र मैत्रिणींना ही कविता मी म्हणून दाखवली आणि काही काळ शांत बसायला सांगितलं. सगळ्यांना एका विलक्षण अनुभूतीचा साक्षात्कार झाला. तूम्हीपण हा अनुभव जरूर घ्या.

श्रीकांत उमरीकर  जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद. मो. 9422878575

No comments:

Post a Comment