Monday, November 16, 2015

केदारनाथच्या कुशीत निर्वाण षट्काच्या छायेत

सामना दिवाळी २०१५ 

केद्रारनाथ, बद्रीनाथ, गंगोत्री आणि यमुनोत्री या यात्रेला उत्तर भारतात छोटा चारधाम असं म्हणतात. कुटूंबातील आम्ही 6 जोडपी हिमालयात या यात्रेसाठी गेलो होतो जून महिन्यात 2011 गेलो होतो. केदारनाथ हे सगळ्यात अवघड ठिकाण. गौरीकुंड या तळाच्या गावापासून 14 कि.मी. अंतर पायी चालत जावं लागतं. घोडे किंवा डोलीची सोय आहे. तसंच वातावरण चांगलं असेल तर हेलिकॉप्टरचाही आजकाल वापर होतो आहे. मी मात्र डोंगरातला हा अवघड प्रवास पायी केला. सकाळी सातलाच गौरीकुंडपासून चालायला सुरूवात केली. रस्ता मोठा अवघड. सारखा दम लागत होता. पण जरा आजूबाजूला नरज टाकली की सगळ्या श्रमाचा विसर पडायचा. हिरवेगार सुंदर डोंगर, त्यावर उतरलेले ढग, खळाळत वाहणारी मंदाकिनी नदी.  

दिवसभर पायपीट केल्यावर दुपारी 4 ला मी केदारनाथला पोंचलो तेंव्हा अगदी थकून गेलो होतो. इंचभरसुद्धा चालणं शक्य वाटत नव्हतं. मंदिर आणि आजूबाजूचा परिसर नजरेच्या टप्प्यात आला होता. वातावरण तसं ढगाळच होतं. पाऊस थोडासा पडून गेला होता. ढग थोडे विरळ होत चालले होते. आणि अचानक सूर्यासमोरचे ढग विरून गेले. सूर्याचे किरण समोरच्या हिमालयाच्या शिखरांवर चमकायला लागले. त्या दृश्यानं मी आवाक्च झालो. त्या शिखराला मेरू पर्वत म्हणतात. ते शिखर म्हणजेच महादेव समजण्यात येतं. शंकराचार्यांना याच ठिकाणी शिवाचा साक्षात्कार झाला. याच ठिकाणी त्यांनी निर्वाणषटकम् लिहीलं आणि योग समाधी घेतली. हिरवेगार सुंदर डोंगर, त्यांची बर्फाळ शिखरं, त्यावर चमकणारं उन, निळंभोर आभाळ. मी तसाच रस्त्याच्या कडेला जाऊन उभा राहिलो. त्या शिखराला पाहूनच हात जोडले. मला नंतर मंदिरात गेल्यावर समजलं की मंदिरातील महादेवाची पिंड म्हणजे या पर्वत शिखराचीच प्रतिकृती आहे. मंदिरात अर्थात माझ्यासारख्याचा जीव घुसमटतो. बाहेरच महादेवानं मला दर्शन दिलं. आणि एक वेगळीच भावना मनात दाटून आली. वाटलं आपलं आयुष्य संपून गेलंय. 

हळू हळू सूर्याची किरणं लालसर गुलाबी होत गेली. पर्वताचं ते शिखर पश्चिमेला बाह्यगोल झालेलं आहे. त्या लालसर प्रकाशात किरणांनी एक चंद्रकोरच शिखरावर निर्माण केली आहे असं वाटत होतं. रावणानं शिवताण्डव स्तोत्र लिहीलं आहे. त्याच्या दुसर्‍या कडव्यात ‘किशारचंद्रशेखरे रति: प्रतिक्षणं मम’ अशी ओळ आहे. शंकराच्या मस्तकावर जी चंद्रकोर आहे तीचं वर्णन किशोरचंद्रशेखरे असं केलेलं आहे. लहान नाही आणि पूर्ण चंद्रही नाही नेमकी युवाअवस्थेतील चंद्रकोर म्हणजे ‘किशोर’ चंद्रकोर. इतका नेमका शब्द मला मराठीतही सापडला नाही. मला दिसलेल्या दृश्यात सूर्याच्या किरणांमूळे अशीच आकृती त्या डोंगरावर निर्माण झाली होती. तो नेमका फोटो माझ्या मोठ्या भावानं फारच सुंदर घेतला आहे.  

