Monday, June 13, 2016

कोण होता निजामाचा बाप?

उरूस, दै. पुण्यनगरी, 13 मे 2016


"सध्या देशात निजामाच्या बापाचे राज्य आहे"  असे उद्गार शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी काढले. संजय राऊत यांचा इतिहासाचा अभ्यास किती आहे माहित नाही पण मराठवाड्याचा आणि त्यातही हैदराबाद संस्थानचा अभ्यास मात्र तोकडा असावा हे नक्की. निजामाचा बाप काढताना त्यांना जो अर्थ अपेक्षीत आहे त्याच्या नेमके उलट चित्र इतिहासातून समोर येतं. निजामाचा बापच कशाला त्याचे इतरही दादा परदादा यांची कारकिर्दी त्याच्यापेक्षा उदारमतवादी, विकासाभिमुख, प्रगल्भ असल्याचे पुरावे आहेत. अर्थात ही तुलना सातव्या निजामाशी आहे. इतर जगाशी नाही. 

दक्षिणेतील इस्लामी राजवटीबद्दल फार कमी माहिती महाराष्ट्राच्या इतर भागातील लोकांना आहे. दक्षिणेतील सगळ्यात पहिली इस्लामी राजवट कर्नाटकातील गुलबर्गा येथील हसन गंगु बहामनी याची. या राजवटीतील पाच सरदारांनी पुढे बंड करून आपआपले प्रदेश स्वतंत्र म्हणून घोषित केले. हैदराबादच्या गोवळकोंडा येथील कुतुबशाही, विदर्भातील एलिचपुरची इमादशाही, अहमदनगरची निजामशाही (ही निजामशाही अणि हैदराबादची निजामी राजवट विभीन्न आहेत. नेहमी यांच्याबाबत गल्लत केली जाते. शिवाय त्यांचा कालखंडही एक नाही.) विजापुरची आदिलशाही आणि बिदरची बरीदशाही. 

हैदराबादची (हैदराबाद असाच शब्द आहे. हैद्राबाद नाही. हैदर अलीने आबाद केलेले शहर म्हणून हैदराबाद,) कुतुबशाही मोगलांनी जिंकुन घेतली आणि आपला सरदार तिथे नेमला. मोगलांचा दख्खनचा सरदार मीर कमरूद्दीन याने पुढे मोगलांच्या अंतर्गत भांडणाचा फायदा घेवून 1724 मध्ये आपली स्वतंत्र राजवट घोषित केली. या मीर कमरूद्दीन यांस ‘निजाम उल मुल्क’ अशी पदवी होती. म्हणजे मुख्य दिवाण (मराठीत पेशवा). हीच पदवी पुढे त्याच्या वंशजांशी लावायला सुरवात केली. म्हणून या घराण्याच्या गादीवर बसलेल्या सर्वांना निजाम म्हणतात. खरे तर या घराण्याची पदवी ‘असफजाह’ ही होती. म्हणजे ही असफजाही घराण्याची राजवट असे म्हणायला हवे. 

या असफजाही घराण्याने 1724 ते 1948 अशी जवळपास सव्वादोनशे वर्षे राज्य केले. महाराष्ट्राचा मराठवाडा हा मराठीभाषिक भाग या राजवटीचा भाग होता. संजय राऊत ज्याला निजामाचा बाप म्हणतात तो म्हणजे सहावा निजाम. त्याचे नाव निजाम मीर मेहबुब अली पाशा. याची कारकिर्द सर्वात मोठी म्हणजे 42 वर्षे ( 1869-1911)टिकली. 

या निजामाच्या बापाचे म्हणजेच सहावे निजाम मेहबुब अली पाशा यांचे जोहरा बेगम नावाच्या मुळ हिंदू असलेल्या सरदार घराण्यातील स्त्रीवर प्रेम होते. तिच्यापासून त्यांना जो मुलगा झाला तोच हा सातवा निजाम मीर उस्मान अली पाशा. (जन्म 6 एप्रिल 1885) हा औरस पुत्र नसल्याने वारसाचा प्रश्न निर्माण झाला. पुढे मेहबुब अली पाशा यांनी राजघराण्यातील स्त्रीयांशी निकाह लावले. त्यांच्या पासून त्याला मुलंही झाली. पण अनौरस असलेला उस्मानअली याने कटकारस्थान करून गादी बळकावली. पुढे आयुष्यभर हा निजाम औरसपुत्र नसल्या कारणाने निजामाच्या कुटूंबात एकाकी पडला. त्याचे फक्त त्याच्या आईशी जिव्हाळ्याचे संबंध होते. ती गेल्यानंतर तीच्या मजारीपाशी तो नियमित जावून बसत असे.  

