Sunday, April 12, 2020

माझी माय सरसोती | माला शिकविते बोली ||



दै. दिव्य मराठी काव्य तरंग रविवार १२ एप्रिल २०२० 

माझी माय सरसोती | माला शिकविते बोली ||
लेक बहिनाच्या मनी |  किती गुपितं पेरली ||

माझ्यासाठी पांडुरंगा | तुझं गीता भागवत ||
पावसात सामावतं |  माटीमधी उगवतं ||

अरे देवाचं दर्सन | झालं झालं आपसुक ||
हिरिदात सूर्यबापा | दाये अरूपाचं रूप ||

तुझ्या पायाची चाहूल | लागे पानापानांमधी ||
देवा तुझं येनं जानं | वारा सांगे कानामधी ||

फुलामधी सामावला | धरत्रीचा परिमय ||
माझ्या नाकाले इचारा | नथनीले त्याचं काय? ||

किती रंगवशी रंग | रंग भरले डोयात ||
माझ्यासाठी शिरिरंग | रंग खेये आभायात ||

धर्तीमधल्या रसानं | जीभ माझी सवादते ||
तव्हा तोंडातली चव |  पिंडामधी ठाव घेते ||

-बहिणाबाई चौधरीे
(पृ. 113, बहिणाईची गाणी, सुचित्रा प्रकाशन, 16 वी आवृत्ती)

अनाम बायाबापड्यांच्या जात्यावरच्या ओव्यांनी मराठी कविता संपन्न केली आहे. इंद्रजीत भालेराव यांनी या जात्यावरच्या ओव्यांबाबत असं लिहीलं आहे
... अशा पुरूषांपासूनच इतिहासात
कवितेला कायम भीती होती
म्हणून सातशे वर्ष कविता फक्त
जात्याभोवतीच जीती होती

संत जनाबाईंपासून ठळकपणे मराठी कवितेची परंपरा दाखवता येते (महदंबेचे धबळे त्याआधी आहेत.) या जनाबाईच्या रचना म्हणजे जात्यावरच्या ओव्यांचंच एक रूप आहे. आधुनिक काळात याच परंपरेतील कवयत्री म्हणजे बहिणाबाई चौधरी. तुकारामांच्या शिष्या संत बहिणाबाई या वेगळ्या. काही जणांना हा गैरसमज होतो की या दोन्ही बहिणाबाई एकच आहेत की काय.

जात्यावर बसल्यावर ओवी सुचत जाते असा बापा बापड्यांचा अनुभव आहे. बहिणाबाईंची कविता तर त्याचा जिता जागता पुरावाच आहे.

जात्या इसवरा तू रे कोन्या डोंगराचा ऋषी
माईवानी उकलीते काळीज हे तूझ्यापाशी

अशी एक गोदावरी नदीच्या काठी गंगाखेड परिसरात जात्यावरची ओवीच आहे.

बहिणाबाईंनी आपल्या या कवितेत आपल्या काव्यनिर्मितीचं रहस्य अतियश सोपं करून उलगडून दाखवलं आहे. सरस्वती असा शब्दही जिला नीट उच्चारता येत नाही ती आपल्या प्रतिभेनं कवितेचं महावस्त्र विणत जाते या मागे ही माय ‘सरसोती’च कशी आहे हे त्यांनी सांगितलं आहे. बहिणाबाईंनी संतांच्या रचनांमधला सगळा वेदांत आजूबाजूच्या निसर्गात शेतीत शोधला आणि शब्दांतून मांडून दाखवला.
बोली भाषेतील एक गोडवा, निसर्गदत्त अशी लय बहिणाबाई नेमकी पकडतात. बोरकरांची एक प्रमाण भाषेतील ओळ आहे

होउ आपणही निळ्या घेउ त्याशी अंगसंग
निळ्या झाल्या त्यांच्या संगे रंग खेळतो श्रीरंग

आणि हीच ओळ बहिणाबाईंच्या कवितेत किती सहजतेने येते. ‘श्रीरंग’ सोपा असा ‘शिरीरंग’ होवून जातो. बोरकरांना तरी निळ्या होवून श्रीरंगाकडे जाण्याची आवश्यकता वाटते पण बहिणाबाईंना मात्र त्याच्याकडे न जाताच ‘माझ्यासाठी शिरीरंग रंग खेये आभायात’ असा ठाम विश्वास आहे.  

माणूस निसर्ग आणि शेती अशा त्रिसुत्रात बहिणाबाई आपलं सगळं जगण्याचं अध्यात्म बांधतात. या तिनही घटकांचा आपसांतला संबंध जितका सुंदर बहिणाबाईंनी मांडला तो तसाच कुणाला लिहीता आला नाही. आणि परत ही सगळी रचना अतिशय कलात्मक अशा अष्टाक्षरी छंदात आहे. म्हणजे छंदशास्त्राला कुठेही धक्का लावला नाही. अन्यथा लोकगीतांमध्ये हे स्वातंत्र्य घेतलं जातं.

शेवटच्या कडव्यात एक मोठं सत्य त्या कलानिर्मितीबाबत सांगून जातात. धरतीमधल्या रसाचा जीभेला अनुभव येतो मगच त्याची चव पिंडाला कळते. अनुभवातूनच शब्दकळा समृद्ध होते. रोजच्या जगण्याचा निसर्गाचा समृद्ध असा अनुभव घेतल्याशिवाय कळणार कसं आणि मग ते सारं आपल्या शब्दांत उतरणार कसं?

जगण्याच्या अनुभवांतून संतांची रचना जशी सोपी साधी शब्दवेल्हाळ झालेली आहे तशी बहिणाबाईंची आढळते. सोपानदेव चौधरी यांनी एक आठवण लिहून ठेवली आहे. त्यावरून कळते बहिणाबाईंचे जिवनविषयक तत्त्वज्ञान सोप्या भाषेतले पण किती पक्की वैचारिक बैठक असलेले होते. त्या बोलतात ‘जो असतो परंतू दिसत नाही तो देव आणि जे दिसतं पण कधीच नसतं ते भेव’

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ‘मुकनायक’ आणि ’बहिष्कृत भारत’ या आपल्या नियतकालिकांवर बोधवाक्य म्हणून संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम यांच्या रचना वापरल्या आहेत.  शिवाय हे नियतकालीकं चालू करताना सहा महिने आधी सर्व संत वाङ्मय आणून वाचून काढले. त्यांचा अभ्यास केला.  त्यांच्या एका कार्यकर्त्याला याचं मोठं आश्वर्य वाटलं की हिंदू धर्मातील या संतांच्या रचना कशाला? त्याला उत्तर देताना बाबासाहेबांनी सांगितलं होतं, ‘आपल्या निरक्षर अडाणी लोकांना समजून सांगण्याची भाषा ही साधी सोपी असली पाहिजे. संतांनी अशी भाषा शेकडो वर्षे वापरली. या भाषेचा अभ्यास केल्या शिवाय आपल्यालाही कळणार नाही सामान्य लोकांशी कसा संवाद साधावा.’  
बहिणाबाई कुणी सामाजिक राजकीय आंदोलनातील नेत्या नव्हत्या. त्या संतही नव्हत्या. पण त्यांना सामान्यांच्या हृदयाची भाषा नेमकी कळली होती म्हणून त्यांची कविता आज इतक्या वर्षांनीही संतांच्या रचनांसारखी लोकांच्या ओठांवर खेळते आहे. हृदयात ठसून बसली आहे.

