विवेक, उरूस, मे 2019
बुधवार दिनांक 8 मे रोजी पाकिस्तानातील लाहोरच्या सुप्रसिद्ध दाता दरबार सुफी दर्ग्यात कट्टरपंथियांनी बॉंबस्फोट केले. त्यात दहा जण मृत्यूमुखी पडले असून 20 जण गंभीर जखमी झाले आहेत. हा हल्ला तालिबान्यांनी केला आहे. तशी त्यांनी कबुलीही दिली आहे. हे तेच तालिबानी आहेत ज्यांनी अफगाणिस्तानातील बामियानातील सर्वात मोठ्या प्राचिन बुद्ध मुर्ती मिसाईल्स लावून उडवल्या होत्या. हेच कट्टरपंथी तालिबान आता पाकिस्तानातील सुफी संप्रदायाच्या विविध श्रद्धा स्थानांवर हल्ले करत आहेत.
याच ठिकाणी यापूर्वीही आयसिस या कट्टरपंथीय गटाने 2010 मध्ये आत्मघाती हल्ला केला होता. त्यात50 जण ठार झाले होते.
11 व्या शतकातील सुफी संत अबुल हसन अली हुजविरी जे दाता गंज बक्ष या नावाने ओळखले जातात यांचा हा दर्गा आहे. दक्षिण आशियातील सर्वात मोठा दर्गा म्हणून ही जागा प्रसिद्ध आहे. ‘दाता दरबार’ या लोकप्रिय नावाने हा दर्गा ओळखला जातो. भारतातील सर्वात प्रसिद्ध अजमेरचे सूफी संत ख्वाजा मोईनोद्दीन चिश्ती यांनी पण या दाता दरबार मध्ये दाता गंज बक्ष यांच्या कबरीपुढे माथा टेकवला होता. त्यांचे आशिर्वाद घेतले होते. अगदी आत्ता आत्तापर्यंत नवाज शरीफ, इमरान खान पर्यंतचे पंतप्रधान इथे माथा टेकवत आले आहेत.
या दर्ग्यात कव्वाल्ली महोत्सव भरवला जातो. जगभरातील कव्वाल इथे आपली हजेरी लावणे प्रतिष्ठेचे समजतात. इथे संगीत परंपरा मोठ्या निष्ठेने जतन केली जाते. या परिसरातील कव्वाली गायनाची एक वेगळी शैली आहे. शास्त्रीय संगीताचा पाया असलेली ही कव्वाली आज फारच थोड्या गायकांनी आत्मसात केली आहे. भारतातील हैदराबादचे कव्वाल या शास्त्रीय परंपरेत गातात.
या सुफी संतांबाबत अजून एक मुद्दा इतरांपेक्षा वेगळा आणि वैशिष्ट्यपूर्ण आहे. दाता गंज बक्ष यांनी ‘कश्फुल महजूब’ या नावाचा लिहीला. सूफी प्राचीन तत्त्वज्ञान विषयक ग्रंथ अरबी भाषेत उपलब्ध होते. हा फारसी भाषेतील सूफी तत्त्वज्ञानाचा पहिलाच ग्रंथ होय. म्हणून याला अतोनात महत्त्व आहे. मोगल दरबाराची अधिकृत राजभाषा फारसी होती. मोठ-मोठ्या विद्वानांना चर्चा करण्यासाठी सगळ्यात जूना फारसी ग्रंथ म्हणून हाच उपयोगी पडत आला आहे. सम्राट अकबराने तर केवळ तत्त्वचर्चा करण्यासाठी वेगळी इमारत बांधली होती. तिथे हा ग्रंथ सन्मानाने प्रतिस्थापीत करण्यात आला होता. पाश्चात्य विद्वान निकलसन यांनी 1914 मध्ये या ग्रंथाचा इंग्रजीत अनुवाद प्रसिद्ध केला. पुढे रशियन अभ्यासक झोकोसिस्की यांनी 1920 मध्ये याची रशियन आवृत्ती सिद्ध केली. या ग्रंथात सूफी साधनेच्या श्रद्धा, तत्त्वे, पहिल्या युगापासून ते समकालीन सूफींची संक्षिप्त चरित्रे यांचा समावेश आहे. विभिन्न सुफी संप्रदाय आणि त्यांच्याशी संबंधीत साधकांची परिस्थिती, सूफींचे नियम, त्यांची प्रगतिस्थळे आणि पारिभाषिक शब्दावलींचे विवेचन या ग्रंथात समाविष्ट आहे. (सूफी तत्त्वज्ञान : स्वरूप आणि चिंतन, लेखक-डॉ. मुहम्मद आजम, पद्मगंधा प्रकाशन, पुणे. पृ. 346)
इथले संगीत व सूफी तत्त्वज्ञान विषयक ग्रंथ हा कट्टरपंथी इस्लामी अतिरेक्यांना सगळ्यात खटकणारा मुद्दा आहे. त्यामुळेच या दर्ग्यावर हल्ले केले जातात. या दर्ग्यात ज्या प्रमाणे कव्वाल्यांमधून संगीताचे जतन केले जाते तसेच इथे मोठे ग्रंथालय आहे. त्या ग्रंथालयात विविध तत्त्वज्ञान विषयक जूने-पुराणे ग्रंथ सांभाळून ठेवले आहेत.
