संबळ, अक्षरमैफल, जून 2019
सिराज औरंगाबादीचा उल्लेख संबळ सदरात एप्रिल महिन्यातील अंकात केला होता. योगायोगाने याच सिराज औरंगाबादीवर असलम मिर्झा यांचे एक पुस्तक नुकतंच प्रकाशीत झाले आहे. भारतभर उर्दूचा एक फार मोठा चाहतावर्ग असा आहे की ज्याला अरबी लिपी वाचता येत नाही. स्वाभाविकच हा वर्ग चांगल्या उर्दू साहित्यापासून वंचित राहतो. अलीकडच्या काळात लिप्यांतर करून (इंग्रजी शब्द ट्रान्सक्रिप्शन) उर्दू साहित्य देवनागरी लिपीत प्रसिद्ध केले जात आहे. याचा एक मोठा फायदा म्हणजे मोठ्या वाचकवर्गापर्यंत हे पोचू शकत आहेत.
ऍड. असलम मिर्झा गेली 50 वर्षे सातत्याने मराठी-उर्दू असा पूल बांधण्याचा प्रामाणिक प्रयास करत आहेत. उर्दू मध्ये गालिबच्या शंभर वर्षे आधी ज्याने पहिल्यांदा गझल लिहीली तो वली औरंगाबादी हा शायर मराठवाड्याच्या मातीतलाच. त्याच्या नंतरचा महत्त्वाचा शायर म्हणजे सिराज औरंगाबादी.
असलम मिर्झा यांच्या पुस्तकाचे नाव ‘सिराज औरंगाबादी- जीवन, व्यक्तित्व एवं संकलित गजले’ असं आहे. यात सिराजच्या चरित्राची माहिती आहे, त्याच्या कवितेची चिकित्सा आहे सोबतच त्याच्या निवडक अशा शंभरएक गझला दिल्या आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे या संपूर्ण गजला देवनागरी लिपीत आहेत. सोबतच कठीण शब्दांचे अर्थ कवितेच्या खाली दिले आहेत. यामुळे या पुस्तकाला महत्त्व प्राप्त झाले आहे.
सिराजच्या चरित्रविषयक तपशीलाचा भाग पुस्तकात सुरवातीला आला आहे. साउदी अरेबियातील पवित्र मदिना शहरातील सिराजचे पूर्वज मुगल सम्राट जहांगीरच्या काळात भारतात आले. उत्तर प्रदेशमधील मुझफर नगर परिसरात सिराज यांच्या काजमी सय्यद वंशाचे बरेच लोक वस्ती करून होते. सिराज यांचे पूर्वजही याच ठिकाणी स्थिरावले. मुगलांची दक्षिणेतील राजधानी म्हणून औरंगाबाद एक महत्त्वाचे सत्ताकेंद्र होते. औरंगजेबाच्या काळात सिराज यांचे वडिल सय्यद मोहम्मद दरवेश औरंगाबादला स्थलांतरित झाले. इथे ते शिक्षक म्हणून काम करायचे. याच परिसरात 21 मार्च 1712 मध्ये (13 सफर, 1124 हिजरी) सिराज यांचा जन्म झाला. सिराज यांचा जन्मदिवस तिथी प्रमाणे रमझानच्या पवित्र महिन्यानंतर येणार्या महिन्यात येतो.
सिराज यांना घरातूनच ज्ञान घेण्याची प्रेरणा मिळाली पण त्यांना खरी ओढ होती ती सूफी तत्त्वज्ञानाची. औरंगाबाद जवळचे खुलताबाद हे सूफी संप्रदायाचे एक फार मोठे केंद्र म्हणून मान्यता पावलेले आहे. याच ठिकाणच्या हजरत शाह अब्दूल हमान चिश्ती हुसैनी यांचे शिष्यत्व स्विकारले. यावेळी सिराज केवळ 20 वर्षांचे होते.
1739 पर्यंत सिराज यांच्या नावाचा दबदबा तयार झाला होता. वली औरंगाबादी नंतर त्यांचे वारस म्हणून सिराज यांचे नाव सर्वातोमुखी झाले होते. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे या वर्षी सिराज यांचा कविता संग्रह (दिवान) ‘अन्वारूल सिराज’ या नावाने प्रसिद्ध झाला. यात त्यांच्या 500 च्या वर गझला समाविष्ट आहेत.
असलम मिर्झा यांनी सिराज यांच्या कवितांचे वैशिष्ट्य सांगताना, ‘अपनी गजलों की मिठास, कोमलता और अलंकारिक शैली के कारण वह श्रोताओं मे बहुत लोकप्रिय थे.’ असे नोंदवून ठेवले आहे. सिराज यांच्या लोकप्रियतेचे दुसरे कारण म्हणजे त्यांचा संगीताचा व्यासंग. त्यांच्या सोबत वादक नेहमी असायचे. परिणामी सिराज यांच्या गजला साग्रसंगीत सादर व्हायच्या. याचा परिणाम त्यांची लोकप्रियता वाढण्यास झाला.
