लोकसभा निवडणुकीची तिसरी फेरी पार पडली. एकूण 302 मतदारसंघात आत्तापर्यंत मतदान झाले. झालेले मतदान एकूण सरासरीपेक्षा जास्त असल्याचे आकडेही एव्हाना हाती आले आहेत. ज्या भागामध्ये मतदानाबाबत शंका होत्या, गोंधळाची शक्यता होती, रक्तपाताची भिती व्यक्त होत होती तिथेही शांततेत मतदान पार पडले. झारखंड, छत्तीसगढ सारखा नक्षली प्रभावी प्रदेश, कश्मिर, पश्चिम बंगाल येथे मोठ्या प्रमाणात हिंसाचार पूर्वी झालेला होता. या वेळेसे सर्वत्र किरकोळ अपप्रकार वगळता मतदान शांततेत पार घडले.
दोन तृतियांश जागांवर मतदान पार पडले आहे. शक्यता आहे उर्वरीत भागांतही अशाच प्रकारे मतदान होईल. मग प्रश्न उपस्थित होतो कॉंग्रेसचे खासदार आणि एकेकाळचे पत्रकार राहिलेले मा. कुमार केतकर सारख्यांनी निवडणुकाच होणार नाहीत ही भिती कशाच्या आधारावर व्यक्त केली होती? मोदी हुकूमशहा आहेत ते निवडणुका घेणारच नाहीत हा आरोप का केला गेला होता?
2014 ला मोदी निवडुन आल्यानंतर भारतात 27 निवडणुका विधानसभांच्या पार पडल्या. यातील एक तरी निवडणुक दिलेल्या मुदतीपेक्षा लांबली काय? एका तरी निवडणुकीत पूर्वीपेक्षा जास्त हिंसाचार झाला, मतदानाचे प्रमाण अत्यल्प राहिले असे काही घडले का? मग हा आरोप नेमका कोणत्या आधारावर केला गेला?
जम्मु कश्मिरमध्ये तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाही या नविन सरकारने घेवून दाखवल्या. कश्मिर विधानसभेची निवडणुक सध्या लांबलेली आहे. इतका एक अपवाद वगळता देशभरात कुठलीही निवडणुक लांबली नाही. कश्मिरात लोकसभेच्या निवडणुका बाकी देशासोबत होत आहेत. अलीकडच्या काळातील कदाचित ही पहिलीच निवडणुक असावी ज्यावेळी संपूर्ण 543 मतदारसंघात निवडणुक होत आहे. मग असला आरोप केतकरांसारखे विद्वान का करतात?
दुसरा एक आरोप असा आहे की पराभव झाल्यावर मोदी सत्ता सोडणारच नाहीत. आता याचा खुलासा प्रत्यक्ष मोदींचा पराभव झाल्यावरच होवू शकेल. पण आत्तापर्यंत ज्या ज्या राज्यांमध्ये भाजपचा पराभव झाला तेथील सत्ता भाजपने सोडलीच नाही असे कुठे घडले आहे का? कर्नाटकात भाजपाने अट्टाहासाने सरकार बनवले. मुख्यमंत्री म्हणून येदूरप्पा यांनी शपथ घेतली. पण त्यांना बहुमत सिद्ध करता आले नाही तेंव्हा महिन्याच्या आतच राजीनामा द्यावा लागला. आणि कुमारस्वामी यांनी कॉंग्रेसच्या पाठिंब्यावर सरकान बनवून मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. गेली आठ महिने हे सरकार चालू आहे. स्वत:ला सत्ता भेटावी म्हणून धच्चोटपणा भाजपने केला हा आरोपही मंजूर करू. पण जेंव्हा सभागृहात बहुमत सिद्ध करता आले नाही तेंव्हा मुकाट राजीनामा देवून कुमारस्वामींच्या सत्तास्थापनेचा मार्ग भाजपच्या येदूरप्पांना मोकळा करावा लागला. हे सगळे समोर असताना कुमार केतकर मोदी सत्ता सोडणार नाहीत असा आरोप का करतात?
1975 मध्ये अलाहाबाद उच्च न्यायालयाचा निकाल विरोधात गेल्यावर केतकर ज्यांची आरती ओवाळतात त्या इंदिरा गांधींनीच सत्ता न सोडता आणीबाणी लादून आपण हुकूमशहा आहोत हे सिद्धच केले होते. त्या इंदिरा गांधींचे आणि विशेषत: आणीबाणीचे समर्थन करणारे कुमार केतकर मोदींवर हुकूमशहा असल्याचा आरोप करतात तेंव्हा मोठी गंमत वाटते.
