Saturday, May 18, 2019

गिरीश कुबेर : एक अर्टिकल तो तबियत से लिखो यारो !



गिरीश कुबेर यांचे लोकसत्तातील ‘अन्यथा’ हे सदर माझ्या आवडीचे आहे. मी ते आवर्जून वाचतो. परदेशातील असे संदर्भ ते नेमके हूडकून काढतात ज्यातून मोदी-अंबानी-भाजप-संघ यांच्यावर नेमका निशाणा साधला जावा.

मोदी पंतप्रधान झाल्यापासून त्यांचे ट्रंप यांच्याशी साम्य कसे आहे हे कुबेरांना आडून आडून सुचवायचे असते. खरं तर त्यांनी ते सरळच लिहावे. पण कुबेर तसे करत नाहीत. त्यांनी टीका जरूर करावी. पण ती करताना ते कधी कधी असं काही लिहून जात आहेत की त्यातून त्यांच्या हेतूबद्दलच शंका यावी.

आज शनिवार 18 मे 2019 रोजी त्यांनी ‘एक पत्थर तो तबियत से उछालो यारों...’ या नावाचा लेख लिहीला आहे. अमेरिकेत व्हर्जिनिया राज्यात लेक्सिग्टन शहरातील रेड हेन नावाचे रेस्तरॉं आहे. येथे ट्रंप यांच्या प्रसिद्धी प्रमुख सारा हकबी सँडर्स आपल्या कुटूंबियांसमवेत गेल्या होत्या. रेस्तरॉंच्या मालकाने त्यांना खाद्यपदार्थ देण्यास नकार दिला. हकबी यांना अपमानित होवून बाहेर पडावं लागलं. अशी ही कथा आहे. पुढे या रेस्तरॉंच्या मालकावर लोकांनी कसा बहिष्कार टाकला, पत्रं पाठवली, धमक्या दिल्या असं एक ट्रंप यांना खलनायक बनविणारे चित्र कुबेर यांनी रंगविले आहे. शेवटी हे रेस्तरॉं बंद ठेवावे लागले. आणि काही दिवसांनी ते उघडणार त्या दिवशी लोकांच्या रांगा लागल्या होत्या, मालकाला वाटले की परत निषेध वगैरे की काय? पण तसे नव्हते लोकांनी धन्यवाद देण्यासाठी फुले देवून स्वागत करण्यासाठी रांगा लावल्या होत्या. शिवाय पाकिटात घालून पैसे या मालकाला देवू केले होते वगैरे वगैरे...

कुबेरांचा लाडका सिद्धांत लोक हुकूमशाहीच्या विरोधात कसे रस्त्यावर आले, आणि त्यांनी कशी ट्रंप यांची दादागिरी एका रेस्तरॉं पुरती संपवली तो त्यांनी रंगवला आहे.

मला लेख आवडला. पण काहीतरी खटकत होते. परत वाचताना पहिल्या परिच्छेदातील एका गोष्टीचा अर्थच लागेना. ट्रंप यांच्या प्रसिद्धी प्रमुख हकबी यांचा नेमका गुन्हा काय? केवळ त्या ट्रंप यांच्या प्रसिद्धी प्रमुख आहेत हा त्यांचा अपराध कसा काय होवू शकतो? अमेरिके सारख्या लोकशाही असलेल्या देशात एखाद्या सार्वजनिक ठिकाणी रेस्तरॉं मध्ये कुणाही ग्राहकाने खाद्य पदार्थ मागितल्यावर त्याला नकार देण्याचे कारण काय? किंवा काही कारणाने आम्ही सेवा देवू शकत नाहीत म्हणून नम्रपणे नकारही देता येतो. ते स्वातंत्र्य रेस्तरॉं मालकाला आहेच. पण अपमानित करण्याचे कारण काय?

आणि याचे नेमके कुठले समर्थन कुबेर करत आहेत? कुबेरांना हे सगळे संदर्भ भारताशी जोडायचा छंद आहे. आपण भरतातील परिस्थितीचा विचार करू. समजा उद्या कॉंग्रेसचा विजय झाला (हे वाचूनच कुबेरांना केतकरांना गुदगुल्या होतील). कॉंग्रेस अध्यक्ष राहूल गांधी यांचे प्रसिद्धी प्रमुख दिल्लीतील एखाद्या भाजप समर्थक व्यक्तीच्या उपहारगृहात गेले. त्या मालकाने राहूल गांधी यांच्या प्रसिद्धी प्रमुखाला मला तूझ्या मालकाबद्दल राग आहे म्हणून अपमानित करून हाकलून लावले तर कुबेर कुणाची बाजू घेतील?

ट्रंप यांच्या प्रसिद्धी अधिकारी हकबी यांनी काही गैर वर्तन केले का? कुणाला शिवीगाळ केली का? मद्यमान करून अनैतिकतेचे काही प्रदर्शन केले का? त्यांनी मागितलेले अन्न नाकारण्याचे कारण काय?

या सगळ्या प्रकरणाचे कुबेर नेमक्या कोणत्या बाजूचे आणि का उदात्तीकरण करत आहेत? खरं तर या प्रकरणाला अजून काही पैलू असू शकतील जे की आपल्याला माहित नाही. त्याच्याशी आपल्याला सध्या फारसे कर्तव्य नाही. एखाद्या लोकशाही देशातील व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी जाते. तिथे वैध मार्गाने आपल्याला हवे त्याची ऑर्डर देते. आणि तो मालक काहीच सबळ कारण नसताना केवळ ट्रंप यांच्या कार्यालयातील अधिकारी म्हणून अपमान करतो? आणि कुबेर सारखा लोकशाही देशातील संपादक त्याचे समर्थन करतो. हा तर मोठा अजब प्रकार झाला.

भारतात मंदिरांमधून सर्वांना प्रवेश मिळावा म्हणून ओरडणारे, अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाने बोंब करणारे हेच लोक आहेत ना? मग सार्वजनिक उपहारगृहात सर्वांना प्रवेश असावा. प्रत्येकाला त्याने मागितलेले आणि उपलब्ध असलेले अन्न मिळावे असं यांना वाटत नाही?

गिरीश कुबरे ‘एक अर्टिकल तो तबियत से लिखो यारो‘. मोदीभक्त अंधळे आहेत म्हणून टीका करताना मोदी विरोधकही आंधळे होत चालले आहेत की काय? 
                 
श्रीकांत उमरीकर  जनशक्ती वाचक चळवळ,244-समर्थ नगर, औरंगाबाद 431-001. मो. 9422878575
 

No comments:

Post a Comment