Tuesday, January 14, 2014

कडूबाईने कडू केली दारूवाल्यांची तोंडे

दै. पुण्यनगरी, उरूस, मंगळवार 14 जानेवारी 2014


कोण ही कडूबाई? औरंगाबाद नाशिक जून्या रस्त्यावर कसाबखेड्याच्या पुढे पिंपळगांव दिवशी म्हणून गाव आहे (गंगापुर तालूका). त्या गावातील ही एक दलित विधवा. या गावात एका शेतकरी मेळाव्यासाठी महेश गुजर पाटील यांच्या सह्याद्री युवा प्रतिष्ठानने मला बोलावले होते. कार्यक्रमात बोलायचे जे ठरले होते ते राहिले बाजूला. सत्कार हार शाली नारळ सगळं राहिलं बाजूला. महेश पाटील म्हणाले या महिलांची एक समस्या आहे ती समजून घेणार का? मी तातडीने होकार दिला. त्यांचे म्हणणे आम्ही ऐकू लागलो. कडूबाईने दारूच्या विषयाला तोंड फोडले. फुटाण्यासारखी ही बाई ताड ताड बोलत राहिली. ऐकणारे सगळे आवाक. त्या गावात अवैध दारूचे दुकान आहे. त्याचा त्रास सगळ्यांनाच होत होता. या विरूद्ध आवाज कोण उठवणार? हाच कळीचा प्रश्न होता.  ‘‘सांगा भाऊ काय करायचे? आम्ही गरीबानं कसं जगायचं?’’ या तिच्या प्रश्नावर कोणालाच काय बोलावे ते कळेना. मी म्हणालो तूम्हीच सांगा मावशी काय करायचे ते. ती म्हणाली ‘‘आत्ता तूम्ही सगळे चला आपण दारू विकणारीला समजावून सांगू.’’
खरं तर अशावेळी आलेला पाहूणा काहीतरी कारणे सांगून चालढकल करतो. आपले भाषण पूर्ण करतो. शाली श्रीफळ मानधनाचे पाकिट (मिळणार असेल तर) स्वीकारून आपल्या गावी सटकतो. पण मी पडलो चळवळीतला कार्यकर्ता. मी लागलीच सारं बाजूला सारून तिच्यासोबत उठलो. तूम्ही पुढं व्हा मी गावातून बायका घेवून येते म्हणून कडूबाई निघाली. तिच्या सोबत इतरही बायका उठल्या आणि मोठ्या उत्साहाने आता काहीतरी होवू शकेल या आशेने निघाल्या.
बघता बघता त्या दारूच्या दुकानासमोर पन्नास एक महिला आणि जवळपास शंभर पुरूष, तरूण पोरं गोळा झाले. कडूबाईने तिला दुकान बंद कर म्हणून समजावून सांगितले. सगळा गाव गोळा झाला तरी दारू विकणारी बाई मात्र ताठ होती. ती गावापुढे वाकायला तयार नव्हती. तीच कडूबाईला म्हणाली, ‘‘अगं खुशाल जा पोलिसाकडे. मीच तूला भाड्याचे पैसे देते. माझ्या कडून हप्ते घेणारे काय तूझी कंप्लेन ल्येहून घेत्येत. मी बघतेच...जाय तू खुशाल जाय..’’ कडूबाई भडकली. तिच्यासोबतच्या बायका दुकानात शिरल्या. बायकांनी सगळ्या दारूच्या बाटल्या ताब्यात घेतल्या. आम्ही बायकांच्या मागेच उभे होतो. माझ्याकडे वळून कडूबाई म्हणाली, ‘‘सांगा भाऊ आता काय करायचे?’’
मी म्हटलं ‘‘आता आपण इथेच रस्त्यावर बसून राहू. पोलिस येतील आणि जी काही कारवाई करायची ती करतील. तोपर्यंत आपण हा रस्ता आडवू.’’ आणि बघता बघता वातावरण आंदोलनाचे बनले. सगळ्या बायका दारूच्या बाटल्या घेवून रस्त्यावर बसल्या. मी सोबतच्या मंगेश पाटील या पाहूण्यासोबत आणि गावच्या तरूण पोरांसोबत बायकांच्या पाठीशी रस्त्यावर बसलो.
