Sunday, October 18, 2015

परदेशी संगीत देशी मातीत रूजविणारी तरूणाई


उरूस, पुण्यनगरी, 18 ऑक्टोबर 2015

रॉक बँड ची स्पर्धा चालू आहे. मंचावर चार तरूण जेमतेम 17-18 वर्षांचे गिटार, ड्रम, आवाजाच्या माध्यामातून समोरच्या तरूणाईवर जादू करत आहेत. त्यांना प्रतिसाद द्यायला त्या संगीताच्या पद्धतीप्रमाणे काही तरूण हेडबँग करत आहेत. हेडबँग म्हणजे केस वाढविलेली डोकी गोल गोल फिरवत स्टेजसमोर उभं राहून दाद देणे. जे काही संगीत चालू आहे ते रॉक मधील ‘क्लासिकल’ समजले जाणारे ‘मेटल’ संगीत आहे. याची जाणीव सर्वांना आहे. त्यामुळे शांतपणे ते ऐकल्या जातं आहे. गाणं संपताच टाळ्यांचा कडकडाट होतो. बाकी धांगडधिंगा करणार्‍या इतर बँडला मागे सारून रॉकमधील ‘मेटल’ वाजविणार्‍या या गटाला पहिलं बक्षिस मिळतं.  

ही कुठली जर्मनी, इटली, इंग्लंड, अमेरिका देशातील घटना नाही. भारतात, महाराष्ट्रात, मराठवाड्यातील औरंगाबाद शहरात मागच्या महिन्यात घडलेली घटना आहे. रॉक बँडची स्पर्धा रोटरी क्लबच्या दरवर्षी वतीने भरविण्यात येते. गेली दोन वर्ष ‘थर्स्टी ओशन’ हा बँड ग्रुप बक्षिस मिळवत आहे. मागच्यावर्षी दुसरं बक्षिस मिळवणारी ही मुलं या वर्षी पहिल्या क्रमांकाची मानकरी ठरली आहेत. नुसतं बक्षिस मिळवलं असतं तर त्याची फारशी दखल कुणी घेतली नसती. हाती गिटार घेवून मिरवले, धाड धाड ड्रम बडिविला की जवळपासची मित्रमंडळी विशेषत: मुली त्यांना भाव देतात. असाच आपला समज असतो. पण या मुलांचे वैशिष्ट्य म्हणजे हे कुठलीही भेसळ न करता, पाश्चात्य संगीतातील ‘क्लासिकल’ समजले जाणारे ‘मेटल’ संगीत वाजवत आहेत. सध्या बारावीत शिकणार्‍या या तरूण मुलांना याचाही अभिमान आहे की इतक्या लहान वयात हे संगीत वाजविणारे महाराष्ट्रात तरी तेच एकमेव आहेत. 

अमर ढुमणे-केतन कुलकर्णी-राहूल भावसार- सलिल चिंचोलीकर या चार तरूणांची ही कथा आहे. शाळेत असताना संगीताच्या प्रेमामुळे या चौघांची ओळख वाढत गेली दोस्ती गहरी होत गेली. दहावीच्या वर्षात शाळेच्या निरोप समारंभात आपण आपली कला आपल्या दोस्तांसमोर शिक्षकांसमोर सादर करावी असे त्यांना वाटले. आणि पहिल्यांदा चौघांनी आपली कला रसिकांसमोर सादर केली.  तसं तर हे संगीत कळणारी आपल्याकडे फारशी माणसं नाहीतच. अगदी घरचे किंवा जवळचे मित्रही या बाबत कसे कोरडे आहेत याचाच अनुभव या चौघांनाही येत गेला. पण यांची संगीतावरची निष्ठा अगदी शुद्ध. घरच्यांना हळू हळू यांचे या संगीतावरचे प्रेम जाणवत गेले. आणि यांना काहीसे अनुकूल वातावरण तयार झाले. 