औरंगजेबाचा मुलगा असफजहा आणि त्याच्या मुलाच्या काळात औरंगाबाद साहित्य संगीताचे एक महत्त्वाचे केंद्र बनले होते. संगीत मैफिली व मुशायरे इथे सतत होत असत. दिल्ली शहराचे जे वर्णन केले जाते त्या प्रमाणेच ‘दख्खन की दिल्ली’ अशी ओळख औरंगाबादची त्या काळात बनली होती. या वातावरणाचा एक मोठा फायदा सिराज यांना झाला.
सिराज आपल्या आयुष्याच्या उत्तरार्धात आजारी पडले. त्या आजारातच त्यांचे निधन झाले. 16 एप्रिल 1764 मध्ये त्यांनी वयाच्या 52 व्या वर्षी आपली जिवन यात्रा संपवली. सिराज यांचे शिष्य जियाउद्दीन ‘परवाना’ यांनी त्यांचा अंत्यसंस्कार संपूर्ण इतमामात पार पाडला. त्यांच्या कबरीवर एक घुमट बांधला. आजही सिराज यांची मजार औरंगाबादेत नौबत दरवाजा परिसरात पंचकुवा कबरस्तानात उभी आहे.
सिराज यांनी सांसरिक पाश स्वत:भोवती बांधून घेतलेच नव्हते. त्यांचे शिष्यच त्यांना सांभाळायचे. औरंगजेब पुत्र आझम शहा च्या दरबाराचा राजाश्रयही त्यांनी कधी स्विकारला नाही. परिणामी त्यांच्या अभिव्यक्तीवर कुठलाही दबाव आला नाही. पुढच्या पिढीच्या गालिबसारख्या महाकवीला जी राजदरबारी उपेक्षा सहन करावी लागली ती शोकांतिका सिराजची कधी झाली नाही. सिराजच्या फकिरी वृत्तीचा फायदा त्यांच्या काव्याला झाला हे मिर्झा यांचे बारीक निरीक्षण खरंच मार्मिक आहे.
फारसी काव्याचा अभ्यास सिराज यांनी केला होताच पण मिर्झा यांच्या मते दक्षिणेतील लोकांच्या बोलीभाषा, रितीरिवाज, श्रद्धा यांच्या अभ्यासामुळे सिराज यांच्या शायरीला एक अनोखा रंग प्राप्त झाला. आज आपण ज्याप्रमाणे ‘जितके लोकल तितके ग्लोबल’ असं म्हणतो ते सिराजसारख्या प्रतिभावंताला मध्ययुगीन कालखंडातही लागू पडतं हे फार महत्त्वाचे आहे. मराठी संतांनी लोकभाषेत आपल्या रचना केल्या याचा मोठा प्रभाव सिराज यांच्यावर झाला. याचा परिणाम म्हणजे त्यांच्या काव्यात स्थानिक बोलीभाषेतील शब्द येत राहिले.
तुकारामांचा एक अभंग आणि त्याचा सिराजवर पडलेला प्रभाव मिर्झा यांनी दाखवून दिला आहे. तुकाराम महाराजांचा तो अभंग असा आहे, ‘ऐके कैसे झाले भोंदू । कर्म करोनि म्हणती साधू ॥ अंगी लावूनियां राख । डोंळे झांकुनि करिती पाप ॥ ( अभंग क्र. 3247, सार्थ तुकारामाची गाथा, संपादक :विष्णुबुवा जोग महाराज) आता सिराज यांनी असे लिहीले आहे
लगा के खाक बदन पर जो कुई लिया बैराग
वह अपने बर में अजब जाम-ए-हरिर किया
(जाम-ए-हरिर म्हणजे शरिरावर रेशमी वस्त्र)
तुकाराम महाराजांचा काळ हा सिराज यांच्या आधीचा आहे. त्यावरून हा अनुबंध लक्षात येतो.
सिराज सूफी होते पण त्यांना सूफी शायर संबोधण्यास मिर्झा नकार देतात. कारण त्यांच्या कवितेतील शृंगार, जीवनाप्रतीचा रसरशीत उत्साह, निसर्गाबद्दलची ओढ या बाबी त्यांना वेगळं ठरवतात. जीवनातील वास्तवाकडे ते एका प्रेमीच्या नजरेने पाहतात. आपल्या प्रिय व्यक्तीला स्त्री रूपात संबोधण्याची एक पद्धत देशी भाषांमध्ये आढळते ती तशीच सिराज आपल्या अविष्कारात वापरतात. सिराज यांच्या शायरीत प्रेयसी साठी जी संबोधने येतात ती भारतीय भाषांमधली आहेत. उदा. मनहरन, जादूनयन, मोहन इ.