तासाभरात रस्त्यावर वाहनांची रांग लागली. आपोआपच रस्ता रोको झाला. पोलिस लगेच धावत पळत आले. पोलिसांना वाटले काही तरी पक्षाचे संघटनेचे लोकं आहेत. ते शहरातून आले आणि गावच्या लोकांना त्यांनी भडकावले व रस्ता रोको आंदोलन घडले. पण पोलिसांचे आकलन चुक होते. आंदोलन गावच्या महिलांमधून अचानकपणे उभे राहिले होते. आम्ही फक्त त्याला दिशा दिली. आणि प्रत्यक्ष रस्त्यावर उतरण्याची कृती केली.
दारूच्या दुकानाविरूद्ध पोलिसांना जनरेट्यामुळे कारवाई करावी लागली. हा तूमचा मार्ग चुक आहे. रस्त्यावरून उठा. कायदा हातात घेवू नका असे पोलिस इन्स्पेक्टर सांगत होते. त्यांना वाटले हे शर्ट पँटवाले इनवाले शहरी लोक म्हणजे नेते असणार तेंव्हा ते आम्हालाच बोलायला लागले. मी त्यांना सांगितलं साहेब तूम्ही हे सगळं या बायकांना सांगा. आंदोलन त्यांचे आहे. आम्ही फक्त भाऊ म्हणून त्यांच्या पाठिशी आहोत. कायदा हातात घेवू नका असे पोलिस बायकांना सांगताच बायका भडकल्या.
कडूबाई पोलिसांना म्हणाल्या, ‘‘साहेब ही बाई ढवळ्या दिवसा दारू विकून राहिली. हीच्या दुकानाला लायसेन बी नाय. तीला तूमी काही बोलना झाले. आनी आमाला कायद्याचं शानपन कामून शिकविता? आगूदर तिला बंदी घाला. आन् आज नाय तर कवाच हीतं दारू विकली जानार नाय असं कागदावर लिवून द्या. मग आमी उठतो.’’
पोलिसांना लक्षात आलं की हे प्रकरण वाटतं तितकं सोपं नाही. जनता खरंच भडकली आहे. तरी सरकार म्हणजे इतकी सोपी गोष्ट नसते. त्यांनी त्यांचे डोके लावून आम्हा दोघा तिघांना त्यांच्या दृष्टीनं नेते वाटणार्‍यांना 20 कि.मी. अंतरावरील लासूरच्या पोलिस स्टेशनला बोलावले. आम्ही तिकडे गेलो की इकडे पोलिस इन्स्पेक्टर गावात शिरले. त्यांना जाणून घ्यायचे असावे की हे आंदोलन काय आहे. कोणी भडकावले. इकडे आम्हाला फुकटची वारी झाली. पोलिस स्टेशनला कोणीच नाही पाहून परत गावात आम्ही आलो. तोपर्यंत गावात बायकांनी पोलिसांना गराडा घालून अडकवून ठेवले होते.
आम्ही पोचताच बायकांना हायसे वाटले. आम्ही पोलिसांना समजावून सांगितले, ‘‘साहेब हा जनक्षोभ आहे. आम्हाला या बायकांची नावे माहित नाही. त्यांनाही आमची नावे माहित नाहीत. ही जी तूमची विचारसरणी असते की एखादा पक्ष संघटना चळवळ काहीतरी शहरात बसून ठरवते आणि मग गावात येवून आंदोलन उभं राहते. तसं काहीच नाही. आम्हाला इथे येईपर्यंत काहीच माहित नव्हते. बघता बघता हे आंदोलन उभं राहिलं आहे. लोकांना कायदा हातात घ्यायचा नाही. पण ज्यांनी घेतला त्यांच्यापर्यंत तूमचा हाता पोंचत नाही .’’ पोलिस इन्स्पेक्टरना ही सगळी परिस्थिती कळली असावी.
कडूबाई त्यांना म्हणाली,‘‘साहेब मी तर जयभीम हाय. पन दारू विकनारी तर मोठ्या घरची हाय ना. तीनं असं कामून करावं? माझा नवरा दारू प्यायचा मला मारायचा. तो मरून गेला. मी रांडमुंड बाईनं पोराला मोठं केलं. पोरगा दारू प्यायला लागला. सुनेला बडवायला लागला. सुन आता रॉकेल ओतून मरायची मला धमकी देती. असं कायी इपरित घडलं तर तूमीच मला बेड्या घालताल की नाय?’’ कडूबाईच्या प्रश्नावर पोलिसांपाशी काहीच उत्तर नव्हते. पोलिस सांगत होते,‘‘हे बघा काळजी करू नका. पुढं असं होणार नाही. काही घडलं तर आम्हाला सांगा. फोन करा.’’ पोलिसांना वाटलं आता हा विषय संपेल. पण बायका मोठ्या वस्ताद. अनुसया बाई आता पुढे सरसावल्या. त्या म्हणाल्या, ‘‘साहेब तूम्हाला संागितलं की तूमचा हवालदार येईन. त्यो तर कायी दारू बंद करनार नायी. पन उलटा हप्ता घेईन आनी वरून दारूबी पिउन जाईन.’’
