उरूस, 12 नोव्हेंबर 2021
उसंतवाणी- 229
(देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मलिक यांनी अंडरवर्ल्डशी संबंधीत जमिनी खरेदी केल्या असा पुराव्यासह आरोप केला. त्याने मलिक अस्वस्थ झाले. कुर्ल्याच्या तीन एकर जमिनीचे हे प्रकरण आहे. )
देवेंद्र घालतो । ‘नवाबा’त हड्डी ।
आरोप कबड्डी । सुरू झाली ॥
भूमी व्यवहार । दिसते वंडर ।
वर्ल्ड हे अंडर । गुंतलेले ॥
कुणाचे कुणाशी । आहे साटेलोटे ।
बारामती वाटे । सारे जाते ॥
सर्वत्र पसरे । चांदणे शरद ।
करिते गारद । भले भले ॥
शरद ऋतूत । चंद्राला ग्रहण ।
पेटले हे रण । राजकीय ॥
राष्ट्रवादीकडे । सदा गृह खाते ।
खाण्यासाठी नाते । जपलेले ॥
अंडरवर्ल्डशी । नात्याचे गुपित ।
सत्तेच्या कुपीत । कांत म्हणे ॥
(10 नोव्हेंबर 2021)
उसंतवाणी- 230
(नाशिक साहित्य संमेलनाच्या गीतामधून सावरकरांचे नाव वगळले. यावर तीव्र प्रतिक्रिया सावरकर प्रेमी साहित्य प्रेमी यांच्यामध्ये उमटली. त्याची दखल घेत हे नाव नव्याने समाविष्ट करण्यात आले. )
सावरकरांचे । वगळले नाव ।
नाशकात भाव । भलत्यांना ॥
छोटे मोठे कुणी । कवी फुटकळ ।
नेते भुजबळ । समाविष्ट ॥
लिहुनिया किती । साहित्य सकस ।
ठेवूनी आकस । नाकारले ॥
लेखण्या मोडून । बंदुका घ्या हाती ।
अशी ज्याची ख्याती । अभिमानी ॥
संमेलन गीती । त्याला नाही स्थान ।
बुद्धीने गहाण । पडले हे ॥
भिंतीरती जो । लिहीतो कविता ।
प्रकाश सविता । साहित्याचा ॥
संमेलन जत्रा । सुमारांची सद्दी ।
साहित्य हे रद्दी । कांत म्हणे ॥
(11 नोव्हेंबर 2021)
उसंतवाणी-231
(उद्धव ठाकरे यांना मानेच्या त्रासासाठी गळ्यात कॉलर बसवावी लागली.)
गळ्यात दिसे तो । मानेसाठी पट्टा ।
राजकीय थट्टा । अदृश्याची ॥
तिचाकी रिक्षाचा । रोजच दणका ।
तुटतो मणका । अभिमानी ॥
बाळासाहेबांचा । होता ताठ कणा ।
नाही खाणाखुणा । त्याच्या कुठे ॥
पाळीव वाघाच्या । मवाळ गर्जना ।
लाचार याचना । सत्तेसाठी ॥
आघाडीचे मंत्री । फुसके नवाब ।
हड्डीत कबाब । काय खावे? ॥
पद देवोनिया । ठेविले उपाशी ।
काकांची तुपाशी । फौज सारी ॥
पाठीचा असो की । राजकारणाचा ।
कणा महत्त्वाचा । कांत म्हणे ॥
(12 नोव्हेंबर 2021)
श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575