Tuesday, January 7, 2014

इंदिरा संतांच्या जन्मशताब्दीची दखलही नाही... !

दै. पुण्यनगरी, उरूस, मंगळवार 7 जानेवारी 2014

कवियत्री इंदिरा संत यांची जन्मशताब्दी 4 जानेवारील 2014 ला संपली. ‘माजघरातील मंद दिव्याची वात’ असं कुसूमाग्रजांच्या कवितेची ओळ घेवून ज्यांचं वर्णन करावं लागेल अशा या श्रेष्ठ कवियत्रीचा जन्म 4 जानेवारी 1914 ला झाला. (मृत्यू 13 जूलै 2000) इंदिराबाइंची जन्मशताब्दी (जानेवारी १३ ) सुरु झाली तेंव्हा  चिपळूणला साहित्य संमेलनाचे पडघम वाजत होते. इंदिरा संतांची दखल घ्यावी असं साहित्य महामंडळाच्या लोकांना तेंव्हा वाटलं नाही. साहजिक आहे कारण इंदिरा संत काही महाराष्ट्रात राहत नव्हत्या. त्या होत्या बेळगावला. एरव्ही बेळगावच्या नावाचं वारंवार गळा काढणं आम्हाला आवडतं. बेळगाव महाराष्ट्रात आला पाहिजे असं आजही घसा कोरडा करून आम्ही ओरडतो. प्रत्येक साहित्य संमेलनात तसा ठरावही केला जातो. पण याच बेळगावच्या प्रतिभावंत कवियत्रीची जन्मशताब्दी मात्र आम्ही विसरून गेलो. 
इंदिरा संतच काय पण बर्‍याच साहित्यीकांच्या जन्मशताब्दीला आम्ही विसरत चाललो आहोत. बी.रघुनाथ आणि त्या पाठोपाठ वा.रा.कांत यांची जन्मशताब्दीही नुकतीच संपून गेली. साहित्य संमेलनांत यांची कुणाला आठवण झाली नाही. बी.रघुनाथ तसे या तिघांत नशिबवान. त्यांचे स्मारक परभणीला उभारले गेले. तिथे दरवर्षी त्यांच्या नावाने साहित्य उत्सव भरतो.  परभणीची माणसे त्यांची आठवण जागी ठेवतात. पण ते भाग्य वा.रा.कांत आणि इंदिरा संत यांच्या वाट्याला नाही.
जुन्या कवींची नावे काढली की काही जणांच्या कपाळाला आठ्या चढतात. आता या जुन्यापान्या कवींची झेंगटं आमच्या गळ्यात कशाला असा तो भाव असतो. इंदिराबाईंची शरदातील दुपारचे वर्णन करणारी एक अतिशय सुंदर अशी कविता आहे. 

ही निळीपांढरी शरदांतील दुपार :
तापल्या दुधापरि ऊन हिचे हळुवार
दाटली साय की स्निग्ध शुभ्र आकाशी
फिरतात तशा या शुभ्र ढगांच्या राशी

त्या ऊन दुधाचे घुटके घेत खुशाल
सुस्तीत लोळतो खाली हिरवा माळ
अन् बसल्या तेथे गाई करित रवंथ
वारीत शेपट्या कोणी चरती संथ

आता ही कविता आजच्या काळात समजून घ्यायला, जवळची वाटायला काय अडचण आहे? आज गायी नाहीत का? आज दुधाचा वापर नविन मोबाईल इंटरनेटच्या जमान्यात होत नाही का? आजच्या फेसबुकच्या काळात निळा पांढरा हे रंग फेसबुकच्या पहिल्या पानावर जे दिसतात ते आभाळात दिसत नाहीत का?
सध्या साहित्य संमेलनाचे दिवस आहेत. बरोबर 20 वर्षांपूर्वी परभणीला साहित्य संमेलन भरलं होतं. त्या संमेलनासाठी इंदिरा संत यांनी उभं रहावं असा प्रस्ताव घेवून मी व इंद्रजित भालेराव इंदिरा संतांना भेटायला गेलो. कवियत्री ललित लेखिका वासंती मुझुमदार यांच्या दादर, शिवाजी पार्क मुंबई येथील घरी इंदिराबाई उतरल्या होत्या. ‘तूम्ही फक्त अर्जावर सही करा. बाकी आम्ही सगळं करतो. तूम्हाला निवडून आणतो.’ या आमच्या अग्रहाला इंदिराबाईंनी मुळीच भीक घातली नाही. जळगांव साहित्य संमेलनातला पराभव त्यांच्या जिव्हारी लागला होता.  त्यांनी शांत पण ठामपणे आपला नकार दिला. ‘तेवढा विषय सोडून काय बोलायचे ते बोला’ असं त्या म्हणाल्या. आम्ही काहीसे नाराज झालो. पण मग बघता बघता कवितेचा विषय निघाला. साहित्यीक विषय निघाले. त्यात संमेलनाचा विषय वाहून गेला. शुभ्र केस, पांढरे फिक्या-जांभळ्या फुलांचे पातळ, बारीक लुकलुकते डोळे, हळू बोलणे. वासंती मुझुमदारांच्या कलात्मक सजवलेल्या दिवाणखान्यात दिमाखदार सोफ्यावर बसलेल्या इंदिरा बाई स्वत:च एक कविता भासत होत्या.मी सोबतच्या ‘मृण्मयी’ या त्यांच्या निवडक कवितांच्या संग्रहावर त्यांची स्वाक्षरी घेतली. 18 फेब्रुवारी 1994 अशी त्यावर तारीख आहे. म्हणजे त्यांचे वय तेंव्हा 80 होते. सहस्रचंद्र त्यांनी आयुष्यात पाहिले होते. कष्टमय आयुष्य भोगलेल्या इंदिराबाईंनी आपली कविताविषक भूमिका साध्या शब्दांतून पण किती समर्पकपणे व्यक्त केली आहे 

