Monday, November 1, 2021

उसंतवाणी - राजकीय उपहास- भाग ७२

 

उरूस, 28 ऑक्टोबर  2021 

उसंतवाणी- 214

(शरद पवारांनी मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या अध्यक्षपदाची निवडणुक लढवली. 29 वि. 2 मतांनी त्यांनी ती जिंकली. पवारांचा साहित्याशी काय संबंध? ही संस्था तरी त्यांनी स्थापन केली का? )

ग्रंथप्रेमी काका । दाविती उमाळा ।
राजकिय चाळा । नका म्हणू ॥
या मराठी ग्रंथ । संग्रहालयाची ।
बिल्डिंग मोक्याची । योगायोग ॥
ग्रंथप्रेम शुद्ध । ध्यानी ना भुखंड ।
कोण तो श्रीखंड । उपहासे ॥
जुनी इमारत । व्हावी डेव्हलप ।
हेतू शुद्ध खुप । बघा जरा ॥
गगनचुंबी ही । होता इमारत ।
साहित्य प्रगत । होणारच ॥
ग्रंथासाठी मस्त । ए.सी. करू खोली ।
कोपर्‍यात खाली । कुठेतरी ॥
कांत दिसतो हा । ग्रंथ मकबरा ।
तोंडात तोबरा । विद्वानांच्या ॥
(26 ऑक्टोबर 2021)

उसंतवाणी- 215

(कश्मिर भारतात सामील झाला तो दिवस म्हणजे 27 ऑक्टोबर. या दिवसाला पाकिस्तानात काळा दिवस म्हणतात. कश्मिर भारताने कसा जबरदस्तीने गिळंकृत केलाय असा प्रचारच जागतिक पातळीवर केला जातो.)

27 ऑक्टो । हाचि तो दिवस ।
कश्मिरी अवस । संपविली ॥
श्रीनगरवर । मिळविला ताबा ।
पाक म्हणे तौबा । पळतांना ॥
पाकसाठी हाच । दिवस तो काळा ।
आतंकिंची शाळा । भरलेली ॥
भारतविरोधी । प्रचार हा नीट ।
चाले टुलकीट । जागतिक ॥
क्रिकेट हा आता । राहिला न खेळ ।
देशद्रोही मेळ । दिसू लागे ॥
व्यापलेला भाग । लागला निसटू ।
समूळ उपटू । विषवल्ली ॥
पीओके घेवून । देऊ या उत्तर ।
पसरो अत्तर । कांत म्हणे ॥
(27 ऑक्टोबर 2021)

उसंतवाणी-216

(सीएए आंदोलनात भडकावू भाषण केले म्हणून शर्जिल इमाम तुरूंगात आहे. त्याची जमानत याचिका फेटाळण्यात आली. त्यावर मानवाधिकाराचे नाव घेवून पुरोगाम्यांनी आरडा ओरड सुरू केली आहे.)

शर्जिल इमाम । मिळाली ना बेल ।
भोग आता जेल । कर्मफळे ॥
‘भारताला तोडू’ । देशद्रोही बोल ।
जिभेचा हा तोल । सुटलेला ॥
केवळ ना जीभ । दूषित हा मेंदू ।
सेक्युलर भोंदू । लाडावती ॥
कायद्याने नीट । आवळला फासा ।
तडफडे मासा । देशद्रोही ॥
‘डर का माहौल’ । केला बोलबाला ।
अल्पसंख्याकाला । भुलविले ॥
देशद्रोही त्याला । नाही दया माया ।
हवे बडवाया । कायद्याने ॥
युएपीए चा हा । बसता फटका ।
फुटला मटका । कांत म्हणे ॥
(28 ऑक्टोबर 2021)


श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575 

उसंतवाणी - राजकीय उपहास- भाग ७१



उरूस, 25 ऑक्टोबर  2021 

उसंतवाणी- 211

(राष्ट्रवादीचे प्रवक्ते मंत्री नवाब मलिक यांनी समीर वानखेडे या एनसीबी च्या अधिकार्‍याला उघड धमकी दिली की तुला एका वर्षांत तुरूंगात पाठवतो. )

मंत्रीपदे बसे । नवाब-ए-गांजा ।
वाजवतो झांजा । मग्रुरीचा ॥
अधिकार्‍याला दे । धमकी जोरात ।
तुला तुरूंगात । घालीन मी ॥
आई बाप त्याचे । सारे उद्धरीले ।
बोल जहरिले । असभ्य ते ॥
वैधानिक पदी । बसविले ज्याला ।
उन्मत्त तो झाला । सत्ता मदे ॥
ड्रग्ज व्यापाराचे । जाळे जागतिक ।
त्यात अगतिक । अडकले ॥
प्रश्‍न विचारता । उठतो भडका ।
शब्दांचा तडका । फडफड ॥
मारी वानखडे । अचुक हे खडे ।
मंत्री तडफडे । कांत म्हणे ॥
(23 ऑक्टोबर 2021)

उसंतवाणी- 212

(दिवाळीच्या काळात जश्‍न-ए-रिवाज या नावाने एक कलेक्शन फॅब इंडियाने काढले. शिवाय काही जाहिरात दारांनी आपल्या दिवाळी जाहिरातीतून कुंकू नसलेली स्त्री प्रतिमा दाखवली. यावर शेफाली वैद्य यांनी नो बिंदी नो हॅशटॅग अशी एक मोहिम सुरू केली. बघता बघता त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला आणि मग अपरिहार्यपणे जाहिरातदारांना बदलावे लागले. आपल्या जाहिरातीत कुंकू/टिकली/बिंदी लावणारी स्त्री दाखवावी लागली.)

