ऊरूस, पुण्यनगरी, 15 नोव्हेंबर 2015
दिवाळी हा दिव्यांचा सण आहे हे आपण पारंपारिक दृष्ट्या मानतो आणि तशी ती साजरीही करतो. दिवाळीत नवे कपडे, फटाके, फराळ यांचीही भरमार असते. अगदी ग्रामीण भागातही फटाक्यांची दुकानं लागतात. फुलांची आरास केली जाते. पण गेली काही वर्षे दिवाळीत आवर्जून संगीताचे कार्यक्रम साजरे होताना दिसत आहेत. म्हणजे आजकाल दिव्यांसोबत फुलांसोबत सुरांचीही आरास दिवाळीत केली जाते आहे.
दिवाळीत धनत्रयोदशीला ‘सुर धन त्रयोदशी’ म्हणून साजरी करणे किंवा पाडव्याच्या दिवशी ‘दिवाळी पाडवा संगीत पहाट’ म्हणून साजरी करणे असं घडताना दिसत आहे. मोठ्या शहरांमध्ये दिवाळीत पहाटे गाण्याचा कार्यक्रम होतो हे उर्वरीत महाराष्ट्राला फक्त ऐकून माहित होते. तेंव्हा वर्तमानपत्रांतून कधीतरी त्याच्या बातम्या यायच्या. आणि तामाम ग्रामीण जनता ते वाचून आपली गाण्याची तहान भागवायची. गेल्या दहा वर्षांपासून पुण्या मुुंबईतलं हे लोण औरंगाबाद, जालना करत उदगीरसारख्या तालूक्याच्या सीमावर्ती भागातही जावून पोचले आहे. यातील दखल घेण्याजोगी बाब म्हणजे सामान्य रसिकांचा फार मोठा प्रतिसाद याला जागजागी लाभतो आहे.
एकीकडे मराठी नाटक कसं जगवायचं म्हणून सगळे आंबट तोंड करून चर्चा करत आहेत. मराठी भाषेचे काय होणार यावर चर्चा केल्या शिवाय मराठीच्या प्राध्यापकांचा दिवसच मावळत नाही. शासन नाट्य स्पर्धा घेतं आहे, साहित्य संमेलनाचे ओझेही परत शासनाच्याच डोक्यावर आहे. आणि दुसरीकडे मराठी गाणी, त्यातही परत नाट्य संगीत नाटकाच्या मंचावरून निसटून गाण्याच्या बैठकीत अलगद जावून बसलं आहे. शासनाच्या कुठल्याही पाठिंब्याशिवाय, आर्थिक मदतीशिवाय सामन्य रसिकांनी हे आपल्या बळावर तोलून धरलं आहे हे विशेष.
एखाद्या साहित्यीक कार्यक्रमाला लोक जमवायचे तर कोण यातायात करावी लागते. इतकं करूनही आलेला वक्ता काही फार चांगला बोलेल असं नाही. ज्या पुस्तकावर चर्चा असेल ते लोकांनी वाचलेले असेल किंवा भविष्यात वाचतील याचीही खात्री नाही. जुन्या काळात आपण कसं नाटक करायचो याच्या चर्चा साठी पार केलेले मोठ्या उत्साहात करताना दिसतात. पण प्रत्यक्षात सामान्य रसिकांसमोर नाटक मात्र सादर होत नाही.
या पार्श्वभूमीवर दिवाळीत सादर होणार्या गाण्यांच्या कार्यक्रमांकडे बघितलं पाहिजे. लोकं उत्स्फुर्तपणे प्रतिसाद देत आहेत. पैसे जमा करत आहेत. ज्या सभागृहात कार्यक्रम सादर होणार आहे त्याची अवस्था बहुतांश ठिकाणी अतिशय बेकार आहे. मग त्या दिवसापूरती साफसफाई केली जाते. वीज लोडशेडिंग मुळे अचानक जाणे किंवा पैसे न भरल्यामुळे सभागृहाचा विद्यूत पुरवठाच खंडित केला जाणे याचा दाहक अनुभव असल्याने वीजेची स्वतंत्र सोय केली जाते. ही सगळी धडपड गाण्याचा आनंद मिळावा म्हणून लोकं करतात. याची गांभिर्याने दखल घेतली पाहिजे.
