Sunday, October 25, 2015

बेगम अख्तर : गझलेचा झळाळणारा स्वर ।


उरूस, पुण्यनगरी, 25 ऑक्टोबर 2015

(रेखाचित्र वासुदेव कामात यांचे आसून राजहंस प्रकाशनाच्या अंबरीश मिश्र लिखित "शुभ्र काही जीवघेणे" या पुस्तकातून साभार )


उत्तरप्रदेशातील फैजाबाद गवातील स्वातंत्र्यापूर्वी 1920-22 सालची ही घटना. घरासमोरच्या पिंपळाच्या पारावर सात आठ वर्षांची एक मुलगी हिंदोळे घेत गाणं गात होती. हे गाणं एक तरणाबांड सैनिक तन्मय होवून ऐकत होता. त्या मुलीला कल्पनाच नव्हती. गाणं संपलं आणि त्या सैनिकाने खुशीत आपल्याजवळचे एक चांदीचे खणखणीत नाणे तिला बक्षिस दिले. पुढील आयुष्यात संगीत नाटक अकादमी, पद्मश्री सारखे कैक मानाचे पुरस्कार त्या मुलीला मिळाले. हजारो लोकांच्या मैफलीत तिनं गाणं सादर केलं. पण त्या एकट्या रसिकासाठी गायलेलं ते गाणं ‘सावरीया की मूरतिया’ आणि त्यानं बक्षिस म्हणून दिलेलं चांदीचं नाणं तिच्या कायम स्मरणात राहिलं. 

ही मुलगी म्हणजे पुढे विख्यात झालेली मलिका -ए-गझल पद्मश्री बेगम अख्तर. बेगम अख्तर यांचे जन्मशताब्दि वर्ष नुकतंच होवून गेलं. त्यांचा जन्म 7 ऑक्टोबर 1914 चा आणि मृत्यू ऑक्टोबर महिन्यातीलच 30 ऑक्टोबर 1974 चा.

गझलगायक गुलाम अलींच्या कार्यक्रमा संदर्भात मोठा गदारोळ उठला आहे. या संदर्भात बेगम अख्तर यांचा एक किस्सा मोठा लक्षणीय आहे. 1961 ला युद्धाच्या पार्श्वभूमीवर त्यांचा एक कार्यक्रम पाकिस्तानात कराची इथे आयोजित करण्यात आला. हा कार्यक्रम लष्कारातील जवान आणि अधिकार्‍यांसाठी होता. त्या कार्यक्रमात बाईंनी एक अप्रतिम असा दादरा गायला. त्याचे बोल ऐकताच पाकिस्तानी लष्कराचे डोळे पाण्याने भरून आले. तो दादरा होता, ‘हमरी अटरिया पे आवो सजनवा, सारा झगडा खतम हो जाये’. कलाकारानं त्याच्या कलेतूनच उत्तर द्यायचं असतं. पत्रकारांनी बेगम अख्तर यांना या दादर्‍याबाबत खुप छेडलं. बाईंनी काहीच उत्तर दिलं नाही. नुसतं स्मित हास्य करून तो विषय संपवून टाकला. 

बेगम अख्तर यांचा जन्म फैजाबादचा. त्यांच्या सुरवातीच्या सगळ्या रेकॉर्ड ‘अख्तरी फैजाबादी’ या नावानेच आहेत. बेहजाद लखनवी याची गझल, 

दीवाना बनाना है तो दीवाना बना दे
वरना कही तकदीर तमाशा न बना दे
ऐ देखनेवालो, मुझे हँस हॅसके न देखो
तुमको मुहब्बत कही मुझसा न बना दे..