    श्रीकांत उमरीकर  जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद. मो. 9422878575

तबलीग-निजामुद्दीन दर्गा विरूद्ध आहेत !


दै. महाराष्ट्र टाईम्स संवाद रविवार १२ एप्रिल २०२० 


तबलीगच्या विघातक हरकतींमुळे देशभर सध्या मोठ्या प्रमाणात संताप आहे. चर्चा चालू आहे. तबलीगच्या दिल्लीतील मरकज (मरकजचा मुळ अर्थ केंद्र, उद्दीष्ट, ध्येय) चा उल्लेख करताना वारंवार निजामोद्दीन औलियाचा उल्लेख येतो आहे. त्याचे कारण म्हणजे तबलिगच्या या मरकजची घटना घडली तो परिसर निजामोद्दीन नावाने ओळखला जातो. आणि त्याचे कारण म्हणजे सुफी संत हजरत निजामोद्दीन औलिया यांचा दर्गा याच भागात आहे. 

तबलीग आणि निजामोद्दीन ही दोन नावे सोबत घेतली जात असल्याने निजामोद्दीन औलियावरही टीका होवू लागली आहे. 

नेमकं इथेच गैरसमज पसरण्याची शक्यता आहे. कारण तबलीग ही कट्टरपंथी इस्लामची शिकवण देणारी चळवळ असून हीचा मुळातच सुफी पंथाला विरोध आहे. किंबहुना भारतातील दोन प्रमुख सुफी दर्गे ख्वाजा गरीब नवाज मोईनोद्दीन चिश्ती (अजमेर) आणि ख्वाजा हजरत निजामोद्दीन औलिया (दिल्ली) यांच्या वाढत चाललेल्या भक्तवर्गामुळे, या दर्ग्यांच्या लोकप्रियतेमुळे याला विरोध करण्यासाठी 1926 ला तबलीगची सुरवात भारतात झाली.

तबलीगवर मोठ्या प्रमाणावर आता लिहून येतं आहे पण ही ज्याची प्रतिक्रिया होती त्या सुफी दर्ग्यांबद्दल मात्र अजूनही फारशी माहिती नाही. गैरसमजच फार आहेत. मुळात इस्लामला गाणं बजावणं प्रतिकांची पूजा मंजूर नाही. पण हिंदू प्रभावात भारतीय उपखंडात इथल्या मुसलमानांना सुफी संप्रदाय जवळचा वाटला. मग संतांच्या पूण्यतिथीला उत्सव साजरा करणे ही हिंदू परंपरा उचलून सुफी संतांचे ‘उरूस’ सुरू झाले. दर्ग्यावर चादर चढवणे, फुले वाहणे, उदबत्ती लावणे, नवस बोलणे (मन्नत), गंडा बांधणे, स्त्रीयांचे गळ्यात काळी पोत बांधणे, भजनं गावून परमेश्वराला आळवणे हे सगळे सुफी दर्ग्यात वाढत गेले.

हजरत मोहम्मद पैंगबरांपासून सुफींची परंपरा सांगण्यात येते. सुफींचे पमुख पाच पंथ आहेत. 1. चिश्ती 2. कादरी 3. फिरदौसी 4. सुर्‍हावर्दी 5. शत्तारी. यातील ज्या दर्ग्याची चर्चा तबलीग प्रकरणा निमित्त होते आहे तो निजामोद्दीन औलिया हा दर्गा चिश्ती संप्रदायाचा आहए. भारतातील प्रमुख चिश्ती सुफी संत म्हणजे अजमेरचे ख्वाजा मोईनोद्दीन चिश्ती. यांना 17 वे ख्वाजा म्हणतात.  त्यांच्यानंतर 18 वे ख्वाजा बख्तीयार काकी (दिल्ली), 19 वे ख्वाजा बाबा फरीद गंजेशक्कर (पाकपत्तन पंजाब). यानंतर ज्यांना 20 वे ख्वाजा म्हणून ओळखले जाते ते म्हणजे निजामोद्दीन औलिया. पुढे 21 वे ख्वाजा म्हणजे बुर्‍हानोद्दीन गरिब. यांचा दर्गा औरंगाबाद जवळ खुलताबाद येथे आहे. याच दर्ग्यात पहिले निजाम मीर कमरोद्दीन असफजहा यांची कबर आहे. या परंपरेतील शेवटचे म्हणजेच 22 वे ख्वाजा म्हणून जैनोद्दीन चिश्ती हे ओळखले जातात. यांचा दर्गा खुलताबादलाच आहे. याच दर्ग्यात सम्राट औरंगजेबाची कबर आहे. 

सुफी दर्ग्यात जावून नवस बोलणे ही परंपरा इस्लामला मंजूर नाही. सम्राट अकबराने पुत्रप्राप्तीसाठी आग्र्याचे ख्वाजा सलिमोद्दीन चिश्ती दर्ग्यात मन्नत मागितली होती (कांही जण हाच संदर्भ अजमेरच्या दर्ग्यात जोडतात. जोधा अकबर आणि मोगल ए आजम चित्रपटांत याचे चित्रण आहे.) आणि पुढे पुत्र प्राप्ती झाल्यावर हा नवस पायी जावून फेडला.   मुलाचे नाव सलिम ठेवले. हाच पुढे जहांगीर या नावाने गादीवर बसला. (सलीम अनारकली या काल्पनिक प्रेम कहाणीने हा बादशहा परिचित आहे.) शाहरूख खान याच्या बंगल्याचे नावही ‘मन्नत’ असेच आहे.

आजही हिंदू मुसलमान सुफी दर्ग्यात नवस बोलतात. शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजी राजे यांनी पुत्रप्राप्तीसाठी नगरच्या शाहशरिफ दर्ग्याला नवस बोलला होता. म्हणूनच पुढे मुलांची नावे शहाजी आणि शरीफजी अशी ठेवली. 

दर्ग्याला नवस बोलणे हे एक वेळ ठीक आहे. त्या संतांच्या नावाप्रमाणे मुलांची नावे ठेवणे ठीक आहे. पण हैदराबादचे दिवाण महाराजा किशनप्रसाद यांनी आपल्या मुलाचे नावच 6 वे निजाम मेहबुबअली पाशा यांच्या नावावरून मेहबुबप्रसाद असे ठेवले होते. 

हजरत निजामोद्दीन औलिया यांचे शिष्य म्हणजे प्रसिद्ध संगीतज्ज्ञ कवी अमीर खुसरो. आपल्या शास्त्रीय संगीतात अमीर खुसरो यांचे योगदान मोठे आहे. आजही हजरत निजामोद्दीन औलिया यांच्या नावाने कित्येक बंदीशी गायल्या जातात. अमीर खुसरो यांनी आपल्या गुरूचे वर्णन करताना येशू ख्रिस्त आणि ख्वाजा खिज्र यांचे सर्व गुण शेख निजामोद्दीन औलियात एकवटले असल्याचे नमुद करून ठेवले आहे. मुहम्मद इकबाल यांनी यामुळेच या निजामोद्दीन औलिया यांचे वर्णन आपल्या कवितेत केले आहे.