1983 नंतर भारतभर रंगीत दूरदर्शन सर्वत्र दिसू लागला. 1994 नंतर विविध वाहिन्यांची सुरवात झाली. दहा वर्षांनी म्हणजे 2004 पासून मराठीतही विविध वाहिन्या सुरू झाल्या. या सगळ्याचे एक अजीर्ण 2015 मध्ये व्हायला सुरवात झाली. हे माध्यम अतिशय रूक्ष आहे. त्यातून फारसं कलात्मक काही मिळतं आहे असं दिसेना. लोकांना या शिवाय काहीतरी वेगळं हवं आहे. सुरवातीला प्रायोजकाचा दबाव नव्हता तेंव्हा दूरदर्शन मालिका अतिशय दर्जेदार असायच्या. आजही त्यांच्या आठवणी लोक काढतात. रामायण, महाभारत यांना आपल्या परंपरेत एक मोठं स्थान आहे म्हणून त्यावरच्या मालिका गाजल्या असं म्हणता येईल. पण ‘हमलोग’, ‘नुक्कड’, ‘सर्कस’, ‘सत्यजीत राय प्रेझेंटस्’, ‘मालीगुडी डेज’, ‘अमरावती की कथाए’ अशा मालिका आजही लोकांच्या आठवणीत आहेत त्याचं कारण काय? तर त्यांचे सादरीकरण करताना कलात्मक पातळीवर कस लागला होता. याच्या उलट आजच्या चकचकीत गुळगुळीत प्रायोजीत मालिका लोकांच्या लक्षातही रहात नाहीत.
मग यांना वैतागलेले जे काही लोक आहेत ते याच मालिकेतील कलाकार काम करत असलेल्या नाटकांना गर्दी करतात. गाण्याचे जे प्रेमी आहेत ते गाण्याच्या कार्यक्रमांना गर्दी करतात. साहित्याच्या प्रेमींना कवितांचे अभिनव पद्धतीनं साजरे होणारे कार्यक्रम आवडू लागतात. इतकंच काय आजकाल गावोगावी व्याख्यानांनाही मोठी गर्दी होत असलेली आढळत आहे. म्हणजे मंचावरून सादर होणारं नाटक, व्याख्यान, गाणं, कविता, एकपात्री, अभिवाचन त्यातील जिवंतपणा मुळे लोकांना आपल्याकडे आकर्षित करू लागलं आहे.
दिवाळीत किंवा खरं म्हणजे एरव्हीही सादर होणार्या गाण्याच्या कार्यक्रमांचे एक वैशिष्ट्य म्हणजे यात सर्व प्रकारची गाणी लोकांना आवडतात. जुनी हिंदी चित्रपटातील गाणी, मराठी भावगीते, लावणी, नाट्यगीत, अभंग सारं सारं एका मैफलीत ऐकायची लोकांची तयारी असते.
एकदा गर्दी गोळा होत आहे म्हटलं की प्रयोजक पैसा द्यायला फारशी खळखळ करत नाही. एका गंभीर मुद्याची चर्चा झाली पाहिजे. एरव्ही मोठ मोठ्या जाहिराती देणारे उद्योग अशा सांस्कृतिक कार्यक्रमाला प्रायोजकत्व देतात कारण त्यांना प्रतिसाद लगेच समोर दिसतो आहे. एरव्ही वर्तमानपत्रे किंवा टिव्हीवरच्या जाहिरातींचे दर प्रचंड वाढले आहेत. शिवाय त्यांचा प्रतिसाद नेमका काय आणि किती आहे हे कळतच नाही. यापेक्षा कितीतरी कमी पैशात सांस्कृतिक कार्यक्रम साजरा होतो.
