राज कपुर म्हटलं की चार्ली चॅपलीनच्या भारतीय अवतारात रस्त्यावरून मुकेशच्या आवाजात ‘आवारा हू’, ‘मेरा जुता है जपानी’, ‘छलिया मेरा नाम’, ‘दिल जो भी कहेगा मानेंगे’ असलं काहीतरी गात चाललेला सामान्य माणुस हीच प्रतिमा समोर येते. कारण म्हणजे अशीच प्रतिमा स्वत: राज कपुर, तेंव्हाची प्रसिद्धी माध्यमं यांनी तयार केली. आणि रसिकांनी याच प्रतिमेवर भरभरून प्रेम केलं. पण राज कपुर अगदी सुरवातीच्या काळापासून मुकेश-मन्ना डेच्या आवाजाशिवाय पडद्यावर गात होता.
2 जून ही राज कपुरची पुण्यतिथी. (जन्म 14 डिसेंबर 1924, मृत्यू 2 जून 1988) त्याची मुकेश-मन्ना शिवायची वेगळी गाणी सहजच डोळ्यासमोर आली.
'अंदाज' (1949) या मेहबुब खानच्या चित्रपटाने राज कपुरला पहिल्यांदा बॉक्स ऑफिसवर प्रचंड यश मिळवून दिले. या चित्रपटात मुकेशचा आवाज नौशाद यांनी वापरला होता दिलीप कुमार साठी. यात राजसाठी एकमेव गाणे होते आणि तेही मोहम्मद रफीच्या आवाजात ‘यु तो आपस मे बिगडते है’. राज कपुरचा स्वत:च्या निर्मिती दिग्दर्शनातला पहिला हिट चित्रपटत बरसात आला तो या नंतर. त्यात मुकेशचा आवाज त्याच्यासाठी पडद्यावर उमटला होता.
राज कपुर-नर्गिस ही जोडी यशस्वी ठरते आहे हे बघुन कित्येक निर्मात्यांनी त्यांना घेवून चित्रपट काढले. या हिट जोडीच्या 16 चित्रपटांपैकी केवळ 6 चित्रपट आर.के. स्टुडियोचे होते. तर 10 बाहेरच्या निर्मात्यांचे होते. ‘जान पेहचान’ (1950) हा असाच बाहेरचा चित्रपट. खेमचंद प्रकाश यांनी एक सुंदर द्वंद गीत राज-नर्गिस जोडीवर दिलेलं आहे. शकिल बदायुनी यांनी हे गाणं लिहीताना एक ओळ अशी लिहीली आहे की त्यामुळे राज-नर्गिस या प्रेमकथेला हवा मिळाली.‘आरमान भरी दिल की लगन तेरे लिये है’ हे गाणे तलत मेहमुद-गीता दत्तच्या आवाजात आहे. नर्गिसच्या तोंडी शब्द आहेत ‘क्यू प्यार की दुनिया मे ना हो ‘राज’ हमारा’ तर त्याला राज उत्तर देतो, ‘है दिल को तेरी ‘नर्गिसी’ आंखो का सहारा.’ खरं तर केवळ या ओळीसाठी पुढे शकिलला राज कपुरनं आपल्या चित्रपटात संधी द्यायला हवी होती पण ते घडलं नाही.
सी. रामचंद्र त्या काळात अतिशय गाजलेले संगीतकार. त्यांच्या बर्याच गाण्यांत ते स्वत:चाच आवाज वापरायचे. ‘सरगम’ (1950) या चित्रपटात ‘वो हमसे चुप है, हम उनसे चुप है, मनानेवाले मना रहे’ हे गाजलेलं गाणं राज-रेहाना सुलतान यांच्यावर आहे. गाण्याची चाल अतिशय गोड पण बोल मात्र सामान्य आहेत.
'दास्तान' (1950) या राज कपूर सुरैय्या च्या चित्रपटात रफी सुरैय्या च्या आवाजात एक त्या काळात न शोभणारे गाणे नौशाद यांनी दिले आहे. 'तारा री तारा री' असे बोल असलेले पाश्च्यात्य ठेक्यातील फार गोड गाणे आहे. नौशाद यांचे हे वैशिष्टय की त्यांनी ज्या वेळी पाश्चिमात्य वाद्य वापरून स्वरमेळ वापरून जे संगीत निर्माण केले ते मात्र भारतीय होते. इथेही रफी ने आपला आवाज अतिशय वेगळा लावला आहे.
'दास्तान' (1950) या राज कपूर सुरैय्या च्या चित्रपटात रफी सुरैय्या च्या आवाजात एक त्या काळात न शोभणारे गाणे नौशाद यांनी दिले आहे. 'तारा री तारा री' असे बोल असलेले पाश्च्यात्य ठेक्यातील फार गोड गाणे आहे. नौशाद यांचे हे वैशिष्टय की त्यांनी ज्या वेळी पाश्चिमात्य वाद्य वापरून स्वरमेळ वापरून जे संगीत निर्माण केले ते मात्र भारतीय होते. इथेही रफी ने आपला आवाज अतिशय वेगळा लावला आहे.