तेरी लहद की जियारत है जिंदगी दिल की
मसीह व खिज्र मे ऊंचा मुकाम है तेरा ॥
(तुझ्या समाधीचे दर्शन करणे ही माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी आकांक्षा आहे. कारण तुझे स्थान हे खिज्र आणि मसीह यांच्यापेक्षा कितीतरी अधिक उंच आहे.)

तबलीग आणि सुफी यांचा विरोध असण्याचे कारण केवळ वरवर नसून मुळात जे इस्लामी तत्त्वज्ञान आहे त्याला छेद देत काही गोष्टी सुफींनी स्विकारल्या ज्या की वेदांतापासून घेण्यात आल्या आहेत यामुळे आहे. डॉ. आजम यांनी असे नमुद केले आहे की, ‘...उपरोक्त तथ्यांच्या आधारावर असे म्हणता येऊ शकते की सूफींच्या परम उद्दिष्टासंबंधी धारणेस बौद्धांच्या निर्वाण आणि उपनिषदांच्या मोक्ष या धारणेशी जोडले जाऊ शकते आणि याची शक्यता अधिक आहे की या दोहोंचा प्रभाव या दृष्टीकोनातून सूफींवर पडलेला असावा.’ (पृ. 262, ‘सूफी तत्त्वज्ञान : स्वरूप आणि चिंतन’- डॉ. मोहम्मद आजम, पद्मगंधा प्रकाशन, आ.1)

सुफी एक भारतीय पंथ आहे असे समजून त्याचा विचार झाले तर आपल्याला भारतीय मुसलमानांच्या मानसिकतेचा उलगडा होवू शकतो. हा मुसलमान कव्वाली- दर्गे- उरूस-मजारी-नवस-गंडे-चादर चढवणे यांच्या
  माध्यमांतून आपली एक वेगळी ओळख प्रस्थापित करू पाहतो आहे. आणि ही परंपरा किमान 800 वर्षांची वारकरी संप्रदाया सारखीच प्राचीन आहे. (ख्वाजा मोईनोद्दीच चिश्ती यांनी 1192 मध्ये या संप्रदायाची भारतीय उपखंडात स्थापना केली.)

भारतातील सर्वात मोठा उरूस हजरम ख्वाजा मोईनोद्दीन चिश्ती यांचा अजमेरला भरतो. दसर्‍या क्रमांकाचा उरूस महाराष्ट्रात परभणीला कादरी परंपरेतील सुफी संत तुरतपीर यांचा भरतो. यांनी रामदासांच्या दासबोधाचा ‘मन समझावन’ नावानं उर्दूत अनुवाद केला आहे. तिसर्‍या क्रमांकाचा उरूस खुलताबादला जरजरी बक्ष यांचा भरतो. े

तबलीग चळवळ ही या सुफींच्या विरोधातील आहे. हे कट्टरपंथी देवबंदवाले इतर सुफी मानणार्‍या बरेलवी मुसलमानांना आपले समजत नाहीत. तबलीगचा पहिला विरोध हा हिंदूंना नसून हिंदू प्रभावातील सुफी मानणार्‍या मुसलमानांना आहे हे लक्षात घेतले तर आपल्याला या संघर्षाला समजून घेणे सुलभ होईल. 

(या लेखनासाठी डॉ. मोहम्मद आजम, डॉ. यु.म. पठाण, रा.चि. ढेरे, डॉ. श्रीधर कुलकर्णी यांच्या पुस्तकांचे संदर्भ घेतले आहेत.)

श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575

Saturday, April 11, 2020

वाधवान वाधवान। कायद्याची धुळधाण ॥


उरूस 11 एप्रिल 2020

सोशल मिडिया हे असे माध्यम आहे की ते कधी तूमच्यावर उलटेल हे सांगता येत नाही. तेंव्हा याचा वापर जपूनच करायला पाहिजे. जाणते राजे राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी तबलिग प्रश्‍नी फेसबुक लाईव्ह करताना हा विचारच केला नसावा. तबलिगवर बोलताना कारण नसतांना त्यांनी महाराष्ट्रात आम्ही तबलिग मेळाव्यांना कशी परवानगी दिली नव्हती मग दिल्लीला कशी देण्यात आली? दिल्लीचे पोलिस केंद्रीय गृहखात्याच्या ताब्यात आहेत. मग ही जबाबदारी गृहमंत्री अमित शहांवरच येते असा मुद्दा उपस्थित केला.

खरं तर हा विषय इथेच संपलाही असता. पण महाराष्ट्राच्या गृहमंत्र्याचे हेच प्रश्‍न विचारणारे एक पत्र सोशल मिडीयात व्हायरल झाले आणि चर्चेला अजूनच तोंड फुटले. इथे पर्यंतही या विषयाची व्याप्ती फारशी नव्हती. कारण हे पत्र कितपत सत्य आहे हे समोर आले नव्हते. पण असं म्हणतात ना ज्यानं चोरी केली त्याला राहवतच नाही. तसं झालं.

राष्ट्रवादीचे अनिल देशमुख जे की महाराष्ट्राचे गृहमंत्री आहेत यांनी पत्रकारांसमोर येवून हेच प्रश्‍न केंद्रिय गृह मंत्र्यांबाबत विचारले आणि शरद पवारांचेच मुद्दे परत समोर आणले.

याच्या काही वेळातच महाराष्ट्र सरकारचे गृहखात्याचे सचिव अमिताभ गुप्ता यांचे एक पत्र सोशल मिडियात व्हायरल झाले. त्यात त्यांनी उद्योगपती येस बँक घोटाळ्यातील आरोपी कपिल वाधवान आणि त्यांच्या कुटूंबातील 22 जणांना खंडाळा ते पाचगणी प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली असे नमूद केले आहे. यासाठी कायदा धाब्यावर बसवला गेला.135 कोटी लोक स्थानबद्ध असताना  23 श्रीमंत राजकारण्यांच्या जवळच्या लोकांना नियम तोडून प्रवासाची परवानगी देण्यात आली.

न्यूज चॅनेलच्या पत्रकारांनी त्वरीत या प्रकरणातील सत्य समोर आणले. खरोखरच उद्योगपती कपिल वाधवान आपल्या कुटूंबांतील 22 सदस्यांसह पाच एसयुव्हि वाहनांमधून पाचगणीला लॉकडाउन काळात कायदा मोडून गेल्याचे सिद्ध झाले.

तबलिग प्रश्‍नी हवेत गोळीबार करणारे शरद पवार आणि गृहमंत्री अनिल देशमुख हे या प्रकरणी प्रचंड अडचणीत सापडले. तातडीने सचिव अमिताभ गुप्ता यांना दीर्घ मुदतीच्या रजेवर पाठविण्यात आले.  प्रकरणाची चौकशी करण्यात येईल असे घोषित करण्यात. माजी मुख्यमंत्री भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्य सचिव अमिताभ गुप्ता यांच्यावर कडक कारवाईची मागणी केली सोबतच या पाठीमागे असलेल्या मंत्र्यांवरही संशयाचे बोट ठेवले. गृहमंत्र्यांचा राजीनामा मागण्यात आला.

राष्ट्रवादीचे दुसरे मंत्री नवाब मलिक यांनी यात पडण्याचे खरं तर काहीच कारण नव्हते. पण त्यांनी आय.ए.एस. व आय.पी.एस. अधिकार्‍यांवर कारवाई करण्याचा राज्याला अधिकार नाही. भाजपाची मागणी असेल तर त्यांनीच केंद्राला सांगावे आणि या अधिकार्‍यांवर कारवाई करावी असे सांगून हात झटकले.