दिवाळीला म्हणे । जश्‍न-ए-रिवाज ।
पुजेला नमाज । म्हणतील ॥
हिंदुंच्या सणाला । श्रद्धेवरी घाव ।
पुरोगामी आव । फुकटाचा ॥
बाईच्या कपाळी । नको म्हणे कुंकू ।
लिब्रांडू हे भुंकू । लागलेत ॥
सणांच्या भोवती । फिरे अर्थचक्र ।
तरी दृष्टी वक्र । हिंदुंवर ॥
आमचे उत्सव । सण समारंभ ।
आनंदाचा कुंभ । आम्हासाठी ॥
जनक्षोभापायी । ऍड बदलली ।
लढाई जिंकली । अर्थ-शस्त्रे ॥
कांत श्रद्धेला या । लावील जो धक्का ।
बंदोबस्त पक्का । करू त्याचा ॥
(24 ऑक्टोबर 2021)

उसंतवाणी-213

(आर्यन खान अटक प्रकरणांत अधिकारी समीर वानखेडे यांच्या विरोधात मंत्री नवाब मलिक यांनी आघाडीच उघडल्याने मोठा गुंता झाला. मंत्री विरूद्ध अधिकारी ही प्रशासनातील सावळा गोंधळाची प्रतिमा झाली.)

आर्यन केसचा । झाला फार गुंता ।
हबके जनता । पाहताना ॥
राज्यातला मंत्री । केंद्र अधिकारी ।
करी मारामारी । आपसांत ॥
राहिला ना घट्ट । ‘सैल’ साक्षीदार ।
शब्दांची माघार । घेत असे ॥
लाचेसाठी घेतो । नाव वानखेडे ।
उठे ओरखडे । कामावर ॥
ड्रग्ज रॅकेटची । खोल खोल मुळे ।
विषारी ही फळे । लगडती ॥
ड्रग्ज किंवा सत्ता । नशा भयंकर ।
अवैधाचा ज्वर । चढलेला ॥
कांत उंच उठो । सत्याचा आवाज ।
असत्याचा माज । उतरो हा ॥
(25 ऑक्टोबर 2021)


श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575 

औरंगाबाद परिसरांतील बारवा


(शिवतीर्थ वेरूळ)

औरंगाबाद परिसरांतील बारवा
(गवाक्ष दिवाळी अंक २०२१ ) 

बारव म्हणजेच पायर्‍या असलेली विहिर. केवळ बारव या नावाने आपण याला ओळखत असलो तरी याचे भरपूर प्रकार आहेत. पायर्‍यांची विहीर या बोली भाषेतील शब्दांत बारवेची नेमकी व्याख्या आलेली आहे. इतर विहिरीतून पाणी उपसण्यासाठी पोहर्‍याचा वापर करावा लागतो. किंवा मुळात या वहिरीचा उद्देशच पाणी उपसून त्याचा शेतीसाठी किंवा पिण्यासाठी उपयोग करणे असा असतो.

पण बारवेच्या बाबतीत मात्र पाणी मोटेने उपसणे हा हेतूच नाही. बारव ही त्या प्रदेशांतील जलव्यवस्थापनाचे केंद्र असते. बारवेच्या जवळपास उंचीवर एखादा तलाव, पाणीसाठा, नदी असते. त्या पाण्याचे जमिनीखालचे प्रवाह शोधून त्याच्या नेमक्या बिंदूवर बारव बांधली जाते. हीला पायर्‍या असल्याने त्याचा उद्देश पाणी प्रत्यक्ष घागरीने, म्हणजेच हाताने घेणे असा असतो.

बारवा जेंव्हा मंदिर परिसरांत बांधल्या जातात त्याला कुंड, तीर्थ, कल्लोळ अशी नावे असतात.  कंकालेश्वर (बीड) येथील मंदिर तर एका सुंदर अशा बांधीव कुंडातच आहे. मादळमोळी (जि. बीड) येथील बारव ही चारही बाजूने सुंदर अशा बांधीव ओवर्‍या असलेली आहे. आता या बारवेतच देवीचे मंदिर बनविल्या गेले आहे. चारठाण येथील पुष्करणी बारवही चारही बाजूने ओवर्‍यांचे बांधकाम केलेली अशी विस्तीर्ण आहे. ज्या अतिशय विस्तीर्ण अशा बारवा आहेत त्यांना पुष्करणी म्हणतात. अतिशय विस्तीर्ण असा तलाव कंधार येथे आहे त्याला ‘जगत्तुंग समुद्र’ असे नाव दिल्या गेले आहे.