रॉक संगीत दुसर्‍या महायुद्धानंतर अमेरिकेत जन्माला आले. त्याला पार्श्वभूमी महायुद्धाची होती. जगभरात एक बंडखोरी नविन पिढीत तयार होत होती. आणि या बंडखोरीला कलेतून व्यक्त होण्यासाठी रॉकचा जन्म झाला. याच रॉकमधून इंग्लंडमधून 1960 नंतर आणि अमेरिकेत 1970 नंतर मेटल संगीताची सुरवात झाली. मेटल या रॉक प्रकारात चार कलाकार असतात. एक लिड गिटारिस्ट, दुसरा बेस गिटारिस्ट, तिसरा ड्रमर आणि चौथा गायक. 

मेटल रॉक संगीतात ज्या बँड ग्रुपचे संगीत या  मुलांना जास्त आवडले त्या बँडचे नाव आहे मेटालिका. अमेरिकेतील कॅलिफोर्निया इथे 1981 मध्ये या बँडची सुरवात झाली. लार्स उलरिच (ड्रमर), जेम्स हेटफिल्ड (गायक), किर्क हॅमेट (लिड गिटारिस्ट), रॉबर्ट ट्रुजिलो (बेस गिटारिस्ट) हे चार कलाकार मेटालिका मध्ये आहेत. आत्तापर्यंत 8 वेळा ग्रॅमी अवॉर्ड त्यांना प्राप्त झालंय. संगीताच्या क्षेत्रातील जाणकारांना याची कल्पना आहे की हा या क्षेत्रातील सर्वोच्च सन्मान आहे. 

अमर-केतन-राहूल-सलिल या चौघांवर मेटालिकाच्या या चार कलाकारांचा त्यांच्या संगीताचा विलक्षण प्रभाव पडला. ही खरंच कौतुकास्पद गोष्ट आहे की इतक्या लहान वयात आजूबाजूला पोषक वातावरण नसताना पाश्चिमात्य संगीतातील काही एक गंभीर प्रकार आवडावा आणि त्यासाठी ध्यास बाळगावा. 

ही तरूण मुलं ही कला केवळ नेटवरून माहिती मिळवत शिकत गेली. बाकी वाद्यांसाठी स्थानिक पातळीवर त्यांना इतर शिक्षकांची मदत मिळत केली. पण प्रामुख्याने या संगीताची साधना त्यांनी स्वत:च गुरूशिवाय केली हे विशेष. एकलव्याने द्रोणाचार्यांचा पुतळा समोर ठेवून साधना केली. ही मुलं नेट समोर ठेवून साधना करत आहेत. बाकी निष्ठा तशीच आहे. 
साधारणत: असं समज असतो की पाश्चिमात्य संगीत म्हणजे श्रीमंत घरातील लाडावलेल्या मुलांचे खुळ. पण ही चारही मुलं अगदी साध्या मध्यमवर्गीय घरातली आहेत. अजूनही त्यांची राहणी साधी आहे. इतक्या तरूण वयात मेटल सारखे गंभीर संगीत प्रकार हे वाजवितात हे पाहून पुण्याला त्यांना विशेष निमंत्रण देण्यात आले. महाराष्ट्रात अतिशय मोजके असे बँड आहेत जे गांभिर्याने संगीताची साधना करतात. त्यांना या मुलांच्या प्रतिभेची जाणीव झाली. 

नविन पिढीला सामाजिक समस्यांची जाणीव नसते असाही एक आरोप आपण करतो. पण ही मुलं यालाही अपवाद आहेत. मेटल सारखे संगीत तेंव्हाच्या युरोपातील सामाजिक अस्वथतेला व्यक्त करत होते. या मुलांना आजच्या भारतातील सामाजिक  अस्वस्थतेला आपल्या संगीतातून व्यक्त करावे वाटते. ही विशेष कौतुकाची बाब आहे. मेटल मधील जी गीतं असतात ती काल्पनीक नसून वास्तवदर्शी असतात. समाजाच्या प्रश्नांशी निगडीत असे हे संगीत आहे. म्हणून ते आम्हाला आजही जास्त भावून जाते ही या मुलांची भावना आहे. 