धार्मिक श्रद्धांसोबतच संगीत कला तत्त्वज्ञानाचे केंद्र म्हणून हा दर्गा प्रसिद्ध आहे. ही सगळी समृद्ध अशी ज्ञानाची- कलेची परंपरा नष्ट करणे हे कट्टरपंथीय इस्लामचे पहिले उद्दीष्ट आहे. भारतात शेकडो वर्षे मंदिरे शिल्पकला ग्रंथ यांच्यावर हल्ले होत गेले. इस्लामधील सुफी हे सुद्धा कट्टरपंथियांच्या रडारवर आलेले आहेत. त्यांच्यावर कठोर हल्ले केले जात आहेत. आणि नेमकी हीच जागतिक चिंतेची बाब आहे.
जगभरात विविध देशांतील तत्त्वज्ञान, कला, शिल्प, संगीत याबाबत एक मोठ्या प्रमाणावर जनजागृती होताना दिसत आहे. जगभरचे संशोधक अभ्यासक आपल्या आपल्या देशाच्या सीमा ओलांडून इतर देशांतील अशा बाबींचा अभ्यास करताना दिसून येत आहेत. अभ्यासकां सोबतच जगभरचे पर्यटक अशा धार्मिक श्रद्धा ठिकाणांना आवर्जून भेट देतात. तेथील परंपरा श्रद्धा समजून घेतात. तत्त्वज्ञानाची तोंड ओळख करून घेतात. युरोपमध्ये अशा पर्यटनासाठी मोठ्या प्रमाणात सामान्य लोक उत्सूक आहेत.
जेंव्हा दाता दरबार दर्ग्यावर हल्ला होतो तेंव्हा त्याची वेदना जगभर उमटते त्याचे कारण हेच आहे. जगभरच्या सामान्य श्रद्धाळू रसिक कलावंत वर्गाला अशा ठिक़ाणांबाबत आस्था वाटत असते. भौतिक प्रगती साधलेला एक बर्यापैकी मध्यमवर्ग आता अशा बाबींकडे वळला आहे. त्यासाठी तो जगभर पर्यटक म्हणून फिरतो आहे. त्याला जगभरातील कला संस्कृती धार्मिक समजूती यांना डोळसपणे समजून घेण्यात रस आहे. त्याचा नव्याने अन्वयार्थ लावण्यात आपली बुद्धी तो खर्च करू पाहतो.
कराचीचे कव्वाल अमजद साबरी यांची हत्या या पूर्वी पाकिस्तानात करण्यात आली, शाहबाज कलंदर दर्ग्यात बॉंबस्फोट करण्यात आले आणि आता दाता दरबार दर्ग्यात बॉंब स्फोट झाले. याचा आपण कडाडून निषेध केला पाहिजे. ही जी तालिबानी वृत्ती आहे तीचा नायनाट केला गेला पाहिजे.