महाराष्ट्रात हीनयान बौद्ध काळांत लयनस्थापत्यांत पाण्याच्या टाक्यांची निर्तिती झाल्याचे तज्ज्ञ मांडतात. त्यानंतर महाराष्ट्रात भव्य मंदिरांचे निर्माण होवू लागले तेंव्हाच पाणी साठवण्यासाठी व्यवस्थापनासाठी बारवांची निर्मिती मंदिर परिसरांत झालेली आढळते. मराठवाड्यांतील प्राचीन मंदिरांपैकी औंढा, निलंगा, जामखेड (ता.अंबड) येथे बांधलेल्या दगडी विहिरी आढळतात.

मराठवाड्यांत साधारणत: राष्ट्रकुटांच्या काळात मंदिरांची निर्मिती झालेली आहे. त्या अनुषंगाने त्याच काळात बारवांची निर्मितीची सुरवात दिसून येते. आज ज्या बारवा महाराष्ट्रात आढळून येतात त्यांचा कालखंड उत्तर चालुक्यांचा होय. (दहावे-अकरावे-बारवे शतक)

औरंगाबाद परिसरांतील तीन प्रमुख बारवा ज्या अतिशय भव्य आकर्षक आणि बारव वास्तुशास्त्राच्या दृष्टीने महत्त्वाच्या आहेत त्यांची दखल घ्यावी लागेल.

1. वेरुळचे शिवालय तीर्थ : ही बारव फार पुरातन आहे. अहिल्याबाईंनी हीचा इ.स. 1769 मध्ये जिर्णोद्धार केल्याचा उल्लेख तेथील शिलालेखात आहे. स्थापत्याच्या दृष्टीने अतिशय देखणे असे हे बांधकाम आहे. लाल चिर्‍यांत ही बारव बांधल्या गेली आहे. चारही बाजूंनी हीला करण्यासाठी सुंदर पायर्‍या आहेत. एका खाली एक असे सात टप्पे अशी पायर्‍यांची रचना केली आहे. बारवेच्या चारही बाजूनी अष्टकोनी आकाराचे बुरूजासारखे भक्कम बांधकाम केलेले आहे.

प्रत्येक बाजूस एकूण 56 पायर्‍या या बारवेस आहेत. चौथ्या टप्प्यांत चार दिशांना चार आणि चार कोपर्‍यांत चार अशी आठ देवळे आहेत. या आठही देवळांची शिखरे वैशिष्ट्यपूर्ण आणि वेगवेगळी आहेत. आठ दिशांच्या आठ देवता असे अष्ट दिक्पाल येथे दाखविले आहेत.

2. शेकटा बारव : औरंगाबाद जवळ वाळूजपासून शेंदूरवाद्याकडे एक रस्ता जातो. खाम नदीच्या काठावर शेंदूरवादा आहे. या शेंदूरवाद्याच्या बाजूला आताच्या बीडकीन पासून येणार्‍या मोठ्या रस्त्यावर (शेंद्रा-बीडकीन-नगर रोड) शेकटा आहे. शेकट्याची बारव औरंगाबाद परिसरांतील सर्वात भव्य आणि खोल अशी बारव आहे. ही बारव चौरस आकाराची आहे. पश्‍चिम बाजूला हीला दोन ठिकाणी प्रवेश करण्यासाठी पायर्‍या कोरलेल्या आहेत. प्रवेशाच्या पायर्‍या संपल्यावर एक सोपान (सपाट अशी जागा) सोडलेली आढळून येते. तेथून पर चौरस आकारात पायर्‍या उतरत उतरत निमुळत्या होत जातात. बारवेच्या दक्षिण बाजूला चार खांबावरचे शिवायलय आहे. त्याचे खांब आता ढासळले असून केवळ चौथरा शिल्लक आहेत. सहसा बारवेत न आढळणारी गोष्ट या बारवेत दिसून येते. पाणी उपसण्यासाठीची दगडी रचना दक्षिण काठावर केलेली आहे. मोटेने उपसलेले हे पाणी वाहून नेण्यासाठी दगडी हौद आणि पन्नास फुट अंतरापर्यंत दगडी नाला कोरलेला आहे. हे सहसा बारवेत आढळत नाही.
या बारवेत एकूण प्रत्ये बाजूला दोन असे आठ देवकोष्टके आहेत. पण यात आता देवतांच्या मुर्ती आढळून येत नाहीत.  शिवालयातील महादेवाची पिंडी शाबुत आहे. आजही शिवरात्रीला येथे उत्सव साजरा केला जातो.
बारवेला भव्य अशी संरक्षक भिंतही बांधलेली आहे. सहसा बारवा संपूर्णत: जमिनीतच असल्याने अशा भिंती आढळून येत नाहीत. पण शेकट्याची बारव ही याला अपवाद आहे.