आता परत एकदा राष्ट्रवादीवाले स्वत: होवून गोत्यात अडकले. ज्येष्ठ पत्रकार प्रवीण बर्दापुरकर यांनी इ.स. 2017 मधील मोदी सरकारचा जी.आर.च सोशल मिडीयातून समोर आणला. ज्यात हे अधिकार राज्याला देण्यात आल्याचे स्वच्छ नमूद केले आहे. आता नवाबांची पंचाईत झाली.

यावरही कडी केली ती माजी पोलिस अधिकारी सुरेश खोपडे यांनी. अमिताभ गुप्ता हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कसे आहेत. ते फडणवीसांच्या काळातच कसे मुख्य सचिव बनले होते. हे कारस्थान संघाचेच कसे आहे हे सोशल मिडियात लिहीले. आता प्रत्यक्षात गुप्तांवर कारवाई करा ही मागणी देवेंद्र फडणवीस, किरीट सोमय्या भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा करत आहेत. जे की संघाचे स्वयंसेवक स्वत:ला म्हणवून घेतात. आणि अमिताभ गुप्तांना वाचवू पहाणारे सर्व राष्ट्रवादीचे लोक आहेत. अशी कारवाई करता येते हे सांगणारे पत्रकार प्रवीण बर्दापुरकर हे पण संघाचे आहेत असा आरोप खुद्द खोपडेच सोशल मिडियावर करत आहेत. आणि हे सगळे ‘संघवाले’ गुप्तांवर कारवाई करा, अशी कारवाई करता येते, राज्य सरकारला हे अधिकार आहेत हे सांगत आहेत. आणि दुसरीकडे खोपडे मात्र हे संघाचे कारस्थान आहे असं म्हणत आहेत. हे काय गौडबंगाल आहे हे आता याच लोकांनी स्पष्ट करावे.

याच पद्धतीनं राष्ट्रवादीचे दुसरे मंत्री जितेंद्र आव्हाड हे करमुसे प्रकरणात अडकले आहेत. त्यांच्या विरोधात पोस्ट लिहीली म्हणून अनंत करमुसे यांना पोलिसांनी उचलून आव्हाडांच्या बंगल्यावर नेले. त्यांच्या समोर करमुसेंना प्रचंड मारहाण केली. या मारहाणीची तक्रारच अधिकृतरित्या करमुसे यांनी पेालिसांत केली. सरकार काही कारवाई करत नाही हे पाहून विरोधी पक्ष नेते राज्यपालांना जावून भेटले. राज्यपालांनी संबंधित अधिकार्‍यांना कारवाई करण्याबाबत विचारले. राज्यपालांचा तो अधिकार आहे. पोलिसांना राज्यपालांनी विचारल्यावर कारवाई करावी लागली. आव्हाडांचे सचिव व इतर चार जणांविरोधात गुन्हा नोंदवला गेला. याही प्रश्‍नावर राष्ट्रवादीला माघार घ्यावी लागली.

दिल्ली सरकारने 10 मार्चलाच जमावबंदी लागू केली होती. मग दिल्ली मरकजच्या मेळाव्याचा प्रश्‍नच उपस्थित होत नाही. मरकजच काय पण कुठलाच मेळावा, कार्यक्रम आपोआप अनधिकृत ठरतो. हे माहित असताना शरद पवार आणि त्यांची री ओढणारे अनिल देशमुख परवानगीचे तुणतुणे का वाजवत आहेत?

याचा दुसरा अर्थ असा निघतो की यांना माहित असून जाणीवपूर्वक दिशाभूल केली जात आहे. पत्रकार भाउ तोरसेकर आरोप करत आहेत त्याप्रमाणे चुकीचा संदेश दिला जातो असं म्हणून ठरवून ठरवून पवार चुकीचाच संदेश देत आहेत.

एकेकाळी जास्त माध्यमं नव्हती तेंव्हा 12 वा बॉम्ब स्फोट मस्जीद बंदरला झाला ही पवारांची थाप धकून गेली. पण आता सोशल मिडियाच्या काळात अशा थापा धकून जावू शकत नाहीत. तबलिग मरकज प्रकरणात पवारांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून दिशाभूल करणारे प्रश्‍न उपस्थित केले. आणि बघता बघता त्यांचेच मंत्री याच सोशल माध्यमांतून उपस्थित झालेल्या प्रश्‍नांनी अडकले आहेत. आव्हाडांच्या 5 कार्यकर्त्यांवर कारवाई झाली आहे. मुख्य सचिव गुप्ता यांच्यावर कारवाई झाली आहे. उद्योगपती वाधवान आणि त्यांचे 22 कुटूंबिय क्वारंटाईन करून पाचगणीला अलगीकरणासाठी शासनाच्या निगराणीखाली ठेवल्या गेले आहेत. 14 दिवसांचे हे क्वारंटाईन संपल्यावर त्यांची रवानगी तुरूंगात करावी लागणार.

वाधवान वाधवान जप करत कायद्याची धुळधाण करणार्‍या कायद्याच्या रक्षकांच्या गळ्यात त्यांच्याच कारनाम्याचा फास आवळला गेला आहे.

श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575 

Thursday, April 9, 2020

कोरोना आपत्तीत तुटताहेत भाजी बाजाराच्या बेड्या!


उरूस 8 एप्रिल 2020

कोरोनाच्या आपत्तीत एक मोठं आशादायक चित्र समोर आलं आहे. भाजी आणि फळांची बाजारपेठ मुक्त होवू पहात आहे. ही बाजारपेठ आतापर्यंत कृषी उत्पन्न बाजारपेठ कायद्याच्या बेडीत अडकून पडलेली होती. शेतकरी संघटनेनं कायमच हा जाचक कायदा रद्द झाला पाहिजे अशी मागणी केली होती. कृषी उत्पन्न बाजार समितीतमुळे तयार झालेली व्यापार्‍यांची एकाधिकारशाही शेतमालाच्या मुळावर उठली होती.

कोरोनाच्या निमित्ताने घरोघरी जावून भाजी विक्रीची संधी निर्माण झाली. याचा फायदा घेत चांगल्या भावात काही शेतकर्‍यांनी घरोघरी जावून भाजी विक्रीस सुरवात केली आहे.

या आपत्तीनं समोर आणलेला हा विषय ग्राहकांनी नीट समजून घेतला पाहिजे. शेतकर्‍यांचा खरा शत्रू हा कृषी उत्पन्न बाजार समितीतील दलाल व्यापारी नसून त्यांची एकाधिकारशाही निर्माण करणारे धोरण हा आहे. काय म्हणून ठराविक व्यापार्‍यांनाच खरेदीचा परवाना मिळतो? काय म्हणून ठराविकच ठिकाणी हा घावूक बाजार भरतो? शेतकर्‍याला आपला माल विकाण्यासाठी विविध पर्याय का उपलब्ध असत नाहीत? प्रत्यक्ष शेतकर्‍याच्या बांधावर येवून माल खरेदी करण्यासाठी व्यापार्‍याला का प्रोत्साहन दिले जात नाही?