दारूचे दुकान बंद झाले. पोलिसांनी कारवाई केली. आंदोलन संपले. गावातल्या बायकांना आम्ही त्यांच्या पाठीशी उभं राहिल्यामुळे मोठा हुरूप आला. पोलिसांना वाटले यात दलित सवर्ण असा काही रंग दिसतो का ते तपासावे. पण आश्चर्य म्हणजे दारू दुकानाविरूद्ध बोलणार्‍या दलित कडूबाईच्या पाठिशी गावातील सवर्ण तरूण आणि बायका मोठ्या प्रमाणात उतरल्या होत्या. 
थोडीशी चौकशी केल्यावर या सगळ्या प्रश्नाचा वेगळाच पैलू समोर येत गेला. महेश गुजर मला सांगत होते की गंगापुर साखर कारखाना चालू होता तेंव्हा या गावातील बर्‍याच जणांना रोजगार मिळाला होता. कारखाना सहकारी तेंव्हा तो का बंद पडला हे वेगळं सांगायची काही गरजच नाही. ज्याचे दारूचे दुकान होते त्याची कारखान्यातली नोकरी गेली. मग साहजिकच तो दारूच्य धंद्याकडे वळला. गावाकडे दारू पिणार्‍यांची जी संख्या वाढली त्यात या कारखान्याने बेरोजगार केलेल्या बर्‍याच लोकांचा समावेश आहे. आज ग्रामीण भागात भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतीचे पुरते शोषण केल्यामुळे रोजगार निर्मिती बंद पडली आहे. आणि दुसरे जे शहरी रोजगार आहेत त्यांची मर्यादा आता स्पष्ट झाली आहे. परिणामी गावोगावी बेकार तरूणांचे तांडे कोपर्‍या कोपर्‍यावर पडून आहेत. असा मोठा वर्ग दारू आणि मग इतर अवैध धंदे, अस्मितेचे राजकारण यांना बळी पडतो.
सकाळी गेलेलो आम्ही. परतायला आम्हाला संध्याकाळ झाली होती. दिवस मावळताना कडूबाईच्या डोळ्यात मात्र सुर्य उगवताना दिसला. काळीसावळी सुरकूतल्या चेहर्‍याची विधवा कडुबाई देवगिरी किल्ल्याच्या परिसरात राहणारी, तिला कल्पनाही नसेल पाचशे वर्षांपूर्वी नाथांनी याच ठिकाणी लिहीलं होतं, ‘दार उघउ बया दार उघड । नवखंड पृथ्वी तूझी चोळी । सप्त पाताळी पाउले गेली । एकवीस स्वर्गे मुकूटी झळाळी । दार उघड बया दार उघड ॥ प्रस्थापित व्यवस्थेला पुरूष लवकर शरण जातो पण बाई नाही हे नाथांना माहित होतं. म्हणूनच पुढे पंचवीस वर्षातच जिजाउने स्वराजाच्या धडा महाराजांकडून गिरवून घेतला. आताच्या काळात बाहेरच्या नाही तर आपल्यातच असलेल्या राक्षसांविरूद्ध लढण्यासाठी आता सामान्य स्त्री मधल्या महाकालीला जागे व्हावे लागणार आहे हे नाथांना कुठे माहित होते. पण कडुबाईला मात्र ते निश्चितच कळले आहे.  


            श्रीकांत अनंत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद. मो. 9422878575.

2 comments:

  1. Daru virodhi je koni kahi kartey tyala maza purn pathimba asto. Yu done a good job.
    \

    ReplyDelete
  2. This comment has been removed by the author.

    ReplyDelete