Thursday, January 30, 2020

त्या चंद्राचे या चंद्राचे मुळीच नाही काही नाते !


२६ जानेवारी २०२० काव्यतरंग, दै. दिव्य मराठी.
त्या चंद्राचे या चंद्राचे
मुळीच काही नाही नाते.
त्या चंद्रावर-
अंतरिक्षयानात बसोनी
माकड मानव कुत्रा यांना जाता येते
या चंद्राला वाटच नाही
एक नेमके ठिकाण नाही
हाहि नभाचा मानकरी पण-
लक्ष मनांच्या इंद्रगुहांतुनि
भटकत राही.

नटखट मोठा ढोंगीसोंगी
लिंबोणीच्या झाडामागे
केव्हा लपतो मुलाप्रमाणे
पीन स्तानांच्या दरेत केव्हा
चुरून जातो फुलाप्रमाणे
भग्न मंदिरावरी केधवा
बृहस्पतीसम करतो चिंतन
कधी बावळा तळ्यात बुडतो
थरथर कापत बघतो आतुन,
तटघुमटावर केव्हा चढतो
कधी विदूषक पाणवठ्यावर
घसरूनि पडतो
कुठे घराच्या कौलारांतुनि
उतरुनि खाली शेजेवरती
तिथे कुणाची कमलपापणी
हळूच उघडून नयनी शिरतो
कधी कुणाच्या मुक्त मनस्वी प्रतिभेसाठी
द्वारपाल होऊन जगाच्या
रहस्यतेचे दार उघडतो
अशा बिलंदर अनंतफंदी
या चंद्राचे त्या चंद्राशी कुठले नाते?

त्या चंद्रावर विज्ञानाची शिडी लावुनी
शास्त्रज्ञांना चढता येते
रसिक मनांना या चंद्राला
पळभर केंव्हा
जळात वा डोळ्यांतच केवळ धरता येते.
-कुसुमाग्रज
(हिमरेषा, कॉंटिनेंटल प्रकाशन)
(कवितेवरील चित्र जॉन मस्टोन, सौजन्य आंतरजाल)

कुसुमाग्रजांच्या कितीतरी प्रसिद्ध अशा कविता आहेत. पण ही कविता तशी फारशी पोचलेली नाही. ‘हिमरेषा’ या दुर्लक्षीत राहिलेल्या कवितासंग्रहातील ही कविता. मानवाने चंद्रावर पहिले पाऊल ठेवले त्या प्रसंगावरून कुसुमाग्रजांना ही कविता सुचली असावी. कारण हीचा कालखंड तोच आहे. (हिमरेषा 1 ली आवृत्ती 1964)
कला आणि जीवन यांतील एक अतिशय सुरेख असा संबंध कुसुमाग्रजांनी परत कलेच्याच नाजूक भाषेत समजावून सांगितला आहे. 1960 नंतर औद्योगिकीकरणाने जगभरात वेग पकडला. 1990 नंतरच्या जागतिकीकरणांतून बाजारपेठेचे तत्त्वज्ञान जोरकसपणे पुढे आले. त्याचा मोठ्या प्रमाणात स्वीकार जगभरात केला जावू लागला. 2000 नंतर संगणक आणि पुढे मोबाईलने अवघे विश्व व्यापले.

या सगळ्यांतून आपण परत त्याच मानवाने चंद्रावर पहिले पाऊल ठेवले या बिंदूपाशी येवून थांबतो. दगड माती खड्डे यांनी भरलेला चंद्र पाहताना कलाकारांनी लेखकांनी पाहिलेला चंद्र कुठे आहे? हा  प्रश्‍न जसा कुसुमाग्रजांना तेंव्हा पडला होता तसाच प्रश्‍न आज नवनविन शोध लागत असताना, तंत्रज्ञानाचा विस्फोट होत असताना मानवी मनाला पडतो आहे. माणसाच्या मुळच्या भावभावनांचे काय? हास्य, करूणा, शृंगार, वीर आदी नवरस सगळे अजूनही मनावर कब्जा करून बसलेले आहेतच ना. मानवी जीवन यंत्रांनी व्यापून टाकले तरी माणूस यंत्र नाही ना बनू शकत. आणि तो तसा बनत नाही यातच त्याचे माणूसपण आहे. हेच कोडे व्यवहारी दृष्टीच्या लोकांन उलगडत नाही. हे कोडे रसिक दृष्टीकोनातूनच समजून घेता येवू शकते.

कुसुमाग्रजांच्या कवितेत उलगडून दाखवावे असे काहीच नाही. तशी खुप सहज सोपी ही कविता आहे. तितकीच ती मुलभूत मानवी भावभावनांची दखल घेणारी सखोल कविता आहे. आपण एखाद्या पौणिमेच्या चांदण्या रात्री गच्चीवर किंवा उघड्या माळावर किंवा कोरड्या नदीच्या पात्रात पडून एकटक आकाशाकडे पाहिलं तर एका वेगळ्याच सौंदर्याची अनुभूती येते आणि या कवितेचा आशय उमगून येतो.  सभोवतीचे भौतिक जग त्या चांदण्यात असे काही अद्भूत वाटू लागते की जणू काही हे सगळं परिकथेतीलच आहे. अशी काय ताकद चांदण्यात असते की ती आपल्या मनाचा कब्जा घेते? हीच कलेची ताकद आहे. आणि कला समजून घ्यायची असेल तर तसेच कलासक्त मनही असावे लागते. रसिकतेची रसिकतेने करून दिलेली व्याख्या असेच या कवितेचे वर्णन करावे लागेल.  


श्रीकांत उमरीकर  जनशक्ती वाचक चळवळ,244-समर्थ नगर, औरंगाबाद 431-001. मो. 9422878575

1 comment:

  1. कुसुमाग्रजांच्या कवितेत उलगडून दाखवावे असे काहीच नाही. तशी खुप सहज सोपी ही कविता आहे. तितकीच ती मुलभूत मानवी भावभावनांची दखल घेणारी सखोल कविता आहे. आपण एखाद्या पौणिमेच्या चांदण्या रात्री गच्चीवर किंवा उघड्या माळावर किंवा कोरड्या नदीच्या पात्रात पडून एकटक आकाशाकडे पाहिलं तर एका वेगळ्याच सौंदर्याची अनुभूती येते आणि या कवितेचा आशय उमगून येतो. सभोवतीचे भौतिक जग त्या चांदण्यात असे काही अद्भूत वाटू लागते की जणू काही हे सगळं परिकथेतीलच आहे. अशी काय ताकद चांदण्यात असते की ती आपल्या मनाचा कब्जा घेते? हीच कलेची ताकद आहे. आणि कला समजून घ्यायची असेल तर तसेच कलासक्त मनही असावे लागते. रसिकतेची रसिकतेने करून दिलेली व्याख्या असेच या कवितेचे वर्णन करावे लागेल.
    पुन्हा पुन्हा वाचावा असा हा परिच्छेद... !

    ReplyDelete