Thursday, October 31, 2019

मनसे-वंचित : ‘पाड’काम जास्त, ‘बांध’काम किंचित !!


उरूस  31 ऑक्टो 2019 

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांत ‘एक हात लाकुड आणि दहा हात धिलपी’ या प्रमाणे मनसे आणि वंचित या दोन पक्षांचे नेते प्रवक्ते भरमसाठ दावे करत होते. प्रत्यक्षात यांची ताकद अतिशय नगण्य होती. पण यांनी केलेले दावे आणि त्याला मिळालेली प्रसिद्धी यांनी माध्यमांमध्ये एक ठराविक जागा व्यापलेली होती. मनसेने आम्हाला विरोधी पक्ष म्हणून निवडा असे आवाहन करून जागा लढवल्या केवळ 104. पैकी एकच आमदार निवडून आला आणि संपूर्ण महाराष्ट्रात एकूण मिळून 2.25 टक्के इतकीच मते मिळाली.

मनसे सारखेच मोठे दावे वंचित बहुजन आघाडीने केले होते. वंचितची तर भाषा कॉंग्रेसलाच आम्ही 40 जागा देतो अशी उद्धट राजकीय होती. या वंचितला 24 लाख मते म्हणजेच 4 टक्क्यांच्या जवळपास मतदान झाले. म्हणजेच लोकसभेला मिळालेल्या 41 लाख मतांच्या अर्धीच मते या वेळेस वंचितला मिळाली. एकूण 235 जागा वंचितने या विधानसभेत लढवल्या होत्या.

या दोन्ही पक्षांची चर्चा करत असताना मनसेने सेना भाजपच्या 10 जागा पाडल्या आणि वंचितने कॉंग्रेस राष्ट्रवादीच्या 25 जागा पाडल्या असे आकडेवारीने सिद्ध केले जाते. हे आकडे खरे आहेत पण ते फसवे आहेत. वंचितची सगळी मतं ही कॉंग्रेस राष्ट्रवादीची आहेत तसेच मनसेची सगळी मते ही भाजप सेनेची आहेत असे एक गृहीतक मान्य करून ही मांडणी केली जाते.

वस्तुत: या आकड्यांच्या भ्रमातून बाहेर येवून या पक्षांचा आता विचार करणे भाग आहे. किती दिवस वारंवार कुणाला तरी पाडणारे पक्ष म्हणून यांचे मुल्यमापन केले जाणार आहे? मुळात प्रश्‍न असा निर्माण होतो की एखादा पक्ष ‘वोट कटुआ’ म्हणून सतत ओळखला जाणार असेल तर त्याला काही तरी भवितव्य असणार का?
गेली 13 वर्षे मनसे हा एक पक्ष म्हणून मतदारांसमोर आहे. प्रकाश आंबेडकरही वंचित या नावाने नसतील पण गेली 35 वर्षे महाराष्ट्राच्या राजकारणात आहेत. इतकी वर्षे झाल्यानंतरही यांचे मुल्यमापन यांनी कुणाच्या जागा पाडल्या असेच होणार असेल तर ते त्यांच्यासाठी अतिशय नामुष्कीचे आहे.

या निवडणुकीत कुठल्याही नोंदणीकृत पक्षा शिवाय जवळपास 20 टक्के इतकी प्रचंड मते बंडखोर किंवा सक्षम असे अपक्ष यांना गेली आहेत. यांची संख्याही 15 इतकी आहे. आता मनसे किंवा वंचितला हा सवाल विचारला गेला पाहिजे की प्रस्थापित पक्षां विरोधात तुमची आघाडी होती. त्यांना पर्याय म्हणून तूम्ही मतदारांना सामोरे गेला होता. मग या प्रस्थापित पक्षांना किंवा अगदी इतर छोट्या पक्षांना नाही म्हणणारा हा मतदार तूमच्या कडे का नाही आला?

नोटा किंवा अपक्ष यांच्याकडे वळलेला हा मतदार हे प्रस्थापित मोठ्या पक्षांपेक्षा जास्त वंचित आणि मनसेचे अपयश आहे. सांगली आणि लातूर ग्रामीण या दोन मतदारसंघात ‘नोटा’ ला दुसर्‍या क्रमांकाची मते मिळाली. हे मनसे आणि वंचितचे अपयश मानावे लागेल. कारण मनसेने मतदारांना सक्षम विरोधी पक्ष म्हणून निवडून द्या असा दावा केला होता. वंचित सतत असं सांगत आली होती की आपण प्रस्थापितांच्या विरोधात वंचितांना सोबत घेवून लढतो आहोत. मग त्यांना ही मते का नाही मिळाली?

मनसे आणि वंचित यांना अजून एक प्रश्‍न विचारला पाहिजे. हितेंद्र ठाकुर यांची बहुजन विकास आघाडी, अबू आझमी यांचा समाजवादी पक्ष, बच्चु कडू यांचा प्रहार जनशक्ती पक्ष, विनय कोरे यांचा जनसुराज्य पक्ष, रवी राणा यांचा स्वाभिमानी पक्ष, शेतकरी कामगार पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष यांना सोबत घेण्यात वंचित-मनसेला का अपयश आले? कॉंग्रेस राष्ट्रवादी सोबत फरफटत गेलेला राजू शेट्टी यांचा पक्ष यांच्या आघाडीत का नाही येवू शकला?

आज महाराष्ट्रात अशी परिस्थिती आहे की प्रस्थापित पक्षांशिवाय 29 आमदार इतर छोट्या पक्षांचे म्हणून किंवा अपक्ष म्हणून निवडून आले आहेत. यातच वंचितने साथ सोडून दिलेल्या एमआयएम चे दोन आमदारही आहेत.
29 इतक्या मोठ्या संख्येने प्रस्थापित 4 राजकीय पक्षांशिवाय आमदार निवडून येतात शिवाय 25 टक्के इतकी प्रचंड मतेही या सर्व इतर उमेदवारांना प्राप्त होतात मग ज्या पर्यायी राजकारणाचा दावा मनसे किंवा वंचित करत होते त्यांच्याकडे ही मते का नाही गेली? या मतदारांना त्यांचा पर्याय विश्वासार्ह का नाही वाटला?

मनसे आणि वंचितचे अपयश अजून एका दृष्टीने बघायला पाहिजे. ज्या ठिकाणी त्यांचे उमेदवार उभे नव्हते त्या ठिकाणी त्यांनी इतर सक्षम अपक्ष किंवा छोट्या पक्षांच्या उमेदवाराला पाठिंबा का दिला नाही? वंचितने 235 जागी आपले उमेदवार उभे केले होते. साहजिकच उर्वरीत 53 जागी त्यांना इतर कुठल्याही सक्षम अपक्ष उमेदवाराला पाठिंबा देता आला असता. मनसेने केवळ 104 उमेदवार उभे केले होते. त्यांनाही उर्वरीत 184 जागी इतर उमेदवारांना पाठिंबा देता आला असता. केवळ आदित्य ठाकरेंना वरळीत पाठिंबा देवून राज ठाकरेेंनी काय मिळवले? वैयक्तिक नात्याला महत्त्व आणि पक्षाला महत्त्व नाही का?

या दोन्ही पक्षांनी आपली विश्वासार्हता गमावली आहे. परत जेंव्हा हे मतदारांना सामोरे जातील तेंव्हा त्यांना अशाच किंवा या पेक्षाही मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागेल. सत्ताधार्‍यांना पर्याय शोधणारे राजकारण हे मनसे किंवा वंचितकडून होईल याचा विश्वास मतदारांना नाही. आजही भाजप सेनेला पर्याय म्हणून मतदार कॉंग्रेस राष्ट्रवादीकडेच पाहतो हे या निवडणुकीने स्पष्ट झाले आहे. हे पक्ष बदलले तर यांना भवितव्य आहे. नसता नाही. 

  

Monday, October 21, 2019

EVM विरोधक- सिर्फ हंगामा खडा करना हमारा मकसद था!


