Sunday, November 8, 2015

मराठी रंगभूमी दिन ! नाट्यगृह मात्र दीन ...!!

उरूस, पुण्यनगरी, 8 नोव्हेंबर 2015

नुकताच महाराष्ट्रात ‘मराठी रंगभूमी दिन’ साजरा झाला. बरोब्बर 172 वर्षांपूर्वी 5 नोव्हेंबर 1843 ला विष्णुदास भावे यांच्या ‘सीता स्वयंवर’ या नाटकाचा खेळ सांगलीत पटवर्धनांच्या राजवाड्यात साजरा झाला. मराठी नाटकाचा हा सादर झालेला पहिलाच प्रयोग. त्यामुळे 5 नोव्हेंबर हा दिवस ‘मराठी रंगभूमी दिन’ म्हणून साजरा केला जातो. एका ज्येष्ठ नटाला ‘विष्णुदास भावे सुवर्ण पदक’ देवून त्याचा सन्मान केला जातो. ज्येष्ठ नट विक्रम गोखले यांना या वर्षी हे पदक अभिनेत्री फैय्याज यांच्या हस्ते सांगलीत बहाल करण्यात आले. 

महाराष्ट्रात ठिक ठिकाणी विविध कार्यक्रम सादर झाले. मराठी माणूस नाट्यवेडा आहे असं म्हणायची पद्धत आहे. त्यामुळे आपण सगळे आपल्या नाट्यवेडाचे प्रदर्शन केले. एकदिवसाचे वेड ओसरले की आपण भानावर येतो. आणि भानावर येवून पाहिले की काय परिस्थिती दिसते? मुंबई पुणे ठाणेचा अपवाद वगळला तर उर्वरीत महाराष्ट्रात नाट्य चळवळ जवळपास थंडावली आहे. महाराष्ट्र शासनाच्या वतीने नाट्य स्पर्धा घेतल्या जातात. त्यासाठी महाराष्ट्रातून एकूण 350 संस्थांनी अर्ज दाखल केले आहेत. म्हणजे इतके नाटकं होतीलच याची खात्री नाही. पण पूर्वी 200 पर्यंत अर्ज यायचे  त्यामानाने हा आकडे उत्साह वाढविणारा आहे. एकूण 19 केंद्रांवर ही स्पर्धा होणार आहे. शासनाचे आर्थिक पाठबळ आहे म्हणून निदान एवढी तरी हालचाल दिसते आहे. विद्यापीठाच्या पातळीवर युवक महोत्सवांत एकांकिका सादर केल्या जातात. 20-20 च्या जमान्यात कसोटीला उतरती कळा लागावी तशी पूर्ण दोन किंवा तीन अंकी नाटकांना उतरती कळा लागली आहे.
 
सगळ्यात पहिल्यांदा महाराष्ट्रातील नाट्यगृहांची स्थिती काय आहे ते पाहिले पाहिजे. मुंबई, ठाणे, पुणे परिसर वगळला तर उर्वरीत महाराष्ट्रात चांगली नाट्यगृह आहेत का? छोटी गावं आपण तात्पुरती बाजूला ठेवू. ज्या शहरांमध्ये महानगर पालिका आहे म्हणजे तेथील लोकसंख्या किमान पाच लाखांपेक्षा जास्त आहे. मग इथे एखाद्या चांगल्या नाट्यकृतीसाठी हजारभर प्रेक्षक सहज मिळायला पाहिजे. त्यांच्यासाठी बसायला चांगले नाट्यगृह हवे. उत्तर महाराष्ट्रात नाशिक, धुळे, जळगांव विदर्भात अकोला, अमरावती, नागपुर, चंद्रपुर तर मराठवाड्यात औरंगाबाद, नांदेड, परभणी, लातूर येथे महानगरपालिका आहेत. पश्चिम महाराष्ट्रात नगर, सांगली, कोल्हापुर, सोलापुर ही मोठी शहरं महानगरपालिकांची आहेत. म्हणजे पुण्या मुंबईच्या बाहेर महाराष्ट्रात किमान पंधरा ठिकाणी लोकसंख्येचा विचार केला तर मोठ्या प्रमाणात रसिक उपलब्ध आहेत. मग यांच्यासाठी नाट्यगृह आहेत का? आणि जी आहेत त्यांची अवस्था काय आहे? 