किशोर कुमारने राज कपुरसाठी केवळ एकाच चित्रपटात आवाज दिला. एस.डी.बर्मन यांनी 1950 मध्ये ‘प्यार’ नावाच्या चित्रपटात ही किमया घडवून आणली. शैलेंद्रचे अतिशय साधे वाटणारे शब्द,
एक हम और दुसरे तूम
तिसरा कोई नही
यू कहो हम एक है और
दुसरा कोई नही
किशोर आणि गीता दत्त यांच्या आवाजात असे काही खुलले आहेत की राज-नर्गिस जोडीसाठी हाच आवाज चालला असता असंही मनोमन वाटत रहातं. याच चित्रपटात ‘कच्ची पक्की सडकों पे मेरी टमटम’ असं किशोरचं घोडागाडीवरचं मस्तीखोर गाणं आहे. या चित्रपटाचं वैशिष्ट्य म्हणजे एक गायक म्हणून नायकासाठी सगळी गाणी गायची संधी (पाच गाणी) किशोर कुमारला पहिल्यांदाच मिळाली. म्हणजे किशोरला खरा ब्रेक एस.डी.बर्मनने राज कपुरच्या तोंडी दिला असंच म्हणावं लागेल. पण पुढे चुकुनही किशोरचा आवाज राज कपुरसाठी वापरला गेला नाही.
रोशनच्या ‘अनहोनी’ (1953) मध्ये राज-नर्गिस साठी लता-तलत ही जोडी वापरली होती. टेलिफोनचे गाणे चित्रपटात त्या काळात गाजायचे. या चित्रपटात रोशनने तलत-लताचा हळूवार आवाज वापरत ‘मेरे दिल की धडकन क्या बोले’ हे मधुर गाणे दिले आहे. शैलेंद्रचे साधे शब्द यात फार चपखल बसले आहेत. ‘समा के दिल मे हमारे’ हे तलत-लताचे गाणेही अतिशय गोड आहे.
मदन मोहन हा अतिशय मधुर चाली बांधणारा, कमी वाद्य वापरणारा संगीतकार. त्याची रास राज कपुरशी जुळणे तसे कठीणच. शंकर जयकिशनच्या वाद्यांच्या प्रचंड गोंगाटात आणि मुकेशच्या जाडसर आवाजात शेाभणारा राज कपुर जेंव्हा मदन मोहनच्या सुरावटीत ‘आशियाना ’ (1952) मध्ये तलतच्या आवाजात गातो
मै पागल मेरा मनवा पागल,
पागल मेरी प्रीत रे
पागलपन की पीड वो जाने
बिछडे जिसका मीत रे
तेंव्हा आपला आपल्या कानांवर विश्वासच बसत नाही. संगीतातला हा हळवा राजकपुर फार दुर्मिळ आहे. त्याची आर्त गाणी मुकेशच्या आवाजात पुढे आली पण त्यांच्या मागे शंकर जयकिशनचे गोंगाटी संगीतही येऊन कानावर आदळते.मदन मोहनचाच दुसरा चित्रपट धून (1953). त्यात हेमंत-लताच्या आवाजात ‘हम प्यार करेंगे’ हे एक श्रवणीय गाणे राज-नर्गिसवर आहे.
सुप्रसिद्ध तबलावादक अल्लारखां यांनी काही मोजक्या चित्रपटांना संगीत दिलं आहे. त्यात बेवफा (1952) हा राज कपुरचा चित्रपटही आहे. राज-नर्गिस या हिट जोडीच्या या चित्रपटात तलतच्या आवाजात ‘दिल मतवाला लाख संभाला’ हे गोड गाणे आहे.
एस.मोहिंदर हा फारसा परिचित नसलेला संगीतकार. ‘पापी’(1953) या राज-नर्गिसच्या चित्रपटाला त्याचे संगीत आहे. बांगड्या विकणार्या राज कपुरच्या तोंडी रफीचे एक फार वेगळे खट्याळ गाणे आहे. ‘ले ले गोरी पेहन ले छोरी. गोरी गोरी कलायी मे काली चुडिया’ असे हे गाणे. यात या बांगड्या घालून तू कशी ‘नर्गिस, मीना कुमारी, गीताबाली’ सारखी दिसशील असं मजेशीर वर्णन आलेलं आहे.
संगीत ओ.पी.नय्यरचे आहे, गायला आशा-रफी ही ओपीची हिट जोडी आहे, मधुबाला सारखी नटखट नायिका आहे फक्त बदल आहे तो नायकाबाबत. कोणी कल्पनाच करू शकणार नाही अशा या चित्रपटाचा नायक आहे राज कपुर. ‘दो उस्ताद’ (1959) या चित्रपटात ‘नजरोंके तीर मारे कस कस कस, एक नही दोन नही आठ नऊ दस’ असे खास ओ.पी.स्टाईल गाणे आहे. जॉनी वॉकरवर शोभणारे हे गाणे आहे मात्र राज-मधुबाला वर.
