उरूस, पुण्यनगरी, 6 डिसेंबर 2015
भारतावर परकियांचे राज्य होते तेंव्हा त्यांच्या विरूद्ध लढून शहिद झालेल्यांना हुतात्मा संबोधले जाते. पण आपल्याच सरकारविरूद्ध आंदोलन करावे लागले, त्यात आपल्याच सरकारने गोळीबार केला, आपलेच भाऊबंद शहीद झाले तर त्यांना काय संबोधायचे?
परक्यांशी लढताना येणारं
पवित्र मरण
आमच्या वाट्याला येणार नाही
आपल्याच लोकांनी केलेल्या वारांनी
ते बाटल्या शिवाय राहणार नाही
पण आई
तूझं काळीज मात्र भगतसिंगाच्या आईचं असू दे !
आजच्या तरूणांची ही व्यथा आहे.
10 डिसेंबर 1986 रोजी कापूस प्रश्नी परभणी-हिंगोली रस्त्यावरील सुरेगाव इथे आंदोलन करणार्या शेतकर्यांवर महाराष्ट्र पोलिसांनी गोळीबार केला. त्यात ज्ञानेश्वर टोणपे, निवृत्ती कर्हाळे व परसरामजी कर्हाळे हे तीन शेतकरी शहीद झाले. हा असंतोष का उठला होता? अचानक झालं का हे सगळं?
फुले शाहू आंबेडकरांच्या या महाराष्ट्रात बरोबर 29 वर्षांपूर्वी कापूस प्रश्नावर शेतकर्यांचा भडका उठला. गेल्या वर्षी मिळाले होते तितकेही दर देण्यास महाराष्ट्र सरकार तयार झाले नाही. शंकरराव चव्हाण तेंव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. विरोधी पक्षात असलेल्या शरद पवार यांनी आपला समाजवादी कॉंग्रेसपक्ष नुकताच पंतप्रधान राजीव गांधी यांच्या उपस्थितीत कॉंग्रेसमध्ये विलीन केला होता. ही घटना याच कापसाच्या परिसरात औरंगाबादेत घडली. ज्यांना शेतकर्यांच्या प्रश्नाची नाडी कळते असे मानले जाते त्यांनाही शेतकर्यांच्या या असंतोषाचा सुगावा लागला नव्हता.
महात्मा गांधींच्या जयंतीदिनी 2 ऑक्टोबरला अकोल्यात शेतकरी संघटनेने कापूस परिषद घेतली. नोव्हेंबर मध्ये चांदवड येथे प्रचंड मोठे महिला अधिवेशन पार पडले. 23 नोव्हेंबरला अकोला, बुलढाणा, यवतमाळ, अमरावती, परभणी, नांदेड, हिंगोली या कापसाच्या पट्ट्यात दिवसभराचे चक्काजाम आंदोलन शेतकर्यांनी केले. लाखो शेतकरी त्यात सहभागी झाले. कापसाच्या प्रश्नावर शेतकर्यांचा प्रचंड असंतोष उफाळून येत होता. 7 डिसेंबर पासून बेमुदत रस्ता रोको करण्याचे शेतकर्यांनी ठरविले. म्हणजे 2 ऑक्टोबर पासून 7 डिसेंबर अशी तब्बल दोन महिन्याची मुदत सरकारला मिळाली होती. या काळात शेतकर्यांच्या मागण्या संदर्भात सरकाने काय पाऊल उचलले?
सरकारने एकच तातडीने गोष्ट केली. ती म्हणजे शेतकर्यांची जे नेते होते, या भागातील कार्यकर्ते होते त्यांची धरपकड करून त्यांना तुरूंगात टाकले. तेंव्हा शेतकरी संघटनेचे परभणी जिल्ह्याचे प्रमुख असलेले ऍड. अनंत उमरीकर यांनी आपल्या पुस्तकात लिहून ठेवलं आहे की, ‘मी पोलिसांना सांगत होतो. तूमचा निर्णय चुकीचा आहे. सर्व प्रमुख कार्यकर्त्यांना तुरूंगात डांबून टाकलंत तर रस्त्यावर जमा होणार्या हजारो लाखो कार्यकर्त्यांवर नियंत्रण कोण ठेवणार? त्यांना मार्गदर्शन कोण करणार? पण पोलिसांनी काहीही ऐकलं नाही. आम्हा सर्व प्रमुख कार्यकर्त्यांना जिंतूर रोडच्या मुख्य तुरूंगात परभणी येथे अटक करण्यात आली.’
7 डिसेंबर पासून आंदोलनास सुरवात झाली. शेकडो शेतकर्यांनी रस्त्यावर उतरणं पसंद केलं. शेतकर्यांना पकडून तुरूंगात टाकण्याची मोहिम सरकारने चालविली. पण तुरूंग भरून गेला. आता इतक्या लोकांना ठेवायचं कुठे? 9 डिसेंबरला पकडून आणलेल्या शेकडो शेतकर्यांना मैदानावर उघड्यावर डांबून ठेवण्यात आलं. जेवणाची सोय करणं शक्यच नव्हतं. खाण्याची पाकिटं दिली. शेवटी या सगळ्या शेतकर्यांना बाया बापड्यांना मध्यरात्री अचानक सोडून देण्यात आलं. इतक्या रात्री जायचं कुठं? आम्हाला निदान रात्रभर तरी काही आडोसा द्या रहायला. आम्ही सकाळी निघून जातो असं गरीब बाया बापड्या म्हणत असताना या गोरगरीब जनतेवर पोलिसांनी अमानुष लाठीमार सुरू केला. किती आश्चर्य पहा. पकडून आणलं सरकारनंच. त्यांची सोय लावता येत नाही हे पाहून त्यांना हाकलून लावलं परत सरकारनंच. शिवाय त्यांच्यावर लाठीहल्ला केला सरकारनंच. पोलिसांच्या लाठीहल्ल्याने जायबंदी झालेले हे बहादूर शेतकरी भाऊ बहिणी बिलकूल न घाबरता आपआपल्या गावी कसेबसे परतले आणि त्यांनी इतरांना आंदोलन अजूनच तीव्र करण्याची प्रेरणा दिली.