एक तर चांगली नाट्यगृह नाहीत. जी आहेत त्यांची अवस्था बेकार आहे. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे बहुतांश नाट्यगृह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ताब्यात आहेत. सगळ्याच महानगर पालिकांची आर्थिक स्थिती खराब असल्याने वेगळे काही सांगायची गरज नाही. यातील काही ठिकाणी नाट्यगृह खासगी ठेकेदारांना चालवायला दिली आहेत. त्यातही परत देखभाल व्यवस्थीत केली जात नाही म्हणून काही दिवसांत नाट्यगृहाची अवस्था खराब होते. व ठेकेदार ते चालविणे सोडून देतो. 

म्हणजे एकीकडे स्थानिक स्वराज्य संस्था ते चालवू शकत नाहीत. दुसरीकडे पूर्णपणे व्यवसायिक पातळीवर कोणी चालविले तर किती उत्पन्न मिळेल याची हमी नसते. उत्पन्नासाठी तो कुठल्याही कार्यक्रमांना जागा देतो. मग नाट्यगृहाची अवस्था खराब होत जाते. याचा एकत्रित परिणाम आपण आज पाहतो आहोत. 

यासाठी काय करावं लागेल? नुसती टिका करणं सोपं आहे. मराठी माणसांचे नाट्यवेड लेख लिहीण्यापुरतं बरं असतं पण प्रत्यक्षात या वेडासाठी तो किती किंमत मोजायला तयार आहे? 

खरं तर मराठी माणसांने ग्रामीण भागात तमाशासारखी  कला आपल्या स्वत:च्या हिमतीवर पैशावर जोपासली. कुठलीही साधनं नसताना गावोगावी तमाशा आजही सादर होतो. जत्रेमध्ये तमाशाचे खेळ होतात. त्यासाठी कुठलेही नाट्यगृह नसते. कुठलीही रंगमंच व्यवस्था, ध्वनी व्यवस्था, प्रकाश व्यवस्था सोयीची नसते. तरी ही सगळी माणसे आपले कलेचे वेड जीवापाड जपतात. मग तूलनेने संपन्नता असलेले शहरी लोक नाट्यगृहातील मराठी नाटक जपायला का कमी पडतात? जागोजागच्या नाट्य संस्था, कला संस्था, सांस्कृतिक चळवळीतले लोक पुढे येवून नाट्यगृह व्यवस्थापनाची जबाबदारी अंगावर का नाही घेत? 
प्रत्येकवेळी शासनावर भार टाकून आपण गप्प बसायचे ही कुठली प्रवृत्ती? आज सगळ्या महानगरात वेगवेगळे महोत्सव भरत असतात. त्यांना मोठ्या संख्येने प्रायोजक मिळतात. उद्योगांना आपल्या नफ्यातील 2 टक्के रक्कम सामाजिक सांस्कृतिक कामासाठी खर्च करण्याची सक्ती शासनाने केली आहे. (सी.एस.आर. स्कीम) तेंव्हा या 2 टक्क्यांमधील काही रक्कम नाट्यक्षेत्रात काम करणार्‍या संस्थांना मिळवता येवू शकते. याच्या आधारावर या संस्था नाट्यगृहांची जबाबदारी अंगावर घेवू शकतात. आणि या सगळ्यातून जी नाट्यगृह सध्या खराब झाली आहेत त्यांची दुरूस्ती देखभाल करता येवू शकते. किंवा खरं तर नाट्य संस्था किंवा सांस्कृतिक संस्थांना ही नाट्यगृह चालवायला देवून शासन दरवर्षी काही रक्कम दुरूस्तीसाठी म्हणून मंजूर करू शकते. 