अख्तरीबाईंनी गायली आणि ती तुफान लोकप्रिय झाली. पंडित जसराज यांनी या गझलेची एक सुंदर आठवण सांगितली आहे. त्यांच्या शाळेच्या रस्त्यावर एक छोटंसं दुकान होतं. तिथं ग्रामोफोनचा मोठा कर्णा लावलेला असायचा. रोज तिथं हीच गझल चालू असायची. जसराज तिथेच पायरीवर बसून ऐकत रहायचे. शाळा सुटायची वेळ झाली की घरी परत जायचे.  शेवटी शाळेतून त्यांचं नावच काढून टाकण्यात आलं. जसराज गमतीनं म्हणायचे अख्तरीबाईंमुळे माझं नाव शाळेतून काढलं गेलं. आणि म्हणूनच मी गाण्यात काहीतरी नाव काढू शकलो. नसता त्या शाळेच्या आणि पुढे करिअरच्या गुंत्यातच अडकून पडलो असतो. 

बेगम अख्तर यांचं घराणं म्हणजे गळ्यात पेटी अडकवून दारोदार गाणं गात फिरणार्‍या नटनी बेडनी चं घराणं. बैठकीत बसून गाणं म्हणणार्‍या तवायफ यांना आपल्यापेक्षा कमी लेखायच्या. बेगम अख्तर यांचा आवाज, गाण्याचा रियाज, गाण्यासाठीची तळमळ पाहून नर्गिस ची आई जद्दनबाई हीने त्यांना कलकत्त्याला बोलावून घेतलं. तिथल्या तवायफ बेगम अख्तर यांच्याबद्दल आकस बाळगून होत्या. जद्दनबाई यांनी मध्यस्थी केली. सगळ्या मोठ्या तवायफांची आपल्या घरी बैठक बोलावली. त्यात बेगम अख्तरला गायला लावलं. फुल बत्तासे वाटून त्यांच्यावर ओढणी पांघरली. सगळ्यांच्या पाया पडायला लावलं. आणि मग सगळ्या तवायफांनी बेगम अख्तर यांच्या गाण्याच्या मैफिलींना मान्यता दिली. पत्रकार अंबरिश मिश्रांनी आपल्या ‘शुभ्र काही जीवघेणे’ या पुस्तकात हा किस्सा मोठ्या रंजकतेनं लिहून ठेवला आहे.   

बेगम अख्तर यांनी काही चित्रपटांतून कामं केली. पण त्यांचे मन तिथे रमले नाही. चित्रपट सृष्टीनेही त्यांना स्विकारले नाही. 1942 च्या सुमारास आलेला ‘रोटी’ हा त्यांचा चित्रपट काहीसा गाजला. पण पुढे कारकीर्द मात्र बहरली नाही.

सांसारिक आयुष्यातही त्यांना सुख मिळू शकलं नाही. लग्नानंतर गर्भ राहिला पण  थोड्या काळातच गर्भपात झाला आणि एक स्वप्न विरून गेलं. बाई मग संसारात रमल्याच नाहीत. त्यांच्या पतीला त्यांच्या गाण्याची तळमळ कळली. अख्तरी फैजाबादी या नावानं आत्तापर्यंत त्यांची सांगितीक कारकिर्द बहरली होती. गर्भपाताच्या दु:खातून त्या बाहेर पडून गायल्या लागल्या ते नविन नाव घेवूनच. आता ‘बेगम अख्तर’ या नावानं त्यांची सांगितीक कारकीर्द सुरू झाली. 

दिवाना बनाना है या गझलेनं त्यांना प्रसिद्धी मिळवून दिली होती. आता दुसर्‍या पर्वात शकिल बदायुनीच्या 