दोन शब्दांना जोडण्यासाठी एक अनोखी पद्धत उर्दूत आहे. त्याचा वापर ज्यांनी सुरवातीच्या काळात करून या शब्दकळेला सौंदर्य प्राप्त करून दिले त्यातील एक अग्रगण्य नाव म्हणजे सिराज. ‘दिल का दर्द’ असे न म्हणता ‘दिल-ए-दर्द’ किंवा ‘गम की शाम’ न म्हणता, ‘शाम-ए-गम’. यामुळे सिराजच्या काव्याला एक अप्रतिम असे सौंदर्य प्राप्त झाले आहे. केवळ दोन शब्दांनाच नाही तर तीन किंवा प्रसंगी चार चार शब्दांनाही असे जोडत सिराज एक वेगळी रचना तयार करतात. उदा. ‘आराम-ए-जान-व-दिल’, ‘खयाल-ए-हलक-ए-जुल्फ-ए-दराज’. सिराज यांची अतिशय गाजलेली गजल ‘खबर-ए-तहय्युर-ए-इश्क सुन’ यातही या प्रकारची सुंदर शब्दरचना आढळून येते.
सिराज हे सूफी होते यामुळे त्यांच्या कवितेला एक गुढ अध्यात्मिक असा रंग आहे. खबर ए तहय्यूर-ए-इश्क याच कवितेतील मतल्यातील (धृवपद) दुसरी ओळ उदा. म्हणून बघता येईल. तो शेर असा आहे
खबर-ए-तहय्यूर-ए-इश्क सुन, न जूनूं रहा न परी रही
न तो तू रहा न तो मै रहा, जो रही सो बेखबरी रही
आता ही ओळ गाताना कव्वाल ‘न तो तू रहा’ म्हणत असताना थांबतात. आणि यात थोडासा बदल करून या ओळीतील अध्यात्मिक गुढ अर्थ श्रोत्यांसमोर उलगडतात. ते असं गातात, ‘न तो तू ‘तू’ रहा, न तो मै ‘मै’ रहा’. यामुळे सिराज यांच्या काव्याचे सौंदर्य अजूनच झळाळून उठते.
जसे आपल्याकडे संत काव्यात विविध अर्थ दडलेले असतात. किर्तनकार ते उलगडून दाखवतो तस तसा त्यावर प्रकाश पडतो. म्हणून ज्ञानेश्वर, तुकाराम यांचे काव्य वाचताना त्यावर कुणी भाष्य केलेले असेल तर त्याचे सौंदर्य उलगडण्यात मदत होते. याच पद्धतीनं सिराजसारखे जे सूफी प्रवृत्तीचे कवी आहेत त्यांच्या कवितांवर सभाष्य टिपणीसह ग्रंथ प्रसिद्ध झाले पाहिजेत. म्हणजे त्यांच्या अर्थाकडे नीटपणे पाहता येईल.
सिराजच्या शायरीचा फार वेगवेगळ्या अंगाने अभ्यास मिर्झा यांनी केला आहे. बोली भाषेतील शब्द वापरण्यात सिराज माहिर आहेत. उदा. ‘ले कर जाता’ असं न म्हणता ते सरळ ‘लिजाता’ म्हणतात. ‘मुझको’ असं न म्हणता ते ‘मुझकुं’ असं लिहीतात. ‘समझ’ असा उर्दू शब्द न वापरता ते सरळ मराठी ‘समज’ असाच शब्द लिहीतात. दगडाला उर्दूत पत्थर म्हणतात पण सिराज मात्र ‘फत्तर’च लिहीणार.
या सगळ्यांतून सिराज यांच्या निमित्ताने भाषिक अस्मितेचाही एक वेगळाच पैलू मोठ्या अग्रहाने मिर्झा आपल्यासमोर ठेवतात. आजही औरंगाबाद ते हैदराबाद या परिसरातील दखनी भाषेला उर्दूचे विद्वान पंडित नावे ठेवतात. आजही या भाषेत लिहीणार्यांना उपेक्षा सहन करावी लागते. अशा काळात या दख्खनी भाषेला मानाचे स्थान देणार्या सिराज औरंगाबादीची भलावण मिर्झा करतात त्याला बरीच सांस्कृतिक कारणे आहेत.