21 ऑक्टोबर 2019   

लोकसभा निवडणुक  निकालानंतर इव्हिएम विरोधात राज ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांनी मोठा गदारोळ महाराष्ट्रात घातला होता. त्याही पुढे जावून निवडणुकांवर बहिष्कार घालण्याचीही घोषणा करण्यात आली होती. सर्व विरोधी पक्षांना हाताशी धरून राज ठाकरेंनी एक पत्रकार परिषद घेत आंदोलनाची घोषणा केली. त्यात प्रकाश आंबेडकर सहभागी झाले नाहीत. तेंव्हाच शंका यायला सुरवात झाली होती. राज ठाकरेंच्या ममता बॅनर्जी, सोनिया गांधी यांच्याशी झालेल्या भेटी चर्चेत राहिल्या. महाराष्ट्रात राजू शेट्टींशी झालेली भेट, राष्ट्रवादीशी चाललेली चुंबाचुंबी हे सगळं होत राहिलं. तिकडे प्रकाश आंबेडकर कॉंग्रेसशी आघाडी करायची की नाही यावर उलट सुलट बोलत राहिले. भाजपची बी टीम म्हणून आमच्यावर आरोप केले तेंव्हा पहिले याचा खुलासा करा असा आग्रह पत्रकारांपाशीच करत राहिले. तेवढ्या मुद्द्यावरून मुलाखत सोडून  निघूनही गेले. 

इव्हिएम विरोध करणारे कॉंग्रेस राष्ट्रवादीवाले हळू हळू बाजूला झाले. त्यांनी आपसात आघाडी करून घेतली. ज्या काही छोट्या पक्षांना सोबत घ्यायचे ते घेतले. राष्ट्रवादीने अतिशय गांभिर्याने आख्खी प्रचार यंत्रणा राबवली. भले त्यांना मते किती मिळतील किंवा किती जागा निवडून येतील हा भाग वेगळा. कॉंग्रेसवाले सुस्त बसून राहिले. त्यांना सत्ताधार्‍यांच्या विरोधात जिथे जास्त नाराजी आहे तिथे आपोआप आपला फायदा होईल ही आशा असावी.
शिल्लक राहिले प्रकाश आंबेडकर आणि राज ठाकरे. आंबेडकरांनी तर याही पुढे जावून मतदार यादीतील 41 लाख मतदारच कसे बोगस आहेत हे सांगायला सुरवात केली. त्यासाठी निवडणुकाच पुढे ढकला अशीही मागणी लावून धरली.

ठरल्याप्रमाणे निवडणुकांच्या तारखा जाहिर झाल्या. कॉंग्रेसवाले वंचितला आणि राष्ट्रवादीवाले मनसेला हूंगून विचारत नाहीत हे लक्षात आल्यावर दोघांनाही स्वतंत्रपणे निवडणूका लढविण्याशिवाय कसला पर्यायच शिल्लक राहिला नाही.

आत्तापर्यंत मोठा आव आणणारे हे दोन्ही पक्ष स्वबळावर निवडणुक लढवताना उघडे पडले. मनसेला केवळ 104 जागी उमेदवार उभे करता आले. त्यांच्या प्रचारासाठी राज ठाकरे यांनी केवळ 14 सभा घेतल्या. त्यांच्या सारख्या आळशी राजकारण्याकडून यापेक्षा जास्त अपेक्षा ठेवणेही बरोबर नाही.

प्रकाश आंबेडकरांनी 235 उमेदवार उभे केले पण सभा केवळ 50 च घेतल्या. एम.आय.एम. सोबत युती तुटताना जेंव्हा जागांचे आकडे फुगवून सांगितले जात होते, आमच्याकडे शेकड्यांनी अर्ज आलेत हे सांगितले जात होते. पण प्रत्यक्षात 288 उमेदवार त्यांना उभे करता आलेले नाहीत. 21 अपक्षांनी वंचितचे उमेदवार नसलेल्या मतदारसंघात त्यांचेच निवडणुक चिन्ह ‘गॅस सिलिंडर’ घेवून त्यांची फिरकीच घेतली.

राज ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांना इव्हिएम आणि बोगस मतदार या प्रश्‍नावर करण्यासारखी एक अतिशय साधी गोष्ट होती.

288 मतदार संघांतील त्यांचे सशक्त उमेदवार असलेल्या मतदार संघातील काही मतदान केंद्र निवडायचे. त्या ठिकाणी तसाही उमेदवाराचा प्रतिनिधी म्हणून यांच्या कार्यकर्त्याला बसण्याची परवानगी असतेच. त्याने मतदान झालेल्या प्रत्येक व्यक्तीला तुमचे मतदान व्हिव्हिपॅटवर तपासले का इतकेच विचारायचे. एका मतदान केंद्रावर सरासरी 1000 मतदान असते. 60 टक्के मतदान म्हणजे 600 लोकांनी मतदान केले. दिवसभरात 600 लोकांना विचारून खात्री करून घ्यायची. जर कुठे काही तफावत आढळली, कुणाची काही तक्रार आली की लगेच त्याची दखल घेत निवडणुक अधिकार्‍यांकडे नोंद करायची.

प्रकाश आंबेडकर यांच्या कार्यकर्त्यालाही बोगस मतदार ओळखून बाहेर काढण्याची संधी होती. जी बोगस मतदारांची यादी यांच्याकडे आहे ती त्यांनी आलेल्या मतदाराशी तपासून पहायची. बोगस नाव असलेला मतदार मतदानाला आला की लगेच त्याला पोलिसांच्या ताब्यात द्यायचे. ज्या दोन मतदार यादीत त्याचे नाव आहे असे मतदान केंद्र शोधून तिथे आपले दोन कार्यकर्ते बसवून तपास घ्यायचा. यातून आपल्या आरोपात किती तथ्य आहे किंवा नाही हे त्यांनाच कळले असते. काही आढळलं तर त्यावर यांना गदारोळ करता आला असता.

पण प्रकाश आंबेडकर आणि राज ठाकरे यांनी हे काहीही केले नाही. संपूर्ण मतदान जवळपास शांततेत पार पडले. कमी झालेला मतदानाचा आकडा वगळता चिंता करावे असे काहीच घडले नाही. काही ठिकाणच्या यंत्रांमध्ये झालेली बिघाड आणि इतर अडचणी वगळता फारसे काही आक्षेपार्ह घडले नाही. जिथे अडचणी आल्या त्यावर निवडणुक अधिकार्‍यांनी मात मिळवली. आणि संपूर्ण निवडणुक प्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडली.
दुष्यंतकुमारचा एक सुंदर शेर आहे

‘सिर्फ हंगामा खडा करना मेरा मकसद नही
मेरी कोशीश है की ये सुरत बदलनी चाहिये

पण प्रकाश आंबेडकर आणि राज ठाकरे यांच्या बाबतीत याच्या उलट म्हणावे लागेल

सिर्फ हंगामा खडा करनाही मेरा मकसद है
कुछ ना करके सिर्फ बाते करना मेरा काम है

यांना निवडणुकीनं जबाबदार विरोधी पक्ष म्हणून सिद्ध करण्याची संधी लोकशाहीने दिली होती. पण यांनी ती गमावली. कुठल्याच मतदान चाचण्या, मतदानोत्तर चाचण्यात यांच्या बाजूने आकडे देत नाहीत. संपूर्ण महाराष्ट्रभर मतदान होताना यांची यंत्रणा काम करते आहे असे दिसले नाही. प्रचारात तर यांच्या जोर नव्हताच. यांच्यापेक्षा विरोधक म्हणून कॉंग्रेस राष्ट्रवादीलाच मतदारांनी पसंद केलेले वरकरणी दिसून येते आहे. निकालानंतर यावर शिक्कामार्तब होईल.

या निवडणुकीत इव्हिएम विरोधकांनी संधी गमावल्याचे स्पष्टपणे समोर आले आहे. 
 
श्रीकांत उमरीकर  जनशक्ती वाचक चळवळे,244-समर्थ नगर, औरंगाबाद 431-001. मो. 9422878575 ˆˆ   

Friday, October 18, 2019

विरोध‘राज’ठाकरे महाराज इंदुरीकर!


18 ऑक्टोबर 2019 
राज ठाकरे यांची औरंगाबाद जिल्ह्यात वैजापूरला प्रचाराची सभा होती. सभा कशी झाली? असा प्रश्‍न ग्रामीण भागातील एका तरूणाला विचारले. त्याने दिलेले उत्तर अतिशय मार्मिक आणि नेमके होते. भले भले पत्रकार जे लिहायला काचकुच करत आहेत किंवा मुद्दामहून लिहीत नाहीत ते या तरूणाने छानपैकी व्यक्त केले. तो म्हणाला, ‘राज ठाकरे म्हणजे राजकारणातले इंदुरीकर महाराज आहेत !’