ऐ मुहोब्बत तेरे अंजाम पे रोना आया
जाने क्यों आज तेरे नाम पे रोना आया

या त्यांच्या गझलेने कहर माजवला. आजही ही गझल रसिकांच्या स्मरणात आहे. गझलेने  बाईंना  नाव दिले गझलेत त्यांचे योगदानही आहे पण त्यासोबतच उपशास्त्रीय संगीतातही त्यांचं मोठं योगदान आहे. ठूमरी, दादरा, चैती, कजरी या गानप्रकारांना त्यांनी सामाजिक प्रतिष्ठा मिळवून दिली. तवायफांच्या कोठ्यावर असलेलं हे गाणं बाहेर काढलं. संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते स्विकारताना बाईंना आपल्या कलेचे चीज झाल्याचं एक वेगळंच समाधान वाटलं. एरव्ही ज्या काळात बेगम अख्तर गायच्या तेंव्हा गाण्याला प्रतिष्ठा नव्हती. गाण्यार्‍या बाईला तर केवळ तुच्छतेनं भोगवस्तू म्हणूनच पाहिलं जायचं. 
अख्तरीबाईंच्या गळ्यावर सत्यजीत रे सारख्या महान दिग्दर्शकाचा विश्वास होता. म्हणूनच जलसा घर नावाच्या आपल्या चित्रपटात जमिनदार छबी विश्वास याच्या हवेलीत गाणं गाण्यासाठी बेगम अख्तर यांनाच बोलावलं. स्वर तर बेगम अख्तर यांचा आहेच पण भूमिकाही त्यानीची केली आहे. या चित्रपटाट  त्यांनी  मिश्र पिलूतील ठूमरी ‘भर भर आयी मोरी आँखिया पियाबीन..’ गायली आहे. 

बेगम अख्तरवर लिहीताना अंबरिश मिश्र यांना काही संदर्भ लागत नव्हते. त्यांनी महान संगीतकार नौशाद यांना याबाबत विचारले. नौशाद यांनी दिलेलं उत्तर मोठं मार्मिक आहे. ते म्हणाले, ‘जहॉं जहॉं गॅप्स लगती है वहां वहां अख्तरी के गझलों के दिये रख दो. चारों ओर रोशनी ही रोशनी.’

बेगम अख्तर यांचा शेवटचा कार्यक्रम अहमदाबादला होता. त्यांच्या छातीत कळा येत होत्या. कोणी सुचवले की आपण विश्रांती घ्या. गाऊ नका. बाई म्हणाल्या ‘ये भी क्या मशवरा है? अगर गाते गाते ही मेरी मौत हो जाये, तो इससे बढकर मेरी खुशकिस्मती और क्या होगी?’. खरंच गाणं संपत असताना त्यांच्या  छातीतल्या कळा वाढल्या. भैरवी कशीबशी संपवली आणि त्यांना लगेच दवाखान्यात दाखल करण्यात आलं. माधव मोहोळकर यांनी आपल्या ‘गीतयात्री’ पुस्तकात या प्रसंगावर लिहीताना अख्तरीबाईंच्या पहिल्या गाजलेल्या गझलेच्या ओळींचा उल्लेख केला आहे. बेहजाद लखनवीची ती गझल आहे. त्यातील एक शेर असा आहे

मै ढूंढ रहा हूँ मेरी वो शमा कहॉं है
जो बज्म की हर चीज को परवाना बना दे
दीवाना बनाना है तो दीवाना बनाना दे..

व्यवस्थेचा बेगडी विरोध न करता प्रत्यक्ष कृती करण्यावर बेगम अख्तर यांचा भर होता. त्यांना आकाशवाणीत राष्ट्रीय प्रसारणासाठी बोलावण्यात आलं. त्यांनी गझल गायची तयारी केली तेंव्हा त्यांना सांगितलं की गझल गायला आकाशवाणीवर बंदी आहे. आपण ठूमरी दादरा किंवा इतर उपशास्त्रीय काहीतरी गा. बाईंनी बाणेदारपणे नकार दिला आणि तिथून न गाता परतल्या. प्रसारण मंत्र्यांना हे कळले आणि जेंव्हा आकाशवाणीच्या नियमात दुरूस्ती होवून गझल गायला परवानगी मिळाली तेंव्हाच बेगम अख्तर आकाशवाणीवर गायल्या.

याच महिन्यात जयंती आणि पुण्यतिथी असलेल्या या महान गायिकेला विनम्र अभिवादन ! 

श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575  

No comments:

Post a Comment