आता तर परिस्थिती पूर्ण हाताबाहेर गेली. 10 डिसेंबरला सुरेगाव पाटीला मुख्य रस्त्यावर साधारण सकाळी 9 च्या सुमारास शेतकरी गोळा व्हायला सुरवात झाली होती. आजूबाजूच्या गावांतून फार मोठ्या प्रमाणात शेतकरी गोळा होत आहेत ही खबर पोलिसांना लागली. त्यांनी आंदोलन आवरतं घ्या म्हणून जमा झालेल्या शेतकर्यांशी हुज्जत घालायला सुरवात केली. महिला आघाडीच्या कार्यकर्त्या अंजली पातूरकर व शेतकरी कार्यकर्ते दत्तराव नाईक यांच्या पत्नी लीलाताई या शेतकरी मायबहिणींसमोर भाषण करत होत्या. पोलिसांनी जमावर अंदाधुंद लाठीहल्ला सुरू केला. जमाव प्रक्ष्ाुब्ध झाला. लोकांची संख्या वाढत चालली हे पाहून गोळीबार सुरू केला. याच गोळीबारात तीन शेतकर्यांचा मृत्यू झाला. गोळीबाराचे समर्थन करावे म्हणून दोन बस पोलिसांनीच जाळून टाकल्या. बाजूला दत्तराव नाईक यांची पिठाची गिरणीही जाळली.
पुढे चौकशीत सरकाने असे सांगितले की जमाव हिंस्र झाला होता. त्यांनी 12 बोअरच्या बंदूकीतून पोलिसांवर गोळीबार केला. जाळपोळ केली. पोलिसांवर दगडफेक केली. म्हणून आम्हाला गोळीबार करावा लागला. शिवाय दोन पोलिसही या लोकांनी मारून टाकले.
सरकारचे पितळ चौकशी अहवालात पुर्ण उघडे पडले. आजूबाजूला सगळा काळ्या मातीचा प्रदेश. तिथे फेकायला दगडं कुठून मिळणार? ज्यांची गिरणी जाळली ते दत्तराव नाईक स्वत: आंदोलनात आधीच तुरूंगात जावून बसलेले. त्यांची पत्नी धीरपणे भाषण करते आहे. त्यांची गिरणी जमाव जाळणार कसा? लोकांनी गोळीबार केला तर त्या बंदूका कुठे गेल्या? जे पोलिस मेले असा दावा सरकाने केला होता ते दोन पोलिस गावकर्यांनी आपल्या घरात दडवून ठेवले होते. कारण पोलिसच लोकांच्या प्रचंड संतापाला घाबरून गेले होते. हे दोन पोलिस जर बाहेर दिसले असते तर त्यांना लोकांनी ठेचून मारले असते अशी त्यांनाच भिती होती.
इतकेच काय पण हुतात्मा परसरामजी कर्हाळे यांचा मुलगा पाणीपुरवठा विभागात नौकरी करत होता. त्याच्या अंगावर खाकी कपडे होते. कामावरून परतत असताना त्याला वडिलांच्या मृत्यूची बातमी समजली. तो वडिलांचा मृतदेह ताब्यात घेण्यास गेला असता पोलिसांनी त्याला परवानगी दिली नाही. त्याच्या अंगातील कपड्यांमुळे जमाव त्याच्यावरही धावून जाईल अशी भिती खुद्द पोलिसांनाच वाटत होती.
सरकारने पोलिसांना हताशी धरून केलेले हे पाप त्यांच्या इतके अंगाशी आले की पुढे 6 दिवस या परिसरात एकाही पोलिसाची सरकारी प्रतिनिधीची फिरायची हिंम्मत होईना. लोक प्रचंड चिडलेले. सगळी वाहतूक रस्त्यावर झाडं टाकून ठप्प करून ठाकलेली. तुरूंगात असलेल्या सर्व शेतकरी कार्यकर्त्यांना बाहेर सोडणं शासनाला भाग पडलं. पत्रकारांना सोबत घेवून हे कार्यकर्ते या परिसरात लोकांना भेटी देत फिरले. शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांनी स्वत: येवून हुतात्म्यांच्या घरी जावून सांत्वन केलं. परत आंदोलन झालं तर आम्ही स्वत: आणि आमची पोरंही रस्त्यावर येवूत असं जेंव्हा या हुतात्म्यांच्या वीर पत्नींनी सांगितलं तेंव्हा तर उपस्थितीतांच्या तोंडातून शब्दच बाहेर पडत नव्हते.
आज बरोबर 29 वर्षांनीहि शेतकऱ्याची भयानक परिस्थिती आहे. या हुतात्म्यांची स्मारकं लोकांनी वर्गणी गोळा करून उभारली आहेत. दरवर्षी या हुुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी 10 डिसेंबरला लोक जमा होतात. कापूस आंदोलनातील या हुतात्म्यांना विनम्र अभिवादन !