'नजराना' (१९६१) चित्रपट रवी च्या संगीताने नटलेला राजेंद्रकृष्ण यांचे शब्द घेऊन पडद्यावर आला होता. राज कपूर सोबत यात होती वैजयंतीमाला. रफीच्या आवाजात एकच गाणे ह्यात राज कपूर साठी होते "बाजी किसीने प्यार कि जिती या हार दी". बिनाकात हिट ठरलेली ही गझल आजही रेडिओ वर नेहमी लागते. (मुकेश- लता चे प्रसिद्ध गाणे 'बिखरा के झुल्फे चमन मे ना आना' ह्यातच आहे.)
'नजराना' (१९६१) चित्रपट रवी च्या संगीताने नटलेला राजेंद्रकृष्ण यांचे शब्द घेऊन पडद्यावर आला होता. राज कपूर सोबत यात होती वैजयंतीमाला. रफीच्या आवाजात एकच गाणे ह्यात राज कपूर साठी होते "बाजी किसीने प्यार कि जिती या हार दी". बिनाकात हिट ठरलेली ही गझल आजही रेडिओ वर नेहमी लागते. (मुकेश- लता चे प्रसिद्ध गाणे 'बिखरा के झुल्फे चमन मे ना आना' ह्यातच आहे.)
कल्याणजी आनंदजींनी ‘छलिया’ मध्ये एका गाण्यासाठी मुकेशचा आवाज चढू शकत नाही म्हणून राजसाठी रफीचा वापर केला आहे. ‘नजराना’ मध्येही रवीने इतर गाण्यात मुकेश वापरताना ‘बाजी किसी ने प्यार की जीती या हार दी’ या एका गाण्यात मात्र राजसाठी रफीचा वापर केला होता. ज्याने मुकेशचा आवाज राजसाठी कायम वापरला त्या शंकर जयकिशननेच आपल्या चित्रपटात रफीचा आवाज राजसाठी वापरला. ही जादू घडली ‘एक दिल सौ अफसाने’ (1963) मध्ये. राज-वहिदावरचे हे गाणेही मोठे गोड आहे. ‘तूम ही तूम हो मेरे जीवन मे, फुल ही फुल है जैसे जीवन मे’
राज कपुरने आपल्या कारकीर्दीत मुकेश-मन्ना डे च्या शिवायही इतर गायकांचा वापर केला हे विसरल्या जाते. स्वत: राज कपुरची गाण्याची समज अतिशय उत्तम होती. त्याला विविध गायकांच्या आवाजाची जातकुळी चांगलीच समजत होती. त्याला स्वत:ला मात्र मुकेश हाच आपला आवाज आहे असं वाटत होतं हे अगदी खरं. मुकेश गेल्यावर त्याला श्रद्धांजली वाहताना ‘आज मेरी आवाज ही चली गयी’ हे त्याचे वाक्य याचीच साक्ष देते.
श्रीकांत अनंत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575.
Dear Shrikant
ReplyDeleteWhile writing a very good article, I feel that you have placed Shankar Jaikishan on wrong footing. While addmitting that their musical score was loud, it must be said that this is not totally true. They have melodious music to their credit in lot of songs. Moreover, their mastery over variety of musical instruments and keen eye in their appropriate use is incomparable. No doubt,in their fading years, they lost the place due to loud music, but their overall contribution was certainly unique. I am immense admirer of this duo and hence this post. Of course, I do not underrate the other maestros as well.
शंंकर जयकिशन हा फार मोठा आणि मत्वाचाच संंगीतकार आहे.. मी हिंंदी सिनेमाच्या गाण्यांंवर अभ्यास करतोय त्यात golden era ची सुरवातच शंंकर जयकिशच्या "बरसात" पासून झाली असंं प्रतिपादन केले आहे.. शंंकर जयकिशन यांंनी वाद्यांंचा अतिरेकी वापर केला इतकाच आक्षेप काही वेळा केला जातो.. आणि तो खरा आहे.. golden era १९६६ ला राहूल देव बर्मनच्या "तिसरी मंंझील" पाशी संंपतो.. अशी माझी मांंडणी आहे.. बाकी शंंकर जयकिश प्रतिभावंंत संंगीतकार आहेच.. सगळ्यात प्रभावी आहे हे पण खरंंच आहे..
Deleteशंंकर जयकिशन हा फार मोठा आणि मत्वाचाच संंगीतकार आहे.. मी हिंंदी सिनेमाच्या गाण्यांंवर अभ्यास करतोय त्यात golden era ची सुरवातच शंंकर जयकिशच्या "बरसात" पासून झाली असंं प्रतिपादन केले आहे.. शंंकर जयकिशन यांंनी वाद्यांंचा अतिरेकी वापर केला इतकाच आक्षेप काही वेळा केला जातो.. आणि तो खरा आहे.. golden era १९६६ ला राहूल देव बर्मनच्या "तिसरी मंंझील" पाशी संंपतो.. अशी माझी मांंडणी आहे.. बाकी शंंकर जयकिश प्रतिभावंंत संंगीतकार आहेच.. सगळ्यात प्रभावी आहे हे पण खरंंच आहे..
Delete