उरूस, 18 नोव्हेंबर 2021
उसंतवाणी- 235
(बाबासाहेब पुरंदर यांचे निधन झाले. त्यांना वाहिलेली ही शब्दश्रद्धांजली !)
शिवशाहिरा घे । मानाचा मुजरा ।
लागल्या नजरा । स्वर्गाकडे ॥
शिवबांच्या पायी । ठेवोनी मस्तक ।
जोडीले हस्तक । भक्तीभावे ॥
शिवबांनी भक्ता । लावियले गळा ।
धन्य तो सोहळा । कौतुकाचा ॥
गड किल्ले आज । रडती मुकाट ।
सुन्न पायवाट । बुरूजाची ॥
शिवमय ज्याची । बहरली वाणी ।
फुलली लेखणी । जन्मभर ॥
शिवासाठी ज्याने । केली पायपीट ।
तोचि झाला वीट । चरणाशी ॥
‘शंभर’ नंबरी । आयुष्य हे सोने ।
कांत गाई गाणे । गौरवाने ॥
(16 नोव्हेंबर 2021)
उसंतवाणी- 236
(मिलिंद तेलतुंबडे याचा पोलिसांच्या चकमकीत खात्मा करण्यात आला. त्यामुळे एक मोठा धक्का पुरोगाम्यांना बसला आहे. नक्षलवादाचे प्रत्यक्ष/अप्रत्यक्षरित्या समर्थन करणारे अडचणीत आले आहेत.)
तेलतुंबडेचा । झाला असे खात्मा ।
तळमळे आत्मा । पुरोगामी ॥
संघर्षाच्या खोट्या । रचुनिया गाथा ।
पिकविला माथा । सामान्यांचा ॥
आदिवासींसाठी । करी म्हणे हिंसा ।
गांधींची अहिंसा । बुडवुनी ॥
लोकशाही मूल्ये । दिली पायदळी ।
बंदुकीची गोळी । सन्मानिली ॥
अर्बन नक्षल । घेवुनी मुखोटा ।
विचार हा खोटा । प्रचारीला ॥
कायद्याची बसे । जोरात थप्पड ।
हो तिळपापड । कम्युनिस्ट ॥
कांत धरू जाता । हिंसेचा पदर ।
बनते कबर । चळवळे ॥
(17 नोव्हेंबर 2021)
उसंतवाणी-237
(सोयाबीनचे भाव खाली पाडा असे आवाहन पोल्ट्री असोसिएशन च्या वतीने सरकारला करण्यात आले. कारण कोंबड्यांना पशुखाद्य म्हणून सोयाबीन स्वस्तात उपलब्ध झाले पाहिजे.)
शेतमाल भाव । चला खाली पाडू ।
शेतकरी गाडू । मातीमध्ये ॥
पोल्ट्रीसाठी हवे । सोयाबीन स्वस्त ।
होवू दे उध्वस्त । शेतकरी ॥
हमी भाव खरा । आहे कमी भाव ।
बुडवितो नाव । शेतीची ही ॥
‘इंडिया’ ‘भारत’ । द्वैताची ही रेषा ।
शोषणाची दिशा । ठरलेली ॥
‘भारत’ कष्टाळू । राहतो उपाशी ।
‘इंडिया’ तुपाशी । आयतोबा ॥
आयात करूनी । स्वस्त कच्चा माल ।
कुणबी उलाल । देशातला ॥
शेतीचे शोषण । सर्कारी धोरण ।
देशाचे मरण । कांत म्हणे ॥
(18 नोव्हेंबर 2021)
श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575