राज ठाकरे भाषणांसाठी प्रसिद्ध आहेत. त्यांची भाषणं एकेकाळी टिव्ही चॅनलचा टिआरपी मिळवायची. त्यांच्या सभा नेमक्या 7 वाज. सुरू व्हायच्या. बहुतांश वाहिन्या या सभा लाईव्ह दाखविण्यात धन्यता मानायच्या. 2014 ला त्यांचा राजकीय फियास्को झाला आणि वाहिन्यांनी हात आखडता घेतला. राज ठाकरेंनी 2019 च्या लोकसभेला ‘लाव रे तो व्हिडीओ’ म्हणत उमेदवारांशिवाय प्रचार करण्याचा नवा टिआरपी खेचणारा फंडा शोधून काढला. या भाषण शोचे जेमतेम 9 एपिसोडच झाले. (मधल्या काळात शरद पवारांच्या मुलाखतीचाही एक शो राज ठाकरेंनी केला).

सर्व सभा संध्याकाळीच झाल्या होत्या. खाली मातीत लोक बसले आहेत, तळपत्या उन्हात नेत्याची वाट पहात आहेत, जीपा ट्रॅक्टर भरभरून लोक सभास्थळी आलेले आहेत असं कुठेच घडलं नाही. शांतपणे सगळ्या सभा रात्री पार पडल्या. लोकांना बसायला खुर्च्या मांडलेल्या होत्या. मुंबई पुण्यात मोठ्या सांस्कृतिक कार्यक्रमांना जशी गर्दी होते तशीच ही गर्दी होती. पण माध्यमांची या सभा मोदी विरोधात म्हणून गाजवायला सुरवात केली.

यांचा काडीचाही परिणाम मतदानावर झाला नाही. युतीची एकही जागा महाराष्ट्रात कमी झाली नाही. उलट टक्केवारी मतांमध्ये वाढच झाली. स्पष्टपणे 51 टक्के मते घेत 41 खासदार भाजप सेनेचे निवडून आले.

आता विधानसभेत नाही नाही म्हणत इव्हिएमवर टीका करत राज ठाकरेंनी 104 उमेदवार उभे केले. त्यांच्या प्रचारार्थ आता त्यांना सभा घेणे भागच होते. पण एव्हाना ‘लाव रे तो व्हिडीओ’ चा जोर ओसरून गेला होता. दिवसाला जेमतेम दोन किंवा तीन सभा सध्या राज ठाकरे घेत आहेत. कुठलीही वाहिनी आता या सभा लाईव्ह दाखवायला तयार नाही. त्यांच्या दृष्टीने राज ठाकरेंचा टिआरपी घसरला असावा.

राज ठाकरेंच्या सभा केवळ मनोरंजन म्हणून उरल्या आहेत. त्यांना कुणीच राजकीय दृष्ट्या गांभिर्याने घेत नाही. निवृत्ती महाराज इंदोरीकर यांच्या किर्तनांचा लोक मनोरंजन म्हणून किंवा स्टँड अप कॉमेडी म्हणून आनंद घेतात. पण कुणीही वारकरी सांप्रदायिक त्यांच्या किर्तनांना प्रमाण मानत नाही. त्यांचे दाखले कुणाला संदर्भ म्हणून चालत नाहीत. पारंपरिक ज्या गाथांवरच्या टीका वापरल्या जातात त्यांचाच संदर्भ वारकरी घेतात. जोग महाराज, साखरे महाराज, धुंडा महाराज देगलुरकर शंकर महाराज खंदारकर, सोनोपंत दांडेकर यांचा शब्द आजही वारकरी संप्रदायात प्रमाण आहे.

आज प्रत्यक्ष किर्तन करणार्‍यांत चैतन्य महाराज देगलुरकर, चंद्रशेखर महाराज देगलुरकर, राउत महाराज, मुकूंदकाका जाटदेवळेकर, गहिनीनाथ महाराज औसेकर, भास्करगिरी महाराज ही मंडळी अग्रेसर आहेत. वारकरी संप्रदायात यांना किंमत आहे. निवृत्ती महाराज इंदुरीकर किंवा त्या पूर्वीचे अशी शोबाजी करणारे बाबामहाराज सातारकर यांना नाही.

याच प्रमाणे राजकारणात राज ठाकरेंचे होवून बसले आहे. स्वाभाविकच त्यांच्याकडे कुणीही पर्यायी पक्ष म्हणून किंवा विरोधी पक्ष म्हणूनही पहात नाही. शरद पवार उतारवयात रोज जितक्या सभा घेतात तितक्याही राज ठाकरेंना घेता येत नाहीत. आजही कॉंग्रेस राष्ट्रवादीचेच उमेदवार भाजप सेनेला पर्याय म्हणून दुसर्‍या स्थानांवर आहेत.

आज कुणी कितीही टिक़ा करो कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी यांचे गावोगावी कार्यकर्त्यांचे जाळे आहे. पण भाजप सेनेला पर्याय म्हणून बढाया मारणार्‍या राज ठाकरेंना 288 उमेदवारही मिळालेले नाहीत. बुथनिहाय कार्यकर्ते मिळणे तर दूरची गोष्ट. त्यांच्या सर्व उमेदवारांच्या मतदारसंघात प्रचार करणे त्यांना शक्यही नाही. 

बीड जिल्ह्यात आणीबाणीपूर्वी बाबुराव आडसकर आणि बापु काळदाते यांचा किस्सा प्रसिद्ध आहे. बापु काळदाते समाजवादी परिवारातले. अतिशय उत्तम भाषणं करण्यासाठी प्रसिद्ध. पण बाकी पक्षाचा सगळा कारभार भोंगळ. कॉंग्रेसचे बाबुराव आडसकर आपल्या कार्यकर्त्यांना म्हणायचे, ‘चांगलं बोलतो तर मानधन देवून पैसे लावून त्याची भाषणं ठेवू. मतं कशाला द्यायला पाहिजेत.’ आणि खरंच बीडच्या मतदारांनी बाबुरांवांना आमदार केले आणि बापु काळदातेंची भाषणं ऐकली (बापु आमदार आणि आणिबाणीत खासदार म्हणून निवडून आले ही बाब अलाहिदा).

आज राज ठाकरेंचा बापु काळदाते झाला आहे. भाषणं ऐकण्यासाठी लोक तयार आहेत. पण पाठीशी पक्षाची काहीच संघटना नाही, विश्वासार्ह कार्यकर्त्यांचं जाळं नाही, स्वत:शिवाय दुसरा कुणी नेता नाही. केवळ भाषणं आणि भाषणं. आधून मधून व्यंगचित्रं. कधी कधी खळ्ळ खट्याक. त्या निमित्ताने जोरदार प्रसिद्धी. बाकी काहीच नाही.

प्र.के. अत्रें असेच जोरदार भाषणं करायचे. पण लोक मतं देवून कॉंग्रेसला सत्तेवर बसवायचे. आज हीच परिस्थिती भाजपबाबत झाली आहे. राज ठाकरेंनी केलेली टीका लोकांनी ऐकून घेतली. टाळ्या वाजवल्या. हशा उसळला. पण सत्ता मात्र भाजपला बहाल केली.

विधानसभेत फारसं काही वेगळं होण्याची शक्यता नाही. युतीला दोनशे पेक्षा जास्त जागा मिळत असल्याचे सर्वेक्षणांतून पुढे आलं आहेच. मनसेचे मात्र खातंही उघडतं की नाही अशी शंका आहे. राज ठाकरे अध्यात्मात असले असते तर इंदूरीकर महाराजांना जबरदस्त स्पर्धा तयार झाली असती. पण इंदूरीकर महाराजांचे नशिब चांगलं आहे. राज ठाकरे किर्तन करत नाहीत.

श्रीकांत उमरीकर  जनशक्ती वाचक चळवळ, 244-समर्थ नगर, औरंगाबाद 431-001. मो. 9422878575 ˆˆ   

Wednesday, October 16, 2019

‘दिशा’ साप्ताहिकाचा वाचन कुपोषणामुळे बालमृत्यू !


१६ ऑक्टोबर २०१९ 

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या गदारोळात एक बातमी दबून गेली. बातमी प्रत्यक्ष माध्यमांशी संबंधीतच आहे. झी. समुहाने दोन वर्षांपूर्वी ‘दिशा’ नावाचे साप्ताहिक मोठा गाजावाजा करून सुरू केले होते. सकाळचे माजी संपादक विजय कुवळेकर यांना या साप्ताहिकाच्या संपादकपदी नेमले होते. या महिन्यात हे साप्ताहिक अधिकृत रित्या बंद करत असल्याचे ‘दिशा’च्या अंकात छापून आले. आणि या साप्ताहिकाचा अवतार संपूष्टात आला.
15 ऑक्टोबर भारतरत्न अब्दूल कलाम यांची जयंती ‘वाचक प्रेरणा दिन’ म्हणून साजरा केला जातो. याच ऑक्टोबर महिन्यात ‘दिशा’ बंद पडल्याची बातमी यावी हे दुर्दैव आहे. दैव हा शब्द यासाठी वापरला की त्याशिवाय दुसरे काही कारण दिसत नाही. आर्थिक दृष्ट्या डबघाईला आले म्हणून बंद पडले हे खरे असले तरी खुप वरवरचे कारण आहे.