असे कितीतरी प्रश्‍न निर्माण होतात. मुळात शेतकर्‍याच्या मालाला ग्राहकांपर्यंत पोचविण्यासाठी जी व्यवस्था आहे ती अशी एकाधिकारशाहीला प्रोत्साहन देणारीच का निर्माण झाली? या मार्गाने शेतीचे शोषण करण्याचे धोरण कुणी ठरवले?

आज शेतकरी सरळ ग्राहकाला नेवून भाजी फळं विकतो आहे. मग हेच नियमित स्वरूपात करण्यास कसला अडथळा आहे? सगळेच शेतकरी आपला माल ग्राहकापर्यंत नेवू शकत नाहीत. विक्रीकौशल्य ही स्वतंत्र बाब आहे. अगदी टाटा सारखा बलाढ्य उद्योगपतीही आपली गाडी स्वत: विकत नाही. त्यासाठी डिलर नेमले जातात. तेंव्हा सर्व शेतकरी स्वत:च्या मालाची विक्री करतील ही भाबडी आशाही चुक आहे. विक्री करणार्‍याला भाजीचे उत्पादन घेता येतेच असे नाही.

या सगळ्याची निकोप वाढ विकास व्हावा यासाठी शेतमाल बाजार हा खुला पारदर्शक असणे आवश्यक आहे. तो तसा नसला की एकीकडून शेतकर्‍याचे शोषण होते आणि दुसरीकडे ग्राहकही नाखूश असतो. आणि यातील खलनायक म्हणून व्यापारी दलाल हा समोर दिसायला लागतो. प्रत्यक्षात हा व्यापारी किंवा दलाल हाही या व्यवस्थेचा अविभाज्य घटक आहे. तो त्याचे कौशल्य वापरून शेतकर्‍याचा माल घावूक पद्धतीनं खरेदी करतो. तेवढे एकगठ्ठा पैसे शेतकर्‍याला देतो. या मालाची वर्गवारी साफसुफ पॅकिंग स्टोरेज हे सगळं त्यानं करावं असं अपेक्षीत असतं. या मालावर प्रक्रिया करून तो ग्राहकाला हव्या त्या स्वरूपात आणणे ही त्याची जबाबदारी असते. पण दूर्दैवाने आपल्याकडे शेतमालाच्या बाबत हे घडले नाही. शेतकर्‍यांनी मजबूरीत आपला माल बीटावर आणणे. परवाना असलेल्या दलालांनी व्यापार्‍यांनी त्याची अडवणूक करून कमी भावात तो खरेदी करणे. या मालाचे मोजमापही नीट न करणे. आणि मधल्या मधे काहीच व्हॅल्यू ऍडिशन न करतो लगेच त्याचा लिलाव करून छोट्या विक्रेत्यांना तो विकून टाकणे. म्हणजे हा दलाल केवळ दोन तासांत उत्पादन करणार्‍या शेतकर्‍यापेक्षा जास्त प्रमाणात नफा कमावतो आणि मरमर करून हे सगळं कमावणारा नफा तर सोडाच प्रसंगी तोटा सहन करून आपला माल विकतो. उत्पादन खर्चापेक्षा कमी किंवा काहीवेळा तर अशी भयानक स्थिती झाली आहे की वाहतूकीचा खर्चही भरून निघू नये इतकी कमी किंमत मिळालेली आहे.

दुसरीकडून भाजी फळं विकणारा कष्टाळू गाडेवाला छोटा किरकोळ व्यापारी दिवसभर विक्री करून किमान पैसे कमावतो. तिसरीकडे हवं तसा माल हव्या त्या पैशात मिळाला नाही म्हणून ग्राहकही फारसा खुश नसतो.
धुमीलची प्रसिद्ध कविता आहे

एक आदमी रोटी सेकता है
एक आदमी रोटी खाता है
एक तिसरा भी आदमी है
वो न रोटी सेकता है
न रोटी खाता है
वो सिर्फ रोटीसे खेलता है
ये तिसरा आदमी कौन है
मेरे देश की संसद मौन है

नेमकी हीच शेती धोरणाची स्थिती बनली आहे.

शासनाने कृषी उत्पन्न बाजार समितीची जाचक अट उठवली पण ही समिती बरखास्त नाही केली. शिवाय लोकांची मानसिकताही आठवडी बाजारात जावून स्वत: खरेदी करण्याची असल्याने तोही एक अडथळा गाड्यावर घरोघरी जावून विक्री करताना येत होता. कारण आठवडी बाजारातील भाव आणि गाड्यावरील भाव यात मोठा फरक असायचा. या सगळ्याच्या मुळाशी रेाटीशी खेळणारा ‘तिसरा आदमी’ आहे.

कोरोनाच्या निमित्ताने शेतमाल सरळ ग्राहकांपर्यंत पोचवणारी व्यवस्था निकोप पद्धतीनं वाढीस लागली पाहिजे. गावातील बेरोजगार तरूणांनी आपल्या बापाच्या शेतातील माल, दुध विक्रीसाठी छोटी मोठी व्यवस्था निर्माण केली पाहिजे. यासाठी येणारे सर्व अडथळे दूर करणे हेच शेतकरी आंदोलन यापुढचे असणार आहे. खुला बाजार मागितल्यानंतर हीच आंदोलनाची भविष्यातील दिशा असू शकते. जी शेतकर्‍यांसाठी आणि समान्य ग्राहकांसाठीही हितावह आहे. नसता परत एकदा सुट सबसिडीच्या भिकारी मागण्या आपण करू लागलो तर शेतकरी आंदोलन काळाच्या मागे पडेल.

शेतकर्‍याच्या बांधावर जावून माल खरेदी करून तो ग्राहकाच्या दारात आणणारी पारदर्शी खुली बाजार व्यवस्था आम्हाला हवी आहे. या व्यवस्थेत जो आपले योगदान देईल त्याचे स्वागत आहे. काहीच न करता केवळ लायसन आहे म्हणून मलिदा खाणारी दलालांची आयतखावू व्यवस्था उद्ध्वस्त करण्याची हीच मोठी संधी आहे. ‘वर्क फ्रॉम होम’ यशस्वी होतं आहे असं दिसलं तर कंपन्या मोठ्या प्रमाणात आपल्या कर्मचार्‍यांना घरूनच काम करण्याचा आग्रह धरतील. आणि एकूणच व्यवस्थेवरील ताण कमी होईल. खर्चाची बचत होईल. त्याप्रमाणेच ग्राहकाच्या दारापर्यंत शेतमाल ही योजना दोन्ही बाजूंनी फायदेशीर बनू शकते.

बेरोजगारी वाढली म्हणत असताना आपण रोजगाराच्या संधी दाबून टाकतो आहोत हे लक्षात घ्या. सेवा व्यवसायात मोठ्या संधी कोरोनाच्या निमित्ताने समोर आल्या आहेत. या आपत्तीचा आपण फायदा घेवू. एक नविन स्वच्छ पारदर्शी स्पर्धात्मक अशी शेतमाल खरेदी विक्री व्यवस्था उभी करू.