दिवाळीत आता सर्वत्र साजरा होणार्या गाण्याच्या कार्यक्रमांनी दोन व्यवस्थांच्या सांस्कृतिक हस्तक्षेपावर प्रश्नचिन्ह उभं केलं आहे. एक शासन. आणि दुसरे म्हणजे माध्यमांवर प्रचंड जाहिराती देवून खर्च करणारे मोठे उद्योग समुह. लोकांनी शासनाला बाजूला ठेवून उद्योगांकडून प्रयोजकत्व मिळवून किंवा स्वत: वर्गणी गोळा करून आपला आपला नविन मार्ग चोखाळला आहे. आणि ही बाब अतिशय आशादायी आहे.
महाराष्ट्रात सांस्कृतिक वातावरण निर्माण व्हायचे असेल तर सादरीकरणाच्या ज्या कला आहेत त्यांचे कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर लोकसहभागातून झाले पाहिजे. या दिवाळीत प्रदर्शित झालेला ‘कट्यार काळजात घुसली’ हा चित्रपट याचे एक वेगळेच उदाहरण आहे. मंचावर सादर झालेले एक जुने नाटक आज परत चित्रपटाच्या रूपाने सादर होते. त्याला प्रतिसादही चांगला मिळतो. या चित्रपटांतील गायक कलाकारांनी ज्या ज्या ठिकाणी गाण्याचे कार्यक्रम सादर केले त्याला लोकांनी तुडूंब गर्दी केली आहे. इतकंच नाही तर विविध ठिकाणच्या गाण्याच्या कार्यक्रमांत सादर झालेली कट्यार ची गाणी लोकांनी उचलून धरली. त्यांच्या फर्माईशी केल्या. यातून एक बाब सिद्ध होते की लोक आता स्वत:चे सांस्कृतिक धोरण ठरवू पहात आहेत.
टिव्ही सारखी माध्यमे मंचावरून सादर होणार्या कलेसाठी घातक नसून त्यांचा आधार घेवून गाणं नाटक अभिवाचन अश्या उपक्रमांना बळ मिळू शकतं हे समोर येतं आहे. संगीत नाटक त्यातील नाट्य व वाङ्मयीन गुणवत्ता ढासळल्याने सामान्य रसिकांनी नाकारले. पण नाट्यसंगीताला मात्र आजही मराठी रसिकांच्या मनात विशेष जागा आहे.
दिवाळीतील गाण्यांच्या कार्यक्रमांमुळे अजून एक चांगली बाब घडून येताना दिसत आहे. मोठ्या कलाकारांचे कार्यक्रम जसे सादर झाले तसेच स्थानिक कलाकारांनाही आपली कला सादर करण्याची संधी मिळाली. त्यांनाही कमी जास्त प्रमाणात रसिकांनी प्रतिसाद दिला आहे. सादरीकरणाच्या कला या सादरच झाल्या पाहिजेत. मोठा गायक आहे, त्याला मोठा पुरस्कार मिळाला आहे, त्याचं मोठं नाव आहे पण तो सध्या फारसं गातच नाही. किंवा त्याचं गाणं लोकांना ऐकायलाच भेटत नाही तर नाही चालणार. गायक हा गाण्यातूनच सिद्ध झाला पाहिजे. या सगळ्या कार्यक्रमांत हे एक चांगलं घडत आहे की लोकांना काहीतरी कानावर पडतं आहे. तासंन्तास टिव्हीला चिकटून बसलेली निबुद्ध करमणुक अपरिहार्यता म्हणून स्वीकारणारी मराठी रसिकता घराबाहेर पडून मंचावरून सादर होणार्या जिवंत कलेला दाद देवू पहात आहे हे कौतूक करण्यासारखं आहे.
आता जागजागीच्या कलाप्रेमींनी सजग राहून आपल्या आपल्या भागातील सांस्कृतिक चळवळ टिकवली पाहिजे, वाढवली पाहिजे. बाहेरचे कलाकार, बाहेरचा पैसा, बाहेरची प्रेरणा फार काळ पुरत नाही. आतूनच उर्मी असली पाहिजे. दिवाळीतल्या गाण्यानं इतका जरी दिवा आपल्या काळजात तेवत ठेवला तरी खुप झाले.
श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575
No comments:
Post a Comment