सार्वजनिक ग्रंथालये सर्वात जास्त असलेले महाराष्ट्र हे भारतातील पहिल्या क्रमांकाचे  राज्य आहे. दहा हजार सार्वजनिक ग्रंथालये, दहा हजार महाविद्यालयीन ग्रंथालये आणि 5 हजार शालेय ग्रंथालये म्हणजे एकूण 25 हजार इतकी किमान दखल घ्यावीत अशी मोठी ग्रंथालये महाराष्ट्रात शासनाच्या अनुदानावावर चालत आहेत. आणि तरी ‘दिशा’ सारख्या साप्ताहिकाचा असा दोनच वर्षात अकाली मृत्यू व्हावा?

‘दिशा’ बाबत त्यांच्या काय आणि कशा चुका झाल्या हा मुद्दा स्वतंत्र आहे. त्यावर टिका करताना किंवा त्यांची बाजू घेताना काही मुद्दे हिरीरीने पुढे केले जातील. मला त्यात पडायचे नाही. वाचन संस्कृती रूजविण्यासाठी आपण जे काही म्हणून प्रयत्न करतो आहोत त्यांचीच ‘दिशा’ चुकत आहे असा माझा आरोप आहे.

गॅसची सबसिडी जशी खातेदारांच्या खात्यात सरळ जमा होते आहे तसे आता वाचकांच्या खात्यात ही रक्कम जमा करावी का? सार्वजनिक ग्रंथालयांमुळे वैयक्तिक खरेदी बंद झाली. आणि दुसरीकडे सार्वजनिक ग्रंथालयांचा दर्जा ढासळत गेला. या दुहेरी कात्रीत आज मराठी ग्रंथ व्यवहार सापडला आहे. मराठीत साप्ताहिके, पाक्षिके, मासिके, द्वैमासिके, त्रैमासिके, दिवाळी अंक, वार्षिक अंक असे कितीतरी प्रकाशीत व्हायचे. या सगळ्यांतून वाचकांच्या किमान तीन चार पिढ्या गेल्या शतकभरात समृद्ध झाल्या. हळू हळू नियतकालीके बंद पडायला लागली. ‘अंतर्नाद’ मासिक भानु काळे यांनी नुकतेच बंद केले. त्यांचा केवळ दिवाळी अंक आता निघणार आहे. (माझ्या स्वत:च्या गाठीशी ‘ग्रंथसखा’ मासिक पाच वर्षे  आणि ‘शेतकरी संघटक’ पाक्षिक 5 वर्षे चालविण्याचा अनुभव आहे. दोन्हीही बंद पडली आहेत.)

परत परत वाचन संस्कृतीचा प्रश्‍न येतो तेंव्हा या समस्येवर वरवरचे उपाय शोधले जातात. दूरगामी विचार करायचा असेल तर काही गोष्टी सगळ्यांनी मिळून करण्याची नितांत गरज आहे. ते नाही केलं तर अजून काही नियतकालिके, प्रकाशनं बंद होत जातील.

‘किशोर’ मासिक बालभारतीच्या वतीने म्हणजेच शासनाच्या वतीने प्रकाशीत केले जाते. 1971 पासून हे प्रकाशीत होते आहे. आज किती शाळांपर्यंत किशोर पोचते? 48 वा दिवाळी अंक नुकताच प्रकाशीत झाला. किती पालकांना माहित आहे की असा काही अंक निघतो म्हणून? या मासिकाला शासनाचे पूर्ण पाठबळ आहे म्हणून निदान अंक सातत्याने निघत तरी आहे. ‘लोकराज्य’ हे साप्ताहिक शासनाच्या वतीने प्रकाशीत होते. तेही असेच शासनाचा संपूर्ण आर्थिक पाठिंबा आहे म्हणून प्रकाशीत होवू शकते आहे. पण या दोन्ही शासकिय नियतकालीकांचा किती प्रभाव मराठी वाचकांवर आहे?

म्हणजे एकीकडे ‘दिशा’ सारखे साप्ताहिक बंद पडत आहे आणि दुसरीकडे शासनाचे जे चालू आहे त्याचा काहीही प्रभाव पडत नाही. हे कशाचे द्योतक आहे?

शालेय पातळीवर ग्रंथालये पूर्णत: उद्ध्वस्त झाली आहेत. त्यांना सक्षम करण्याची गरज आहे. दुसरी गोष्ट सार्वजनिक ग्रंथालयांबाबत धोरण बदलले गेले पाहिजे. वाचन प्रेरणा दिवसाचे कार्यक्रम ठेवले जातात पण या सोबतच पुस्तकं वाचकांपर्यंत पोचविण्यातल्या अडचणी दूर झाल्या तरच काहीतरी अर्थ या उपक्रमाला शिल्लक राहिल. नसता तो एक नुसता उपचार ठरेल.

मध्यंतरी विनोद तावडे यांनी शिक्षण मंत्री असताना जाहिर केले की बुके नव्हे बुक द्या. किमान शासकीय पातळीवर तरी ही योजना राबवायला हवी होती. त्यासाठी शासकीय प्रकाशने तरी उपलब्ध व्हायला हवी होती. रा.रं. बोराडे साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष असताना त्यांनी महाराष्ट्राचे शिल्पकार नावाने एक चरित्रात्मक पुस्तकांची मालिकाच प्रकाशीत केली होती. या पुस्तकांची किंमत अतिशय कमी (रू. 50 च्या आसपास) ठेवण्यात आली होती. मग ही पुस्तके पुष्पगुच्छा ऐवजी शासकीय पातळीवर उपयोगात आणता आली असती. पण तसं काहीच घडलं नाही. आजही कुठल्याही शासकीय कार्यक्रमांत साहित्य संस्कृती मंडळ, राज्य मराठी विकास संस्था, बालभारती, तंत्रशिक्षण विभाग, साहित्य अकादमी, नॅशनल बुक ट्रस्ट यांनी प्रकाशीत केलेली पुस्तके सप्रेम भेट दिली जात नाहीत.

एखादे साप्ताहिक मासिक बंद पडले की उसासे निघतात, अश्रु ढाळले जातात, वाचन संस्कृतीची चिंता केली जाते.  काही लेख छापून येतात. ते कुणी वाचतं की नाही माहित नाही. पुढे काही घडत नाही.

मी स्वत: गेली 20 वर्षे जनशक्ती वाचक चळवळीच्या माध्यमांतून पुस्तक प्रकाशन, पुस्तक प्रदर्शन, पुस्तकांवर विविध प्रकारचे कार्यक्रम (प्रकाशन समारंभ, अभिवाचन, एक पुस्तक एक दिवस, लेखकाच्या मुलाखती) करत आलेलो आहे.  ‘दिशा’ साप्ताहिकाचा अकस्मिक मृत्यू मला अस्वस्थ करतो आहे. पुढील असे मराठी नियतकालिकांचे बालमृत्यू (वयाच्या हिशोबाने, आशयाच्या नव्हे) टाळायचे असतील तर वाचनाचे कुपोषण थांबवणे गरजेचे आहे.

एक छोटा संकल्प करायची मी विनंती आपणाला करतो. मोठ्यांसाठी काय आणि कसे करता येईल तो मोठा विषय आहे. पण लहान मुलांसाठी किमान ‘किशोर’ मासिक खरेदी करा. पोस्टाने येण्यात अडचणी असतील तर माझ्याकडे संपर्क करा मी जरूर सहकार्य करावयास तयार आहे.

महाराष्ट्रभरच्या अ वर्ग ग्रंथालयांमधून ‘एक पुस्तक एक दिवस’ हा उपक्रम राबविण्यासाठी आम्ही सहकार्य करण्यास तयार आहोत. कृपया ग्रंथालयांशी संबंधीत ग्रंथपाल, संस्थेचे विश्वस्थ, जागरूक वाचक, लेखक, रसिक यांनी संपर्क करावा.

प्रकाशक परिषद, ग्रंथ विक्रेते, साहित्य संस्था, शाळा महाविद्यालये यांच्या सहकार्याने ‘ग्रंथ प्रदर्शने’ भरवू या. आम्ही हात पुढे केला आहेच. तूम्ही पण पुढे या.