3. खुफिया बावडी : ही बारव देवगिरी किल्ल्याच्या पाठीमागे फतेयाबाद गावात आहेत. हीला खुफिया बावडी असे म्हणतात. हे निजामशाहीच्या काळातील बांधकाम असल्याचे मानले जाते. एका खाजगी शेतात ही बावडी आहे. उत्तरदिशेने जमिनीत उतरत गेलेल्या पायर्‍या आहेत. तीन तीन ओवर्‍यांच्या तीन भव्य बाजू आणि प्रवेशाची चौथी बाजू अशी ही खुफिया बावडी. गुप्त मसलतीसाठी हीचा वापर केला जायचा. चौरस आकाराच्या या बावडीच्या तीनही बाजूस कमानींची मोठी दालने आहेत. कमानींवर घुमट बांधण्याची शैली बहमनी कालखंडात मराठवाड्यात आढळून येते. पूर्वीच्या काळात अशा दगडी कमानी नाहीत.

खुफिया बावडीचे बांधकाम अजूनही भक्कम आहे. या बावडीचे पाणी शेतकरी आजही वापरतात.

याच खुफिया बावडीची लहान बहिण शोभावी अशी तीन ऐवजी एकाच कमानीच्या चार बाजू चार ओवर्‍या अशी छोटी वीटांनी बांधकाम केलेली बावडी औरंगाबाद शहरात कर्णपुरा देवीच्या मंदिरा जवळ उत्तर बाजूला शेतात आहे. ही बारव मोगलांच्या काळातील असावी. भाजलेल्या दगडी पातळ विटांनी हीचे बांधकाम केले आहे.

बीडकीन शहरांत तीन अतिशय चांगल्या बारवा आहेत. एक तर अगदी अलीकडच्या कळातील भर बाजारात असलेली किल्लीच्या आकराची बारव आहे. एका बाजूने पायर्‍या आहेत. ही बारव गोल अकाराची आहे. पायर्‍यां जवळ देवकोष्टक असून त्यात सात आसरा आहेत. दुसरी बारव मुस्लीम कबरस्तानात असून चौकोनी आकाराची आहे. त्या परिसरांत मंदिराचे अवशेष विखुरलेले आहेत. एकेकाळी इथे महादेव मंदिर असल्याच्या खुणा आजही आढळून येतात. तिसरी बारव  एकात एक चार टप्पे असलेली आहे. एका बाजूने या बारवेला प्रवेशाच्या पायर्‍या आहेत. बारवेत समोरा समोर असे दोन मंडप आढळून येतात. एका देवकोष्टकांत शेषशायी विष्णुची मूर्ती ठेवली आहे. औरंगाबाद परिसरांत बारवेत ज्या देवता आढळून येतात त्याचा पुरावा केवळ बीडकीन येथेच मिळतो. इतर ठिकाणच्या मुर्ती आता अस्तित्वात नाहीत. शेषशायी विष्णु मुर्ती ही केवळ जलाशयापाशीच आढळून येते. क्षीरसागरात शेषशय्येवर पहुडलेले विष्णु आणि त्यांची पाय दाबणारी लक्ष्मी अशी ही मुर्ती असते. याच मुर्तीच्या प्रभावळीत अष्टदिक्पाल यांच्याही मुर्ती आढळतात.

शेकट्याच्या जवळच्या शिवारात एका बुजलेल्या आवारात आजही ही शेषशायी विष्णुची मुर्ती झिजलेल्या अवस्थेत आहेत. त्याचे संवर्धन गावकर्‍यांनी नुकतेच केले आहे.  

प्रत्यक्ष औरंगाबाद शहर आणि परिसरांत एकूण 18 बारवांची नोंद केल्या गेली आहे. खरं तर अजूनही काही बारवा सापडतील पण त्या बहुतांश नष्ट झाल्या, बुजल्या, कचरा टाकल्या गेला अशा आहेत. बांधकाम दृष्ट्या त्यांच्यात काही फारसे महत्त्वाचे नाही.

हर्सूल देवी परिसरांत तीन बारवा आहेत. एक तर प्रत्यक्ष देवीच्या मंदिरासमोरचे कुंडच आहे. त्याचा आकार चौरस आहे. त्याचा आकारही लहान आहे. बाकी दोन बारवा जरा दुर अंतरावर आहेत. मंदिराच्या दक्षिणेला जी मोठी बारव आहे ती एका मोठ्या बांधकामाचा महलाचा भाग असावा अशी आहे. जाळी उभारून तीला संरक्षीत केल्या गेले आहे. तिचा आकार चौरस आहे. याच बारवेजवळ एक सतीचा बुरूज आहे. शिवाय एक राजस्थानी शैलीतील एक समाधीसारखे बांधकामही आहे. हा संपूर्ण महल असावा. आता तिथे केवळ मोकळी जागा आहे. जोत्याचे दगडी अवशेष काही ठिकाणी सापडतात.