आपल्याकडे 1949 मध्ये सी. रामचंद्र यांनी ‘सरगम’ चित्रपटांतून पाश्चिमात्य रॉक संगीत मोठ्या प्रमाणात वापरले. पुढे आर.डी. बर्मन यांनी ‘तिसरी मंझील'मध्ये आणि अगदी 1990 नंतर ए.आर.रहेमाने ‘रोझा’ मध्ये पाश्चिमात्य संगीताचा वापर मोकळ्या हाताने केला. या तरूण मुलांना अशी भेसळ नको वाटते हे विशेष. त्यांचे म्हणणे भारतीय लोकसंगीत, शास्त्रीय संगीत, सुफी संगीत आणि पाश्चिमात्य संगीत अशी भेळ करू नये. जे वाजवायचे ते स्वतंत्र वाजवावे. 

आपल्याकडे अल्लादिया खां, अब्दूल करिम खां सारखे जयपुर किंवा किराणा घराण्याचे महान गायक आपल्या आपल्या घराण्यांबाबत किती अभिमानी आणि आग्रही होते याच्या दंतकथा आपण भरपूर ऐकत आलो आहोत. पण नविन 17 वर्षांची मुलांची पिढीही शुद्ध संगीतासाठी आग्रह धरते याचे कौतुकच केले पाहिजे. 

हे पाश्चिमात्य संगीत किंवा कुठलेही संगीत किंवा एकुणच कला यासाठी आपल्या शिक्षणात अजितबात पोषक वातावरण नाही असा तक्रारीचा सुर राहूल भावसारने व्यक्त केला. केतन कुलकर्णी सारखा तरूण ‘थर्स्टी ओशन’ नाव का घेतले याबाबत जागरूक आहे. पाणी असून पिता येत नाही अशी समुद्राची व्यथा यांना सांगायचीय. लिड गिटारिस्ट असलेल्या सलिलला रियाजाचे महत्त्व जास्त वाटते. या बँडमध्ये तालाची बाजू सांभाळणार्‍या अमरला चार जणांचा मिळून तोल सांभाळणे महत्त्वाचे वाटते. एकत्र असल्याने आपण काही निर्माण करू शकतो ही बाब इतक्या कमी वयात या मुलांना जाणवली हे विशेष.

या संगीताच्या प्रसारासाठी प्रस्थापित माध्यमे अपुरी पडतात. किंवा ते दखलच घेत नाहीत ही तक्रारही या मुलांनी व्यक्त केली. त्यांच्या मते सोशल मिडिया हाच खरा आम्हाला पाठिंबा देतो आमची दखल घेतो. मोठ मोठे रॉक बँड भारतात येतात त्यांची माहिती सोशन मिडियावर मिळते. त्यांच्या कार्यक्रमाची तिकीट विक्री ऑनलाईन होते. हजारो रसिक त्यांच्या कार्यक्रमांना हजेरी लावतात. तिकीटं सहजा सहजी मिळतही नाहीत. आणि याची कसलीच खबर वर्तमानपत्रे, टिव्ही चॅनल यांना नाही. खरंच विचार करायला लावणारी बाब आहे. मराठवाड्यात बसून 17 वर्षाच्या मुलांना अमेरिकेतील संगीताची मोहिनी पडते. त्यासाठी ते आपली शक्ती खर्च करतात. आणि याची खबरही माध्यमांना नसते. यांन्नी या ग्रीक-अमेरिकन संगीतकाराची ताजमहालच्या परिसरात झालेली मेहफील हाच काय तो अलिकडचा अपवाद. बाकी माध्यमे उदासीन असतात. 

ज्ञानेश्वरांनी 16 व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहीली हे आपण नुसतं ऐकतो. पण हेच वर्य काहीतरी नविन सुचण्याचं आणि त्यासाठी वेडं होण्याचं आणि तशी कृती करण्याचं असतं हे लक्षात घेत नाहीत. हे वय प्रत्येकाच्या आयुष्यात येतं. या मुलांनी आपल्यातली ही उर्मी ओळखली. त्यासाठी प्रत्यक्ष कृती केली. आज बक्षिस मिळवलं. त्यांचे मन:पूर्वक अभिनंदन !!

श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575      

1 comment:

  1. Congrats to all of them and to you who noticed their passion and achievement.
    Guys, you are an awesome foursome. All the best to your life full of music.

    ReplyDelete