केवळ चर्चा करण्यापेक्षा आपण सकारात्मक कृती करू या. वाचन संस्कृती जोपासू या.

श्रीकांत उमरीकर  जनशक्ती वाचक चळवळे,244-समर्थ नगर, औरंगाबाद 431-001. मो. 9422878575 ˆˆ   

Thursday, October 10, 2019

छोट्या पक्षांची राजकीय भुरटेगिरी !


10 ऑक्टोबर 2019 

एका ‘राष्ट्रीय’ पक्षाने मोठ्या पक्षाशी युती केली. त्याला आपल्या वाट्याला ज्या जागा मिळाल्या त्या सर्व जागा लढवायला उमेदवारही मिळाले नाहीत. मग त्या पक्षाने बाहेरून उमेदवार आयात केले. या उमेदवारांना तिकीट वाटप करताना खर्‍याखुर्‍या राष्ट्रीय पक्षाने गुपचूप आपला ए. बी. फॉर्मही देवून टाकला. प्रत्यक्षात जेंव्हा अर्ज मागे घेण्याची तारीख उलटली तेंव्हा या ‘राष्ट्रीय’ पक्षाला कळाले की आपल्याला सोडलेल्या जागी ना आपला उमेदवार उभा आहे ना आपले चिन्ह त्याला आहे. मग यांनी उगीच उसना आव आणत ‘धोका’ झाल्याची ओरड केली.

ही काही कुठली कल्पित गोष्ट नाही. अगदी आत्ता घडलेला खराखुरा प्रसंग आहे. महादेव जानकर यांचा ‘राष्ट्रीय समाज पक्ष’ नावाचा एक पक्ष आहे (तो किती राष्ट्रीय आहे हे जानकर स्वत:ही सांगू शकत नाहीत). त्याला भाजप सेना युतीने तीन जागा सोडल्या होत्या. पैकी एक जागा त्यांचा आमदार निवडून आलेला आहे. बाकी दोन जागा परभणी जिल्ह्यातील गंगाखेड आणि जिंतूर अशा होत्या. जिंतूरला कॉंग्रेस मधून भाजपात आयात केल्या गेलेल्या मेघना बोर्डीकर यांना भाजपने तिकीट दिलं. चिन्हही दिलं. पण देताना सांगितलं की तूम्ही ‘रासप’ च्या उमेदवार आहात. गंगाखेडला शिवसेनेने आपला अधिकृत उमेदवार उभा केला. रासपला उमेदवारच मिळाला नाही. साखर कारखान्यामधील आर्थिक गुन्ह्यांसाठी तुरूंगात असलेले उद्योजक रत्नाकर गुट्टे यांना ‘रासप’ ने आपला उमेदवार बनवले आणि अर्ज भरायला लावला.

रामदास आठवले यांच्या पक्षाला अशाच पाच जागा मिळाल्या. पण त्यांचे उमेदवार भाजपच्या चिन्हावर उभे आहेत. मग आता ते अधिकृतरित्या कुणाचे उमेदवार? आठवले इतक्या वर्षांपासून राजकारणात आहेत. यांनी स्वत:चा म्हणून जो पक्ष आहे त्याचा काय आणि किती विस्तार गेल्या 25 वर्षांत केला? यांना स्वत:ला मंत्रिपद मिळालं (ते ही राज्यसभेवर खासदार म्हणून सत्ताधार्‍यांनी निवडुन आणल्यावर किंवा विधान परिषदेवर निवडुन आणल्यावर.) या शिवाय यांचा कोण सदस्य विधानसभेवर निवडुन आला व मंत्री झाला? गंगाधर गाडे यांना आमदार नसतानांच मंत्री केल्या गेलं. सहा महिने ते मंत्री राहिले. पण नंतर कुठल्याच सभागृहात निवडुन न आल्याने त्यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. सध्याच्या मंत्रीमंडळात अविनाश महातेकर हे पण असेच आमदार नसताना मंत्री बनवल्या गेले आहेत.

विनायक मेटे म्हणून असेच एक सद्गृहस्थ या भाजप सेना महायुती सोबत आहेत. त्यांचा म्हणून जो काही पक्ष आहे तो कुठे आणि नेमक्या किती जागा लढवत आहे ते कुणालाच माहित नाही. राजू शेट्टीं पासून बाजूला झालेले सदाभाऊ खोत यांनी ‘रयत क्रांती संघटना’ नावाचा एक पक्ष काढला. हा पक्ष कुठे आणि किती जागा लढवत आहे हे खुद्द सदाभाऊ यांना तरी माहित असेल का अशी शंका येते.

दुसरीकडे कॉंग्रेस राष्ट्रवादी सोबत असलेल्या छोट्या पक्षांची स्थिती यापेक्षा खराब आहे. राजू शेट्टी आघाडी सोबत आहेत. त्यांना लोकसभेत दोन जागा मिळाल्या. ते स्वत: वगळता दूसरा उमेदवाराच त्यांना मिळाला नाही. सांगलीची जागा न मागताच त्यांच्या गळ्यात पडली आणि वसंतदादांच्या घराण्यातील उमेदवार त्यांना आयात करावा लागला. आता विधानसभेला राजू शेट्टी आमदार होते तेवढा शिरोळ एकच मतदारसंघ आघाडीने त्यांना सोडला आहे. त्यांचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर आणि कोल्हापुरचे बहुतांश पदाधिकारी भाजपात गेले आहेत.

जनता दलाने आघाडीतून बाहेर पडून 9 जागा लढविण्याचे ठरविले आहे. समाजवादी पक्षाचे असेच हाल आहेत. आबु आझमी (मानखुर्द शिवाजीनगर) आणि कलीम कुरैशी (औरंगाबाद पूर्व) अशा दोनच जागा त्यांना सोडण्यात आल्या आहेत. तिसर्‍या भिवंडी (पूर्व) मध्ये समाजवादी पक्षा विरोधात कॉंग्रेसने आपला उमेदवार दिला आहे.

डाव्या पक्षांची तर अजूनच वाताहत आघाडीने करून टाकली आहे. भाकप आता 16 जागांवर स्वतंत्र लढणार आहे. कळवणमध्ये विद्यमान माकप आमदार जे.पी.गावित यांच्या विरोधात राष्ट्रवादीने उमेदवार दिला आहे. केवळ एक डहाणूची जागा माकपसाठी आघाडीने सोडली आहे. माकप 4 जागा लढवत आहे.

विनय कोरे यांचा 'जनसुराज्य' नावाचा एक पक्ष आहे. ते स्वत: शाहुवाडी मतदारसंघातून निवडणुक लढवत आहेत. त्यांच्या विरोधात आघाडीने उमेदवार दिलेला नाही.

शेतकरी कामगार पक्षाला उरण आणि पनवेल या दोनच जागा आघाडीने सोडल्या आहेत. सांगोल्याची गणपतराव देशमुखांची परंपरागत जागाही राष्ट्रवादीने लाटली. आपला अधिकृत उमेदवार उभा केला. नंतर आता पत्रक काढून शेकापच्या उमेदवाराला (गणपतराव देशमुखांच्या नातवाला) पाठिंबा देण्याचे जाहिर केले आहे.

प्रहार संघटनेचे बच्चु कडू म्हणून आमदार आहेत. त्यांच्या विरोधात कॉंग्रेसने आणि वंचित बहुजन आघाडीनेही उमेदवार दिला आहे.

एकीकडे पुरोगामी म्हणवून घेणार्‍या बहुजन विकास आघाडी, भाकप, माकप, जनता दल, समाजवादी पक्ष, शेकाप, जनसुराज्य, प्रहार, स्वाभिमानी, भारीपचे काही तुकडे (गवई, कवाडे, इ.) या सगळ्यांची बोळवण आघाडीने एखाद दुसरी जागा देवून केलेली दिसते आहे. हे सगळे आघाडीत आहेत की नाहीत हे त्यांनाही सांगता येईना.

महाराष्ट्रातील या छोट्या पक्षांची अवस्था अतिशय दयनीय अशी झाली आहे. या पक्षांनी निवडणुकांच्या आधी जी विधाने केली आहेत ती तपासून पहा. म्हणजे यांचा भूरटेपणा दिसून येईल. एकेकाळी डाव्यांना (शेकापसह) काही एक विचारसरणी म्हणून मान तरी होता. भले त्यांच्या जागा कमी असो. त्यांना सामाजिक प्रतिष्ठा होती. आता त्यांची आंदोलनेही नि:संदर्भ होवून बसली आहेत. इतरांना तर विचारसरणी नावाची काही गोष्टच नाही.