शहरांतील एक अष्टकोनी छोटी बारव समर्थनगर मध्ये आहे. (प्लॉट क्र.244 च्या बाजूची खुली जागा). हीला पुर्वकडून उतरण्यास पायर्‍या असून त्या परत उत्तरेकडे वळल्या आहेत. बारव अष्टकोनी असून संपूर्ण दगडी बांधकाम उत्तम अवस्थेत आहे. बारवेत भरपुर पाणी आहे. यशवंतराव होळकरांच्या काळात याच जागी एक महाल होता. त्या महालाच्या घुमटाचे अवशेष अजूनही शाबूत आहेत. जिथे आता अतिक्रमण केल्या गेले आहे. त्या महालाचा एक भाग म्हणजे ही बारव असावी.

विद्यापीठ परिसरांत सोनेरी महाल येथे दोन बारवा आहेत. या बारवांचे बहुतांश बांधकाम शाबूत आहे. शिवाय परिसरांत अजून एक मोठी बारव आहे.

जिचा खास उल्लेख करावा लागेल अशी एक बारव म्हणजे हिमायत बागेतील शक्कर बावडी. औरंगजेबाचा काळात हिमायत बाग विकसित केल्या गेली. यात आयताकृती अशी ही शक्कर बावडी आहे. एका बाजूला वीटांचे भक्कम असे कमानी कमानीचे बांधकाम असून त्यावर मोट लावण्याची दगडी रचना आहे. तिथून पाणी उपसले जायचे. बाकी तीनही बाजूंनी बांधीव अशी ही बावडी आहे.

सातारा परिसरांत खंडोबाचे मंदिर आहे. याच परिसरांत दोन बारवा आहेत. या बारवांची पडझड झालेली आहे. अहिल्याबाईंनी या खंडोबा मंदिराचा जिर्णोद्धार केल्याचा उल्लेख आढळतो. त्याच काळात या बारवाही दुरूस्त केल्या असाव्यात. पण त्या आता चांगल्या अवस्थेत नाहीत.

प्रत्यक्ष औरंगाबाद शहराचा जो भाग आता मुख्य वस्तीचा भाग आहे त्याला फारसा प्राचीन इतिहास नाही. याउलट औरंगाबाद लेण्या, हर्सूल देवी परिसर, सातारा डोंगर परिसर, कर्णपुरा, जाधववाडी येथे जूने संदर्भ आहेत. त्यामुळे जून्या बारवा या शहराच्या मध्यवर्ती अशा ठिकाणी नसून बाह्य भागात आहेत.

औरंगाबाद ही सैनिकांची वस्ती होती. नंतर मलिक अंबर काळापासून या शहराला चेहरामोहरा प्राप्त झाला. मलिक अंबर काळात पाणी व्यवस्थापनाची वेगळी अशी व्यवस्था नहरींद्वारे केली गेली. याचा परिणाम म्हणजे या परिसरांत बारवांची अवश्यकता राहिली नाही. कारण खापरी नळांद्वारे पाणी संपूर्ण परिसरांत खेळवले गेले होते. तसे नळ जागजागी आढळतात.

सातारा डोंगरावर खंडोबाचे मुळ प्राचीन मंदिर आहे. त्याला कालखंड अगदी यादवांच्याही आधी उत्तर चालूक्यांच्या काळापर्यंत जातो. याच मंदिरा जवळ दगडी बांधकाम असेलेले कुंड आहे. या कुंडाच्या तीन बाजू नीट बांधलेल्या आहेत. उतराची तिसरी पश्चिमेकडची बाजू मोकळी आहे. म्हणजे तेथूनपाणी वहात येवून या कुंडात साठवले जात असे. आजही या कुंडात पाणी साठते.

महाराष्ट्रांतील बारवांची मोहिम चालविणार्‍या रोहन काळे या तरुणाने शहरांतील एक दोन नव्हे तर 18 बारवांची नोंद जी.पी.एस. लोकेशन सह महाराष्ट्राच्या नकाशावर केली आहे. त्यांची यादी आणि त्यांचे लोकेशन खालील तक्त्यात दिले आहेत. आपण या बारवां नकाशावर जरूर शोधा. - समोर मॅपवरील क्रमांक दिला आहे. शिवाय जीपीएस कोऑर्डिनेटही दिले आहेत. या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून महाराष्ट्रातील तब्बल 1500 बारवा नकाशावर आल्या आहेत. यातील 10 बारवांना महाराष्ट्र पर्यटन नकाशावर पर्यटन महामंडळाने स्थानही दिले आहे.

 
1. विद्यापीठ परिसर शिवमंदिर बारव - 191
2. सोनेरी महल परिसर बारव-192
3. विद्यापीठ परिसर शिवमंदिर बारव 2- 193
4. कर्णपुरा देवीमंदिर बारव -194
5. शिवमंदिर बारव - 196
6. चरणदास हनुमान मंदिर बारव - 432
7. निपट निरंजन बारव - 433
8. सोनेरी महल परिसर बारव 2 - 434
9. विद्यापीठ परिसर बारव 3 - 435
10. छत्रीची बारव - 436
11.  गंगा बावडी - 437
12.  हरसिद्धी मंदिर (हर्सूल) बारव - 438
13. हरसिद्धी मंदिर बारव 2- 439
14. सुरेवाडी महादेव मंदिर बारव - 440
15. गुरूची बावडी- 441
16. समर्थ नगर बारव - 795
17. शक्कर बावडी - 986
18. हरसिद्धी मंदिर बारव 3 - 1276  

