मॅक्स महाराष्ट्र या न्यूज पोर्टलच्या रवी अंबेकरांना मुलाखत देताना केतकरांनी जे तारे तोडले आहेत त्याला खरोखरच तोड नाही.
महाभारतात युद्ध संपल्यावरचा एक प्रसंग आहे. सरोवराच्या पाण्यात दुर्योधन शेवटच्या घटका मोजत निपचीत पडून आहे. त्याला शोधत अश्वत्थामा तिथे जातो. शेवटच्या क्षणी दुर्योधन त्याला सेनापतीपदाचा अभिषेक करतो आणि सूड घ्यायला सांगतो. त्या प्रमाणे अश्वत्थामा पांडवाच्या शिबीरात मध्यरात्री शिरतो. पांडवांचा सेनापती धृष्ट्यद्युम्न (हे नांव राहूल गांधींच्या तोंडून केतकरांनी वदवून दाखवावे.) द्रौपदीच्या पाच मुलांना (पाच पांडवांपासून झालेली पाच मुले. या शिवाय प्रत्येक पांडवाला इतर पत्नीपासून झालेली अपत्ये होतीच.) जवळ घेवून झोपलेला असतो. झोपेत त्या सर्वांची हत्या करून अभिमन्यूची पत्नी उत्तरा हीच्या गर्भावर तो ब्रह्मास्त्र सोडतो. या सगळ्या पापासाठी त्याला शाप मिळतो. त्याच्या कपाळावरचा तेजस्वी मणी देव काढून घेतो. आणि ती भळभळती जखम घेवून अश्वत्थामा फिरत राहतो. अशी ती कथा आहे.
केतकरांना निकालाचा आधीच अंदाज आलेला असावा. कॉंग्रेसचे सगळे बौद्धिक सेनापती एका पाठोपाठ एक अपयशी ठरल्यावर आता शेवटचा बौद्धिक सेनापती म्हणून केतकरांना नेमल्या गेले असावे. त्यांनी भाजपवर सूड उगवायचा म्हणून अश्वत्थाम्या कृतीसारखी दळभद्री भाषा आत्तापासूनच करायला सुरवात केली आहे. 23 मे नंतर केतकरांना हरलेल्या कॉंग्रेसच्या राज्यसभेतील खासदारकीची भळभळती जखम कपाळावर घेवून जगत राहावं लागणार असं दिसतं आहे.
केतकर असं म्हणाले की मोदी काहीही झाले तरी सत्ता सोडणारच नाहीत. 23 मे ला दंगल होईल. विजय मिळाला तर भाजपवाले विजयाच्या उन्मादात माज आल्याने दंगा करतील. पराभव झाला तर निराशेत दु:खात दंगल करतील. पण दंगल करतील हे निश्चित.
केतकरांना असे विचारायला पाहिजे की तूम्ही हे भाकित कशाच्या आधारावर करत आहात? भारतीय लोकशाहीसाठी इतकी दळभद्री भाषा तूमच्या तोंडून कशी काय निघत आहे?
आत्तापर्यंत निवडणूक निकालावर भारतात कधी दंगल झाली आहे का? लोकसभेची 17 वी निवडणूक शेवटच्या टप्प्यात आहे. केवळ पन्नास जागांची निवडणूक राहिली आहे. जवळपास शांततेत मतदान झाले आहे. आधीपेक्षा एखाद दोन टक्के जास्तच मतदान होण्याची शक्यता आहे. जो काही हिंसाचार मतदानाच्या वेळी झाला तोही पश्चिम बंगाल मध्ये जिथे की भाजपची सत्ता नाही. मग केतकर हा आरोप कोणत्या आधारावर करत आहेत?
2014 ते आजतागायत ज्या ज्या राज्यांत विधानसभेच्या निवडणूका झाल्या त्या त्या ठिकाणी सत्ताबदल सहज झाला. भाजपचा पराभव झालेल्या राज्यांमध्ये भाजप मुख्यमंत्र्याने सत्ता सोडण्यास नकार दिला असे एक तरी उदाहरण आहे का? मोदी 13 वर्षे गुजरातचे मुख्यमंत्री होते. त्यांच्या कालखंडात गुजरात राज्यात ज्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका झाल्या त्यात ज्या ज्या ठिकाणी भाजपचा पराभव झाला तिथे इतर पक्षांना सत्तेत येण्यापासून रोकल्या गेले आहे का?