वंचित बहुजन आघाडी, मनसे आणि एम.आय.एम. हे तीन पक्षही स्वतंत्रपणे लढत आहेत. वंचितने जास्तीत जास्त म्हणजे 244 जागी उमेदवार दिले आहेत. असला उपद्व्याप एकेकाळी बहुजन समाज पक्ष करायचा. (आताही त्यांनी उमेदवार उभे केले आहेतच.) त्या खालोखाल मनसेने 102 जागी उमेदवार दिले आहेत. त्यानंतर एम.आय.एम. चा नंबर लागतो. त्यांनी 24 उमेदवार उभे केले आहेत.

वंचित बहुजन आघाडी आणि मनसे यांनी इतक्या कोलांटउड्या मारल्या आहेत की त्यांनी आपणहून आपली विश्वासार्हता धोक्यात आणली आहे. एकीकडे प्रकाश आंबेडकर सगळ्या जागा लढवत आणि दुसरीकडे राज ठाकरे यांनी एकही जागा न लढवता जो काही खेळ लोकसभेसाठी केला तो कशासाठी होता याचे उत्तर अजूनही मिळाले नाही. कारण वंचितचा फायदा घेत एम.आय.एम. चा खासदार निवडून आला . राज ठाकरेंचा ‘लाव रे तो व्हिडीओ’ कॉंग्रेस राष्ट्रवादीच्या पराभवाला रोकू शकला नाही. मग यांनी मिळवलं ते काय? आणि इतकी आपली प्रत्यक्ष अप्रत्यक्ष ताकद सिद्ध करून कुणाशी युती आघाडी केलीच नाही. उलट एम.आय.एम. शी असलेली व्यवहारीक तडजोड वंचितने गमावली.

2009 मध्ये मनसेेचे 13 आमदार निवडून आणले होते शिवाय युतीचे सर्व खासदार मुंबईत पाडून दाखवले होते. एकेकाळी बसपाने विदर्भात असेच लाख लाख मते 6 मतदारसंघात घेवून दाखवले होते. याच वर्षी रामदास आठवले यांनी रिडालोआ (रिपब्लिकन डावी लोकशाही आघाडी) चा फसलेला प्रयोग सादर केला होता. 2014 मध्ये ‘आम आदमी पक्षाने’ लोकसभेला सर्वच जागी उमेदवार उभे करून एक वगळता सर्वांची अमानत गमावली होती.

पण या सगळ्या प्रयोगांतून कुठलेच शहाणपण तिसरी आघाडी शिकली नाही. 

प्रमुख राजकीय पक्ष वगळता उर्वरीत जे पक्ष आहेत ते एकत्र येवून का नाही काही एक आव्हान उभं करू शकले? किमान सगळ्यांना मिळून एकत्र प्रचाराची आघाडी तर निर्माण करता आली असती. ज्या मतदारसंघात आपला उमेदवार नाही त्या ठिकाणी दुसर्‍या छोट्या पक्षाला मते द्या असे तरी सांगता आले असते. पण जितके पक्ष छोटे तितके त्यांचे अहंकार मोठे. सत्ताधार्‍यांसोबत असलेल्यांना निदान सत्तेचा काही तरी तुकडा चाखायला मिळतो. पण विरोधातले पक्षही एकत्र येत नाही ही एक कमाल आहे.

युती आणि आघाडीतील प्रमुख पक्ष वगळता आज फारशी राजकीय ‘स्पेस’ छोट्या पक्षांना महाराष्ट्रात शिल्लक नाही. जी काही आहे ती व्यापत निवडुन येण्यासाठी जी राजकीय तडजोड करावी लागते ती कुणीच केलेली दिसत नाही. याचा मोठा तोटा या पक्षांना भोगावा लागणार आहे. आश्चर्य म्हणजे प्रस्थापित पक्षांतील बंडखोर स्वतंत्र लढणे पसंत करत आहेत पण ते अशा कुठल्याच छोट्या पक्षाच्या दावणीला गेलेले दिसत नाहीत. म्हणजे त्यांचाही या पक्षांवर भरवसा नाही.

वंचित बहुजन आघाडीला एक मोठी संधी तिसरी आघाडी उभारण्याची होती. पूर्वीचे सगळे मतभेद बाजूला ठेवून, सगळे पूर्वग्रह दूर सारून एक सक्षम अशी तिसरी आघाडी प्रस्थापितांना पर्याय म्हणून समोर आली असती तर त्याचा एक चांगला संदेश सामान्य मतदारांपर्यंत गेला असता. या तिसर्‍या आघाडीने खर्‍याखुर्‍या विरोधी पक्षाची भूमिका निभावली असती. भविष्यात या आघाडीला जनतेने अजून प्रतिसाद दिला असता. पण प्रमुख पक्षांच्या पेक्षाही यांच्यात जास्त मतभेद आहेत. वैयक्तिक  राग लोभ यांच्या तडजोडी आड आलेले दिसतात.

निवडणुकीची घोषणा होण्याआधी राजू शेट्टी राज ठाकरेंना कसे भेटले, प्रकाश आंबेडकर आणि राज ठाकरे ई.व्हि.एम. विरोधात कसे एकत्र येणार, किसान लॉंग मार्च मुळे डाव्यांची कशी ताकद वाढली आहे अशा फुगवलेल्या बातम्या पत्रकार देत राहिले. याचा काडीचाही परिणाम निवडणुकीत दिसून येत नाहीये. आज महाराष्ट्रातील मतदारांसमोर युती आणि आघाडी यांच्या शिवाय फारसा पर्याय दिसत नाही. दलित मुसलमान वंचित मतांचा मोठा टक्का वंचित आणि एमआयएम कडे वळला होता. तो आता परत आघाडीच्या सक्षम उमेदवाराकडे वळताना दिसतो आहे.

2009 ला ‘रिडालोस’चे, 2014 ला ‘आप’चे अपयश महाराष्ट्राने अनुभवले. आणि आता 2019 ला ‘वंचित’ आणि ‘मनसे’चे तसेच अपयश समोर येण्याची शक्यता आहे. तिसर्‍या आघाडीतील पक्षांसाठी ही धोक्याची घंटा आहे.

        श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575

 
 

 
   

Saturday, October 5, 2019

जनीची अद्भूत वाकळ



काव्य तरंग - दै. दिव्य मराठी ५ ऑक्टो २०१९ 

पीठ शेल्याला लागले झाला राऊळी गोंधळ
कुण्या घरचे दळण आला दळून विठ्ठल ॥धृ०

पीठ चाखले एकाने म्हणे आहे ही साखर
पीठ हुंगले दुज्याने म्हणजे सुगंधी कापूरी
खरे कुणा आकळेना मनी उठले वादळ ॥१

कुणी शेला झटकला पीठ उडून जाईना
बुचकळला पाण्यात पीठ धुवून जाईना
झाली सचिंत पंढरी वाढे राऊळी वर्दळ ॥२

ठिगळाच्या पांघरूणा शेला म्हणती सकळ
फक्त जनीस दिसले होती तिची ती वाकळ
कशी मागावी कळेना जनी रडे घळघळ ॥३

- श्री.दि. इनामदार (दिंडी जाय दिगंतरा, प्रकाशक- साहित्य सेवा, औरंगाबाद, पृ. 38)

सध्या सर्वत्र वातावरण आषाढी वारीचे भारलेले असे आहे. गेली 700 वर्षे हा वारकरी संप्रदाय उभ्या महाराष्ट्रला व्यापून मनामनात ठाण मांडून बसलेला आहे. काळ नवा येतो आहे तसतशी वारी अजूनच उत्साहाने आनंदाने उर्जेने न्हाऊन निघत आहे. नविन पिढीलाही ती आपल्याकडे खेचून घेते आहे.  

जनाबाईंचे स्थान संत साहित्यात अतिशय वेगळे असे आहे. ही जनाबाई स्त्रीसुलभ भावना आपल्या अभंगांमधून मांडण्यासाठी प्रसिद्ध आहे. देवाशी भांडण करण्याची तिची ताकद पाहिली की पुरूषांपेक्षा स्त्रीची अभिव्यक्ती कशी वेगळी आहे हे दिसून येते. देवाला अगदी जवळचा समजून सखा समजून ती व्यक्त होते म्हणूनच त्याच्याशी तिला मनसोक्त भांडताही येते. 