पाकिस्तानात संगीतावर मोठे हल्ले होत आहेत. यामूळे संगीतकार, गायक, रसिक, वादक कलाकार हे भयभीत चिंताग्रस्त झाले आहेत. पाकिस्तानातील संगीतावरील हल्ल्यांचा विषय घेवून जवाद शरीफ नावाच्या तरूणाने एक सुंदर माहितीपट ‘इंडस ब्लूज’ नावाने तयार केला. सध्या विविध जागतिक चित्रपट महोत्सवात तो दाखवला जात आहे. त्याला कैक पुरस्कारही मिळाले आहेत. जूनी पुराणी वाद्ये सिंधू नदीच्या खोर्यात कशी संपूष्टात येत चालली आहेत. वादकांना किमान प्रतिष्ठा तर सोडाच खायला पण भेटायची मारामार आहे. शिवाय त्यांच्यावर हल्ले होत आहेत. वाद्य जाळून टाकली जात आहेत. सध्या आख्ख्या पाकिस्तानात एकच सारंगी वादक जिवंत शिल्लक राहिला आहे. अशा 24 दूर्मिळ वाद्यांपैकी 9 वाद्यांचा वेध या माहितीपटात घेतला आहे.
दाता दरबार दर्ग्यावरील हल्ला हा भारतीयांसाठी चिंतेचा विषय यामुळे आहे की सूफी तत्त्वज्ञान, संगीत, मोगल स्थापत्य या सगळ्या गोष्टी ज्यावर हे हल्ले होत अहोत हे सगळं आपल्याशी निगडीत आहे. नव्हे आपल्यात पूर्णपणे मिसळून गेले आहे. इतकंच नव्हे तर आपल्या संस्कृतीचा परंपरेचा ते एक अभिन्न असे अंग बनून आहे. त्यामुळे हा हल्ला स्वाभाविकच आपल्यावरचाच हल्ला असतो.
कराची मधील सिंधी संस्कृती, पंजाबातील संस्कृती या भारतापासून वेगळ्या काढताच येत नाहीत हे कट्टरपंथीय इस्लामचे खरे दुखणे आहे. ज्या भारतीयांबद्दल ते द्वेष करतात त्या भारतीय परंपरेची पाळेमुळे या प्रदेशातील इस्लाममध्ये खोल रूजलेली आहेत. ती उपटून कशी काढणार?
जगाला असे वाटत होते की इस्लामने भारतावर आक्रमण केले आणि येथील कित्येक लोकांना धर्मांतर करायला लावून मुसलमान केले. वरवर हे खरेही आहे. जगात इंडोनेशियाच्या खालोखाल मुस्लिम लोकसंख्या भारतात आहे. इतके तर लोक बाहेरून येणे शक्यच नाही. तेंव्हा भारतातील मुसलमान हे मूळचे इथलेच आहेत. आता हळू हळू काळावर मात करून या प्रदेशातील इस्लामवरच येथील समृद्ध संस्कृती परंपरा यांचा प्रभाव पडल्याच्या खुणा स्पष्ट दिसत आहेत. त्यांना नष्ट करता येणं शक्य नाही हे कट्टरंपंथियांनी ओळखले पाहिजे. भारत आता सार्वभौम प्रजासत्ताक लोकशाही देश आहे. आधुनिक देश आहे. येथे आता मध्ययुगीन कालखंडातील धर्मांधपणा शक्य नाही. पण पाकिस्तानसारखा देश जो गेली 7 दशके चाचपडतच आहे तेथे हे हल्ले अजून चालूच आहेत. हड्डप्पा मोहेंजदरो सारख्या प्रचीन संस्कृतीची ओळख सांगणारी शहरे या भागात सापडली. सिंधू नदीचा समृद्ध संस्कृतीचा हा प्रदेश. कट्टरपंथीयांना येथील खाणाखुणा नष्ट करण्याची दुष्टबुद्धी होते आहे.
केवळ भारतच नव्हे तर जगभरच्या पत्रकार, लेखकांनी या हल्ल्यांचा कडक निषेध केला आहे.
श्रीकांत उमरीकर जनशक्ती वाचक चळवळ,244-समर्थ नगर, औरंगाबाद 431-001. मो. 9422878575
No comments:
Post a Comment