(पुरक संदर्भ : महराष्ट्रातील बारव स्थापत्य आणि परंपरिक जलव्यवस्थापन, लेखक अरूणचंद्र पाठक, अपरांत प्रकाशन)

(बारवेंचे नकाशावरील स्थान निश्चिती संदर्भ रोहन काळे.)
(फोटो सौजन्य व्हिन्सेंट पास्किनली)

Friday, October 22, 2021

उसंतवाणी - राजकीय उपहास- भाग ७०

 

उरूस, 22 ऑक्टोबर  2021 

उसंतवाणी- 208

(बांग्ला देशात हिंदुंवर अनन्वीत अत्याचाराच्या घटना समोर आल्या. त्याने सारे जग हादरून गेले. )

बांगला देशात । हिंदुंचा संहार ।
विषारी फुत्कार । धर्मांधांचे ॥
सेक्युलर येथे । वाजते डफली ।
हिंदुंची कापली । मान तिथे ॥
सीएए विरोधी । केला ज्यांनी शंख ।
त्यांना बसे डंख । कट्टरांचा ॥
बांगला देशी हा । ओके द्वेष आग ।
फणा काढी नाग । धर्मवेडा ॥
अडकले होते । पाक जबड्यांत ।
वाचवे भारत । बांग्लादेशा ॥
उपकाराची या । जरा न जाणीव ।
हिंदुंचा घे जीव । नीचपणे ॥
कट्टर इस्लामी । धर्मांधता शाप ।
जगा त्याचा ताप । कांत म्हणे ॥
(20 ऑक्टोबर 2021)

उसंतवाणी- 209

(आर्यन खानला सत्र न्यायालयात जामिन मिळाला नाही. आता त्यांचे वकिल उच्च न्यायालयात गेले आहेत.)

मागतो ‘मन्नत’ । तरी नाही बेल ।
नशिबात जेल । आर्यनच्या ॥
चर्चा करू करू । थकले लिब्रांडू ।
कायद्याचा दांडू । माथ्यावर ॥
शाहरूख ब्रँड । उतरला भाव ।
बदनामी घाव । कारट्याचा ॥
कायद्याचा कधी । मानतो ना धाक ।
त्याचे आज नाक । ठेचले हे ॥
कायद्यापुढती । सगळे समान ।
परि असमान । कायदाच ॥
अशा नाठाळांना । बसे आज धक्का ।
झाले हक्का बक्का । बॉलीवुड ॥
माज असे ज्याला । दुनिया ‘मुठ्ठी में’ ।
जाई तो ‘मिट्टी में’ । कांत म्हणे ॥
(21 ऑक्टोबर 2021)

उसंतवाणी-210

(21 ऑक्टोबर रोजी 100 कोटी चा टप्पा कोरोना विरोधी लसीकरणाने गाठला. इकडे महाविकास आघाडीने महाराष्ट्रात हप्ते वसुलीचा 100 कोटींचा टप्पा गाठला.)

100 कोटींचा । गाठला हा टप्पा ।
विरोधाच्या गप्पा । तरीसुद्धा ॥
कुणासाठी टप्पा । लसीकरणाचा ।
वशीकरणाचा । हप्त्यांसाठी ॥
100 कोटींच्या । हप्त्यांची वसुली ।
सत्तेची ढोसली । आघाडीने ॥
कोरोना काळात । केली बोंबाबोंब ।
भ्रष्टाचारी कोंब । उगवले ॥
इंजेक्शन असो । असो ऑक्सिजन ।
रडविले जन । व्यवस्थेने ॥
जनता सोशिक । चिवट जिवंत ।
झाली ‘लसवंत’ । अभिमाने ॥
साध्या माणसांचे । झुंजणे हे खास ।
रचे इतिहास । कांत म्हणे ॥
(22 ऑक्टोबर 2021)


श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575 

उसंतवाणी - राजकीय उपहास- भाग ६९

 

उरूस, 19 ऑक्टोबर  2021 

उसंतवाणी- 205

(कॉंग्रस कार्यकारिणी बैठक पार पडली आणि त्यात परत सोनिया गांधीच एक वर्ष हंगामी अध्यक्ष राहतील असा निर्णय झाला. ऑगस्ट 2022 मध्ये कॉंग्रेस अध्यक्षपदाची प्रक्रिया सुरू होईल. आणि ऑक्टोबरमध्ये अध्यक्ष निवडल्या जाईल आसे ठरविण्यात आले. परत राहुल गांधीच अध्यक्ष होतील असे संकेत अंबिका सोनी यांनी दिले आहेत. )