जनाबाईच्या घरची कामं विठ्ठल करायचा अशी अख्यायिका आहे. त्याचा साधा मतितार्थ आजच्या काळात इतकाच घेता येतो की रोजच्या तिच्या जगण्यात विठ्ठलभक्ती अगदी ओतप्रोत भरून राहिली होती. रोजची कामं हीच तिची देवपुजा होती. अशा जनाईवरची औरंगाबादचे दिवंगत कवी श्री.दि. इनामदार यांची ही अतिशय गोड प्रसादिक रचना. संतांच्या रचनांची जी जातकुळी आहे त्याच शैलीत श्री.दि.नी संतांविषयी रचना केल्या आहेत. अशा रचनांचा एक आख्खा कविता संग्रहच ‘दिंडी जाय दिगंतरा’ या नावाने प्रसिद्ध आहे. त्याच संग्रहातील ही रचना. 

जनाबाईच्या घरचे दळण दळण्यासाठी विठ्ठल हातभार लावतो. पहाटे मंदिरात परत येताना थंडी असल्याने असेल कदाचित पण तो तिच्या घरची वाकळ अंगावर पांघरून घेता. मंदिरात ही वाकळ विठ्ठल मुर्तीच्या खांद्यावर आढळून येते आणि सर्वत्र गहजब उडतो. त्याचे वर्णन करणारी ही साध्या शब्दकळेतील पण प्रभावी कविता. देवाशी भांडणारी जनी जेंव्हा देवाच्या खांद्यावर आपलीच वाकळ पाहते आणि तिच्या डोळ्यातून खळखळा अश्रू वहायला लागतात. या साध्या कृतीतून तिची भक्ती काय प्रतीची असते याचा उलगडा रसिकांना ही कविता वाचताना होतो.

वारकरी संप्रदायात देव आणि भक्त यांच्यातील वेगळ्या नात्याचा उलगडा यातून होतो. हे नाते हृदयाचे आहे. हे नाते इतर संप्रदायांत वर्णन केल्याप्रमाणे रूक्ष कर्मकांडांने युक्त पाप पुण्याच्या धाकाने दबलेले नाही. जनाबाईंनीच एका अभंगात असे म्हटले आहे, ‘धरिला पंढरीचा चोर । गळा बांधांनिया दोर ॥ हृदय बंदिखाना केला । आत विठ्ठल कोंडिला ॥
ˆ
ˆ  
श्रीकांत उमरीकर  जनशक्ती वाचक चळवळ,244-समर्थ नगर, औरंगाबाद 431-001. मो. 9422878575

Wednesday, October 2, 2019

गांधी बाबाचा गंडा !


2 ऑक्टोबर 2019 

माझ्या हाताला सुताचा पांढरा दोरा गुंडाळलेला पाहून एका सन्मित्राने विचारले, ‘‘हा कुठला गंडा आहे?’’ त्याच्या प्रश्‍नातच मला उत्तर सुचले. मी सांगितले, ‘‘हा गांधीबाबाचा गंडा आहे. फार पावरफुल आहे. लगेच पावतो.’’ त्याला बिचार्‍याला माझ्या बोलण्यातील खोच कळली नाही. मी काहीतरी सामाजिक क्षेत्रात लुडबुड करत असतो. तेंव्हा बाबा महाराज करण्यातला नाही. मग हा गंडा कसा काय? शिवाय गांधीच्या नावानं कसा? विचारलं तर हा काहीतरी लंबेचौडे ‘लेक्चर’ हाणीन अशी भिती वाटल्याने असेल कदाचित त्याने मान डोलावत प्रश्‍न आवरत काढता पाय घेतला.

आज गांधींची 150 वी जयंती. तेंव्हा या दिवशी आपण गांधींच्या तत्त्वांची आठवण राखण्यासाठी म्हणून खादीचे सुत हाताला वर्षभर बांधायचे असा संकल्प मी तीन दिवसांपूर्वीच केला होता. त्याला कारण घडले ते महागामी गुरूकुलात संपन्न झालेला ‘सुत्रात्मन्’ हा कार्यक्रम. नृत्यगुरू पार्वती दत्ता यांनी महात्मा गांधींना अभिवादन करण्यासाठी अप्रतिम असा कलाविष्कार 28-29 सप्टेंबर रोजी सादर केला. दुसर्‍या दिवशी ‘सुत्रात्मन्’ ची प्रस्तावना करताना त्यांनी गांधी विचार आणि कला या बाबत विवेचन मधुर आयुर्वेदिक हिंदीत समोर ठेवले. उडिसी व कथ्थक या दोन्ही नृत्यप्रकाराचा समावेश करून एक आगळा वेगळा कलाविष्कार सिद्ध केला. कार्यक्रमाच्या शेवटी समृद्धी या सर्वात छोट्या नृत्यांगनेने समोर बसलेल्यांना एक एक सुताचा धागा दिला. यातला एक माझ्याही वाट्याला आला. त्याच दिवशी माझा निश्चय पक्का झाला की आपण हा धागा मनगटावर बांधायचा.
केवळ धागा बांधून काही होत नाही. नुसता धागा बांधणे ही तशी सहज सोपी प्रक्रिया आहे. काही एक संकल्प करणे हे पण सहज शक्य आहे (तो कितपत पाळला जाईल ते निराळे). पण माझ्या मनात संघर्ष सुरू झाला की यासाठी आपण पात्र आहोत का? किमान एखादी तरी अशी घटना आहे का की ज्यातून सिद्ध होवू शकेल की आपण गांधी विचारांनी प्रेरीत झालो आणि ते कृत्य केलं? आणि तसे नसेल तर हा धागा कसा काय बांधणार?

एकेकाळी शिष्याची परिक्षा घेवून मगच गुरू त्याला आपलेसे करायचे. मग मला गांधीना गुरू करायचे असेल तर एखादी तरी परिक्षा देणं आणि त्यात उत्तीर्ण होणं आवश्यक होतं. तसं शरद जोशींच्या विचारांत गांधींचा फार मोठा भाग आहे. त्या अनुषंगाने माझे नाते गांधींशी जूळत होते. पण मला माझ्या स्वत:च्या आयुष्यातील प्रसंग हवा होता.

दोन दिवस यात गेल्यावर शेवटी 30 तारखेच्या रात्री मला तो प्रसंग आठवला. औरंगाबाद शहरातील रस्त्याच्या प्रश्‍नांवर आंदोलन करत मी रस्त्यावर (अक्षरश: रस्त्यावरच) उतरलो होतो. लोकांनी प्रचंड प्रतिसाद दिला. मोठा रस्ता रोको झाला. दुसर्‍या दिवशी कुणीतरी राजकीय नेत्याने अस्वस्थ होवून पोलिसांत तक्रार केली की इतके मोठे आंदोलन झाले आणि तुम्ही काहीच गुन्हे दाखल करत नाहीत? हे काय चालू आहे? मग पोलिसांनी आम्हाला (माझ्यासह चार जण) उस्मानपुरा पोलिस स्टेशनमध्ये बोलावून घेतले आणि गुन्हे दाखल केले. एक कागद माझ्या पुढे केला आणि सही करायला सांगितले. ‘‘हे काय आहे?’’ असे विचारताच,  ‘‘तुम्हाला जामीन घ्यावा लागेल.’’ असे पोलिसांनी संागितले. मी विचारले, ‘‘आणि नाही केली सही तर?’’ मग त्याने सांगितले की, ‘‘तुम्हाला अटक होईल. तुरूंगात जावे लागेल.’’

दुपारची साधारण 12 ची ती वेळ होती. माझ्या सोबतच्या तिघांनी झटपट सह्या केल्या. त्यांचे ते मोकळे झाले. माझ्यात मात्र आता गांधी संचारायला सुरवात झाली. आपला निग्रह किती टिकतो? असा प्रश्‍न हा गांधी मला विचारायला लागला. मी पत्रकारांना आणि जवळच्या मित्रांना फोन केला आणि जामिन न घेता तुरूंगात जाण्याचा माझा निश्चय सांगितला. सगळ्यांना वाटत होते की अजून काही वेळ गेला की हा तयार होईल. मग प्रश्‍न संपून जाईल. बाकी कोर्ट कचेर्‍या कितीही काळ चालत राहो. त्यानं काय फरक पडतो.

मी जामिन नाकारला म्हणजेच मला न्यायालयात उभं करणं आलं. हे माझ्या अजून काही पत्रकार मित्रांना आणि वकिल मित्रांना कळताच त्यांची धावपळ सुरू झाली. मला सगळे समजावून सांगायला लागले. माझ्याातला गांधी माझ्याकडे मिश्किल नजरेने पहात होता. मी तसतसा शांत होत गेलो. माझ्या विचारांवर ठाम राहिलो.