दक्षिणेत औरंगाबाद जवळील खुलताबाद हे सूफी संप्रदायाचे एक मोठे केंद्र राहिलेले आहे. जवळपास 700 वर्षांपासून येथे सूफी तत्त्वज्ञानाची चर्चा चालत आली आहे. सूफी संतांनी यात मोठे योगदान दिले आहे. या सगळ्याचा प्रभाव निश्चितच सिराज यांच्यावर आहे. या परिसरातील सूफींवर हिंदू चालीरिती, सण समारंभ, प्रतिके, प्रतिमा यांचाही प्रभाव पडलेला दिसून येतो. सिराज यांच्या काव्यातील अशी स्थळे मिर्झा यांनी शोधून दाखवली आहेत.
नैन रावन है, अर्जून बाल, पलकें भव घनक भीम की
हमारे दिल की दुख नगरी के राजा रामचंद्र हो
किंवा केशरी रंगांबद्दल लिहीताना आणि धुळधाण हा अगदी खास मराठी शब्दप्रयोग करताना सिराज लिहून जातो
केसरि जामा बदन में उसके देख
दिल हमारा धुलधानी हो गया
एके ठिकाणी तर सिराज यांनी कमाल केली आहे. वेदाध्यायन करण्यासाठी बसलेला ब्राह्मण त्याच्या वेदपठणाची लय, ते एक नादबद्ध संगीत हे सगळं चालू आहे आणि गळ्यात मात्र जानवे प्रेमाचे दिसते आहे म्हणजे
वेद ख्वानी नाला-व-फरियाद की है सुबह शाम
जिस ब्रहमन कुं गले का हार है जुन्नार-ए-इश्क
(नाला-व-फरियाद चा अर्थ रडणे ओरडणे, जुन्नार म्हणजे जानवे)
मीरेची भक्ती भारतीय संस्कृतिक संदर्भात एक अतुलनीय असे उदाहरण आहे. असे उदाहरण आपल्या शायरीत घेताना सिराज यांनी आपल्या प्रदेशातील हिंदू मानसिकतेचा उत्तम अभ्यास केलेला आढळून येतो.
दान-ए-अश्क मीरा तर-ए-पलक में मोहन
रोज समरन है तिरे नाम की माला करने
सिराज यांच्या काव्यातील असे कितीतरी पैलू मिर्झा आपल्या लिखाणात सहज दाखवून जातात. खरं तर त्यांनी या पुस्तकाला जोडलेली ही प्रस्तावना अपुरी आहे. सिराजच्या शायरीवर सविस्तर असे भाष्य त्यांनी देवनागरीत लिहावे.
सिराज सारख्यांच्या दख्खनी भाषेतील शायरीचा अभ्यास भारतीय संस्कृतीच्या दक्षिणेतील एका पैलूचा अभ्यास होय. हे समजून घ्यायला पाहिजे. मूळात उर्दू ही मुसलमानांची भाषा म्हणून आपण तीच्याकडे दूर्लक्ष करतो. पण ही भाषा दिल्लीत जन्मलेली आणि 100 टक्के भारतीय भाषा आहे. जगातील भारत उपखंड वगळला तर कुठलाच मुलसमान उर्दू बोलत नाही. केवळ अरबी लिपी स्विकारल्याने एक मोठा गहजब माजवला जातो. याला उत्तर म्हणून आता उर्दू साहित्याचे देवनागरीत लिप्यांतर अशी एक मोठी मोहिमच चालविण्याची गरज आहे.
सिराज यांचे महत्त्व भावी पिढ्यांतील गालिब सारख्या महाकविंच्या संदर्भात कसे आणि काय होते समजून सांगताना असलम मिर्झा यांनी उर्दूचे अभ्यासक समीक्षक विचारवंत डॉ. जमील जालीबी यांचा एक फार महत्त्वपूर्ण संदर्भ आपल्या पुस्तकात दिला आहे. डॉ. जमील लिहीतात,
‘पूरी उर्दू शायरी के पसमंझर मे ‘सिराज’ की शासरी को रख कर देखा जाए तो वह उर्दू शायरी के रास्ते पर एक मर्कजी जगर पर खडे नजर आते है. जहां से मीर, सौदा, दर्द, मुसहफी, आतिश, मोमिन, गालिब और इकबाल की रचायत के रास्ते साफ नजर आते है. सिराज ने उर्दू शायरी के बुनयादी राग को जगाया है. इसीलिए उन की आवाज सारे बडे शासरों की आवाज, लय और लहजे में मौजूद है.
सिराज यांचे मोठेपण आणि महत्त्व यापेक्षा वेगळ्या शब्दांत काय मांडणार?
(सिराज औरंगाबादी-जीवन, व्यक्तित्व एवं संकलित गजले, प्रकाशक-मिर्झा वर्ल्ड बुक, कैसर कॉलनी, औरंगाबाद, मो. 9325203227, पृ. 203, किंमत रू. 300)