परभणीला माझ्या भावाने भाजी उत्पादन करणार्‍या शेतकर्‍यांना गोळा करून हा ताजा शेतमाल ग्राहकांपर्यंत पोचविण्याचा उपक्रम चालवला आहे. (लेखात वापरलेला फोटो त्याच उपक्रमाचा आहे.) औरंगाबादला माझे आईवडिल राहतात (नारायणी अपार्टमेंट, 200 ज्योती नगर, औरंगाबाद) त्या अपार्टमेंटचा वॉचमन राजू याचा मोसंबी ज्यूसचा गाडा होता. त्याने लॉकडाउन च्या काळात भाजी आणून जवळच्या लोकांना देण्याची सोय केली. बघता बघता भाजीचा त्याचा व्यवसाय वाढत चालला आहे.

तूमच्या आजू बाजूच्या ‘राजू’ला असेच प्रोत्साहन द्या. तूमच्या माहितीतील शेतकर्‍यांना विचारा. आपण सगळे मिळून या केरोना संकटातून शेतमालाच्या मुक्त पारदर्शी व्यापाराची संधी निर्माण करू. 

श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575 

Wednesday, April 8, 2020

तबलीग व आव्हाड प्रश्‍नी मौनाचा पुरोगामी कट !


उरूस 8 एप्रिल 2020

शाहिनबाग आंदोलनातील लोकांनी अवैध (या आंदोलकांना रस्त्यावर बसण्याची परवानगी नव्हती. त्यांची बाजू घेणार्‍यांनी नीट अभ्यास करावा.) पद्धतीनं लाखो लोकांचा रस्ता 100 दिवस अडवून ठेवला होता. त्या आडमुठपणाला ‘तमाशा’ शब्द उपहासाने वापरला तर बर्‍याच पुरोगाम्यांना तो झोंबला होता. या शब्दामुळे माझ्यावर तिखट टीका केली गेली. भयंकर ट्रालिंग झाले. आता हेच सगळे पुरोगामी तबलीगचे कोरोना पसरविण्याचे भयानक घातक प्रकरण समोर आल्यावर मात्र मिठाची गुळणी धरून गप्प आहेत. पाठोपाठ महाराष्ट्रात राष्ट्रवादीचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या बंगल्यावर त्यांच्या उपस्थितीत त्यांच्या अंगरक्षकांनी विरोधात फेसबुक पोस्ट टाकल्याने अनंत करमुसे यांना प्रचंड मारहाण केल्याचेही प्रकरण समोर आले आहे. याही बाबतीत ही सगळी जमात-ए-पुरोगामी आळीमिळी गुपचिळी बाळगून शांत आहे.

2019 च्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुका होण्याच्या आधी कॉंग्रेस खासदार माजी पत्रकार (आता कॉंग्रेसच्या अधिकृत दावणीला बांधल्या गेल्यावर त्यांना माजी पत्रकार असेच म्हणावे लागेल ना) मा. कुमार केतकर यांनी असा आरोप केला होता की मोदी  शहा निवडणुकाच होवू देणार नाहीत. झाल्यातरी सत्ता सोडणार नाहीत. दंगे होतील. मुळात मोदी पंतप्रधानपदी येणे हाच कसा आंतरराष्ट्रीय कट आहे हे केतकर आवर्जून सांगत होते. भगवान राम जरी पृथ्वीवर अवतरले तरी मोदी पंतप्रधान होणार नाहीत असंही ते बोलले होते. केतकरांना या आंतरराष्ट्रीय कटाची इतकी माहिती होती तर आंतरराष्ट्रीय पोलिसांना त्यांनी का नाही दिली?

2019 च्या निवडणुका पार पडल्या. आधीपेक्षा जास्त जागा निवडून येउन मोदीच परत पंतप्रधान झाले. त्यामुळे केतकरांची भविष्यवाणी खोटी ठरली. कुठेही निकालावर दंगे झाले नाहीत. मग हा कट असल्याची अफवा केतकर का पिकवत होते? हेच केतकर आता तबलीग आणि जितेंद्र आव्हाड प्रकरणी कुठे आहेत?

कलम 370, ट्रिपल तलाक, राम जन्मभूमी निकाल, सीएए कायदा आणि त्याच्या विरोधातील शाहिनबाग आंदोलन या सर्वांवर जमात-ए-पुरोगामी सगळे तुटून पडले होते. राम जन्मभुमी प्रकरणांत तर रोमिला थापर सारख्या पुरोगाम्यांनी लिहीलेली इतिहासाची पुस्तकेही खोटी असल्याचे सिद्ध झाले.

माझ्यासारखा एक सामान्य माणूस जेंव्हा शाहिनबागेला ‘तमाशा’ हा शब्द उपहासाने वापरतो तेंव्हा तुटून पडण्याची उबळ यांना येते. जे कधी नियमित माझ्या ब्लॉगवर कधी व्यक्त होत नाहीत. विरोध दर्शविण्यासाठी का होईना ज्यांना काही लिहीण्याची उसंत नसते. ते सगळे महाराष्ट्रातले पुरोगामी मित्र एका शब्दावर आक्रमक होवून शब्दबाण बरसू लागतात.

आणि आज भारताला इतका मोठा धोका तबलीगींनी दिला तेंव्हा मात्र शांत बसतात. महाराष्ट्रात अभिव्यक्ती स्वातंत्र्याची जपमाळ ओढणारे एका सामान्य माणसाला महाराष्ट्राचा मंत्री आपल्या बंगल्यावर आणून प्रचंड मारहाण करतो आणि इथेही हे शांत बसतात?

आता मात्र मला वेगळीच शंका येउ लागली आहे. लहान मुलांच्या भांडणात ज्याची चुक असते ज्याने मारहाण केली असते तोच मोठ्यानं ओरडायला लागतो रडायला लागतो. तसेच कुमार केतकरांना हा सगळा जमात-ए-पुरोगाम्यांचा कट माहित होता. ते स्वत:ही याच कटात सहभागी आहेत.  म्हणून त्यांनीच आधीच आरडा ओरड सुरू केली. प्रत्यक्षात ते म्हणाले तसे काहीही झाले नाही. निवडणुक शांततेत पार पडली. नविन सरकारने सत्ताग्रहण केले. या निवडणुकीत हिंसाचारही अतिशय कमी झाला. म्हणजे या जमात-ए-पुरोगामींचेच ढोंग उघडे पडले.

आव्हाडांच्या प्रकरणांतही मारहाणीची माहिती समोर आली आणि या सगळ्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याची पाठराखण करण्यातला ढोंगीपणा उघड झाला.

ज्यानं आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट टाकली त्याच्यावर कायद्यान्वये जी काही कारवाई अपेक्षीत ती झालीच पाहिजे. त्याबाबत मला कसलीही सहानुभूती नाही. तो कुणाही पक्ष संघटनेचा कार्यकर्ता असो त्याच्यावर कायद्याद्वारे शिक्षा मिळावी. पण एखाद्या राज्यात कायदा करणारे मंत्रीच जर कायदा स्वत:च्या हातात घेत असतील तर सामान्य माणसांनी करायचे काय?

हेच आव्हाड आणि त्यांचे नेते शरद पवार मोदी विरोधात आक्षेपार्ह पोस्ट लिहिणार्‍यां बाबत कसे वागले होते? मुुंबईला सोशल मिडीयावर ट्रोल होणार्‍या मोदी भाजप विरोधी तरूणांची बैठक घेवून शरद पवारांनी या तरूणांच्या पाठिशी आपण असल्याचे सांगितले होते. शिवाय त्यांना लागणारी कायदेशीर मदतही करणार असल्याचे घोषित केले होते.