जिल्हा न्यायालयात मला नेल्यावर अजून काही जण भेटायला आले. माझ्या वकिल मामाला वाटले माझ्या वडिलांना बोलायला लावले तर माझ्यावर दबाव येईल. पण झाले उलटेच. बाबांना कळल्यावर त्यांनाही माझ्या निश्चयाचे कौतुक वाटले आणि माझ्या निर्णयावर मी ठाम रहावे असे त्यांनी सुचवले. न्यायाधीश मॅडम समोर उभं केल्यावर त्यांनीही मला समजावून सांगितले. पण मी जामीनाला नकार देतोय म्हटल्यावर त्यांनी मला थांबायला सांगितलं. बाकीची कामं आटोपून मला आपल्या चेंबरमध्ये बोलावून घेतलं. तोपर्यंत त्यांनी मुख्य जिल्हा न्यायधीशांशी या पेचप्रसंगावर चर्चा केली होती. मला त्यांनी परत समजावून सांगितलं, ‘‘तुमची सामाजिक प्रश्‍नांबाबतची तळमळ कळली आहे. आम्ही त्याची गांभिर्याने दखल घेतो आहोत. पण तूम्ही जामिनावर सही करा आणि अटक टाळा.’’ आता माझ्यातला गांधी अजूनच माझ्याकडे मिश्किल पहायला लागला. त्या गांधीला न्यायाधीश महोदयांमागचा गांधीही साथ देत होता. मी शांतपणे त्या गांधीच्या नजरेला नजर देत म्हणालो, ‘‘महोदया, माझी काहीच चुक नाही. मी सामाजिक प्रश्‍नांसाठी कायदा मोडला आहे. मी सही करणार नाही. मी तुरूंगात जायला तयार आहे. तुम्हाला रस्ते खराब आहेत हे आम्ही आंदोलन करून सांगायची का गरज पडावी? तुमच्यासाठी काय वेगळे रस्ते आहेत का? तुम्हालाही ही परिस्थिती चांगलीच माहित आहे. तेंव्हा खड्डे असलेल्या रस्त्यांच्या जगात बाहेर राहण्यापेक्षा मी आत तुरूंगातच राहणे पसंद करेल.’’

शेवटी नाईलाजाने न्यायाधीश मॅडमनी मला तुरूंगात धाडण्याचा आदेश काढला. त्यावर यांच्यावतीने कुणी सही केली तर यांना तात्काळ बाहेर सोडा, परत न्यायालयात आणण्याची गरज नाही अशी सुचनाही लिहीली. (जी मला दुसर्‍या दिवशी माझी सुटका झाल्यावर कळली.)

आता तो समोरचा गांधी आणि माझ्या मनातला गांधी दोघेही माझ्या पाठीवरून हात फिरवत होते. मी खुपच शांत झालो. एव्हाना माध्यमांपर्यंत हा विषय गेला होता. रस्त्याच्या प्रश्‍नावर आंदोलन करणार्‍या एका सामान्य नागरिकाला सरकार तुरूंगात डांबतेय ही बातमी सर्वत्र पसरली होती.

मग पुढे ती संध्याकाळ, तुरूंगातली रात्र आणि दुसर्‍या दिवशीची सकाळ ही बातमी माध्यमांत गाजत राहिली. माझ्या मनातला गांधी आता मात्र माझ्या खांद्यावर हात ठेवून मला उर्जा पुरवत होता. माझे गुरू शरद जोशी यांना एव्हाना ही बातमी कळाली होती. माझा फोन बंद होता म्हणून त्यांनी बाबांना फोन करून माझं कौतुक केल्याचं मला नंतर कळलं.

तुरूंगातील ती रात्र गांधी माझ्या सोबतच होता. पहाटे बराकीत पेपर आले तेंव्हा पलिकडच्या कोपर्‍यातील सात आठ कैदी माझ्याकडे आणि पेपरांतील बातमीकडे आळीपाळीने पहायला लागले. तेंव्हा मला कळले की माझा फोटो तिथे आला आहे म्हणून. खरं तर असल्या प्रसिद्धीने हुरळून जाणं सहज शक्य होतं. पण हा माझ्या मनातला गांधी मला तसं काहीच करू देत नव्हता. त्यानं मला शांत केलं होतं.

दुपारपर्यंत हा विषय सर्वत्र गाजला. शहरांतील प्रतिष्ठीत नागरीक पोलिस आयुक्तांकडे शिष्टमंडळ घेवून गेले. माझ्या तुरूंगवासातील तांत्रिक बाबींची सोडवणूक करून माझी तातडीने सुटका करण्याची तजवीज आयुक्तांनी केली. दुसर्‍या दिवशी दोन वाजता माझी सुटका झाली. आतले कैदी ज्यांना एव्हाना माझा अटकेचा विषय नीटच समजला होता, मोठ्या काकुळतीनं म्हणाले, ‘‘बॉस बाहर मत जावो यार. इधर बहोत प्रॉब्लेम है. बाहर तो बहोत सारे लोग लढते है. हमारे लिये कौन लढेगा? तुम जैसे लोग चाहीये.’’ तो कैदी मित्र सुभाष याच्या वाक्यावर माझ्याकडे काहीच उत्तर नव्हते.

पुढे या प्रश्‍नावर बराच गदारोळ झाला. योगायोगानं औरंगाबाद शहरांतील 13 रस्त्यांनी कामं त्यानंतर मार्गी लागली. मी प्रत्यक्ष आंदोलन केलं तो रस्ता अजून तसाच आहे. पण त्या चौकातले इतर तिनिही रस्ते सिमेंटचे झाले.
आज सहा वर्षांनंतर मी त्या सगळ्या घटनेकडे तटस्थपणे पाहतो तेंव्हा कळतं की हा आपल्यातला गांधी आपल्याला धीर देत होता. किंवा तोच आपल्याकडून हे करवून घेत होता.

प्रचंड तटबंदी असलेला मनावर दबाव आणणारा भव्य दरवाजाचा तो तुरूंग, दरवाजा नसणारे संडास, वापरायचे पाणी आणि प्यायचे पाणी यात काहीच फरक नसणे, एका लांबलचक सतरंजी शिवाय त्या प्रचंड मोठ्या हॉल मध्ये दुसरं काहीच नसणे, आयुष्याचे सर्व रंग उडून गेलेले ते भकास चेहरे, पोपडे उडालेल्या रंगहीन कळाहीन भिंती, त्या खिडक्यांचे भक्कम भितीदायक गज, पाहताच जरब निर्माण करणारी बराकी बाहेरच्या भव्य अंगणाची दगडी फरशी, पहाटे काहीच कारण नसताना पोलिसांनी एका तरूण पोराच्या पार्श्वभागावर रट्टा मारत हाणलेली गच्चाळ शिवी हे सगळं एरव्ही मला पचवणं मुश्किल होतं. मनातला गांधी प्रचंड ताकद पुरवत होता. म्हणून शांतपणे सोबत नेलेलं महाभारतावरचं पुस्तक वाचत पडून राहता आलं. (आंदोलन आणि तुरूंगावारीवर सविस्तर कांदबरी लिहायची आहे.)

आज बरोब्बर सहा वर्षांनी गांधींच्या 150 व्या जयंती निमित्त सुताचा धागा बांधण्यासाठी हे सगळं आठवलं. निर्णय पक्का झाला. आपण पात्र असल्याची खात्री मनोमन पटली. आंघोळ करून स्वच्छ कपडे घालून अंगणात आलो. पावसाळी हवा जावून स्वच्छ उन पडलं होतं. गांधी बर्‍यापैकी समजून घेतलेल्या वकिली शिकणार्‍या छोट्या मुलाला सांगितलं हाताला धागा बांधायला. आपला बाप असं काहीतरी उटपटांग करत असतो हे त्याला जन्मापासून माहित असल्या कारणाने त्याने उत्साहाने झटपट धागा बांधून दिला.

सर्वोदय भवनात जावून ‘वैष्णव जन तो तेणे कहीऐ’ हे भजन ऐकलं. समाधान वाटलं.

गांधी आश्रम, स्मारकं,  खादी, गोपालन अशा कितीतरी गोष्टी आज कळकट होवून गेल्या आहेत. बर्‍याच ठिकाणचे गांधींचे पुतळे पण कळाहीन आहेत. अप्रतिम शिल्प सौंदर्य असलेले गांधी पुतळे फार थोडेच आढळतील. बाह्य जगातील इतर उपचारांपेक्षा आपण आपल्या मनात गांधी जपणं हेच जास्त महत्त्वाचं. त्याचीच खुण म्हणून हा पांढरा धागा मनगटाला. 
   
        श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575