रात्री शेजारती साठी आपण मंदिरात जाऊ असं कवितानं माझ्या पत्नीनं सुचवलं. थकल्यामुळं इतर कोणीच यायला तयार नव्हतं. आम्ही दोघंच मंदिरात गेलो.  तर दरवाजा बंद. तिथल्या सुरक्षा रक्षकानं बाजूच्या दरवाजानं जायला सांगितलं. खरं तर त्यानं आम्हाला तसं का सांगितलं ते मला कळालं नाही. तिथे जाऊन पाहतो तर मंदिरात तिन पूजार्‍यांशिवाय कुणीच नाही. त्यांची परवानगी काढून आम्ही दोघं त्या रिकाम्या मंदिरात बसून राहिलो. ते त्यांचं साफसफाईचं काम करत होते. मंदिरात पाचही पांडव, द्रौपदी, कुंती आणि श्रीकृष्ण यांच्याही मूर्ती आहेत. हे मंदिर पांडवांनी बांधलं अशी अख्यायिका आहे. आपल्या हातून घडलेल्या पापाचं परिमार्जन करण्यासाठी काय करावं याची त्यांनी व्यासांपाशी पृच्छा केली. तेंव्हा व्यासांनी त्यांना शिवाची आराधना करण्यास सांगितलं. शिवानं त्यांना दर्शन दिलं. त्याची पिंड तयार करण्याचा त्यांनी प्रयत्न केला पण तो सफल झाला नाही. तेंव्हा हा पर्वत म्हणजेच मी आहे असं शिवानं सांगितलं. आणि ती पिंड म्हणजेच त्या मेरू पर्वताची प्रतिकृती म्हणून राहिली. अहिल्याबाई होळकरांनी त्यावर सुंदर असं चांदीचं छत्र लावलं आहा.

रात्रीही योगायोगानं आभाळ निरभ्र होतं. चंद्राचा सुंदर प्रकाश पडला होता. खळाळत वाहणार्‍या मंदाकिनी नदीच्या काठावर मी बसून राहिलो. चांदण्यात तेच शिखर पाहताना अगदी वेगळं आणि काहीतरी अद्भूत पाहतो आहोत असं वाटत होतं. हे जे काही आहे ते खरं नाही. चित्रच काढलेलं आहे. आणि आपण त्याच्या समोर बसलेलो आहोत. ते सगळं वातावरण खरं तर भितीदायक वाटायला हवं होतं. कारण सगळीकडेच सन्नाटा पसरलेला. नदीचा आवाज सोडला तर कसलाच आवाज नाही. पण तो पर्वत मला आश्वासक वाटत होता. शंकराचार्यांना काय वाटलं असावं याचा थोडाफार अंदाज येत होता.

दुसर्‍या दिवशी सकाळीही आभाळ निरभ्र राहिलं. आता पर्वताच्या दुसर्‍या बाजूनं सूर्याची कोवळी किरणं पडलेली होती. मंदिराच्या उजव्या बाजूला मोकळ्या मैदानात मी जावून बसलो. सुंदर हिरवळ, तिच्यावर पिवळी जांभळी रानफूलं डोलत असलेली, पाण्याचे नितळ असे प्रवाह खळाळत जाणारे, समोर हिरवागार डोंगर, त्याच्यामागचं मेरूपर्वताचं शुभ्र शिखर. हे सगळं वातावरण संमोहीत करणारं होतं. मी ध्यान लावून बसलो आणि निर्वाण षटकाचे पठण केले. त्या वातावरणातून उठावेच वाटत नव्हते. बरोबरचे सगळे मंदिरात अभिषेक करत होते आणि मी बाहेर त्या पर्वताच्या समोर बसून निर्वाण षटकाचे पठण करत होतो मोकळ्या हवेत. याच जागेवर बसून शंकराचार्यांनी निर्वाणषटक हे शेवटचे स्तोत्र लिहीलं आणि योग समाधी घेतली. त्यांचं समाधी मंदिरही इथे बांधलेलं आहे.ही योगसमाधी 2013 मध्ये आलेल्या महाप्रलयात वाहून गेली. शंकराचार्यांनी केदारनाथला योग समाधी घेतली असे काही जण मानतात तर काही जण याच ठिकाणी पाण्याच्या प्रवाहात त्यांनी देह सोडून दिला असंही समजतात. पण शंकराचार्यांचा शेवट केदारनाथला झाला यावर सर्वांचे एकमत आहे.