सहावा निजामाच्या काळात उर्दूला राजभाषा म्हणून स्थान देण्यात आले. फारसीच्या जागी उर्दूची स्थापना करणे म्हणजे त्या काळात एक पाऊल पुढे असेच म्हणायला हवे. 

1879 मध्ये रँडचा खुन करणारे क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके हैदराबाद संस्थानच्या सरहद्दीवर गाणगापुर येथे आश्रयाला आले होते. त्यांचे सहकारी बाळकुष्ण हरी चाफेकर याच संस्थानातील रायचुर येथे राहिले. ते आजारी पडले तेंव्हा त्यांना देण्यासाठी लोकमान्य टिळकांनी काही रक्कम हैदराबादचे समाजसुधारक न्यायमुर्ती केशवराव कोरटकर यांच्याकडे पोचविली. त्यांनी ती चाफेकरांना दिली. सहाव्या निजामच्या काहीशा उदारमतवादी धोरणामुळे इंग्रजांविरूद्ध हालचाली करण्याच्या शक्यता संस्थानात निर्माण झाल्या होत्या.

बीड जिल्ह्यात धारूरमध्ये आर्यसमाजाची स्थापना (1891), टिळकांनी सुरू केलेला सार्वजनिक गणेशोत्सव हैदराबाद मध्ये (1895), हैदराबादमध्ये विवेक वर्धिनी मराठी शाळा (1907), गुलबर्ग्यात नुतन विद्यालय (1908) अशा काही प्रमुख घटना याच निजामाच्या कारकिर्दीत घडल्या.  

प्रसिद्ध शास्त्रीय गायक पंडित जसराज यांचे वडिल पंडित मोतीराम यांना सहाव्या निजामाने आश्रय दिला होता. ते दरबारी गायक म्हणून हैदराबाद येथे वास्तव्यास होते. 

हा सहावा निजाम कलासक्त होता याचा एक नमुनेदार पुरावा म्हणजे हैदराबादचा ‘फलकनुमा पॅलेस’ (फलकनुमाचा अर्थ आभाळाचा आरसा). या निजामाचे एक सरदार आणि पाचव्या निजामाचे दामाद नवाब विकार उल उमरा यांनी त्या काळी 40 लाख खर्चून 9 वर्षे कालावधीत ही सुंदर वास्तु उभारली. अर्थात हा पांढरा हत्ती पोसणे शक्य नाही हे त्याला उमगून चुकले. एकदा त्याने सहावे निजाम मेहबुब अली यांना आपल्याकडे दावत देण्यासाठी बोलाविले. या नव्या कोर्‍या अलिशान महालाची प्रशंसा करत मेहबुब अली पाशा यांनी आपला मुक्काम वाढवत नेला. त्याचा योग्य तो अर्थ काढून नवाब विकार उल उमरा यांनी काढता पाय घेतला. आणि हा पॅलेस निजामाला ‘नजर’ केला. अर्थात निजामांनी उदार होऊन काही रक्कम टप्प्या टप्प्याने देवू केली असं म्हणतात. पण काहीही असो हा शाही पॅलेस मेहबुब अली यांच्या ताब्यात आला. हे सहावे निजाम एरव्ही रहायचे ते घराण्याच्या पारंपारिक राजेशाही ‘चौमहल्ला’ पॅलेसमध्ये. शिवाय इतरही दोन महाल होतेच. आणि दरबार भरवायचे चौथ्या महालात.  सातव्या निजामासारखे भिकारड्या किंग कोठी इमारतीत सहाव्या निजामाने आयुष्य नाही काढले.  त्याही अर्थाने ते सातव्या निजामाहून वेगळे ठरले.  

