उरूस, 21 एप्रिल 2020
कोरोना आपत्तीत वृत्तपत्रांना एक मोठी संधी उपलब्ध झाली आहे. एरव्ही वृत्तपत्रे कागदावर छापून ग्राहकापर्यंत पोचविणे हे एक किचकट, वेळखावू, पैसेखावू काम होवून बसले होते. कोरोनात वृत्तपत्रांच्या वितरणावर बंदी आली आणि हीच वृत्तपत्रे डिजिटल स्वरूपात कुठल्याही मोबाईलवर मोफत पाठवायला सुरवात झाली.
यामुळे एक नविन संधी आता वृत्तपत्रांना उपलब्ध झाली आहे. काही इंग्रजी वृत्तपत्रांनी त्यांच्या डिजीटल आवृत्त्या सशुल्क उपलब्ध करून दिल्या आहेत. मराठीत मात्र हा प्रयोग यशस्वी झाला नव्हता. आता कोरोनात ही संधी आहे. वृत्तपत्रांची छपाई, तो मोठा खर्च, वितरणातील प्रचंड अडचणी, वितरणासाठी मनुष्यबळाची कमतरता या सगळ्यांवर मात करणे आताच शक्य आहे.
ही सेवा मोफत असावी का सशुल्क यावर मतमतांतरे असू शकतात. पण ही सेवा मोफत असावी अशा मताचा मी आहे. तसेही सध्या वृत्तपत्रांचा सगळ्यात मोठा महसुल जाहिरातीतूनच येतो आहे. वृत्तपत्रांचे वितरण करण्यासाठी येणारा खर्चही खुप मोठा आहे. तेंव्हा महसुल सगळा जाहिरांतीतून गोळा करणे आणि ही वृत्तपत्रे डिजीटली मोफत उपलब्ध करून देणे हे व्यवहार्य वाटत आहे.
दुसरा एक फायदा डिजीटल किंवा ऑन लाईन आवृत्तीला मिळू शकतो. व्हिडिओंची जोड या बातम्यांना देता येवू शकते. किंवा खरे म्हणजे या संधीचा फायदा घेवून एका वेगळ्यात स्वरूपात वृत्तपत्रे देता येवू शकतात.
तंत्रज्ञानाचा फायदा घेवून तळागाळापर्यंत पोचण्याची हीच संधी आहे. 1990 नंतरच्या जागतिकीकरण पर्वात जगभरातील व्यापार खुला होण्यास सुरवात झाली, जगभरांतील तंत्रज्ञान सर्वांपर्यंत पोचण्यास सुरवात झाली. भारतात दोन ठळक उदाहरणं याची आपण अनुभवतो आहोत. पहिलं उदाहरण मोबाईलचे. 2010 नंतर मोबाईलचे सार्वत्रिकीकरण होण्यास सुरवात झाली. ऍण्ड्रॉइड मोबाईलने तर मोठी क्रांतीच केली. अगदी छोट्यातल्या छोट्या गावात जिथे जिथे नेटवर्क आहे तिथपर्यंत या मोबाईलच्या माध्यमातून आपण जग हाताच्या तळव्यावर आणून ठेवू शकलो. भारतासारख्या देशात जिथे संपर्क हीच मोठी अडचण होती तिथे किमान तेवढे एक काम या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने झाले.
दुसरे उदाहरण छोट्या लोडिंग ऍटो आणि दुचाकी मोटारसायकलचे आहे. गेल्या 20 वर्षांत यांचे सार्वत्रिकीकरण झाले व किमान रस्ता जिथे आहे तिथपर्यंत आपण ही वाहने पोचवू शकलो. अगदी दुर्गम भागांतील आदिवासी वस्ती वगळ्यास सर्वत्र (जवळपास 130 कोटी लोकसंख्या) ही सुविधा आता उपलब्ध आहे.
त्यामुळे ग्रामीण भागांतील माल बाजारपेठेत पोचविणे सुलभ झाले. छोटी वाहने आणि दुचाक्या यांच्यामुळे अगदी छोट्या गावांतून वस्त्यांमधून मोठ्या गावांना प्रवास करणे तुलनेने सोपे आणि स्वस्त झाले.
ऑनलाईन बँकिंगचे पण असेच उदाहरण आहे. अगदी छोट्या भागांत जिथून पैशाचे व्यवहार करणे अवघड असायचे तिथे डिजिटल बँकिंगने खुप मोठे काम केले आहे. विशेषत: ग्रामीण भागात या सुविधेचा लाभ मोठा झाला आहे.
याच पद्धतीने डिजिटल तंत्रज्ञानाचा फायदा घेवून तळागाळापर्यंत वृत्तपत्र पोचविले पाहिजे. अगदी छोट्या गावात वृत्तपत्रांचे प्रतिनिधी कधी नेमले जायचे नाहीत. या निमित्ताने ही पण एक संधी आता उपलब्ध आहे. थोडेफार शिकलेला आणि चांगला मोबाईल हाती असणारा आता वृत्तपत्रांचा प्रतिनिधी बनू शकतो. वेब मालिकांच्या माध्यमांतून ग्रामिण भागांतील प्रतिभा समोर येते आहे. तिला मोठा प्रेक्षकवर्गही लाभतो आहे. हेच वृत्तपत्रांच्या बाबतीत पण घडू शकते. अगदी छोट्या भागांतील वाचक यापूर्वी गृहीत धरला गेलाच नव्हता. तिथपर्यंत वृत्तपत्रे पोचविणे व्यवहार्य नव्हते. पण आता डिजिटल माध्यमांतून हे सहज शक्य आहे.
परदेशस्थ भारतीयांचाही एक फार मोठा वर्ग जो संपूर्णत: या डिजिटल आवृत्त्यांवरच अवलंबून आहे. आजही हा वर्ग ही वृत्तपत्रे ऑनलाईनच वाचतो. त्याच्यापर्यंत पोचायला दुसरा सक्षम व व्यवहार्य पर्याय नाही. माझा स्वत:चा असा अनुभव आहे की गेली माझ्या ब्लॉगच्या 1 लाख 85 हजार दर्शकांपैकी 35 हजार इतकी मोठी संख्या ही परदेशी वाचकांची आहे. म्हणजे हे प्रमाण 20 टक्क्यांच्या जवळ जाते. आपण मराठी वृत्तपत्रांचा विचार करू. परदेशातील सोडा पण भारतात सर्वत्र पसरलेली जी मराठी माणसे आहेत त्यांच्यापर्यंत आपण छापील वृत्तपत्र पोचवू शकतो का?
डिजिटल तंत्रज्ञान एक मोठे वरदान आहे. आपत्ती जशी आली आहेत तसेच त्यातून बाहेर पडण्याची पण संधी आहे. एरव्ही पर्यावरणवादी कागद वाचवा पर्यावरण वाचवा असा नारा देतातच. या डिजिटल माध्यमामुळे पर्यावरणाची हानी पण होणार नाही.
केवळ वृत्तपत्रेच नाहीत तर इतरही बर्याच क्षेत्रात या तंत्रज्ञानाचा वापर कोरोना नंतर वाढलेला दिसून येईल. त्यामुळे कितीतरी पैशांची बचत, वेळेची बचत पर्यावरणाचे रक्षण अशा बाबी घडून आलेल्या दिसतील. यासाठी आपण या तंत्रज्ञानाकडे सकारात्मक दृष्टीने बघण्याची गरज आहे. यावर नकारात्मक दृष्टीकोनातून शंका उपस्थित करत राहिलो तर हाती काही लागण्याची शक्यता नाही.
श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575