जुनीच सोनिया । जुनाच राहुल ।
नव्याची चाहूल । नको आम्हा ॥
आम्हा प्रिय भारी । वंश परंपरा ।
अध्यक्ष दुसरा । नाही दूजा ॥
हंगामी अध्यक्ष । ठेवूया कायम ।
हाच तो नियम । प्रिय आम्हा ॥
कुणी म्हणो पप्पु । कुणी म्हणो मठ्ठ ।
चिकटला घट्ट । पदाला जो ॥
जात नाही पीळ । जळो जरी सुंभ ।
तैसाची हा शुंभ । कांगरेसी ॥
भाजपच्या मनी । फुटली उकळी ।
स्पर्धा हो मोकळी । नेतृत्वाची ॥
थुंकलेला थुंका । चाटतो जो पुन्हा ।
कॉंग्रेसी तो जाणा । कांत म्हणे ॥
(17 ऑक्टोबर 2021)

उसंतवाणी- 206

(नवाब मलिक, जितेंद्र आव्हाड, अजित पवार, अनिल देशमुख सर्व राष्ट्रवादीचे मंत्री विविध कारणांनी गोत्यात आले आहेत. देशमुखांना तर राजीनामाच द्यावा लागला.)

हर्बल गांजाची । खिशात ही पुडी ।
राष्ट्रवादी ‘घडी’ । विस्कटली ॥
वझे वझे गेला । एक ‘वाजे’ पायी ।
हर्बलची घाई । दूजा नडे ॥
‘अनंत’ लीलेने । मारला ‘कर्मुसे’ ।
झाले कसेनुसे । अटकेने ॥
‘अजित’ गोत्यात । ईडीच्या धाडीने ।
केंद्राच्या खोडीने । खेळ चाले ॥
जागी थांबलेले । सारे मंत्री काटे ।
शिवलेले फाटे । जागजागी ॥
‘बारामती’ स्तब्ध । मुख्य तास काटा ।
उपहास मोठा । राजकीय ॥
दिल्लीच्या मोहात । निसटे गल्लीही ।
उडते खिल्ली ही । कांत म्हणे ॥
(18 ऑक्टोबर 2021)

उसंतवाणी-207

(दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी नव हिंदुत्वाचा मुद्दा मांडून नविन वादाला तोंड फोडले आहे.)

पाळीव वाघोबा । बोलतो तडक ।
हिंदूत्व कडक । आमचेच ॥
नव हिंदुत्वाचा । लाविला जो शोध ।
त्याच्यातुनी बोध । कांही नाही ॥
सेनेच्या हिंदुत्वी । उरला न राम ।
भरे ‘रोम रोम’ । सोनियाचा ॥
सेना हिंदुत्वाचा । सेक्युलर झब्बा ।
‘राज’ घाली बिब्बा । राजकीय ॥
सेना भवनाच्या । समोर पोस्टर ।
हिंदुत्व बुस्टर । डोस जणू ॥
सेनेचे हिंदुत्व । मिठाची मासळी ।
बाहेर वा जळी । जिवंत ना ॥
हिंदुत्व धरता । निसटते खुर्ची ।
सोडताच मिर्ची । कांत म्हणे ॥
(19 ऑक्टोबर 2021)

श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575 

उसंतवाणी - राजकीय उपहास- भाग ६८


 
उरूस, 16 ऑक्टोबर  2021 

उसंतवाणी- 202

(सावरकरांबाबत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी महात्मा गांधींच्या पत्राचा हवाला दिला आणि मोठा गदारोळ पुरोगाम्यांत उठला. वास्तविक हे पत्र खरे असल्याचे विक्रम संपत आणि उदय माहुरकर या लेखकांनी सप्रमाण सिद्ध केल्यावरही पुरोगामी ते मानायला तयार नाहीत.)

सावरकरांना । घातल्या ज्या शिव्या ।
त्याच्या झाल्या ओव्या । काळावर ॥
देशासाठी वीर । भोगे काळे पाणी ।
गौरवाची गाणी । त्यांच्यासाठी ॥
तरी पुरोगामी । काढितसे शका ।
बदनामी डंका । वाजतो हा ॥
अभ्यासक सत्य । मांडती निखळ ।
पुरोगामी मळ । जाईचना ॥
गांधीहत्या केस । निर्दोष सुटका ।
तरी दे फटका । आरोपांचा ॥
माफीपत्रांसाठी । फुकाचा गोंधळ ।
उलगडे घोळ । अभ्यासात ॥
कांत थुंकणे हे । सूर्यावरी जैसे ।
आपुल्याच बैसे । तोंडावरी ॥
(14 ऑक्टोबर 2021)

उसंतवाणी- 203

(आपला जावाई समीर खान हर्बल तंबाखु खातो त्याला विनाकारण एनसीबी ने पकडले असा अजब युक्तीवाद मंत्री राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला. आर्यन खानचा असा काही बचाव केला जातो आहे की तो निरागस मुलगा असून खिशात आईने दिलेल्या सातुच्या पिठाच्या गोळ्या घेवून फिरतो. )