मग आता फेसबुक पोस्टवरून ज्याला मारहाण झाली त्याला शरद पवार कायदेशीर मदत करणार का? शरद पवार अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या बाजूचे आहेत ना? म्हणजे त्यांनीच तशी घोषणा केली होती.

शिवाय मा. जितेंद्र आव्हाड हे महान गांधीवादी आहेत. ते गांधींची अहिंसा मानतात असं त्यांच्याच ट्विटरवरून दिसून येतं. मग आता त्यांच्या नजरेसमोर त्यांच्या बंगल्यावर कुणाला मारहाण होते तो भाग अहिंसेच्या कक्षेत येत नाही का? का त्यांचा गांधीवाद त्यांच्या बंगल्याच्या बाहेर पडल्यावर सुरू होतो आणि बंगल्याच्या आत येताना चपलीसारखा ते गांधीवादही बाहेरच सोडून टाकतात?

पुरोगामी माध्यमांची भूमिका तर अजूनच विचित्र. कुठलेच वर्तमानपत्र या बातमीची दखल घेण्यास तयार नाही. सोशल मिडियातून यावर आवाज उठवला जात आहे. पत्रकार सुशील कुलकर्णी यांनी आपल्या ऍनालायझर या वेब चॅनलवरून याला वाचा फोडली आहे. त्यावर मोठ्या प्रमाणात आता प्रतिक्रिया उमटत आहेत.

अनंत करमुसे या अभियंत्याला मारहाण झाली त्याची बाजू घेतली की लगेच हे भाजप संघवाले आहेत, भिडेंच्या आंबराईतील हे नासके आंबे आहेत, नथुरामाच्या अवलादी आहेत असली टीका सुरू होते.

मला स्वत:ला करमुसे यांची जात काय हे माहित नाही आणि समजून घेण्यात रस नाही. ते कोणत्या संघटनेचे आहेत याचाही पत्ता नाही. त्यांच्या आक्षेपार्ह पोस्टवर कुठलीही कायदेशीर कारवाई झाली तरी मी त्यासाठी बचावार्थ पुढे येणार नाही.

अनंत करमुसेला जितेंद्र आव्हाडांच्या समोर मारहाण झाली. त्यांच्या निवास्थानी मारहाण झाली. हे निषेधार्ह आहे. आव्हाडांना मंत्री मंडळातून काढून टाकले पाहिजे. आव्हाडांच्या समर्थनार्थ सोयीचा बुद्धीवाद करणार्‍यांचाही मी निषेध करतो.

देशपातळीवरील भयानक घातक प्रकरण तबलीग असो की महाराष्ट्रातील एका व्यक्ती पुरते आव्हाड प्रकरण जमात-ए-पुरोगामी ही एका आंतरराष्ट्रीय कटात सहभागी आहेत की काय अशी शंका आता येत चालली आहे. नसता ते असे मौन  बाळगून चुप्प बसले नसते.


श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575   

Sunday, April 5, 2020

गाउलीच्या पावलात सांज घरा आली !


काव्यतरंग, दै. दिव्य मराठी 5 एप्रिल 2020

सांज

गाउलीच्या पावलात सांज घरा आली
तुंबलेल्या आचळांत सांज भरा आली
शिणलेल्या डोळुल्यांचा सांज प्राण झाली
आतुरल्या हंबराचा सांज कान झाली

माउलीच्या वातीतून सांज तेज ल्याली
माउलीच्या गीतातून सांज भाव प्याली
माउलीच्या अंकावर सांज मुल झाली
मुलासाठी निदसुरी सांज भूल झाली

वहिनीच्या हातासाठी सांज क्ष्ाुधा झाली
वहिनीच्या हातातून सांज सुधा झाली
वहिनीच्या मुखासाठी सांज चंद्र झाली
वहिनीच्या सुखासाठी सांज मंद्र झाली

-बी. रघुनाथ
(समग्र बी. रघुनाथ खंड 1 कविता, प्रकाशक गणेश वाचनालय परभणी.)

संध्याकाळी घराकडे परत निघालेल्या गायी, त्यांच्या खुरांमुळे उडालेली धूळ, त्या धुळीत मिसळलेली मावळत्या सुर्याची सोनेरी किरणे, ओढ, हुरहुर, अंगणात तुळशीसमोर लावलेला दिवा, अंगणार आजीच्या मांडीवर पहूडलेला तान्हूला, आत चुलीपाशी भाकरी करणारी घरची गृहीणी अशा वातावरणाला शब्दबद्ध करते बी. रघुनाथांची ही कविता.

काळ कितीही आधुनिक होत जावो अगदी पहाटेचा सुर्य उगवतानाचा प्रहर आणि सुर्य मावळतानाची सांजवेळ या दोन्ही प्रसंगी सारं विसरून माणूस पार अगदी आदिम काळात जावून पोचतो. संध्याकाळी हळू हळू वातावरण गडद होत जातं. अगदी दाट अंधार पडतो. तुळशीसमोरच्या दिव्याचा छोटासा प्रकाश मनात आशेचा किरण जागवतात. 

1940 च्या दरम्यान कधीतरी बी. रघुनाथांनी लिहीलेली ही कविता. आज 80 वर्षांनंतरही अगदी ताजी वाटत राहते. पहिल्या कडव्यात घराकडे परतणार्‍या गायी आणि त्यांची हंबरणारी वासरं येतात. त्यांच्या निमित्ताने ताटातुट झालेल्या सगळ्यांच जीवांचे प्रतिक कवितेत प्रकट होते. 

दुसरं कडवं मोठं विलक्षण आहे. काळवंडत चाललेली सांज आपल्या मायमाउल्यांनी तुळशीसमोरच्या छोट्याशा दिव्याच्या तेजाने उजळून टाकली आहे. ही एक फार मोठी आशादायी बाब बी. रघुनाथ लिहून जातात. सगळ्या कठीण प्रसंगांवर मात करण्यासाठी या आपल्या बायाबापड्या नेहमीच सज्ज राहिल्या आहेत. संध्याकाळी तुळशीसमोर अंगणात दिवा लावणे असो की अमावस्येला पणत्या लावून सण साजरा करणं असो. अंधारावर मात करण्याची अदम्य अशी इच्छाशक्ती बायाबापड्यांच्या या कृतीतून सतत दिसत आली आहे. 

मांडीवरच्या तान्ह्यासाठी ती स्तोत्र, अंगाई काहीतरी गात आहे. त्यामुळे ‘माउलीच्या गीतातून सांज भाव प्याली’ असे जे शब्द येतात ते फार अर्थपूर्ण आहे. केवळ अंधारावर मातच केली जाते असे नाही तर तिच्या गीतातून एक सुंदर असा भाव व्यक्त होतो आहे. 

स्त्रीयांचे हे एक वैशिष्ट्य आहे. कष्ट करताना त्यांनी जो कलाविष्कार प्रकट केला आह तो मोठा विलक्षण राहिलेला आहे. भुपाळ्या, आरत्या, ओव्या, स्तोत्रं या सगळ्यांतून बाईने सामान्य कष्टकरी आयुष्याला भावात्मक सौंदर्य बहाल केलं आहे. रांगोळीतून कलात्मक दृष्टी बहाल केली आहे. जात्यावरच्या ओवीतून तर ही कलात्मकता ठसठशीतपणे समोर येते. म्हणूनच एका जात्यावरच्या ओवीत बाईने जे जीवन आणि कला याबद्दलचे वैश्‍वीक सत्य सांगितले आहे ते तसे त्या भाषेत आणि इतक्या साध्या पद्धतीनं आजतागायत कुणालाच लिहीता आले नाही.