रक्तामध्ये ओढ मातिची
मनात मातीचे ताजेपण
मातीतुनी मी आले वरती
मातीचे मम अधुरे जीवन

इंदिरा संतांबद्दल बर्‍याच जणांनी लिहून ठेवलं आहे. पण त्यांचं एक अतिशय सुंदर आणि मनोज्ञ चित्रण त्यांच्या मुलाच्या प्रकाश नारायण संत यांच्या लिखाणात उमटलं आहे. प्रकाश संतांच्या चारही कथा संग्रहातून लंपनची आई दुर्गा हीचे जे वर्णन आहे ते सर्व इंदिरा संत यांच्यावरच बेतलेले आहे. इंदिरा संत आणि त्यांच्या भगिनी ना.सी.फडके यांच्या पत्नी कमला फडके या दोघीच अपत्य त्यांच्या आईवडिलांना. मग इंदिरा बाईंच्या आईने आपलाच नातू इंदिरा संत यांचा मुलगा दत्तक घेतला. भालचंद्र दिक्षीत असं नाव या मुलाला मिळालं. पुढे चालून जेंव्हा त्यानं सुंदर असे कथा लेखन केले तेंव्हा परत आपले जुने नाव ‘प्रकाश नारायण संत’ धारण केले व लेखक आई वडिलांचे ऋण फेडले.
बोरी बाभळीची झाडे सर्वत्रच फोफावली असतात. पण त्यातले सौंदर्य कुणाला जाणवत नाही. इंदिराबाईंची बाभळीवरची एक सुंदर कविता पूर्वी अभ्याक्रमाला होती. बाभळीच्या झाडातही एक सौंदर्य असते हे त्यांच्या कवितेतूनच प्रथमच व्यक्त झाले.

लवलव हिरवी गार पालवी
काट्यांची वर मोहक जाळी
घमघम करती लोलक पिवळे
फांदी तर काळोखी काळी

कुसर कलाकृती अशी बाभळी
तिला न ठावी नागर रिती
दूर कुठेतरी बांधवरती
झुकून जराशी  उभी एकटी.

गावाबाहेर दूर उभं राहणार्‍या बाभळीचे सौंदर्य आणि उपेक्षा झाल्याची वेदना जशी इंदिरा बाईंनी ओळखली तशी अजून एका  मनाची वेदाना त्यांनी ओळखली. प्रेम म्हटलं की राधा-कृष्ण ही जोडी भारतीयांच्या मनात पहिल्यांदा येते. कुष्णाचीच दुसरी जोडी रूक्मिणीच्या सोबतची. ती तर आम्ही विठ्ठल-रूक्मिणी रूपात पूजतोही. उत्तर भारतात मीरेच्या कृष्णप्रेमाची मोठी महती गायली जाते. पण इंदिरा बाईंना जाणवलेले कृष्णासोबतचे हे प्रेम कुणाचे आहे?

अजून नाही जागी राधा
अजून नाही जागे गोकुळ
अशा अवेळी पैलतिरावर
आज घुमे का पावा मंजूळ

मावळतीवर चंद्र केशरी
पहाटवारा भवती भणभण
अर्ध्या पाण्यामध्ये उभी ती
तिथेच टाकुन अपुले तनमन

विश्वच अवघे ओठां लावुन
कुब्जा प्याली तो मुरलीरव
डोळ्यामधुनी थेंब सुखाचे
‘‘हे माझ्यास्तव... हे माझ्यास्तव....’’

कुब्जेचे प्रेम कुणाला समजले नव्हते ते इंदिराबाईंच्या कवीमनाने टिपले. आता या सगळ्या कवितां आज जुन्या वाटतात का? अशा रसरशीत, काळावर टिकणार्‍या कविता लिहीणार्‍या कवियत्रीची जन्मशताब्दी आम्ही विसरून जातो हे त्यांचे का आमचे दुर्दैव? संमेलनाच्या अध्यक्षीय भाषणात ‘‘सल असल्याशिवाय अस्सल कविता लिहीता येत नाही’’ हे म्हणणं सोपं आहे. पण प्रत्यक्षात अस्सल कविता लिहीणार्‍यांना आम्ही विसरतो ही सल कुणाला सांगायची फ.मु.शिंदे...बोला जरा...

 
            श्रीकांत अनंत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद. मो. 9422878575.

2 comments:

  1. श्याम देशपांडे मला एकदा म्हणाला होता कि नुसती टीका काय करतोस... चांगले साकारात्मक लिहून दाखव... मी ते मनावर घेतले... आणि आवर्जून आसे काही लेख आता लिहितो आहे.. खरे तर आधीही लिहीतच होतो.. पण श्याम ने ते वाचले नव्हते. आणि होते काय की टीका केली त्याची चर्चा होते पण इतर लिखाणाची होत नाही. म्हणून माझे आसे लिखाण बाजूला पडले. या माझ्या ब्लोग वर जुने लेख तुही कधी चालून बघ मी टिके व्यतिरिक्त मी खूप लिखाण केले आहे.

    ReplyDelete