पहिला निजाम मीर कमरूद्दीन याच्यासोबत काही हिंदू कायस्थ कुटूंब हैदराबादला आली. दिवाणाच्या खालोखाल महत्त्वाचे असलेले पेशकार पद या राजा चंदूलाल, राजा नरेशप्रशाद आणि महाराजा किशनप्रशाद यांना वंशपरंपरेने मिळाले. महाराजा किशनप्रशाद हे सहाव्या निजामाचे अगदी लहानपणापासूनचे सवंगडी. त्याचा अतोनात विश्वास त्यांनी संपादन केला. मेहबुब अलीच्या निधनापर्यंत त्यांचे पंतप्रधान म्हणून महाराजा किशन प्रशाद यांनी काम बघितले. महाराजा किशनप्रशाद यांची सहाव्या निजाम मेहबुब अली पाशा यांच्यावर इतकी निष्ठा होती की त्यांनी आपल्या एका मुलाचे नावच मेहबुबप्रशाद ठेवले होते. मराठवाड्यातील परतुर ही त्यांची खासगी जहागीर होती. मेहबुब अली पाशा याच्या निधनानंतर मीर उस्सानअलीने याच किशनप्रशाद यांना हाताशी धरून गादी पटकावली. आणि पहिलं काम काय केलं तर याच किशनप्रशाद यांना पदावरून हटवले. 

याच निजामाच्या काळात किशनराव औरंगाबादकर नावाच्या हिंदू माणसाने ‘मुशीर-ए-दक्कन’ नावाचे उर्दू दैनिक 1890 मध्ये चालू केले. ते जवळपास 1973 पर्यंत चालू होते. ‘निजाम विजय’ नावाचे दैनिकही याच निजामाच्या कारकिर्दीत एकोणिसाव्या शतकाच्या सुरवातीला सुरू झाले. 

मराठवाड्यासाठी ‘काचीगुडा-मनमाड’ रेल्वे हा फार जिव्हाळ्याचा विषय असतो. हा रेल्वेमार्ग 1900 मध्ये ‘गोदावरी व्हॅली रेल्वे’ नावाने याच निजामाने सुरू केला. हैदराबादचा प्रसिद्ध तलाव ‘हुसेन सागर’ 1875, इंजिनिअरिंग स्कूल 1870, निजाम कॉलेज 1887 अशा कितीतरी बाबी सहाव्या निजामच्या नावावर आहेत. मरावाड्यातील पहिले वाचनालय 1901 मध्ये लोकमान्य टिळकांच्या प्रेरणेने परभणीला सुरू झाले तेही याच निजामाच्या कालखंडात.

शिवसेना उपनेते संजय राऊत यांना कुठल्या अर्थाने ’निजामाचा बाप’ काढायचा होता तेच जाणो. पण निजामाचा बाप निजामासारखा नव्हता हे मात्र खरे. 

(ह्या लेखासाठी संदर्भ म्हणून अनंत भालेराव लिखित "हैदराबादचा मुक्ती संग्राम आणि मराठवाडा"  आणि धनंजय कुलकर्णी लिखित "हैदराबादची चित्तरकथा " ह्या दोन पुस्तकांचा वापर केला आहे. दोन्हीचे प्रकाशक मौज प्रकाशन मुंबई.)
  
श्रीकांत अनंत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575.

6 comments:

  1. मत- मतांतरे असू शकतील.. पण श्रीकांतजी आपल्या लेखणीला सलाम.

    ReplyDelete
  2. इतिहास न जाणता इतिहास तोंडी लावणरांची तोंडे पाहण्यासारखी झाली असतील।

    ReplyDelete
  3. धन्यवाद अुमरीकर साहेब, माझे वडिल, चुलते हेच सांगत असत

    ReplyDelete
  4. धन्यवाद अुमरीकर साहेब, माझे वडिल, चुलते हेच सांगत असत

    ReplyDelete
  5. धन्यवाद श्रीकांत!!! माझे वडिल अजूनही मला हेच सांगत असतात

    ReplyDelete
  6. खुपच छान लेख हा ईतिहास प्रथमच वाचणात आला.

    ReplyDelete