दाण्याच्या जोडीने जिण्याचा रगडा
गाण्याच्या ओढीने ओढीते दगडा

बाईच्या आविष्कारातील हे सौंदर्य बी. रघुनाथ नेमके टिपतात. गाय, माय या नंतरचे तिसरे कडवे घरी कष्ट करणार्‍या प्रौढ गृहीणीला समर्पित आहे. सावरकरांच्या शिवाय या पद्धतीनं वहिनीला काव्यात कुणी स्थान दिलेलं नाही. 

घरातील ही मोठी वहिनी सगळ्यांसाठी जेवण बनवते आहे. तिच्या हाताला चव आहे. तीच्या हातचं खाण्यासाठी सांज ‘क्ष्ाुधा’ झाली आहे. भूक लागली आहे. आणि ती जे काही ताटात वाढते त्याची गोडी अविट आहे. ‘वहिनीच्या हातातून सांज सुधा झाली’ अशी ओळ त्यासाठीच येते.

शेवटच्या दोन ओळी तर अतिशय सुंदर आहेत. दिवसभराची घाई कामाची गडबड आता शांत झाली आहे. सुर्य मावळून चंद्र उगवला आहे. दिवसभराचा कामाचा ‘तीव्र’ सप्तक संपून सांज ‘मंद्र’ झाली आहे. अगदी शेवटच्या ओळीत वहिनीच्या मुखासाठी चंद्राची उपमा येते. आणि कवितेचा कलात्मक शेवट होतो. 

मराठी नव कथेची पायवाट ज्यांनी घालून दिली असे कथाकार बी. रघुनाथ, निजामकालीन मराठवाड्याच्या जनजीवनाचा आडचा छेद आपल्या लेखनातून दाखवून देणारे बी. रघुनाथ, ‘आज कुणाला गावे’ अशी तीव्र सामाजिक भाष्य करणारी कविता लिहीणारे बी. रघुनाथ मोजक्या शब्दांत गाउली, माउली आणि घरावरची साउली (वहिनी) अशा तिन स्त्री प्रतिकांतून ‘सांज’ ही कविता रसिकांच्या ओंजळीत टाकतात. हा नाजूक कलाविष्कार मोठा विलक्षण आहे. 

एखाद्या संगीतकाराने मारवा अथवा पुरिया धनाश्री रागाच्या सुरावटीत या कवितेची चाल बांधून हीचे सौंदर्य अजून वाढवावे असे मला फार वाटत रहाते.

(बी रघुनाथ रेखाटन ल. म. कडू यांचे आहे)

    श्रीकांत उमरीकर  जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद. मो. 9422878575

Wednesday, April 1, 2020

जिथल्या तेथे पंख मिटूनियां निमूट सारी घरेपाखरे


उरूस, 1 एप्रिल 2020

शिशासारखी भरली मळभट
मृत्यूची चाहूल सुरूंना
अवचित हबकुनि थबके वारा
वाळूंतुन पाऊल सुटेना

घळींघळींतुन अडेआदळे
उजेड वेडा दिसांधळासा
मुकी जखम झाल्या हृदयाचा
तटून आहे एक उसासा

जिथल्या तेथे पंख मिटुनिया
निमूट सारी घरेपांखरे
राख माखुनी पडून आहे
लूत लागले सुणे बिचारे

त्रिशूळसा अन् कुणी कावळा
अवकाशाला कापित येतो
जातां जातां या जखमेचा
झटकन् लचका तोडुन नेतो
-बा.भ.बोरकर
(गितार पृ.44, मौज प्रकाशन. बोरकरांची समग्र कविता, खंड 2, पृ. 41. देशमुख आणि कंपनी)

सध्या लॉकडाउन मुळे बोरकरांच्या या ओळी ‘निमूट सारी घरेपाखरे’ सर्वत्रच लागू पडत आहेत. सारं कांही ठप्प आहे. नेमके हे उन्हाळ्याचे दिवस आहेत. सर्वत्र एक करडा राखेसारखा रंग जाणवतो आहे. बोरकरांनी जी पहिली ओळ लिहीली त्यालाही हा काळ अनुकूल आहे.

ही शांतता आहे पण भयाण आहे. कोरोनाच्या भयाचे सावट सार्‍या जगावरच पसरले आहे. रातअंधळा असा शब्द आपण नेहमी वापरतो. पण ‘दिसांधळा’ असं काही नाही. बोरकरांनी नेमका हा नविन शब्द तयार करून कवितेत चपखल वापरला आहे. सध्याची परिस्थिती मुकी जखम झाल्यागत आहे. भळभळ काही वहात नाही. काही व्यक्त करता येत नाही. पण सारे काही ठप्प असल्याने मनाची विचित्र अशी घालमेल होते आहे.

पंख मिटून पाखरे रात्री झाडावर शांत बसून असतात हे आपल्याला माहित आहे. पण इथे लॉकडाउन मुळे घरेही पंख मिटून आहेत. तेंव्हा बोरकरांच्या कवितेतील ही ओळ इथेही लागू पडते आहे.  तिसर्‍यात जो ‘सुणे’ हा शब्द आला आहे त्याने बर्‍याच जणांचा गोंधळ होतो. एक तर हा शब्द कोकणी आहे. मराठी नाही. सुणे याचा अर्थ कुत्रा. लूत लागलेले कुत्रे जसे पडून असते तसे सगळे जगणे पडून आहे असा अर्थ इथे आहे. बोरकरांच्या प्रतिभेचा कस या शब्दावर लागलेला आहे. एक तर सुणे हा कुत्र्यासाठी आहे पण त्यातून ‘जिणे’ असाही ध्वनीत अर्थ निघतो. दुसरा एक अर्थ सुने म्हणजे एकटे असाही निघतो. या सगळ्यामुळे या शब्दाचे सौंदर्य अजूनच वाढले आहे.

शेवटच्या ओळीत ‘त्रिशुळसा कुणी कावळा’ अशी प्रतिमा येते. इथे कावळ्याला त्रिशूळसा म्हटलेले नसून तो आभाळातून खाली उतरताना तिरका येतो म्हणजेच जमिनीशी जवळपास 60 अंशाचा कोन करतो. आणि नेमका हा कोन त्रिशुळाचा दैत्याला मारतानाचा आहे. देवीच्या हातातील त्रिशुळाने ती दैत्याचा वध करते तो कोन आहेच तसाच कावळ्याचा जमिनीवर झेपावण्याचा कोन आहे.

कोरोनामूळे मृत्यूच्या भयानक बातम्या कानावर येत आहेत. या बातम्या म्हणजे कावळ्याने जखमेचा लचका तोडून न्याव्या तशाच वेदनादायी आहेत.

बोरकरांनी ही कविता 8 एप्रिल 1962 ला लिहीली. आज 58 वर्षांनी बरोबर एप्रिल महिन्यातच आपल्याला हाच अनुभव येतो आहे. हा एक विलक्षण योग आहे. बोरकरांची प्रतिभेला सलाम.

श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575