दगडांत जैसा । शोभतो मार्बल ।
नशेत हर्बल । तंबाखू ही ॥
नवाबी थाटाने । बोलती मलिक ।
जावाई खारिक । खातो जणू ॥
आर्यन बाळाच्या । खिशामध्ये पीठ ।
तपासून नीट । पहा जरा ॥
सातू पीठ गोळ्या । देते गौरी आई ।
नका करू घाई । आरोपांची ॥
खावा गुपचुप । गायछाप जर्दा ।
कशासाठी गर्दा । करिता हा ॥
तुमची ती दारू । नाही जोरकस ।
थोर सोमरस । मोठ्यांचा हा ॥
कटला पतंग । तुटलेला मांजा ।
हर्बल हा गांजा । कांत म्हणे ॥
(15 ऑक्टोबर 2021)

उसंतवाणी-204

(दरवर्षी शिवसेनेच्या वतीने दसरा मेळावा घेतला जातो. या वर्षी यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाषण करताना जे तारे तोडले त्यावरून मुख्यमंत्री म्हणून आपण अपात्र आहोतच पण पक्ष प्रमुख म्हणूनही आपण अपात्र आहोत हेच उद्धव ठाकरेंनी सिद्ध केले.)

दसरा मेळावा । काय ते भाषण ।
सीमा उल्लंघन । घरातून ॥
शोधून शत्रूस । म्हणे आम्ही ठेचू ।
गोवर्‍या या वेचू । काकां घरी ॥
शिवसैनिकाला । करू मुख्यमंत्री ।
परि आधी मंत्री । पोरगा हा ॥
हे करू ते करू । स्वप्नांवर साय ।
झाले किती काय । सांगेचना ॥
सांगितली गोष्ट । कासव नी ससा ।
मनसोक्त हसा । श्रोते जन ॥
केंद्र तसे राज्य । म्हणे सार्वभौम ।
पसरला भ्रम । मेंदूमध्ये ॥
पाळीव वाघ हा । बोलतो जोशात ।
काकांच्या खिशात । कांत म्हणे ॥
(16 ऑक्टोबर 2021)

श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575 

उसंतवाणी-राजकीय उपहास-भाग ६७

 

उरूस, 13 ऑक्टोबर  2021 

उसंतवाणी- 199

(लखीमपुर हिंसाचारा विरोधात महाराष्ट्रात आघाडी सरकारने बंद पुकारला.)

युपीसाठी इथे । नौटंकीचा छंद ।
कशासाठी बंद । आघाडीचा ॥
करू म्हणे बंद । बोलतो जोमात ।
आधीच कोमात । महाराष्ट्र ॥
इथे सोयाबीन । गेले पाण्याखाली ।
कुणब्याला वाली । कुणी नाही ॥
जालियनवाला । बाग आठवते ।
मृत्यू विसरते । गोवारींचे ॥
मावळ आठवा । स्मरा सुरेगांव ।
काळजात घांव । कुणब्यांच्या ॥
कृषी कायद्यांत । काय आहे वांधा? ।
दलालांचा धंदा । बसणार ॥
कांत जो जो करी । महाराष्ट्र बंद ।
तोची भाउबंद । दलालांचा ॥
(11 ऑक्टोबर 2021)

उसंतवाणी- 200

(सलग 200 दिवस ही उसंतवाणी लिहिल्या गेली. आजची हा द्विशतकी अभंग. )

दोन शतकांची । झाली वाटचाल ।
पांघरती शाल । वाचक हे ॥
‘सत्य असत्याशी । मन केले ग्वाही ।
मानियेले नाही । बहुमतां’ ॥
तुकोबांचे शब्द । मानिले प्रमाण ।
जाहले निर्माण । हातून हे ॥
अस्वस्थ जनांची । मिटाया तलखी ।
वाहतो पालखी । शब्दांची ही ॥
संत रचनांचा । लागला जो लळा ।
ऐसी शब्दकळा । प्रकटली ॥
आपण लिहिले । नाही याचा दंभ ।
तुम्हा हाती कुंभ । नम्रतेने ॥
शतकांपासुनी । प्रबोधन वारी ।
त्यात वारकरी । कांत जाणा ॥
(12 ऑक्टोबर 2021)

उसंतवाणी-201

(महा विकास आघाडी सरकारने बंद केला. ऍटो टॅक्सी वाल्यांना बंदसाठी दमदाटी केली मारहाण केली. दुकाने जबरदस्ती बंद करण्यास भाग पाडले.)

आघाडीने केला । महाराष्ट्र बंद ।
मनमानी छंद । सरकारी ॥
आंदोलन मोर्चा । विरोधी हत्यार ।
केला अंगीकार । सत्ता पक्षे ॥
चालविता न ये । जयासी शासन ।
सोडावे आसन । तातडीने ॥
उतरे रस्त्यात । लावतसे काडी ।
जाळे बसगाडी । आपलीच ॥
तेंव्हा राजीनामे । खेळले खिशात ।
काकांच्या खिशात । पक्ष सारा ॥
सत्ता घोड्यावर । पक्की हवी मांड ।
राघु बोलभांड । कामाचे ना ॥
फुसक्या स्वाराला । लाथ मारी सत्ता ।
कटे त्याचा पत्ता । कांत म्हणे ॥
(13 ऑक्टोबर 2021)


श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575