मोदी पंतप्रधान होणे हा आंतरराष्ट्रीय कटाचा भाग असल्याचा आरोप केतकर करतात. खरं म्हणजे मोदी हुकूमशहा आहेत म्हणून तथ्यहीन टीका करणे हाच एक मोठ्या कटाचा भाग आहे की काय अशी शंका आता येवू लागली आहे.
दहा वर्षांपूर्वी केतकरांना ज्येष्ठ पत्रकार अनंत भालेराव स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. सध्याची जागतिक परिस्थिती यावर बोलताना भाषणाच्या शेवटी अचानक एक वाक्य केतकर बोलून गेले. ‘... सध्यातरी जगात एकच माणूस विचार करतो आहे. आणि तो म्हणजे बराक ओबामा.’
ज्याचा किमान अभ्यास आहे अशी कुणीही व्यक्ती बराक ओबामा यांना विचारवंत म्हणून स्विकारेल का? अमेरिकेत सतत सुमार लोकच अध्यक्षपदी विराजमान झालेले आहेत. त्यातल्या त्यात ओबामा शहाणे असं फारतर म्हणता येईल. मग अशा परिस्थितीत कुमार केतकर बराक ओबामा यांचे कौतूक करताना, ‘... जगात सध्या एकच माणूस विचार करतो आहे’ असं करतात तेंव्हा ते कसे पटणार? असं बोलणं म्हणजे आंतरराष्ट्रीय कटाचा भागच वाटू लागतो. म्हणजे ओबामांचे कौतुक करणे आणि आपल्या देशात लोकशाही मार्गाने मिळालेले पंतप्रधानपद कटाचा भाग म्हणणे हे काय कोडे आहे?
कालपर्यंत केतकर केवळ पत्रकार होते. त्यामुळे त्यांनी विविध वेळी भाषणांमधून मोदी भाजप संघावर आरोप करणे समजू शकत होतो. पण आता ते सगळ्यात जून्या पक्षाचे राज्यसभेत अधिकृत प्रतिनिधी आहेत. आताही ते केवळ बीनबुडाचे आरोप करत तोंडाची वाफ दवडणार असतील तर त्यांना कुणी गांभिर्याने घेणार नाही. ज्या पद्धतीनं माध्यमे मोदी-भाजपची बाजू घेणे किंवा विरोध करणे असा आंधळेपणा करत आपली विश्वासार्हता गमावून बसले आहेत तसेच केतकरांचे होईल.
लोकसभा निवडणुक म्हणजे एक मोठी संधी केतकरांसारख्या विचारवंतांना होती. भाजप मोदी विरोधात देशभर एक मोठी वैचारिक आघाडी ते उघडू शकत होते. काही महत्त्वाच्या मुद्द्यांच्या आधारे भाजप संघाला घेरण्याचे काम सहज शक्य होते. तर तेही करण्यात ते कमी पडत आहेत.
केतकरांना ‘सुमार केतकर’ म्हणून जे ट्रोलींग समाजमाध्यमांवर केलं जातं त्यासाठी ते स्वत:च जबाबदार आहेत. आत्तापर्यंत शांततेत पार पडलेल्या निवडणुका हा ‘निवडणुका होणारच नाहीत’, ‘मोदी हुकूमशहा आहेत’ या केतकरांच्या आरोपातील खोटारडेपणाचा मोठाच पुरावा आहेत.
श्रीकांत उमरीकर
जनशक्ती वाचक चळवळ,244-समर्थ नगर, औरंगाबाद 431-001. मो. 9422878575
sahamat aahe.
ReplyDeleteकेतकरांबद्दल न बोललेले बरे परंतु इंदिराजींबद्दल आपले आणीबाणी संदर्भातील लिखाण वस्तुस्तिथीस धरून नाही.प्रत्यक्षात जेपी नी पोलीस वगैरेंना संप करण्याबद्दल वक्तव्य बिहारमध्ये केले ह्यावर तत्कालीन कायदेतज्ञ नानी पालखीवाला, रजनी पटेल आणि सिध्दार्थन शंकर रे ह्यांनीलेखी सल्ला दिला होता, bhal patankar
ReplyDeleteकाय सल्ला दिला? आणीबाणी जाहिर करा?
ReplyDelete