Wednesday, February 19, 2020

बेसूरांनो बंद व्हा !


उरूस, 19 फेब्रुवारी 2020

‘सूर नवा ध्यास नवा’ या कार्यक्रमात गायक महेश काळे यांनी ‘हे सूरांनो चंद्र व्हा’ हे नाट्यगीत पाश्चात्य संगीताच्या चौकटीत वेगळ्या पद्धतीनं सादर केलं आणि त्यावर मोठ्या प्रमाणात समाज माध्यमातून ट्रोलिंग सुरू झालं.

वास्तविक महेश काळे हे पं. जितेंद्र अभिषेकी यांच्याकडून तालिम घेतलेले घराणेबाज कलाकार आहेत. त्यांचा आवाज चांगला आहे आणि ‘कट्यार काळजात घुसली’ चित्रपटाच्या यशानंतर त्यांना भरपूर लोकप्रियता लाभली आहे. त्यामुळेच त्यांच्याकडून अपेक्षा वाढल्या. 

भारतीय संगीतात विविध प्रयोग कित्येक शतकांपासून चालू आहेतच. डबक्यात साचलेलं पाणी असावं तसं हे संगीत नाही. अगदी अलिकडच्या काळात पं. रवीशंकर यांच्यासारख्या दिग्गजांनी जागतिक पातळीवर आपलं संगीत नेवून त्यात विविध प्रयोग यहुदी मेहुनिन सारख्या जगदविख्यात व्हायोलीन वादकासोबत केले आहेत. रवीशंकर यांची मुलगी अनुष्का शंकर ही पण असे प्रयोग करत आहे.

तेंव्हा महेश काळे यांनी ‘हे सूरांनो चंद्र व्हा’ पाश्चात्य शैलीत सादर केलं यात तसा आक्षेप घेण्यासारखं काही नाही. या लेखाचे शिर्षक चिन्मय दातार (पुणे) याला सुचलं त्यातील ‘बेसूर’ हा शब्द फार महत्त्वाचा आहे. महेश काळे हे बेसूर गायले असा तो मोठा आक्षेप आहे. आणि त्यावर चर्चा झाली पाहिजे.

पु.ल. देशपांडे यांच्या ‘रावसाहेब’मध्ये एक फार उत्तम प्रसंग आहे. बालगंधर्वांच्या चाली एक हौशी गायक संगीतकार बदलून गातो. त्यावर रावसाहेब उखडतात. त्या गायकाचा ‘मग आम्ही बदलू नयेत का?’ अशा प्रश्‍न आल्यावर रावसाहेबांचे उत्तर फार महत्त्वाचं पुलंनी नोंदवलं आहे. ‘बदल की रे. ते दिनानाथ मंगेशकर बदललं आमची हिंमत झाली का त्याला विचारायची. त्याची ताकदच ती.’

संगीतात प्रयोग करायचे असतील तर ते ताकदीने झाले पाहिजे. ते रूजवता आले पाहिजेत. हिंदी चित्रपट संगीतात कितीतरी पाश्‍चिमात्य वाद्यं वाद्यमेळ संकल्पना यांचा सुंदर उपयोग करत प्रतिभावंत संगीतकारांनी (सी. रामचंद्र, शंकर जयकिशन, ओ.पी.नय्यर, एस.डी. आणि आर.डी. बर्मन, सलील चौधरी आदी..) हिंदी चित्रपट संगीताचा प्रदेश समृद्ध केला. शास्त्रीय संगीतातही व्हायोलीन, मेंडोलीन सारखी वाद्ये आपल्याकडे पूर्णत: रूजल्या गेली. विश्व मोहन भट (सुरवातील ब्रिजभुषण काबरा यांनी) यांनी गिटारला ‘मोहन वीणा’ असे नाव देवून तिला भारतीय शास्त्रीय संगीतात समर्थपणे रूजवली.