ज्या महान नाटककार विल्यम शेक्सपिअरचे जगभरात नाव घेतले जाते तो एक नाट्यगृह चालवित होता हे विसरता कामा नये. नाट्यक्षेत्रातील मंडळींना असे वाटते की आपण फक्त नाटक करावे, बाकी गोष्टी आपल्यासाठी इतरांनी केल्या पाहिजेत. पण हे नेहमीच होत नाही. आपल्या क्षेत्रातील सर्वच गोष्टींची जबाबदारी आपणांस घ्यावी लागते. दूसर्‍यावर सगळं झटकून मोकळं होता येत नाही. आपल्या बाळासाठी कळाही आपल्यालाच सोसाव्या लागतात.  

राज्य नाट्य स्पर्धे मध्ये नाटकं सादर होतात. मग पुढे त्यांचे काय होते? हे सगळे कलाकार वर्षभर काय करतात? अंबाजोगाईच्या कलाकारांनी आपल्या नाटकाचा एक प्रयोग आपल्याच गावात सादर करून पैसे उभे केले होते. परभणीच्या नटांनी आपली नाटकं आपल्या परिसरात सादर करून पैसे मिळवले होते. अशी महाराष्ट्रात कितीतरी कलाकार मंडळी असतील जे आजही धडपड करून आपल्या भागातील नाट्य चळवळ पुढे नेण्यास तयार आहेत. मग त्यांच्या पाठीशी उभं राहण्याची जबाबदारी इतर रसिकांची कार्यकर्त्यांची संस्थांची नाही का? 

आज संपूर्ण महाराष्ट्राचा विचार केला तर मुंबई-ठाणे-पुणे परिसर वगळता महानगर पालिका असलेली पंधरा शहरे आणि इतर नाट्यप्रेमी दहा तरी छोटी शहरे अशा पंचेवीस ठीकाणच्या नाट्यसंस्थाना एकत्रित करून महाराष्ट्रभर नाट्यगृह व्यवस्थापनासाठी एक यंत्रणा  निर्माण करता येवू शकते. त्यासाठी मराठी नाट्य परिषदेने पुढाकार घ्यावा. दरवर्षी नाटय संमेलन होते. या संमेलनासोबतच राज्य नाट्य स्पर्धेत पहिला दुसरा तिसरा क्रमांक आलेली नाटके महाराष्ट्रात किमान पन्नास ठिकाणी झाली पाहिजेत यासाठी आग्रह धरला पाहिजे.  

नाटक ही सादरीकरणाची कला आहे. त्यासाठी नुसती भाषणं करणं उपयोगाचे नाही. खेळाडू हा मैदानातच चमकला पाहिजे तसं नट हा रंगमंचावरच तळपला पाहिजे. त्यासाठी रंगमंच चांगला असला पाहिजे. नाट्यगृह चांगली असली पाहिजेत. आज सर्वत्र नाट्यगृहांची अवस्था ‘दीन’ होवून बसली असताना कुठल्या बळावर आपण मराठी रंगभूमी ‘दिन’ साजरा करतो आहोत?

आज मोठे कलाकार मालिकांमध्ये पूर्णपणे गुंंतले आहेत. त्यांना रंगभूमीसाठी वेळ नाही. कारण त्यांना तिकडे नाव आणि पैसा जास्त मिळत आहे. त्यांचा नाद सोडून देवू. स्थानिक कलाकारांना हाताशी घेवून त्या त्या ठिकाणची रंगभूमी चळवळ जिवंत ठेवू या. नाहीतरी जगभर रंगभूमी ही स्थानिक कलाकारांनीच जिवंत ठेवली आहे. आपण जर स्वत:ला नाट्यवेडे म्हणत असू तर आपण त्यासाठी किंमत मोजली पाहिजे. 

श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575

No comments:

Post a Comment