केदारनाथ मंदिराच्या डाव्या बाजूला दूरवर डोंगराच्या उतरणीवर एक छोटासा चौथरा होता. त्यावर महादेवाची एक पिंड स्थापन केलेली होती. ही जागा म्हणजे शंकराचार्यांनी योगसमाधी घेतली ती जागा असे सांगण्यात येते. आता तो चौथरा बुडून गेला. शिवाय मंदिराला लागून उजव्या बाजूला प्रदक्षिणा मार्गावरच शंकराचार्यांच्या नावानं एक मंदिर उभारलेलं होतं. त्यात त्यांची छोटी मूर्ती स्थापन केलेली होती. आता तेही सगळं बुडून गेलं. नष्ट झालं.

हा विषय इथेच संपला असता. आम्ही तिथून निघून उत्तरकाशी इथे आलो. त्या ठिकाणी अनंत महाराज आठवले यांनी समाधी घेतली ती जागा आहे. त्यांनी निर्वाण षटकाचा अर्थ विषद केला ते पुस्तक माझ्या वाचनात मागच्यावर्षी आलं होतं. गोरठा (ता. उमरी जि. नांदेड) इथे दासगणु महाराजांचा अनंत महाराजांनी स्थापन केलेला आश्रम आहे.  तिथल्या उत्सवासाठी माझी आई नेहमी जाते. तिने अनंत महाराजांचा गुरूमंत्र घेतलेला आहे. 2010 च्या एप्रिलमध्ये मी मुद्दाम त्या आश्रमात गेलो होतो. तेथून निर्वाणषटकाचे छोटं पुस्तक आणलं होतं. 

उत्तरकाशीच्या आश्रमात आम्ही दोन दिवस राहिलो. गंगेच्या अगदी काठावर (तिला तिथे भागिरथी म्हणतात) तो आश्रम आहे. अनंत महाराज आठवले यांनी सन्यास घेतल्यावर वरदानंद भारती हे नाव धारण केलं. बारा वर्षे ते उत्तरकाशीला होते. त्यांनी तिथेच योगसन्यास घेतला. त्या जागेवर दुसर्‍या दिवशी सकाळी गंगेत स्नान करून मी निर्वाण षटकाचे पठण केलं. ही जागा मोठी प्रसन्न आहे. 

वेरूळ महोत्सवात पं. जसराज यांचं गाणं होतं (इ.स.1991). मी माझ्या दोन मित्रांसोबत (शशांक जेवळीकर आणि गणेश चाकुरकर) या महोत्सवात गेलो होतो. जसराजजींनी आपल्या गाण्याची सांगता निर्वाण षटकाने केली. त्यांचा आवाज असा काही विलक्षण लागला होता. की गाणं संपल्यावर लोकांना टाळ्या वाजवायचंही सुचेना. सगळे आपापल्या जागेवर शांतपणे उभे राहिले. 

चित्रा वैद्य या चित्रकर्तीचं एक चित्र श्याम देशपांडेकडच्या पुस्तकात मला पहायला मिळालं. महादेवाची पिंड आणि त्यावरती चंद्रकोर असं ते चित्र होतं. त्याचं नावंच ‘अल्टीमेट ट्रुथ’ असं दिलं होतं. शिवाय त्याखाली रविंद्रनाथ टागोरांची एक ओळही छापली होती. ‘ Facts are many but the truth is one.