केतकर इतका बौद्धिक थयथयाट का करत आहेत?
याआधी ते असे म्हणत होते की मोदी परत पंतप्रधान होणारच नाहीत. मग आता असं म्हणत आहेत की ते सत्ता सोडणारच नाहीत. मोदीचे पंतप्रधानपद एका आंतरराष्ट्रीय कटाचा भाग आहे.
केतकर कॉंग्रेस पक्षाचे राज्यसभेतील खासदार आहेत. केतकरांनी कॉंग्रेस पक्षाला निवडणुकाच लढवू नका असा सल्ला का नाही दिला? केवळ कॉंग्रेसच कशाला सगळ्या विरोधी पक्षांना त्यांनी असे का नाही सांगितले की मोदी सत्ता सोडणार नाहीतच. आंतरराष्ट्रीय पातळीवर अमुक अमुक इतक्या वर्षांंसाठी मोदींचे पंतप्रधानपद पक्के आहे. मग निवडणुका लढवताच कशाला? सगळ्यांनी मिळून बहिष्कार टाकूत. जगाला एक मोठा संदेश जाईल की मोदींच्या हुकूमाहीच्या विरोधात विरोधी पक्षांनी अतिशय कडक पाऊल चलले आहे.
भाजपला 281 जागा मिळाल्या तरी आपला नैतिक पराभव समजून मोदींनी राजीनामा दिला पाहिजे असे एक विधान केतकरांनी या मुलाखतीत केले आहे. मोदी-भाजप आणि जनता काय करायचे त्यांचे ते पाहून घेतील. जर भाजपला आधीपेक्षा जास्त जागा मिळाल्या तर केतकर काय करतील? किंवा राहूल गांधी काय करतील? केतकरांमध्ये ही हिंमत आहे का की कॉंग्रेसचा पराभव झाल्यास राहूल गांधींचा राजीनामा मागायची?
न्यायालयाचा निकाला विरोधात गेल्यानंतर सत्ता न सोडण्याची खेळी केतकरांच्या प्रिय नेत्या इंदिरा गांधींनी केली होती. ते कदाचित केतकरांच्या इतके डोक्यात घुसून बसले असावे की त्यांना आता वाटते आहे की मोदीही त्यांच्या प्रिय नेत्यांप्रमाणेच पदाला चिकटून राहतील.
कॉंग्रेसचे सगळे भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कर्ण, शल्य (हे सगळे कौरवांचे सेनापती होते) एकट्या दुर्याधनाच्या (राहूल गांधींच्या) अहंकारापोटी धारातीर्थी पडले आहेत. शेवटचा बौद्धिक सेनापती कुमार केतकर अश्वत्थाम्या सारखी सुडाची भाषा बोलतो आहे. 23 मे ला दंगे होण्याची ग्वाही देतो आहे.
निकाल काहीही लागो पण लोकशाहीवर असले दळभद्री आरोप करणार्या केतकरांना त्यांच्या वयाच्या किंवा त्यांच्यापेक्षा ज्येष्ठ एका तरी विचारवंतांने खडसावून विचारले पाहिजे ‘केतकर तूमचे डोके ठिकाणावर आहे काय?’
श्रीकांत उमरीकर जनशक्ती वाचक चळवळ,244-समर्थ नगर, औरंगाबाद 431-001. मो. 9422878575
केतकर हे त्यांच्या वकूबानुसार बोलत आहेत, त्याकडे दुर्लक्ष करणे योग्य ठरेल.
ReplyDeleteकेतकराना हे माहित असेलच कि अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर इंदिराजीनी राजीनामा दिलाच नाही व पंधरा दिवसात आणिबाणी जाहिर करुन विरोधी नेत्याना तुरुंगात टाकले. याच वेळी घटनादुरुस्ती करुन अशी तरतूद केली कि, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, लोकसभाध्यक्ष व पंतप्रधान यांच्या निवडणुकाना न्यायालयात आव्हान देता येणार नाही. याच तरतुदीमुळे सर्वोच्च न्यायालयाने इंदिराजीच्या बाजूने निकाल दिला. यावेळी संसद, न्यायालये, घटना या सर्वांचाच अधिक्षेप झाला होता.
दूर्लक्षच केले असते. पण दंगे होतील हे विधान भयानक आहे. त्याची गंभीर दखल घ्यायला हवी म्हणून लिहीले.
ReplyDeleteकावळ्याच्या शापाने ढोर मरत नाही.
ReplyDelete