महेश काळे यांनी हा प्रयोग करताना सूर सोडला हा आक्षेप गंभीर आहे. त्यांना साथ देणारे पार्श्वगायक तर काय गात होते कोण जाणे. त्यामुळे ‘बेसूरांनो बंद व्हा’ अशी प्रतिक्रिया उमटली. सोबतच ‘गिटार काळजात घुसली’ असंही ट्रोल केल्या जात आहे. ( श्रेय यशवंत पाटील परभणी)

मुळातच नाट्यगीतांवर विनय हर्डीकर सारख्या संगीत समीक्षकांनी गंभीर आरोप केले आहेत. नाट्यगीतांमुळे न नाटकाचा भलं झालं न संगीताचे. असे ते प्रतिपादन करतात. अलीकडच्या काळात पं. जितेंद्र अभिषेकी बुवांचा अपवाद वगळला तर नाट्यसंगीतात कुठलीच उल्लेखनीय कामगिरी कुणा संगीतकाराला दाखविता आली नाही. नाटकाच्या दृष्टीनेही उल्लेखनीय अशी भर संगीत नाटकांनी अलीकडच्या काळात घातलेली नाही.

संगीत नाटक तर जवळ जवळ बंदच पडले आहे. जून्या नाटकांच्या नाट्यगीतांच्या नॉस्टेलजियाला वापरून कट्यार सारखी कलाकृती चित्रपटांतून परत समोर आणली जाते. जून्याच संगीताला नव्याने साज चढविला जातो. आणि नविन ऐकणार्‍यांची एक पिढी काही प्रमाणात तिकडे खेचली जाते. पण यामुळे परत संगीत नाटकांची चलती सुरू होते असे काही दिसत नाहीये.

दहा वर्षांपूर्वी प्रथमेश लघाटे सारखा ‘लिटल चॅम्प’ मधला गायक ‘मी आता नाट्यसंगीतातच करिअर करणार आहे’ असं आश्वासक बोलतो आणि सगळ्यांना वाटतं की नाट्यसंगीताला बरे दिवस आले आहेत. पण तसं काही होताना दिसत नाही. नाट्यगीतं गायली जातात ती शास्त्रीय संगीताच्या मैफिलीत उत्तरार्धात मैफल संपवताना. किंवा सुगम संगीताच्या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून एक दोन जूनी नाट्यगीतं गायली जातात तेवढंच.

मराठी नाटक स्वतंत्रपणे वाटचाल करत आहे आणि भारतीय शास्त्रीय संगीतपण स्वतंत्रपणे पुढे जात आहे. मराठी चित्रपटही आपल्या आपल्या गतीनं पुढे जात आहेत. जून्या नाटकांतलं गाणं चित्रपटात घेवून त्याचा वापर परत रिऍलिटी शो मध्ये करून प्रेक्षकांना खेचून घ्यावं लागतं ही एक प्रकारची मजबूरीच आहे. नविन तेवढ्या ताकदीचं आम्ही काही देवू शकत नाही हा पराभव मान्य करण्यासारखंच आहे.

महेश काळे यांच्यावरच्या ट्रोलिंग मधून विचार करण्यासारखा एक मुद्दा पुढे येतो आहे. जे काही प्रयोग करायचे असतील ते जरूर करा पण मुळचा सुरेलपणा सोडू नका. भारतीय संगीताची समृद्धी प्रचंड मोठी आहे. तिने कित्येक बदल गेल्या सात आठशे वर्षांत पचवले आहेत (सात आठशे म्हणण्याचे कारण शारंगदेवाचा संगीत रत्नाकर हा ग्रंथ आणि अमीर खुस्रो याचा कालखंड हा ज्ञात इतिहास). तेंव्हा ‘हे सूरांनो चंद्र व्हा’ पाश्चात्य पद्धतीनं म्हटल्यानं काही आभाळ कोसळत नाही. पण ते सूरात गायले पाहिजे या बद्दल मात्र दुमत होण्याचे काही कारण नाही. गिटारही सुरातच वाजली पाहिजे. पार्श्वगायन (कोरस) करणार्‍यांचाही सूर चांगला लागला पाहिजे याला कुठलाच पर्याय नाही. संगीतात शॉर्टकट नाही.

   श्रीकांत उमरीकर 9422878575


ˆˆ   

No comments:

Post a Comment