गेली जवळपास 20 वर्षे निर्वाणषटकाने माझा पिच्छा पुरवला. मी रूढ अर्थानं अध्यात्मिक नाही. रोजची पुजा अर्चा असं काही करत नाही. पण या निर्वाणषटकाने एक वेगळीच अनुभूती मला दिली. त्याचं वर्णन नेहमीच्या भौतिक पातळीवरच्या जगण्याच्या चौकटीत नाही करता येत. 

मनोबुद्धयहंकार चित्तानि नाहं न च श्रोत्रजिह्वे न च घ्राणनेत्रे ।
न च व्योमभूमिर्न तेजो न वायुश्चिदानंदरूप: शिवोऽहं शिवोऽहम् ॥
मन बुद्धी, अहंकार, चित्त यातील काहीही मी नाही; तसेच कान, जीभ, नाक, डोळे मी नाही; आकाश भूमी, तेज अथवा वायुही मी नाही (चित् म्हणजे ज्ञान) ज्ञान व आनंदरूप असा शिव मी आहे, मी शिव आहे 

न च प्राणसंज्ञो न वै पंचवायुर्न वा सप्तधातुर्न वा पश्चकोश: ।
न वाक्पाणिपादौ न चोपस्थपायुश्चिदानंदरूप: शिवोऽहं शिवोऽहम् ॥
प्राणसंज्ञक वायू, अथवा प्राण अपान इत्यादी पाच वायू मी नाही; रस, रक्त इत्यादी सात धातू (रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र) अथवा अन्नमयादी पाच कोष मी नाही ; वाणी, हात, पाय व इतर कर्मेंद्रिये मी नव्हे

न मे द्वेषरागौ न मे लोभमोहौ मदो नैव मे नैव मात्सर्यभाव: ।
न धर्मो न चार्थो न कामो न मोक्ष श्चिदानंदरूप: शिवोऽहं शिवोऽहम् ॥
मला कुणाबद्दल द्वेष नाही व आसक्ती नाही; लोभ व मोह मला नाही. गर्व मला कशाचाच नाही व कुणाबद्दल मत्सर नाही; धर्म, अर्थ, काम व मोक्ष या पुरुषार्थापैकी मला काही नको

न पुण्यं न पापं न सौख्यं न दु:खं न मंत्रो न तीर्थं न वेदा: न यज्ञा: ।
अहं भोजनं नैव भोज्यं न भोक्ता श्चिदानंदरूप: शिवोऽहं शिवोऽहम् ॥
मला पुण्य नाही, पाप नाही, सुख नाही, दु:ख नाही, मंत्र, तीर्थ, वेद व यज्ञ यांच्याशी मला कर्तव्य नाही; मी भोजन-व्यापार नाही, भोज्य पदार्थ नाही व त्याचा उपभोग घेणाराही नाही

न मे मृत्युशङ्का न मे जातिभेद: पिता नैव मे नैव माता न जन्म ।
न बन्धुर्न मित्रं गुरूर्नैव शिष्यश्चिदानंदरूप: शिवोऽहं शिवोऽहम् ॥
मला मृत्यू नाही व मृत्यूची शंका व भिती नाही, जातिविषयक भेदभाव मला नाही; मला वडील आई नाही किंबहूना जन्मच नाही, कोणी नात्यागोत्याचे मित्र, गुरू वा शिष्य मला कोणी नाही.

अहं निर्विकल्पो निराकाररूपो विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेन्द्रियाणि ।
सदा मे समत्त्वं न मुक्तिर्न बन्धश्चिदानंदरूप: शिवोऽहं शिवोऽहम् ॥
मी निर्विकल्प म्हणजे संकल्प, विकल्प, संशय यांनी रहित आहे, मी आकाररहित आहे, कारण सर्व ठिकाणी व सर्व इंद्रिये यांना मी व्यापून राहिलो आहे, मला कशाची आसक्ती नाही व म्हणून मुक्तिही नाही.

श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद ४३१ ००१. 

1 comment: